माझा क्रंबललेला ऱ्हूबार्ब
बरेच दिवस खरडवह्यांमधे गाजावाजा करून झाल्यावर शेवटी ही पाककृती प्रकाशित करताना मला नुस्तीच दाढी आतमधे साधूच नाही ही म्हण आठवते आहे. पण असते एखाद्या गणपाच्या किंवा एखाद्या स्वातीताईच्या हाताला चव, म्हणून काय आमच्यासारख्या गप्पाड्या लोकांनी पाणीही उकळवू नये काय? आणि त्यापुढे कधी आमची मजल गेलीच तर त्यावर फुशारक्या मारूच नयेत का काय? असो तर मुद्दा आहे पाकृचा!
आमच्या घरात एकंदरच विचित्रपणाला कमतरता नाही. कधी माझे किडे, कधी नवऱ्याचं डोकं तिरपं चालतं. सगळ्यात नवं खूळ काय, तर स्थानिक शेतकऱ्याकडून भाज्यांचा उकाडा लावलाय. भाज्या नियमित घरी आणून देण्याला उकाडा म्हणतात का नाही माहीत नाही, पण आपण द्यायचा शब्द द्यायचा दडपून. वर सांगायचं, तळकोकणात बालपण गेलेली विदर्भात रहाणारी आमची एक नातेवाईक स्त्री असा शब्द वापरते. हाय काय नाय काय! हां, तर मी काय म्हणत होते, विचित्रपणा! सध्या कायच्याकाय चित्रविचित्र भाज्या घरात येऊन पडतात. बरं त्यांचं सूप बनवून दिलं पोटात ढकलून तर ते नाही. त्याने एक विचित्रपणा केला तर मला दहा विचित्रपणा करण्याची सुरसुरी येते. तर आजचा गिऱ्हाईक आहे, rhubarb; त्याचं भरीत खाणारे आणि त्याची गोष्ट वाचणारे तुम्ही सगळे!
हा ऱ्हूबार्ब आपल्याकडे फार प्रचलित नाही. हे 'खूळ' परदेशीच! चीनमधे निदान दोन-अडीच हजार वर्ष ऱ्हूबार्ब माहीत होते. पण तिथे त्याचा उपयोग औषधी म्हणून (बहुदा रेचक म्हणून) होत असे. हे ऱ्हूबार्ब साधारण चौदाव्या शतकात 'रेशीम मार्गा'वरून युरोपात गेले. आधी तुर्की बंदरांमार्गे गेले म्हणून तुर्कीश ऱ्हूबार्ब आणि पुढे रश्यातून गेले म्हणून रश्यन ऱ्हूबार्ब असंही म्हणत असत. रश्यात व्होल्गाच्या तीरावरही रानटी ऱ्हूबार्ब वाढत असत. युरोपात ही वनस्पती आशियातून येत असे त्यामुळे तिथे त्याची किंमतही दालचिनी, अफू किंवा केशरासारखी दणदणीत होती. हे नावही कसं रूबाबदार वाटतं ना, सायबाच्या देशात ऐकलेला उच्चार ऱ्हूबार्ब, ऱ्हुबार्ब नाही. दिसायलाही मस्त दिसते ही भाजी. ही पहा, थोडा काळ फ्रीजमधे काढल्यामुळे हे मान टाकलेले ऱ्हूबार्ब आहेत, पण ताजे असताना देठाचे रंग फारच सुंदर दिसतात.
पण आपल्याकडे ही भाजी आणि याची पाकृ नाही म्हटल्यावर हिंमत होत नव्हती विकत घेण्याची. गळ्यात पडल्यावर मात्र माहिती शोधली. विक्कीविदुषी असं नाव खवचट खानाने शोधल्यावर त्या नावासाठी गिऱ्हाईक नको का? तर चीनमधून युरोपात गेलेला ऱ्हूबार्ब चीनमधे फक्त औषधापुरताच वापरला जात असे. ब्रिटनमधल्या सर्वसामान्य लोकांना साखर परवडेलशी बनायला लागली तेव्हाच या ऱ्हूबार्बच्या देठांचा अन्न म्हणून उपयोग सुरू झाला. आपल्या अळूच्या देठांएवढीच साधारण जाडी असते. ऱ्हूबार्बची पानं विषारी असतात. त्यात असणारं ऑक्झॅलिक आम्ल मूत्रपिंडांना त्रास देतं. या आम्लामुळे त्वचेलाही त्रास होतो. पण देठांमधली आंबट चव प्रामुख्याने मॅलिक आम्लाची असते आणि एकंदर आम्लाच्या फक्त २-२.५% भागच ऑक्झॅलिक आम्लाचा असतो. थोडक्यात, देठं बिनधास्त खा!
आत्तापर्यंत ऱ्हूबार्बचा एकच पदार्थ खाल्लेला होता, ऱ्हूबार्ब क्रंबल. आमच्या आजूबाजूच्या आणि आमच्यासाठी फोनवर उपलब्ध असणाऱ्या स्वयंपाक्यांची मजल फारतर मोदक, तिलापिया-फ्राय किंवा आर्टीचोक-स्टरफ्राय करण्यापर्यंतच. एका मैत्रिणीला विचारलं, "ऱ्हूबार्ब घरात पडल्येत, तो खाण्यालायक करण्यासाठी त्याची क्रिया कशी करायची?" तिचं उत्तर, "हे काय असतं?" मग त्या देठांचं थोडं वर्णन सांगितल्यावर, "म्हणजे ते बीटाच्या पानांसारखं दिसतं तेच का?" काय पण मैत्रीण आहे! मी मूळची ठाण्याची असल्यामुळे अस्सल मुंबईकर स्वभावाला जागून "बीटाला पानं नसतातच" आणि "साबुदाण्याच्या शेंगा असाव्यात" या समजूतीत आनंद मानणारी! तरी बरं, "गुलाबजाम झाडावर उगवत नाहीत" असं एका परदेशी पाहुण्याला सांगण्याइतपत सामान्यज्ञान माझ्याकडे आहे. नशीब, त्यापुढे त्याने, कुठून येतात असं विचारलं नाही. नाही तर "गुलाबजामच्या पाकातून" असं उत्तर मी तयार ठेवलं होतं.
तर मुद्दा असा की एकदा विक्कीविदुषी बनल्यानंतर अशा निरुपयोगी स्वयंपाकी-मित्रमंडळामुळे गुग्गलपंडीत होणं क्रमप्राप्त होतंच. स्वयंपाकाची बार्बेरिक* कौशल्य आज चालणार ऱ्हूबार्बवर. (*बार्बेरिक हा शब्द आला ग्रीकांकडून. त्यांना ग्रीक सोडून इतर भाषा 'बार-बार'च्या पलिकडे काही ऐकू येत नसत. म्हणून ग्रीक सोडून इतर भाषा बोलणारे बार्बेरिक, असं अलिकडेच वाचलं. संदर्भ - The story of French. आणि एक गंमत, इक प्रत्यय मराठीबाहेरही आहे.) ऱ्हूबार्ब या शब्दाचं मूळही ऱ्हा+बार्बेरम या शब्दांमधे आहे. 'ऱ्हा'चा संदर्भ त्या मूळ झाडाशी आहे आणि व्होल्गा या पाण्याच्या स्रोताला 'ऱ्हा' म्हणत याच्याशीही आहे. बार्बेरम हे बहुदा परदेशी असण्याशी संबंधित असावं. तर या परदेशी खुळाची एक पाकृ:
ऱ्हूबार्ब क्रंबलसाठी लागणारं साहित्य खाली दिलेल्या दुसऱ्या लिंकमधे आहे. मी मी किती साहित्य वापरलं याचीच खानेसुमारी* दिलेली आहे.
१. एक कप ऱ्हूबार्बच्या देठांचे तुकडे
२. १/२ कप अर्धब्राऊन साखर
३. १/८ कप रवा
४. १/८ कप कणीक
५. १/४ बटरस्टीक (मीठ नसलेली), छोटे तुकडे करून
६. एक बेकिंग डिश, एक अव्हन.
बेकिंग डिशमधे ऱ्हूबार्बच्या देठांचे तुकडे, १/४ कप साखर आणि रवा+कणकेतला पाव भाग एकत्र केला. दुसऱ्या भांड्यात उरलेलं सगळं सामान (करा वजाबाकी!) एकत्र केला. लोण्याचे छोटे तुकडे हाताने वितळले तेवढेच, त्यामुळे त्या मिश्रणात गुठळ्या झाल्या. हे मिश्रण बेकिंग डिशमधे वरून घातलं. अव्हन २००० सेल्सियस किंवा ३७५० फॅरनहीट (या देशात अजून ती इंपिरियल एककं वापरतात!) या तापमानाला तापवून त्यात ही बेकिंग डिश ढकलून दिली. एवढ्या कष्टाने थकल्यासारखं वाटलं म्हणून एका सुंदरश्या कॅलिफोर्नियन वाईनचा ग्लास तोंडाला लावला. तसाही अव्हनमधे अर्ध्या तासाचा टायमर आहे, बाटली रिकामी झाली असती तरी कोळशाचा वास येण्याची फार भीती नव्हती. या सगळ्या गडबडीत मधल्या पायऱ्या आणि वाईनचा ग्लास यांचेही फोटो काढायचे राहिले. अर्ध्या तासानंतरही बघितलं तर ते प्रकरण पूर्ण शिजल्यासारखं वाटलं नाही म्हणून आणखी दहा मिनीटं वीज आणि कालापव्यय केला.
त्यानंतर संयम संपल्यामुळे अव्हन बंद केलं, मिटन हातात घालूनच अव्हनमधून बेकिंग डिश बाहेर काढली. थोडक्यात माझं विमान तेव्हाही उडलं नव्हतं. क्रंबल हा प्रकार एवढा बिस्किटी होईल असं वाटलं नव्हतं. मग प्रत्येकाच्या बशीत "मला हे एवढंच शिजवता येतं, गिळायचं असेल तर गिळा नाहीतर आणा इकडे" असं म्हणून बिस्किटाचा तुकडा आणि वर व्हॅनिला आईसक्रीम दिलं. धमकी अधिक लागू पडली का आईसक्रीमची मात्रा हे माहीत नाही, उपस्थित मंडळींनी "यात ऱ्हूबार्बची चव फार नाहीये" असं म्हणत बशा साफ केल्या. "तसं थोडं फायब्रस लागतंय" अशीही एक प्रतिक्रिया आली. असल्या बोलण्याकडे फार लक्ष न देता मी माझ्या बशीतला बिस्कीटी तुकडा क्रंबल समजून खाऊन टाकला. दुसऱ्या दिवशी तोंडात टाकायला हे एवढंच उरलं होतं:
तुम्ही कोणी माझं ऐकून हे प्रकरण करणार असालच तर एवढ्याश्या सामुग्रीसाठी तिप्पट सामान मावेल एवढी मोठी बेकिंग डिश वापरू नका. आणि बोलताबोलता कणीक+रव्याचं मोजमाप चुकवू नका. मी बहुदा २०% अधिक रवा घातला होता. मेघनाच्या सुगरणीच्या सल्ल्यामुळे जळजळ होऊन हे भलतं प्रकरण गळ्यात पाडून झालंच. पण एक चूक मी एकदाच करते.
आता फक्त कोणीतरी येऊन "ते ऱ्हूबार्ब नाहीत काय!" एवढंच ऐकवणं बाकी आहे.
संदर्भः
१. http://en.wikipedia.org/wiki/Rhubarb
२. http://www.oprah.com/food/Rhubarb-Crumble
३. The story of French - Jean-Benoit Nadeau, Julie Barlow
*नंदनला हाफव्हॉली. बाकीच्यांना चुका काढायची आणखी एक संधी.
आयला यमे! माझ्या सल्ल्यांचा
आयला यमे! माझ्या सल्ल्यांचा हा असा परिणाम होणार हे म्हाईत असतं, तर अजून जोमानी दिले नसते का? हरकत नाई, काई बिघडलेलं नाई. आता देईन!
उकाडा, तळकोकणातली + विदर्भात आयुष्य नातेवाईक स्त्री, साबुदाण्याच्या शेंगा, करा वजाबाकी... याचं जाहीर वाचन केलं मी घरात. :ड
बाकी, ते खानेसुमारीचं काये झेंगट?
खी: खी: खी:पाककृतीचा तुकडा
खी: खी: खी:
पाककृतीचा तुकडा आवडला ;)
अवांतर १: पहिला फोटु बघुन तु पुन्हा त्या प्रेतांच्या प्रदर्शनात गेलीस की काय वाटून गेलं.. एकदम 'हिरवी फुप्फुसं' वाटताहेत ;)
अवांतर २: हे चित्र 'हिरवी फुप्फुसं' म्हणून प्रदर्शनात दे किंवा 'क्यालमेट चेन्ज' असही शीर्षक योग्य ठरेल.. प्रदर्शनात अधिक हिट्ट ठरावं :)
अरेरे काय ही सायबाच्या नावानं ओप्रा ब्लास्फेमी!
अरेरे काय ही सायबाच्या नावानं ओप्रा ब्लास्फेमी! देठ आधी शिजवून घ्यायचे असतात. आणि लोणी असं वितळून वापरत नाहीत तर ते पिठात 'रब' करून शॉर्ट क्रस्ट पेस्ट्री बनवायची असते. ही घ्या सायबाची रेसिपी.
रेसिपी बदलली हा आरोप मान्य.
रेसिपी बदलली हा आरोप मान्य. पण तुम्ही मूळ रेसिपी वाचली आहेत का? लिहीलंय ना आधीच, लोणी हाताने वितळलं तेवढंच, त्यामुळे मिश्रणाच्या गुठळ्याही झाल्या इ.
आमच्या गावाकडच्या पबमधल्या क्रंबलची चव आता काही आठवत नाही. मूळ पदार्थ कसा लागतो हे अजिब्बात माहित नसल्यामुळे आपण करू तसं क्रंबल! वर पुन्हा "आमच्याकडे हे असंच करतात" असा माज आहेच.
मियाँजी पडे तो भी ...
>>लोणी हाताने वितळलं तेवढंच, त्यामुळे मिश्रणाच्या गुठळ्याही झाल्या
मियाँजी पडे तो भी टांग उप्पर. असो. रीतभात शिकवेन कधीतरी गाठ पडली तर.
- पोथिनिष्ठ जंतू
>>आमच्या गावाकडच्या पबमधल्या क्रंबलची चव आता काही आठवत नाही. मूळ पदार्थ कसा लागतो हे अजिब्बात माहित नसल्यामुळे आपण करू तसं क्रंबल! वर पुन्हा "आमच्याकडे हे असंच करतात" असा माज आहेच.
तुमच्या गावाकडच्या तुमच्या गोड स्मृतींचं माहीत नाही, पण आमच्या गावाकडच्या गोऽड आज्जीबाईंनी (आणि काही वेळा आज्जोबांनीसुध्दा) केलेला क्रम्बल आम्ही अनेकदा खाल्लेला आहे आणि नंतर भक्तिभावानं शिकलेला आणि बनवलेलासुध्दा आहे. म्हणून तुमच्या ओप्राब्लास्फेमीचा त्रिवार निषेध!
- अभिजाततावादी जंतू
दोन शंका
रसायनशास्त्रात ऑक्झॅलिक अॅसिड हे विषारी मानतात. तरी ते रसायन असलेले रेचक म्हणून कसे खातात ?
मॅलेइक अॅसिड व मॅलिक अॅसिड अशी दोन नामसाधर्म्य असलेली रसायने आहेत. त्यातलं हे नक्की कुठलं? कारण Maleic Acid हे विषारी असते तर Malic Acid नसते.
ताजा कलमः - आधी प्रतिसाद आणि मग विकिपिडिया वर जाऊन बघितले. शंका फिटल्या.
पालेभाजी पासून गोड पदार्थ !
पालेभाजी पासून गोड पदार्थ ! भलताच चॅलेंजिंग प्रकार. चवीचं माहित नाही पण फोटोत 'मेसूर पाक' सारखा दिसतोय.
अजून मी अव्हन मध्ये फक्त 'ग्रिल्ड चिकन' आणि 'वांग्याचे काप' करून पाहिले आहेत. नाहितर फक्त फ्रोझन पिझ्झा आणि "क्रोसों/ ब्रिओश" गरम करण्यासाठी अव्हन वापरला जातोय.
निषेध!
इटलीत राहून फ्रोजन पिझ्झा आणि क्रोसां/ब्रियॉश गरम करता? त्रिवार निषेध. ब्लासफेमी म्हणतात ती हीच!! त्यामानाने शेतकरयाकडून 'भाज्याचा उकाडा' लावून मग त्या भाज्या फ्रीजमधे मान टाकेपर्यंत न वापरण्याची आदितीची ब्लासफेमी किरकोळ वाटते. वापरेना का त्या ओप्रचोप्राची पाकृ. पण आधी भाज्याचा उकाडा लावायचा, मग पाकृ. शोधायची, करायची, फोटोबिटो काढायचे, धागा सुरु करायचा ह्या मेहेनतीपुढे बाकी सारे क्षम्य आहे! :-)
(फुकटचे) सल्ले.
ऱ्हूबार्बचे कंपोट बनवायला खूप सोपे असते आणि बरयाच वेगवेगळ्या गोड पदार्थांवर (उदा. आईसक्रीम) घालून खाता येते. ऱ्हूबार्बला नुसती थोडी साखर घालून पाण्याबरोबर शिजवले की झाले कंपोट तय्यार. हवे तर पाण्याऐवजी संत्र्याचा रस वापरता येईल किंवा स्वादाला वेलदोडा म्हणा किंवा दालचिनी म्हणा असे मसाल्याचे पदार्थ वापरता येतील. फ्रीजमधे हे बरेच दिवस टिकतं आणि त्याच्या सुंदर गडद रंगामुळे दिसतंही आकर्षक.
ऱ्हूबार्बचे सरबतही छान होते. साधारण वर सांगितल्याप्रमाणे कंपोट बनवायचे आणि ते वापरून पन्हयासारखे सरबत बनवायचे.
चिजंनी वर उल्लेखलेली बी.बी.सी. फूडची वेबसाईट पाश्चिमात्त्य पदार्थांच्या पाकृ.साठी सर्वोत्तम आहे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. एकाच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या शेफ्सनी दिलेल्या पा़कृ. 'हमखास पाकसिद्धी' प्रकारात मोडतात, फक्त मी अँथनी वॉरेल वगैरे सारख्या नावांपासून दूर राहते (हे थोडाफार पूर्वग्रहदूषित 'स्नॉबिश' मत अहे याची मला कल्पना आहे. )
पाककृती आवडली
विशेषतः त्यात कृती कमी आणि उक्ती जास्त असल्यामुळे. आणि पाककृतीइतकेच त्यावर आलेले प्रतिसादही. बोंबललेला कबाब/रुबाब काय, आणि हिरवी फुप्फुसं काय आणि ओप्राचोप्रा काय...
कोणे एके काळी माझ्या बायकोने ऱ्हूबार्ब पाय बनवला होता. तो खाऊन 'आंबटढाण' या शब्दाशिवाय मला दुसरा शब्द लक्षात राहिलेला नसल्यामुळे ही पाककृती करून बघण्याचं धाडस होईलसं वाटत नाही.
क्रंबल-बॅच
चांगला दिसतंय र्हुबार्ब क्रंबल. करून पहायला हवं एकदा.
पाशवी शक्तींनीच बार्बेरिकचा अर्थ सांगितल्यावर त्यापुढे काय लिहावं? बाकी मर्ढेकरांनी 'बेकलाईटी बेकलाईटी' या ओळी का लिहिल्या असाव्यात, याचा थोडा थोडा उलगडा होतो आहे ;)