Skip to main content

मराठीचं ज्ञानभाषापण


एखादी भाषा ज्ञानभाषा असते म्हणजे काय?

एखाद्या भाषेतून ज्ञान निर्माण होण्यासाठी त्या भाषेतून, त्या भाषेच्या माध्यमातून जगाकडे पाहणं आवश्यक असतं. आपण मराठी माणसं मराठीच्या चश्म्यातून जगाकडे पाहतो का? जगाचा आपल्याला होणारा बोध हा मराठी स्वरूपाचा असतो का? किंबहुना भारतीय उपखंडातल्या कोणत्याही भाषेच्या भाषकांना जगाचा होणारा बोध त्यांच्या विशिष्ट भाषिक स्वरूपावर बेतलेला असतो काय? असे प्रश्न, आणि या प्रश्नांचे उपप्रश्न आपण या लेखात हाताळणार आहोत. या प्रश्नांमध्ये जे गृहीत धरलंय त्यालाही आपण प्रश्नांकित करणार आहोत.

कोझिकोड कोझीकोडे कोझीकोड

आपण भारताकडे मराठीच्या चश्म्यातून पाहतो का? साधं उदाहरण – कोऴिक्कोड या गावाचं नाव. जवळजवळ सगळे मराठी लोक याचा उच्चार आणि लेखन कोझीकोड किंवा कोझीकोडे असा करतात. कारण इंग्लिशमध्ये याचं लेखन Kozhikode असं होतं. आणि आपण अगदी डोळे मिटून या zh चा झ करून मोकळे होतो. मल्याळम ही लिपी, ही भाषा शिकावी, किमान या शब्दाबाबत काही विचारपूस करावी असं काहीही आपण करत नाही आणि इंग्लिशमधून या ठिकाणाच्या, व्यक्तींच्या नावांना निकालात लावतो. शशि तरूर आपल्यासाठी थरूर असतो आणि कनी मोऴी ही कनी मोझी असते.

ज्ञान म्हणजे काय – स्वच्या माध्यमातूनच ज्ञान निर्मिती होऊ शकते, आपलं असणं आणि आपल्याला होणारं आकलन या वेगळ्या गोष्टी नसतात. पण आपण आपल्या स्वतःला किती गांभीर्याने घेतो हे आपण आपल्या भाषेतून जग समजून घेतो का यातूनही स्पष्ट होत असतं. आपण आपला भवताल आपल्या भाषेतून समजून घेतो तेव्हा आपण एक ज्ञाता म्हणून, जग समजून घेणारी एक व्यक्ती म्हणून ठाम असतो. यात जगाशी थेट भिडणं असतं, यात धैर्य-साहस सहजच असतं. पण आपल्या भाषेतून जग समजून घेतल्याने मला असं काय खास मिळणार आहे असा विचार करण्यात एक मूलभूत अविश्वास आहे, त्यात भाषेला केवळ एक माध्यम म्हणून पाहणं आहे.

इथे तात्त्चिक आणि कळीचा मुद्दा असा – भाषा ही ज्ञानाचं केवळ साधन नसते; तर ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेच्या स्वरूपातच भाषा अविभाज्यपणे असते. भाषा ही ज्ञानाचं स्वरूपच असते. हा भाषिक ज्ञानवाद[i] काही आपल्या गळी उतरलेला नाही. अर्थात आपल्या भाषेच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्यासाठी या ज्ञानवादी भूमिकेवर लोक अवलंबून नसतात, तर बहुतेक तीक्ष्ण भाषिक अस्मिता बाळगणारे भाषिक समूह हे कळत-नकळत अशी भूमिका घेणारे असतात. या भूमिकेच्या विरुद्ध टोकाला याच्याउलट भूमिका असते, ती म्हणजे ज्ञान हे स्वायत्त असतं आणि भाषा किंवा कोणत्याही माध्यमावर अवलंबून नसतं. भाषानिरपेक्ष अशी ज्ञानाची घडण शक्य असते, त्यात अर्भक, प्राणी, गायक, खेळाडू यांना होणारं एखाद्या कौशल्याचं ज्ञान किंवा त्यात मिळणारं प्रावीण्य हे सरसकट भाषिक ज्ञानाशी संबंधित किंवा त्यावर अवलंबून नसतं[ii]. ज्ञान हे अनेक प्रकारचं असतं – त्यात अनुभवातून मिळणारं, अमूर्त गणिती, बीजगणिती संकल्पनांमधून होणारं, नकळतपणे आत्मसात होणारं (भाषा किंवा एखादं कलाकौशल्य), शब्दाच्या वाटेने होणारं, अवकाशाचं अंतराचं होणारं इत्यादी. त्यामुळे या दोन टोकांच्या मध्यात किंवा यांच्या समन्वयातून मानवाला होणाऱ्या ज्ञानाची संगती लागू शकते. त्यामुळे ज्ञानाचा काहीएक भाग हा भाषेच्या आधिपत्याखाली येतो, तर ज्ञानाचा दुसरा काही एक भाग हा गैरभाषिक स्वरूपाचा असतो असं म्हणावं लागेल.

वर आपण स्वतःला गांभीर्याने घेणं आणि म्हणून आपल्या भाषेतून ज्ञान करून घेण्यासाठी धडपडणं याचा उल्लेख केला. मुळात भारत या देशाने आपल्या शैक्षणिक धोरणांत आणि त्यांच्या अंमलबजावणीत भाषांना आणि ज्ञाननिर्मितीला खरोखर किती महत्त्व दिलंय हे स्पष्टच आहे. तेव्हा आपण इथे मराठीच्या ज्ञानभाषेबाबत विचार करत असताना आपल्याला मराठीकडून आणि स्वतःकडून असलेल्या अपेक्षा यांचा विचार करावा लागेल. वर उल्लेख झाला तो ज्ञानाच्या गैरभाषिक स्वरूपाचा. त्यात असलेलं ज्ञान हे भाषेत मांडता येणं याला भाषेचं प्रतिरूपणात्मक वैशिष्ट्य मानतात. यासाठी परिभाषा, भाषांतरं यांचा नक्कीच उपयोग आहे, आणि परिभाषा घडवलेली असल्यावर असं ज्ञान आपल्यापर्यंत पोचणं अधिक सुकर होत जातं. जे ज्ञान अशा प्रकारचं नसतं ते आपल्या जाणिवा, भवताल, इतिहास, सांस्कृतिक-सामाजिक संदर्भ यांनी आकाराला येत असतं. अशा ज्ञानासाठी नक्कीच आपली भाषा, आपले अनुभव आणि विचारप्रक्रिया या आवश्यक असतात. यांच्या अभावी आपल्याबद्दलचं सांस्कृतिक, सामाजिक आणि मानव्यविद्यांना अपेक्षित असणारं ज्ञान आपण घडवू, वाढवू शकणार नाही.

तर किमानपक्षी अशा ज्ञानाच्या बाबतीत तरी एकुणात भारतीय भाषांची आणि मराठीची अवस्था बरी असायला हवी, जेणेकरून महाराष्ट्राबद्दल, मराठी लोक, भाषा, संस्कृती, इतिहास, समाज यांच्याबद्दल आपल्याला एक प्रगल्भ आकलन तयार करता येईल. अशा प्रकारचं आत्मभान एकूणच भारतीय भाषांत अभावानेच दिसतं. अगदी भाषिक राष्ट्रवाद तीक्ष्ण असलेली राज्यंसुद्धा भाषेचं राजकारण करून त्यातच खुश दिसत आहेत, त्यापुढे जाऊन काही ठोस आकलन भारत आणि स्वतःबद्दल तयार झालेलं दिसत नाही.

हे कसं तयार करायचं? तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे खुद्द 'ज्ञानभाषा' हाच शब्द. या शब्दावर आधारून एक अस्सल मराठी भारतीय अशी समाजभाषावैज्ञानिक संकल्पनाच विशद करता येईल किंवा किमानपक्षी ज्ञानभाषा म्हणत असताना भारतीयांना, मराठी लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे हे कळेल. यात एवढं मोठं काय आहे? ते असं – इंग्लिश आणि इतर युरोपीय भाषांमध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या समाज-भाषाविज्ञानात 'language of knowledge' अशी काही संज्ञाच नाहीये. त्यामुळे भारतात जर असा प्रयोग होत असेल आणि जगात असा प्रयोग दिसत नसेल किंवा अगदी विरळा असेल तर या निमित्ताने आपल्याला केवळ या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचा प्रयोग कसा आहे इतकंच नव्हे तर या शब्दाला जोडून असणारं भारतातलं भाषिक, सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक वास्तवही हाती येईल. तो संकल्पना उलगडण्याचा प्रपंच या लेखात मी करू इच्छीत नाही. पण तो तसा करणं हे आपल्याबद्दलचं आकलन निर्माण करण्याचं एक उदाहरण म्हणून पाहता येईल. अर्थात ज्ञानभाषेकडून असणाऱ्या काही अपेक्षांची चर्चा आपण लेखात पुढे करणार आहोत. पण इथे उदाहरण म्हणून घेताना मुद्दा असा आहे की हा एक व्यापक चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय होय.

दुसरा असाच एक शब्द म्हणजे देश किंवा देशी. मराठी भाषेत आणि चर्चाविश्वात अनेकविध अर्थांनी हा शब्द वापरला जातो. अर्थातच अशा व्यामिश्र संकल्पनेसाठी इंग्लिश किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या भाषेत एकच एक पर्याय नसणार आणि इथेच या शब्द आणि संकल्पना यांच्या वेगळेपणाची मेख आहे. काही अर्थ असे – (१) एखादं राष्ट्र उदा० 'भारत माझा देश आहे'. (२) एखादा प्रदेश उदा० अंग देश, पांचाल देश इत्यादी. (३) सह्याद्रीच्या पूर्वेच्या उतारावरील प्रदेश – त्यातून कोंकण, घाट, देश इत्यादी भूसांस्कृतिक विभाग. तसंच 'देशी' हा शब्द आपण या पुढील अर्थांनीही वापरतो – (१) एखाद्या देशातील (१.१) आपल्याच देशातील (२) परदेशातील नसलेला (३) गावाकडचा, रानाकडचा (४) जन्मजात असलेला. अर्थात ही फक्त काही अर्थांची यादी झाली, पण इतर अर्थ आणि या अर्थाचे इतर शब्द घेऊन आपलं देश, भूप्रदेश, राष्ट्र इत्यादींबाबतचं देशी आकलन कसं आहे याचा छान उलगडा होऊ शकेल.

आणखीन एक असाच शब्द वा संकल्पना, जी मराठी भाषा, साहित्यसंस्कृतीत विशिष्ट अर्थाने वापरली जाते; ती म्हणजे 'ग्रामीण'. कानडीत किंवा मल्याळम साहित्यात ग्रामीण अशी काही साहित्यिक कोटी अस्तित्वात नाही. हिन्दीत आंचलिक अशी संज्ञा आहे. पण ग्रामीण या शब्दाने निर्देशित होणाऱ्या सीमा आणि आंचलिक यामध्ये अपेक्षित असलेला आंचलिक प्रदेश हे सर्वस्वी समान नव्हेत. इंग्रजीत त्यातल्या त्यात जवळ जाणारी संज्ञा – पॅस्टरल. पण पॅस्टरलमध्ये मराठीतला निसर्गकवितेत मोडणारा भागही अभिप्रेत आहे. इंग्लिशमधली रुरल ही काही साहित्यिक कोटी नव्हे. मराठीतही ग्रामीण साहित्याची व्याख्या ही साहित्यिक रूपाच्या आधारे कितपत करता येईल याबाबत शंकाच वाटते. म्हणजेच ग्रामीण साहित्य म्हणताना कदाचित त्यातून साहित्यबाह्य गोष्टींचाच निर्देश बहुतांश होत असावा.

अर्थात 'ग्रामीण'चे रूपविवेचन करणे हा लेखाचा उद्देश नव्हे, पण मराठीत ज्ञाननिर्मिती करायची म्हणजे काय याचं उदाहारण म्हणून या संज्ञा-संकल्पनेचा उलगडा करणं हा एक ठोस भाग असू शकतो. अर्थातच हे करताना आपल्याला काही अंशी वर्तमान आकादमिक जगतातल्या सिद्धान्त-संकल्पनांची थोडी जाण हवी, त्याच्या सापेक्षच, त्याच्या संदर्भात (संवादी किंवा विसंवादी) अशा प्रकारे या संकल्पनांचा उलगडा करणं हे ज्ञानभषेचं ठोस कार्य ठरू शकेल. 

एकुणात भारतीय भाषांनी ज्ञाननिर्मितीत आपला वाटा उचलायचा असेल तर कोणत्याही प्रकारचा – भारतीय भाषा-भाषांमधला, आकादमिक सैद्धान्तिक व्यूहांमधला किंवा भारताबाहेरील भाषांशी, लोकांशी असणारा संवाद कायम ठेवणं, वृद्धिंगत करणं अनिवार्य आहे. ज्ञान हे केवळ एकभाषिक स्वरूपाचं नसतं, त्याचं ज्ञानपण हे बहुभाषिक अवकाशात सर्वत्र व्यापलेलं असतं.

बहुभाषिक संदर्भात ज्ञानभाषा असणं म्हणजे काय?

अभिजात मराठी देशी ग्रामीण भाषा

(अ) ज्ञान कोणत्याही भाषेत निपजलं तरी त्या भाषेला आणि त्या ज्ञानापर्यंत पोचण्याच्या प्रक्रियेला एक अटळ असा बहुभाषिक संदर्भ असतो, एक भाषांतरांची, विचारांच्या देवाणघेवाणीची मालिका असते. खुद्द संस्कृताचंच उदाहरण घेऊ. संस्कृत नाटकं ही अनिवार्यपणे संस्कृत-प्राकृत नाटकं आहेत. त्यांना केवळ संस्कृत नाटकं म्हणणं अयोग्य आहे. किंबहुना एकूण संस्कृत साहित्याभिरुची, तिची अभिरुचिव्यवस्था आणि प्राकृतांची अशी वेगळी काढणंही रूप आणि कार्याच्या पातळीवर अशक्य ठरावं. तीच गत आधुनिक युरोपीय भाषांची –  इंग्लिश किंवा कोणत्याही युरोपीय भाषा यांना, त्यांच्या ज्ञानात्मक घडणीला ग्रीक, लातिन, गॉथिक इत्यादी प्राचीन युरोपीय आणि अरबांच्या संपर्कामुळे अरबी, हिब्रू इ० सेमेटिक भाषांचाही अटळ असा संदर्भ आहेच. तसंच आधुनिकतेच्या पहाटे जर्मन आणि फ़्रेंच या भाषांनी काही काळ उच्चशिक्षणाच्या माध्यमभाषा म्हणून मान पटकवला. या भाषांशी आजच्या युरोपीय भाषांचा एक विशिष्ट सत्तासंबंधही आहेच. तसाच ज्ञानाच्या सत्तेच्या आदानप्रदानाचाही संबंध आहेच. त्यामुळे एखाद्या भाषेतलं ज्ञान किंवा एखाद्या भाषेत शक्य असणारी ज्ञानात्मक चौकट ही नेहमीच इतर भाषांच्या सह-अस्तित्वाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध सांगणारी असते.

(आ) ज्ञानभाषा असण्यासाठी प्राचीन असण्याची किंवा संस्कृतसारखं अभिजात असण्याची गरज नसते[iii]. गरज असते ती एका जैविक, सक्रिय अशा ज्ञानविश्वाची आणि चर्चाविश्वाची. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरांना सध्या 'अच्छे दिन' आलेले असले, तरी त्यात अखिल भारतीय केवळ नावापुरते राहून प्रामुख्याने संस्कृतचंच घोडं दामटलं जात असेल, तर आपण आपल्या आधुनिक भारतीय भाषांचं ज्ञानभाषापण मुदलातच नाकारत आहोत. तसं होऊ न देता अभिजात व्हायचं असेल, तर आपल्या परिभाषेत, आपल्या अटी-शर्तींवर, आपल्याला अभिप्रेत आणि फायदेशीर अशा नव्या अर्थांनी अभिजात होणं कधीही उत्तम. अभिजात ठरण्यासाठी 'संस्कृतसारखं' होण्याची अट नाही हे आपण लवकरात लवकर लक्षात घेणं गरजेचं आहे. 'संस्कृतसारखं न होणं' याचा अर्थ भारतीय भाषांच्या वाढीच्या प्रवासात संस्कृतवर फुली मारून पुढे जाणं नव्हे; तर भारतीय भाषांचं आपापसांतलं साहचर्य, अरबी-फार्शी-इंग्लिश या भाषांचं आगमन, आणि त्यांचा भारतीय भाषांवर पडलेला-पडणारा प्रभाव यांचाही विचार साकल्याने, डोळसपणे, आणि खुल्या दिलाने करणं.

(इ) ज्ञानाचा आणि ज्ञानभाषेचा बहुभाषिक संदर्भ अटळ असतो हे आपण समजून घेतलंच. समाजाच्या कळत-नकळत हे बहुभाषिकपण परिचयाचं किंवा कधीकधी मुद्दामहून विस्मरणात ढकलेलं असतं. सामाजिक पातळीवर बहुभाषिकता रुजवणं आवश्यक आहेच. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणांच्या मानसिकतेत, नजरेत आणि त्यांच्या घडणीतच बहुभाषिक समावेशक दृष्टिकोन अंतर्भूत असायला हवा. शासकीय पातळीवर मराठीसाठी अनेक संस्था आहेत. त्यात भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा मंत्रालय या प्रामुख्याने मोडतात. परिभाषा निर्मितीचं काम संचलनालयाचं आहे. त्यातून परिभाषानिर्मिती आणि उजळणीचं काम निरंतर चाललेलं असतं. इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की हे भाषा संचालनालय महाराष्ट्र सरकारचं असलं तरी ते व्यापक भाषिक कार्याचं संचालनालय आहे, ते मराठी भाषा संचालनालय नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुभाषिकतेचा संदर्भ या संस्थेलाही आहेच[iv]. याला आपण संस्थात्मक बहुभाषिकता असं म्हणू.

(ई) वर उल्लेखलेली बहुभाषिक दृष्टी का आवश्यक आहे आणि आपल्या ज्ञानव्यवहाराशी त्याचा अर्थपूर्ण संबंध कसा आहे ते पाहू या. आपण मराठी आणि भारतीय लोक आहोत, पण भारताकडे, त्यातल्या राज्यांकडे, त्या राज्यातली ठिकाणं, लोक – त्यांची नावं यांकडे आपण कधीच त्या-त्या भाषेत डोकावून पाहात नाही. आपल्याला नेहमी कुबड्या मिळतात त्या इंग्लिशच्या किंवा हिन्दीच्या. वर आपण कनिमोऴि आणि शशि तरूर यांचा उल्लेख केलाच आहे. दक्षिण भारतात इंग्लिश लिप्यंतराचा एक साधा संकेत पाळला जातो. त्यानुसार – Th – त, T – ट यांकरता राखीव आहे. मग थ किंवा ठ कसा लिहितात? तर थ किंवा ठ हे ध्वनीच या भाषांमध्ये नाहीत. त्यामुळे यांचं लिप्यंतर न करून त्या भाषकांचं काहीच अडत नाही. हा संकेत ठाऊक नसल्यामुळे आपण खुश्शाल तिरुपती म्हणताना त उच्चारतो, पण ते भान आपल्या 'थिरुअनन्तपुरम'मध्ये दिसत नाही. हा संकेत लक्षात येण्यासाठी या भाषांचं फार सखोल ज्ञान असणंही आवश्यक नाही. पण आपल्याला इंग्लिश स्पेलिंग मराठीच्या संकेतांनीच वाचायचं आहे म्हंटल्यावर आपण काय बहुभाषिक संवेदना बाळगणार[v]!

यावर तोडगा आहे तो महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत किंवा देशोदेशी स्थायिक झालेल्या मराठी लोकांच्या रूपातच. त्यांच्या माध्यमातून मराठी लोकांचा जगाशी आणि परराज्यांशी घनिष्ठ संबंध येतो आणि त्यातून एक संवाद संभवतो. मराठी चश्म्यातून जगाचं ज्ञान निर्माण होणं हे तिथे अधिक संभवतं. मुळात तीच शक्यता बहुभाषिक संवेदनशीलतेत अपेक्षित आहे. एकीकडे 'माय मरो, पण मावशी जगो' अशी म्हण असणारी मराठी, तिचे भाषक मात्र मावशी असणाऱ्या अगदी शेजारच्या भाषांबद्दल चांगलेच उदासीन दिसून येतात.

जगाबद्दल निखळ जिज्ञासा बाळगूनच कोणतीही भाषा ज्ञानभाषा होत असते, डोळे मिटून नव्हे!

संदर्भ

Dharurkar, C. (2025, March 18). Classical language status: Promoting a cheap sense of cultural nationalismOutlook India. Retrieved from 

धारूरकर चिन्मय (२०२५) 'हा अट्टाहास कशासाठी' अभिजात मराठी विशेषांक हेमांगी. मुंबई : रमा प्रकाशन.

धारूरकर, चिन्मय (२०१३ अ) 'प्राचीनतम भाषा आणि आदिमभाषा'. भाषा आणि जीवन पावसाळा. पुणे : मराठी अभ्यास परिषद. पृ० १८-२५ 

धारूरकर, चिन्मय (२०१३ ब) 'भाषेचं मायपण'. अक्षर दिवाळी २०१३. पृ० १०१-१०४. 

धारूरकर, चिन्मय (२०१८) 'मराठीच्या आधुनिकतेची कदर करा'. बीबीसी मराठी

धारूरकर, चिन्मय (२०२१) 'मराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं'. ऐसी अक्षरे २०२१ दिवाळी अंक.

 

लेखक भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर इथे मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे विभागात भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत

 

[i] इथे मी भाषिक ज्ञानवाद असा शब्द वापरला आहे तो केवळ लेखाचा संवादी बाज कायम राहावा म्हणून. तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत अशा भाषेवर बेतलेल्या ज्ञानाच्या संकल्पनेला 'भाषिक चिद्वादी' [linguistic idealism] भूमिका म्हंटलं जाईल. याची पाठराखण करणारे तत्त्वज्ञ – हुम्बोल्ट, नंतरचा विट्गेन्श्टाईन, आणि काही बाबतीत सपिर आणि व्होर्फ हेदेखील. किंवा हायडेगर आणि गादामर यांनी घेतलेल्या भूमिकेत भाषा म्हणजे सत्त्वाचं/असतेपणाचं निधान, घर असतं या मानण्यातून निघालेला 'भाषा-हीच-ज्ञानपद्धती-असते' असं मानणारा अर्थनिर्णयनाचा दृष्टिकोन असंही म्हणता येईल.

[ii] या भूमिकेला आपण निखळ ज्ञानवादी भूमिका म्हणू. यात ज्ञानाचा आधार एकूण मानवाला किंवा कोणत्याही प्रजातीला उपलब्ध असलेली ज्ञानात्मक चौकट (पोलान्यि, राईल आणि ड्राइफुस), ज्ञानेंद्रियं (लॉक, बर्कलि आणि ह्यूम), जन्मजात असणारी ज्ञानसंपादन कौशल्य (यात भाषा हा केवळ एक भाग म्हणून येतो) (देकार्त, लाईब्नित्स, स्पिनोज़ा) आणि त्यांतील समन्वय आणि भाषिक संरचनारहित सांकल्पनिक ज्ञान (इवान्स, ड्रेत्स्के) इत्यादी प्रवाह आहेत.

[iii] मराठी अभिजात नाही, संस्कृत ही भारतीय भाषांची जननी नाही अशी भूमिका मी घेत आलो आहे. त्याबद्दलच्या माझ्या लेखांचे संदर्भ संदर्भयादीत दिलेले आहेत. पाहा, धारूरकर (२०२५, २०२१, २०१८, २०१३अ, २०१३ ब), Dharurkar (2025).

[iv] अर्थातच बहुभाषिकतेबद्दल संवेदनशील असणं म्हणजे संस्कृत, हिन्दी या भाषांच्या सनातनी हिन्दुत्वाशी असणाऱ्या संबंधाला कवटाळणं नक्कीच नव्हे. वर उल्लेखलेलं बहुभाषिक समावेशक शहाणपण पर्यायाने सर्वच राज्यांना लागू आहे. एका राज्याने भाषिक औदार्य दाखवायचं आणि इतरांनी एकभाषिक अरेरावी करावी यात कसलंच सामंजस्य नाही. त्यामुळे हिन्दीचा आणि मराठीभाषकांचा सलोख्याचा संबंध असला तर हिन्दीचं राजकारण महाराष्ट्राला गृहीत धरू शकत नाही हे अलीकडच्या हिन्दीच्या सक्तीला झालेल्या विरोधातून स्पष्टच आहे.

[v] वर आपण zh चा उल्लेख केला. तमिऴ आणि मल्याळम या भाषांत दोन ळ आहेत. एक मराठीसारखा ळ आणि दुसरा बहुतांश ळ या उच्चारासारखा. परंतु त्याच्या उच्चारात ळसाठी आतल्या दिशेने वळलेल्या जिभेचा स्पर्श मूर्धेला होत नाही, जीभ केवळ वळलेल्या अवस्थेत राहते आणि जणू काही स्वराचा उच्चार होताना हवा बाहेर पडावी तशी हवा बाहेर जाते. त्यासाठी आपण ऴ (ळखाली टिंब) हा संकेत वापरू शकतो. हिन्दी लिप्यंतरात ष वापरण्याची रीत आहे. हिन्दीत कोषि़क्कोट्‍ लिहिण्याची रीत आहे, आपण कोऴीक्कोट्‍/कोऴिक्कोड्‍ लिहू शकतो. या zh चा 'झ'शी काही एक संबंध नाही. ब्रिटिश आणि पोर्तुगीजकाळात हे संकेत रूढ झालेले दिसतात.  

प्रभुदेसाई Mon, 20/10/2025 - 08:23

संस्कृत ही भारतीय भाषांची जननी नाही अशी भूमिका मी घेत आलो आहे.
हे वाचून डोळे पाण्याने डबडबले. कोलमडून खालीच पडणार होतो पण वेळेवर सावरलो.

चिमणराव Wed, 22/10/2025 - 13:04

लेख वाचला आणि मनन करत आहे. प्राकृत, मराठी ,(आताची, ज्ञानेश्वरांची किंवा लीळाचरित्रातील) आणि संस्कृत या मला वेगळ्या भाषा वाटतात. त्यांनी एकमेकांचे शब्द आणि व्याकरण घेतले आहे असे जाणवते. पण मूळ निव्वळ आणि अगोदरची कोणती याबाबत संशय आहे.

आता मराठी ज्ञानभाषा कोणती आणि कशी असावी हे ठरवायला आपल्याकडे प्रथम प्रामाणिकपणाचे पाऊल उचलायला हवे.

( यावरून आठवलं हिंदीत ड, ज अशा काही वर्णाखाली टिंब देऊन तो उच्चार वेगळा आहे असं सुचवण्यात येतं. शाळेत हिंदी विषय शिकताना कळलं की परीक्षेतेल उत्तरांत काही वेगळं धरण्यात येणार नाही परंतू ते उच्चार करताना कोण खरा हिंदी भाषी आहे हे तिकडच्या लोकांना समजतं. )