Skip to main content

संपादकीय


दर वर्षी दिवाळी आली की 'हल्लीच्या दिवाळी अंकांत काही दम नाही. श्रीपु मौजेत होते तेव्हाची मौज म्हणजे…' प्रकारचे उसासे येऊ लागतात. तसंच 'मी एकही दिवाळी अंक वाचत नाही' अश्या फुशारक्याही येतात. ज्यांचं लिखाण दिवाळी अंकांत आलेलं असतं ते आपल्या लिखाणाची प्रसिद्धी करतात. काहींच्या तर 'या वर्षी माझं लिखाण कुठे कुठे वाचाल? तर इथे इथे.' अश्या याद्याच प्रसिद्ध होतात. कुणी निंदा किंवा वंदा, दिवाळी अंक जिथेतिथे दिसू लागतातच. जाहिरातीत दिलीप प्रभावळकर की मोहन आगाशे असे काही किरकोळ फरक तेवढे होत राहतात.  

 

याशिवाय दिवाळी अंकांचं एक अर्थकारणही असतं. अनेक लेखकांना वर्षातलं सर्वाधिक मानधन दिवाळीत मिळतं. अनेक दिवाळी अंक काढणाऱ्यांची (आणि ते विकणाऱ्यांची) सर्वात जास्त कमाईही दिवाळी अंकांमुळे होते. अर्थात, हा आकडा काही कोटींमध्ये वगैरे नसतो, कारण शेवटीं आम्हीं…  

 

तर या सगळ्यात 'ऐसी अक्षरे' कुठे बसतो? २०१२पासून हा दिवाळी अंक निघतो. तोही ऑनलाईन आणि विनामूल्य. म्हणजे लेखकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाव्यतिरिक्त अर्थकारण इथे नाही. अंकातली काही नावं तुम्हाला इतर दिवाळी अंकांतही दिसतील, तर काही वेगळी नावंही दिसतील. दर वर्षी काही तरी हटके देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या वर्षी इतिहास संशोधक प्रा. सुमीत गुहा यांनी महाराष्ट्राविषयीच्या दस्तावेजांमधून एक जुनी गोष्ट आपल्यासमोर आणली आहे. गावगाड्यात खरं तर जिला फारसं स्थान नाही अशा एका स्त्रीचा न्यायासाठीचा लढा त्यात दिसेल. 'ऐसी'शी सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या इतिहास संशोधक प्राची देशपांडे (रोचना) यांनी महाराष्ट्र आणि त्याचे शेजारी यांच्यात झालेल्या बहुभाषिक आदानप्रदानाचा एक दरवाजा किलकिला करून भाषावार प्रांतरचनेच्या पलीकडे 'प्रदेश' असा विचार करता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेकडो वर्षांपूर्वी भारताच्या जगाशी असलेल्या व्यापाराद्वारे सांस्कृतिक, भाषिक आणि धार्मिक देवाणघेवाण कशी झाली ते एका बुद्धमूर्तीच्या माध्यमातून इतिहास संशोधक शैलेन भांडारे यांनी उलगडून दाखवलं आहे. महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासात ज्यांना रस आहे आणि त्याविषयीची तीच ती नेहमीची दळणं टाळून वेगळं काही ज्यांना वाचायचं आहे त्यांना हा बौद्धिक फराळ आवडावा. मराठी अभिजात झाल्यामुळे उल्हसित होऊन उत्सव करण्यापेक्षा मराठी चश्म्यातून जगाविषयीचं ज्ञान निर्माण होण्यासाठी काय काय व्हायला हवं, याविषयीचं भाषाशास्त्रज्ञ चिन्मय धारूरकर यांचं चिंतनही कोणत्याही भाषाप्रेमी व्यक्तीला सुरस वाटावं.

 

वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मराठीत आणावं याच हेतूनं आम्ही या वर्षी एक विज्ञान-तंत्रज्ञान विभागही अंकात समाविष्ट केला आहे. औषध शरीरात नेमक्या ठिकाणी पोचून अपेक्षित परिणाम कसा साधतं, खनिज प्रकल्पासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, खाद्यतेल कोणतं वापरायचं ते कसं ठरवावं, आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेलं मोबाईल तंत्रज्ञान कसं उत्क्रांत झालं, असे ह्या विभागातले विषय पाहिले तर त्याची व्याप्ती लक्षात यावी. बाजारातल्या खूपविक्या पुस्तकांपेक्षा यात विषयाची खोलीही अधिक जाणवेल अशी आशा आहे.

 

दिवाळी अंकानं निव्वळ बोजड प्रबोधन न करता रंजनही करावं ह्या हेतूनं अंकातला ललित विभाग सजवला आहे. यात हृषीकेश गुप्ते, प्रसाद कुमठेकर यांसारख्या नावाजलेल्या समकालीन लेखकांचं साहित्य वाचायला मिळेल, तसंच अरुण खोपकरांचे लाडके प्राणीही भेटतील. ज्यांना अभिजातता खुणावते त्यांच्यासाठी जॉन स्टाईनबेकची योजना आहे, आणि रंजकतेच्या चाहत्यांसाठी भारतीय बाजाच्या फ्रेडरिक फॉरसाइथचीही. इतरही बरंच काही वाचायला आहे. प्रत्येक वाचकाला आपल्या आवडीचं काही तरी मिळो हीच आमची नेहमी इच्छा असते. अंकाला दर वर्षी जो उदंड प्रतिसाद मिळतो आणि वर्षं सरली तरी जुन्या अंकांतल्या लेखांना जे नवे वाचक मिळत राहतात त्यावरून तरी ही कामनापूर्ती होत राहताना दिसते. वर म्हटल्याप्रमाणे आम्हाला यात आर्थिक लाभ काहीही नसला तरी दर वर्षी दिवाळी अंकासाठी काम करायला मजा मात्र येते. किंबहुना, अंकाच्या निर्मितीत सहभागी असलेले सर्व जण त्यासाठीच एकत्र येतात. ही मजा वाचकांसोबत वाटून घ्यावी म्हणून हा खटाटोप.

चिमणराव Thu, 23/10/2025 - 06:27

ऐसी अक्षरे सर्वोत्तम दिवाळी अंक असतो. कोणत्याही अर्थकारणात न अडकल्यामुळे निव्वळ आनंद मिळतो. या वर्षी अंकातले लेख अगोदर वाचून नंतर संपादकीय वाचण्याचा योग आला.ऋणनिर्देश वाचलंय.
दहा बारा लेख वाचून झाले आहेत. प्रतिसादही दिले आहेत. इतर लेख वाचणारच आहे.
..
जयदीप चिपलकट्टींचा लेख या वर्षी नाही?
पाककलेत साहित्य आणि ललित बुडवणाऱ्या सई केसकरांनी मात्र विकी छाप लेखावर बोळवण केली. कोणत्याही वेगळ्या फराळाची पाककृती दिली नाही.
वाचतो आहे वाचत राहीन. ऐसीतली मौज कायम आहे.

सई केसकर Thu, 23/10/2025 - 18:45

In reply to by चिमणराव

खरंतर एक अतिशय गोड पाककृती होती माझ्याकडे. पण ती बुंदीच्या लाडवांची होती. मग त्याचा आणि माझ्या विकिपीडीत लेखनाचा संबंध जोडला गेला असता म्हणून नाही लिहिली. :D

चिमणराव Fri, 24/10/2025 - 07:40

In reply to by चिमणराव

एक आठवण..

ललित मासिकात जयवंत दळवी एक सदर गुपचूपपणे ठणठणपाळ या नावाने लिहीत होते. ते काही दिवस सुटीवर गेले म्हणजे लिहायचे थांबले होते. तेव्हा जी.ए. यांनी धारवाडहून एक खरमरीत पत्र पाठवले "ठणठणपाळ सदर येत नसेल तर xxxxx xxxx आम्ही ललितची वर्गणी काय म्हणून भरायची?" (धारवाडला राहून मुंबईत प्रकाशक - लेखक यांचे काय आर्थिक व्यवहार होतात हे जीएंना असं कळायचं हा एक संशोधनाचा विषय होताच.)
तर नंतर वाचकांची ओरड सुरू झाली की आम्हाला या सदरामागचा लेखक कळलाच पाहिजे. शेवटी असं ठरलं की दादरच्या आइडिअल ( बॉम्बे बुक?) डेपोतून पुस्तक विकत घेणाऱ्याला अमुक दिवशी लेखक ( आतमध्ये गुप्त राहून)पुस्तकावर सही ठणठणपाळ करून देतील. खूप गर्दी झाली, पुस्तकांवर सही घेतली पण वाचक हटून बसले की तो लेखक दाखवाच.( बुक डेपोत त्यांना कसे गुप्तपणे रात्रीच आणून ठेवले होते याचा सुगावा लागला नव्हता.) शेवटी जयवंत दळवींना बाहेर यावे लागले. ठणठणपाळचा लेखक कळल्याने त्या सदराचे अप्रूप नंतर कमी झाले. या सदरात लेखक प्रकाशकांच्या कित्येक कार्यक्रमांचा खरमरीत विनोदी आढावा घेतला जात असे. मग लोकांनी हजर असलेल्या अशा कार्यक्रमांत कोण सक्षम लेखक येत असेल याचा तर्क लढवायचाही प्रयत्नही केला होता.

तिरशिंगराव Thu, 23/10/2025 - 06:59

ऐसीचा दिवाळी अंक हा 'हटके'च असतो. इतकं वैविध्यपूर्ण आणि सशक्त लेखन दुसर्‍या कुठल्या दिवाळी अंकात, एका ठिकाणी वाचायला मिळणे अवघड! म्हणुनच तो संपूर्ण वाचायला बरेच दिवस लागतात. पूर्वी तर, ऐसीचं संस्थळ बारा महिने, अशाच दर्जाचं असायचं! पण आता ते तसं राहिलं नाही. ती उणीव दिवाळी अंकात भरुन निघते.

चिमणराव Thu, 23/10/2025 - 09:26

In reply to by तिरशिंगराव

फटके

>>पूर्वी तर, ऐसीचं संस्थळ बारा महिने, अशाच दर्जाचं असायचं! पण आता ते तसं राहिलं नाही....>
वाचकच फटकून राहिले ( गुपचूप वाचून जातात, प्रतिसाद देत नैत)तर लेखकांचा उत्साह कमी होतो ना.

सुधीर Thu, 23/10/2025 - 10:50

मागच्यावेळी पेजरीड काउंट हा निकष ठेवला होता. तो फसवा आहे. संपादकांना युनिक वाचक, डेमोग्राफी इ. निकषांवर लोकप्रियता मोजता येईल. त्यासाठी अंक वाचनासाठी सोशल मिडिया वा इमेल लॉगिन जरूरी ठेवता येईल.

पण मग कधी कधी वाटते लोकप्रियता हाही निकष फसवाच आहे. अंक "मोजक्या वाचकांपुरता" मर्यादीत असला तरी कुठे बिघडते. सकस लेखन असावे इतपत अपेक्षा मोजक्या वाचकांनी ठेवली आणि संपादकांनी ती पूर्ण केली तरी खूप झाले. कदाचित भविष्यात, १०-१५ वर्षापूर्वीच्या इतिहास, साहित्य, कला, संस्कृतीवरच्या एखादं चांगल्या लेखावर ग्रामिण भागातला तरुण वाचक शोधत शोधत आला आणि त्याला हवे ते मिळाले तर अंकासाठीची घेतलेल्या मेहनतीचे सार्थक झाल्यासारखे होईल. आजही असे बरेच लेख असतात जे गुगलवर शोधताना सापडतात, आणि ज्यात विषयाची मांडणी आणि चांगली चर्चा झालेली असते.

चिमणराव Thu, 23/10/2025 - 14:12

In reply to by सुधीर

फसवं काय?

>>पण मग कधी कधी वाटते लोकप्रियता हाही निकष फसवाच आहे. >>फेसबुकमधल्या फसव्या शाबासक्या( लाईक्स) आवडू लागल्या तर आपण तरी काय करणार?

सुधीर Thu, 23/10/2025 - 15:44

In reply to by चिमणराव

सर्च इंजिन, हॅकर्सच्या वेबसाईट आणि प्रतिसादागणिक धागा उघडणारे वाचक यामुळे वाचनसंख्या वाढत जाते. वाचनसंख्या वरून नेमके खरे वाचक किती हे कळत नाही म्हणून फसवं म्हणतोय.

'न'वी बाजू Thu, 23/10/2025 - 18:15

In reply to by सुधीर

वाचनसंख्येचाच जर निकष लावायचा झाला, तर मग ख्रिस्ती धर्मपरिवर्तनावरील धागा हा प्रस्तुत दिवाळी अंकातील सर्वात लोकप्रिय धागा मानावा लागेल.

(घटं भिंद्यात्…)

(आणि, अशा प्रकारच्या चुकीच्या निष्कर्षांवरून प्रेरणा घेऊन ‘ऐसी’ व्यवस्थापनाने उद्या एखादा नाताळ विशेषांक नाही काढला, नि तो चर्चच्या महत्कार्याच्या महतीचे पोवाडे गाणाऱ्या आमंत्रित लेखांना नाही वाहिला, म्हणजे मिळवली. नाही म्हणजे, नाताळ विशेषांकास तत्त्वतः विरोध नाही. Any excuse to be merry; फक्त दिवाळीच काय म्हणून? दिवाळी, नाताळ, ईद, ख़ानुका, काय वाटेल ते चालेल. परंतु, नाताळ विशेषांक आहे, म्हणून त्यात चर्चविश्लेषणात्मक लेख ही थीम काय म्हणून असावी? (तशी ती सांताची थीमसुद्धा आता घिसीपिटी तथा (विशेषेकरून अमेरिकेत राहिल्यावर) अतिपरिचयात् कंटाळवाणी वाटते, म्हणा, परंतु, चालायचेच.))

(अतिअवांतर: तो सांता, नाताळच्या पहाटे रेनडियरांच्या बर्फगाडीत बसून, लोकांच्या घरांच्या धुराड्यांतून घुसून, जगभरातल्या (चांगल्या) मुलांना खेळणी वाटतो, म्हणे. आता, लठ्ठ सांता त्या एवढ्याश्या धुराड्यांतून (न अडकता) पार होऊ शकतो कसा, किंवा, (उदाहरणादाखल) मुंबईतल्या घरांत घुसायला मुळात त्याला बोंबलायला धुराडी सापडतात कोठे (आता तर मुंबईतल्या कापडगिरण्यासुद्धा गेल्या!), असे प्रश्न विचारायचे नसतात, ते तूर्तास सोडून देऊ. परंतु, थंडीचे उबदार कपडे घालून नि (रेनडियरांनी ओढलेल्या!) बर्फगाडीत बसून सांता ऑस्ट्रेलियातल्या नाताळच्या उकाड्यात दारोदार हिंडतो, ही कल्पना मनमोहकरीत्या विनोदी आहे. ख्रिस्त भले मध्यपूर्वेतला असेल (येरुशलेम/बेथलेहेममध्ये बर्फ?), नि त्याने प्रणीत केलेला धर्म हा भले मुळातला तिथला असेल, परंतु, आजचा तथाकथित ख्रिस्तधर्म तथा नाताळ, सांता वगैरे प्रथा या केवळ जागतिक युरोपियन सांस्कृतिक वसाहतवादाच्या द्योतक आहेत, याला याहून भरभक्कम पुरावा तो आणखी काय हवा? पण लक्षात कोण घेतो? चालायचेच.)

'न'वी बाजू Fri, 24/10/2025 - 07:34

In reply to by सुधीर

…मुंबईत सांता का असावा?

सांता क्लॉज़/नाताळबाबा ही काही पॅन-किरिस्तांव/अखिल ख्रिस्ती परंपरा नव्हे. तिचा उद्गम युरोपीय ख्रिस्ती परंपरेत आहे.

सांता क्लॉज़/नाताळबाबा ही संत निकोलस या आद्य ग्रीक ख्रिस्ती संतावरून विविध युरोपीय संस्कृतींत बेतलेली स्थानिक अर्धकाल्पनिक पात्रे आहेत. त्यांचा ख्रिस्ती धर्मपरंपरेशी थेट संबंध नाही; असलाच, तर अप्रत्यक्ष आहे.

(किंबहुना, नाताळ हीसुद्धा खरे तर युरोपात उद्भवलेली प्रक्षिप्त परंपरा असून, ख्रिस्तजन्माशी तिचा बादरायणसंबंध हा नंतर ओढूनताणून जुळविण्यात आलेला आहे, अशीही एक थियरी आहे.)

असो.

प्रभुदेसाई Thu, 23/10/2025 - 22:44

असे आहे का. आभार नबा!

'न'वी बाजू Sat, 25/10/2025 - 08:05

संपादकीयात त्या ख्रिस्ती धर्मपरिवर्तनांवरील लेखाचा उल्लेख is conspicuous by its absence.

असो चालायचेच. (As in, त्यात विशेष ते काय!)

#कुत्रामाणसालाचावलातरतीबातमीहोतनाही

सुधीर Fri, 31/10/2025 - 23:06

दरवर्षी नवनवीन छापील दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि आपापल्या "मार्केट सेगमेंट"मध्ये काही अंकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या अंकांच्या किंमती साधारणतः २०० ते  ६५० रुपये च्या दरम्यान असतात. अनेकदा हे अंक ग्रंथालयातून वाचले जातात; काही वेळेला खरेदी करून.  यंदा भास मध्ये जयदीप चिपलकट्टी, आदुबाळ आणि मेघना यांच्या कथा दिसल्या. हृषिकेश आणि मेघना यांचा लहान मुलांसाठीचा कुल्फी, तसेच शुभदा चौकरचा यांचा वयम हे अंक गेली काही वर्षे माझी बहिण भाच्यांसाठी आणते; मराठी वाचनाची गोडी लागावी म्हणून.

दिवाळी अंकांची ही भाऊगर्दी पाहता, आर्थिक गणित बिघडलेलं नसावं असं वाटतं; तरीही कधी कधी शंका येते, कदाचित काही गणितं चुकतही असतील. कारण खपाची ठोस आकडेवारी सहज उपलब्ध नसते. ४५० रुपये किंमतीच्या एका अंकासाठी ‘ना नफा ना तोटा’ गणित साधण्यासाठी किमान ७०० ते १००० प्रती विकल्या गेल्या पाहिजेत, असा माझा अंदाज आहे; जो साफ चुकीचा असू शकतो. कारण यात मी जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न पकडलेले नाही. छपाईच्या कागदाची गुणवत्ता, पृष्ठसंख्या, पृष्ठ गणिक छपाईचा खर्च, प्रति लेखक मानधन, प्रति लेख प्रूफरीडिंग, विक्रेत्याचे कमिशन आणि इतर काही खर्चांचा माझा अंदाज साफ चुकीचा असू शकतो.

या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मनात येतो, दिवाळी अंकांची ही उलाढाल कितीची असावी? दरवर्षी किती अंक प्रकाशित होतात? त्यांचा एकूण खप किती असतो? एकंदर किती प्रकाशक; लेखक; कवी; ग्राफिक्स डिझायनर; वितरक या प्रक्रियेत गुंतलेले असतात? मुंबई; पुणे; नागपूरसारख्या महानगरांपलीकडे महाराष्ट्रात कुठे कुठे या अंकांना मागणी असते? शोधाशोध केली तेव्हा अमेय तिरोडकरचा हा लेख दिसला; दिवाळी अंकांच्या इतिहासाचा आणि सध्याच्या आव्हानांचा एक चांगला आढावा घेतला आहे. या लेखानुसार सध्या एकूण साधारण ४०० दिवाळी अंक असून, लोकमतचा दिवाळी अंक सर्वाधिक लोकप्रिय असून त्याच्या २ लाखाहून अधिक प्रती खपल्या जातात; जो खरेच खूप मोठा आकडा आहे. 

या सगळ्या नफ्या-तोट्याच्या गणितावर प्रकाश टाकणारा, दिवाळी अंकांच्या "बाजारावर" एखादा लेख जरूर यावा. ऋषिकेश, मेघना वा संपादकांपैकी कुणी यावर लिहू शकतील. 

सुधीर Tue, 04/11/2025 - 17:14

In reply to by प्रभुदेसाई

चांगला लेख आहे. गृहलक्ष्मी इतके जुने आहेत ते माहीत नव्हते.

चिंतातुर जंतू Thu, 06/11/2025 - 09:07

In reply to by सुधीर

४५० रुपये किंमतीच्या एका अंकासाठी ‘ना नफा ना तोटा’ गणित साधण्यासाठी किमान ७०० ते १००० प्रती विकल्या गेल्या पाहिजेत, असा माझा अंदाज आहे.

कोणत्याही दिवाळी अंकाची एवढी विक्री होत नाही.

लोकमतचा दिवाळी अंक सर्वाधिक लोकप्रिय असून त्याच्या २ लाखाहून अधिक प्रती खपल्या जातात

याचा अर्थ इतके लोक हा अंक विकत घेतात असा नसून तो अनेकांना फुकटात वाटला जातो असा आहे.

सुधीर Thu, 06/11/2025 - 13:26

In reply to by चिंतातुर जंतू

धन्यवाद. मग आर्थिक जोखिम असावीच. छापिल अंकांच्या (दिवाळीच नव्हे तर इतरही मासिके, पुस्तके, वर्तमानपत्रे इ.) सध्यस्थितीवर कधीतरी अजून विस्ताराने लिहिलात तर वाचायला आवडेल. मलातर वाटते की छापिल वर्तमानपत्रांचाही खप पूर्वीच्या मानाने कमी झाला असावा. पण त्यांनी डिजिटल सब्स्क्रिप्शन-आधारित मॉडेल सुरू करून ती जोखिम कमी केली आहे. मासिकांबाबत असे काही भविष्यात होऊ शकते काय?