Skip to main content

ऐसी अक्षरे कुल सम्मेलन, पुणे (वृत्तांतासहित)

(नवीन धागा काढण्याऐवजी याच धाग्यात वृत्तांत लिहितो आहे - राजेश घासकडवी)
कोणे एके काळी पुण्यनगरीतून 'कट्टा' नावाचं एक प्रकरण निघायचं. प्रकरण अशासाठी म्हटलं की ते साप्ताहिक, मासिक वगैरे काही म्हणावं असं नियतकालिक तर नव्हतंच, पण अनियतकालिक म्हणून सन्मान करण्याचंही प्रकाशन नव्हतं. माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी कट्ट्यावर पडीक असलेल्या सुपीक मेंदूंतून निघणाऱ्या विचारतरंगांना कागदावर सायक्लोस्टायलित स्वरूपात अवतीर्ण करण्याचं ते एक माध्यम होतं. त्यात प्रसिद्ध झालेल्या अक्षर वाङमयातल्या मला फारच थोड्या अक्षरांनी दर्शन दिलं. आणि एकदोनच मौलिक सुवचनं माझ्या लक्षात आहेत. (ते वाङमय अक्षर असलं तरी माझी स्मृती सक्षर आहे त्याला काय करणार म्हणा!)

आलिया भोगासी असावे सादर,
शनिवारवाड्यासमोर भादर,
म्हशी

आता तुम्ही म्हणाल की हे जुनाट, विसाव्या शतकातलं काव्य मला आत्ता का आठवावं? तर उत्तर सोपं आहे. ऐसी अक्षरे या एकविसाव्या शतकातल्या आर्बिट्ररीनियतकालिकातल्या लोकांनी शनिवारवाडा असलेल्या पुण्यात एक कट्टा केला, त्याचं वृत्तांकन करण्याची म्हैस भादरण्याचा भोग माझ्यावर येऊन पडलेला आहे. म्हणजे, पुणे, कट्टा, म्हैस, भादरणे, भोग, त्यासाठी सादर होणे इतक्या कॉमन गोष्टी असताना हे काव्य आठवलं नसतं तरच नवल.

बरं, भोगच म्हटले तर किती ते? मुळात ऐसी अक्षरे ही साइट चालवायची, मालक म्हणून स्वतःच्या खिशाला तोशीस लावून. त्यासाठी किती आणि कुठच्या माड्या चढाव्या लागल्या याची गणती नाही. वर कट्टा यशस्वी होण्यासाठी जातीने हजर राहायचं. (इतर दोन हरामखोर मालक या संपूर्ण कट्ट्याच्या वेळी हिरव्या माजात झोपून होते) वर कट्ट्याला येणाऱ्या सगळ्यांसाठी गिफ्ट म्हणून पुस्तकं आणायची. आणि त्यावर सुवाच्य अक्षरात 'ऐसी अक्षरे कट्टा' असं लिहून देऊन आपलं नाव लिहायचं. मग फोटो काढायचे. कोण काय गमतीदार बोललं याच्या नोट्स काढायच्या. इतकं सगळं केल्यावर 'तुम्ही आता इतकं केलंच आहे, तर वृत्तांतही तुम्हीच लिहून टाका' हे ऐकून घ्यायचं. भोग भोग म्हणायचं, आणि सादर व्हायचं, ते याला नाहीतर कशाला?

तर ऐसी अक्षरेचा कट्टा करायचा ठरलं. मग तो कुठे करायचा, कोण कोण येणार, कुठे जमायचं यावर बराच ऊहापोह झाला. मग साउथ इंडिजमध्ये बारा-तेरा लोक जमणार हे ठरलं. १८ तारीख एकदाची उजाडली. मी आणि मेघना साउथ इंडिजच्या समोर सव्वाबारा वाजता पोचलो. आता भारतीय वेळेनुसार साडेबाराला भेटायचं ठरवल्यावर इतक्या लवकर पोचणं ही आमची चूकच होती. तरीही मेघनाला वाटलं होतं की बारा वाजता भेटायचं आहे, त्यामुळे ती फारशी लवकर पोचली नव्हती, पण मला साडेबारा माहीत असूनही मी सव्वाबाराला येणं हा अक्षम्य अपराध होता. मेघनाप्रमाणेच गैरसमज झालेले घाटपांडेकाका तिथे आधीपासूनच होते. मग आमच्या त्रिकुटाला नक्की कोण येऊन मिळतंय हे पाहण्यात काही गमतीदार काळ गेला. म्हणजे, आसपास जाणाऱ्या रिक्षा, कार्स, मोटरसायकल्स, स्कूटर्स यांवरच्या मंडळींच्या चेहऱ्याकडे बघून 'हे ऐसीचे लोक असू शकतील का?' असा प्रश्न विचारायचा आणि स्वतःशीच त्याचं उत्तर द्यायचं. काही चूक आणि काही बरोबर उत्तरांनंतर ऋषिकेश, नितिन थत्ते, सचिन, अनुप ढेरे, केतकी आकडे, घनु, बॅटमॅन, मनोबा वगैरे दहाएक लोकांचा कोरम झाला. मग 'आपण वर रेस्टॉरंटमध्येच जावं' असा एक विचार झाला, आणि तो बरोबर आहे की नाही हे कळायच्या आत अमलात आणला गेला.

स्थानापन्न झाल्यावर चार टेबलांची दूरी फारच जाणवल्यामुळे त्यातल्या दोन दऱ्या बुजवून दोन लांबुडकीशी टेबलं तयार केली गेली. आणि अर्थातच गप्पांचे फड सुरू झाले. मग इतक्या सगळ्या लोकांची नावं, आणि आयडी लक्षात ठेवण्याची कसरत प्रत्येकाच्याच डोक्यात सुरू झाली. (आता मी [म्हणजे मी स्वतः, मी हा आयडी नव्हे], मेघना, नितिन थत्ते, केतकी, बिपिन वगैरे काही प्रामाणिक लोकांनी स्वतःच्या खर्याखुर्या नावाचेच आयडी घेतल्यामुळे ते काम काहीसं सोपं झालं. पण काही इतर हरामखोर लोकांनी [मी, तर्कतीर्थ, मन, सिफर, घनु, सोकाजी, अस्मि, सविता वगैरेंनी] आपली नावं आयडीच्या मुखवट्याखाली लपवल्यामुळे लोकांचे कष्ट वाढले. भडकमकर मास्तरांनी तर आपणच शरदिनी असं सांगून लोकांचं काम तिप्पट कठीण केलं.) पण एकदाचे अॅपेटायझर्स आले आणि सर्वजण एकमेकांची दखल घेण्याचे उपचार टाकून देऊन गरमागरम रसम ओरपायला मोकळे झाले.

मग यथावकाश कुठच्याही नव्या नव्या कट्ट्याला निघते तशी संस्थळांच्या इतिहासाची चर्चा झाली. बरेच नवीन सदस्य असल्यामुळे त्यांना केवळ सौम्य, पोलिटिकली करेक्ट इतिहास सांगितला गेला. अर्थातच इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना कट्ट्याला येऊ न शकलेल्या, पण त्याबाबतची आपली जळजळ लपवू न शकणाऱ्यांचे फोन आले. नंदनने पृथ्वीच्या पार विरुद्ध टोकावरून बोलून कट्ट्यात सामील होण्याचा प्रयत्न केला. 'मी नाही तिथे तर माझ्या नावे चारपाच कोट्या कोणी तरी कराव्यात' अशी एक आखरी ख्वाइश सांगितली. अरुण जोशीही फोन करून सहभागी झाले. पण त्यांचा उद्देश कट्ट्यात सामील होण्याचा होता की आपला अरुणजोशी-बॅटमॅन-मनोबा-नगरीनिरंजन अॅक्सिस बळकट करण्याचा होता याबाबत शंकाच आहे. फोन उचलताना बॅटमॅन व मन उठून जोरात हात वर करून 'हेयल अरुण जोशी' असं ओरडले तेव्हा तर हा संशय आणखीनच बळावला.

खाणं चालूच होतं - साउथ इंडिज नावाच्या रेस्टॉरंटमध्ये इडली-मेदूवडे मिळतील या अपेक्षेला पार सुरुंग लावून मराठी माणसांचं साउदी जेवण म्हणजे काय याविषयीचं कल्पनादारिद्र्य उघडं पाडलं. मग गप्पांचा ओघ भलभलत्या ठिकाणी वळला. संजय सोनवणींनी मांडलेला अवकाश ताण सिद्धांत हा विडंबन म्हणून वाचला आणि त्यामुळे आवडला, असं मनोबाने म्हणताच बॅटमॅनने त्याला बाणेदार उत्तर दिलं 'छे छे, सर विडंबन करत नाहीत. आनंद जैसे मरते नही वैसे सर भी विडंबन नही करते'. आता या सगळ्याचा दवणेंशी आणि मराठी सीरियल्सशी काय, असं कोणीही विचारेल. पण काही क्षणांतच तो विषयही उद्बवला खरा. आणि परिसंवादातल्या अजेंड्याचा विषय असल्याप्रमाणे लोकांनीही त्यावर चर्चा झाडली.

जेवण संपवून लोकं खाली उतरली. तिथे एक सामुदायिक फोटो काढण्यात आला. सुदैवाने बटाट्याच्या चाळीतल्या सामुदायिक फोटोमध्ये जशी मारामारी झाली तशी न होता लोकांनी गुण्यागोविंदाने उभं राहून स्मितं दिली. तसेही 'आपण' ऐसीचे सदस्य मारामाऱ्या करतो ते व्हर्च्युअल जगात, (व्हर्च्युअल की व्हर्चअल यावर एक मारामारी अपेक्षित आहे) त्यामुळे प्रत्यक्षात बहुतेक लोकं बहुतेकांशी सामंजस्यानेच वागले. मग तिथेच उभं राहून पार्किंगसाठी जाणाऱ्या इतर गाड्यांना अडवत एक बिनमेजाची गोलमेज परिषद झाली. पोटं भरलेली असल्यामुळे तिथेही गप्पा रंगल्या. त्यात अस्मिने 'आजकाल काय लोक फार पेटताना दिसत नाहीत' अशी नोस्टॅल्जिक कळकळ व्यक्त केली. मग त्यावर 'हो, आजकाल डोकी फुटत नाहीत. कदाचित सोडावॉटरच्या बाटल्या पूर्वीइतक्या स्ट्रॉंग नसाव्यात' असं म्हणून बिपिन कार्यकर्तेंनीही दुजोरा दिला. हे 'न'वी बाजू कोण? हा प्रश्न खूप लोकांना पडलेला होता. त्या अनुषंगानेच इतरही गूढ आणि आकर्षक आयडी म्हणजे खवचट खान, काळा बैल, आडकित्ता वगैरे कोण अशा पृच्छा वर्तुळात परिभ्रमण करत होत्या. पण आडकित्ता डॉक्टर आहेत यापलिकडे बाकी कोण कोण हे कोणालाच माहीत नसल्यामुळे त्यांच्याभोवतीचं धूसरतेचं वलय अधिकच घनदाट झालं.

अशातच साडेतीन चार वाजायला आले. मग हळूहळू लोक गळायला लागले. सातच्या आत घरात पोचायचं म्हणून थत्तेचाचा लवकर निघाले. अनुप, घनु आणि केतकीही इतर कार्यक्रमांना जायचं म्हणून गेले. गोल रोडावला. दहा मंडळी शिल्लक राहिल्यानंतर कुठेतरी शांत बसूया म्हणून जवळच असलेली एक बाग शोधली. हे इतक्या सहज सांगितलं असलं तरी दोन गाड्या, काही जण चालत, रस्ते चुकणं, एकमेकांना फोन करून हे सगळं लटांबर योग्य दिशेला नेण्याचे प्रयत्न वगैरेमुळे ही साधी गोष्टही प्रचंड मनोरंजक झाली. बागेत जाऊन बसलो एकदाचे आणि मग पुन्हा गप्पांचा फड जमला. काय बोललो ते फारसं आठवत नाही, पण म्हशींच्या चेहऱ्यावर कसा इनोसंट भाव असतो यावरची चर्चा माझ्या लक्षात आहे. असंच तासभर थोडं फिदीफिदी झाल्यानंतर 'चहा हवा बुवा' अशी टूम निघाली. मग बाहेर जाऊन जवळच्याच दुर्गामधून (म्हणजे किल्ल्यामधून नाही) चहा कॉफ्या घेतल्या. पुन्हा बिनमेजाची गोलमेज परिषद जमली. आणि मग सरतेशेवटी साडेसहा झाले बुवा म्हणत मंडळी पांगली.

इतकं लिहून मी ही इनोसंट दिसणारी कट्ट्याची म्हैस भादरून संपवतो. शिल्लक असलेल्या केसांसाठी काढा आपापले वस्तरे!




धाग्याचा प्रकार निवडा:

Nile Mon, 20/01/2014 - 13:36

In reply to by ऋषिकेश

इतक्या माड्या चढायच्या म्हणजे एखाद दुसरी गोष्ट विसरायचीच! (बाकी आता मालकांचा विषय निघालाच आहे तर मग) विड्या-काड्याची सोय झालीच असेल तुमची, मग का उगा ओरडता! ;-) (करा, इतिहासाचा अभ्यास करा, म्हणजे कळेल!)

राजेश घासकडवी Mon, 20/01/2014 - 13:41

In reply to by ऋषिकेश

खुद्द मालकांनीच height="" टाकले आहे.

याला म्हणतात बकरी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड. पहिल्या फोटोतलं ते हाइटचं काढून टाकलं होतं. इतरांचं सगळंच एकदम करू म्हटलं तर नंतर राहून गेलं. हे ऐसीकर म्हणजे जरा चूक झाली तर धारेवर धरतात. आणि त्यात संपादक म्हणजे तर विचारायलाच नको, ते मालकांना पण तंब्या देतात! आम्हीच बॅन नाही झालो निळ्याआधी म्हणजे मिळवली.

नंदन Mon, 20/01/2014 - 13:55

वटवृक्ष, त्याच्या फांद्यांतून होणारा 'उजळला प्रकाशु' आणि स्थित सदस्यांचे 'बाबा रे!' छापाचे मंदस्मितविलसित भाव हे सारे टिपणारा शेवटचा फोटू फारच प्रतीकात्मक वाटला ब्वॉ! :)

१. आठवा 'नाथा कामत' - 'बाबा रे' ह्या शब्दापुढे "वत्सा, तू अजाण आहेस", "बेटा, दुनिया काय आहे हे तू पहिचानलं नाहीस", "हा भवसागर दुस्तर आहे.", "प्राण्या, रामकथारस पी" अशांसारखी अनेक वाक्ये गुप्तपणाने वावरत असतात.

मला तर "वटवृक्षाच्या शीतल छायेत..." वगैरे आठवलं ;)

बाकी इतकी मोठाली वाक्ये तोंडपाठ आहेत का बघुन कॉपी? (खरंतर हे नंदनला विचारणे हा अपमान आहे हे माहित असूनही हे पातक करतोय)

नंदन Mon, 20/01/2014 - 14:49

In reply to by ऋषिकेश

गेल्या वर्षीचा ज्योक रिपीट नको, म्हणून थोडी कॉपी, थोडं Erinnerungsvermögen (बरोबर का हो, पेठेबै? :)) असा मेळ घातल्या गेल्या आहे.

बाकी गुर्जींनी निवडलेली पुस्तकं कुठली होती, याबद्दल कुणीतरी चार शब्द लिहा की.

मन Mon, 20/01/2014 - 14:52

In reply to by नंदन

शाम मनोहर ह्यांचं नाटक का एकांकिका काहीअत्री आहे, मला अजून वाचायचय.
दुसरं होतं वेदांतील गोष्टी. तेही चांगलय, पण वाचून झालय.
अजून एक दोन होती.(बहुतेक चि वि जोशींची होती. मला ते विशेष प्रिय नाहित, म्हणून ती पुस्तके पाहिली नाहित.)

घनु Tue, 21/01/2014 - 22:57

In reply to by नंदन

गुर्जीनी पुस्तकाचा गठ्ठा काढला आणि 'randomly' पुस्तकं वाटली....त्यात मला 'तुटलेले पंख' नावाचं अनुवादित पुस्तक मिळालं...हे मुळचं अरेबिक भाषेतील पुस्तक 'खलील जबिन' ह्या लेखकाने लिहिलं आहे. आणि दुसरं मी गुर्जिंना विचारून मारलेलं 'वेदातिल गोष्टी' हे आहे :-)

धन्यवाद हो गुर्जि !!!!

घनु Wed, 22/01/2014 - 10:06

In reply to by राजेश घासकडवी

कृपया गैरसमज करु नका गुर्जी ... माझं तसं इन्टेन्शन नव्हतं ... आमचे मराठी आणि इंग्रजी दोन्हीचे लोचे आहे :( ... त्यामुळे असे गैरसमज होतात.... :(
पण हे बरोबर आहे ... मलाही असेच काहीसे म्हणायचे होते की गुर्जींनी टेबलवर सर्व पुस्तकं ठेऊन एकेकाने ती उचलली ...

बिपिन कार्यकर्ते Wed, 22/01/2014 - 18:58

In reply to by घनु

वेदांतील गोष्टी हे पुस्तक देऊन रा. रा. राजेश घासकडवी हे छुपे सनातनी असल्याचा पुरावाच दिला आहे त्यांनी.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 22/01/2014 - 19:11

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ते बरेच काही छुपे आहेत, होमोफोबिक, भडक भगवे, इतर वेळेस समानतावादी, गावठी कोंबडी हादडणारे, इतर वेळेस 'पेटा'प्रेमी, ... यादी संपणार नाही. गुर्जी पुरते भंजाळलेले आहेत.

मेघना भुस्कुटे Mon, 20/01/2014 - 14:29

In reply to by नंदन

नंदन, असा अपमॉन तू कस्सा क्कॉय बॉ चालवून घेतोस कुणास ठौक... मी नसतं ऐकून घेतलं. कॉपी केलंय का म्हणे! छ्या:... ;-)

तिरशिंगराव Mon, 20/01/2014 - 17:25

इतके रथी-महारथी एकाच भेटीत बघण्याचा चानस हुकला. कट्ट्याएवढ्याच कॉमेंटस भारी.

सोकाजीरावत्रिलोकेकर Mon, 20/01/2014 - 19:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं केलेस!
आंजाचा गाळीव इतिहास अशी चर्चा झडूनसुद्धा तुझी कुण्णी-कुण्णी म्हणून आठवण काढली नाही, मेघुतैने पण नाही. राजेशगुर्जी तर गुळणी घेऊन गप्प बसले होते.

- (यमीचा स्वयंघोषित हितचिंतक) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/01/2014 - 19:37

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

मेघनाला माझी आठवण काढायची गरजच नाही. आमच्या मनाच्या तारा कधीकाळीच, कचराळी तळ्याकाठी जुळल्या आहेत. आणि गुर्जी तसेही माझे हितशत्रू आहेत, त्यामुळे त्याच्याकडून काही अपेक्षा नाहीतच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/01/2014 - 01:21

In reply to by Nile

निळ्या, तू आत्ताच सुरूवात कर. म्हणजे तू मरेपर्यंत लिहून पूर्ण होईल. (शिवाय, मी लफडी करताना हा सर्वद्वेष्टा निळ्या मधेमधे येणार नाही असा फायदा आहेच.)

सोकाजीरावत्रिलोकेकर Mon, 20/01/2014 - 20:49

In reply to by सविता

हे काय प्रकर्ण आहे?

ते नुसतेच प्रकर्ण नसून एक खंडकाव्य असावे असा मला दाट संशय आहे! :D

- (संशयी) सोकाजी

राजेश घासकडवी Mon, 20/01/2014 - 22:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि गुर्जी तसेही माझे हितशत्रू आहेत, त्यामुळे त्याच्याकडून काही अपेक्षा नाहीतच.

हा कट्टा यशस्वी व्हावा म्हणून म्या पामरानं इतकं केलं, पण ऋषिकेशने हाइटबद्दल शिव्या घातल्या, आणि आता अदितीने हितशत्रू म्हटलं. मुक्तसुनीत, चिंतातुर आणि बिपिनने टक्केटोणपे दिले की ऐसीच्या व्यवस्थापनाकडून अवहेलना पूर्ण होईल. इंपीच होताना प्रेसिडेंट बिल क्लिंटनला काय वाटलं असेल याची आता मला कल्पना येतेय.

अक्षय पूर्णपात्रे Mon, 20/01/2014 - 20:11

'कट्टा चांगला झाला नाही' असे मत कोणीच न मांडल्याने भ्रमनिरास झाला असे म्हणून जळजळ व्यक्त करतो. तसेच इन्टॉक्सिकेशनशिवाय इतक्या मोठ्या जमावात आपण मेलेच असतो या विचाराने हुरळत बसतो.

मी Mon, 20/01/2014 - 21:50

कट्टा तसा बरा होता, मी उशिराच पोचलो, बाकिच्यांचे उदर तोपर्यंत बर्‍यापैकी भरलेले असावे कारण एवढावेळ खाण्यात मग्न असलेलं ती तोंड आता बोलायला लागली होती अशा आशयाची प्रतिक्रिया कोणीतरी टाकली, मग कोणी जुन्या आयडींच्या नाड्या सोडण्यात/बांधण्यात गुंतले होते, कोणी त्यावेळी कसा सगळ्यांना बनवला वगैरे पराक्रमही सांगत होते, काहि हसता-हसता बोलत होते, त्यामुळे ते नक्की काय बोलत आहेत हे बहुदा शेजारच्याला सोडून इतरांना शष्प कळत नव्हते पण नेहमीच्या खवचट प्रतिक्रिया न देता सगळे 'हॅहॅ' करुन दात काढून प्रतिसाद देत होते, काही फुकटात मिळालेली जास्तित जास्त पुस्तके कशी लाटता येतील हे बघत होते(बहुदा कोणीतरी दोन-तीन पुस्तका मारलीच..असो). कट्ट्याला कोण आहे ह्यापेक्षा 'अमुक-तमुक' असता तर काय धमाल आली असती असे उपस्थितांची निंदा-नालस्ती करणारे सुर काढून बर्‍याच जणांनी खवचटपणा करुन घेतलाच, बहुदा काहिजण 'विशिष्ठ' आयडी येणार ह्या उत्सुकतेनेपण आलेले दिसत असावेत, ते आयडी आले नाहित म्हणून नाराजी काहिंच्या चेहर्‍यावर दिसत होती..असो. तसेच दशावतारी आयडीपण उपस्थित होतेच पण मोजक्याच आयडींनी सोडल्यास इतरांनी आतली गाठ काहि दिसू दिली नाही. बाहेर उभे असताना, पटकन एका बाजूला जाऊन काहि आयडींनी काहि खलबतांचे धुराडे केले त्याचवेळेस इतर समुदाय दुरुनच आंबट द्राक्षांकडे बघुन न बघितल्यासारखे केले, बिल भरताना कॉर्पोरेट सवलत न मिळाल्याने काहिंना जरा वाइट वाटलेच तेंव्हा मी केलेल्या गणितानुसार खाल्लं १६ लोकांनी आणि बिल बहुदा १७ लोकांचं भरलं..असो..नंतर रविवार दुपारचं 'कार्यबाहुल्य' वगैरे कारणं देत मी तिथुन सटकलो त्यामुळे उर्वरीत रविवार जरा बरा गेला. तसा आधिचा मल्टीस्टारर अंकही छान होता, लहानांनी थोरा मोठ्यांना आदरानी वागवलं, मोठ्यांनी उगाच लहानांची शाळा घेतली नाही, आता काही वागतात वेडीबिद्री पण चांगली आहेत हो सगळी, असे कट्टे पुन्हा पुन्हा घडो(फक्ते बिलाचं बघा बुवा) हिच सदिच्छा.

टिप- व्याकरण, शुद्धलेखन वगैरेवंर शेरे देऊन वेळ यथेच्छ वाया घालवावा.

नितिन थत्ते Mon, 20/01/2014 - 21:53

In reply to by मी

>>मी केलेल्या गणितानुसार खाल्लं १६ लोकांनी आणि बिल बहुदा १७ लोकांचं भरलं.

मला वाटतं १८ लोक जेवले आणि १७ लोकांचं बिल भरलं.......

मी Mon, 20/01/2014 - 21:57

In reply to by नितिन थत्ते

मी जेवलोच नव्हतो फक्त कॉफी प्यालो होतो, आता इतर कोणी जेवले असल्यास कल्पना नाही. (अर्थात तरी मी पुर्ण पैसे(जेवणाचे) दिले होते हे सांगणे लगे)

नितिन थत्ते Mon, 20/01/2014 - 22:06

In reply to by मी

ऐला !!!!
१८ जणांकडून पैसे गोळा केले काय ? कोण बरं गोळा करत होतं....... ;)

सोकाजीरावत्रिलोकेकर Mon, 20/01/2014 - 22:37

In reply to by नितिन थत्ते

अ‍ॅक्चुली हे मला त्याच दिवशी वाटले होते, पण साक्षात 'विदा'फेम गुर्जी व्यवहार करत असल्याने (तेही साक्षात बिकांच्या साथीने) लहान तोंडी मोठा घास घ्यायची हिंमत झाली नाही ;)

- (हिशेबी) सोकाजी

मेघना भुस्कुटे Mon, 20/01/2014 - 22:44

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

जौ द्या मंडळी, तेवढ्या पैशाचं आइसक्रीम खाऊ आपण. मुंबैतल्या कट्ट्याला या... :ड

मेघना भुस्कुटे Tue, 21/01/2014 - 11:30

In reply to by नितिन थत्ते

अहो, मी कुठे कुणाकडे पैसे मागत होते?! माझ्या खर्चाचं घातलं असतं आइसक्रीम! आता गेला तुमचा चान्स!

ऋषिकेश Tue, 21/01/2014 - 09:08

In reply to by मी

"मी जेवणार नाहिये" हे तुम्ही आल्याआल्या जाहिर केलं होतं हे खरं पण नंतर, सगळे सारखे जागा बदलत असल्याने ते कोणाच्या लक्षात राहिलं नसावं. माझ्याही राहिलं नाही. आता प्रतिसाद वाचुन ते आठवलं इतकंच. तिथल्या तिथे सांगून मोकळे झाले असतात तर अधिक योग्य झालं असतं.

बाकी, एकमेकांना पहिल्यांदा सदेह भेटणार्‍या १५-२० जणांच्या कट्ट्याकडून अधिक काय अपेक्षा होत्या हे ही वाचायला आवडेल. थोडक्यात आक्षेप कळले, अपेक्षा काय?

घनु Tue, 21/01/2014 - 11:13

In reply to by मी

काही फुकटात मिळालेली जास्तित जास्त पुस्तके कशी लाटता येतील हे बघत होते(बहुदा कोणीतरी दोन-तीन पुस्तका मारलीच..असो) >>>
अर्रेच्या! म्हणजे मी डोळे मिटून दूध पीत होतो तर. हॅहॅहॅ. :D पण तीन नाही हो मारली पुस्तकं, दोनच घेतली (खरंतर एकचं मारलं आणि एक हक्काचं घेतलं :)). तेही एक जास्तीचं पुस्तक असंच टेबलवर होतं ते गुर्जींना द्यायला गेलो तर ते म्हणे ठेवा तुम्हालाच म्हणुन ते जास्तीचं एक "मारलं" असं म्हणता येईल ;)

सोकाजीरावत्रिलोकेकर Tue, 21/01/2014 - 11:19

In reply to by घनु

(खरंतर एकचं मारलं आणि एक हक्काचं घेतलं (स्माईल))

अच्छा, मला पुस्तक न मिळण्याचे कारण घनु आहे तर! नोंद घेतली आहे, योग्य वेळ यताच हिशेब चुकता केला जाईल.

- (नोंदींची एक्सेल बाळगणारा) सोकाजी

घनु Tue, 21/01/2014 - 11:27

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

अरेरे तुम्हाला पुस्तक नाही मिळालं तर... कोई बात नही.. तुम्हाला पुस्तक द्यायला तर मी चेन्नई ला पण यायला तयार आहे.. बोला कधी येऊ? :D

('तेवढेच एक नविन कॉकटेल चाखायला मिळेल' ही अपेक्षा बाळगणारा) घनु :)

मी Tue, 21/01/2014 - 10:44

वरती मन किंवा ऋषिकेश व त्यांना श्रेणी देणार्‍या इतरांनी माझा प्रतिसाद गंभीरपणे घेतलेला दिसतोय, माझा प्रतिसाद 'विनोदी' होता हे जाहीररीत्या नमूद करू इच्छितो, त्यातला विनोद पोचला नाही हे माझे अपयश आणि दुर्देव. अशा प्रकारच्या विनोदांना डिस्क्लेमर देण्याचा प्रयत्न मी भविष्यात नक्की करेन.

विनोदी प्रतिसादातील मला अपेक्षित नसलेल्या उपहासामुळे तुम्हा व इतर कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी दिलगीर आहे, मी प्रतिसादात सांगितलेले 'आक्षेप' नसून वस्तुस्थितीचे लार्जर दॅन लाईफ विडंबन आहे, त्याकडे तसेच पहावे.

पैशाशी संबंधीत मुद्दा महत्त्वाचा नसून एक निरीक्षण होते, अर्थात पुढील वेळी काळजी घेण्याचे सगळ्यांच्याच लक्षात येईल.

ह्या खुलाश्यानंतरही प्रतिसाद आक्षेपार्ह वाटत असल्यास संपादकांनी जरूर ती कार्यवाही करावी.

ऋषिकेश Tue, 21/01/2014 - 11:04

In reply to by मी

भावना वगैरे नव्हत्या दुखावल्या पण, खरंच विनोदही पोचला नव्हता. असो.
आता क्लीअर झाले. :)

ॲमी Tue, 21/01/2014 - 11:22

In reply to by मी

प्रचंड हातवारे करत, कपाळाच्या शिरा ताणुन थयथयाट करत " 'मी' तुम्ही धुराडं कोणाला म्हणालात? उत्तर द्या. अख्खा महाराष्ट्र तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. बोला 'मी' बोला. उत्तर द्या."

मी Tue, 21/01/2014 - 12:22

In reply to by ॲमी

वर इंडिजला पायनापल शिरा हाणला आणि खाली शिरा ताणताय, हे बरं नव्हे...माझी आंजावरची/कट्ट्यावरची घोडचूक समजा हवंतर..आणि अहो ते नेमकं कोण होतं हे धुरामुळं दिसलंच नाही, आणि नंतर इतरांबरोबर माझे डोळे विस्मयचकित होऊन मग पाणावल्याने बहुदा धुरकट दिसत होतं.

Nile Tue, 21/01/2014 - 11:13

In reply to by मी

मी विनोदी श्रेणी दिली होती. (पुर्णपात्रेंच्या प्रतिसादानंतर आल्याने मला क्यु मिळाला होता.)

पण एकंदरीतच लोकांची विनोद बुद्धीच कमी हो! (आता लिहणार्‍याची का वाचणार्‍याची हे ज्याने त्याने ठरवावे!) ;-)

राजेश घासकडवी Tue, 21/01/2014 - 11:23

In reply to by मी

अशा प्रकारच्या विनोदांना डिस्क्लेमर देण्याचा प्रयत्न मी भविष्यात नक्की करेन.

अरे देवा. असं होताना दिसलं तर ऐसीची जमीदोस्त झालेली इमारत चार मजल्यांनी उठून उभी राहील आणि म्हणेल, 'माझ्या पोटात यापेक्षा खूपच विनोदबुद्धी होती हो...'