Skip to main content

एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ६

6 minutes

भाग एक 

भाग दोन

भाग तीन

भाग चार

भाग पाच

 

 

हा आता ऐतिहासिक किस्सा म्हणून उरला आहे. नव्वदीपूर्व समाजवादी भारतात भांडवलशाही हव्यासाचं पापी रूप ठरवल्या गेलेल्या अनेक खाजगी उद्योगांसाठी दरवाजे उघडले गेले ते आर्थिक उदारीकरणाचं धोरण अवलंबल्याने. ‘लायसन्स राज’चा अंत झाला. नवीन उदार कायद्यांमुळे अशा वस्तूंच्या आयातीला परवानगी मिळाली ज्यामुळे त्या आयात वस्तू वापरून केलेल्या मूल्यवर्धित वस्तूंचं उत्पादन आणि निर्यात सुलभ होईल. धोरणकर्त्यांचा सिद्धांत असा होता की आयातकर भारताच्या सीमेवरच रोखलं गेलं पाहिजे. म्हणजे १९९१पूर्वी भारतीयांवर किती कर आकारला जात होता याचं हे बोलकं प्रतिबिंब आहे.

 

व्हाईट कॉलर गुन्हेगारीकडे वळण्याच्या माझ्या सुरुवातीच्या काळात मी भारतातील खाजगी विमान कंपन्या विमानवाहतुकीच्या बाबतीत किती गलथान कारभार करत होत्या याबद्दल पहिल्या पानावर एक कथा लिहिली. राजस्व आसूचना निदेशालयाने (Directorate of Revenue Intelligence) या प्रकरणाची पुढे चौकशी केली. मी ‘द डेली’मध्ये असेपर्यंत (१९९३पर्यंत) अनेक खाजगी विमान कंपन्या अस्तित्त्वात आल्या होत्या. त्यापैकी बहुतेकांची विमानं १५ वर्षांहून जुनी होती. मला आठवतं त्या काळात परवेझ दमानियाची विमान कंपनी वासरातली लंगडी गाय होती. तीही तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे निर्दोष नव्हतीच. मला वाटतं ‘ड्राय लीजिंग’ हा त्या काळातील एक सामान्य नियम होता.

 

भारतात १९९५पर्यंत उगवलेल्या जेट एअरवेज, एअर सहारा, मोदीलुफ्ट, दमानिया एअरवेज, एनईपीसी एअरलाइन्स आणि ईस्ट-वेस्ट एअरलाइन्स यांनी देशातली १०% बाजारपेठ ताब्यात घेतली होती. परंतु प्रणेता होता थकीयुद्दीन अब्दुल वाहिद, शालेय शिक्षणही पूर्ण न झालेला मल्याळी इसम. त्याने १९९२ मध्ये भारतातील पहिली खाजगी विमान कंपनी सुरू केली.

इस्ट-वेस्ट एयरलाईन्स

१९८४मध्ये इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने Terrorist and Disruptive Activities (Prevention) Act – टाडा – नावाचा एक कठोर दहशतवादविरोधी कायदा आणला. तो प्रामुख्याने पंजाबमधील खलिस्तानी अतिरेकी चळवळीला आळा घालण्यासाठी होता परंतु लवकरच तो देशभर लागू झाला. या कायद्याला कठोर म्हणण्याचं कारण म्हणजे असे कायदे अनेकदा न्यायशास्त्रातल्या मूलभूत मूल्याकडे दुर्लक्ष करतात. आपण म्हणतो “दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष”. टाडा या तत्त्वाचा भंग करतो कारण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी वकील किंवा तपास संस्थांऐवजी अटक केलेल्या व्यक्तीवरच असते. शिवाय, त्यातल्या एका विशिष्ट कलमान्वये आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबाला मान्यता दिली असल्याने पोलीस एखाद्या व्यक्तीला कबुलीजबाब म्हणून कशावरही सही करायला लावू शकत होते. पुढे त्या व्यक्तीवर सिद्ध करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती की त्याने कबुलीजबाबात जे म्हटलं आहे ते प्रत्यक्षात केलं नाही. म्हणजे इतर गुन्हेगारीप्रतिबंधक कायद्यांपेक्षा वेगळा नियम चालत होता – यात छळ कायदेशीर असल्याचं मुळात मान्य केलं गेलं होतं. भारतीय पोलिसही फॉरेन्सिक तपासणीद्वारे सुटू न शकलेल्या प्रकरणांचा उलगडा करण्यासाठी थर्ड डिग्रीचा वापर करण्यासाठी प्रसिद्ध होते.

 

तुम्हाला वाटेल की हा नव्वदीच्या सुरुवातीच्या काळात उदारमतवादी झालेला भारत, खाजगी विमान कंपन्यांचा उदय, बोकाळलेली व्हाईटकॉलर गुन्हेगारी, समाजात बाबरी मशिदीमुळे निर्माण झालेले धार्मिक विभाजन आणि गुंडगिरी या गोष्टींची लांबड का लावतो आहे. याचं कारण म्हणजे मला लतीफ मोहम्मदच्या अटकेची गोष्ट सांगायची आहे. मुंबई पोलिस आणि कस्टम्सच्या संयुक्त प्रयत्नामुळे केंद्रीय अन्वेषण विभागाने हस्तक्षेप केल्यावर हा टाडा खटला झाला.

 

लतीफला एका गुप्त टिपमुळे सहार विमानतळावर उतरताना अटक करण्यात आली. त्याच्याकडे १० लाख रुपये रोख होते. चौकशीनंतर त्याने सांगितलं की तो ते पैसे वांद्र्याच्या ईस्ट वेस्ट एअरलाइन्सचे प्रमुख थकीयुद्दीन अब्दुल वाहिद यांच्या कार्यालयात पोहोचवणार होता.

 

लतीफवर टाडा अंतर्गत आरोप लावण्यात आला. न्यायालयाच्या दृष्टिकोनातून त्याचा कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आला.

 

पत्रकारितेच्या शाळेतला, पण हिंदी माध्यमातला, माझा बॅचमेट मिलिंद खांडेकर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या नवभारत टाईम्समध्ये माझा समकक्ष होता. आमचे बरेच स्रोत सारखे होते. त्यातले एक सतीश झा – ही केस हाताळणारा सीबीआयचा एक कनवाळू अधिकारी. मिलिंद माझ्या आधी झा यांच्या कार्यालयात पोहोचला. बहुदा अटक झाल्यादिवशीच. नवभारत टाईम्सच्या पहिल्या पानावरील दुसऱ्या दिवशीचा मथळा होता की ईस्ट वेस्ट एअरलाइन्सने नेपाळ सीमेवर जाणाऱ्या ‘डी’ कंपनीच्या काही भाडोत्री गुंडांसाठी हे पैसे आणवले होते.

 

तिसऱ्या दिवशी ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर माझी स्वतःची बातमी आली. दाऊद इब्राहिमने भारतातील पहिल्या खाजगी विमान कंपन्यांना निधी दिला होता याची भंडाफोड त्यात केली होती. चौथ्या दिवशी या बातमीतले अनेक बारकावे सांगणारं सविस्तर वृत्तांकन आलं – कारण आमच्या वृत्तपत्राच्या शब्दमर्यादेच्या राक्षसी नियमांमध्ये तिसऱ्या दिवशी काही तपशिलांचा बळी द्यावा लागला होता.

 

***

 

आर्थिक उदारीकरण, गुंडगिरी, आणि माध्यमं एकत्र आली. यावेळी त्यांनी ‘तक्षशिला’मधल्या आमच्या फ्लॅटला लक्ष्य केलं. त्या ठिकाणच्या तीन मूळ भाडेकरूंपैकी फक्त प्रणव आणि मला पगारी नोकऱ्या होत्या. आणि आमचं एकत्रित, उत्पन्न २,००० रुपयांनी कमी पडत होतं. टाटा ग्रुपमध्ये उच्चपदस्थ असलेले आमचे घरमालक चंद्रशेखर नीलकांतन यांनी उदार मानाने भाडं १५०० रुपये ठेवलं होतं. पण ते दिल्यानंतर फारच कमी शिल्लक राहात असत. घरमालक आमच्या मित्राच्या मित्राचे मामा होते, आणि त्याने गळ घातल्याने आम्हांला या अनुदानित भाड्याचा लाभ झाला होता. नंतर आमच्यापैकी बहुतेक जणांनीही त्यांचा असाच ‘मामा’ केला. त्यांच्या चांगुलपणामुळे आपला महागामोलाचा गुंतवणूक म्हणून घेतलेला फ्लॅट आम्हाला भाड्याने दिलाच, पण डिपॉझिटही आकारलं नाही. पण आमच्या आर्थिक ‘समृद्धी’मुळे आम्ही त्या काळात आमच्या फ्लॅटचे टेलिफोन बिल भरू शकलो नाही. 

 

पुढे फोन सुरू झाला, आणि ही बातमी छापल्यानंतर काही दिवसांतच माझ्या फ्लॅटमेट्सनी माझ्यासाठी एक फोन आल्याचं कळवलं. मी विचारलं की कोणी फोन केला होता, आणि त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीने आपलं नाव सांगितलं नाही.

 

काही दिवस असेच फोन येत राहिले आणि शेवटी मला कोणीतरी सांगितलं की त्याला ‘हरीशभाई’शी बोलायचं आहे.

 

तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी असेल, परत फोन आला, आणि यावेळी मी उचलला.

 

ट्रिंग ट्रिंग.

“हॅलो,” मी फोनवर बोललो.

“सर, हरीशभाई हैं क्या?”

“हांजी, मैं हरीशभाई बोल रहा हूँ.”

“एक मिनिट, सर, होल्ड करें. खाजाभाई आप से बात करना चाहते हैं”

“अच्छा.”

 

फोनवर शांतता पसरली. आणि मग, तोंडात दगड ठेवून भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक ग्रीक राजकारणी डेमोस्थेनिससारखा विलक्षण दुमदुमता आवाज आला.

 

“हरीशभाई, ये जो आप लिख रहा है ना, उसको बंद कर दो.”

“जी, मैं कुछ समझा नहीं. आप क्या कह रहे हैं?”

“देखिये, आप बखूबी समझते हैं.”

“मतलब?”


पान चघळणाऱ्या शुद्ध उर्दू भाषिक आझमगढी कव्वालांसारख्या त्या प्रभावी आवाजाचा सूर बदलला.
 

“देखिए, जब अठ्ठारा इंची आप के पिछवाडे से घुसेगी ना, तब आप को सब समझ आ जायेगी.”

मी हादरलो पण रिसिव्हर सोडला नाही.

“देखिए, हम सब कुछ जानते हैं. आप कितने बाजे घर से निकलते हो. कब दफ्तर पहुंचते हो. आप के घर में कौन कौन आते हैं. आप कौन से गेट से घर छोड़ते हो. कहाँ से अंदर आतें हो कॉलनी में. इस लिये संभल जाओ." 

क्लिक.
 

घरात माझे काही मित्र होते, पण त्यांनी फोनकडे लक्ष दिलं नाही किंवा त्याबद्दल विचारपूस केली नाही. माझ्यावर वैयक्तिकरित्या त्या धमकीचा फारसा परिणाम झाला नाही. माझ्या या शूर बेफिकिरीचं कारण अगदी सोपं होतं. क्राइम रिपोर्टर म्हणून माझ्या कारकीर्दीत संघटित गुन्हेगारी कशी चालते याची मला चांगलीच कल्पना आली होती. ते कधीही विश्वासार्ह पत्रकाराला स्पर्श करत नसत. मी अतिशय प्रामाणिक होतो. मी कधीही पैशांच्या देवाणघेवाणीत पडत नसे. मी कोणत्याही टोळीशी संबंधित सदस्याला त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीची माहिती देण्यासाठी माझ्या स्रोतांना राबवत नव्हतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला माहीत होतं की या टोळीने पोलिसांकडून माझी विश्वासार्हता आगोदरच तपासली असेल.
 

हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडला की इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस असलेल्या एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराने त्याच्या स्थानिक गुंडाद्वारे मला धमकी दिली आहे.
 

पण मला ज्या गोष्टीने गोंधळात टाकले ती म्हणजे नोकरशाही. अशा परिस्थितीत पत्रकारासाठी काय प्रक्रिया असू शकते? त्याने काय करणं अपेक्षित आहे? मी माझे संपादक रवी श्रीनिवासन यांच्या कानावर हा प्रकार सांगायचा निर्णय घेतला.

 

***

 

(पुढील भाग)


हरीश नांबियार २०१६पासून इकाॅनाॅमिक टाइम्समध्ये पुनर्लेखन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे २००२मधल्या गुजरात दंगलीच्या आगेमागे ‘बुलेट’वरून केलेल्या भारतभ्रमणातील अनुभवांवर आधारित Defragmenting India: Riding a bullet through the gathering storm हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचा ॲमेझॉनवरील दुवा.

 

तळटिपा:

१. अनुवादकाची टीप : ‘दमानिया एअरवेज’ ही ती कंपनी. अनेक अर्थांनी ही कंपनी आजच्या ‘लो कॉस्ट’ विमान कंपन्यांची आई होती. लहान विमानं, भरपूर उड्डाणं, ग्राहकाकडून पैसे आकारणारी विमानातली खानपानसेवा या गोष्टी प्रथम त्यांनी आणल्या. उणीपुरी चार वर्षं टिकल्यानंतर दमानिया बंधूंनी ही कंपनी खेमका परिवाराच्या स्कायलाईन एनईपीसी ग्रुपला विकली. (त्यांनी दोनच वर्षांत ती खड्ड्यात घातली.) 

२. ‘ड्राय लीजिंग’ म्हणजे फक्त विमान भाड्याने देणे. याचा अर्थ बाकी सगळी जबाबदारी विमान कंपनीची. याउलट ‘वेट लीजिंग’ म्हणजे विमान, पायलटसहित विमानाआतले कर्मचारी (crew), देखभाल कर्मचारी, आणि विमा असं सगळं पॅकेज देणं.

३.  ‘ईस्ट वेस्ट एअरलाईन्स’. छोटा राजन टोळीने भर वांद्र्यात यांची हत्या केली.  

Node read time
6 minutes

सुधीर Wed, 07/01/2026 - 22:51

लेखमाला उत्कंठावर्धक आहे. आम्ही तेव्हा लहान होतो, पण काही गोष्टी आजही ठळकपणे आठवतात. करफ्यूमुळे सगळं वातावरण लॉकडाउनसारखं शांत शांत झालेलं असायचं. शाळांना अनेक दिवस सुट्टी दिली होती. दंगलीच्या काळात आणि त्यानंतर झालेल्या बाँब स्फोटांमुळेही. दुपारी लहान मुलांसाठी 'फन टाइम' लागायचे. त्यात जायंट रोबोट, ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट अशा मालिका पाहायला मिळायच्या. आमचा परिसर थेट दंगलीच्या क्षेत्रात नव्हता, त्यामुळे सुट्टीत आम्ही मजा केली. पण त्याच वेळी बाहेर दंगलीचं तांडव सुरू होतं आणि ते दाहक - विध्वंसक होतं. त्या वास्तवाची जाणीव मात्र खूप उशिरा झाली.

भारताचा फ्री प्रेस इंडेक्स आजही खूप खालच्या पातळीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे ९० च्या दशकातही पत्रकारांच्या हत्या होत होत्या, हे शोध घेतल्यावर कळले. https://en.wikipedia.org/wiki/List_of_journalists_killed_in_India

म्रिन Sat, 10/01/2026 - 12:24

लेखमाला आवडली. हरीशकडे लिहिण्याजोगं आणखी बरंच काही असणार. त्याला लिहायला लावलं पाह्यजे कोणीतरी.