अमेरिकेतील रोचक डोलांडफाईल्स पर्व आणि ममदानीच्या निमित्ताने
झोहरान ममदानी निवडून आल्यामुळे त्यामुळे इथल्या काही भांडवलशाहीप्रेमी लोकांना अतीव दुःख झालय. (त्यांना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. ममदानीने न्यूयॉर्क विकून टाकले तरी इकडे काय फरक पडणारे? इथे पुणे शहर विकून खाणे सुरु आहे त्याबद्दल निवांत आहेत लोक). पुण्यातले एक नवदेशभक्त फेसबुक विचारवंत आहेत त्यांनी तर ममदानीला जी रोमांचक विशेषणे बहाल केली आहेत ती वाचून कुतुहूल जागृत झाले की बुआ कोण आहे हा नरपुंगव ? ( मला एकदा एकाच वेळी 'कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादीष्ठ' असे दोन्ही वगैरे असणारी लोकं बघायची आहेत)
खरडफळ्यावर मुद्दा मांडल्यावर न बा यांनी चांगला व दीर्घ प्रतिसाद दिला , त्यामुळे हा प्रश्न धाग्यात मांडला .( तिकडचा प्रतिसाद कुणीतरी इकडे चिकटवा रे )
त्याच बरोबर ख्रिस्तवासी एप्सटिन नावाच्या कुणा एका व्यक्तीच्या ट्रम्पतात्या फाईल्स उघड्या व्हायला कालपासून सुरुवात झाली आहे म्हणे. एकंदरीत अमेरिकेत रोचक पर्व सुरु आहे किंवा होणारे असं दिसतंय.
अमेरिकेतील कुणी भारतीय यावर जास्त माहिती इथे देतील काय ?
पहिलेपणाचा शाप
नेटफ्लिक्सवर 'मॅडम सेक्रेटरी' नावाची चीझी मालिका आहे. त्यातलं मुख्य पात्र सुरुवातीला अमेरिकेची सेक्रेटरी ऑफ स्टेट, परराष्ट्रमंत्री होते. मग पुढे ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडूनही येते. तेव्हा तिला बराच विरोध होतो, त्यानंतर तिला प्रश्न पडतो की, फक्त अमेरिकेची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष एवढंच तिचं कर्तृत्व असेल का?
मालिका अमेरिकी असल्यामुळे तसं काही तिथे होत नाही.
ओबामाच्या निवडणुकीनंतर इलहान ओमर आणि अलेक्झांड्रिया ओकाझिओ कॉर्टेझ संसदेत निवडून आल्या. त्यांना किती काळ निवडणुका लढवता येतील यावर मर्यादा नाही. झोहरान ममदानीवरही अशी मर्यादा नाही.
न्यू यॉर्कच्या महापौराकडे तशीही फार सत्ता नसते. ममदानी काही कामही करेल, अशी मला आशा आहे. पण ते नाही जमलं तर किमान समाजमाध्यमं वापरून तरुण लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता तरी आहे. आणि त्याला सुरुवातीला होईल तो विरोध हळूहळू कमी होईल, अशी आशा करू.
ओबामांचा विषयच निघाला आहे तर…
ओबामांचा विषयच निघाला आहे तर...
Dreams from My Father (2004): A Story of Race and Inheritance.,
Obama, Barack (2008). The Audacity of Hope.
Obama, Barack (November 17, 2020). A Promised Land. New York:
ही ओबामांनीच लिहिलेली तिन्ही पुस्तके मी २०२० नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वाचली होती. ( कोरोना निर्बंधात घरीच होतो आणि नेटवर काही शोधता शोधता सापडली होती.) त्यामुळे ओबामा विषयी बरेच काही कळले. नंतर त्यांच्या काही धोरणांवर आणि योजनांवर खूप टीकाही झाली आणि विरोध. त्यांच्याबद्दल दुसरे काय म्हणतात हे काही वाचले नाही.
इथे भारतात राहून अमेरिकेतील काय चाललं आहे हे समजण्याचा चांगला मार्ग म्हणजे तिकडचे पेपर्स किंवा पुस्तके वाचणे हा होय. ( आताच्या उपाध्यक्षाने लिहिलेले Hillibili Eligi सुद्धा वाचले.)
न्यूयॉर्कमध्ये नागरिक सुजाण आहेत आणि त्यांनी ममदानींच्या विचारांना लक्षात घेऊन आणि पूर्वग्रह न ठेवता निवडून दिले असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
ऐसीवर चांगले चर्चा विषय लेख येत असतात.
सुलभीकरण
प्रतिसादाचा मुख्य मुद्दा लक्षात आला असला, आणि त्यात थोडेफार तथ्य असलं तरी हा दोष ओबामा(निवडून येण्या)चा आहे हे जरा (म्हणजे सहसा मराठी संस्थळावरील ममव काकालोक करतात इतकं वाईट नसलं तरीही) सुलभीकरण झालं.
नीट पाहीलं तर रिपब्लिकन पक्षाची ही भयानकतेकडील वाटचाल ओबामा अमेरिकन राजकारणाच्या मुख्यपटलावर येण्याच्या कित्येक वर्षं आधी सुरू झालेली आढळून येईल. रेगन व्हाईटहाऊन पासून डिक चेनी, रॉजर स्टोन, ली अॅटवॉटर, कार्ल रोव्ह, रॉजर एल्स वगैरे मंडळीनी व्यवस्थित बेत आखून या पक्षाला, आणि पक्षी देशाला, तिकडे ओढत नेलेलं आहे. (1, 2, 3 )
The Man Who Ran Washington- The Life and Times of James Baker या पुस्तकात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल मध्यममार्गी नेत्यांपासून जहाल मतांच्या कार्यकत्या-नेत्यांकडे कशी सुरू झाली हे दिसून येतं.
ओबामांना काही करून देणार नाही वगैरे विरोधी पक्षाच्या खेळ्याही नविन नव्हत्या. न्यूट गिंग्रीच यांनी क्लिंटन यांच्या काळात कॉंग्रेसमध्ये "एक्स्ट्रीम विरोधाची" चालवलेली पॉलिसी कुप्रसिद्ध आहे. यावर अनेक लेख, पुस्तकं लिहली गेलेली आहेत. (4,5)
1. https://en.wikipedia.org/wiki/Southern_strategy
2. Gravely Ill, Atwater Offers Apology : https://www.nytimes.com/1991/01/13/us/gravely-ill-atwater-offers-apolog…
3. https://archive.org/details/foxeffecthowroge0000broc
4. https://books.google.com/books?id=dLalDwAAQBAJ
5. https://en.wikipedia.org/wiki/Newt_Gingrich#Role_in_political_polarizat…
यावरून आठवले (अवांतर)
मला एकदा एकाच वेळी 'कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादीष्ठ' असे दोन्ही वगैरे असणारी लोकं बघायची आहेत
यावरून आठवले. ओबामांना (त्यांच्या कारकीर्दीत) एकसमयावच्छेदेकरून ‘कम्युनिस्ट’ आणि ‘फॅसिस्ट’ म्हणून संबोधणाऱ्या (पांढऱ्या) व्यक्ती एके काळी माझ्या पाहण्यात होत्या.
यावरून, या दोन्हीं शिव्यांचा (अमेरिकन) इंग्रजी भाषेतील साधासुधा अर्थ ‘मला या व्यक्तीबद्दल पराकोटीचा तिटकारा आहे’ इतकाच होतो, हा बोध मी घेतलेला आहे. (एकदा मेरियम-वेब्स्टर तपासून पाहिली पाहिजे.)
असो चालायचेच.
बाकी…
…हिटलर आणि इस्राएल या दोन्हीं एंटिट्यांबद्दल एकसमयावच्छेदेकरून आदर, प्रेम वगैरे भावना बाळगणाऱ्या व्यक्तीच नव्हे, तर आख्ख्या संघटनाच्या संघटना जेथे असू शकतात, तेथे, एकसमयावच्छेदेकरून कम्युनिष्ठ आणि इस्लामी जिहादिष्ट असणाऱ्या मंडळींनीच तेवढे काय घोडे मारले आहे? त्यांनीच तेवढे का असू नये ब्वॉ? (त्यांच्याच अस्तित्वावर तेवढा का बरे घाला?)
(अवांतर- यहुदी लोकांनी…
(अवांतर- यहुदी लोकांनी वंशविद्वंसाला ( genocide)सहन केले , आता ते तेच करत आहेत/ होते ना हमासच्या हल्ल्याचा सूड म्हणून?)
ममदानी जर शहराच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष देऊन काम करेल अशी जी आशा वाटते आहे स्थानिक नागरिकांना तर उगाच इतरांना उगाच पोटदुखी का होते आहे?
फ्युच्युरामा
इथल्या कुणी 'फ्युच्युरामा' नावाची मालिका बघितली आहे का? त्यात निक्सनचा सढळ हस्ते हलकट व्हिलन असा वापर केला आहे. त्यातला झॅक ब्रॅनिगन अनेकदा वाईट वागतो, पण तो मूर्खही आहे. त्यामुळे त्याच्यावर व्हिलन असण्याचा आरोप करणं कठीण वाटतं. निक्सनच्या पात्राचं तसं नाही; ते शुद्ध हलकट आहे.
ते जे (आपले!) 'ते' आहेत, त्यांचं असं कधी होईल याची मी वाट बघत आहे.
आंधळ्या-पांगळ्याची गोष्ट
आज माझी मैत्रीण निना आणि मी भेटलो. तिनंच ममदानीचा विषय काढला. ती म्हणाली, ती मला निवडणुकचा निकाल लागल्यावर लगेच मेसेज करणार होती. पण नाही केला. Neither of us needs this kind of trouble, असं तिचं म्हणणं. ती ट्रान्स आहे. मी व्हिजावर.
मी तिला म्हणाले, पुढच्या वेळेस असा काहीसा मेजेस करता येईल. "मला खूप आनंद झालाय (किंवा दुःख झालंय). तुला विकेण्डला वेळ असेल तर भेटूच." मग प्रत्यक्ष भेटून काय ते बोलता येईल.
निना हौशीनं सिनेमे बघते. तिला 'मॉन्सून वेडिंग'ही बघायला सांगितला. दिवाळी अंकामुळे महमूद ममदानींच्या लेखनाशी किंचित परिचय झाला, हेही तिला सांगितलं. मग (अर्थातच) विषय झोहरान ममदानी हॉट आहे, याकडे वळला.
एपस्टीन फाईल्स रिलीज करण्यास अचानक
आजपर्यंत एपस्टीन फाईल्स रिलीज करण्यास विरोध होत होता. आता अचानक ट्रम्प यांनी स्वतः या फाईल्स रिलीज करण्याच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले असे कळले.
ट्रम्प यांना पारदर्शकतेचे महत्व रात्रीतून कळले आहे का ?
महत्वाचे म्हणजे अमेरिकेत भ्रष्टाचाराचा स्तर कसा असतो म्हणे ? म्हणजे कोणते अडचणीचे तपशील झाकायचे याचा बंदोबस्त अगोदरच तर करून ठेवला नसेल ना आणि आता देखलो क्या देखना चाहते हो असे तर नाही ?
म्हणजे आपल्याकडे असे नक्की होऊ शकते याचा विश्वास आहे अमेरिकेत कसे असते कल्पना नाही तिथला जस्टिस डिपार्टमेंट पवित्र आहे का ?
ट्रंप किंवा ओबामा हे जर…
ट्रंप किंवा ओबामा हे जर बऱ्याच लोकांना येऊ नयेत असं वाटत असताना निवडून आले तर ममदानीचं काय एवढं मनावर घेऊन बसलेत.
( महाराष्ट्रात मुख्यमंत्री अंतुले झाले तेव्हा कित्येकांना सदमा का काय बसलेला होता. ...काॅन्ग्रेसचं भलं झालंच पण कित्येक लोकांचं त्यांनी भलं केलं होतं. वैयक्तिक लाभ. दिल्लीत जायचंय आणि राहाण्याचा प्रश्न? करा फोन साहेबांना. आखाती देशात नोकरी? साहेब आहेतच. नाटकं उभी करायचीत? साहेब आहेतच. असं इतरही मुख्यमंत्र्यांबाबत म्हणता आले तरी अंतुले जरा अधिकच पावरबाज होते.)
Mixed feelings
ममदानी जिंकल्याबद्दल मला mixed feelings आहेत.
म्हणजे, एकीकडे ते जिंकल्याचा आनंद तर निश्चित आहे. (माणूस भला दिसतो. प्रामाणिक वाटतो. ताज्या दमाचा आहे. कल्पना चांगल्या आहेत. वगैरे वगैरे.) परंतु, अमेरिकेत गेल्या सोळासतरा वर्षांपासून जो राजकीय माहौल चालू आहे, तो पाहता, त्यांचा ओबामा केला जाईल — आणि, he may have already been set up for failure (or worse) — अशी दुसरीकडे भीती वाटते.
ओबामा निवडून आले, तेव्हासुद्धा अशीच आशा वाटली होती. (ओबामा हादेखील असाच भला, प्रामाणिक, (तेव्हा) ताज्या दमाचा, चांगल्या कल्पना असलेला वगैरे माणूस.) But, for no fault of his, he turned out to be an utter failure. कारण, एक काळा माणूस व्हाइट हाउसमध्ये (आमच्या व्हाइट हाउसमध्ये) जाण्याची जुर्रत करू शकतो, या कल्पनेने रिपब्लिकन इतके बिथरले, इतके पिसाळले, की ‘ओबामांना आम्ही one-term President करू’ अशी जाहीर प्रतिज्ञा करून बसले. म्हणजे, तोवर, रिपब्लिकन पक्षात वर्णवर्चस्वाची, झालेच तर ख्रिस्ती मूलतत्त्ववादाची, लक्षणे आहेत, अशी अंधुक कल्पना येण्यासारखी परिस्थिती तशी खूप अगोदरपासून होती. मात्र, ओबामा निवडून आल्यापासून they dropped all pretenses, कमरेला गुंडाळलेले सोडून देऊन ते डोक्याला बांधले नाही, तर (पुन्हा कधीही नको, म्हणून) दूर फेकून दिले, आणि went on to a full-blown Nazi mode. (तेव्हापासूनच्या रिपब्लिकन राजकारण्यांच्या एकाहून एक पिसाळलेल्या वक्तव्यांकडे पाहिले असता हे सहज लक्षात येईल. आणि, don’t get me wrong… पिसाळलेल्या राजकारण्यांना रिपब्लिकन पक्षात नेहमीच जागा होती. परंतु, they used to be kept well under wraps. ओबामांच्या निवडणुकीनंतर they simply started crawling out of the (rotten) woodwork.)
त्यानंतर मग या रिपब्लिकनांनी ओबामांना छळ-छळ-छळले. पदोपदी त्यांच्या मार्गात धोंडे आणून घातले. ‘ओबामांचा जन्म आफ्रिकेतला आहे, म्हणजे ते natural-born American नाहीत, आणि म्हणून घटनेनुसार अध्यक्षपदास पात्र नाहीत’ असे (खोटेनाटे) आरोपच काय केले, त्यावर ओबामांनी आपला अधिकृत जन्मदाखला जाहीर करून (ज्यायोगे त्यांचा जन्म हवाई बेटांत — म्हणजे अमेरिकन भूमीत — झालेला आहे, हे सिद्ध होत होते) त्याचे खंडन केले असता, त्या दाखल्याच्या खरेपणावर शंकाच काय घेतल्या, झालेच तर, त्या जन्मदाखल्याच्या अधिकृतपणाबद्दल ‘तपास करण्यासाठी’ म्हणून हवाईला पथकेच काय पाठवली, एकंदर, येनकेन प्रकारेण distractions निर्माण केली, अडथळे निर्माण केले. झालेच तर, जस्टिस स्कलिया गचकल्यानंतर सुप्रीम कोर्टावर जे रिक्तपद निर्माण झाले, ते भरून काढण्यासाठी ओबामांनी रीतसर आपला उमेदवार पुढे केला असता, “अध्यक्षपदाच्या शेवटच्या वर्षात अध्यक्षाने सुप्रीम कोर्टावर नेमणुका करू नयेत; तो अधिकार पुढील अध्यक्षपदीय निवडणुकीत नव्याने लोकनिर्वाचित होणाऱ्या अध्यक्षाचा असावा”, असे (कोठेही अस्तित्वात नसलेले) “नीतितत्त्व” अक्षरशः ढुंगणातून उपसून काढून पुढे केले, आणि ओबामा अध्यक्ष असेपर्यंत त्या उमेदवाराच्या साध्या सुनावणीससुद्धा नकार दिला. (पुढे ट्रंप अध्यक्ष असताना जस्टिस जिन्सबर्ग वारल्यानंतर मात्र, “नीतितत्त्व” रीतसर फिरवून, ट्रंपची कारकीर्द संपण्यास जेमतेम काही महिने उरलेले असताना, किंबहुना, पुढील अध्यक्षपदीय निवडणूक होऊन तिची मतमोजणी सुरू अस्तानासुद्धा, ट्रंपने पुढे केलेल्या उमेदवाराची झटपट सुनावणी घेऊन तिला कायमसुद्धा करण्यात आले. चालायचेच.)
एकंदरीत, ओबामा निवडून आले खरे — किंबहुना, रिपब्लिकनांच्या नाकावर टिच्चून पुढे दुसऱ्यांदासुद्धा निवडून आले — परंतु, आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत, फारसे काही काम करू शकले नाहीत. त्यांना काम करू दिले गेले नाही. त्यांच्या मार्गात पदोपदी नाही नाही ते अडथळे आणले गेले.
Obama contested — and was elected — on a campaign promise of Change. Well, he brought Change, all right — an unwelcome, undesirable change in the Republican Party.
अमेरिकन राजकारण गढूळ होण्यास ट्रंप आल्यापासून सुरुवात झाली, असा एक सार्वत्रिक समज आहे. तो चुकीचा आहे. अमेरिकेचे राजकारण पराकोटीचे गढूळ होण्यास सुरुवात जी झाली, ती ओबामा सर्वप्रथम जेव्हा निवडून आले, तेव्हापासून. ट्रंपची राजकारणात सरशी ही केवळ त्या गढूळ झालेल्या राजकारणाची अंतिम परिणती होती — यह तो होना ही था। As I always like to say: Trump is not the disease, but merely a symptom of the disease.
आणि, या सगळ्यात ओबामांचे पाप इतकेच होते, की, ते (१) कृष्णवर्णीय होते, आणि (२) (कृष्णवर्णीय असूनसुद्धा) (अध्यक्षपदाच्या) निवडणुकीसाठी उभे राहिले, आणि (३) (कृष्णवर्णीय असूनसुद्धा) (अध्यक्ष म्हणून) निवडून आले.
बाकी, मूळ विषयावर येता, ममदानींच्या पापांची गणती मी ती काय करावी? ते:
(१) मुस्सलमान आहेत (चेक),
(२) ब्राउन कातडीचे आहेत (चेक),
(३) इमिग्रंट आहेत (पक्षी: त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही; झालेच तर, ते (तथा त्यांचे आईवडील) हे “बाहेरून” आलेले आहेत (भले आजमितीस अनेक वर्षांपासून ते अमेरिकन नागरिक असले, तरीही)) (चेक),
(४) ‘इस्राएल’ नामक एका विशेष परराष्ट्राचा त्यांनी उदोउदो केलेला नाही (भले ते केवळ न्यूयॉर्कच्या महापौरपदासाठी उभे राहिलेले असोत — येरुशलेममधील अमेरिकन वकील अथवा अमेरिकन परराष्ट्रमंत्री या पदासाठी नव्हे (ही दोन्ही पदे अध्यक्षनियुक्त असून, त्या पदांवर नेमल्या जाणाऱ्या व्यक्ती या लोकनियुक्त प्रतिनिधी नसतात — किंबहुना, त्या लोकनियुक्त प्रतिनिधी असणे हे घटनेनुसार निषिद्ध आहे — ही बाब अलाहिदा) — आणि, त्या दृष्टीने, या गोष्टीमुळे वन वे ऑर द अदर काहीही फरक पडत नसो) (चेक),
(५) (एवढे सगळे असूनसुद्धा) त्यांनी न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याचे धाडस केलेले आहे (चेक), आणि
(६) (इतकेच नव्हे, तर, एवढे सगळे असूनसुद्धा) ते न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आलेले आहेत (चेक).
बास काय राव, इतकी पापे पुरे नाहीत झाली का?
त्यामुळे, I sincerely hope that he is successful, but am afraid that that is not to be. ममदानींचा ओबामा केला जाईल, ही भीती वाटते.
असो चालायचेच. पाहू यात काय काय होत जाते ते.