Skip to main content

हिंदी चित्रपटातली आवडलेली स्त्री पात्रं

संपूर्ण लेखात 'चमेली', 'तीन दीवारें' आणि 'डोर' या चित्रपटांचे संदर्भ आहेत. या चित्रपटांची कथाही त्या अनुषंगाने लिहीलेली आहे.

'चमेली' खूपच अलिकडे पाहिला. पण पाहिला तेव्हाच 'चमेली' आवडला आणि चमेली आवडली. मुंबईमधली एक पावसाळी संध्याकाळ. धोधो पाऊस पडल्यामुळे रस्ते तसे सुनसान आहेत. फोर्ट भागातल्या एका इमारतीखाली इन्व्हेस्टमेंट बँकर अमन कपूर (राहुल बोस) आसरा घेतो. त्याची गाडी तिथे साठलेल्या पाण्यात बंद पडलेली आहे. मोबाईल येण्याच्या आधीचे दिवस. त्याच संध्याकाळी, त्याच इमारतीखाली स्थानिक वस्तीतली चमेली 'धंदा' करायला तिथे येते. उच्चभ्रू अमन स्वतःच्या विश्वातच मग्न असला तरी सध्या विचार फक्त एकच, गाडी कशी दुरूस्त होईल आणि घरी कसं पोहोचता येईल. चमेलीला तिथे धंद्याची संधी दिसते. अंधार पडता-पडता चित्रपट सुरू होतो, सकाळी संपतो.

मधल्या काळात चमेली अमनला गिर्‍हाईक बनवण्याचा प्रयत्न करते. तो मानत नाही. आधी तिच्याकडे तुच्छ कटाक्ष टाकणारा अमन तिच्या आयुष्यात हळुहळू ती खालच्या समाजातली का असेना, पण माणूस आहे इथपर्यंत येतो. आपण वेश्याव्यवसायात का आलो याची कहाणी सांगताना चमेली त्याच्या डोळ्यातून जवळजवळ पाणी काढते आणि त्याच वेळी त्याला हसून "तू किती सहज फसतोस रे!" असंही म्हणते. अमनची एक दुखरी नस आहे, त्याची बायको. काही काळापूर्वी ती गरोदर असतानाच तिचा मृत्यु झाल्यामुळे अमन उध्वस्त झालेला आहे. त्या दु:खातून अमनला बाहेर येण्याची इच्छाच नाही. बायकोशी संबंधित सर्व दरवाजे त्याने बंदच केलेले आहेत. चमेली कितीही दंगेखोर, happy-go-lucky दिसली तरी तिचं आयुष्यही सोपं नाहीच. एकाच संध्याकाळमधे पोलिस, तिची समव्यावसायिक तृतीयपंथी मैत्रीण लक्ष्मी, तिचा प्रियकर आणि प्रियकराचे गुंड वडील, चमेलीचे कर्जदार, अशा अनेक लोकांचा चमेलीला सामना करावा लागतो. तरीही थोडी शांतता मिळते तेव्हा ती झोकात सिग्रेट ओढते, स्वतःच्या आनंदासाठी गाणंबिणं म्हणते आणि आपल्या तुटपुंज्या उत्पन्नामधेही एका मुलाच्या शिक्षणाची व्यवस्थाही करते.

वास्तवात फार काही शिक्षण नाही, सामाजिक स्थान खूप खालचं आहे, बहुतांश 'सभ्य' लोक तिला कदाचित माणूसही मानत नसतील तरीही तिचं मानवी वर्तन आणि तिची आनंदी वृत्ती यांच्यामुळे ती अमनपेक्षा खूपच मोठी ठरते. दुसर्‍या सकाळी चित्रपट संपतो तेव्हा अमनही आपल्या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला लागतो. चमेली आपल्या दिशेला निघून जाते. एकमेकांना निरोप देतानाही चमेलीला अमनचे पैसे परत द्यायचे असतात.

चमेलीचं चारित्र्य पांढरपेशा लोकांच्या मूल्यांप्रमाणे अस्तित्त्वातच नाही. ती बहुदा माणूसच नाही. चमेलीचं अस्तित्त्व तिच्या चारित्र्याशी निगडीत नाही. चित्रपट स्त्रीपात्राभोवती फिरवला म्हणजे स्त्रीवादी बनत नाही हे कोणी मधुर भांडारकरला सांगणार का? कोणा सिंड्रेलाला हँडसम राजकुमार भेटला की तिचं आयुष्य मार्गी लागतं आणि उत्तरार्धात राजकुमाराचा मृत्यु झाला किंवा त्याने सोडून दिलं की ही सिंड्रेला पुन्हा गरीब, बिचारी, अबला कुणा घोड्यावरच्या राजपुत्राच्या दु:खात!

मी शिकत असताना 'चमेली' आला. करीना कपूरच्या चेहेर्‍याशी किंचित साधर्म्य असणारी माझी एक मैत्रीण आहे, तिला करीना अजिबात आवडत नाही. 'चमेली'मधे करीनाने एका वेश्येचं काम केलेलं आहे हे समजल्यावर मैत्रीण म्हणाली, "आ गयी ना अपनी औकात पे।" तिचं हे वाक्य मला तेव्हाही आवडलं नव्हतंच. पण करीना कपूर न आवडणार्‍या लोकांना तिच्यावर टीका करायची असेल तर चमेलीसारखी आत्मविश्वास असणारी स्त्री ते 'जब वी मेट' किंवा 'हिरॉईन'मधली damsel in distress अशी अधोगती बघावी.

---

'तीन दीवारें'मधे खरंतर चंद्रिका (जुही चावला) हे मध्यवर्ती पात्र नाही. तीन स्त्रियांच्या खुनासाठी तीन वेगवेगळ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालेली आहे. जग्गू (जॅकी श्रॉफ), नाग्या (नागेश कुकूनूर) आणि इशान (नसिरुद्दीन शहा). जग्गूला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप आहे आणि आपल्याला जगण्याचा काहीही अधिकार नाही हे मान्य आहे. नाग्याला आपण खून केलेला आहे हेच मान्य नाही त्यामुळे तो आणि त्याच्या घरचे त्याला सोडवण्यासाठी न्यायालयांमधे झगडा करत आहेत. इशान या सगळ्यांचा पलिकडे आहे. "मला खून करायचाच नव्हता, त्या बाईने अगोचरपणा केला आणि मी धडपडलो म्हणून ती मेली. आता मी पश्चात्ताप करून काय फायदा? ती परत थोडीच येणारे!". त्याला भेटायला कोणी येत नाही, पण तुरूंगातून पळून जाण्याबद्दल त्याला फारच आत्मविश्वास आहे. त्याला असा अनुभवही आहेच. चंद्रिका फाशीची शिक्षा सुनावलेल्या तिघांवर एक माहितीपट बनवण्यासाठी तुरूंगात येते. 'तीन दीवारें'मधली चौथी गोष्ट आहे चंद्रिकेची. तिचा नवरा (लैंगिकदृष्ट्या) षंढ आहे. त्याच्या न्यूनगंडाची परिणती चंद्रिकेवर हात उचलण्यापर्यंतही अधूनमधून होत असते. या तिघांशी बोलून, माहितीपट बनवून ती तिच्या आयुष्यात अर्थ शोधू बघते आहे हे नवर्‍याला आवडत नाही. बायकोने असं तुरूंगात जावं, कैद्यांमधे मिसळावं हे त्याला पटत नाही.

दुसरीकडे नाग्यावर ज्या स्त्रीच्या खुनाचा आरोप आहे ती त्याचीच बायको आणि एका निवृत्त न्यायाधीशाची मुलगी असते. नाग्याला फाशीची शिक्षा झाली असली तरी त्याला त्याचा गुन्हा अजिबात मान्य नाही. "मी काहीही केलेलंच नाही" यावर तो ठाम आहे. आणि काहीही करून नाग्याच्या तोंडून, त्याने बायकोचा छळ केला, असं वदवून घेण्यासाठी हा निवृत्त न्यायाधीश तिच्यावर दबाव टाकतो आहे. एवढे वर्ष नवर्‍याचा अत्याचार सहन करणार्‍या चंद्रिकेला अचानक बळ येतं. ती जेवढ्या शांतपणे न्यायाधीशाला नाग्याचा विश्वासघात करणार नाही, तेवढ्याच शांतपणे नवर्‍यालाही, यापुढे मला त्रास दिलास तर तुला जिवंत जाळेन असं सुनावते.

चंद्रिकेला खुन्यांवरच माहितीपट का बनवायचा असतो, नाग्याने खरोखरच खून केलेला असतो का, या तीन आणि चंद्रिकाच्या गोष्टी एकत्र कशा येतात या रहस्याचा उलगडा करत नाही. पण वर्षानुवर्ष अत्याचार सहन करणारी चंद्रिका अचानक पेटून उठते आणि बंड करते. आपलं अस्तित्त्व अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत रहाते.

तीन दीवारें यू ट्यूबवर सापडला. दोन तासांची एकसंध फीत आहे.

---

तिसरा चित्रपटही नागेश कुकूनूरचा 'डोर'. हिमालयाच्या टेकड्यांमधे एकटी रहाणारी झीनत (गुल पनाग) अतिशय स्वावलंबी स्त्री आहे. आमीर आणि झीनत, आमीरच्या आई-वडलांचा विरोध पत्करूनही लग्न करतात. आमीर नोकरीसाठी सौदीत जातो. आमीरच्या गैरहजेरीत झीनत सासू-सासर्‍यांचे तिच्याबद्दल असणारे गैरसमजही दूर करते. दुसरीकडे राजस्थानात मीरा (आयेशा टाकीया), आपल्या सनातनी घरात नवर्‍याच्या मदतीने काही प्रमाणात तरी स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ पहाते आहे. तिचा नवरा, शंकर नोकरीसाठी सौदीमधे जातो. त्याने पाठवलेले पैसे हा ही मीराचा पायगुण समजून सासू-सासरे तिच्यावर अधिकच खूष होतात.

दुर्दैवाने शंकरचा तिथे मृत्यु होतो आणि खुनाचा आळ आमीरवर येतो. मीराने आमीरला माफ केलं तरच त्याची फाशी रद्द होईल हे झीनतला समजतं. झीनतकडे मीराचं नाव-पत्ताही नसतात. असतो तो शंकर आणि आमीरचा एक फोटो. निश्चयपूर्वक ती मीराला शोधूनही काढते. पण मीराला खरं सांगून तिच्याकडून माफीनाम्यावर स्वाक्षरी मिळेल याबद्दल झीनतला खात्री नसते. मीराचं विधवेचं आयुष्य अतिशय उजाड झालेलं असतं. पण त्याशिवाय अन्य काही मार्ग असू शकतो हेच तिला माहित नसतं. तिने मुकाटपणे हे आयुष्य स्वीकारलेलं असतं. माफीनाम्यासाठी झीनत तिच्याशी ओळख काढते, पण दोघींची मैत्रीही होते. मीराने आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने बघावं हे तिला सांगते. झीनतसारख्या स्वतंत्र विचाराच्या मैत्रिणीमुळे मीराला दुसरा मार्गही दिसतो, स्वयंनिर्णयाचा. आत्मनिर्भरतेचा. जन्मापासून शिकवलेली परंपरा, संस्कृतीची मूल्य मीरा निर्णायक क्षणी झुगारून देते. आणि त्यात तिला मदत करते तिची आजेसासू.

हे पाहिल्यानंतर गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश'मधली शशी आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा कमावल्यानंतरही तिला कमी लेखणार्‍या नवर्‍याला दोन लाडू देते हे घड्याळाचे काटे मागे फिरवणं वाटतं. प्रत्येक स्त्री स्त्रीवादी असण्याची अपेक्षा अनाठायी आहे किंवा स्त्री दिग्दर्शक मसालापट बनवणार नाही हे ही!

ॲमी Sat, 09/02/2013 - 07:34

लेख आवडला.
तिन्ही चित्रपट युट्युब आहेत आणि तिन्ही मी नुकतेच पाहीले. तुलना करण्यात अर्थ नाही माहीतीय, तरीही तीन दिवारे सगळ्यात जास्त आवडला, मग चमेली आणि मग डोर.
स्त्री पात्रांच्या दृष्टीकोनातून जुही > गुल > करीना > आयेशा अशी उतरती श्रेणी देईन.
इश्किया मधली विद्या असायला हवी होती लेखात.
अवांतर: राहुल बोसकडे मोबाइल असतो बअॅटरी संपलेली असते.

नगरीनिरंजन Wed, 13/02/2013 - 09:25

In reply to by ॲमी

इश्किया मधली विद्या असायला हवी होती लेखात.

याच्याशी सहमत.
'चिनी कम' ची तब्बू, 'जो जीता' ची आयेशा जुल्का, लम्हे मधली धाकटी श्रीदेवी याही आवडल्या होत्या; पण आजवर सर्वात जास्त आवडलेले स्त्रीपात्र म्हणजे खूबसूरतमधली रेखाने साकारलेली मंजू दयाळ!

मन Wed, 13/02/2013 - 09:58

In reply to by नगरीनिरंजन

'जो जीता' ची आयेशा जुल्का
ह्याबद्दल अधिक वाचायला आवडेल. म्हणजे त्या पात्रात असं काय रोचक वाटलं ते जाणून घ्यायला आवडेल.
कुठल्या का सिनेमाचा रिमेक असेना, मला जो जीता भयंकर आवडतो. त्यातलं बरच काही आवडतं. पन इथं ज्या अनुषंगानं विचारवंत म्हणवले जाणारे चर्चा वगैरे करताहेत; त्या मापात त्या बिचार्‍या साध्या सुध्या चित्रपटातील छानशी व्यक्तिरेखा कशी बसू शकते?
विचारवंतांना आवडलेले असे काही मला समजूच कसे शकते?
.
एकदा त्याही व्यक्तिरेखेवर "तिचं भावविश्व", "परिप्रेक्ष्य" , "भावबंध ", "जागृत झालेली अस्मिता", "आत्मभान" अशा शब्दांचा मारा करुन टाका. म्हणजे आम्ही तेही पाहताना घाबरत घाबरत "हुच्चभ्रूंचा पिच्चर है भाउ" म्हणत बघू.

नगरीनिरंजन Wed, 13/02/2013 - 10:03

In reply to by मन

एकदा त्याही व्यक्तिरेखेवर "तिचं भावविश्व", "परिप्रेक्ष्य" , "भावबंध ", "जागृत झालेली अस्मिता", "आत्मभान" अशा शब्दांचा मारा करुन टाका. म्हणजे आम्ही तेही पाहताना घाबरत घाबरत "हुच्चभ्रूंचा पिच्चर है भाउ" म्हणत बघू.

खीक्.
मला वाटलं की स्वतःला आवडलेली स्त्रीपात्रं सांगायचीत फक्त!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 13/02/2013 - 10:17

In reply to by नगरीनिरंजन

मला वाटलं की स्वतःला आवडलेली स्त्रीपात्रं सांगायचीत फक्त!

मलाही असंच वाटलं होतं.

'न'वी बाजू Wed, 13/02/2013 - 10:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

... 'अमर अकबर अँथनी'तली निरुपा रॉय, किंवा त्या कुठल्याशा पिच्चरमधली ('प्रोफेसर'?) "मैं जल्लाद हूं... नहीं, मैं माँ हूं... नहीं, मैं जल्लाद हूं... नहीं मैं माँ हूं..." असे गेला बाजार पंधरावीस मिनिटे करत शेवटपर्यंत कोणत्याही निर्णयाला न येता केवळ उच्छाद मांडणारी ललिता पवार चालेल?

पण आपली ऑल-टैम फेवरिट म्हणजे 'शोले'मधली मौसी. त्याखालोखाल, ते नाणे उभे पडल्यावर 'आता ग बया!' छाप हावभाव चेहर्‍यावर आणून पळून जाणारी 'शोले'मधलीच ती रस्त्याच्या कडेची रॅंडम बाई.

तूर्तास इतक्याच. (तशी आम्हाला पिच्चर वगैरे पाहायची फारशी सवय नव्हती म्हणून, त्याला कोण काय करणार?)

... Wed, 13/02/2013 - 11:08

In reply to by 'न'वी बाजू

पण आपली ऑल-टैम फेवरिट म्हणजे 'शोले'मधली मौसी. त्याखालोखाल, ते नाणे उभे पडल्यावर 'आता ग बया!' छाप हावभाव चेहर्‍यावर आणून पळून जाणारी 'शोले'मधलीच ती रस्त्याच्या कडेची रॅंडम बाई.

फार फार 'एक्स्ट्रा' लक्ष असत तुमच ब्वा

प्रसाद Sat, 09/02/2013 - 12:03

लेख मलाही आवडला. करिना कपूर फारशी आवडत नाही पण जब वुई मेट पाहिला तेंव्हा करीनाला मिळालेली आणि तिने केलेली भूमिकाहि आवडून गेली होती.

विषारी वडापाव Sat, 09/02/2013 - 19:39

कोंकणा सेन शर्मा. तिने साकारलेल्या सगळ्या भूमिका आवडतात. मि. अँड मिसेस अय्यर पासून ते अगदी तद्दन अथिति कब आओगे पर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा आवडते तिची. खणखणीत बंदा रुपया आहे अगदी

अतिशहाणा Sat, 09/02/2013 - 21:24

लेख आवडला. मात्र शेवटचे वाक्य तोंडात कडवटपणा ठेवून गेले.

हे पाहिल्यानंतर गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश'मधली शशी आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा कमावल्यानंतरही तिला कमी लेखणार्‍या नवर्‍याला दोन लाडू देते हे घड्याळाचे काटे मागे फिरवणं वाटतं

हा तर त्या पात्राचा समंजसपणा वाटतो. नवऱ्याबरोबर त्या बाईला उरलेले आयुष्य काढायचे आहे. तिने मोठ्या मनाने त्याला माफ करुन टाकले. चित्रपटाच्या अखेरच्या काही मिनिटांमध्येही त्याला आपली चूक समजल्यासारखे दिसते आणि तो तिला आदराने वागवत असल्यासारखे दिसते. यात घड्याळाचे काटे मागे फिरवण्यासारखे काय आहे? आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा कमावल्यानंतर तिने नवऱ्याला लाडू न देता उपाशी ठेवले तर ती कालसुसंगत प्रगती ठरेल की काय?

मन Sat, 09/02/2013 - 23:10

In reply to by अतिशहाणा

हेच्च लिहायला आल्तो.
विमानात हवा तो पेपर ऑर्डर करणारी नायिका दाखवलेली आहे शेवटाला; तेवढे पुरेसे आहे. नवर्‍याला देणे हे थोडीशी नाराजी असली तरी शेवटी एक नातं आहे म्हणून किंवा अगदि काही नसलं तर courtsey म्हणून, विनय म्हणून लाडू देताना दाखवणं आणि ती gentlewoman असल्याचा स्तान्स घेणे मला तरी खटकलं नाही.

मन Sat, 09/02/2013 - 23:13

डोर थेट्रात जाउन पाहिलेला. फार काही रंजक वाटला नाही. थोडाफार बोर झालेला. चमेली बद्दल ऐकून आहे, पाहिला नाही अजून.
"तीन दिवारें" रंजक वाटला. खूप ग्रेट वगैरे नाही, पण ठीक, एकदा पाहण्यासारखा. विशेषतः वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केलाय आणि तरीही आम पब्लिकला पकवलं नाहिये.(नाय तर वेगळी वाट चोखाळतोय असं म्हणत पकवनारे लैच असतात, धोबीघाट वगैरे सारखे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/02/2013 - 23:47

चित्रपटाच्या अखेरच्या काही मिनिटांमध्येही त्याला आपली चूक समजल्यासारखे दिसते आणि तो तिला आदराने वागवत असल्यासारखे दिसते. यात घड्याळाचे काटे मागे फिरवण्यासारखे काय आहे?

स्वतः गिर्‍हाईकांकडे लाडू पोहोचवणारी शशी आपल्या कामाप्रती अतिशय प्रामाणिक आहे. इंग्लिश येत नाही तर शाळेतल्या शिक्षकांशी हिंदीत बोलण्याइतपत आत्मविश्वास तिच्याकडे आहे. ती चांगली आईही आहे, टीनेजर मुलीचे टँट्रम्सही ती व्यवस्थित हाताळते आहे. इंग्लिश फार काही येत नसतानाही न्यूयॉर्क शहरात पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरून इप्सित स्थळी पोहोचण्याएवढी ती हुशार आहे. एवढं सगळं असूनही तिच्यात उणीव काय तर, तिला इंग्लिश येत नाही. तिला समजून घेण्याऐवजी, तिच्या बाजूला उभं रहाण्याऐवजी तिचा नवरा काय करतो? तिच्या कामावर असणार्‍या निष्ठेची टर उडवणे, तिला इंग्लिश येत नाही म्हणून मुलं तिची टिंगल करत असतानाही तिची बाजू न घेणे. म्हणजे बाप म्हणूनही तो चुकार आहेच. बापाला आईची कदर नसताना मुलांना काय असणार? ज्या माणसाला तिची सगळ्यात जास्त कदर असायला हवी तोच तिला कमी लेखतो आहे. आणि तिच्यावर विश्वास कोण दाखवतात? तिची सासू, भाची, वर्गातले मित्र, शिक्षक.

तिने नवर्‍याला सोडून दिलेलं बघायला मला आवडलं असतं. तेवढं नाही तरी निदान शशी त्याच्यापेक्षा सगळ्याच बाबतीत फार मोठी आहे हे तरी दाखवायला हरकत नव्हती. बाहेरच्या लोकांसमोर शशीने कर्तृत्व, हुशारी दाखवल्यानंतरच नवर्‍याला फक्त चुकीची जाणीव होणं ही शिक्षा नाहीच; उलट अशा नापास नवरा आणि चुकार बापावर प्रेम करणं म्हणजे शशीने आपलं स्वत्त्व गमावणं आहे. (दिसायलाही हा आकर्षक नाहीच, तिच्या प्रेमात पडणारा लोराँ मात्र आयकॅण्डीही आहे आणि माणूस म्हणून खूपच चांगला आहे.) इंग्लिश-विंग्लिश बाकी सगळं असूनही शेवटी करमणूकप्रधान, मसालापटच रहातो.

एकेकाळी स्वत्वाची जाणीवही पुरेशी नसणारी 'डोर'मधली मीरा सासू-सासर्‍यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या मूल्यांबद्दल प्रश्न विचारते, त्यांचा धिक्कार करते आणि त्यांच्या नाकावर टिच्चून स्वतःचा अधिकार मिळवण्यासाठी झगडा करते. झीनत ही मुक्त स्त्री आहेच, पण तिच्याकडे बघून मीरासुद्धा स्वातंत्र्य म्हणजे काय याची अजिबात कल्पना नसताना ते शिकते. मीराचा आलेख चढता आहे, शशीचा कड्यावरून खाली उडी मारणारा.

इश्किया मधली विद्या असायला हवी होती लेखात.

विस्तारभयास्तव 'लक बाय चान्स'मधल्या सोनाचा (कोंकोणा सेनशर्मा) समावेशही या लेखात केला नाही. (सगळं लेखात मीच लिहून टाकलं तर प्रतिसादात बाकीचे आणि मीसुद्धा काय लिहीणार?) 'मिक्स्ड डबल्स' मधली मालती (पुन्हा एकदा कोंकोणा) हे पात्रही तसं मला आवडलं. सकृतदर्शनी चमेली, चंद्रिका आणि मीरा यांच्या आयुष्यात लक्षवेधक काहीही नाही. चमेलीतर सामाजिकदृष्ट्याही खालच्या स्तरातली आहे. पण चित्रपटात या व्यक्तींमधला बदल लक्षणीय आहे. 'डोर'मधली झीनत किंवा 'लक बाय चान्स'मधली सोना मुळातच आवडाव्यात अशा आहेत. संकट येतं तेव्हा या सगळ्या आव्हानं स्वीकारतात. 'जब वी मेट'मधली गीत, बॉयफ्रेंड नाकारतो तेव्हा आता आयुष्य संपलं अशीच वागते; ते अतिसामान्य आहे.

मोबाईल-बॅटरीबद्दल आठवत नव्हतं. थ्यँक्स.

बॅटमॅन Sun, 10/02/2013 - 00:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असहमत. जसे "असे-असे दाखवले की परंपरावादी" हे सरसकटीकरण, तसेच "असे-असे दा़खवले की वेगळा" हेही सरसकटीकरणच आहे. नेहमीच्या सरसकटीकरणाला विरोध करता करता तो विरोधभक्तीत परिणत होऊन वेगळ्या सरसकटीकरणात रूपांतरित झालाय की काय, असे वाटते हा प्रतिसाद वाचून.

ऋता Sun, 10/02/2013 - 00:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"तिने नवर्‍याला सोडून दिलेलं बघायला मला आवडलं असतं."
हे तुझं वैयक्तिक मत आहे हे मान्य. पण थोडं टोकाचं वाटलं असतं आणि वास्तवाशी अजिबात संबंध नसलेलं वाटलं असत जर तिने नवर्याला सोडून दिलेलं वगैरे दाखवलं असत.
मी इंग्लिश विंग्लिश पाहिलेला नाही...पण जे त्याबद्द्ल इतरांनी लिहिलय त्यातून मला तरी वाटतय शशी उलट माफ करून मोठी ठरते. तिला इंग्लिश शिकून आदराचं स्थान मुख्यत्वे तिच्या घरातच हवं असतं...बाहेर कुठे नव्हे. नाहीतर घर सोडून (इंग्लिश न येण्या वरून घरचे मानसिक छळ करतात असं म्हणून) इंग्लिश न शिकताही राहू शकली असती की.

"'जब वी मेट'मधली गीत, बॉयफ्रेंड नाकारतो तेव्हा आता आयुष्य संपलं अशीच वागते; ते अतिसामान्य आहे."
सिनेमात फक्त नऊ महिन्याचा काळ (बॉयफ्रेंडने नाकारल्या नंतर) दाखवलेला आहे.त्यामुळे तिची मानसिक स्थिती अगदी नॉर्मल होऊन ती काही जणू झालच नाही अशी घरी परत येऊन जगते आहे हे तर अगदी पटलं नसतं. गीत ही खूपच मानी दाखवलेली आहे...त्यामुळे ती बॉयफ्रेंडला पूर्णपणे विसरून जायचा प्रयत्न करते आणि घरीही जात नाही. अशा वेळी ती स्वतःच्या पायावर काही करून उभं रहाण्याच्या प्रयत्नात दाखवली आहे ते असामान्य वाटलं मला तरी.

'न'वी बाजू Sun, 10/02/2013 - 06:38

In reply to by ऋता

"तिने नवर्‍याला सोडून दिलेलं बघायला मला आवडलं असतं."
हे तुझं वैयक्तिक मत आहे हे मान्य.

मुळात, नवरा तिचा. त्याला ठेवायचा, की सोडायचा, ते तिचे ती बघून घेईल की! तिने काय करायला हवे होते, हे ठरवणारे, तिने काय केलेले पहायला आपल्याला आवडले असते, हे परस्पर ठरवून टाकण्याचे vicarious pleasure घेऊ पाहणारे आपण (म्हणजे मी काय, तुम्ही काय किंवा ३_१४तै काय, किंवा इथले बाकीचेही नेहमीचेच यशस्वी सदस्य काय, आपण सगळेच) नेमके कोण, म्हणतो मी.

आपले निर्णय लोकांवर काय म्हणून लादावेत, नाही काय? ;-)

मन Sun, 10/02/2013 - 00:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्यात वागण्याबोलण्यात कित्येक पारंपरिक म्हणवल्या जाणार्‍या विचारांचे traits आहेत.
त्यामुळे
बाहेरच्या लोकांसमोर शशीने कर्तृत्व, हुशारी दाखवल्यानंतरच नवर्‍याला फक्त चुकीची जाणीव होणं ही शिक्षा नाहीच; उलट अशा नापास नवरा आणि चुकार बापावर प्रेम करणं म्हणजे शशीने आपलं स्वत्त्व गमावणं आहे. (दिसायलाही हा आकर्षक नाहीच, तिच्या प्रेमात पडणारा लोराँ मात्र आयकॅण्डीही आहे आणि माणूस म्हणून खूपच चांगला आहे.) हे वाचून, त्यातही उत्तरार्ध वाचून संताप संताप झाला.चिडचिड झाली.

ऋता Sun, 10/02/2013 - 01:15

In reply to by मन

चिडचिड समजू शकते कदाचित.
कुणी कुणावर आणि का प्रेम करावे यावर मते देण्यानी काही साध्य होत नाही. आणि ती न दिलेली बरी कारण प्रत्येकाची व्यक्तिगत बाजू आपल्याला पूर्णपणे कळू शकत नाही.

अतिशहाणा Sun, 10/02/2013 - 01:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तिने नवर्‍याला सोडून दिलेलं बघायला मला आवडलं असतं. तेवढं नाही तरी निदान शशी त्याच्यापेक्षा सगळ्याच बाबतीत फार मोठी आहे हे तरी दाखवायला हरकत नव्हती

मला वाटते शशी त्याच्यापेक्षा मोठीच दाखवली आहे. चारचौघात टिंगल करणाऱ्या नवऱ्याच्या तशा वागण्याला प्रत्युत्तर म्हणून तिने नाकावर टिचून त्याच्या समोर इंग्लिशमध्ये भाषण केले आणि वर मोठ्या मनाने त्याला माफही केले. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रसंगाने शशी ही 'मोठी' वाटण्याऐवजी खुनशी किंवा लेचीपेची वगैरेच वाटली असती. तिने नवऱ्याला सोडून दिल्यावर दोन मुलांचे काय दाखवायचे? तिच्या तुटपुंज्या इंग्लिशच्या जोरावर आणि लाडूंवर मुलांचे सध्या होऊ शकते त्या दर्जाचे पालनपोषण, शिक्षणे वगैरे होणे शक्य नाही. सध्याच्या कुटुंबव्यवस्थेच्या चौकटीत हा शेवट परफेक्ट वाटला. दुसरे म्हणजे तिच्या नवऱ्याने तिचे इंग्लिश वगळता इतर बाबतीत तिला हिणवल्याचे किंवा तो मनापासून तिचा दुस्वास किंवा मारहाण करत असल्याचे, किंवा अप्रामाणिक असल्याचे कुठे चित्रपटात दिसले नाही. थोडक्यात ज्या मुद्द्यांवर आज कायदेशीररीत्या घटस्फोट मिळू शकतो त्या स्वरुपाचे कोणतेही गुन्हे नवऱ्याने केल्याचे दिसले नाही. त्यामुळे शशीवरही हे नाते पाळण्याचे बंधन आहे. तिच्या नवऱ्याचे तिच्यावर प्रेम आहे. तिला इंग्लिश येत नसूनही बहिणीच्या घरच्या कार्यक्रमासाठी जाण्यास तो तिची मानसिक तयारी करतो. तिचे शिक्षण किंवा इंग्लिशचे तुटपुंजे ज्ञान याची तो करत असलेली टवाळी हा मुद्दा शशीने खोडून टाकून आपण केवळ घरकाम करणारी कामवाली नाही हे त्याला सडेतोडपणे दाखवून दिले.

ज्या माणसाला तिची सगळ्यात जास्त कदर असायला हवी तोच तिला कमी लेखतो आहे. आणि तिच्यावर विश्वास कोण दाखवतात? तिची सासू, भाची, वर्गातले मित्र, शिक्षक.

असे अनेकदा होते. मात्र शशीने त्याच्या कमी लेखण्यामागचे कारण (चुकीचे किंवा बरोबर) काढून टाकून त्याला खजील केलेच की.

... Sun, 10/02/2013 - 00:04

अच्छा आम्हीही प्रतिसादात लिहायच आहे
मग आमचीही लिस्ट

ऊंबरठा मधील सुलभा महाजन

दिलसे मधली मनीषा

क्या कहेना मधली प्रिटी झिँटा

नितळमधली देविका दफ्तरदार

लिस्ट अपूर्ण
आठवेल तशी भर घालण्यात येईल

ॲमी Sun, 10/02/2013 - 02:07

ओके आतापर्यँत जी नावं आली आहेत त्यातले बरेच चित्रपट मी पाहीलेच नाहीत अजुन...

मला आवडलेली काही स्त्री पात्रे
कहानी मधली विद्या
मिर्च मधल्या चारी कथांच्या नायिका
चख दे मधल्या मुली

फार काही वेगळं करत नाहीत तरीही आवडलेल्या
पेज ३, वेक अप सिद मधली कोकना
लव आजकल मधली दिपिका
रंगिला मधली उर्मिला

अतिशहाणा Tue, 12/02/2013 - 01:06

In reply to by ॲमी

इथे प्रतिसाद वाचल्याने या चित्रपटाबद्दल कळले. झकास चित्रपट आहे. खूप आवडला. प्रौढ मनोरंजन असले तरी दर्जेदार वाटले. पहिल्या कथेतील रायमा सेन झकासच दिसते. बोमन इराणीचा प्रसंगातील कलाटणी अगदीच अनपेक्षित होती. खो खो हसलो.

सन्जोप राव Sun, 10/02/2013 - 06:51

हे पाहिल्यानंतर गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश'मधली शशी आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा कमावल्यानंतरही तिला कमी लेखणार्‍या नवर्‍याला दोन लाडू देते हे घड्याळाचे काटे मागे फिरवणं वाटतं. प्रत्येक स्त्री स्त्रीवादी असण्याची अपेक्षा अनाठायी आहे किंवा स्त्री दिग्दर्शक मसालापट बनवणार नाही हे ही!
नेमके हेच या लेखाच्या बाबतीत झाले आहे. लेखाचा विषय आणि मांडणी उत्तम असूनही या वाक्यातील आणि नंतरच्या प्रतिसादांतील आक्रस्ताळेपणामुळे लेखाची आणि या विषयाची एकूण चवच गेल्यासारखी वाटते. स्त्रीवादी आणि पुरुषवादी असे काळे-पांढरे वर्गीकरण करत बसण्यापेक्षा करड्या रंगाचा स्वीकार करणे अधीक प्रौढपणाचे आहे. वात्सल्य आणि ममत्व हे सस्तन प्राण्यांमधील गुण प्रामुख्याने मादीत आढळतात असे जीवशास्त्र सांगते. त्याला माणसाने विचारांची आणि संस्कारांची जोड दिलेली आहे. एवढे कळाले की शशीचे काय किंवा तिच्या नवर्‍याचे काय, वागणे कळून घ्यायला अवघड जाणार नाही. आपली बायको काय आहे हे कळाल्यावर शशीच्या नवर्‍याने तिला काहीशा केविलवाणेपणाने आणि बर्‍याचशा असुरक्षितपणाने 'मुझे प्यार तो करती हो ना?' असे विचारणे आणि त्यानंतर तिने त्याला दोन लाडू वाढणे हे स्त्री आणि पुरुषाच्या मानसिकतेचे बरेचसे बरोबर प्रतिक आहे. 'वीमेन, हू आर अदरवाईज सच अ पेन इन दी नेक, टर्न इन्टू अ‍ॅबसोल्यूट एंजल्स व्हेन यू आर हॅविंग अ हँगओव्हर' असे वुडहाऊस म्हणतो. हे असले शब्दशः घ्यायचे नसते. 'हो का? तुम्ही दारु ढोसणार, तुमची डोकी दुखणार, आणि मग लिंबूपाणी द्यायला फक्त बायको आठवणार..' असे एकदा सुरु झाले की त्याला अंत नाही. 'गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉइल्ड इट बाय अ‍ॅडिंग अ टंग इन इट' यामधला विनोद आधी लक्षात घ्यावा आणि शिवाय या वाक्यातल्या पूर्वार्धात तिला एक कॉम्पिमेंट दिलेली आहे हेही लक्षात घ्यावे. नाहीतर मग हे गुर्‍हाळ कधी संपणारच नाही.

'न'वी बाजू Sun, 10/02/2013 - 07:54

In reply to by सन्जोप राव

'वीमेन, हू आर अदरवाईज सच अ पेन इन दी नेक, टर्न इन्टू अ‍ॅबसोल्यूट एंजल्स व्हेन यू आर हॅविंग अ हँगओव्हर' असे वुडहाऊस म्हणतो.

एक कुतूहल: हे वुड्डहौससाहेबाने नेमके कोठे आणि नेमक्या कोणत्या संदर्भात म्हटले आहे? हे वाचनात आलेले नाही, मिस झालेल्यात जमा आहे, म्हणून विचारतोय. कारण, 'वीमेन, हू आर अदरवाइज़ सच अ पेन इन द नेक' अशा प्रकारचे विधान वुड्डहौससाहेबाने करणे ही अगदीच अशक्यकोटीतील गोष्ट नसली, तरी वुड्डहौससाहेबाची एकंदरीत मते ही मिसॉजिनिस्टिक क्याटेगरीत असल्याचे आजवर जाणवले नाही, रादर, 'फेअरर सेक्स'विषयीच्या त्याच्या भावनांचा कल हा एकंदरीत काहीसा आदराकडेच झुकणारा असावा, अशीच शंका आजवर येत आलेली आहे. त्यामुळे वुड्डहौससाहेबाने जर असे काही विधान केलेले असेल, तर त्याच्या नेमक्या संदर्भाबाबत कुतूहल निर्माण होते, आणि अशा संदर्भाच्या प्रकाशात ते विधान बहुधा अतिशय innocuous निघावे, अशी खात्री वाटते.

'हो का? तुम्ही दारु ढोसणार, तुमची डोकी दुखणार, आणि मग लिंबूपाणी द्यायला फक्त बायको आठवणार..' असे एकदा सुरु झाले की...

याला उत्तर असे आहे: "तुम्हीही ढोसा! मग तुम्हाला हँगओव्हर आला, की बर्फाळलेला लिंबूसोडा नवरा आणून देतो की नाही, ते पहा!" द प्रूफ इज़ इन द ड्रिंकिंग! आता याची प्रचीती घेण्यासाठी तुम्हाला जर ढोसायचीच नसेल, तर त्याला कोण काय करणार? (पण एकंदरीत नॉन-ड्रिंकिंग क्लासेसमध्ये समजण्याकरिता कन्सेप्ट बरीक कठिणच आहे.)

'गॉड मेड ब्यूटी अ‍ॅन्ड स्पॉइल्ड इट बाय अ‍ॅडिंग अ टंग इन इट' यामधला विनोद आधी लक्षात घ्यावा...

काय म्हणून घ्यावा? घेतलाच पाहिजे, अशी सक्ती आहे काय? भारत काय, किंवा यूएसए काय, दोन्ही मुक्त देश आहेत. विनोद लक्षात घेण्याचे किंवा न घेण्याचे स्वातंत्र्य दोन्ही ठिकाणी अबाधित आहे. ज्यांना नाहीच घ्यायचा, त्यांच्यावर तो लक्षात घेण्याचे बंधन लादणारे आपण (तुम्ही, मी किंवा इतरही कोणी) नेमके कोण, म्हणतो मी.

आणि शिवाय या वाक्यातल्या पूर्वार्धात तिला एक कॉम्पिमेंट दिलेली आहे हेही लक्षात घ्यावे.

पुन्हा, ही मखलाशी नेमकी कशासाठी? ज्याने कोणी हे विधान केलेले आहे, त्याने काही "कृपया यातील काँप्लिमेंट लक्षात घ्याच, हं!" अशी जाहीर विनंती केल्याचे किंवा तशी अपेक्षा बाळगल्याचे ऐकिवात नाही. बरे, ती काँप्लिमेंट कोणी लक्षात न घेतल्याने जर मूळ विधानकर्त्याच्या अंगास भोके पडत नाहीत, तर मग ती (भोके) तुमच्या, माझ्या वा अन्य कोणाच्या अंगास काय म्हणून पडावीत?

सदर मूळ विधानकर्ता होतकरू इच्छुक वकिलास काही रिटेनर फी वगैरे देऊ करत असल्याची काही खात्रीलायक बातमी आहे काय? नाही म्हणजे, रांगेत नंबर लावायला नेमके कोठे जावे, म्हणतो.

नाहीतर मग हे गुर्‍हाळ कधी संपणारच नाही.

अहो संपायला हवे आहे नेमके कोणाला? काय समजलेत? नाहीतर मग मराठी संकेतस्थळे चालायची कशी? ही (किंवा असली) गुर्‍हाळे कधी संपणार नाहीत, इसीच उम्मीद पे तो मसं की दुनिया क़ायम है, क्या बोलते, मियाँ?

विसुनाना Sun, 10/02/2013 - 11:11

या लेखाच्या लेखिकेने घेतलेली स्त्रीवादी भूमिका थोडी मेलोड (मुरब्बी, मुरलेली) असती तर बरे झाले असते.

सन्जोप रावांनी उल्लेख केलेल्या " 'मुझे प्यार तो करती हो ना?'" या प्रश्नातच स्त्री-पुरुष नात्याची गुंतागुंत दडलेली आहे.
किंबहुना 'मिशन इंपॉसिबल-२' मध्ये अँथनी हॉपकिन्स म्हणतो तसे " She's a woman - she's got all the training she needs." (पूर्ण संवाद थोड्या वेगळ्या-वाईट अर्थाने आहे. पण सरळ अर्थ घेतला तरी ते खरे आहे.) पुरुषात असलेल्या अपूर्णत्त्वाच्या न्यूनगंडातून तर तो स्त्रीबरोबर सामान्यपणे वागत नाही -असे तर नसेल ना? (यावर कोणीतरी काहीतरी म्हटलेले असावेच, फक्त मला ते माहित नाही, इतकेच!)

तेव्हा शशीने नवर्‍याला लाडू देणे हे तिने त्याला माफ करणे आहे. जवळच्या नात्यांमध्ये माफी मागणार्‍याला माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नसते. (-असे मी म्हणतो..)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/02/2013 - 11:31

मारणे, जबरदस्ती लैंगिक संबंध इ. एवढीच स्त्रियांवर होणार्‍या अत्याचाराची यादी आहे का? बाईला तिच्या नवर्‍याने खायला, प्यायला, ल्यायला पुरेसं दिलं की संपलं त्याचं कर्तव्य? उत्तर हो असेल तर प्रतिसादाचा पुढचा भाग वाचून फार फरक पडणार नाहीच.

मात्र शशीने त्याच्या कमी लेखण्यामागचे कारण (चुकीचे किंवा बरोबर) काढून टाकून त्याला खजील केलेच की.

तिच्या आयुष्यातली १२-१५ वर्ष तिने कुचंबणा सहन केलेली आहे, का तर इंग्लिश येत नाही. आणि हिचं काम पांढरपेशा नाही. या ठोंब्याने हिला सतत कमी लेखलं, मुलांसमोर हिची टिंगल केली, मुलीला आईबद्दल आदर नाही कारण बापही तसा वागत नाही. याबद्दल या ठोंब्याला फक्त काही काळापुरतं खजील वाटणं एवढंच? आणि मुलगा पडला तर हिला मात्र ही सगळी आपलीच चूक आहे असं वाटणार!
शशी नवर्‍यापेक्षा प्रत्येक बाबतीत मोठी आहे. पण मग तिची निवड एवढी खराब का? त्या ठोंब्याचं असं काय कर्तृत्त्व की त्याला एवढी हुशार आणि कर्तबगार स्त्री त्याच्या मुलांची आई म्हणून तरी मिळावी?

'वीमेन, हू आर अदरवाईज सच अ पेन इन दी नेक, टर्न इन्टू अ‍ॅबसोल्यूट एंजल्स व्हेन यू आर हॅविंग अ हँगओव्हर' असे वुडहाऊस म्हणतो. हे असले शब्दशः घ्यायचे नसते.

मग याचा नक्की अर्थ काय? मला समजला तो असा, पुरुषाच्या दृष्टीने, त्याला अगदीच हातपाय हलत नसतात तेव्हा स्त्रिया ममत्वाने सेवा करतात तेव्हाच त्या छान असतात. डोकं चालवायला लागल्या की झेपत नाहीत. काँप्लिमेंटचं म्हणाल तर माझ्या मते त्यात देवाची प्रशंसा आहे, आणि देवालाच दोष दिलाय. बाई ही कलाकृती आहे, प्रदर्शनीय वस्तू. नास्तिकपण बाजूला टाकलं तरी त्यातलं बाईचं वस्तूकरण मला नाही वेगळं काढता येत!

'इंग्लिश विंग्लिश' मला आवडला नाही, पैसे अगदीच वाया गेले असंही नाही. मसालापट म्हणून छान, चकचकीत वगैरे आहे. मिष्टर गोडबोले दिसायला ठोंब्या असला तरी लोराँमुळे पुरेसं नेत्रसुख आहे. त्याच्या संवादातली सोपी फ्रेंच वाक्य समजली म्हणून मी स्वतःची पाठही थोपटून घेतली. त्यातही तिला वाईट वाटत असताना हा "मलाही वाईट वाटतंय" असं म्हणतो तेवढं बरोब्बर समजलं. चित्रपटगृहात शेजारी बसलेल्या उतारवयीन काकूंच्या चेहेर्‍यावर त्यांचे भाव दिसतील इतपत उजेड होता; पैसे पुरतेच वसूल. त्यावर बहुतेकशी गाणी आवडली. एका गाण्यात 'विचार धूसर झाले आहेत' अशा काही अर्थाची ओळ आहे, तेव्हा स्क्रीनवर मॅनहोलमधून बाहेर येणारा धूर दिसतो तो बघून मला अनआवरेबल हसूही आलं. पण बाई कितीही शिकली, हुशार, कर्तबगार असली, तरी "चूल आणि मूल हेच तुमचं खरं आयुष्य गं बायांनो" ही काही माझी निवड नाही. गौरी शिंदेची, बहुसंख्य मध्यमवर्गीय प्रेक्षकांचीही असू शकते. (त्यांना खूष केलं नाही तर हिला पुढच्या पिक्चरसाठी पैसे कसे मिळणार?)

ऋता Sun, 10/02/2013 - 13:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रीनेच घर सोडावं, तिनेच बाहेर पडावं वगैरे म्हणजे सगळ तिनीच करावं, पण पुरूष बदलणार नाही, नवर्याने समजून घेण्याची अपेक्षाच का? सोडा त्याला आणि रहा स्वतंत्रपणे (मगच 'तो'(नवरा) धडा शिकेल अथवा नाही) असाच सूर वाटतो आहे.
मला तरी हा सूर पटत नाही...स्त्रीवादाला स्त्रीयांचा पाठिंबा कसा मिळेल अशाने?

सिनेमा म्हणशील तर नक्कीच तो प्रेक्षकांना खुष करण्यासाठी आणि जास्तीतजास्त गल्ला भरण्यासाठी होता. इतर काही उद्देश असला तर तो दुय्यम असणार.

विसुनाना Sun, 10/02/2013 - 15:05

हा विषय काही हल्लीच आलेल्या चित्रपटांपुरता मर्यादित ठेवण्याइतका लहान नाही. उदाहरणार्थ, मिर्चमसालामधली स्मिता पाटीलची भूमिका हे मला अत्यंत आवडलेले व्यक्तिमत्व आहे.
या विषयावर एक लेखमाला व्हावी असे वाटते.

मन Sun, 10/02/2013 - 15:49

In reply to by विसुनाना

मिर्चमसाला ह्या जुना चित्रपटावरून हल्ली हल्ली आलेला काहिंना "चावट कथा" वाटतील असे कथानक असलेला एक चित्रपट परसूं परसूंच येउन गेला, दोन अडीच वर्षापूर्वी.
त्याचं नाव मिर्च. चित्रपट कहर आहे, धमाल आहे, आणि आपल्याकडे अ‍ॅडल्ट चित्रपट म्हणतात त्या ष्टाइलचा आहे. कोंकणा सेन , रायमा सेन, राजपाल यादव , श्रेयस तळपदे, प्रेम चोप्रा वगैरे मंडळी आहेत.
त्यातील स्त्रीपात्रेही imperative म्हणावीत अशी, मुख्य भूमिकेत होतीं. निव्वळ झाडामागे नाचायचे काम त्यात नव्हते.
.
ऐसीवाल्या मंडळींपैकी कुणी पाहिलाय का?

ॲमी Sun, 10/02/2013 - 16:04

In reply to by मन

आधीच्या प्रतिसादात मी लिहीलय की "मिर्च मधल्या चारी कथांच्या नायिका"
मला लै आवडला हा चित्रपट. मस्ट वॉच :-D

तिरशिंगराव Sun, 10/02/2013 - 21:03

लेख आवडला. तिन्ही सिनेमे पाहिले नाहीयेत, पण आता चमेली तरी पाहीनच.
अदितीचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे. मी अशी अनेक उदाहरणे प्रत्यक्षांत पाहिली आहेत. बायकोला सतत टोमणे मारणे, तिच्या जाडेपणावरुन फालतू जोक्स करणे किंवा चारचौघांत बायकोचा अपमान करणे हे पूर्वीच्या पिढीत अनेक ठिकाणी पाहिले आहे, तेंव्हा असे वाटायचे की या बिचार्‍या का हे ऐकून घेतात ? त्यातल्या काही जवळच्या नातलग बायकांना मी विचारले सुद्धा! पण त्यांचे म्हणणे पडले की मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही हे सहन करतो आणि घर त्यामुळेच सोडू शकत नाही.

ऋता Sun, 10/02/2013 - 21:46

आवडती स्त्री पात्रं म्हणून विचार केला तर फार कमी सिनेमांमधली स्त्री पात्र आवडतात असं लक्षात आलं.
मलाही मिर्च मसाला मधलं स्मिता पाटिलचं पात्र आवडलं होतं... आणि दीप्ती नवलचंही.
अर्थ मधली शबाना अगदी नॅचरल वाटली...आणि आवडली.त्यातली रोहिणी हट्टंगडी सुद्धा लक्षात रहाण्यासारखी आहे.
फायर मध्ये सुद्धा शबानाचं पात्र चांगलं आहे...त्यात ती सोडते नवर्याला.

अनामिक Sun, 10/02/2013 - 22:26

लेख उत्तम उतरला आहे. पण मला व्यक्तीशः चमेली आवडला नव्हता, का ते सांगता येणार नाही कारण आता नीट आठवतही नाही. बाकी, शशी बद्दल बोलायचं तर तिने नवर्‍याला माफ केलेलं संयुक्तीक वाटलं. कोणीच पुर्णतः चांगला किंवा वाईट नसतो. जोडीदाराला त्याच्या गुणदोषांसकट स्विकारणं महत्वाचं. चित्रपटात शशीला वेळोवेळी घरच्यांकडूनच अपमानीत झालेलं दाखवलंय खरं! पण शशी जर हुशार, प्रामाणीक, आणि कॉन्फिडंट आहे तर तिच्या सतत होणार्‍या अपमानाला ती आधीच उत्तर का देत नाही? मला वाटते, नवरा तिला वेळोवेळी चिडवतो, पण ते तिला गृहीत धरल्यामुळे असु शकेल. त्याचं तिच्यावर प्रेम नाही म्हणून, किंवा तो तिला जाणून कमी लेखतो असं मला वाटत नाही. याउलट स्वतःमधली कमतरता तिने इंग्रजी शिकून आणि घरच्यांना चोख उत्तर देऊन पूर्ण केली असं वाटतं. मलातरी तिने त्या फ्रेंच माणसाबरोबर जाणं आवडलं नसतं. ती जर त्याच्याबरोबर गेली असती तर त्याला मी तिचं क्षणीक मोहाला बळी पडून टाकलेलं पाऊल म्हणालो असतो.

आपल्या सभोवताली बघीतलं तर स्त्री 'शशी'प्रमाणेच पुरूष 'शशी'ही दिसतील. माझ्या अगदी जवळच्या मित्राचं उदाहरण द्यायचं झालं तर त्याची बायको चारचौघात त्याला मुर्ख, बावळट अशी संबोधनं सर्रास वापरते. कधी आपल्यालाही वाटावं की का ही ह्याला एवढं कमी लेखते? पण इतरवेळी पाहीलं तर त्यांच्यातील नातं एकदम घट्टं आहे. एकमेकांवरचं प्रेम, विश्वास, आणि सपोर्ट बघता बाकी गोष्टी क्षुल्लक वाटतात.

असो, जर चित्रपटातल्या आवडलेल्या स्त्री भुमीकांचा विचार करायचा झाला तर मला सौदागरमधील नुतनची भुमीका आवडलेली. आता नीट आठवत नाही, पण चित्रपट पाहीला तेव्हा नुतन एकदम आवडून गेली होती.

राजेश घासकडवी Sun, 10/02/2013 - 23:08

हे पाहिल्यानंतर गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विंग्लिश'मधली शशी आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा कमावल्यानंतरही तिला कमी लेखणार्‍या नवर्‍याला दोन लाडू देते हे घड्याळाचे काटे मागे फिरवणं वाटतं.

हे वाक्य मलाही थोडं खटकलं. स्त्रीवादी भूमिकेतून एखाद्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे. पण लेखक/दिग्दर्शक यांनीही तोच चष्मा लावून चित्रपट तयार केला असं मानणं बरोबर नाही. ते एक कथेतलं पात्र आहे, एखादा इझम किंवा वाद पुढे नेण्यासाठी तयार केलेलं असेलच असं नाही. कधीकधी असतं, पण बहुतेक वेळा नसतं. बहुतेक व्यक्ती या इझमी व्यक्तिरेखांइतक्या सरळसोट नसतात.

आणि अगदी स्त्रीवादी भूमिकेतून बघायचं झालं, तरी स्त्री पुरुषाइतकी सबल झाली की तिने पुरुषाला सोडूनच दिलं पाहिजे हा अट्टाहास कळत नाही. 'हा मला बाकी आवडतो, फक्त मला काही वेळा आवडणार नाही असं वागतो, ते वागणं थांबलं तर मला त्याच्याबरोबर रहायला अतिशय आवडेल. एकदा मला स्वतंत्र होण्याची शक्ती आली मग नातं बदलूनच जाईल. अशा बदललेल्या नात्यात रहाणं हे एकटीने रहाण्यापेक्षा केव्हाही चांगलं' अशी साधी भूमिका घेण्याऐवजी 'हा मला आवडणार नाही असं काही वेळा वागतो म्हणजे हा हरामखोर आहे. मी नाईलाजाने रहाते कारण मला स्वतःच्या पायावर उभं रहाण्याची शक्ती नाही. ती शक्ती असती तर तो तसं वागलाच नसता. जेव्हा ती शक्ती येईल तेव्हा मी आत्तापर्यंतच्या त्याच्या वागणुकीचा बदला म्हणून ताबडतोब चालती होईन. मग चांगला धडा मिळेल त्याला.' अशी युद्धखोर मानसिकताच नेहेमी फायदेशीर ठरेल का? मला वाटत नाही. तलवार हातात आली की तिने लागलीच दुष्टाचं मुंडकं उडवण्यापेक्षा ती म्यानात ठेवून कदाचित त्याचा दुष्टपणा छाटून टाकता येतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/02/2013 - 00:23

शशीने लोराँसाठी नवर्‍याला सोडून देण्याची काय आवश्यकता आहे? ती तिचं स्वतंत्र आयुष्य जगू शकतेच. लोराँ फक्त कॅटलिस्ट असू शकतो. तिचा नवराच तिच्यावर अवलंबून आहे, ती नाही. "दुसरा लाडू मिळवण्याची तुझी पात्रता नाही" असं नवर्‍याला सांगणारी मानवी शशी बघायला मला आवडली असती. स्त्रिया देवी असतात, सगळ्यांच्या चुका पोटा घालतात इ. संस्कृती नामक सापळ्यातून ती बाहेर आलेली बघणं रोचक वाटलं असतं.

लेखक/दिग्दर्शक यांनीही तोच चष्मा लावून चित्रपट तयार केला असं मानणं बरोबर नाही.

लेखातलं शेवटचं वाक्य बहुदा सुटलं असावं. "प्रत्येक स्त्री स्त्रीवादी असण्याची अपेक्षा अनाठायी आहे किंवा स्त्री दिग्दर्शक मसालापट बनवणार नाही हे ही!"
दीपा मेहता, मीरा नायर याही स्त्रीवादी चित्रपट बनवत नाही. 'फायर' अपवाद म्हणता येईल. पण दीपा मेहताचे '१९४७ अर्थ', 'वॉटर' आणि मीरा नायरचे 'सलाम बाँम्बे!' आणि 'मॉन्सून वेडींग' मसालापट नाहीतच.

तलवार हातात आली की तिने लागलीच दुष्टाचं मुंडकं उडवण्यापेक्षा ती म्यानात ठेवून कदाचित त्याचा दुष्टपणा छाटून टाकता येतो.

चित्रपटाच्या शेवटीही काय दिसतं, तर शशी आत्मविश्वासाने हिंदी वर्तमानपत्र मागते आहे. त्याजागी तिचा नवरा तिच्यासाठी काही कष्ट घेताना दाखवला असता तरीही हा मुद्दा मान्य केला असता. जणूकाही याला आपल्या कृत्याची लाज वाटली, हिने माफ केलं की हा पुन्हा मोकळा पूर्वीसारखं वागायला! "तुम्ही कष्ट करा, तुम्ही काळजी घ्या, तुम्ही मोठ्या व्हा. आम्ही मोठं औदार्य दाखवून तुमची टर उडवणार नाही."

गौरी शिंदेने तिच्या चित्रपटात तिला हवं ते केलंच, त्याबद्दल आक्षेप घेण्यात अर्थच नाही. ते गल्ला भरण्यासाठी केलं हे मान्य केल्यानंतर त्याचा त्रासही होत नाही. फक्त चित्रपट मसालापट यापलिकडे दखलपात्र रहात नाही. कुठे 'दबंग' येऊन पिटातल्या शिटीमार प्रेक्षकाचा 'पैसा वसूल' करतो, कुठे 'इंग्लिश-विंग्लिश' किंवा 'द डर्टी पिक्चर' मल्टीप्लेक्समधल्या पॉपकॉर्न खाणार्‍यांचे दोन तास मजेत घालवतो.

'मिर्च मसाला'मधल्या चारच कशाला, पाचव्या रॅपर कथेमधल्या स्त्रियाही मला आवडल्या. विशेषतः हिंदी-मराठी मालिकांमधे डँबिस स्त्रिया खलनायकी दाखवतात, 'मिर्च मसाला'मधला धक्का सुखद होता. आपल्याशी वाईट वागणार्‍या नवर्‍यांना चातुर्याने किंवा डँबिसपणे धडा शिकवतात तरीही खलनायक ठरत नाहीतच. त्यातल्या राजस्थानी, जुन्या गोष्टीतला राजाच्या 'इमानदार' सरदाराचं पात्रही झकास आहे.
तशी 'साहेब, बीवी और गँगस्टर'मधली राणी (माही गिल) हे ही रोचक पात्र आहे.
'फायर' आणि 'डोर'मधे एकप्रकारचं साम्य वाटतं. एकीने आपलं उजाड आयुष्य मान्य केलेलं आहे. तिच्या आयुष्यात दुसरी स्त्री येते, ती मुळातच स्वतंत्र विचारांची आहे. तिच्या स्वातंत्र्यामुळे दुसरीलाही स्वातंत्र्याची गोडी आवडते. या यादीत 'फायर' नसणं ही माझी चूकच.

जुने चित्रपट मी फारसे पाहिलेले नाहीत. स्मिता पाटीलचं 'मंडी'मधलं पात्र फार आवडलं होतं. (चित्रपट, बाकीचे अभिनेते, एकंदर अनुभवच फार मस्त आहे.) अगदी जुन्या चित्रपटांबद्दल प्रश्न पडतो की आर्थिक उदारीकरणानंतरच अक्कल फुटलेल्या माझ्यासारख्या लोकांना त्या काळची मूल्य, समाजव्यवस्था नीट समजेल का, त्यातल्या पात्रांचं मूल्यमापन योग्य पद्धतीने करता येईल का?

ॲमी Mon, 11/02/2013 - 07:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'मिर्च मसाला'मधल्या चारच कशाला, पाचव्या रॅपर कथेमधल्या स्त्रियाही मला आवडल्या. विशेषतः हिंदी-मराठी मालिकांमधे डँबिस स्त्रिया खलनायकी दाखवतात, 'मिर्च मसाला'मधला धक्का सुखद होता. आपल्याशी वाईट वागणार्या नवर्यांना चातुर्याने किंवा डँबिसपणे धडा शिकवतात तरीही खलनायक ठरत नाहीतच.
हे तू कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतेय? मिर्च (२०१०) की मिर्च मसाला (१९८७)?
मी मिर्च(२०१०) बद्दल बोलत होते. त्यात ४च कथा आहेत आणि त्यांना एकत्र बांधणारी पाचवी कथा. कथालेखक (अरुणोदय सिँग), त्याची गर्लफ्रेँड (शाहना), फिल्म प्रॉड्युसर (सुशांत सिँग), शेवटी थोडा वेळ त्याची बायको यांची पाचवी कथा. त्यात रअॅपर वगैरे काही नाही...
बाकी इंग्लिश विँग्लिश बद्दल मी तुझ्या मताच्या बाजुने जास्त झुकणारी आहे. शशी, बॉलीवुड कथेमधलं, बॉक्सऑफिसवर नजर ठेउन बनवलेलं कअॅरक्टर आहे हे ही मान्य.
साहिब, बीवी और गँगस्टर मधली माही आवडली.
मंडी मधली शबाना जास्त आवडली स्मिता पेक्षा.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/02/2013 - 08:04

In reply to by ॲमी

स्वारी, मला 'मिर्च'च म्हणायचं होतं. आणि बांधणारी कथा ज्यात लेख, संपादक, निर्माता, त्याची बायको आहेत ती रॅपर (wrap = बांधणे, या अर्थाने) कथा. या चित्रपटाबद्दल फार चर्चा का झाली नाही न कळे! चुकून कधीतरी नेटफ्लिक्सवर दिसला, कोंकोणा, श्रेयस तळपदे अशी नावं पाहून बघितला आणि चक्क आवडला.

ॲमी Mon, 11/02/2013 - 08:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ओके ओके wrap. मी rapper असा विचार केला :-D
हो फारशी चर्चा झाली नाही याची, पण जबरा आहे चित्रपट.
युट्युबवर आहे. पाहीला नसेल तर ऐसीअक्षरेकरांनी नक्की पहावा.

राजेश घासकडवी Mon, 11/02/2013 - 11:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक स्त्री स्त्रीवादी असण्याची अपेक्षा अनाठायी आहे किंवा स्त्री दिग्दर्शक मसालापट बनवणार नाही हे ही!

हे वाक्य नजरेतून सुटलेलं नव्हतं. त्यातूनही स्त्रीवादी असलेल्या प्रत्येकीने अशा प्रकारची वागणूक देणाऱ्या नवऱ्यापासून पायावर उभं रहाण्याची शक्ती आल्यावर दूर गेलं पाहिजे असा सूर दिसतो. तोच एकंदरीत खटकलेला आहे. त्याच नात्याची इक्वेशन्स बदलून रहाणं कदाचित अधिक समाधान देणारं असू शकतं. जिथे आपण मान झुकवून राहिलो तिथेच हक्काने ताठ मानेने मिरवण्यातही सुख असतं. स्त्रीवाद म्हणजे विशिष्ट वागणुकींचं एक गाठोडं आहे आणि ते खांद्यावर असलं की दुसरे पर्यायच नाहीत हा विचार कोता वाटतो.

स्त्रिया देवी असतात, सगळ्यांच्या चुका पोटा घालतात इ. संस्कृती नामक सापळ्यातून ती बाहेर आलेली बघणं रोचक वाटलं असतं.

अपराध पोटी घालणं हे दौर्बल्यातून येतं की शक्तीतून याने प्रचंड फरक पडतो.

... Mon, 11/02/2013 - 08:15

हं
थोडक्यात *समस्त
नवरेमंडळीना पडलो तरी आपलेच नाक वर याची सवय असते
तेव्हा बायकांनीच काय ते समजून घेतलेले ऊत्तम ;) :P

*समस्त नवरेमंडळीनी हलकेच घ्यावे

सविता Mon, 11/02/2013 - 11:26

मला मॄत्यूदंड मधली माधुरी आवडली होती. लक बाय चान्स मधले कोंकणा सेन चे पात्र पण!

बाकी .... शशी आणि तिचा नवरा ... यात स्त्री-पुरूष असा भेदभाव न करता, दोन माणसामधले नाते असा विचार करा ना! एखादा माणुस आवडण्यासाठी तो सर्वगुणसंपन्न किंवा सुंदर असला पाहिजे असं नाही. (असला तर छान पण तो "मस्ट" क्रायटेरिआ नाही). नात्यात तुम्ही त्या माणसाचा कितीही राग आला, तो चुकला हे माहित असलं तरी लगेच नातं तोडलंच पाहिजे असं नाही. समोर चा जर चूक मान्य करत असेल तर आपण माफ करतोच! करायला पहिजे. तोडणं, दुखावणं फार सोप्पं असतं, जोडून ठेवणं कौशल्याचे काम असते.

सरसकट फक्त स्वतःचा विचार आणि दर वेळी एक घाव दोन तुकडे.. हे मला मान्य नाही. याला मी स्त्रीवादी म्हणणार नाही, तुसडेपणा म्हणेन!

मी Mon, 11/02/2013 - 12:47

हिंदी चित्रपटातलं एकमेव(ऑल्मोस्ट) आवडलेलं स्त्री-पात्र म्हणजे चिनी-कमची तब्बू, चित्रपटाचा उत्तरार्ध वगळता उत्तम चित्रपट व तब्बूला विशेष वाव आहे. ऑल्मोस्ट ह्यासाठी कारण दुसरं आवडलेलं स्त्री-पात्र कल्की कोचलीनचं 'जिन्दगी मिलेगी ना दोबारा' मधलं. ह्याशिवाय यादी वाढेलसं वाटत नाही.

हिंग्लिश-विंग्लिश मधल्या शशीने नवर्‍याला सोडलं असतं तर चाललं असतं का? उमम.. कुटूंब-व्यवस्थेचे समन्वयवादी पाईक ह्या निर्णयाला अनुमोदन देणार नाहीत, पण माझ्यामते प्रत्येकाचा जगण्याच्या निवडींचा प्राधान्यक्रम त्या निर्णयाशी जास्त संबंधीत असेल त्यामुळे ह्याचं उत्तर हो/नाही असं निरपेक्ष देता येणार नाही, त्यामुळे १)नवर्‍याला माफ करुन आता जास्त आदर+प्रेमासहित त्याच घरात रहाण्याचा आनंद मिळवणं किंवा २)नवरा/मुलं आज खजिल झालेतं, उद्या परत माज करतील व आयुष्य परत दु:खी होईल तेंव्हा आता स्वातंत्र्य मिळतयं तर ते घेउन आनंद मिळवायचा प्रयत्न करु किंवा ३) इतर काही विचार हे शशीच्या निर्णयास जबाबदार असतील.

ऋषिकेश Mon, 11/02/2013 - 12:45

लेखा आवडला.
बरीच चर्चा झाली आहे. तेव्हा फक्त मला आवडलेल्या केवळ हल्लीच्या हिंदी चित्रपटातील काहि स्त्री-भुमिका देतो.
-- कोंकणा सेन-शर्माची ओंकारा मधील भैय्याणी (चित्रपटापेक्षाही ही भुमिका तुफान लक्षात राहिली आहे, ती करताना कोंकणाने केलेला गृहपाठ पदोपदी जाणवतो. मग ते बोलणं असो वा शिव्या देण्याचा लहेजा असो)
-- फॅशनमधील प्रियांका चोप्रा
-- भुल भुलैय्या नावाच्या एक 'टिपिकल' चित्रपटातील विद्या बालन आणि तिचे मंजुलिका हे पात्र
-- अय्या मधील राणी
-- जिंदगी ना मिलेगी दोबारा मधील कल्की कोची

बाकी यादी बरीच मोठी ठरावी ही काही पटकन आठवलेली 'मुख्य-पात्रे' तीही अगदी हल्लीच्या हिंदी चित्रपटातील

सन्जोप राव Mon, 11/02/2013 - 15:45

'खुशबू' मधील हेमामालिनी, 'मेरे अपने' मधील मीनाकुमारी, 'परिचय' मधली जया भादुरी, 'चोरी चोरी' मधली नर्गिस.. अशी बरीच मोठी यादी आहे. त्यांवर विस्ताराने लिहायलाही आवडले असते पण या धाग्यात तसे काही लिहावेसे वाटत नाही.

विसुनाना Mon, 11/02/2013 - 15:52

In reply to by सन्जोप राव

सन्जोप राव, नेकी और पूछपूछ?

या धाग्यातच लिहावे असे नव्हे. आपणासारख्या सिद्धहस्त, जाणकार, व्यासंगी, शब्दप्रभू लेखकाकडून या विषयावर लेख आले तर सोनेपे सुहागा.
वरच्या वाक्यातील आपल्याला लावलेली विशेषणे गैरवाजवी नाहीत हे अनेकजण जाणतात. त्यामुळे तुमच्याकडची यादी जितकी मोठी तितके चांगलेच आहे.

चिंतातुर जंतू Mon, 11/02/2013 - 19:46

इंग्लिश-विंग्लिशमधल्या नायिकेनं नवऱ्याला सोडायला हवं होतं की नाही यावर बरीच चर्चा झालेली दिसते. मला चित्रपटाविषयी एक साधं समीकरण मांडावंसं वाटतं. जर शेवटी ती नवऱ्याकडे परत येते असंच दाखवायचं होतं, आणि तरीही तो तिचा पराभव किंवा तिनं आपल्या आत्मसन्मानाशी केलेली ती तडजोड नाही, असं परिणामकारकरीत्या दाखवायचं होतं, तर चित्रपटातल्या सुरुवातीच्या (भारतातल्या) काळातला नवरा मुळात मनानं चांगला आहे; त्याचं त्याच्या बायकोवर प्रेम आहे; फक्त तिला इंग्लिश येत नाही त्यामुळे त्याला तिची थोडी लाज वाटते असं दाखवायला हवं होतं. पण चित्रपटात सुरुवातीला दिसणारा नवरा अगदी हलकट आणि अप्पलपोट्या वाटतो. शिवाय एक व्यक्ती म्हणून तो अगदीच कंटाळवाणा वाटतो. ह्याच्याबरोबर नायिकेला आयुष्य घालवावंसं वाटावं, आणि तरीही नायिका प्रेक्षकांना अक्कलवान वाटावी, यासाठी पटकथेत वाव हवा होता. पण प्रेक्षकांना नायिकेबद्दल सहानुभुती वाटावी यासाठी नवरा इतक्या काळ्या रंगात रंगवला आहे, की शेवटी नायिकेची इब्सेनच्या 'डाॅल्स हाऊस'मधली (१८७९) नोराच व्हायला हवी असं वाटावं. ते टाळायला हवं होतं. हा पटकथेतला दोष वाटतो.

ऋषिकेश Tue, 12/02/2013 - 09:44

In reply to by चिंतातुर जंतू

हे असे असणे अधिक वास्त्वदर्शी असावे!
प्रत्यक्षात ज्या पिढीचे प्रतिनिधित्त्व श्रीदेवी करते त्या पिढीतही 'पदरी पडले नी पवित्र झाले' या विचारसरणीतून वर्तन होताना अनेकदा आजुबाजुला दिसते. शेवटी माफ करणे हे नवरा कित्ती कित्ती छान वगैरे मुळे नसून पदरी पडले.. मुळे असावे असे वाटते. त्यामुळे तो वैट्ट दाखवूनही चालते किंबहुना तो आहे त्यापेक्षा जराही चांगला दाखवला असता तर आपल्याकडील बायकांना तिचे दु:ख नकली वाटले असते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/02/2013 - 01:51

गुलामगिरी हटवण्याबद्दल Conquest of happiness मधे बर्ट्रांड रसलने लिहीलेलं आहे, "गुलामगिरी होती तेव्हा मालक लोक सुखात होते. अनेक गोष्टींची काळजी घेण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. आता गुलामगिरी नाहीशी होत आहे. गुलामांना त्यांचं स्वातंत्र्य मिळत आहे. पण आता कोणालाच जबाबदारी टाळता येत नाही. कोणालाच पुरतं सुख नाही. आधी गुलामांना स्वातंत्र्य नव्हतं पण निदान श्रीमंतांकडे (मर्यादित अर्थाने) काही कौटुंबिक अडचणी नव्हत्या." (शब्द माझे, अर्थ त्याचा.)

कुटुंबसंस्थेच्या बाबतीतही हेच होत आहे का? स्त्रिया घराबाहेर पडत आहेत, त्यांना घरात देता येणारा वेळ कमी होत आहे, पण पुरुष पूर्वीप्रमाणेच अपत्यसंगोपन, स्वयंपाक, घरकाम इ, गोष्टी स्त्रियांची जबाबदारी समजून सोडून देत आहेत. कुटुंबसंस्था तर टिकायला हवी पण "आम्ही काहीच करणार नाही", यात शशीच्या नवर्‍याचं तिला इंग्लिश न येण्यावरून टर उडवणं सोडाच, शिकण्यासाठी प्रोत्साहन न देणंही आलंच. आणि मग ही कुटुंबसंस्था हवी म्हणून केला तिने थोडा त्याग करावा, राग-बिग आला तरी तो गिळून टाकावा; मुलांच्या योग्य संगोपनासाठी कुटुंब नको का?

शशीच्या नवर्‍याबद्दल काडीमात्र सहानुभूती नसण्याचं कारण हेच आहे. शशीला इंग्लिश शिकायचंय का, तर ते घरच्यांना आपली किंमत कळावी म्हणून; इंग्लिश शिकल्यामुळे तिचा फायदा होणार आहे म्हणून नाही. घरच्यांना तिला इंग्लिश आलेलं का आवडेल, तर तिच्यामुळे चारचौघात लाज जाते म्हणून, तिच्याशी अधिक विषयांवर गप्पा मारता येतील म्हणून नाही. घरच्यांना म्हणजे तिच्या नवर्‍याला. लहानपणापासून वडील जे करत आहेत तेच मुलांनी केलं तर मुलांचं काय चुकलं? पण व्यवस्थित इंग्लिश बोलणारी, हिंदी कमीच येणारी भाची मात्र मावशीची टर उडवत नाही, एवढंच नाही तर मावशीला इंग्लिश शिकायला प्रसंगी खोटं बोलूनही भरीव प्रोत्साहन देते. लाडू वळणं हे काम किती महत्त्वाचं आहे हा प्रश्न नसून शशीची बुद्धी, कर्तबगारी त्यात पूर्ण वापरली न जाण्याचं दु:ख आहे. नवर्‍याला शशीचा वेळ चांगला जातो म्हणून बहुदा लाडूंवर आक्षेप नाही; पण तिची कामावरची श्रद्धाही त्याला समजतच नाही. "गड्याला का नाही पाठवत लाडू पोहोचवायला?". तो कोरडा तो कोरडाच असतो.

लोराँशी शशीचे संबंध मैत्रीपलिकडे हवेतच कशाला? (म्हणजे असले तर असले, कोण कोणाबरोबर कश्या प्रकारचे संबंध ठेवतं यावरून माणसाचं महत्त्व ठरवणं अमान्यच, पण) बाई एकटी असली तर तिचं आयुष्य रिकामं असतं असाच विचार कशाला? "वात्सल्याविण अपूर्ण नारी"वगैरे काही नसते तसंच कोणी लैंगिक जोडीदारही काही एवढा महत्त्वाचा नसतो. शशीच्या वयात तर बहुदा नाहीच. ती कदाचित एकटीही राहील. लोराँ हा कॅटलिस्ट आहे तो हे समजून घ्यायला, की एवढे दिवस ज्या नवर्‍याबरोबर आपण रहात होतो त्याला आपल्याबद्दल काही संवेदनाच नाहीत. हा ठोंब्या जी वागणूक देतो, त्यापेक्षा आपली क्षमता, आपलं मूल्य बरंच जास्त आहे.

प्रतिसाद पूर्ण केला आहे.

मन Tue, 12/02/2013 - 09:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाई एकटी असली तर तिचं आयुष्य रिकामं असतं असाच विचार कशाला?
मूळ विचार "कोणतीही व्यक्ती एकटी असली तर तिचं आयुष्य काही प्रमाणात रिकामं असतं" असा विचार मांडला आणि त्यास सहमती दर्शवली; तर त्याच्याशी तुम्ही किती असहमत असाल?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/02/2013 - 11:50

In reply to by मन

हा प्रश्न अपूर्ण आहे. तरीही उत्तर बर्‍यापैकी असहमत असं आहे.

कोणाचं आयुष्य किती रिकामं आणि भरलेलं असावं हे ज्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. काहींना बाळंतपणानंतर रिकामपण येतं, काहींना रजोनिवृत्तीनंतर, काहींना नोकरीतल्या निवृत्तीनंतर. अगदी जोडीदार जिवंत असतानाही. एकटं असणं हे काही फक्त जोडीदार नाही म्हणूनच असतं असंही नाही. ओळखीतल्या काही शशीच्या वयाच्या, तिच्यापेक्षाही सिनीयर जोडप्यांकडे पाहूनही हे लोकं एकटेच आहेत असं वाटतं. एकमेकांची फक्त सवय झालेली आहे असं दिसतं; सवय यंत्रांपासून चपलांची आणि पाळीव प्राण्यांपासून जोडीदाराची, कोणाचीही आणि कसलीही होते.

अतिशहाणा Mon, 11/02/2013 - 21:36

तिच्या आयुष्यातली १२-१५ वर्ष तिने कुचंबणा सहन केलेली आहे, का तर इंग्लिश येत नाही. आणि हिचं काम पांढरपेशा नाही. या ठोंब्याने हिला सतत कमी लेखलं, मुलांसमोर हिची टिंगल केली, मुलीला आईबद्दल आदर नाही कारण बापही तसा वागत नाही. याबद्दल या ठोंब्याला फक्त काही काळापुरतं खजील वाटणं एवढंच? आणि मुलगा पडला तर हिला मात्र ही सगळी आपलीच चूक आहे असं वाटणार!
शशी नवर्‍यापेक्षा प्रत्येक बाबतीत मोठी आहे. पण मग तिची निवड एवढी खराब का? त्या ठोंब्याचं असं काय कर्तृत्त्व की त्याला एवढी हुशार आणि कर्तबगार स्त्री त्याच्या मुलांची आई म्हणून तरी मिळावी?

हे अर्ग्युमेंट थोडेसे तपासून पाहू. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटात जेवढे दाखवले आहे त्याचा पूर्वग्रहरहित दृष्टीने विचार केला तर शशीच्या नवऱ्याची वागणूक ही तिच्या इंग्लिशच्या अज्ञानापुरती मर्यादित दिसते. (शशीच्या कामाबाबतची हेटाळणी ही मूळ अडचण नसून, इंग्लिशच्या अज्ञानाशी पूरक अशी वाटते). शशीची थोरली मुलगी साधारणपणे पाचवीत वगैरे जाणारी आहे. म्हणजे तिचे वय १२ ते १३ वर्षाचे असावे. शशीच्या मुलीला समजा वय वर्षे साडेतीन किंवा चार असताना तिला प्री-स्कूलमध्ये टाकले असावे. त्यापूर्वी किंडरगार्टन किंवा माँटेसरी (अंगणवाडी व बालवाडी वगैरे) मध्ये माध्यमाचा फारसा संबंध येत नसावा. थोडक्यात शशीची इंग्लिश माध्यमातून संपर्क साधण्याची कमतरता ही, ती मुलगी प्री-स्कूल मध्ये प्रवेश घेतल्यानंतर थोडीफार दिसून आली असावी. थोडीफार अशासाठी की 'आपल्या आईला इतर आयांपेक्षा कमी इंग्लिश येते' इतपत जाणीव होण्याइतकी अक्कल शशीच्या मुलीला अगदी पहिल्या इयत्तेतच आली असे म्हटले तरी 'इंग्लिशमधून संपर्क साधण्याचे अज्ञान व त्या अनुषंगाने होणारी हेटाळणी ही ' आठ ते नऊ वर्षापेक्षा जास्त नसावी. आता ही हेटाळणी ही केवळ भाषेच्या अनुषंगानेच आहे की साधारणपणे टीनएज वयात सर्वच मुलांना आपले आईबाप हे मागासलेले वाटतात व त्यांची हेटाळणी करतात या अनुषंगाने आहे याबाबतही थोडा विचार करायला हवा. शशीच्या मुलीला जर आई आणि बापाची हेटाळणी करायचीच असली तर ती दोघांपैकी कोणाची हेटाळणी जास्त करणार हे शशीच्या मुलीच्या दृष्टीकोनातून पाहिले तर लख्ख कळेल. हे वागणे योग्य की अयोग्य याबाबत मी टिप्पणी केलेली नाही. टीनएज मुलांना 'आपल्याला अक्कल आली आहे' असे वाटू लागले की आपले आईबाप 'कूल' वाटत नाहीत हे वैश्विक सत्य आहे. मात्र त्यांना खरेच अक्कल आली की त्यातला फोलपणा कळून चुकतो. (स्वानुभव!). आता बापाने आईला लाख आदराने वागवले तरी मुलगी त्याच आदराने वागवेल अशी काहीही खात्री नाही. किंबहुना ती तशी वागवणार नाही असे बहुतेक केसेस मध्ये दिसते. त्यामुळे नवऱ्याने केलेली हेटाळणी आणि मुलीने केलेली हेटाळणी या दोन्ही स्वतंत्र गोष्टी असून दोन्हींचा संबंध लावण्यात correlation आणि causation मधली गफलत होत आहे असे दिसते.

दुसरा मुद्दा असा की शशीचे काम पांढरपेशा नाही याबाबत तिच्या नवऱ्याने तिला कमी लेखले असे आहे. त्याचे विश्लेषण आपण थोडे वेगळ्या पद्धतीने करु. शशीचा नवरा हा उच्चविद्याविभूषित आहे. आता तो स्वतः नोकरी करतो आहे की त्याची स्वतःची कंपनी आहे हे मला आता आठवत नाही, तरी चांगल्या पदावर उत्तम कमाईची नोकरी असावी असे त्याचे घर-गाडी वगैरेंवरुन वाटते. थोडक्यात शशी घरी जे लाडू वगैरे विकते त्याचा हेतू हा घराला आर्थिक हातभार लावणे हा नसून शशीचा वेळ चांगला जावा व तिला त्या छंदातून चांगला आनंद मिळावा हा आहे. या गोष्टीवर त्याचा आक्षेप असल्याचे दिसले नाही. त्याबाबत मी तरी त्याला निश्चितच क्रेडिट देईन. शशीच्या नवऱ्याने जर 'मी एवढी चांगली नोकरी करतो आणि तू गावभर दारोदार फिरत लाडू विकते' असे आर्ग्युमेंट करत तिच्या छंदावर टाच आणली असती तर तो Typical Male Chauvinist Pig आहे असे मानून, तो तिला खरंच कमी लेखतो असे मानता आले असते. आता शशीचे लाडू वळण्याचे काम खरेच हलक्या दर्जाचे आहे का? याचा विचार चित्रपटातील दोन स्त्रियांच्या दृष्टीकोनातून करूया.

एक्झिबिट अ) शशीची भाचीः ती म्हणते की 'मावशी तू इंग्लिशच्या क्लासला जा, तुझा जन्म लाडू वळण्याकरिता झालेला नाही' म्हणजे इंग्लिशच्या क्लासला जाणे हे लाडू वळण्यापेक्षा चांगल्या दर्जाचे काम आहे. इथे एका मुलीलाच लाडू वळणे हे इतर एका कामाच्या तुलनेत हलक्या दर्जाचे आहे असे वाटते. (शशीच्या नवऱ्याला काय वेगळे वाटत होते?)

एक्झिबिट ब)स्वतः शशीः शशीचा नवरा गप्पा मारताना म्हणतो की 'माझ्या बायकोचा जन्म लाडू वळण्यासाठीच झाला आहे'. हे ऐकल्यावर शशी खजील होते. कारण कदाचित तिलाही मनोमन असे वाटते की लाडू वळणे हे हलक्या दर्जाचे काम आहे. अन्यथा खजील होण्याचे काही कारण नव्हते. (शशीच्या नवऱ्याला काय वेगळे वाटत होते?)

लाडू वळणे हे अत्यंच उच्च दर्जाचे काम आहे असे माझे स्वतःचे प्रामाणिक मत आहे. मला स्वतःला लाडू वळता येत नाहीत. मात्र शशीची भाची, शशी व शशीचा नवरा या चित्रपटातील तीन प्रमुख पात्रांना ते काम हलक्या दर्जाचे वाटते व यातील दोन पात्रे स्त्रीलिंगी आहेत हा भाग मी ध्यानात आणून देऊ इच्छितो.

पुढच्या विधानावर मला आक्षेप अशासाठी आहे की 'शशी ही नवऱ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत मोठी आहे मात्र तिची निवड खराब का?' थोडक्यात She could do much better!. यात लग्नाच्या गाठी कशा ठरतात व नेहमीच अनुरूप जोडीदार मिळत नाहीत एवढे बाजूला काढले तरी शशीला थोर दाखवण्याच्या नादात तिच्या नवऱ्यावर केलेला अन्याय दिसतो. On absolute terms पाहिले तर शशीचा नवराही नवऱ्याची कर्तव्ये चोख पाळताना दिसतो. रीतसर पगार कमावून पैसे घरी आणतो. ते पैसे व्यसनात वगैरे खर्च करत नाही. बाहेरख्यालीपणा वगैरे करत नाही. त्याच्यातील न्यून काय आहे तर शशीची अस्थानी व अपमानास्पद हेटाळणी करणे हे. ही हेटाळणी अकारण नाही हे वर मी दाखवून दिले आहे.
येथे मनुष्याची वर्तणूक व मनुष्याचा स्वभाव याची गल्लत करणे योग्य नाही असे नम्रपणाने नमूद करु इच्छितो. शशीचा नवरा वाईट नाही. काही गोष्टींमधील त्याची वर्तणूक वाईट आहे. मग यावर योग्य इलाज हा ही वर्तणूक बदलणे हा आहे, व्यक्ती बदलणे हा नाही. एखादी गोष्ट दुरुस्त करता येत असेल तर ती फेकून देऊन दुसरी आणण्यापेक्षा ती दुरुस्त करणे योग्य असे मला वाटते. (Go Green!)

बरे शशीची कर्तबगारी (नवऱ्याच्या तुलनेत) खरेच अगदी डोळे दिपावी अशी चित्रपटात दाखवली आहे का? तर नाही! लाडू वळणे आणि मुले सांभाळणे हे काम असंख्य स्त्रिया करतात. अगदी नोकऱ्या वगैरे सुद्धा सांभाळून. शशी तर नोकरीही करत नाही. येथे घरकामाला कमी लेखण्याचा संबंध नाही. मात्र शशीची रेघ मोठी करण्याच्या नादात तिच्या नवऱ्याची रेघ ही रेघ नसूनच एक छोटा बिंदू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न आहे तो अमान्य आहे.

"दुसरा लाडू मिळवण्याची तुझी पात्रता नाही" असं नवर्‍याला सांगणारी मानवी शशी बघायला मला आवडली असती.

पण पण दुसरा लाडू देणे हेदेखील अमानवी नाही. जशास तसे उत्तर देणे हे जितके मानवी आहे, तितकेच 'मला हा गुन्हा इतका महत्त्वाचा वाटत नाही त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष करते' हेदेखील तितकेच मानवी आहे. यात अपराध पोटात घालणे वगैरे मोठे शब्द वापरण्याइतके काही नाही.

पण चित्रपटात सुरुवातीला दिसणारा नवरा अगदी हलकट आणि अप्पलपोट्या वाटतो. शिवाय एक व्यक्ती म्हणून तो अगदीच कंटाळवाणा वाटतो

नवरा हलकट आणि अप्पलपोट्या वाटणे हा दृष्टीकोनाचा फरक असावा. मला नवरा हलकट किंवा केवळ स्वतःपुरते पाहणाला (अप्पलपोट्या किंवा स्वार्थी) असा वाटला नाही. शिवाय प्रत्येकच व्यक्ती ही रंगेल किंवा कलास्वादात रस घेणारी हवी हा अट्टाहासही अनाकलनीय आहे. एक typical सर्वसामान्य वाटणारी व्यक्ती जशी असेल तसाच तो रंगवला आहे.

याशिवाय त्या फ्रेंच पात्रासाठी (Eye Candy) नवऱ्याला सोडणे वगैरे मला पटत नाही. शशीच्या प्रती त्याचे आकर्षण हे केवळ platonicच आहे असे वाटत नाही. थोडेफार शारीरिक आकर्षणही असावे. त्यामुळे नवऱ्याला सोडून न देता 'catalyst' म्हणून (माझा अंदाज adultery) त्याचा वापर करणे अनैतिक आहे असे मला वाटते. आणि नवऱ्याला सोडून द्यायचे तर त्यात कायदेशीर अडचणी आहेत. इंग्लिश न येण्याबाबतची हेटाळणी या मुद्द्यावर घटस्फोट मिळाला तरी त्या फ्रेंच पात्राचे व्हिसा स्टेटस नक्की माहीत नाही. मात्र जर तो एच-१ वर असेल तर शशीचे स्टेटस एच-४ (म्हणजे पुन्हा डिपेंडंट) वगैरे होईल. त्यामुळे त्याच्या रेस्टारंटमध्ये लाडू वळण्याशिवाय शशीला फारसे दुसरे काही जमेल असे वाटत नाही. त्याचे इंग्लिशचे तुटपुंजे ज्ञान लक्षात घेता त्याच्याकडे ग्रीनकार्ड असावे असे वाटत नाही. शिवाय उद्या शशीला फ्रेंच येत नाही म्हणून तो व त्यांची भावी मुले हेटाळणी करणारच नाहीत असे नाही.

अतिशहाणा Tue, 12/02/2013 - 02:09

In reply to by बॅटमॅन

आमचे अनेक मानलेले गुरु आहेत. माझ्यासह अनेकजण त्यांना गुरुच मानत आलेले आहेत. ते सर्वच मला शिष्य मानतात की ते माहीत नाही. (हशा!) मात्र या गुरुंपैकी एका गुरुंच्या प्रतिसादांचा अभ्यास करुन त्या शैलीची केवळ नक्कल करण्याइतपतच आमची मजल. :)

मात्र यात कोणीही अफजल गुरु नव्हेत! (येथे टाळ्या)

मन Tue, 12/02/2013 - 09:26

In reply to by अतिशहाणा

गेल्या दहा हजार वर्षात असा प्रतिसाद कुणी दिला नसेल.
ह्याने पतीचीही बाजू व्यवस्थित मांडल्याने ह्याला "अतिशहाणा" नव्हे तर "पतीशहाणा" अशी पदवी आम्ही देत आहोत.

रुची Mon, 11/02/2013 - 22:42

हिंदी सिनेमातल्या मला आवडलेल्या स्त्रीपात्रांच्या शोधासाठी मला पार जुन्या काळात जावे लागले. 'अनुराधा' नावाच्या चित्रपटातली लीला नायडूची भूमिका फार आवडली होती. त्यात सुरवातीची सधन वडिलांची लाडकी कन्या, उत्तम गायिका, धेय्यवादी डॉक्टरच्या प्रेमात पडलेली, वडिलांच्या मर्जीविरुद्ध लग्न करणारी अल्लड तरुणी आणि नंतरची एका मुलीची आई, नवर्याच्या दुर्लक्षाने कंटाळून गेलेली, कलेपासून फारकत झाल्याने विझून गेलेली संसारी स्त्री त्याकाळाच्या मानाने फार सुंदर रंगवलेली आहे. शिवाय त्यातली बलराज सहानीची भूमिका ही काही शशीच्या नवर्याइतकी एकाच रंगात रंगविलेली नव्ह्ती. तो पूर्वी तिच्या प्रेमात पडला असला तरी नवरा झाल्यावर तिला गृहित धरणारा आणि स्वतःच्या धेय्यांपुढे, आदर्शांपुढे तिला कमी महत्व देणारा होता. हे करताना तो खलपुरुष न वाटता एक सामान्य नवरा वाटतो जो आपल्या योग्यतेपेक्षाही उजवी स्त्री सहभागिनी म्ह्णून मिळाल्यावर तिला गृहित धरतो आणि तिच्यापुढे चूल आणि मूलचे आयुष्य वाढून ठेवतो.
त्या चित्रपटातही अनुराधा थांबते पण तिच्या थांबण्यामागे केवळ असहायता नसते, असते ते आपल्या नवर्याबद्दलचे प्रेम त्याचे गुणदोष माहित असतानाही. ती थांबते ते या जाणिवेने की त्याने तिला गृहित धरणे जितके चुकीचे होते तितकेच तिने त्याच्या आयुष्यापुढे आपल्या स्वत्वाचा त्याग करणे आणि आपल्या कलेला पायदळी तुडवणे ही चुकीचे होते. त्यामुळे त्याच्याबरोबर थांबूनही आपल्या संगिताच्या खोलीची झाडलोट करणारी नायिका मला फार आवडून गेली होती.
कोणत्याही गोष्टीकडे एकाच प्रकारच्या चष्म्यातून पाहिले की फक्त आपल्याला हवे तसेच जग दिसायला लागते, मग तो चष्मा स्त्रीवादाचा असो, पर्यावरणवादाचा असो, जातीवादाचा असो किंवा वंशवादाचा असो. ह्या सार्या॑ गोष्टींच्या जाणिवा असणं जितकं महत्वाचं आहे तितकंच एकाच गोष्टींना अनेक अंगांनी तपासणंही आहे.
अवांतर: मला 'इंग्लिश विंग्लिश'च्या नवर्याला लाडू देण्याच्या प्रसंगापेक्षा 'मुलगा पडला आणि त्याला लागलं म्हणजे आपण चांगली आई नाही आहोत असं समजून क्लासला जाणे सोडण्याच्या महामूर्खपणाचा प्रसंग जास्त वैतागवाणा वाटला. केवळ आत्मविश्वास आला म्हणजे ती आपला संसार तोडेल किंवा नवऱ्याला फटकारेल वगैरे अपेक्षा तिच्या पात्राकडून करणे म्हणजे मला आपला स्त्रीवाद तिच्यावर थोपण्यासारखं वाटतं. ती एक मध्यमवर्गीय, काहीशी परंपरागत, कुटुंबवत्सल स्री आहे पण ती सुद्न्य आणि हुषार आहे असे तिचे पात्र आहे, त्याच्याशी प्रामाणिक रहाण्यात दिग्दर्शकाची चूक आहे असे वाटत नाही पण मुलगा पडला म्हणून तिने स्वत:ला निष्काळजी आई समजण्याच्या प्रसंग दिग्दर्शकाने फारच "तडजोड" केल्यासारखा वाटला.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/02/2013 - 12:16

In reply to by रुची

अनुराधा यूट्यूबवर संपूर्ण सापडला. सव्वा दोन तासांची क्लिप आहे.
http://www.youtube.com/watch?v=fsnW1vV6d1w

जरूर पहाते.

क्रेमर Tue, 12/02/2013 - 00:10

'सूरज का सातवां घोडा' या चित्रपटातील जवळजवळ सर्व स्त्रीपात्रे आवडली होती. बर्‍याचदा स्वतःला उचलून धरून पुरूषांचे खुजेपण अधोरेखित करणारी स्त्रीपात्रे आवडतात.

Nile Tue, 12/02/2013 - 01:54

थोडासा रुमानी हो जाए मधली अनिता आपल्याला जाम आवडली होती ब्वॉ! बाकी सगळं जाऊंद्या, गाडी खाली जाऊन रिपेअर करणारी पोरगी इज सो रोमांटीक! अशी एखादी भेटली तर आम्ही दोघं जोडीने गाडी खाली जाऊ, रिपेअरींगला!!

चिंतातुर जंतू Tue, 12/02/2013 - 10:27

>>त्यातली बलराज सहानीची भूमिका ही काही शशीच्या नवर्याइतकी एकाच रंगात रंगविलेली नव्ह्ती. तो पूर्वी तिच्या प्रेमात पडला असला तरी नवरा झाल्यावर तिला गृहित धरणारा आणि स्वतःच्या धेय्यांपुढे, आदर्शांपुढे तिला कमी महत्व देणारा होता. हे करताना तो खलपुरुष न वाटता एक सामान्य नवरा वाटतो जो आपल्या योग्यतेपेक्षाही उजवी स्त्री सहभागिनी म्ह्णून मिळाल्यावर तिला गृहित धरतो आणि तिच्यापुढे चूल आणि मूलचे आयुष्य वाढून ठेवतो.
त्या चित्रपटातही अनुराधा थांबते पण तिच्या थांबण्यामागे केवळ असहायता नसते, असते ते आपल्या नवर्याबद्दलचे प्रेम त्याचे गुणदोष माहित असतानाही. ती थांबते ते या जाणिवेने की त्याने तिला गृहित धरणे जितके चुकीचे होते तितकेच तिने त्याच्या आयुष्यापुढे आपल्या स्वत्वाचा त्याग करणे आणि आपल्या कलेला पायदळी तुडवणे ही चुकीचे होते. त्यामुळे त्याच्याबरोबर थांबूनही आपल्या संगिताच्या खोलीची झाडलोट करणारी नायिका मला फार आवडून गेली होती.

मार्मिक प्रतिसाद आणि इथे 'अनुराधा'ची 'इंग्लिश विंग्लिश'शी तुलनाही मार्मिक आहे, कारण तीमधून 'इंग्लिश विंग्लिश'च्या पटकथेचा सर्वसामान्यपणा उघडा पडतो.

अनुराधा१९८० Wed, 13/02/2013 - 11:04

हा विषय वाचुन, मला ही कोणा स्त्री पात्रा बद्दल लिहावे असे वाटत होते पण खुप विचार करुन ही एक ही डोक्यात आले नाही. :-(

मयुरा Thu, 14/02/2013 - 04:35

लेख आवडला,

मला स्वःताला सॅटर्डे नाईट लाईव्ह ह्या दर शनिवारी रात्री लागणार्‍या निखळ मनोरंजनात्मक कार्यक्रमातील -टिना फे, एमी पोलर,क्रिस्टन व्हिग, नसीम पेद्राद ह्या आणि ह्यांसारख्या अनेक अतिशय गुणी अभिनेत्री खूप भावतात. त्या अभिनेत्री आवडण्यामागे त्या पूर्ण कार्यक्रमाची कथा,मांडणी, पात्रयोजना आणि विषय हा सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणावा लागेल. पण त्याही पलिकडे जाउन प्रत्येक पात्र कमालीची विनोदबुध्हीची चुणूक दाखवत,कुठेही तोल न ढळु देता, समरसतेने भुमिका साकारताना बघणे हि एकदातरी अनुभवावी.

-मयुरा

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 14/02/2013 - 10:43

तीन धाग्यांवर चालेल असा प्रतिसाद एकत्रच देते.

'ईस्ट इज ईस्ट' या ब्रिटीश-आयरिश चित्रपटात एक पाकीस्तानी नवरा - ब्रिटीश बायको आणि त्यांचं कुटुंब यांचं आयुष्य चित्रित केलेलं आहे. ओम पुरीने या पाकीस्तानी पुरुषाचं काम केलेलं आहे. आपली मुलं पुरेशी पाकीस्तानी असावीत म्हणून त्याचा जीवाचा आटापिटा सुरू असतो. तो करूण विनोद सगळ्या भारतीयांना कदाचित फार आवडणार नाही पण देसी लोकांचं निरीक्षण करणार्‍या भारतीयांना फार आवडेल. नवर्‍याने मुलांना आपले निर्णय घेऊ न देण्याबद्दल शेवटी त्याची ब्रिटीश बायको ठाम भूमिका घेते. नवर्‍याशी प्रचंड भांडण होतं तेव्हा त्याला "आत्ता निघून जा" असं स्पष्ट शब्दांत सांगते. राग आला तर उगाच देवी-बिवी भूमिका न घेता, सरळ माणसाप्रमाणे त्याला रात्रभर फिश-अँड-चिप शॉपमधे झोपायला लावते. दुसर्‍या दिवशी ती पुन्हा त्याला चहा पाजते तरीही ती मला आवडली.

ओम पुरीचे मँचेस्टरी-पाकीस्तानी इंग्लिश फारच मजेशीर आहे. इंग्लिशचे हे मँचेस्टरी उच्चार आणि कनिष्ठ मध्यमवर्गाची "ब्लडी-बास्टर्ड" भाषाही मजेदार आहे. जेफ्री बॉयकॉटची कॉमेंटरी ज्यांना समजत नाही त्यांनी सबटायटल्स वापरून चित्रपट बघावा. आगरी किंवा दख्खनी बोलीला जसा विनोदी बाज आहे तसाच या उच्चारांमधेही आहे.

'सध्या काय पाहिलंत'चा दुसरा धागा तसाही भरलेला आहे, आता तिसरा धागा सुरू करायला हरकत नाही.

ऋषिकेश Thu, 14/02/2013 - 12:29

कोण त्या न बघितलेल्या व्हॅलेन्टाईनपेक्षा मधुबालाचा जन्मदिवस म्हणून आज प्रेमदिन पाळावा असे नेहमी वाटत आले आहे.
असो.
इथे ५० हिरवणींचे फटु बघता येतील