विमा नव्हे, मनःशांती
"मनाची उभारी आणि आर्थिक शांतता याचा परस्परसंबंध वेगळा सांगायलाच नको. आर्थिक आघाडीवर सगळं व्यवस्थित असेल तर डोकं किती शांत रहातं. त्यातून आजच्या धकाधकीच्या जीवनात ... हा शब्दप्रयोग आलाच पाहिजे बरं का, नाहीतर फाऊल समजला जातो... वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव असतात. आपण ते सगळे टाळू शकत नाही. काहींचं फारतर व्यवस्थापन करता येतं. या ताणतणावांमुळे होणारे रक्तदाब, मधुमेह, त्वचारोग असे वेगवेगळे विकार मनुष्याचा कुरतडून कुरतडून जीव घेतात. यातले काही तणाव आपण जरूर दूर करू शकतो. मुख्य म्हणजे आर्थिक तणाव. लहानपणापासूनच आपल्या मध्यमवर्गीय, मराठी घरांमधे बचतीचं महत्त्व शिकवलं जातंच. जरी अगदी नोकरीच्या सुरूवातीच्या वर्षांत शिल्लक बाजूला काढणं शक्य झालं नसेल तरीही हरकत नाही. एकदा का विमा काढला की कसलीही चिंता नाही." पूजा हेमाला समजावून सांगत होती. "अगं हेमे, विमे विकणं तसं सोपं नाही. पण आपण मध्यमवर्गीय लोकांसाठी विमा एजंट बनायचं. उगाच श्रीमंतांच्या मागे जायचं नाही किंवा गरीबांवरही वेळ खर्च करायचा नाही. या मध्यमवर्गीय लोकांना सगळं तोलूनमापून करायला आवडतं. आपणही नाही का अशाच घरांमधे रहात? आपल्याला कसली भीती वाटते, तीच भीती आपल्यासारख्या इतरांनाही वाटते. त्याच भीतीचा थोडा आणखी मोठा बागुलबुवा करायचा आणि विकायची आणखी एक पॉलिसी. त्यासाठी काही कळीचे शब्द आहेत. आजकाल लोकं चमत्कार वगैरे शब्दांना भुलत नाहीत. सगळ्यांना शाळेत विज्ञान शिकवलं जातंच. तसं आजकाल एक गोष्ट फक्त एकच गोष्ट करते असं सांगून लोक भुलत नाहीत. विमा हा फक्त आर्थिक स्थैर्यासाठी नसून मनःशांतीसाठी आहे, असं म्हटलं की अर्ध काम होतंच. मनःशांती हा आजचा मोठा कीवर्ड आहे गं. हे आजूबाजूचे फॅन्सी जिम पहातेस ना? मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत जिथे जाऊन वजनं कमी करतात, तिथेही आजकाल योगा आणि कपालभाती वगैरे विकतात. मनःशांतीसाठी लोकं फार कष्ट घेतात आजकाल. आज विकली जाणारी वस्तू म्हणजे मनःशांती."
गेले काही महिने हेमाला काहीतरी वेगळं करायचं होतं. आपल्यात आणखी काही नवीन कौशल्य आहे का ते आजमावायचं होतं. आणि पूजाशी हा विषय काढल्यावर तिने लगेच "तू रॉकेट सिंग बन. तो 'सेल्समन ऑफ द इयर' झाला, तू 'विमा एजंट ऑफ द इयर' होऊ शकतेस. मी आहे ना तुला हे सगळं शिकवायला!" आज त्यांच्या ट्रेनिंगचा पहिलाच दिवस होता. विमा का, कशासाठी याच्याशी हेमाचा काहीही संबंध नव्हता. "पण म्हणून काय बिघडलं?", पूजाने ट्रेनिंग सुरूच ठेवलं. "तू काय विकत घेतलं आहेस, का विकत घेतलं आहेस याला महत्त्व नाही. आता तू गोल्ड फेशियल घेतलंस काय आणि घरच्याघरी साय तोंडाला चोपडून दुपारी लवंडलीस काय, तू आणि तुझी बेस्ट फ्रेंड, म्हणजे मी, वगळता तिसर्या कोणालाही फरक समजत नाही. विम्याचंही तेच आहे. तू कोणती पॉलिसी घेतली आहेस, त्याचा तुला काय फायदा होतो हे महत्त्वाचं नाही. तू ते कसं मांडते आहेस याला महत्त्व आहे. जमाना जाहिरातीचा आहे, dear!"
"विमा घेणार्या लोकांचा खरंच काय, किती आणि कसा फायदा होतो किंवा होईल याची काही गणितं तरी दाखव गं. कोणी विचारलं तर अगदीच तोंडघशी नको पडायला!!" हेमाच्या शंका कमी होण्याची काहीही लक्षणं दिसत नव्हती. हे पाहून पूजाला आणखी उत्साह चढला. "हे पहा हेमा, गणितं काय करायची आहेत? मला सांग, तू आणि तुझ्या नवर्याचा विमा आहे ना? त्यातून तुझं डोकं शांत रहातं ना! मग झालं तर. विमा हा फक्त विमा नाही, विमा ही डोक्याची शांतताही आहे. आत्ता पहा तू, मध्यमवयीन आहेस. या वयात अयोग्य जीवनपद्धतीमुळे किती काय-काय होतं हे तुला माहित्ये ना! समजा उद्या तुला किंवा नवर्याला आला एखादा हार्टअटॅक, आणि त्यातून नोकरी गेली तर? म्हणजे, तुझं असं व्हावं असं नाही, पण कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं ना? असं झालं तर पोरांच्या शिक्षणाचं काय? तुमच्या म्हातारवयाच्या देखभालीचं काय? आणि ही सगळी काळजी आत्ता काही झालेलं नसतानाच नको का करायला? परवाच तुला सांगते, माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्याला आला ना हार्टअटॅक. त्यातून तो खासगी कंपनीत नोकरीला. तिथे विमा काढलेला होता म्हणून सगळं औषधपाणी व्यवस्थित झालं गं. तसा तो म्हणे फार जाडा आहे आणि म्हणे सिग्रेट, दारू, खाण्यावर ताबा नाही ... सगळंच. हे मी तुला म्हणून सांगत्ये गो. पण समजा असं काही आपल्यालाही झालं तर?"
हेमाचा चेहेरा थोडा चिंताक्रांत झाला. नुकती दहावी-बारावी झालेली पोरं तिच्या डोळ्यासमोर आली. "बघ, तुलाही वाटली ना काळजी पोरांची! मी काय म्हणते, तू आणखी एखादी पॉलिसी का घेत नाहीस? तुझी पॉलिसी वाईट आहे असं नाही. पण तुझ्या पॉलिसीत एकदाच काय ते पैसे मिळणार आणि मग पुढे काय? उद्या व्याजाचा दर आजच्याएवढा चढा असेल याची काही खात्री नाही. मग त्या रकमेचा हवा तसा उपयोगही होणार नाही. तू त्या जोडीला एखादी पेन्शन पॉलिसी का घेत नाहीस? हे पहा, आपल्याकडे चार प्रकारच्या पॉलिस्या आहेत. एक म्हणजे तुझी आहे तशीच, एकरकमी हातात पैसे मिळतील. म्हणजे उद्या एखादा हृदयविकाराचा झटका वगैरे आला तर त्याची रक्कम उपचारासाठी वापरता येईल. पण ती संपल्यावर पुढे काय? दुसरी आहे ती पेन्शन पॉलिसी. ती अशा वेळेला उपयोगी आहे. यात आत्ता दरमहा पैसे टाकायचे आणि निवृत्तीनंतर दरमहा पैसे घ्यायचे. आत्ता तू दरमहा जेवढे टाकशील, तेवढेच पैसे तुला पुढे वापरायलाही होतील. घरखर्चही कसा वाढतो आहे या महागाईत तू पहाते आहेसच."
हेमाच्या चेहेर्यावर पुन्हा एक प्रश्नचिन्ह आलं. "पूजे, पण माझी सरकारी नोकरी आहे. अलिकडे लागलेल्यांना पेन्शन मिळणार नाही, पण मला मिळेल. ग्रॅच्युईटी आणि फंडही आहेच. शिवाय आमची सरकारी आरोग्यविमा योजना निवृत्तीनंतरही आहेच की!" पूजाकडे उत्तर बहुतेक तयारच होतं. "ते बरोबरच आहे. मी हे विसरलेच. पण तू एक सांग, उद्या तुम्ही लोकं कुठे गावी जाऊन राहिलात तर तिथे थोडीच तुझा सरकारी डॉक्टर हृदयविकारावर उपचार करणार आहे? अशा वेळेस तुला पॉलिसी नको का?" हेमाने मान्य करण्यासारखी फक्त मान डोलावली. पूजाने ट्रेनिंग पुन्हा सुरू केलं. "तिसरी पॉलिसी आहे ती मुलांच्या शिक्षणाची. आजकाल शिक्षण किती महागडं झालंय नाही! आपल्याकाळी असं नव्हतं. आपण तर अगदी फुकटातच शिकलो म्हण, शिवाय आपल्या पदव्या हातात मिळायच्या आतच आपल्या नोकर्या सुरू झाल्या. पोरांचं असं नाही ना. आता शिक्षणासाठी पैसे ओता, पुन्हा एवढं करून नोकरीची हमी नाहीच. आणि नोकरी मिळाली तर त्यांना थोडीच पेन्शनेबल नोकरी मिळणारे? म्हणून ही तिसरी अपत्य-शिक्षण पॉलिसी. आणि चौथी आहे ती सगळ्यात सुंदर स्कीम आहे. यात आपण आपलं घर गहाण ठेवायचं. आजकाल हे रिव्हर्स मॉर्गेज असतं ना तसंच. पण त्याशिवाय आत्ता थोडे पैसे भरले की आपल्यामागे मुलांना घर एक वर्ष ठेवता येतं! पोरांची चिंता म्हणून नाही गं कशी!"
"अगं पण पोरांची काळजी आ..." हेमाची वाक्य तोंडातच राहिली. "हे बघ, मी तुला ट्रेनिंग दिलेलं आहे. तू विमे विकून तर पहा. विकल्याशिवाय तुला कळणार कसं तुझ्यात हे कौशल्य आहे का नाही ते! आपण थोडीच विम्याची गणितं शिकायला-शिकवायला बसलो आहोत? आपल्याला मतलब कशाशी आहे, डोक्याला असणार्या शांततेशी. तुला नवीन काहीतरी करून मनःशांती मिळेल, लोकांना आर्थिक स्थैर्य विकत घेण्यातून. तेवढी मनःशांती मिळाली की काम झालं. विम्यातून त्यांचा आणि विक्रीतून तुझा काही आर्थिक लाभ झाला तर झाला, उत्तमच आहे. पण मनःशांती मिळाली हे काय कमी वाटतं का काय तुला? या मन:शांतीअभावी आज किती लोकांना तरूण वयात रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह होतात तुला माहित आहे ना! तुम आम खाओ, गुठलियां क्यू गिनती हो?"
हेमाचा चेहेरा थोडा खुलला. "लोकं मानतील का गं हे?" तिने शेवटची शंका विचारून घेतली. पूजा तयारीचीच असावी, "अगं, हीच वाक्य तिथेही वापरायची. मोठमोठ्या actuaries नी याची क्लिष्ट गणितं केलेली आहेतच असं सांगायचं. गणिताचं नाव काढलं की बहुतेक लोकं शंका घेत नाहीत ना!"
परवा स्टॉपवर बसची वाट पहात बसले होते तेव्हा हा संवाद कानावर आला. हेमा आणि पूजा कोण हे मला माहित नाही. स्टॉपवरच्या अन्य प्रवाशांची आणखी किती माहिती काढायची?
एकदम झकास
एकदम झकास लेख.
रॅशनल लोकांनी विमा घेण हे कसे वैज्ञानिक दृष्टीकोणात बसते ही पण त्यात भर घालता येईल. अनिश्चिततेचे नियोजन करण्यासाठी अन्य कोठलीही योजना उपलब्ध नाही.सगळा हवाला देवावर व दैवावर ठेउन चालणार आहे का? बघ बाई हेमा तू जर खरी रॅशनल असशील ना तरच विमा घेशील. नाहीतर हे सगळे हप्त्याचे पैसे बाबा बुवांच्यावर उधळणार्या लोकांपैकी तू एक ठरशील.
ह्यवरून आठवलं....
ग्रुपमध्ये एकजण तावातावाने चर्चा करीत भविष्यात होणारी प्रत्येक गोष्ट, अगदि तपशीलवार, granular level details मधे आधीच कशी जाणता येते ह्याबद्दल बोलत असे. असे अजूनही काही लोक होते. भविष्य जाणता येत असूनही आणि आपण स्वतः दीर्घायू अस्लयाची खात्री असल्याचे सांगणार्या ह्या मंडळींनी नक्की हेल्थ इन्शुरन्स काय नि टर्म इन्शुरन्स काय ; नक्की का घेतले ते आजतागायत समजू शकलो नाही.
+१
युलिपसारखे गुंतागुंतीचे प्रॉडक्ट्स अधिकाधिक विकून मनःशांती मिळते ती ते विकणार्यालाच. घेणार्यासाठी ते सर्वोत्कृश्ट प्रॉडक्त कधीच नव्हतं.
शेप्रेट, वेगावेगळे, शुद्ध टर्म इन्शुरन्स आणि फुल्ल फ्लेज्ड गुंतवणुकीच्या हिशेबानं बनलेला सोपा सुटसुटित मुच्युअल फंड घेणं बकवास युलिप प्रॉडक्ट घेण्यापेक्षा कधीही चांगलं.
फंड कुठला चांगला हे मात्र तुमचा अभ्यास आणि इतर घटकांवरून ठरवावं लागेल. फ्रँकलिन टेम्प्लटन पासून ते hdfc top 200 पर्यंत बरेच आहेत. अवांतर होइल म्हणून इथेच थांबतोय.
झकास.....
वास्तवादी म्हणू की मार्मिक ह्या विचारात आहे.
फक्त पात्रांची नावं बदलली तर ह्याच धाटणीचे संवाद कित्येकदा कानावर आदलत असतात.
स्थैर्य आणि स्थैर्य गमावण्याचं भय दोन्ही माणूस एकाचवेळी प्राप्त करत असावा.