मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०५
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद जवळपास १०० झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
2014 मध्ये मोदी सरकार आल्यावर
2014 मध्ये मोदी सरकार आल्यावर सिक्युलर लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि मुसलमानांना वाईट दिवस येतील अशी भीती दाखवली. तेव्हा दोन तीन वर्ष तरी "कुठे हिटलरसारख्या छळछावण्या काढल्यात?" असे विचारले जातात होते. तसे काही घडले नसल्याने सिक्युलर लोकांना गप्प करण्यात यश आले.
डिटेन्शन कॅम्पच्या रूपाने आता त्या प्रत्यक्षात येण्याची पहिली पायरी सुरू झाली आहे का?
हिंदू राष्ट्र
नेपाळ सोडून जगात आणखी एक स्वर्गवत हिंदू राष्ट्र निर्माण झाले आहे
खादाड हावरटपणा!
आज २४ डिसेंबर. ट्रंपतात्यांनी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. आम्हाला २६ तारखेला सुट्टी होती, ती घाईघाईनं बदलून २४ तारखेला दिली आहे. माझा अंदाज असा की लोकांनी ख्रिसमसच्या खरेद्या कराव्यात म्हणून ही सुट्टी आहे. धार्मिक कारण वगैरे अजिबात नाही. लोकांनी खरेद्या केल्या की मग अर्थव्यवस्था कशी सुदृढ आहे वगैरे ट्यँवट्यँव करता येईल. एकीकडे तात्यांवर महाभियोग चालला; पुढे ते त्यात दोषी ठरणार नाहीत, हेही स्पष्टच आहे. पण डाग लागला वगैरे.
आमच्या घराजवळ मोठा मॉल आहे. काल सकाळी ऑफिसच्या वेळेत गर्दी नव्हती, पण दुपारहून मॉलच्या आजूबाजूला चिकार गर्दी होती. शहरभर मॉल, दुकानांच्या भागात सगळीकडे ट्रॅफिक जॅम. आजही तसंच होईल असं वाटतंय.
माझ्याकडे २० डॉलरांचं एक कूपन आहे. कपड्यांचं दुकान. कसली गरज नाहीये, मग २० डॉलरांचं काही घ्यावं का, असा प्रश्न आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू घेता येत असतील तर ठीकच आहे! खाऊन संपून जातं.
जिम १ जानेवारीला उघडा आहे, ह्यावरून काल माझं आणि ट्रेनरचं बोलणं झालं होतं, 'नववर्ष-वाले येतात ना म्हणून १ तारखेला जिम बंद नाहीये', त्यानं स्पष्ट केलं. मला एकदम जाहिराती, फेसबुकवरच्या पोष्टी आणि प्रत्यक्ष आयुष्य एकत्र येत आहेत असं वाटलं. आज सकाळी जिमला गेले होते. तिथे ख्रिसमसच्या खरेदीवरून त्यानंच विषय काढला. "नातेवाईक विचारतात, तुला काय हवंय? मला काहीच नको असतं किंवा काही तरी छाटछूट. किंवा अगदी विचित्र काही तरी. ते ख्रिसमससाठी कसं मागायचं? ते लोक मागे लागतात, नवा लॅपटॉप घे, नवा फोन घे. मला त्याचा काही उपयोग नाही. टायपिंग आणि पावरपॉइंटसाठी नवा लॅपटॉप कशाला हवा!"
अमेरिकी, २२-२३ वर्षांचा तरुण गिफ्टागिफ्टीला नावं ठेवतोय बघून दिल बागबाग हो गया!
उद्याचे सूर्यग्रहण बघण्यासाठी
उद्याचे सूर्यग्रहण बघण्यासाठी तयार असलो तरी त्यावर पाणी पडण्याची निश्चिती आहे. चार दिवसांपासून सूर्य ढगाआड आहे.
सामान्य माणसास चंद्रासारखी कोर असणारा सूर्य दिसणे यापलिकडे काही गंमत नाही तरी पाहण्यासाठी साधा पडदा*1 वापरतो.
मुंबई ठाण्याकडे कंकण दिसणार नाही, कुन्नुर उटी,काराईकुडीला कंकण आहे.
*-1 गिफ्ट रापर कागदाचे दोन घडी करून काम होते. दोनचार सेकंद पाहण्यासाठी ठीक. दोनतीन ग्रहणात वापरले आहे. शिफारस करत नाही. सोलर फिल्टरच वापरावा.
शुद्धलेखन चुकले!
'मी पाहीलेला सूरयोदय' असे आहे ते.
परंतु ते असो.
ठाण्यात आणणार असाल तर सकाळी ८:०० ते १०:०० ह्या वेळात खग्रास ठेवा. तेव्हाच घरबसल्या सूर्य दिसतो. मग मीही 'मि पाहिलेला सुरयोदय' असं चित्र काढेन.
नसलेल्या (बोले तो, न दिसणाऱ्या) सूर्याचे/'सूरयोदया'चे चित्र काढणार? ॲबस्ट्रॅक्ट आर्ट? (अरे वा!)
मग काय चित्रात नसलेल्या सूर्याकडे बाण दाखवून 'ईथे सूरय आहे.' असे 'लीजंड' लिहिणार काय?
कल्पना उत्तम आहे. (आपल्यासारख्या कल्पक कलाकारांचा उस्ताद म्हणवून घेण्यात अभिमान वाटतो. आमची कला दोन पावले पुढे नेऊन ठेवलीत. अशीच उत्तुंग शिखरे गाठत राहा.)
मायबोलीवरच्या आईचे नाव मधले
मायबोलीवरच्या आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत या धाग्यावर बरीच चर्चा होत आहे.
क्राँसाँ
गेले बरेच महिने मी फार्मर्स मार्केटातून क्रॉसाँ विकत आणत आहे. दर शनिवारी सकाळी तिकडे जायचं, दोन क्रॉसाँ आणि कधीमधी सँडविचचा पाव आणायचा. त्या स्टॉलवरचे लोकही मला ओळखतात. आणि दर वेळेस मी 'क्रॉसाँ' मागितले की ते मला 'क्रॉसाँट का? बरं, बरं', असं म्हणतात.
हे उच्चार बरोब्बर अस्सेच. हा संवाद बरोब्बर अस्साच.
आज मी 'र'चा उच्चार थोडा घशातून केला. खाँसाँ असा काय तरी. मला जितपत फ्रेंच 'र' म्हणता येईल तितपत. आज त्यांनी माझा उच्चार न सुधारता दोन क्रॉसाँ पिशवीत भरून दिले.
शिकवलं मी त्यांना आणि त्यांनी मला.
(ह्यावरून 'पाव लाव' वगैरे विनोद अपेक्षित.)
उच्चाराची खुबी
croissant उच्चाराची खुबी अशी - ''oi''चा उच्चार ''वा'' 'r' हा घशातून निघतो असं ढोबळपणे म्हणतात, पण उच्छवास सोडताना जर तुम्ही ''अ'' म्हटलंत तर जो ध्वनी येतो तो फ्रेंच ''र'' त्यामुळे आधीच्या ''क''चा उच्चार ''ख''कडे झुकलेला वाटतो. तेव्हा ख् + र् + वा ख्र्वा आणि पुढे साँ असा ख्र्वासाँ. मला वाटतं गडबड ''वा'' न उच्चारता अनुनासिक ऑकार उच्चारल्याने तो फ्रेंच वाटे ना आणि फ्रान्सबाहेर फ्रेंचचे उच्चार जो तो आपापल्या चष्म्यातून करतो. निदान करकरीत क ऐवजी ''ख''सदृश उच्चार केल्यावर त्याला फ्रेंच ढब आली असावी. पण या शब्दात ''ट''चा उच्चार फ्रेंचमध्ये होत नाही हे न जाणणाऱ्यांचे खकार ऐकल्याने समाधान झाले की ''तुम नहीं सुधरोगी'' अशी त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली ?!
'ट'ची गंमत
कदाचित तसाच 'ही बाई सुधारण्यातली वाटत नाही, माफ करूया', असा विचार असावा. किंवा 'ग्राहकराणीला नाराज करू नये' असं बेकरीत शिकवलं असेल. किंवा नवीन वर्षाचा संकल्प. आता ह्यापुढे काय होतंय, त्यावरून कदाचित उलगडा होईल.
एकदा अटलांटा विमानतळावर पुढच्या विमानाची वाट बघत होते, तिथे एका बेकरीच्या दुकानात अशीच 'ट'ची गंमत झाली होती. मी 'क्रॉसाँ' मागत होते. दुकानातल्या आफ्रिकी-अमेरिकी तरुणीला ते समजत नव्हतं. काचेआडच्या पावाकडे मी बोट दाखवलं, त्याचा फायदा झाला नाही. मग 'तो नाही का, चंद्रकोरीच्या आकाराचा, चिकार लोणी घालतात तो फ्रेंच पाव', असं वर्णन सांगितलं, तरीही काही नाही. मग फक्त 'चंद्रकोरीच्या आकाराचा पाव' असं म्हणल्यावर 'तुला क्रसाँट हवाय का' असं अत्यंत तुच्छतापूर्ण आवाजात विचारण्यात आलं. मी हो म्हणल्यावर तिचा चेहरा 'कुठून कुठून परदेशी लोक येतात' असा झाला होता.
जगाचा मक्ता घेतलेल्या देशातल्या लोकांना फार फार आत्मविश्वास असतो, तो नक्की कुठून येतो, ह्याचा विचार मी सुरू केला.
---
तिर्री मांजर आमच्याकडे आली त्या सुरुवातीच्या महिन्यांतलीच गोष्ट. तिला बाहेर सोडायला सुरुवात केली होती. आजूबाजूला इतर कोणी मांजरं नाहीत, ह्याबद्दल तिची खात्री पटली होती. मी बाहेर काही तरी खुरपत होते. समोरून एक मोठा कुत्रा जात होता. माझ्या गुडघ्यापर्यंत निदान उंच असेल.
तिर्री शेपूट फुलारून त्याच्यावर ओरडली. कुत्र्याच्या चेहऱ्यावरची माशीसुद्धा हलली नाही. तो नेहमीप्रमाणे डुलत-डुलत, चालत पुढे गेला.
ह्या प्रकाराचं वर्णन मी बऱ्या अर्ध्याला सांगत होते. "तिला बहुतेक वाटतं की ती माझ्याएवढी उंच आहे. आणि मग तिनं त्या कुत्र्याला दम द्यायचा प्रयत्न केला"... म्हणून मी घशातून तसा आवाज काढून दाखवला.
बरा अर्धा थंडपणे म्हणाला, "ती फ्रेंचमध्ये 'रा' म्हणत होती तर!"
शंका (सवांतर)
फ्रान्सबाहेर फ्रेंचचे उच्चार जो तो आपापल्या चष्म्यातून करतो.
१. स्वित्झर्लंड/बेल्जियम/क्वेबेकमध्येसुद्धा???
२. उच्चार चष्म्यातून कसा करता येईल?
२अ. चष्मा ओठांसमोर धरून उच्चार करणे अपेक्षित आहे काय?
२ब. काँटॅक्ट लेन्सवाले लेन्सेस डोळ्यांतून काढून ओठांसमोर धरत असतील काय?
२क. लेन्स इंप्लांटवाले नेमके काय करत असतील?
२ड. ज्यांना चष्मा/लेन्स/अन्य तत्सम काही नाही, असे फ्रान्सबाहेरील लोक फ्रेंचचा उच्चार करण्याच्या भानगडीतच पडत नसतील काय?
अरे हो की!
किंबहुना, फ्रान्सबाहेरील चष्मा/काँटॅक्ट लेन्सवाल्यांनासुद्धा आपापली आयुधे नरड्यात कोंबून१ फ्रेंचचे उच्चार करता येतीलच, म्हणा. हे लक्षातच आले नव्हते माझ्या. आणून दिल्याबद्दल आभार.
..........
१अतिअवांतर: चिंजंच्या नरड्यात चष्मा कोंबलेला आहे, आणि ते (पुण्यात) फ्रेंच पाजळीत आहेत, असे चित्र डोळ्यांसमोरून तरळून गेले. क्षणिक परमसंतोष जाहला.
सरकारी नवीन नोटिशीनंतर ( पैसे
सरकारी नवीन नोटिशीनंतर ( पैसे ताबडतोब भरा) वोडाफोन (५३ह कोटी)भरण्यापेक्षा धंधा बंद करण्याच्या विचारात.
१३ तारखेपर्यंत विवरण द्यायचे आहे. किती पेट्या घेऊन कुठे उभे राहणार वगैरे.