'ऑफसाईड' आणि परंपरेच्या नानाची टांग
दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर सगळीकडे याच प्रकारची चर्चा वाचून कंटाळा आला. त्यातल्यात्यात काही राजकीय आणि सामाजिक-म्हणवणार्या-राजकीय नेत्यांनी 'बाईट' देऊन करमणूक केली. काही बाबा-बापूंसारख्या भंपक लोकांनी या तापल्या तव्यावर स्वतःची पोळी भाजायचाही प्रयत्न केला. या सगळ्याची तिडीक, वैताग कमी का काय म्हणून अधूनमधून "तिचाही काही कमी दोष नाही" आणि "घेतली थोडी काळजी तर काय बिघडतं? तुझ्याच भल्याचं सांगतो आहोत ना?" अशा प्रकारची मतंही अनेकांना फुटलेली दिसत आहेत. 'ऑफसाईड'ची साधारण गोष्ट अशी की इरानमधे मुलींना फुटबॉलची मॅच स्टेडियममधे जाऊन बघायला खोमेनीच्या काळापासून बंदी घातलेली आहे. काही मुली चोरून आत जायचा प्रयत्न करतात आणि पकडल्या जातात. ही गोष्ट माहित असताना आणि सध्या या विषयामुळे डोकं उठलेलं असताना चित्रपट बघावा का न बघावा असा प्रश्न पडला होता. तरीही बघितला. अतिशय योग्य निर्णय घेतला असं शेवटी झालं.
पुढच्या तपशीलांमधे चित्रपटाची गोष्ट समजते. शेवटचे दोन परिच्छेद वाचायला हरकत नाही.
साधारण गोष्ट माहित असली तरी मधले तपशील आणि ते मांडण्याची दिग्दर्शक जाफर पनाहीची पद्धत फारच मजेशीर आहे. एकमेकांना न ओळखणार्या पाच-सात मुली पकडल्या जातात म्हणून एकत्र येतात. त्यांना पोलिस वगळता इतर कोणी ओळखत नाही असं नाही, पण "तू गप बसलास तर ती जमवेल स्टेडीयममधे जाणं!" असं तरूण मुलं आपसात म्हणतात. एका वयस्कर माणसाला स्टेडीयममधे जायचं असतं, त्याची मुलगी तिथे आत असेल याची त्याला कुणकुण लागते. तिच्या भावांना हे कळलं तर ते तिला फार त्रास देतील म्हणून तिला आधीच अडवण्यासाठी आणि 'वाचवण्यासाठी' हा माणूस तिथे जात असतो. मॅच स्टेडीयममधेच का बघायची आणि घरात बसून टीव्हीवर का नाही याचं तो स्पष्टीकरण देतो, "तिथे बसून शिव्या देता येतात. कोणाच्या ज्याच्या हव्या त्याच्या नावाने. कोणी काही बोलत नाही. आपण आहोत तस्सेच्या तस्से आपल्याला व्यक्त होता येतं. एवढी मजा घरी येईल का?" पण अशी मजा घेण्याची स्त्रियांना मुभा नाही. का? तर पुरुष तिथे अश्लील बोलतात, शिव्या देतात मग स्त्रियांच्या मनावर विपरीत परिणाम नाही होणार?
या पकडल्या जाणार्या मुलींमधे एक मुलगी थोडी वयाने मोठी, शिक्षण सुरू आहे, तिला (खास पुरुषी समजला जाणारा) इगो आहे आणि गोड बोलून काम करून घेता येईल अशी आशाही आहे. या मुलींना 'पकडून' स्टेडियमच्या भिंतीच्याच बाहेरच्या बाजूला किंचित बॅरिकेड लावून अडकवलेलं आहे. ही मुलगी तिथल्याच एका गार्डशी गप्पा सुरू करते. हे सगळे गार्ड्स सक्तीच्या लष्करभरतीची दोन वर्ष पूर्ण करत आहेत. यातली कोणी मुलगी सटकली तर आयुष्यभर लष्करात रहावं लागेल याची धास्तीच त्यांना जास्त आहे. पण आपल्या भगिनीसमान मुलींच्या 'शीलरक्षणा'साठी हे सगळे गार्ड्स कटिबद्ध आहेत. प्रश्न विचारणार्या मुलीला हा गार्ड उत्तरं देतो. "सिनेमाचं ठीक आहे गं, तिथे कोणी गाली-गरोच करत नाही. आणि तब्रिझ भागाततर स्त्रियांना आत जाऊही देत नाहीत." तब्रिझ भागाचं स्पष्टीकरण हिला फार पटत नाही, पण ती विषय बदलते. "तुम्ही भले बाप-भावांबरोबर याल इथे. तुमच्यासाठी ते बाप-भाऊ आहेत, पण इतर स्त्रियांसाठी ते परपुरुषच ना!" आणि मग मागच्या इरान-जपान मॅचच्या वेळी जपानी स्त्रियांना आत का जाऊ दिलं, असा तिला प्रश्न पडतो. "त्यांना आपली भाषा समजत नाहीत. मग त्यांना अपशब्द कसे समजणार?" लगेच उत्तर येतं.
एका मुलीला मधेच शू येते. ती मुलींच्या स्थानिक संघात फुटबॉल खेळतही असते त्यामुळे तिला मॅच जवळून बघण्यात विशेष रस असतो. स्टेडीयममधली सगळी टॉयलेट्स पुरुषांचीच, तिथे हिला कसं नेणार? "तू इथे आलीच नसतीस तर असा प्रसंग उद्भवलाच नसता. ही चूक तुझीच आहे" हे ही ती शांतपणे ऐकून घेते. शेवटी नाईलाज म्हणून एक गार्ड तिला तिथे घेऊन जातो. पुन्हा तिथल्या एकही क्यूबिकलमधे परपुरुष नाहीत ना याची खात्री करून घेतो आणि ती तिथे असताना इतर कोणी अन्य कोणतीही क्यूबिकल वापरू नयेत याचीही खबरदारी घेतो. पण संडास-साहित्याचं काय? "तुला वाचता येतं तर डोळे बंद करूनच विधी कर" असं तिला तो सांगतो. फार वाद न घालता ती आत जाते. अन्य पुरुषांना आत शिरूच न देण्यातून जी गडबड होते त्यात ही मुलगी सटकते. लाखभर लोक स्टेडीयममधे असतात, हिला शोधणार कुठे? निराश होऊन हा गार्ड बाहेर येतो. पण थोड्या वेळाने हाफ-टाईम होतो, आणि ही मुलगीच बाहेर येते. "तुला तुझ्या घरच्यांबद्दल वाटणार्या काळजीची आठवण झाली, तुला त्रास होऊ नये म्हणून मी बाहेर आले" असंही ती इतर मुली आणि मुख्य गार्डला सांगते.
या मुलींना बसमधून बाहेर काढलं जातं, कारवाईसाठी दुसर्या ठिकाणी नेण्याचा इरादा असतो. इरान हा सामना जिंकतं. मुली, हे गार्ड्स, सगळं तेहेरानच विजयोत्सव साजरा करू लागतं. रस्त्यावरच्या गर्दीतून कोणीतरी मिठाई वाटत बसमधेही शिरतो. सगळे एकमेकांसोबत आनंद साजरा करतात. आणि परंपरा, स्त्रियांचं पुरुषांनी रक्षण केलं पाहिजे, तुम्ही काळजी का घेत नाहीत वगैरे वगैरे गोष्टींना काहीही प्रतिसाद न देता या मुली गर्दी आणि ट्रॅफिकचा फायदा घेऊन निसटतात.
विकीपीडीयावर या चित्रपटाची मजेशीर कथाही आहे. जाफर पनाहीने खोटी गोष्ट Ministry of Guidance ला दिली आणि चित्रपटासाठी परवानगी मागितली. आधीच्या चित्रपटाचं संपादन कर, या अटीवर त्याला चित्रपटाच्या प्रदर्शनाची परवानगी मिळाली. पण फुटबॉल विश्वचषकाच्या क्वालिफायर्स सुरू असताना त्याला हे शूटींग करायचं होतं म्हणून या अटीकडे दुर्लक्ष केलं. छोटे डिजीटल कॅमेरे स्टेडीयमच्या आत नेऊन त्यावर चित्रीकरण केलं. या मुलीही कोणी प्रसिद्ध अभिनेत्री नाहीत. सगळ्याच विद्यापीठांमधे शिकणार्या विद्यार्थिनी आहेत ज्यांना फुटबॉलमधे रस आहे. सरकारी दुर्लक्ष व्हावं म्हणून जाफर पनाहीने सहाय्यक दिग्दर्शकाचं नावही पुढे करण्याचा प्रयत्न केला. हा डाव थोडक्यात फसला आणि हा चित्रपट इरानमधे प्रसिद्ध होऊ शकला नाही. एका आठवड्यापुरताही नाही. झालेलं शूटींग जप्त करण्याचा प्रयत्नही सरकारी पातळीवर झाला.
'ऑफसाईड'मधे कोणतीही मुलगी आजूबाजूचे लोक, गार्ड्स यांच्याशी फार वाद घालत नाही. सूचक प्रश्न विचारतात आणि समाधानकारक उत्तर मिळालं नाही तरी पुढचा प्रश्न विचारतात. उत्तर मिळालं तर ठीक नाहीतर पुढची कृती. चित्रपट बनवण्याची प्रक्रिया आणि चित्रपटात घडणारी गोष्ट यांच्यात हे एक मजेदार साम्य आहे. परंपरा, स्त्रियाचं रक्षण पुरुषांनी केलं पाहिजे, अश्लील शब्द, लेखन, दृष्य स्त्रियांच्या नजरेला पडू नयेत त्यामुळे स्त्रियांनी घरातच रहावं, "तू काळजी घेतली नाहीस म्हणून तू अशा परिस्थितीत फसलीस" अशा प्रकारच्या सगळ्या chauvinism ला अतिशय शांतपणे मधलं बोट दाखवणारा 'ऑफसाईड' बघताना मला स्ट्रेसबस्टर वाटला. त्यापुढे थोडा विचार केला तर "परंपरांच्या नानाची टांग" हे पारंपरिक लोकांना ओरडून सांगण्याची गरज आहे का असाही एक प्रश्न या चित्रपटामुळेच पडला.
हा धागा सोहेला अब्दुलालीला समर्पित.
कायदेभंग केला म्हणून इस्लामिक रिपब्लिक ऑफ इरानमधे जाफर पनाही स्वतःच्याच घरी नजरकैदेत आहे. डिसेंबर २०३० पर्यंत चित्रपट बनवण्यावर त्याच्यावर बंदी घातलेली आहे. (बातमी)
फेसबुकावर एका मित्राकडून
फेसबुकावर एका मित्राकडून समजलं की हा चित्रपट UTV world movies वर बर्याचदा दाखवतात.
ऋषिकेश, होय. चित्रपटात जाफर पनाहीला त्याचे विचार दाखवता येतात. 'अ सेपरेशन'मधे इरानच्या परंपरांना ठेंगा दाखवणार्या असगर फरहादींनी माफी मागून सुटका करून घेतली हा निर्णय योग्य होता हे जाफर पनाहींच्या उदाहरणावरून सतत वाटत रहातं.
विकीपीडियावर असंही समजलं, फुटबॉलच्या सामन्यांना स्त्रियांना जाऊ देण्यात अहमदिनेजाद यांनी तयारी दाखवली पण धर्ममार्तंड आडवे आले.
प्रश्न
परीक्षण रोचक आहे. सिनेमा पाहायचा म्हणतो.
अवांतर पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न :
>>>>"घेतली थोडी काळजी तर काय बिघडतं? तुझ्याच भल्याचं सांगतो आहोत ना?" अशा प्रकारची मतंही अनेकांना फुटलेली दिसत आहेत.
"मुलींनी थोडी काळजी घेतल्याने काही वाईट होत नाही" हे माझंही मत आहे. ते या बलात्काराच्या निमित्ताने फुटलेलं नाही. या मतामधे आक्षेपार्ह - किमान त्याची संभावना अन्य "फुटलेल्या" मतांबरोबर करणं मला (माझ्या वैयक्तिक दृष्टीने) रोचक वाटलं. उपरोल्लेखित मतामधे काही आक्षेपार्ह असल्यास ते नक्की काय, हे कधीतरी जाणून घ्यायला मला आवडेल.
"घेतली थोडी काळजी तर काय
"घेतली थोडी काळजी तर काय बिघडतं? तुझ्याच भल्याचं सांगतो आहोत ना?"
ह्या वाक्यात "तुम्ही काळजी घ्या, आम्ही बदलणार नाही" असा अर्थ दडलेला आहे का? किंवा ज्यांना हे आक्षेपार्ह वाटते त्यांनी हा अर्थ लावलेला आहे का? तसे असेल तर ह्यातला आक्षेप "आम्ही (म्हणजे पुरूष) बदलणार नाही" ह्याला असावा असे दिसते.
मुसुंना हा अर्थ अभिप्रेत नाही हे समजून मी त्यांच्या वाक्याशी सहमत आहे.
अर्थ
+१
त्याचा अर्थ
सिस्टिम बदलण्याची* ताकद आमच्यापाशी नाही...... म्हणून सिस्टिम आपोआप / कुणीतरी दुसरा बदलेपर्यंत सिस्टिमशी अगदीच फटकून राहू नये
असा वाटतो.
* यात पुढील गोष्टी अंतर्भूत आहेत.....
१. मुली रात्री अपरात्री सहजपणे फिरू शकतील.
२. मुलींनी कसेही कपडे घातले तरी मुले/पुरुष सज्जनपणेच वागतील. (तथाकथित सोज्वळ कपडे घातल्याने गैरप्रकार थांबत नाहीत हे मान्य आहे).
३. त्यातूनही काही गैरप्रकार घडला तर मुलीला समाज स्वीकारेल (अविवाहित असली तर मार्केटव्हॅल्यू कमी होणार नाही. विवाहित असेल तर जोडीदाराच्या वागणुकीत फरक पडणार नाही.
४. इतर अशा प्रकारच्या गोष्टी
किती वेळा तेच तेच लिहायचं असा
किती वेळा तेच तेच लिहायचं असा प्रश्न पडलेला आहे. पण तरीही इथला प्रतिसाद पुन्हा एकदा चिकटवते:
ज्यांच्यावर बलात्कार होतो किंवा अन्य प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं त्या मुली/स्त्रिया "चला, आज आचरट वर्तन करू या" किंवा "चला, आज काळजीच नको घेऊ या" असं म्हणतात/वागतात असं वाटत नाही. लोकल ट्रेनमधून उतरताना बहुसंख्य मुली हातातली सॅक, पर्स शरीराच्या पुढच्या बाजूला धरतात ते फक्त पाकीटमारांपासून बचाव म्हणून नाही. घरातून अशा प्रकारचा सूचनांचा भडीमार (होय, मला भडीमारच म्हणायचं आहे.) वयात येणार्या प्रत्येक मुलीवर होत असावा (स्वानुभव आणि परहस्ते अनुभवही!).
काही लोक म्हणतात, "काळजी घ्या, एवढंच आम्ही म्हणतोय, यात काय गैर आहे?" त्याच्यापुढे एकच पायरी चढून काही लोक म्हणतात, "काळजी घेतली नाहीत, योग्य वागला नाहीत तर भोगा आपल्या कर्माची फळं!" आणि ही भूमिका अयोग्य आहे. मुली काळजी घेत नाहीत म्हणूनच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात हा कार्यकारणभाव चूक असल्याचं अनेक अभ्यासांमधे दिसलेलं आहे. जिथे सुसंगतीच नाही, जे कारणच नाही त्याचं निवारण करण्याच्या सूचना देऊन काय साध्य होणार आहे?
पोट दुखत असेल तर पोटात काय बिघडलंय ते बघायचं सोडून काल सिनेमा बघितला म्हणून आज पोट बिघडलं म्हणण्यासारखं हे आहे. बलात्कारः (गैर)समज आणि तथ्ये यातला पहिलाच मुद्दा वाचावा ही विनंती.
अगदी पिडीत व्यक्तीने काळजी घेतली नाही म्हणून असा प्रकार ओढवून घेतला म्हणजे हे काय दारू पिऊन कार झाडाला ठोकणं आहे का, की ज्या माणसाची चूक झाली आणि त्याच व्यक्तीला परिणाम भोगावे लागले? विकृत वागणार कोण आणि त्याचे परिणाम भोगणार कोण? तिने काळजी घेण्यासाठी 'चादोर' वापरायची का बुरखा वापरायचा का इतर काही? काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं? अनेक ठिकाणी, संशयिताने काही कृती करण्यापूर्वी त्याच्याशी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारा, शक्य असेल तर जरूर प्रतिकार करा (कारण तुम्ही सहज पचणारं भक्ष्य नाही हे लक्षात येईल) इ प्रकारच्या सूचना असतात. अशा प्रकारच्या मनोधैर्य वाढवणार्या (पण तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीनेच जगा असं सांगणार्या) सूचना देण्याऐवजी, "पण काळजी घेण्यात काय वाईट आहे? मी काय चुकीचं म्हटलं" अशा रिकाम्या गप्पांकडे किती लक्ष द्यावं? अशा प्रकारे कार्पेटखाली कचरा सारण्यामुळे कोणाचं, किती भलं झालं आहे? (या कचर्याचा उहापोह करणारा एक लेख लोकसत्तामधे आलेला आहे. घाटपांडे काकांनी प्रतिसादात त्याची लिंक दिलेलीही आहे.)
"मुलींनी काळजी घ्यावी" अशा प्रकारचे प्रतिसाद फुटलेले (yes, I mean it.) दिसले. पण आम्ही आमच्या मुलग्यांशी संवाद ठेवू, त्याच्याशी अशा विषयांवर बोलू, स्त्रिया ही वस्तू नाही अशा प्रकारची मूल्य त्याला शिकवू अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किती प्रमाणात दिसल्या? तुरळक एक-दोन वगळता मला एकही दिसली नाही. 'ऐसी अक्षरे'वरही नाही. माझ्या नजरेतून सुटलेली असेल तर दाखवा, विद्यात बदल करायला, विधान मागे घ्यायला वेळ लागणार नाही.
बहुतेक वेळा लोक मतं बदलत
बहुतेक वेळा लोक मतं बदलत नाहीत याची आता सवय झालेली आहे. लोकांनी मतं बदलावीत म्हणून धाग्यात ते विधान केलेलं नव्हतंच. असा मतबदल दिसला असता तर (आनंदमिश्रीत) आश्चर्य जरूर वाटलं असतं.
मला त्याचा वैताग आलेला आहे; जाफर पनाहीलाही "तू इथे आलीच नसतीस तर तुला पुरुषांच्या स्वच्छतागृहात नेण्याची वेळच आली नसती." किंवा "तू काळजी घेतली नाहीस म्हणून तुझी काळजी घेण्यासाठी मी इथे अडकलो" यावर टीका करावीशी वाटली. मला माझी व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं अशा प्रकारची मतं व्यक्त करणारा जाफर पनाही अजून १८ वर्ष अडकलेला असेल.
या प्रकारच्या
या प्रकारच्या प्रतिक्रियांचाही कंटाळा येऊ लागला आहे.
वर मी दिलेल्या प्रतिसादाप्रमाणे
"तू जा गं कशीही कुठेही.... तुला कोण काय करतो ते पाहतोच आम्ही" असे म्हणायला पालकांना* आवडेलच. पण दुसरा भाग नुसतीच वल्गना ठरायची शक्यता बरीच असल्याने ते पालक पहिला भाग उच्चारू शकत नाहीत असं मानायला काय हरकत आहे. ते पालक मुलीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवताहेत असा आरोप पालकांवर का होतो आहे हे कळत नाहीये.
*पालकांमध्ये हितचिंतकही इनक्लूडेड आहेत.
हे स्वतःवर निष्कारण ओढवून
हे स्वतःवर निष्कारण ओढवून घेणं आहे. आपण जर स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं याचा विरोध करणारे नसू तर "... आता भोग आपल्या कर्माची फळं" या विधानांचा विरोध केल्याचा आरोप स्वतःवर का ओढवून घ्यावा?
किंवा
काही पुरुष विकृत वागतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून काही स्त्रियाही सगळ्याच पुरुषांना वाईट समजतात. सभ्य पुरुषांनी स्वतःला बलात्कारी, विकृत का समजून घ्यावं?
खुलासा.
समाजात घडणार्या अप्रिय घटनांचे कारण संस्कार हे असतात, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा संस्कारांवर भर देणं गरजेचं आहेच, पण फक्त संस्कार हेच कारण नसतं हे लक्षात घेतल्यास, बाकी कारणांसाठी अप्रिय घटना घडू नये म्हणून काही जबाबदार्या घेणं अपरिहार्य बनतं.
योगेश राऊतचा उजवा हात आणि डावा पाय तोडावा, व शालेय अभ्यासक्रमात माणूसकी शिकवण्यासाठी धडा असावा असं मला वैयक्तिकरीत्या वाटतं, पण नयनाने(पुजारी) रात्री/बेरात्री अनोळखी माणसाकडून लिफ्ट घ्यावी हे मला गैर वाटतं.
"पण नयनाने(पुजारी) रात्री/
"पण नयनाने(पुजारी) रात्री/ बेरात्री अनोळखी माणसाकडून लिफ्ट घ्यावी हे मला गैर वाटतं." याबद्दल थोडेसे
१. नयना ज्या कंपनीत होती सिनेक्रॉन, तिथे 8am to 5pm आणि 12noon to 9pm अशा दोन शिफ्ट्स होत्या.
२. रिसेशन टाईममुळे कंपनीने डोअरस्टेप पिकअप ड्रॉप पुर्णतः बंद केलं होतं. 5pm to 9pm अजीबात कंपनी केब मिळायची नाही.
३. जॉब वाचवण्यासाठी, आपण काम करतोय हे दाखवण्याचं खूप प्रेशर होतं. त्यामुळे नयना कंपनी बसने 8am ला ऑफिसात यायची आणि 7.30 to 8pm दरम्यान on her own घरी जायची.
४. त्यादिवशी संकष्टी, करवाचौथ होती आणि नयनाचा उपवास होता.
५. खराडी ला pmt खूप कमी आहेत आणि तिला खराडी ते कात्रज जायचं होतं.
५. ती झेनसारच्या कुल केब मधे चढलेली आणि तिच्यासोबत अजुन एक आयटीचा पुरुष चढलेला, जो मगरपट्टाला उतरलेला. त्यानंतर तिला किडनेप केलं.
६. तिला मारण्यापुर्वी ATM पीन घेउन २ ३ ATM मधुन पैसे काढले.
७. त्या ४ जणांपैकी एक सिनेक्रॉनचा सिक्युरीटी गार्ड एक सिनेक्रॉनचा व एक झेनसारचा केब ड्रायवर होते.
८. कंपनीच एक्सेस कार्ड पाहुन पेनिक होउन तिला मारलं.
९. मारण्यापुर्वी तिला फोर्सफुली काहीतरी खायला घालुन उपवास सोडायला लावलेला.
१०. मारुन फेकुन दिल्यावर त्यांच्यापैकी एक (विश्वास कदम) ने परत येउन तिच्या मृत शरीरावर बलात्कार केला.
बाकी चर्चा वाचतो आहे, ह्या
बाकी चर्चा वाचतो आहे,
ह्या केसशी अगदी जवळून संबंध आल्याने काही मुद्दे लिहितो..
२. रिसेशन टाईममुळे कंपनीने डोअरस्टेप पिकअप ड्रॉप पुर्णतः बंद केलं होतं. 5pm to 9pm अजीबात कंपनी केब मिळायची नाही.
हा मुद्दा काहिसा सत्याला धरून नाही.
तोपर्यंत ह्या कंपनीमधे बसची व्यवस्था दिवसाच्या ठरावीक वेळेलाच असायची. त्या वेळा कंपनीच्या नियमीत दोन शिफ्ट्च्या वेळेबरोबर जुळवलेल्या असायच्या, याशिवाय इतर वेळेला येण्याजाण्याची व्यवस्था स्वत: करायची असायची.
कंपनी कॅब केव्हाही हवी असेल तरी तुमच्या साहेबाचे आणि आणखी कुणाचे तरी अप्रूवल लागायचे. अजूनही लागतेच बहुतेक.
ह्या प्रकारानंतर ह्या कंपनीमध्ये झालेल्या बदलांविषयी, ते इतर वर्कींग वूमन ना चांगले आहेत की वाईट याविषयी लिहिता येइलच, पण ते इथे अवांतर ठरेल.
जवळुन संबध माझाही आलेला आहे
जवळुन संबध माझाही आलेला आहे म्हणुनच "पण नयनाने(पुजारी) रात्री/ बेरात्री अनोळखी माणसाकडून लिफ्ट घ्यावी हे मला गैर वाटतं." असं एका वाक्यात "गैर" ठरवता येतं नाही हे सांगण्यासाठी मी आधीचा प्रतिसाद दिलेला.
२. मुद्द्यात तुमचा आक्षेप 'अजीबात' या शब्दाला असेल तर आक्षेप मान्य आहे.
पण बेंगलोर hp कॉल सेँटर केस आणि wipro ज्योतिकुमारी केस नंतर हायकोर्ट ने (कंपनीतील महीला कर्मचार्याच्या सुरक्षेची जबाबदारी ceo वर असते आणि त्यासाठी) दिलेल्या गाइडलाईन्स, सिनेक्रॉन मधे फॉलो होतं होत्या का?
केब मिळण्यासाठी किती जणांकडे खेट घालावे लागत होते?
आणि या केसच्या थोडे दिवस आधीच, 'रिसेशन टाइममधेदेखील आम्ही पार्टी करु शकतो' हे दाखवण्यासाठी एन्युअल फंक्शन झालं नव्हतं का? बहुतेक फुकट दारुपण होती नक्की माहीत नाही.
"या प्रकारानंतर ह्या कंपनीमध्ये झालेल्या बदलांविषयी, ते इतर वर्कींग वूमन ना चांगले आहेत की वाईट याविषयी लिहिता येइलच, पण ते इथे अवांतर ठरेल." ती तर अजुन वेगळीच कहाणी.
असो मला याविषयावर बोलायला आवडत नाही आणि धाग्यावर अवांतर देखील होतय. सो टॉपिक क्लोज्ड फ्रॉम माय साइड.
लिफ्ट घेतलेली नव्हती तिने
लिफ्ट घेतलेली नव्हती तिने इलिगल ट्रान्सपोर्ट युज करत होती ती.
कालची चिडचिड आज थोडी(च) कमी झालीय म्हणुन आधीच्या प्रतिसादात यापुढचा भाग एडवतेय...
"पण नयनाने(पुजारी) रात्री/ बेरात्री अनोळखी माणसाकडून लिफ्ट घ्यावी हे मला गैर वाटतं."
"म्हणून "रात्री/ दिवसा अनोळखी माणसाकडून लिफ्ट घ्यावी" हे जस्टीफाय होते काय?"
अशा वाक्यांमुळे या केसबद्दल माहीत नसलेल्यांचा समज खालीलप्रमाणे होइल असे मला वाटले
"टिवल्याबावल्या/मौजमजा करुन,रात्री १० १२ वाजता, रोडवर अंगठा दाखवून अनोळखी व्यक्तिकडुन लिफ्ट मागितली किँवा अनोळखी व्यक्ति चार चाकीतुन आला आणि 'चला मेडम तुम्हाला लिफ्ट देतो' म्हणाला आणि नयना त्या गाडीत बसली"
पण वस्तुस्थिती ही होती की "१२ तास काम करुन झाल्यावर, ७.३०-८ च्या दरम्यान, इलिगल ट्रान्सपोर्ट करणार्या, सिनेक्रॉनशेजारीच ऑफिस असलेल्या झेनसारच्या कुलकेब मधे ती चढलेली"
कुलकेब साध्या केब पेक्षा सिक्युअर समजली जाते आणि पुण्यात कितीतरी कंपनीच्या बस/केब, pmt पेक्षा २ ५ रुपये जास्त घेउन इलिगल ट्रान्सपोर्ट करतात. आणि याची गरज का पडली हेदेखील माझ्या, अर्धवट यांच्या प्रतिसादातून स्पष्ट होइल असे वाटते.
अस्मिताशी सहमत,त्याच
अस्मिताशी सहमत,
त्याच अनुषंगाने एक संभाषण कालच ऑफीसात ऐकले म्हणून पुढचे लिहितो.
'तिने अनोळखी माणसाकडून लिफ्ट घेणे' 'रात्री-अपरात्री फिरणे' वगैरे वाक्ये सरसकट कानावर येतात, अशा सगळ्याच अत्याचारांच्या केसेस मधे पुरेशी सत्यासत्यता न पाहता, तेव्हा वैताग येतो आणि घृणाही वाटते.
काल ऑफीसमधे दिल्लीच्या केसविशयी इतर दोघांची चर्चा चालू असता एकाने सहज म्हणले "पण ती पोरगी रात्री साडेअकरा बारा वाजता मित्राबरोबर पिक्चरला गेली हे चूकच नाही का?" माझा संयम सुटणार होता, सुटला नाही हे माझे दुर्दैव.
अवांतर - शहरात इल्लीगल ट्रान्स्पोर्ट उघडपणाने चालते, लोकांना ते वापरावे लागते याबद्दल शहराचा महापौर, पोलीस आयुक्त दोषी नाही, वापरणारा दोषी, वाह रे न्याय..
आक्षेपार्ह पेक्षाआथोडे वेगळे
>>उपरोल्लेखित मतामधे काही आक्षेपार्ह असल्यास ते नक्की काय, हे कधीतरी जाणून घ्यायला मला आवडेल.
सदर वाक्य आक्षेपार्हपेक्षा गैरमजावर आधारित (पालकसुलभ, पोकळ) चिंतेतून आले असले (आणि त्या चिंतेबद्दल मी आस्था बाळगतो तरी) स्त्री अपत्यावर अन्याय करणारे आहे असे वाटते.
जोपर्यंत "मुलींनी थोडी काळजी घेतल्याने काही वाईट होत नाही" हे वाक्य आणि "मुलांनी (मुलग्यांनी) थोडी काळजी घेतल्याने काही वाईट होत नाही" हे वाक्य सारखेच परिणामकारक आणि महत्त्वाचे आहे तोपर्यंत या वाक्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र इथे केवळ "मुलींनाच" काळजी घ्यायला का सांगितली जावी हे कळत नाही.अदितीने दिलेल्या धाग्यात स्वतः बलात्कार झालेल्या सोहेलाचे हे वाक्य इथे चिंत्य आहे: But rape is not inevitable, like the weather
जर मुलींना काळजी घे असे सांगणे योग्य वाटते तर आपापल्या मुलग्यांना "आज काळजी घे रे बाबा, कितीही तीव्र इच्छा झाली तरी कोणावर बलात्कार करू नकोस" असे का सांगितले जाऊ नये? (का मुलग्यांनी बलात्कार करणे ही त्यांची नैसर्गिक inevitable प्रवृत्ती आहे? तसे मत इथे कोणाचे असेल असे वाटत नाही)
कारण सत्य असे आहे की बलात्काराचा संबंध तात्कालिक लैंगिक आवेगाशी अपवादात्मक परिस्थिती वगळता फारसा नाही. आणि इतक्या अपवादाची काळजी घेत बसलो तर वीज पडण्यापासून, फुटपाथवर गाडी घुसून होणार्या शक्य मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींबद्द्ल 'प्रत्येकाने' काळजी घ्यायला हवी या (आणि फक्त याच) दृष्टिकोनातून या वाक्याशी सहमती नोंदवावी लागेल
खतरनाक
"आपापल्या मुलग्यांना "आज काळजी घे रे बाबा, कितीही तीव्र इच्छा झाली तरी कोणावर बलात्कार करू नकोस" असे का सांगितले जाऊ नये? (का मुलग्यांनी बलात्कार करणे ही त्यांची नैसर्गिक inevitable प्रवृत्ती आहे? तसे मत इथे कोणाचे असेल असे वाटत नाही)"
हे वाक्य जबरदस्त आवडले आहे, विरोधाभासाचे उदाहरण म्हणून...
पहिले वाक्य आणि कंसातले वाक्य हि परस्परविरोधी विधाने आहेत असं नाही वाटत तुम्हाला? जर ही नैसर्गिक प्रवृत्ती नाही हे मान्य केलं तर कोण आपल्या मुलांना असं सांगेल? :) लक्षात येतंय का? :) :) :)
त्यावरचे सहमतीचे प्रतिसाद बघून ह्ह्पुवा
"तिचाही काही कमी दोष नाही" - अतोनात आक्षेपार्ह
"तिचाही काही कमी दोष नाही" - अतोनात आक्षेपार्ह - बलात्कार किंवा इतर लैंगिक अत्याचार हे मुलीच्या विवक्षित प्रकारे वागण्यामुळे होत असते तर प्रत्येक मुलीवर व्हायला हवेत कारण कुणाला कुठले कपडे / कशा प्रकारचं वागणं उद्दीपित करू शकेल याविषयी काही ठोक नियम नाहीत. आणि अंगभर कपडे घालणाऱ्या स्त्रियांवर असे अत्याचार होत नाहीत असही नाही
"घेतली थोडी काळजी तर काय बिघडतं? तुझ्याच भल्याचं सांगतो आहोत ना?" - या वाक्यातील गर्भितार्थ जर स्वतःच्या सुरक्षिततेविषयी जागरूक रहा अर्थात (be alert - be safe) असा असेल तर त्यात काही चूक आहे असे नाही. अशी काळजी सर्वानीच घेतली पाहिजे.
बाकी परीक्षण रोचक आहे. सिनेमा पहायचाय .. आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का ?
जो डर गया समझो मर गया ऑर जो नही डरा वो पहिले मर गया
कुठल्या तरी सिनेमाचा एक संवाद आठवला " जो डर गया समझो मर गया ऑर जो नही डरा वो पहिले मर गया"
ह्या जनावारांच्या जंगल राज मधे तुम्हाला जीवंत, ठिक ठाक रहायचे असेल तर काळजी घेतली च पाहिजे. ज्यांना ह्या जनावरांना किंवा system ला आव्हान द्यायचे आहे त्यांनी त्याची किंमत मोजण्याची तयारी ठेवावी.
हा civilised देश नाहीये. त्यामुळे स्वता:च स्वता:ची काळजी घ्या. त्यानी दुर्घटना टाळता आली नाही तरी लांबवता येइल.
काळजी घ्या" म्हणजे काय?
आक्षेप "काळजी घ्या" या भावनेला नाही. "काळजी घ्या" म्हणजे काय करा त्या यादीला आहे
समजा तुला रात्री एकटं जायचंय तर ही ही काळजी घे, समजा बॉयफ्रेंड बरोबर डेटला चालली आहेस तर ही ही काळजी घे, समजा तुझ्यावर रेप झाला तर ही ही काळजी घे यातील "काळजी घे" आणि रेप होऊ नये म्हणून रात्री एकट जाऊ नकोस, डेटिंग करू नकोस, असे कपडे घाल-तासे घालु नकोस ही स्वतःच्या काळजीमुळे मुलीवर बंधने लादणे यात फरक आहे असे मी समजतो.
दुसर्या प्रकारात ते स्वातंत्र्य हिरावून रोज भितीत रहाणं झालं, पहिल्या प्रकारात खरोखर काळजी घेणे व पालकांनी केलेलं मार्गदर्शन झालं. आणि पहिल्या प्रकारची काळजी मुलीच काय मुलांनीही घ्यावीच घ्यावी असे प्रत्येक पालकांनी सांगावे (किमान सांगायचे काम करावे) - त्याला हरकत नाही.
असो.
मगाशी ऐसीवरील एका व्यक्तीशी चॅटवर बोलताना म्हणालो तेच इथे जाहिरपणे सांगतो "रोजच्या रोज या तथाकथित काळजी घेण्याच्या नावाखाली दररोजच्या जगण्यावर इतकी बंधने आणि भितीचे आयुष्य" विरुद्ध "स्वतंत्र आणि कधीतरी रेप होण्याची शक्यता (Probability)" याचा विचार करून यात मी दुसरा पर्याय निवडेन.
काळजी म्हणजे पथ्य
काळजी घेणे म्हणजे preventive maintenance. जसे गाडी, मशिन, किंवा आपले शरीर बिघडु नये म्हणुन आपण prevention घेतो तसेच हे आहे.
मधुमेह झाल्यावर गोड खाऊ नये हे पथ्य आहे. ते तुमच्या स्वातंत्र्या वर घाला च आहे. पण तुम्ही ते करता.
जसा मधुमेह हा वस्तुस्थिती म्हणुन स्वीकारता
तसेच,
रस्त्यावर रात्री माणसातल्या रुपातले राक्षस मोकळे असतात. त्यांना अटकाव करु शकेल अशी गर्दी तेंव्हा नसते. ही वस्तुस्थिती आहे. ती स्वीकारा आणि पथ्य पाळा.
नाहीतर मी वर म्हणल्या प्रमाणे तुमच्यात जर ह्या राक्षसांना आव्हान देण्याचे बळ असेल तर जरुर द्या.
असहमत! शब्दार्थाचा कीस
असहमत! शब्दार्थाचा कीस पाडण्याच्या भानगडीत भावनेकडे दुर्लक्ष होतेय इथे. आणि हा विषय प्रॅक्टिकल असल्यामुळे नुस्ती भावनादेखील काही कामाची नाही. काही काँक्रीट सूचना देणे मस्ट आहे. सर्व सूचना पाळूनसुद्धा बलात्कार होतातच मग त्या पाळण्यात अर्थ काय, हा सवाल मला तरी खरंच कैच्याकै वाटतो. सर्व काळजी घेऊनसुद्धा एखादा रोग होतोच, मग कशाला पाहिजे आयसीयू अन बारा भानगडी असे म्हटल्यासारखे आहे. आपल्या परीने आपण कायम सतर्क असले पाहिजे इतके लक्षात ठेवले म्हणजे झाले. कारण येडझवे लोक फार जास्त आहेत आपल्या देशात.
उगीच 'राक्षस' वगैरे शब्द
उगीच 'राक्षस' वगैरे शब्द वापरून काय उपयोग? हिंदी सिनेमातले विल्हन किंवा परिकथेतील मोठे मिशा-डोळे असलेले चित्रविचित्र राक्षसच फक्त बलात्कार करत नाहीत. हा हिंसाचार साधी माणसं करतात, साधे पुरुष करतात. रात्री अपरात्री, लांब कुठेतरी अंधारातच नाही तर घरात, परिचित मंडळींकडूनही बलात्कार होतात. बलात्काराला आपल्या समाजात फार खोलवर टोलरेट केलं जातं - सामाजिक शिक्षा म्हणून, एखाद्या समाजाचा "अपमान" करायचे साधन म्हणून. या सगळ्याला जबाबदार फक्त मुलींनाच ठेवण्यात आणि बलात्कर करणारांना "वायझेड" का काय ठरवणे आणि त्यांच्या पासून स्वत:ला लांब ठेवले तर असे काही होणारच नाही, बाकी मग तुम्ही पाहून घ्या, असे म्हणणे म्हणजे या सामाजिक टॉलरन्स ला, आणि त्याला कायम ठेवण्यात दैनंदिन सामाजिक, सांस्कृतिक वृत्तींचा काय हात आहे, या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे आहे.
पुण्यात आमच्या कॉलेजच्या समोर मोटारबाइकांवर उभे राहून आम्ही समोरून जाताना शिट्ट्या मारत आमच्या छातीच्या आकाराचे आकडे ओरडत खिदळणारे पुरुष राक्षस नव्हते; आमच्या सारखेच कॉलेज मधे शिकणारे, संध्याकाळी वैशालीत चहा प्यायला येणारी मुलं होते. मध्यम वर्गीय घरातले. यातील अनेक जण (संध्याकाळी ६-७ वाजता सुद्धा) एखादा हात लांब करून आम्हाला हात लावायला घाबरायचा नाही. आम्ही पोलीसांकडे तक्रार केल्यावर आमच्या हॉस्टेलचा कर्फ्यू ९ वाजता होता (म्हणजे फारच उशीरा), आणि आम्ही हॉस्टेल मध्ये एकट्या राहणार म्हणजे "यू मस्ट बी गेम, ऑर होर्स" असे त्यांच्यातल्या एका अगदी सुशिक्षित, गाडीची चावी बोटावर फिरवत फिरवत सांगितलेलं अजूनही आठवतं. यावर कॉलेजवाल्यांचा उपाय - कर्फ्यू ८ वाजता केला गेला.
दिवसाढवळ्याही असा हिंसाचार सर्वत्र होतो, भारतभर होतो; बसमध्ये प्रवास करणारे आणि हळूच गर्दीचा फायदा घेऊन चिमटा काढणारे प्रवासी सगळेच "राक्षस" नसतात. तुमच्या आमच्या सारखेच आई-बहिण-बायको-मैत्रिण असणारे पुरुष असतात, पण त्यांनी असं केलं तर १) त्यांनी काहीतरी गैर केलं असं वाटत नाही, आणि २) पकडले गेले तरी, "काय मोठ्ठं झालं, ती इथे आहेच कशाला, घरी का नाही बसत चांगल्या सुशिक्षित मुलीसारखी, ती इथे नसती तर असं घडलंच नसतं" असे त्याच्या म्हणण्याचे समर्थन करणारे सगळे पुढे सरसावतात.
एखाद्या अत्यंत हिंसक बलात्काराची बातमी पसरली की या सगळ्याला उपाय म्हणजे मुलींनी, स्त्रियांनीच आपलं वर्तन बदलावं, पुन्हा लक्ष्मण रेखा, पडदा, इत्यादीचा स्वीकार करावा (माझ्या मते हॉस्टेलचे कर्फ्यू वगैरे यातच मोडतात), नाहीतर त्यांनी परिणाम भोगावेत असे सांगणारे अनेक दाढीवाले बापू-भैया-स्वामी-दीदी नेहमीच पुढे येतात. पण हेच सोल्यूशन म्हणून ज्यांना स्वीकार नाही, ज्यांना स्त्रिया नोकरी करताना, शिकताना, घराबाहेर पडतील, पुरुषांबरोबर वावरतील, ९ वाजता सिनेमा पाहून बसने घरी परत येतील, ऑफिसहून परतताना कधी त्यांनाही उशीर होऊ शकेल हे पटतं, त्यांनी "तुम्ही काळजी घ्या", आणि याला पुरुषांच्या वर्तनाला 'आता ते असं करणारच, मग आपणच शहाणे होऊ' च्या पलिकडे विचार करायलाच हवा.
धिस इज नॉट अ फिल्म
जफर पनाही हा माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक. 'ऑफसाईड' तुकड्यातुकड्यांत पाहिला आहे. 'द सर्कल' सुद्धा इराणी स्त्रियांना मिळणारी वागणूक याच विषयावर आहे.
२०११ साली पनाहीने स्वतः नजरकैदेत असताना आणि त्याच्यावर चित्रपट बनवण्याची बंदी असताना कुठूनतरी एक व्हिडियोकॅम पैदा केला आणि आपल्या त्या आयुष्यातला एक दिवस चित्रित केला. हा चित्रपट नंतर फ्लॅश ड्राईव्हमध्ये टाकून ती एका केकमध्ये लपवून बाहेर नेण्यात आली. या माहितीपटाचे (?) नाव 'धिस इज नॉट अ फिल्म' असे ठेऊन तो अमेरिकेत चित्रपटगृहांत दाखवण्यात आला. अधिक माहिती http://karinaschroeder.com/2012/03/23/an-inside-look-on-iranian-censors… येथे मिळेल.
काळजी घेणे हे जेंडर स्पेसिफिक नाही
रात्री बेरात्री एखाद्या पुरुषानेही कुठेही फिरण्याचे धाडस करू नये. मला कोण काय करणार आहे? इथेपासून ते माझे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिस आणि समाजावर आहे इथेपर्यंत कोणताही विचार कामी येत नाही.शहराच्या मध्यवर्ती भागापासूनचे अंतर आणि एकट्याने सुरक्षितपणे फिरण्याची रात्रीची वेळ व्यस्त प्रमाणात असते.
भारतात अगदीच वाईट परिस्थिती नसली तरी 'मगिंग' होऊ शकते.(बंगलुरुच्या बातम्या आल्या होत्या असे आठवते.) दारूबाज झुंडींशी वाद होऊ शकतो. मद्याच्या अंमलाखाली ड्रायव्हिंग करणारा उडवू शकतो. ज्या काळात धार्मिक/जातीय तणाव असतो/दंगली होण्याची शक्यता असते तेव्हा रात्रीबेरात्री गल्लीबोळातून फिरणे पुरुषाच्या प्राणावर बेतू शकते. इ.इ.
काळजी न घेतल्यास व्यक्तीचा प्राण जाऊ शकतो. स्त्री असल्यास (स्त्रीच्या पावित्र्याला प्राणाइतकेच महत्त्व देणारी संस्कृती असल्याने , आयरॉनिकली)तिचे पावित्र्य(!) लुटले जाऊ शकते.
ऋषिकेश म्हणतो त्याप्रमाणे
ऋषिकेश म्हणतो त्याप्रमाणे प्रमूख आक्षेप 'काळजी घ्या' म्हणजे काय करा याच्या यादीला आहे.
आणि काळजी घ्या असं सांगणार्यांना सरसकट बुरसटलेले असं विशेषण मी तरी लावणार नाही,
परंतू "जोपर्यंत परिस्थीती सुधारत नाही तोपर्यंत जरा काळजी घ्या" असं पोटतिडीकीने समजावणारा समाजाचा एक मोठा भाग, तीच परिस्थीती सुधारण्यासाठी काय करता येइल याची चर्चा त्याच पोटतिडीकीने करताना दिसत नाही याचा खेद वाटतो इतकंच.
अन्याय
>>परंतू "जोपर्यंत परिस्थीती सुधारत नाही तोपर्यंत जरा काळजी घ्या" असं पोटतिडीकीने समजावणारा समाजाचा एक मोठा भाग, तीच परिस्थीती सुधारण्यासाठी काय करता येइल याची चर्चा त्याच पोटतिडीकीने करताना दिसत नाही याचा खेद वाटतो इतकंच.
याबद्दल साशंक आहे. यासाठी वर सुचवलेले उपाय उदा. आपल्या मुलग्यांना समजावणे, त्यांच्यावर संस्कार करणे वगैरे करण्याबाबत काळजी घ्या म्हणणारेही सहमतच असतील. आणि आपल्या मुलग्यांवर तसे संस्कार करतही असतील.
काळजी घेणे या यादीत अंगभर कपडे घाला, रात्री बाहेर फिरू नका अशा बंधनस्वरूप निगेटिव्ह गोष्टी असतील तशाच.... शक्यतो वर्दळीच्या जागी रहा. बॉयफ्रेंडबरोबर सुद्धा सुनसान जागी जाऊ नका अशा केवळ काळजी घेण्याच्या सूचनाही असतील.
ऋषीकेशने म्हटल्याप्रमाणे "धोका पत्करायला तयार आहे" असे म्हणणार्या किती मुली सापडतील हे ठाऊक नाही.
काळजी घ्या असे म्हणणार्यांना "परिस्थिती बदलावी असे वाटत नाही/बदलू नये" असे वाटते हा गर्भित आरोप अनाठायी आणि अन्यायकारक वाटतो.
जे काळजी घ्या म्हणत आहेत त्यांचे म्हणणे, "काळजी न घेणे म्हणजे धोका पत्करणे" इतकेच आहे. धोका पत्करायला तयार असणारे आपल्या जवाबदारीवर पत्करू शकतात. [तुमच्या जवाबदारीवर धोका पत्करा असे म्हणायला पालक धजावत नाहीत एवढाच काय तो प्रश्न आहे].
अवांतर : धोका पत्करा असा सल्ला देणारा रेकलेस होण्यास उद्युक्त तर करत नाही?
>>काळजी घ्या असे
>>काळजी घ्या असे म्हणणार्यांना "परिस्थिती बदलावी असे वाटत नाही/बदलू नये" असे वाटते हा गर्भित आरोप अनाठायी आणि अन्यायकारक वाटतो.
मुद्दा सब्जेक्टीव आहे हे मान्यच परंतू, मी लिहिलेल्या वाक्यातील महत्वाचा शब्द "त्याच पोटतिडीकीने" हा होता,
सरसकटीकरण करणे मलाही आवडणार नाही, परंतू काही वेळेस, "काळजी घ्या" ह्या वाक्याची पुढची आवृत्ती "काळजी घेतली नाही ना, मग होणारच बलात्कार" मग पुढे "बलात्कार झाला म्हणजे, निष्काळजीच असेल ती" इथपर्यंत जाऊ शकते असे नोंदवतो.
स्पॉट ऑन!!!
ऋषीकेशने म्हटल्याप्रमाणे "धोका पत्करायला तयार आहे" असे म्हणणार्या किती मुली सापडतील हे ठाऊक नाही.
काळजी घ्या असे म्हणणार्यांना "परिस्थिती बदलावी असे वाटत नाही/बदलू नये" असे वाटते हा गर्भित आरोप अनाठायी आणि अन्यायकारक वाटतो.
जे काळजी घ्या म्हणत आहेत त्यांचे म्हणणे, "काळजी न घेणे म्हणजे धोका पत्करणे" इतकेच आहे. धोका पत्करायला तयार असणारे आपल्या जवाबदारीवर पत्करू शकतात. [तुमच्या जवाबदारीवर धोका पत्करा असे म्हणायला पालक धजावत नाहीत एवढाच काय तो प्रश्न आहे].अवांतर : धोका पत्करा असा सल्ला देणारा रेकलेस होण्यास उद्युक्त तर करत नाही?
शब्दाशब्दाशी प्रचंड सहमत. अधोरेखित वाक्यांत दुखरी नस पकडल्या गेली आहे.
बलीवर्दनेत्रभञ्जक प्रतिसाद!!!
हेच हेच!
बाकीवर चर्चा होते आहेच. त्याबद्दल माझे मत पुरेसे स्पष्ट आधीच आहे. वेगळ्या शब्दात पुनरुक्ती करत नाही
तुमच्या जवाबदारीवर धोका पत्करा असे म्हणायला पालक धजावत नाहीत एवढाच काय तो प्रश्न आहे
या चर्चेत पालकांच्या भुमिकेतून बरेचसे विचार मांडले जात असल्याने या प्रश्नाला कंसात सोडण्याऐवजी खरंतर याच प्रश्नावर विस्ताराने चर्चा होणे अधिक गरजेचे वाटते. कायद्याने सज्ञान पाल्यांच्या पालकांची भुमिका इथे मार्गदर्शकाची असावी का बंधने घालणार्या प्रशासकाची? खरंतर पालकांचीच का खरंतर सज्ञान व्यक्तींच्या नातेवाईकांची (ज्यात या चर्चेपुरते आई-वडिलांप्रमाणे नवरा, भाऊ आणि प्रसंगी अपत्ये चिंत्य समजावी) भुमिका काय असावी? आणि माझ्यामते तिथेच या चर्चेची मेख असावी :)
अपेक्षेप्रमाणे इथे सगळे गप्प
कायद्याने सज्ञान पाल्यांच्या पालकांची भुमिका इथे मार्गदर्शकाची असावी का बंधने घालणार्या प्रशासकाची? खरंतर पालकांचीच का खरंतर सज्ञान व्यक्तींच्या नातेवाईकांची (ज्यात या चर्चेपुरते आई-वडिलांप्रमाणे नवरा, भाऊ आणि प्रसंगी अपत्ये चिंत्य समजावी) भुमिका काय असावी?
अपेक्षेप्रमाणे इथे सगळे गप्प (झाले?) आहेत ;)
पाल्याला स्वतःला अक्कल नसते तेव्हा आम्ही सांगतो तसे वागावे असे पालक एका वयापर्यंत समजत असतीलही पण वय वाढल्यावर मुलग्यांप्रमाणेच, मुलगी, बहिण सज्ञान झाली आहे (किंबा बायको, आई सज्ञान आहे) तिला एक व्यक्ती म्हणून तिच्याशी संबंधीत प्रत्येक निर्णय तिचा तिला घेऊ द्यावा हे योग्य स्वातंत्र्य नाही काय? 'काळजी घेणे' म्हणजे निर्णय घेताना चर्चा व्हावी, मते सांगितली जावीत मात्र आपला निर्णय सज्ञान स्त्रियांवर लादला जाऊ नये. मग तो रात्री अपरात्री बाहेर फिरण्यासंबंधी असो किंवा आखुड कपड्यांविषयी. स्त्रिया सज्ञान आहेत आणि त्यांचे त्यांना भले बुरे कळते यावर माझा ठाम विश्वास आहे. तुमचा?
परत परत तेच म्हटले जात
परत परत तेच म्हटले जात असल्याने गप्प झालो होतो.
प्रशासकाची भूमिका घेण्याची 'काळजी घ्या' असे म्हणणार्या कोणाची इच्छा आहे असे वाटत नाही. आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तुमच्या जबाबदारीवर काही करा असे म्हणायला पालक तयार होत नाहीत याची दोन कारणे असतात.
१. स्वातंत्र्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची आणि ती शेवटपर्यंत निभावण्याची मुलींची तयारी आहे अशी परिस्थिती अजून आलेली नाही असे वाटते.
२. पालक ज्या समाजात राहतात त्या समाजात पालकांचीसुद्धा/पालकांचीच जबाबदारी आहे असे समजले जाते. (या जबाबदारीत संपूर्ण समाजातल्या पुरुषांचे शिक्षण करणे अर्थातच अपेक्षित नसते).
बाकी आता थांबतोच.
आभार!
स्वातंत्र्याची संपूर्ण जबाबदारी घेण्याची आणि ती शेवटपर्यंत निभावण्याची मुलींची तयारी आहे अशी परिस्थिती अजून आलेली नाही असे वाटते.
आभार! (आणि खरेतर हे मत इतक्या स्पष्टपणे मांडल्याबद्दल अभिनंदन)
हेच बहुसंख्य पुरूषांचे मत अधोरेखीत करायचे होते आणि अर्थातच या मताशी सहमत नाही.
सुलभीकरण
>>>परंतू "जोपर्यंत परिस्थीती सुधारत नाही तोपर्यंत जरा काळजी घ्या" असं पोटतिडीकीने समजावणारा समाजाचा एक मोठा भाग, तीच परिस्थीती सुधारण्यासाठी काय करता येइल याची चर्चा त्याच पोटतिडीकीने करताना दिसत नाही याचा खेद वाटतो इतकंच.
असं मानणं हा एकंदर सुलभीकरणाचा एक भाग.
ओव्हरऑल, सुलभीकरण हा सगळ्याचा स्थायिभाव बनत चाललेला आहे. (हे विधान म्हणजेदेखील एक सुलभीकरण आहे असं कुणी म्हणेल :) ) "एकंदर परिस्थिती पालटली पाहिजे पण मुलींनी काळजी घेणंसुद्धा चुकीचं नाही" असं काळजीपोटी सांगणार्यांच्या हेतूंबद्दल संशय व्यक्त केला किंवा त्यांना कसलं कसलं लेबल लावलं तर ते आर्ग्युमेंटकरता सोयीचं होतं.
"तुमचं एकंदर म्हणणं मान्य आहे, परंतु त्याचबरोबर अन्य काही गोष्टीही खर्या आहेत, त्यांच्याबाबतही विचार करा, त्याला दुय्यम लेखण्याची किंवा "कंटाळा करण्याची" चूक करू नका" असं म्हणणं म्हणजे तुमच्या मूळ मुद्द्यालाच विरोध करणं नव्हे हे (पुन्हा एकदा, कंटाळा न येता) नमूद केलेलं बरं.
ऍनालॉग काळजी
सगळी चर्चा वाचली. मला वाटतं 'काळजी' हा शब्द पुरेसा स्पष्ट न झाल्यामुळे याबद्दलचा वाद अधिकच वाढतो.
त्याची एक छटा अशी आहे की बलात्कारापश्चात त्याची कारणमीमांसा करताना 'तू काळजी घेतली नाहीस म्हणून तुझ्यावर बलात्कार झाला, याचा अर्थ ती तुझी चूक'
दुसरी छटा अशी आहे की 'अगं भटकायला हरकत नाही, पण भलत्या वेळी भलत्या ठिकाणी जाऊ नकोस, भलत्या गोष्टी करू नकोस. थोडी काळजी घे.'
पैकी पहिला वापर अर्थातच त्याज्य आहे हे सगळेच मान्य करत असावेत. दुसऱ्या वापरातही 'भलतं' म्हणजे काय यावरून योग्य की अयोग्य ठरतं. जगात काहीच काळंपांढरं नसतं, तसंच काळजी घेणं म्हणजे काय हेही एका स्पेक्ट्रमवर असतं.
- आपला चेहरा परपुरुषांना दाखवणं - बुरखा घालण्याची काळजी घ्यावी
- उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकणं - बाजाराला वगैरे जावंच लागलं तर नवरा किंवा भावाबरोबर जाण्याची काळजी घ्यावी
या अतिरेकी आणि आक्षेपार्ह काळज्या घेण्याची सूचना अजूनही काही देशात होते.
- स्त्रियांनी घरकामापलिकडे नोकऱ्या वगैरे करणं - हिंडाफिरायला हरकत नाही, पण जास्तच बाहेरेचे उद्योग सांगितले आहेत कोणी? ते न करण्याची काळजी घेतली की झालं.
- सूर्यास्तानंतर बाहेर असणं - सातच्या आत घरात येण्याची काळजी घ्यावी
हे पहिल्या दोनपेक्षा जरा कमी जाचक असले तरी जाचकच आहेत. जसजसे आपण या अटी शिथिल करत जातो, म्हणजे स्वातंत्र्य वाढवत जातो, तसतसं त्या काळजीमागची स्त्रियांना बंदिस्त करण्याची भावना कमी होत जाते.
- अमुकअमुक एरिया म्हणजे गुंडांचा अड्डा आहे. तिथे अपरात्री जाणं. - ते टाळण्याची काळजी घ्यावी
- बारमध्ये कोणाबरोबर ड्रिंक घेताना आपलं ड्रिंक नुसतंच सोडून बाथरूममध्ये वगैरे जाणं. त्याने कोणीतरी त्यात काहीतरी टाकण्याची शक्यता असते - ते टाळण्याची काळजी घ्यावी
दुर्दैवाने 'काळजी' या शब्दाच्या बरणीचा वापर सरसकट केला की भलतंसलतं न करण्याची काळजी घेण्यात पहिल्या व दुसऱ्या दोन काळज्यांची तुलना शेवटच्या दोन काळज्यांशी होते. मग किंचितच वेगळी मतं असणारांमध्ये वाद झाला तर काय आश्चर्य?
़धन्यवाद!
नेटफ्लिक्सवर सापडला. आजच पहाते आणि मग प्रतिक्रिया देते.