Skip to main content

Belle de jour - स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध

लुईस बुन्युएलचा एक चित्रपट बघून डोक्यात फारच गोंधळ झाला होता. त्यातून आमच्या दोन नंबरच्या गुर्जींना तो फार आवडतो हे म्हटल्यावर या बुन्युएलबद्दल अधिकच कुतूहल जागृत झालं. बुन्युएलची चित्रपट बनवण्याची शैली अतिवास्तववादी (surreal) प्रकारची आहे. तसे त्याचे काही स्पॅनिश आणि फ्रेंच चित्रपट वास्तववादीही आहेत. पण उतारवयात (बहुदा पुरेशी प्रसिद्धी, पैसा मिळाल्यानंतर) त्याने त्याला आवडतील असेच चित्रपट बनवले असावेत. 'बेल द्यु जुर' हा ही उतारवयात बनवलेला एक अतिवास्तववादी चित्रपट. धार्मिक रूढींखाली दबलेल्या, पण तरीही स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेऊ पहाणार्‍या एका स्त्रीची ही गोष्ट.

चित्रपटात काय घडतं हे विकीपीडीयावर आहे. तरी थोडक्यात सांगायचं झालं तर सेव्हरीनचं तिच्या नवर्‍यावर प्रेम आहे पण त्याच्याशी तिचे शारीरिक संबंध ती टाळते. नवरा तरीही तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. याची तिच्या मनात भीती, गंड आहे. ती भीती आणि त्याच वेळेला शारीरिक संबंधांबद्दल तिला असणारं कुतूहल तिला स्वप्नांमधे दिसत रहातं. सभ्यपणाबद्दल तिच्या डोक्यात काही ठराविक, साचीव कल्पना धर्मामुळे घट्ट बसलेल्या आहेत. शारीरिक संबंध, उपभोग घेणं ही काही वाईट गोष्ट आहे, स्त्रीने चारचौघांसमोर शालीनता दाखवली पाहिजे हे स्त्रीचे आदर्श तिच्या डोक्यात घट्ट बसलेले आहेत. जे कोणी या आदर्शांचं पालन करणार नाहीत ते सगळे वाईट लोक आहेत असं मत. तिच्या लहान वयात कोणीतरी तिच्याबरोबर दुर्वर्तन (मॉलस्टेशन) केलेलं आहे. शारीर संबंध वाईट, त्यांची इच्छा धरू नये, ते करणं पाप अशी विचारसरणी एकीकडे धार्मिक शिक्षणातून तिच्या डोक्यात घट्ट बसलेली आहे; ती स्वतःला अपवित्रही समजते. पण मनाई केलेली गोष्ट मुद्दाम करून बघावी अशी अनिवार ओढही तिला आहे.

ओळखीतली एक स्त्री वेश्येचं काम करते या बातमीमुळे तिच्या डोक्यात असणारं शारीरसंबंधांबद्दल असणारं आकर्षण उफाळून येतं. पण प्रत्यक्षात नवर्‍याबरोबर आपल्या स्वपीडक लैंगिक इच्छांची पूर्तता करण्याऐवजी, त्याच्यासोबत धार्मिक, नीतीमान स्त्री असाच व्यवहार करत दुसरीकडे ती एका वेश्यालयाचा रस्ता धरते. नवर्‍याला यातलं काही समजू नये म्हणून ती फक्त दिवसाच काम करणार असं म्हणते आणि बनते 'दिवसाची सुंदरी', belle de jour.

'बेल द्यु जूर' हा स्वपीडक स्त्रीच्या लैंगिकतेचा शोध आहे. स्त्रियांना सामान्य आयुष्यातच पुरुषावर सत्ता गाजवता येत नाही; धार्मिक स्त्रीला नाहीच नाही. मग वेगळं स्वपीडन कुठून येणार? हा गोंधळ आणखी वाढतो कारण आपल्याला नक्की काय हवं आहे याची कल्पनाही सेव्हरीनला नसते; मग आपल्या लैंगिक मागण्या पुरुषासमोर मांडणं आणखीनच दूरचं. पण सेव्हरीन स्वप्नात आणि प्रत्यक्षात वेश्यालयात तिच्यावर प्रेम करणार्‍या पुरुषावर सत्ता गाजवून आपली सत्ता गाजवण्याची इच्छा पूर्ण करते. अनुभवातून परिपक्व होत जाते आणि लैंगिक संबंधांमधे पीडेतूनही तिला आनंद होईल तेवढीच पीडा ती मिळवते. ही पीडा लैंगिक अत्याचाराच्या अगदी विरूद्ध आहे; तिचा त्यावर ताबा आहे. वेश्यालयातल्या नोकरीमुळे तिला जे काही हवं असतं ते सगळं मिळतं; अनेक पुरुषांच्या चित्रविचित्र फँटसीजमुळे ती सर्व प्रकारचे लैंगिक अनुभव उपभोगते. लहानपणापासून तिच्या डोक्यात भिनवलेली गोष्ट, सुखोपभोगामुळे शिक्षा होईल, ती तिला कधीच भोगावी लागत नाही.

सेव्हरीन आणि तिच्या नवर्‍याचे वेश्यालयातल्या अनुभवामुळे शारीर संबंध सुखकर होतात. स्वप्न पाहून आनंद मिळवण्याची तिला काहीच आवश्यकता रहात नाही. तेव्हा तिचा वेश्यालयातला प्रियकर तिच्या नवर्‍यावर गोळ्या झाडतो; त्यात तो अपंग होतो. प्रत्येक गोष्टीसाठी तो तिच्यावर अवलंबून आहे. त्याच्या एका मित्राला हिच्या वेश्यालयातल्या नोकरीबद्दल माहिती आहे. तो तिच्या नवर्‍याला हे सांगतो. नवर्‍याच्या दृष्टीने सेव्हरीन आता धार्मिक, नीतीमान स्त्री नाही. सेव्हरीनला पुन्हा स्वप्न पडायला सुरूवात होते.

'बेल द्यु जूर' हा स्त्रीवादी चित्रपट नाही; सेव्हरीन एकदाही आपण स्त्री असण्याबद्दल, स्वपीडक असण्याबद्दल अभिमान बाळगत नाही. तरीही एका स्त्रीच्या लैंगिकतेवर आधारित आहे. एखादी गोष्टी चांगली-वाईट असं काही न म्हणता, बुन्युएल (नेहेमीप्रमाणे) लोकांच्या वागण्याबोलण्यातलं द्वैत दाखवतो; या चित्रपटात धार्मिक स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दलचं! आपल्या आजूबाजूलाही अशा स्त्रिया दिसतात. पुरुषांसमोर फार तोंडही उघडत नाहीत पण बायका-बायकांच्या गप्पा सुरू झाल्यानंतर स्त्रियांच्या पॉर्नोग्राफीत काय असू शकेल याची पुरती कल्पना येते. प्रत्यक्षात पॉर्नोग्राफी न पहाता, हे नक्की काय असेल याबद्दल कुतूहल असेल तर कलात्मकरित्या बनवलेला 'बेल द्यु जूर' नक्की आवडेल.

अवांतरः चित्रपटावर स्पेनमधे त्या काळी बंदी होती. बुन्युएल मूळचा स्पॅनिश. फ्रान्स-स्पेन सीमेलगतचे स्पॅनिश लोकं फ्रेंच शहरांमधे जाऊन हा सिनेमा बघत होते. त्यामुळे तिथे हा चित्रपट खूप चालला. पण त्यातल्या बहुसंख्य लोकांची 'निराशा' झाली. स्त्रियांच्या लैंगिकतेच्या मुद्द्याभोवती फिरणार्‍या चित्रपटात काहीही 'मसाला' नाही.

नंदन Tue, 23/04/2013 - 04:59

आवडली. चित्रपट मिळवून पहायला हवा. स्पेन आणि फ्रान्स ह्या दोन देशांच्या सीमेलगतच्या कातालान संस्कृतीचा, शिष्टतेच्या संकेतांतील फरकाचा व तिथल्याच दालीसारख्या सरिअलिस्ट कलाकारांचा; बुन्युएलच्या कारकीर्दीवर वा चित्रपटांच्या विषयाच्या निवडीवर कसा प्रभाव पडला, हे जाणून घेणे रोचक ठरावे.

जयदीप चिपलकट्टी Tue, 23/04/2013 - 05:02

> त्यातून आमच्या दोन नंबरच्या गुर्जींना तो फार आवडतो हे म्हटल्यावर ...

गुरुजी एकूण किती आहेत आणि त्यांचा अग्रक्रम कसा ठरवला जातो यावर काही प्रकाश पडू शकला तर बरं होईल. हे नंबर काळ्या दगडावर लिहिलेले आहेत की साबणावर? त्यांच्यापैकी एखाद्याची बौद्धिक घसरण झाली (उदाहरणार्थ, व. पु. काळे आवडू लागले) तर क्रम खाली जाऊ शकतो का? किंवा उलट म्हणजे रशियन भाषा शिकणे, ग्रेस कळणे पण नावडणे, गायत्री चक्रवर्ती वाचून जगाविषयी नवी दृष्टी लाभणे, असं काही झाल्यास क्रम वधारतो का?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/04/2013 - 05:33

In reply to by जयदीप चिपलकट्टी

गुरु-शिष्य ही परंपरा व्यक्तीपूजेच्या पठडीतली असल्यामुळे एकदा गुर्जी म्हटला की तो नेहेमीच गुर्जी असतो. गुर्जींचा क्रम सध्यातरी गुर्जी बनवण्याच्या कालानुसारच ठरलेला आहे. त्यात कोणत्याही प्रकारची उच्चनीचता (सध्यातरी) नाही. (ओरिगिनल) गुर्जींची गुर्जी ही पदवी फार प्रसिद्ध झाल्यामुळे दोन नंबरच्याला गंड आल्याचं दिसलं; म्हणून मुद्दाम त्याच्या गुर्जीपणाची जाहिरात केली.

रशियन भाषा शिकणे, ग्रेस कळणे पण नावडणे, गायत्री चक्रवर्ती वाचून जगाविषयी नवी दृष्टी लाभणे, असं काही झाल्यास क्रम वधारतो का?

नाही. मुळात गुर्जी झाल्यास क्रमाबद्दल विचार करण्यात येईल.

तळटीपः गुरुजी आणि गुर्जी याच्यात कृपया गल्लत करू नये.

अवांतरावर अवांतरः कवितास्पर्धेच्या निकालाचं काय?

Nile Tue, 23/04/2013 - 05:51

In reply to by जयदीप चिपलकट्टी

गुरुजी एकूण किती आहेत आणि त्यांचा अग्रक्रम कसा ठरवला जातो यावर काही प्रकाश पडू शकला तर बरं होईल.

हे एक फार कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे, ते समजावून सांगायला तुमचा एकदा क्लास घ्यावा लागेल. ;-)

(आद्य शिष्य)

तर्कतीर्थ Tue, 23/04/2013 - 11:09

In reply to by जयदीप चिपलकट्टी

किंवा उलट म्हणजे रशियन भाषा शिकणे, ग्रेस कळणे पण नावडणे, गायत्री चक्रवर्ती वाचून जगाविषयी नवी दृष्टी लाभणे, असं काही झाल्यास क्रम वधारतो का?

:)

जीए आवडत नाहीत. वुडहाऊस कळत नाही असं जाहिर केल्यावर बरेच जण झुरळासारखं झटकून टाकतात.

तिरशिंगराव Tue, 23/04/2013 - 19:46

अशा विषयावरचे वास्तववादी सिनेमे आपल्या देशांत चालायला (म्हणजे लोकांनी स्वीकार करायला)अजून किती वर्षे लागतील?
परीक्षण आवडले. मिळवण्याचा प्रयत्न करतो.

चिंतातुर जंतू Tue, 23/04/2013 - 19:54

>>अशा विषयावरचे वास्तववादी सिनेमे आपल्या देशांत चालायला (म्हणजे लोकांनी स्वीकार करायला)अजून किती वर्षे लागतील?

बासु भट्टाचार्य यांनी 'आस्था' नावाचा एक (माझ्या मते भयाण!) चित्रपट काही वर्षांपूर्वी दिग्दर्शित केला होता. त्याची कहाणी ह्याची भ्रष्ट नक्कल होती. त्यात जागतिकीकरणावर काही भाष्य केलं होतं.

ॲमी Wed, 24/04/2013 - 12:30

रोचक वाटतोय.
आस्थाची कथा मैत्रीणीकडुन ऐकलेली. तीने शेवट वेगळा सांगीतलेला.
लेखाच्या शिर्षकावरुन 'एवढ्यात काय पाहीलत' धाग्यातला एक प्रतिसाद आठवला. Jeanne Dielman, 23 Quai du Commerce, 1080 Bruxelles (1975) आई, मुलगा यांची संथ दिनचर्या, आई दुपारी वेश्याव्यवसाय करत असते आणि एक दिन अचानक...

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 24/04/2013 - 19:07

'साहेब, बिवी और गँगस्टर' हा चित्रपट लैंगिकतेबद्दल नाही. या चित्रपटात ही तीन मुख्य पात्र आहेतच; त्याशिवाय बीवी गँगस्टरला सिड्यूस करते, लैंगिकतेचा वापर करून घेते; तिची लैंगिकता हे मध्यवर्ती नाही, पण एक पात्र म्हणून वापरलेलं आहे म्हणायला हरकत नाही. ही बिवी, आपला नवरा साहेब आणि 'ज्ञात' जगासमोर मानसिक रुग्ण म्हणून सहानुभूती मिळवत रहाते. पण गँगस्टरचा वापर करवून घेण्यासाठी लैंगिकतेचा वापर करते. शेवटी येनकेन प्रकारेण ती सर्वेसर्वा बनते. तिला सोयीचे असणारे लोक जगतात, गैरसोयीचे ठरणारे मरतात. आणि या सगळ्यात तिला अजिबात कसलीही शिक्षाही होत नाही.

"Jeanne Dielman ..." ग्रंथालयात आहे; बघून कळवते.

मस्त कलंदर Wed, 24/04/2013 - 19:52

वेगळा चित्रपट दिसतोय.
साहब बिवी... पहिल भाग पाहिलाय, रिटर्न्स पाहाणं अजून बाकी आहे.

चिंतातुर जंतू Thu, 25/04/2013 - 00:14

'बेल द जूर'ला अनेक पदर आहेत. उदाहरणार्थ :
- दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असलं तरी त्यांची परस्परांविषयीची मतं सत्यावर आधारलेली असतीलच असं नाही. उदा : सेव्हेरिन 'बेल द जूर' झाल्यानंतर तिच्याशी शरीरसंबंध सुधारतात हे नवऱ्याला आवडतं, पण त्यामागचं खरं कारण (तिचं वेश्या असणं) तिनं त्याच्यापासून लपवून ठेवलेलं असतं.
- शरीरसुख आणि प्रेम एकाच व्यक्तीकडून मिळावं ही अपेक्षा अवाजवी आहे, पण लोक ही गल्लत करतात. प्रेम नवऱ्यावर आणि शरीरसुख वेश्यागृहातल्या प्रेमिकाकडून ही परिस्थिती सेव्हेरिनच्या दृष्टीनं सर्वोत्तम आहे, पण वेश्यागृहातल्या प्रेमिकाचं तेवढ्यानं समाधान होत नाही (आणि कदाचित नवऱ्याचंही होणार नाही).
- शरीरसुखासाठीच्या किंवा प्रेमातल्या आपल्या जोडीदारानं आपल्याशीच एकनिष्ठ रहावं ही अपेक्षादेखील अवाजवी असते, पण बऱ्याच लोकांच्या दु:खाचं मूळ ह्या मालकी हक्काच्या अपेक्षेत असतं.
- स्वपीडन आणि कॅथॉलिक धर्म ह्यांचा फार मोठा परस्परसंबंध आहे. मुळात क्रूसावरचा ख्रिस्त हीच स्वपीडन दर्शवणारी प्रतिमा आहे (तुमच्या पापांसाठी तो मेला!). सर्व शारीर आनंदांना पाप ठरवणारी कॅथॉलिक शिकवण त्यात भर घालते. इथे सेव्हेरिनचं धार्मिक असणं आणि स्वत:वर फ्रिजिडपणा लादणं हे एक प्रकारचं स्वपीडन म्हणता येईल. नंतर ती शरीरसुखाचा आनंद घ्यायला लागते तेव्हा वेगळं स्वपीडन चालू होतं. नंतर नवरा पांगळा होणं आणि त्यातून आलेलं अपराधीपण (तुझ्या पापांमुळे तो पांगळा झाला!) हे आणखी वेगळं स्वपीडन. हे पाहता या ना त्या प्रकारे स्वपीडन हेच तिचं भागधेय आहे आणि त्यातून तिची सुटका नाही असं दिसतं. हा एक प्रकारचा स्त्रीवाद म्हणता येईल. आणि ह्या सगळ्या स्वपीडनांमधलं तिच्या दृष्टीनं सगळ्यात चांगलं स्वपीडन हे शरीरसुखात असणं ही कॅथॉलिक धर्मालाच दिलेली एक चपराक म्हणता येईल.

बॅटमॅन Thu, 25/04/2013 - 00:23

In reply to by चिंतातुर जंतू

मी पिच्चर पाहिला नसल्याने माझा प्रश्न अज्ञानमूलक आहे याची जाणीव ठेवूनच विचारतो:

स्वपीडनापासून सुटका नाही आणि शरीरसुख हेच स्वपीडन दाखवून कॅथलिक धर्माला चपराक हे तसं सुसंगत वाटतंय, पण स्वपीडनातून सुटका नसण्याचा स्त्रीवादाशी संबंध काय? की त्यासाठी पिच्चर बघावा लागेल?

मी Fri, 26/04/2013 - 11:43

In reply to by चिंतातुर जंतू

आणि ह्या सगळ्या स्वपीडनांमधलं तिच्या दृष्टीनं सगळ्यात चांगलं स्वपीडन हे शरीरसुखात असणं ही कॅथॉलिक धर्मालाच दिलेली एक चपराक म्हणता येईल.

'चांगल?' हे नीटसं कळलं नाही, कॅथॉलिक धर्माप्रमाणे शरीरसुखासाठी स्वपीडन करणं पाप मानलं जातं असं ऐकलं आहे.

राजेश घासकडवी Fri, 26/04/2013 - 19:03

In reply to by चिंतातुर जंतू

प्रतिसाद खूपच आवडला. विशेषतः

हे पाहता या ना त्या प्रकारे स्वपीडन हेच तिचं भागधेय आहे आणि त्यातून तिची सुटका नाही असं दिसतं. हा एक प्रकारचा स्त्रीवाद म्हणता येईल. आणि ह्या सगळ्या स्वपीडनांमधलं तिच्या दृष्टीनं सगळ्यात चांगलं स्वपीडन हे शरीरसुखात असणं ही कॅथॉलिक धर्मालाच दिलेली एक चपराक म्हणता येईल.

हा भाग.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/04/2013 - 00:53

त्यातून आलेलं अपराधीपण (तुझ्या पापांमुळे तो पांगळा झाला!) हे आणखी वेगळं स्वपीडन.

यात पूर्णतः तिचं स्वपीडन असावं असं वाटत नाही. तिला एकंदरच नक्की काय हवंय, काय करायचंय हे समजत नाही. 'गुड गर्ल' बनलेली असताना तिला हेन्री आवडत नाही. पण त्याच्याकडूनच तिला वेश्यालयाचा पत्ता मिळतो आणि ती तिथेच जाते. तो तिच्याशी फ्लर्ट करतो ते तिला 'गुड गर्ल' म्हणून आवडत नाही; पण त्याच्याबरोबर असण्याचं तिला स्वप्नात मात्र दिसतं. तो क्लायंट म्हणून येतो तेव्हा सुरूवातीला हे तिला आवडत नाही, पण नंतर ती त्याच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी तयार होते. तिचा गोंधळ निस्तरत नाहीच.

---

बॅटमॅनः या डीव्हीडीच्या कव्हरमधे फक्त या चित्रपटाच्या संदर्भात बुन्युएलची मुलाखत आहे. त्याला प्रश्न विचारला की "कशावरून सेव्हरीन ही मध्यमवर्गीय, धार्मिक, पापभीरू स्त्री आहे जी पार्टटाईम वेश्येचं काम करते? कशावरून ती मुळातली वेश्या असून पार्टटाईम पापभीरू स्त्रीची भूमिका जगत नाही?" बुन्युएल म्हणतो, "तुम्हाला हव्या त्या दृष्टीकोनातून तुम्ही त्याकडे बघू शकता. तिला जी स्वपीडक स्वप्न पडतात ती खरी सेव्हरीन आणि बाकीचं सगळं स्वप्न असंही मानता येईल." (वास्तविक ही स्वप्न एवढी विचित्र (bizzarre) आहेत की ते प्रत्यक्षात घडतं असं वाटणार्‍या मनुष्याचा मेंदू थोडा हललेला असला पाहिजे असं वाटलं.) बुन्युएल चित्रपटातल्या कलाकारांसोबतही पात्रांची मानसिकता वगैरेची चर्चा करत नसे. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरं त्याच्या मुलाखतीमधूनही कितपत मिळतील याबद्दल शंका आहे.

मुद्दा एवढाच की चित्रपट स्वतः पहा; इथे न लिहीलेलं आणि तरीही त्यात दाखवलेलं चित्रपटात बरंच काही आहे; आणि हे सगळं दाखवण्याची शैलीही फारच मजेशीर आहे.

चिंतातुर जंतू Fri, 26/04/2013 - 13:05

>>स्वपीडनातून सुटका नसण्याचा स्त्रीवादाशी संबंध काय?

स्त्री जेव्हा आपलं भागधेय आपल्या ताब्यात घेऊ पाहते तेव्हा पुरुषांना त्याचा त्रास होतो. मग तिला येनकेनप्रकारे पीडा देणं हा त्यांचा सूड घेण्याचा मार्ग असतो. इथे नवऱ्यावर प्रेम आणि शरीरसुखासाठी घराबाहेर जाणारी नायिका स्वेच्छेनं आत्मपीडा करून घेते तेव्हा ती ह्याला आव्हान देते. म्हणजे ती इतरांच्या मर्जीनुसार स्वत:ला पीडा करून घेत नाही, तर स्वत:च्या मर्जीनुसार करून घेते. पण मग तिच्या आयुष्यातल्या (नवरा सोडून) इतर दोन पुरुषांना ते सहन होत नाही. त्यातला एक नवऱ्यावर हल्ला करतो आणि त्याला कायमचं पांगळं करतो, तर दुसरा तिच्या विवाहबाह्य वर्तनाची नवऱ्यापाशी कागाळी करतो. आता ह्या सगळ्यामुळे तिला जो त्रास होतो, तो तिच्यावर लादलेला असतो; स्वेच्छेचा नाही. म्हणजे ती इतकी पीडित ठरते की पीडेचं भागधेय आपल्या मर्जीनुसार राबवण्याचं स्वातंत्र्यसुद्धा तिला लाभत नाही.

बॅटमॅन Fri, 26/04/2013 - 13:10

In reply to by चिंतातुर जंतू

म्हणजे ती इतकी पीडित ठरते की पीडेचं भागधेय आपल्या मर्जीनुसार राबवण्याचं स्वातंत्र्यसुद्धा तिला लाभत नाही.

हे जरा विचित्र वाटत नाही का? पीडेचं भागधेय आपल्या मर्जीनुसार राबवण्याचं स्वातंत्र्य नाहीतरी कोणाला मिळतं? बाकी कळ्ळं थोडंसं का होईना.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 26/04/2013 - 20:21

In reply to by बॅटमॅन

स्त्रियांच्या बाबतीत बहुतेकदा हे स्वातंत्र्य त्या सोडून बाकीचेच त्यांनी काय करायचं हे ठरवतात. धर्मातून आलेली बंधनं ही सुद्धा स्त्रियांवर जास्त, सक्तीच्या किंवा मर्जीने ठेवलेल्या लैंगिक संबंधांमधेही पुरुष स्त्रीवर सत्ता गाजवतो. दु:ख मिळवण्यासाठी स्त्रीला वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे स्त्रियांचं स्वपीडक असणं थोडं गुंतागुंतीचं होतं. स्वपीडक पुरुष असेल तर तो सरळच भूमिकेची अदलाबदल करणे, स्त्रियांना/स्त्रीला त्याच्यावर सत्ता गाजवायला सांगणे असं करू शकतो. (असंही एक दृष्य चित्रपटात आहे. त्यात वरचं सामाजिक स्थान असणारा पुरुष वेश्यांना त्याच्यावर सत्ता गाजवायला सांगतो.)

सेव्हरीन स्वपीडक आहे आणि किती दु:ख तिला हवं आहे हे ती ठरवते. वेश्यागृहातला तिचा प्रियकर (तिच्यावर प्रेम करणारा) गुंड आहे, पण ती त्यालाही, मनाविरोधात वागलास तर सोडून जाईन, अशी धमकी देते. लैंगिक संबंधांत असं स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही. (हा फ्रेंच चित्रपट १९६७ सालचा आहे.)

बॅटमॅन Sat, 27/04/2013 - 00:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांच्या पीडेबद्दलची गुंतागुंत वगैरे स्वपीडनाबद्दल थोडं ठीक आहे, जण्रल पीडेबद्दल लागू पडत नाही. असो.

बाकी

सेव्हरीन स्वपीडक आहे आणि किती दु:ख तिला हवं आहे हे ती ठरवते. वेश्यागृहातला तिचा प्रियकर (तिच्यावर प्रेम करणारा) गुंड आहे, पण ती त्यालाही, मनाविरोधात वागलास तर सोडून जाईन, अशी धमकी देते. लैंगिक संबंधांत असं स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही. (हा फ्रेंच चित्रपट १९६७ सालचा आहे.)

यावरून पिच्चरमध्ये तरी तिला पीडेचे भागधेय ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे किंवा तिने मिळवलेय असे दिसतेय. शेवटचे जण्रल वाक्य सध्यापुरते सोडून देऊ. पण मग जंतू म्हणताहेत त्याला हे कौंटर जातंय.

चिंतातुर जंतू Fri, 26/04/2013 - 15:35

>>पीडेचं भागधेय आपल्या मर्जीनुसार राबवण्याचं स्वातंत्र्य नाहीतरी कोणाला मिळतं?

हे काहीसं आत्महत्येचा किंवा इच्छामरणाचा हक्क माणसाला असण्यासारखं आहे. किंवा, आयुष्य वेदनादायी आहे हे गृहितक म्हणून घेतलं, तर माझी पीडा मी निवडू शकत असेन तर इतरांमुळे पीडा भोगायला लागणाऱ्या एखाद्यापेक्षा मी अधिक स्वतंत्र आहे असं तरी म्हणता येईल.

चिंतातुर जंतू Sat, 27/04/2013 - 10:42

>>यावरून पिच्चरमध्ये तरी तिला पीडेचे भागधेय ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे किंवा तिने मिळवलेय असे दिसतेय.

हा सेव्हेरिनच्या बाजूनं चित्रपटातला उत्कर्षबिंदू म्हणता येईल, पण शेवटी तिला ह्याची किंमत चुकवावी लागते. ती मी वर म्हटल्याप्रमाणे असते. वास्तव दु:खद झाल्यावर सेव्हेरिनला पुन्हा स्वप्नांचा आधार घ्यावा लागतो.

जुई Fri, 14/06/2013 - 08:50

'सुखोपभोगामुळे शिक्षा होईल'ही भावना फारच प्रबळ असते . विशेषता बायकांना याचे बाळकडूच दिले जाते . अगदी मनाजोगे खायला , ल्यायला घेण्यापासून ते लैंगिक सुखापर्यंत. आजकाल बदल होत असतील तरी लैंगिक सुखाच्या बाबतीत बोलणे अजूनही तसे निषिद्धच आहे . हा चित्रपट जरूर बघयला हवा . धन्यवाद .