Skip to main content

रामतीर्थकरबाई आणि बाबा?

तुम्हांला रामतीर्थकर बाई माहीत असतीलच. "भा करी करता आली च पाहिजे"वाल्या?

त्यांचं म्हणणं आहे, त्यांना आई म्हणायचं. आईचं म्हणणं नाकारता येत नाही, म्हणून आई. ठीक आहे, आई म्हणू! ज्यांचं दूध पितो त्या सगळ्या आया, असं म्हणण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती, माझं ठाण्यातलं बालपण आणि पुलंचा जोक एकत्र करायचं तर 'गोकुळ'च्या दुधाच्या पिशवीलाही आई म्हणावं लागेल. तुम्हाला पटवून देऊ का की ती पिशवी आई नव्हेच.

तर माझं आडनाव जोशी! बरोब्बर, मराठी मध्यमवर्गीयांचे सगळे दुर्गुण ज्यांच्यात एकत्र ठासलेले असतात, त्यांतली मी, जोशी! दुधाची पिशवी फोडायची म्हणली की मी पिशवीच्या कडेला समांतर कापायचे. पुस्तकाचं पान मुडपल्यासारखं त्रिकोणी नाही. त्रिकोण कुटुंब-नियोजनाचा असतो. ते नियोजन फसल्यामुळेच मी आले. तर त्रिकोणी काप नाही, पिशवीचं सील तेवढं कापायचं. दूध पातेल्यात ओतलं की मग सील टराटरा ... नाही, मी जोशी आहे. सुबकपणे सील कापून काढायचं. मग पिशवीत चार थेंब पाणी घालून, पिशवीला आतून चिकटलेलं दूध पातेल्यात घेतल्याचं समाधान करायचं.

गोकुळ पिशवी म्हणजे दूध नाही.

... आणि दूध तापवायला ठेवायच्याही आधी पिशवीत किंचित साबण आणि पाणी घालून पिशवी धुवायची. व्यवस्थित. मग सिंकच्या आतल्या बाजूच्या टाईल्स स्वच्छ आहेत हे बघून पिशवी वाळत घालायची. मला सांगा, त्या पिशवीची एवढी काळजी घेतल्यावर तिला आई म्हणता येईल का? आईकडे कोणी एवढं लक्ष देतं का? तर नाही, दुधाची पिशवी आई असणं शक्यच नाही.

त्यातून जिचं सील फोडायचं तिची तुलना आईशी... शी, शी, शी! मी जोशी आहे हो!!

पण म्हशीला आई म्हणायला माझी अजिबात ना नाही. ती म्हस असते कुठे; तिचं दूध कोण, कधी, किती वाजता काढतं; तिच्या वासरांचं काय होतं असले प्रश्न कोण विचारतं? माझ्या भावाला दूध मिळालं का ह्याची चौकशी मी कधीही केली नाही. तसंच. म्हणजे सगळ्या परींनी ती म्हैसही माझी आई. जिच्याकडे पुरेपूर दुर्लक्ष करायचं ती आई! तर मग रामतीर्थकर बाईंनी काय घोडं मारलंय! त्याही आईच.

तर परवा त्या म्हणाल्या, "... आमच्या पिढीनं कधी वडिलांच्या अंगाला हात लावला नाही. ... पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. पप्पा पुरुष आहेत ते लक्षात येत नाही?"

आमचे परमपूज्य मला सायकलीवर बसवून फिरायला न्यायचे हो! आठवा ते जुने सिनेमे, त्यात कसे हिरो-हिरवीण ...छे, छे, मी काही म्हणलेलं नाही. भलता चावटपणा नको. मी जोशी आहे. पण वडलांनाच चालतं एका सायकलवरून नेणं तर आम्हाला काय? अं?

मग ते शाळेत सोडायला यायचे. रस्ताभर बोट धरायला लावायचे. मी पण आगाऊ, ते बोट पुढे करायचे तर मी बाबांचं मनगट पकडायचे, कधी अख्खा हात पकडायचे, कधी कडेवर घ्या म्हणायचे! पण चूक कुणाची? सायकलवरून डबलसीट नेलं कुणी?

एकदा मी बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले. डोकं दुखायला लागलं. केवढी हाडं! उगाच नाही आईच्या मांडीवरच पोरं झोपत. बाबांच्या मांडीवर झोपवलं तर पोरांच्या कवटीचा भुगा होणार आणि वर रामतीर्थकर बाई भडकणार!

तर बाई भडकल्यात की मुली बाबांच्या गळ्यात पडतात,''पप्पा, पप्पा' म्हणत'. मलाही राग येतो. पप्पा हा काय शब्द आहे का! डॅडी म्हणावं, इंग्लिशमध्ये चांगला सोयीचा वाक्‌प्रचार आहे - डॅडी काँप्लेक्स!

नाही तर सरळ मराठीत म्हणावं, "बाबा!" राज ठाकरे भडकतील हो, मराठीत बोललं नाही तर? भडकतील का? वडलांना बाबा म्हणलं पाहिजे, असा आग्रह धरला तर मतं मिळतील का? ...का वडलांना मामा किंवा काका म्हणत नाही म्हणून बाई भडकल्यात? का भलत्याच पुरुषाच्या गळ्यात पडून 'पप्पा, पप्पा' म्हणत नाही आणि भलत्या पुरुषांना स्कँडलाईज करत नाहीत म्हणून बाई भडकल्यात.

मी फेसबुकवर नाव लावते - संहिता अदिती जोशी. संहिता आणि अदिती ही माझीच नावं आहेत. दोन्ही माझ्या जन्मापासून चालत आलेली आहेत. मी अत्यंत बोरिंग बाई आहे - मी जोशी आहे. पण लोकांना मी भलतीच रंगीबेरंगी वाटते. खरं तर माझ्यापेक्षा माझी आई रंगीत असेल असं वाटतं. काहींनी मला विचारलं होतं, मला माझ्या वडलांचं नाव माहीत नाही का? मी म्हणाले, "मला माझ्या वडलांचं नाव माहीत नसतं तर आईबद्दल मला खूपच जास्त आदर वाटला असता. पण नाही हो! माझी आई अगदी जेनेरिक, मराठी-मध्यमवर्गीयांना झेपेल इतपतच बंडखोर वगैरे होती. मुलगी शिकली प्रगती झाली, तेवढंच." तीही जोशी आडनाव लावायची!

लहानपणी आपण सगळे जोक सांगायचो. बंड्याचे बाबा एवढेच थोर आहेत की त्यांच्या घरी प्रियांका चोप्राचं पोस्टर आहे. माझे बाबा ... जोशी असले तरीही ... एवढे थोर आहेत, एवढे थोर आहेत, की मी त्यांच्या गळ्यात पडल्यामुळे रामतीर्थकर बाईंना डॅडी काँप्लेक्स येतो.

'न'वी बाजू Mon, 24/02/2020 - 07:49

त्यांचं म्हणणं आहे, त्यांना आई म्हणायचं. आईचं म्हणणं नाकारता येत नाही, म्हणून आई. ठीक आहे, आई म्हणू! ज्यांचं दूध पितो त्या सगळ्या आया, असं म्हणण्याची आपली भारतीय संस्कृती आहे.

ईईईईईईईईईई! म्हणजे, तुम्ही रामतीर्थकर बाईंचे दूध पिता??? (कल्पनेनेच शहारे आले!)

त्यातून जिचं सील फोडायचं तिची तुलना आईशी... शी, शी, शी!

Receipt acknowledged; No comments.

म्हणजे सगळ्या परींनी ती म्हैसही माझी आई.

हम्म्म्म्... शक्यता आहे खरी. (लक्षणे तर बरीच जुळतात.) असो.

तर परवा त्या म्हणाल्या, "... आमच्या पिढीनं कधी वडिलांच्या अंगाला हात लावला नाही. ... पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. पप्पा पुरुष आहेत ते लक्षात येत नाही?"

रामतीर्थकर बाईंच्या इथे पप्पासुद्धा स्त्री असतात काय? असतील ब्वॉ. दुर्दैवाने आमच्याकडे असे नव्हते. पण हल्ली सर्वसमावेशाचा जमाना आहे; रामतीर्थकर बाईंच्या इथली पद्धत आपण टॉलरेट केली पाहिजे. त्यांनासुद्धा आपले म्हणा रे कोणी!

(बादवे, आम्हीसुद्धा पुरुष असून क्वचित्प्रसंगी आमच्या आईच्या गळ्यात पडत असू. ती स्त्री आहे, याची पूर्ण कल्पना असूनसुद्धा. परंतु आम्हाला, का कोण जाणे, त्याची कधी शरम नाही वाटली. कदाचित आम्ही बेशरम, गावावरून ओवाळून टाकलेले असू. कोण जाणे.)

आमचे परमपूज्य मला सायकलीवर बसवून फिरायला न्यायचे हो! आठवा ते जुने सिनेमे, त्यात कसे हिरो-हिरवीण ...छे, छे, मी काही म्हणलेलं नाही. भलता चावटपणा नको.

अत्र्यांच्या नावावर खपवला जाणारा एक जुना विनोद या निमित्ताने आठवला. काहीतरी लेडीज़ सायकलच्या संदर्भातला. परंतु, तुम्ही आणि तुमचे दिवंगत तीर्थरूप या दोघांहीबद्दलच्या आदरापोटी अधिक तपशिलात न शिरता आवरते घेतो.

तर बाई भडकल्यात की मुली बाबांच्या गळ्यात पडतात,''पप्पा, पप्पा' म्हणत'. मलाही राग येतो. पप्पा हा काय शब्द आहे का! डॅडी म्हणावं, इंग्लिशमध्ये चांगला सोयीचा वाक्‌प्रचार आहे - डॅडी काँप्लेक्स!

नाही तर सरळ मराठीत म्हणावं, "बाबा!" राज ठाकरे भडकतील हो, मराठीत बोललं नाही तर? भडकतील का?

गंमत म्हणजे, 'बाबा' हा शब्द फारसीतून उचललेला आहे. म्हणजे म्लेंच्छ शब्द. म्हणजे यांना कितपत चालावा, हे शंकास्पद. उलट 'डॅड'चा संबंध थेट संस्कृतातील 'तात'शी जुळवता येतो. म्हणजे आर्योद्भव.

(त्याहीपुढची गंमत म्हणजे, फारसी हीसुद्धा खरे तर मुळात आर्योद्भव भाषा आहे. पण लक्षात कोण घेतो?)

का भलत्याच पुरुषाच्या गळ्यात पडून 'पप्पा, पप्पा' म्हणत नाही आणि भलत्या पुरुषांना स्कँडलाईज करत नाहीत म्हणून बाई भडकल्यात.

मला तर ब्वॉ भलतीच शंका येते. सर्व पुरुषांनी ('सर्वां'मध्ये 'सर्व पुरुष'सुद्धा अंतर्भूत होतात, अशी माझी समजूत आहे; चूभूद्याघ्या.) आपल्याला 'आई' म्हणावे, अशी बाईंची अपेक्षा आहे, असे कळते. म्हणजे, सर्व पुरुषांनी ('आई' म्हणत - कारण बहुधा 'मम्मी' म्हणायचे नाही म्हणून!) आपल्या गळ्यात पडावे, अशी बाईंची काही सुप्त इच्छा, फँटसी, अथवा फेटिश असावे, किंवा कसे? (चूभूद्याघ्या.)

लहानपणी आपण सगळे जोक सांगायचो. बंड्याचे बाबा एवढेच थोर आहेत की त्यांच्या घरी प्रियांका चोप्राचं पोस्टर आहे.

हा विनोद मात्र समजला नाही. कृपया समजावून सांगावा. आगाऊ आभार.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/02/2020 - 20:22

In reply to by 'न'वी बाजू

लहानपणी आपण सगळे जोक सांगायचो. बंड्याचे बाबा एवढेच थोर आहेत की त्यांच्या घरी प्रियांका चोप्राचं पोस्टर आहे.

गृहितक असं की बंड्या माझ्या वयाचा आहे. त्याचे वडील प्रियांका चोप्राच्या, म्हणजे साधारण आपल्या मुलाच्या वयाच्या मुलीकडे बघून लाळ गाळतात; हे प्रकार बंड्या आणि त्याच्या घरचे खपवून घेतात. ह्याबद्दल बाहेर कोणी बोलत नाही. आमच्या घरी, मी मुलगी आहे आणि वडलांच्या गळ्यात पडले तर घरचे खपवून घेतात (किंवा आनंदानं हे नातं मान्य करतात) पण रामतीर्थकर बाईंना त्रास होतो.

शाळेत असताना कुणी शिक्षिकेनं सांगितलं होतं, म्हणे एकेकाळी पुरुष आपल्या स्वतःच्या मुलांवर चारचौघांत प्रेम दाखवू शकत नसत. का, तर म्हणे त्यातून आपल्या बायकोवरच्या प्रेमाचं प्रदर्शन होईल. मात्र भावा-बहिणीच्या मुलांवर प्रेम दाखवलेलं चालत असे. ह्यावर जोक करण्याची तीव्र इच्छा होती; पण हे सगळं समजावून सांगावं लागेल ह्याच भीतीपोटी ह्यावर जोक करण्याचा मोह आवरला.

चिमणराव Mon, 24/02/2020 - 07:59

रामतीर्थकर बाईंचं नाव हल्ली ऐकतोय. काही तरी सल्ला देत भाषणं करतात आणि गर्दी जमते वगैरे.
मुंबईतील ,किंवा उपनगरांत वाढलेल्यांना माहीत नसणार. इथे या भाषणांचं कौतुक होणार नाही.
बाकी गावागावांत काय सांगतात हे ऐकायलं हवं.
-----------
माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी लहानपणापासून सल्ले देत आलो आहे मोठ्या वयाच्या नातेवाईकांना. त्यामुळे हा फार बोलतो अशी प्रसिद्धी राखून आहे.
-------------
शहरांत कोणत्याही रविवारी बाजारात दहा ते बारा फेरफटका टाकला तर दुसरी चौथीतली मुलगी आणि तिचा बाबा अशा दोनचार जोड्या अवश्य दिसतात. मुलीची अखंड बडबड सुरू असते, बाबा हुंहुं करत ऐकत असतो. मग स्कुटरवरून घरी.
-----------
लेख आवडला.

'न'वी बाजू Mon, 24/02/2020 - 08:41

In reply to by चिमणराव

शहरांत कोणत्याही रविवारी बाजारात दहा ते बारा फेरफटका टाकला तर दुसरी चौथीतली मुलगी आणि तिचा बाबा अशा दोनचार जोड्या अवश्य दिसतात. मुलीची अखंड बडबड सुरू असते, बाबा हुंहुं करत ऐकत असतो. मग स्कुटरवरून घरी.

वस्तुतः, हे नॉर्मल आहे. मात्र, यातसुद्धा (म्हणजे (स्त्री असलेल्या) मुलीने (पुरुष असलेल्या) वडिलांच्या गळ्यात पडण्यात) जर का बाईंना काही पाप दिसत असेल, तर, एक तर बाई तरी पर्व्हर्ट असल्या पाहिजेत, किंवा त्यांचे वडील तरी पर्व्हर्ट असले पाहिजेत, किंवा दोन्ही.

कदाचित लहानपणीचा काही कटु अनुभव वगैरे? (चाइल्ड सेक्शुअल अब्यूज़ ही एक गंभीर समस्या आहे, आणि पुष्कळदा असे लैंगिक अत्याचार करणारी व्यक्ती ही व्हिक्टिमच्या जवळच्या नात्यातील असते, असे ऐकून आहे.) तसे काही असल्यास बाईंशी सहानुभूत होणे शक्य आहे; परंतु, म्हणून त्यांच्या सरसकटीकरणाशी सहमत होता येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/02/2020 - 08:57

In reply to by 'न'वी बाजू

आई गेल्यावर माझी बडबड ऐकवायला घरी कोणी उरलं नाही. मग मी बाबांशी बडबड करायला सुरुवात केली. मग त्यांनीही माझ्याशी, पुढे आमच्या मित्रमंडळाशीही भिकारडे जोक करायला सुरुवात केली. ते अत्यंत so-bad-that-it's-good विनोद करत. मित्रमंडळानं असले जोक उलट त्यांच्यावर केले की त्यांना विशेष आनंद होत असे.

आई गेल्यावर आमचं नातं फारच सुधारलं. किंबहुना तयार झालं.

अरविंद कोल्हटकर Mon, 24/02/2020 - 09:41

ह्या रामतीर्थकर बाईंची अनेक प्रवचने यूट्यूबवर आहेत. त्यांचा एक साचा असतो. मुली फार शिकल्या की त्यांना शिंगे फुटतात आणि त्याचा परिणाम संसार उद्ध्वस्त होण्यामध्ये होतो अशी त्यांची शिकवण असते. बाईने संसार नेटका करण्यामध्ये सुख शोधावे, फार शिकून नोकरी करण्यामागे लागू नये असे त्यांचे मत आहे.

अशीच शिकवण इंदुरीकर महाराज नावाचे एक वारकरी पंथातील प्रवचनकार देत असतात. अलीकडेच सम-विषम तिथीला समागम झाल्यास पुरूष-स्त्री प्रजा निर्माण होते असे विधान करून त्यांनी अंनिस आणि तत्सम विचारवाल्यांना चूड दाखवून बोलावले आहे आणि वादाची धुमाळी सुरू केली आहे.

हे सर्व लोक आधुनिक विचारांची कुचेष्टा करतात आणि त्यांचे चाहते त्यांना उचलून धरतात. त्यामुळे हे लोक अधिकच चेकाळून बडबडत राहतात.

त्यांना फार महत्त्व द्यायची आवश्यकता नाही. मी त्यांची भाषणे करमणूक म्हणून पाहतो. तुम्हीहि तेच करावे असा माझा अनाहूत सल्ला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/02/2020 - 20:39

In reply to by अरविंद कोल्हटकर

रामतीर्थकर बाईंची भाषणं मी काही वर्षांपूर्वी ऐकली. एक भाषण जेमतेम ऐकू शकले. हे सगळे इंदुरीकर, रामतीर्थकर, संभाजी भिडे वगैरे लोक त्याच रांगेतले ह्याबद्दल मला अजिबात शंका नाही.

गेले काही दिवस फेसबुकवर बरेच लोक बाईंवर टीका करताना दिसले. बीबीसी-मराठीसकट. मग मला राहवलं नाही. सनातनी लोकांकडे दुर्लक्ष करणं सोपं आहे. पण ममव लोकांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, ही गोष्ट मला दुर्लक्षणीय वाटत नाही. रामतीर्थकर बाईंचं सदर विधान कोणकोणत्या पद्धतींनी किळसवाणं आहे ह्याबद्दल फेसबुकी चर्चा वाचून मला कंटाळा आला.

दुसरं, बहुतेकदा ह्या शिकलेल्या, ममव लोकांना विनोद चांगला वापरता येत नाही, समजत नाही असंही दिसतं. लोक कुंडलकरवर चिडतात; तो ठरवून खोड्या काढतो, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा किंवा हसा, हे बहुतेकांना जमत नाही. पण मला त्याचा व्रात्यपणा आवडतो.

म्हणून टवाळकी. रामतीर्थकर बाई, किंवा त्यांच्या समर्थकांसाठी हा खटाटोप नाहीच; ह्या लोकांना 'डॅडी काँप्लेक्स' म्हणजे काय हे इंटरनेटवर वाचलं तरीही समजेल का, इथपासून मला शंका आहेत. पण ज्यांना वाचल्यावर ते समजेल अशा आणि स्वतःला सारखंसारखं सिरीयसली घेणाऱ्या ममव लोकांसाठी हे आहे.

'न'वी बाजू Tue, 25/02/2020 - 08:22

In reply to by अरविंद कोल्हटकर

अंनिस आणि तत्सम विचारवाल्यांना चूड दाखवून बोलावले आहे

अंनिसवाले तरी असल्या लोकांना भाव, महत्त्व का देतात? "मूर्ख आहेत" म्हणून त्यांची भाषणे करमणूक म्हणून का पाहात नाहीत?

चिमणराव Mon, 24/02/2020 - 09:50

मुलगी शाळेत, बाबा बारा तास ओफिसात मग गंमतीजमती ती बाबाला केव्हा सांगणार? बाबा दिलेल्या चिठ्ठीनुसार एकेक गोष्टी खरेदी करतानाच रविवारी.

मी माझ्या मुलीचा पापाही कधी घेतला नाही, अगदी जन्म झाल्यावर नर्सने हातात दिल्यावरही. अगदी दोन वर्षांपर्यंत 'ठो' द्यायचो. डोक्याला डोके लावणे. त्यात अधिक गम्मत असते मुलांनाही. कुणीतरी पापा घेणे वेगळे आणि आपले डोके बाबा आईच्या डोक्यावर आपटवून हसणे वेगळे. इतरही नातेवाईक तसेच करू लागले.

shantadurga Mon, 24/02/2020 - 11:25

:-मी माझ्या मुलीचा पापाही कधी घेतला नाही, अगदी जन्म झाल्यावर नर्सने हातात दिल्यावरही.
- पण तुम्ही करता तेच योग्य आणि "पापा घेणे हे पाप" हे जोवर तुम्ही म्हणत नाही , तोवर तुमचा "बाबा" झाला नाही असं समजायला हरकत नाही :)

सामो Mon, 24/02/2020 - 11:54

वडील व मुलीचं नातं बऱ्याच अंगांनी मुलीची आयडेंटिटी ठरवतं. ज्योतिषात, सूर्य हा ग्रहं मुलीच्या (व मुलाच्या) कुंडालीत, वडील जसा दर्शवितो तसाच 'स्व' ची जडणघडणही. जसा चंद्र, आईचा कारक असतो तसेच.

तर परवा त्या म्हणाल्या, "... आमच्या पिढीनं कधी वडिलांच्या अंगाला हात लावला नाही. ... पप्पा म्हणून गळ्यात पडायचं. पप्पा पुरुष आहेत ते लक्षात येत नाही?"

या संदर्भात - अगदी फारच लहान असताना म्हणजे मॉन्टेसरीत, मी म्हणत असे - मी मोठी झाले की बाबाशीच लग्न करणार. पुढे अर्थातच ते बंद झाले. आईपेक्षा बाबांशी मी जवळ होते/आहे. माझी मुलगीही तशीच, माझ्याहूनही तिला तिच्या वडीलांचा लळा अधिक आहे.
नवऱ्याकडून अपेक्षा करताना, बऱ्यापैकी वडील एक रोल मॉडेल असतात असे लक्षात आलेले आहे. तुलना ही नाही म्हटली तरी होतेच्च. पदोपदी! आता यालाच डॅडी इश्यु असे नाव आहे का ते माहीत नाही. पहील्यांदा प्रेमात पडले होते तेही माझ्याहून, १९ वर्षांनी मोठ्या प्रोफेसरांच्याच. यालाच डॅडी इश्यु म्हणतात का माहीत नाही.
पण एकंदर वडील-मुलगी या नात्यात मी अतिशय सुदैवी आहे. आणि बाबाला मिठी मारायला अजुनही मी लाजत नाही. यात मी काही फार वेगळी आहे असा आव अजिबात नाही. मला ते नैसर्गिक वाटते. उत्तम पितृसुख, पितृछत्र लाभलेले आहे.
________
रामतीर्थंकर बाई समुपदेशनही करतात असे त्यांनी एका व्हिडीओत म्हटलेले आहे. त्यांनी काही केसेस पाहून जर डिफेन्स मेकीनिझम म्हणुन हा सल्ला दिलेला असल तर तो दुर्दैवी आहे. प्रत्येक अपत्याला उत्तम वडील लाभतच असतील असे नाही. कदाचित आपल्याला त्यांनी पाहीलेल्या केसेस माहीत नसतीलही. कदाचित आपेले जग व त्यांच्या भाषणाचा ऑडियन्स वेगळा असेलही. तेव्हा मला तरी एकदम टीका करता येत नाही. फक्त ज्यांना कोणाला अशा सल्ल्याची आवश्यकता आहे, त्या मुली दुर्दैवी म्हणाव्या लागतील.

चिमणराव Mon, 24/02/2020 - 12:02

आपण इंदोरीकर किंवा रामतीर्थंकर नाही, त्यामुळे सोशल मिडियावर लिहिताना मी माझ्या आयुष्यात पूर्वी काय केलं कसं वागलो हे लिहिणं मला योग्य वाटतं. आता याचे काय परिणाम, निष्कर्ष, वागणं बरोबर होतं का वगैरे माझ्यासह कोणीही तपासलं तरी हरकत नाही. समजा ते बरोबरच वाटलं तर तसंच करायला पाहिजे. त्याकाळी सोशल मिडिया असती, लगेच लिहिलं असतं तर महिन्याभरात दुरुस्तीही करता आली असती. पण आता फक्त इतिहास मांडणे एवढेच हातात आहे. कमितकमी ते मांडणं हे सोशल मिडियाला प्रामाणिकपणे भिडणं ठरेल.

चिमणराव Mon, 24/02/2020 - 12:09

त्या बाईंनी असे सल्ले देण्याची का गरज पडली हे विचारात घ्यायला हवे. कारण ज्या भागात त्या वावरतात, फिरतात तिथली काही उदाहरणे तशी विचित्र घडली असावीत.

पुंबा Mon, 24/02/2020 - 19:45

पोक्त बाईने असं गावोगाव उंडारत हिंडणं शोभतं का? त्यात आणखी विधवा म्हणे! या वयात वाती वळाव्या, कुठं नखुल्या, कुर्डया, वळवट, शेवया करु लागायला जावं, जप करीत दिवस कंठावा, फार काही नाही तर खोकत बाजेवर पडून र्हावं. ते सोडून व्याख्याने देत हिंडते ही बया! एसटीने प्रवास काय करते, कोर्टात बालिष्टरी काय करते! दिवसंच असे धर्मबुडवे, दुसरे काय! पुर्वी असं नव्हतं, बाई विधवा झाली की तिच्या कपाळावर शेण फासून बोडखी करीत तिला, कुठं तरी कोपच्यात बसून र्हात गायीसारख्या. कलियुगात, वयस्कर बायकांनी सुद्धा ताळतंत्र सोडला हो!

चिंतातुर जंतू Tue, 25/02/2020 - 15:38

In reply to by नील

म म व? (समथिन्ग मध्यम वर्गीय ?)

हो. मराठी.

सामो Tue, 25/02/2020 - 21:20

एकंदर रामतीर्थंकर बाईंची विधाने भयानक ऑर्थोडॉक्स आणि समाजाला मागे खेचणारी आहेत याबद्दल दुमत नाही. त्या विधानांचे समर्थन अजिबात नाही. हे त्यांचे भाषण ऐकून मग बनविलेले मत.