नेतृत्व : एक तौलनिक (म्हणजे उगीच केलेलं) विश्लेषण!

अलिकडे आम्हांस वारंवार दिल्लीस जावे लागते. प्रांतिक खड्ड्यांपासून राष्ट्रीय खड्ड्यांपर्यंतचा हा आमचा प्रवास सोपा नव्हता. मात्र, प्रांतिक खड्डे जेवढे खोल तेवढे राष्ट्रीय खड्डे समजायला सोपे असतात. भाषा, पाणी, जमीन, राहणी यांच्या राज्यवार कडबोळ्यातून राष्ट्रव्यापी प्रश्न तयार होतात. नदी दिसली की तिला अडवावे हे माणूस प्रगती करता करता शिकला. कॉलेजात असताना मुरकत चाललेल्या एखाद्या प्रकरणास अडवावे ही अंतःप्रेरणा आमचीही होतीच की! स्त्री गुणधर्माच्या वस्तूंस अडवावे ही परंपरागत पुरुषी गुणधर्म आहे. सांगायची गोष्ट म्हणजे भाषा, जमीन इ. स्त्रीलिंगी वस्तूंच्या मालकी हक्कावरून किंवा मालकी हक्क प्रस्थापित झाल्यावर वापर करण्याच्या पद्धतीवरून वाद उभे राहणे हे नेहमीचेच आहे. पाऊस हा 'तो' असल्याने कदाचित अशा वादांतून सुटला असावा.नाहीतर कदाचित 'आमच्या इथूनच हे ढग पुढे गेले आणि तुमच्याकडे पाऊस पडला. तेव्हा तुमच्या पाण्यावर आमचाही हक्क आहे' वगैरे युक्तिवाद ऐकू आले असते. असो.

प्रांतिक प्रश्नांचे हे अर्थातच एक प्रातिनिधिक चित्र आहे. बाकी मग पूर्ववैमनस्यातून होणाऱ्या खून-मारामाऱ्या, फसवणुकीचे प्रकार, भारतीय कुटुंबव्यवस्थेचा मानदंड असलेले कौटुंबिक कलह, सुनांचे छळ, सार्वजनिक बेशिस्त, लहान मुलं आणि बालसंगोपनाचे प्रश्न, कुमारवयीन मुलं आणि पौगंडावस्थेतील प्रश्न, तरुण मुलं आणि तारुण्यातील प्रश्न, विवाहित जोडपी आणि कौटुंबिक (यात एकत्र आणि विभक्त असे दोन प्रकार आहेत) प्रश्न, मध्यमवयीन जनता आणि जनरेशन गॅपचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिक आणि एक्सटेंडेड जनरेशन गॅपचे प्रश्न आणि या सगळ्या प्रश्नांना छेद देणारा आरोग्य आणि लोकसंख्येचा प्रश्न हे सगळे भिडू आलटून पालटून राज्य घेतच असतात. यातूनही वेळ काढून लोक सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यातूनच मग प्रायोगिक रंगभूमीचे प्रश्न, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे प्रश्न, वाङमय प्रकारांच्या श्रेष्ठत्वाचे प्रश्न, कलाकारांच्या मानधनाचे प्रश्न, कलेतील सामाजिकतेचे प्रश्न, मराठी कविता (कविता काढून कथा, कादंबरी, नाटक, विनोद काहीही बसू शकेल) - काल, आज आणि उद्या ही चर्चा अशी प्रश्नांची गंगाजळी वाढतच जाते.

मात्र या साऱ्यांना पुरून उरणारा प्रश्न आहे तो नेतृत्वाचा. आम्हांला दिल्लीला वारंवार का जावे लागत आहे हे आता सूज्ञ वाचकांच्या लक्षात येऊ लागले असेल. नेतृत्व हे कुणा ऐऱ्या-गैऱ्याचे काम नव्हे. नेतृत्व आणि नृत्य यांच्यात किंचित नामसाधर्म्याप्रमाणे इतरही काही साम्यस्थळे आहेत. मात्र नेतृत्वात नृत्यदिग्दर्शन जास्त महत्वाचे असते. नृत्य स्वतःला जमत नसले, प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा अतिस्वास्थ्यामुळे उचलाल ते पाउल कपाळमोक्षी ठरत असेल तरी दुसऱ्याला आपल्या तालावर नाचवता आले की तुम्ही नेतृत्वास लायक होता.

महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्वाला विधानसभेची आणि विधानसभेतील नेतृत्वाला दिल्लीची वाट दाखवण्यामागे आमचा फार मोठा सहभाग आहे हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो.याबाबतीत आम्हांला जास्त रहस्यभेद करता येणार नाही. परंतु एका परिचित कथेचा आधार घेऊन आम्हांला यावर थोडा अधिक प्रकाश टाकता येईल. कृष्ण पहुडलेला असताना दुर्योधन अज्ञानमूलक वर्तनाचे उदाहरण देत त्याच्या उशाशी बसला. अर्जुन त्याच्या पायाशी बसला. कृष्ण उठल्यावर त्याने अर्जुनाला प्रथम पाहिले आणि मागणीचा पहिला अधिकार त्याला दिला. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे. थोडक्यात, पायाशी बसलेल्यांना सर्व काही आणि डोक्याशी (किंवा त्याच्यावर) बसलेल्यांना काही नाही हा साधा नियम लक्षात ठेवला तरी पुरेसे आहे.

काळाचा महिमा अगाध आहे. त्यापुढे रथी-महारथी फिके पडतात हे आपण जाणताच.काळाबरोबर सर्व काही बदलतं. माणूसही बदलतोच. कितीही नाही म्हटलं तरी हे सूक्ष्म सत्य नाकारता येत नाही. नेतृत्वही त्याला अपवाद नाही. 'ओल्ड स्टाईल' नेतृत्व आज उपयोगाचं नाही. सूतकताई, सामुदायिक प्राथर्ना वगैरे नॉन-ग्लॅमरस उपक्रम आज कोण राबवेल? (उपोषणाला मात्र बरे दिवस आले आहेत!) सुभाषचंद्र बोसांचे धडाडीचे नेतृत्वही आज बिनकामाचे. गणवेश चढवून भल्या पहाटे आता फक्त पहिल्या पाळीचे कामगार जातात. शिवाय फ्रंटवर जायची आफत कोण ओढवून घेईल? जी काही मर्दमुकी गाजवायची ती गल्लीत. स्थानिक बसेसची तोडफोड, जाळपोळ, महानगरपालिकेत धुडगूस, परप्रांतीयांना मारहाण इ. कार्याला काय कमी शौर्य लागतं? टिळकांची स्टाईल तर भलतीच अवघड. नेतृत्व करणारा फावल्या वेळेत गणितं सोडवू शकतो, भूगोलाचा अभ्यास करतो हे ऐकून आज लोक हसून गडाबडा लोळतील. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येणारं आणि स्वतःच्या वाढदिवशी चौकातल्या फ्लेक्सवर टांगून घेण्यात धन्यता मानणारं नेतृत्व गणित सोडवणं तर सोडाच, पण चारचा पाढा तरी म्हणू शकतं का अशी शंका काही संशायात्मे काढतील. पण यात गुणवत्तेचा प्रश्नच नाही, ही नेतृत्वाची नवीन स्टाईल आहे एवढंच आम्ही म्हणू. डॉ. आंबेडकर तर फारच कालबाह्य. त्यांनी एकट्यानीच एवढा अभ्यास करून ठेवला आहे की त्यांच्या अभ्यासाचा अभ्यास करता करताच नवीन नेतृत्व थकून जातं. मग 'नेतृत्व' कधी करणार? अभ्यास, निष्ठा, राजकारणाआधी व्यवस्थेचा विचार वगैरे टाकाऊ कल्पनांचा वारसा पुढे लालबहादूर शास्त्रींसारख्या काही मंडळींनी चालू ठेवायचा व्यर्थ खटाटोप केला.एवढी गांधी टोपी डोक्यावर चढवूनही वाऱ्याची बदलती दिशा शास्त्रीजींच्या लक्षात येऊ नये म्हणजे कमाल झाली! जेपी, विनोबा भावे, एसेम जोशी, नाथ पै या व अशा काही मंडळीनी स्वातंत्र्योत्तर काळात स्वतःची इस्टेट वाढवायची सोडून गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद वगैरेंच्या वेगवेगळ्या रेसिपीज लोकांना समजावण्यात वेळ खर्ची घातला. एकूणात नेतृत्व आणि नृत्य यातील अद्वैत लक्षात न आल्याने भल्या जाणत्या मंडळींकडून याबाबतीत चुका झाल्या आहेत.

नव्या नेतृत्वाला आम्ही कायम हे अद्वैत समजावून द्यायचा प्रयत्न करीत असतो. शिवाय त्यांना हेही सांगत असतो की बाबांनो, दिवस थीम बेस्ड आहेत. सगळे कार्यक्रम, चर्चा यांना एक थीम हवी. परवाच आम्हांला आमच्या बिल्डींगमधल्या एका मुलाने (हा फक्त झोपताना फेसबुक मिटवून ठेवतो. बाकी मग दात घासायला सुरुवात केल्यापासून फेसबुक उघडं असतं) 'देशभक्ती' या थीमवर त्याच्या फेवरेट नाईट क्लबमध्ये 'वॉर ऑफ डीजे' रंगणार आहे असं सांगितलं. थोडक्यात प्रत्येक गोष्टीला थीम हवी. नेतृत्वालाही थीम लागते आणि टार्गेट लागतं. थीम पॉप्युलर लागते आणि टार्गेट सॉफ्ट लागतं. (उदा. मुंबईतला व्यावसायिक भैय्या. एकेकाळी तमिळ अण्णा हे टार्गेट होतं. ते आता बदललं. चालायचंच. नेतृत्वात महत्वाचं एकच. लोकांनी तालावर धरलेला नाच. ताल महत्वाचा नाही. तो बदलू शकतो. नाच थांबता कामा नये.) आणि या दोन्हीच्या माध्यमातून भरमसाठ भावनिक आव्हानं करता यायला हवीत. भारतीय आणि भावना यांचं एक अतूट नातं आहे. डोळ्यात पाणी आणून एखाद्याने गोठ्यातल्या बैलाला प्रसूतिवेदना सुरु झाल्या आहेत असं सांगितलं तर जनता पाणी घेऊन धावेल. बुद्धीवादी भारत (आणि महाराष्ट्र) पुस्तकातून दिसतो. प्रत्यक्षात दिसणं अवघड. असो.

तर सांगत होतो थीमबद्दल. आधुनिक भारतात (जाम शब्द आहे!) नेतृत्वाच्या थीम्स बऱ्यापैकी विकसित झाल्या आहेत. तळागाळातला माणूस ते महालातला माणूस - सगळे थीमवर खेचता येतात. याबाबतीत आम्ही राज्य नेतृत्वाला आणि राष्ट्रीय नेतृत्वाला वेळोवेळी सल्ले देत असतो. (आगामी लोकसभेसाठी अडवाणी यांनी आमच्याशी आत्तापासूनच पत्रव्यवहार सुरु केला आहे.)

तळागाळातला माणूस एकेकाळी गांधी-आंबेडकरांवर विश्वास ठेवायचा. त्यांचे एकमेकांशी मतभेद असले तरी 'माणसं चांगली आहेत' असं त्याचं त्यांच्याविषयी मत होतं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी गेले आणि गांधीवादी उरले. मग आंबेडकर गेले आणि आंबेडकरवादी उरले. कालांतराने फक्त 'वादी'च उरले. तळातला माणूस तळातच राहिला. वादी मंडळींनी राजकीय भविष्याकडे नेणाऱ्या थीमच्या शिड्या पकडल्या.

तळागाळातून थोडं वर आलं की चौपाटी लागते. तिथे मध्यमवर्ग नावाचा एक वर्ग असतो.कार्ल मार्क्स यांचा हा विशेष आवडता वर्ग. मध्यमवर्ग मधूनच किनाऱ्यावरच्या बंगल्यांकडे बघतो आणि मधूनच समोरच्या गाळाकडे. बंगल्यात तर जायचं आहे, पण समोरच्या गाळाचं काय करायचं? या वर्गाचं असं होऊ लागलं की काही वादी येतात. त्यांचं या वर्गाला ठासून सांगणं असतं की तुम्ही ठाम राहिलं पाहिजे. अस्तित्व, परंपरा, अस्मिता, अभिमान असे शब्दही ते वापरतात. या शब्दांत बऱ्याच वेळ गटांगळ्या खाल्ल्यावर या वर्गाला दमायला होतं. अस्मिता जपायला ऑफिस अवर्स नंतरच जमेल या विचाराने चौपाटीवर भेळ खाऊन झगमगलेल्या बंगल्यांकडे बघत हा वर्ग घरी येतो आणि पंख फुल ऑन करून झोपतो.

नेतृत्व हे या सगळ्यांचं करायला लागतं. त्यातल्या त्यात बंगले बांधून असणारा वर्ग जरा वेगळा असतो. कारण तिथे पैसा असल्याने त्यांची मन रमवायची ठिकाणंही वेगळी असतात. 'वादी' मंडळींच्या थीममध्ये त्यांना रस नसतो. अस्तित्व, वेगळेपण, ठसा, अस्मिता वगैरे बाळसेदार मंडळींना झोपवायला अखेरीस पैसा नामक पाळणाच लागतो हे सत्य त्यांनी ताडलेले असते.

पण म्हणून नेतृत्वाचं महत्व कमी होत नाही. गावोगावी विखुरलेल्या असंख्य अशिक्षित, सुशिक्षित बेरोजगारांची फौज हाताशी धरून तिला एका तालावर झुलवत ठेवायची कसरत सोपी नव्हे. शिवाय शासनपद्धती जरी लोकशाहीची असली तरी पक्षशासनाची पद्धत शीर्षासनाची ठेवावी लागते. कारण डोकं आहे तिथे ठेवून पक्षाशी बांधील राहणं कठीण. पक्षाला कार्यकर्त्याच्या डोक्यापेक्षा हातापायांची जास्त गरज असते. एक उदाहरण बघा -

पक्ष : साहेब येणार आहेत दौऱ्यावर. कार्यक्रम जंगी व्हायला हवा.
कार्यकर्ता अ : करू की. जंगी कार्यक्रम करू. इवेंट मॅनेजमेंटची शेपरेट विन्गच हाय की आपली.
कार्यकर्ता ब : माणसं किती लागतील सभेला? बजेट काय?
कार्यकर्ता क : पण साहेब कशावर बोलणार आहेत?

'क' चा प्रश्न गैरलागू आहे. 'अ' आणि 'ब' ला पदोन्नतीचे चान्सेस आहेत. पक्षाच्या थिंक टँकना पडलेल्या भेगा बुजवणारे पक्षाला नको असतात. मग गळत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांची चलती असते.

नेतृत्वाचं हे असं आहे. 'गंदा है पर धंदा है' च्या चालीवर बोलायचं झालं तर 'गलत है पर मतलब है'!

सांप्रतचा महाराष्ट्र आणि भारत बघता नेतृत्वाच्या 'हजारे'पणामुळे नेतृत्वाच्या 'हुजरे'पणाला आळा बसेल अशी एक आशा व्यक्त करण्यात येत आहे. या एकूणच परिस्थितीविषयी आम्ही चिंतन करत आहोत. पानिपतच्या पराभवापासून ते आजवर दिल्लीच्या सिंहासनाकडे डोळे लावून बसलेल्या मराठी माणसाचे आशास्थान जे की शरदराव पवार यांनीही हजारे गुरुजींच्या जंतर मंतरचा धसका घेतल्याचे आम्हांला समजले. दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी नाशिकच्या द्राक्षांच्या वाईनचे घुटके घेता घेता खुद्द साहेबांनीच ही भीती आमच्यापाशी बोलून दाखवली. द्राक्षं, क्रिकेट, मुळशी खोरे विकास या आवडीच्या प्रांतातून जमेल तसा वेळ काढून शेतीच्या प्रश्नातही लक्ष घालणारे आणि
माँटेकसिंगांच्या बाजूला खुर्ची टाकून प्लॅनिंग कमिशनच्या मिटींगा गाजवणारे साहेब किंचित हताश झालेले बघून आम्हांला गलबलून आलं. वास्तविक आमच्या मागच्याच बैठकीत आम्ही त्यांना 'क्रिकेट वगैरे ठीक आहे, पण नृत्याचे धडे घेत जा. परदेशी आहे म्हणून साल्सा नको असं करू नका. जमत असेल तर तो शिका' असं सुचवलं होतं. मात्र एकूण शारीरिक आवाका लक्षात घेता ते शक्य होणार नाही हे समजून घेऊन मग आम्ही त्यांना 'जमल्यास एखाद्या डान्स शोचे परीक्षक तरी व्हा' असं सुचवलं होतं. पण आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केल्याने लोक आज अण्णासाहेबांच्या तालावर ठेका धरत आहेत हे वर्तमान आहे. (आम्हांला असंही वाटतंय की महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा शारीरिक आवाका तर दिल्लीच्या सिंहासनाच्या वाटेवर आडवा येत नाही ना? आम्ही या संदर्भात नितीन गडकरींना लवकरच पत्र पाठवणार आहोत. अयोध्येच्या रामापेक्षाही नागपूरच्या हल्दीरामाशी त्यांचे सख्य अंमळ जास्त आहे.)

तर सध्या नेतृत्वाला कधी धक्का बसेल सांगता येत नाही. खुद्द साहेबांची ही तऱ्हा तर इतरांचं काय? युवराज पवार तर सारखेच काकांकडे धाव घेतात. वास्तविक स्वयंघोषित टग्यांनी असं करणं बरोबर नाही. याबाबतीत त्यांनी कृष्णकुंज निवासी शान-ए-महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे यांचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवायला हवे. काका लोक महाराष्ट्रात पुतण्यांना वाचवत नाहीत या इतिहासापासून त्यांनी वेळीच धडा घेतला होता. म्हणूनच 'काका अपनी जगह, मोका अपनी जगह' हे सूत्र स्वीकारून त्यांनी स्वतंत्रपणे गादीचे आणि गर्दीचे नवनिर्माण केले. एका अर्थी तेही टगेच. नुसता हात उंचावला की पिन ड्राप सायलेन्स! पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांसारखे सध्या महाराष्ट्रात साडेतीन टगे आहेत. स्वयंघोषित युवराज पवार, उद्घोषित - राजसाहेब ठाकरे, अघोषित - नारायण राणे आणि पन्नास टक्के एफिशियन्सीवाले युवराज ठाकरे. पन्नास टक्के त्यांनी कॅमेऱ्याला कधीच देऊन टाकले आहेत!

राज्यपातळीवर नेतृत्वाची ही कथा आहे. बाकी मग काँग्रेसचे मुख्यमंत्री भोज्यालाही न शिवता आल्याने धडाधड आउट होत आहेत. भगव्या फळीतली मंडळी 'मोदींना हे कसं काय जमतं बुवा?' या कौतुकात मग्न आहेत. आंबेडकर ज्यांचा राम त्या दासांनाही कलर कॉम्बिनेशनचे महत्व कळू लागले आहे. अस्मितेला तर सगळेच गोंजारत आहेत आणि दिल्लीच्या वाऱ्यांतून आम्हांला मात्र 'अण्णा तेरो नाम' चे सूर ऐकू येत आहेत. नेतृत्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि तो कसा सोडवायचा यावर चर्चा करण्यासाठीच बहुधा आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवर उतरून रिक्षावाले मीटरने येत नाहीत म्हणून बाबा आढावांना फोन लावणार तोच खुद्द मॅडमचा मेसेज आला आहे - 'स्टार्ट इमिजिएटली!'

आम्हांला गेले पाहिजे!

(पूर्वप्रसिद्धी:परिवर्तनाचा वाटसरू, दिवाळी २०११)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (8 votes)

प्रतिक्रिया

अतिशय उच्च दर्जाचा विनोद.

नदी दिसली की तिला अडवावे हे माणूस प्रगती करता करता शिकला. कॉलेजात असताना मुरकत चाललेल्या एखाद्या प्रकरणास अडवावे ही अंतःप्रेरणा आमचीही होतीच की! स्त्री गुणधर्माच्या वस्तूंस अडवावे ही परंपरागत पुरुषी गुणधर्म आहे.

'देशभक्ती' या थीमवर त्याच्या फेवरेट नाईट क्लबमध्ये 'वॉर ऑफ डीजे' रंगणार आहे

पक्षाच्या थिंक टँकना पडलेल्या भेगा बुजवणारे पक्षाला नको असतात. मग गळत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांची चलती असते.

कोणीतरी पूर्वी वापरलेली उपमा देऊन म्हणतो, सरस्वती तुमच्या कळफलकावर कजरारे कजरारे म्हणत नृत्य करते आहे.

लेख कालातीत आहे, पण आधुनिक काळातल्या काही ताज्या घटनांबद्दल असंच खमंग येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत सकस विनोद आहे.
सध्याचे राजकीय नेतृत्व ही अशा सकस विनोदाच्या सुगीसाठी अगदी योग्य अशी सुपीक जमीन आहे आणि तुम्हीही अगदी शेलकं बेणं वेचून आणलंय. होऊ द्या तुमची शेती जोरात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नगरीनिरंजन, प्रतिसादाबद्दल आभार...शेती करायचा प्रयत्न करतो..बघूया जमते का... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है! बर्‍याच दिवसांनी सए काहीतरी खरोखर फर्मास वाचायला मिळाले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिलंय! मजा आली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राजेश, संगणकस्नेही, ऋषिकेश,

प्रतिसादाबद्दल आभार...

उत्पल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कृष्ट. अतिशय आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद व्हाईट बर्च...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'टंग इन चीक' शैलीचा उत्कृष्ट लेख . काही मुद्दे तर फारच पटले.
काळाचा महिमा अगाध आहे. त्यापुढे रथी-महारथी फिके पडतात हे आपण जाणताच.काळाबरोबर सर्व काही बदलतं. माणूसही बदलतोच. कितीही नाही म्हटलं तरी हे सूक्ष्म सत्य नाकारता येत नाही. नेतृत्वही त्याला अपवाद नाही. 'ओल्ड स्टाईल' नेतृत्व आज उपयोगाचं नाही. सूतकताई, सामुदायिक प्राथर्ना वगैरे नॉन-ग्लॅमरस उपक्रम आज कोण राबवेल?
राईट. डाऊन विथ नोस्टाल्जिया!
भारतीय आणि भावना यांचं एक अतूट नातं आहे. डोळ्यात पाणी आणून एखाद्याने गोठ्यातल्या बैलाला प्रसूतिवेदना सुरु झाल्या आहेत असं सांगितलं तर जनता पाणी घेऊन धावेल.

शेक. भाबडेपणा हा आपला स्थायिभाव आहे. लोकांना लॉजिक आवडत नाही, विज्ञान आवडत नाही, विश्लेषण आवडत आही, पण 'सात हजार वर्षांची परंपरा असलेल्या या महान भारतभू,,' वगैरे फार आवडते. अगेन डाऊन विथ नोस्टाल्जिया!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

धन्यवाद सन्जोप राव...

भारतमातेचे सुपुत्र इ. प्रश्न का विचारत नाहीत, किंबहुना त्यांना प्रश्न का पडत नाहीत हा मलाही पडलेला मोठा प्रश्न आहे. संतमड़ळींच्या बरोबरीने त्याच काळात कुणी शास्त्रज्ञ जन्मले असते तर मला वाटतं काही लोकांनी तरी विठ्ठ्लाकडे भक्तिभावाने लागलेले आपले डोळे तिथून काढून सूक्ष्मदर्शक यन्त्रात घातले असते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतिहास हा वाचायला, चघळायला सोपा असतो. बराचसा विकिपिडियावर उपलब्ध असतो. त्यावर बोलायचे म्हणजे विचार करावा लागत नाही. स्वतःचा विचार तर नाहीच नाही. मग असे उमाळे काढणार्‍यांची सुमारसद्दी झाली तर त्यात नवल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

युवराज पवार म्हणजे कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युवराज पवार म्हणजे अजित पवार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह.. बरेच दिवसांने मार्मीक विनोद वाचला... खुप छान.. हल्लीच्या घटनांवर येउद्या काही तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राज्यावर साडेतीन टक्क्यांऐवजी साडेतीन टग्यांचे राज्य आले वाटतं.... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राजकारणासोबत गणित आणि भूगोलाचा अभ्यास हे आवडलं. त्याच चालीवर "पन्नास टक्के एफिशियन्सीवाले युवराज ठाकरे" राजकारणाबरोबरच छायाचित्रणाचा अभ्यास करत असतील Wink

नेतृत्व आणि नृत्य, 'अण्णा तेरो नाम', साडेतीन टगे, वगैरे खासच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नितिन, अदिती, अर्धवटराव...प्रतिसादाबद्दल आभार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख पूर्वी नजरेतून सुटला होता म्हणून आत्ता वाचला. काय मस्तं लिहिता हो तुम्ही! अतिशय मार्मिक आणि धारधार विनोद मस्त पकड घेतात पण त्यामुळे मुद्द्यांतलं गांभिर्य कमी होत नाही. तोलून मापून वापरलेले शब्द आणि टिप्पण्यांमागची विचार करायला प्रवृत्त करायला लावणारी शैली खासच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रूची,

प्रतिसादाबद्दल आभार...

उत्पल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाम आवडले बुवा आपल्याला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

खणखणीत! उच्च, सकस, धार्दार... काय हवं ते म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही, उत्पल दत्त जसा उच् श्रेणीचा अभिनय करायचे, तसे उच्च लिहिले आहे. बर्‍याच दिवसानी ,राजकारणावरील लेखांची बौद्धिक भूक भागवणारा ,लेख वाचायला मिळाला.
तो नजरेतून सुटला कसा याचंच आश्चर्य वाटताय. असो.
लिहिते रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त, धार्दार, नादखुळा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खुपच दिवसांनी कोणावरही शिंतोडे न उडवता लिहीलेला, वर म्हटल्याप्रमाणे उच्च्प्रतिचा सकस लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0