Skip to main content

एक होती आजी

मृतदेहाचा स्पर्श चांगलाच गार असतो. आजीला हात लावून बघितलं तेव्हा ती गेली आहे हे मला जाणवलं होतं. खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना बोलावलं. नंतर मग पुढच्या हालचाली. अँब्युलंसमध्ये मी आणि माझे वडील. समोर आजी. वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत तिला ठेवलं. ज्वाळांचा लोट उठता उठता दार बंद झालं आणि मी क्षणभर डोळे मिटले. आजीचं प्रेत आपण जाळलं खरं, पण 'आजी गेली' म्हणजे नक्की काय झालं? ती नक्की गेली का? असे विचित्र प्रश्न त्याक्षणी डोक्यात घोळत होते.

आजी गेली तेव्हा ती पंच्याऐंशी वर्षांची होती. १ सप्टेंबर २०११. त्या दिवशी गणपती बसले होते. मला त्याचं विशेष असं काही वाटत नसलं तरी आजीला वाटलं असतं. तिच्या अखेरच्या आजारपणात ती काही महिने तिच्या धाकट्या मुलीकडे, म्हणजे माझ्या मावशीकडे होती. त्या दरम्यान संक्रांत आली होती. त्या दिवशी आजीला भेटायचं राहून गेलं. म्हणजे संक्रांत आहे म्हणून मावशीकडे जाऊन आजीला भेटावं असं डोक्यातच आलं नाही. आठवड्यातून दोनदा आम्ही (मी आणि ही) तिला भेटायला जायचोच. पण संक्रांत निसटली. त्यानंतर जेव्हा गेलो तेव्हा आजी आमच्यावर जाम भडकली होती. संक्रांत असून तुम्ही आला नाहीत भेटायला, याचं एक जाऊ दे, पण तुझ्याही लक्षात नाही आलं? असं तिने आम्हाला आणि विशेषतः हिला बरंच सुनावलं. मी मुलगा आहे त्यामुळे काही गोष्टी मला अर्थातच कळणार नाहीत आणि ही मुलगी आहे त्यामुळे तिला त्या अर्थातच कळतील असं एका ऐंशीपलीकडच्या बाईचं गृहीतक असावं यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. पण आजीला दुसरीही एक बाजू होती आणि ती चांगली आधुनिक होती. माझ्याचबाबतीतला एक किस्सा आठवतो. माझं लग्न व्हायच्या आधीची गोष्ट. मी आणि माझी एक मैत्रीण. आम्ही लग्नाचं ठरवलं होतं. पण नंतर काही कारणाने माझ्याकडून नकार दिला गेला. तपशीलात सगळं सांगणं इथे शक्य नाही. कारण ते मोठंच विषयांतर होईल. आजीलाही सगळं तपशीलात सांगणं मला शक्य होत नव्हतं. लग्न ही गोष्ट एकविसाव्या शतकात आधी होती तेवढी 'रूटीन' राहिलेली नाही हे माझ्या प्राचीन आजीला कसं समजावून सांगायचं या विचारात मी होतो तो तिनेच मला त्रिफळाचित केलं. 'ती तुला शरीरसुख देण्यात कमी पडणार आहे का?' असा थेट सवाल टाकला. आजीला मी मार्कं दिले! (लग्नाचा निर्णय न घेण्यामागे हे कारण नव्हतं हे जाता जाता सांगून टाकतो.)

मी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याला आजीकडे आलो आणि पुढची एकोणीस वर्षे आजीबरोबर राहिलो. सध्या आजी नसलेल्या घरात राहतोय. ती माझ्या आईची आई. तिला दोन मुली. आजोबा ती अठ्ठावीस वर्षांची असताना वारले. आजीने पुढे एकटीने सगळं केलं. त्यामुळे स्वभावात हट्टीपणा भरपूर. 'विशिष्ट' (म्हणजे तिच्या!) पद्धतीनेच सगळं व्हायला हवं हा आग्रह. पन्नाशीतल्या तिच्या मुलींना दांडीवर कपडे कसे वाळत घाला हेही ती उत्साहाने सांगायची. आवडलं नाही की स्पष्ट बोलून दाखवणं हा एक (चांगला) गुण. माणसाचं मूल्यमापन करायची तिची अशी एक खास पद्धत. मी जेव्हा नोकऱ्यांची धरसोड करायचो तेव्हा जरा काळजीत पडायची, पण 'तुला योग्य वाटेल ते कर' हे मात्र तिने कायम ठेवलं. अत्यंत धोरणी, शिस्तप्रिय स्वभाव. त्यामुळे गडबड, बेशिस्त, वेळ न पाळणं याचा मनापासून राग. पैशाची हाव नाही, पण अखेरीस पैसा महत्त्वाचा याबाबत संदेहही नाही. माझे एक दूरचे मामा, जयंत बापट, ऑस्ट्रेलियात असतात. रसायनशास्त्रातून डॉक्टरेट. नावाजलेले अभ्यासक. समाजसशास्त्रातील एका विषयावरही डॉक्टरेट. अलिकडेच 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित. आजीला त्यांचं फार कौतुक. पुण्यात आले की आजीला भेटायला यायचे. ते पौरोहित्य करायचे. ऑस्ट्रेलियात त्यांनी लग्नही लावली होती. आजीला या गोष्टीचं विशेष कौतुक. एकदा घरी आले होते. इतरही काही नातेवाईक होते. पौरोहित्याचा विषय निघाला. आजीने स्वछ प्रश्न टाकला, "काय रे जयंता, तुला तिकडे लग्न लावायचे किती पैसे मिळतात?" मी पुन्हा आजीला मार्कं दिले!

म्हातारी माणसं एक 'काळ' वागवत जगत असतात. आजीसुद्धा स्मरणरंजनात रमायचीच. त्यावेळी तिचा चेहरा खुलून यायचा. पण ती स्मरणात 'अडकलेली' मात्र नव्हती. टीव्ही बघताना शंभर प्रश्न विचारायची. रोजचा पेपर नीट वाचायची. त्यावरही प्रश्न. एकदा मला म्हणाली की मला खरं तर पेपरातलं सगळं कळत नाही. पण तरी मी वाचते. किमान शब्द तरी ओळखीचे होतात. एकदा तिने गुगली टाकला होता - 'अमेरिकेत पैसे ठेवले तर व्याज जास्त मिळतं का रे?' मी चकित. हा प्रश्न आजीला का पडावा? मग लक्षात आलं की त्याचा संबंध परकीय गुंतवणुकीबाबतच्या एका बातमीशी होता.

'इतर जातीचे लोक', 'खालच्या जातीचे लोक' असा उल्लेख खूप वर्षांपूर्वी तिच्या बोलण्यात आल्याचं स्मरतं. यात काही वावगं आहे असं तिला वाटत नसणारच. (यात काही वावगं न वाटण्याची आपल्या समाजाची मानसिकता आपल्याबद्दल पुष्कळच बोलते!) त्यावेळी तिच्याशी वाद घातला नव्हता कारण तेव्हापर्यंत वादाचं अंग विकसित व्हायचं होतं. माझ्या आजीच्याच वयाच्या एका दुसऱ्या आजीने एकदा कुठल्यातरी संदर्भात महारांचा उल्लेख केला होता. ही माझ्या एका मैत्रिणीची आजी. नक्की शब्द आठवत नाहीत, पण महारांचा उल्लेख करताना त्यांची 'चेहराबोली' मला बरंच काही सांगून गेली होती. त्यावर मी प्रबोधनाचा थोडा प्रयत्न केला. मैत्रिणीला नंतर फोन करून 'महार जिथवर गेले तिथवरचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची एक व्याख्या आहे, म्हणजे आपल्या राज्याचं नावच महार लोकांवरून पडलं आहे हे तुझ्या आजीला सांग' असं सांगितलं. तिने ते आजीला सांगितलं की नाही माहीत नाही. माझ्या आजीशी या विषयावर बोलायचा प्रसंग नंतर कधी आला नाही. आता मात्र वाटतं की जातीच्या मुद्द्यावर एकदा तिला काही प्रश्न विचारून बोलतं करायला हवं होतं.

घरात कामाला ज्या बायका यायच्या त्यांच्याशी तिचे सलोख्याचे संबंध होते. (एकदा तिने आमच्या बाईंना अंडा करी करून आणायला सांगितली होती. याचं कारण म्हणजे आजीने एकदा अंडा करी केली होती आणि त्यात खोबऱ्याचा इतका मारा केला होता की ती उपासाची अंडा करी झाली होती! तिची चव आमच्या बाईंनी घेतल्यावर त्यांना अर्थातच 'या बामणांनी वाट लावलीय बैदा करीची!' असं मनात वाटून नैराश्य आलं असणार आणि म्हणून त्यांनी अंडा करी करून आणायची ऑफर दिली होती. ती आजीने स्वीकारली!) आपल्या घरात कुणी माणूस आपली कामं करतो/करते यात एक काहीतरी 'मूलभूत चूक' आहे इथवर माझा जो प्रवास झाला तो आजीचा झाला नव्हता. त्यामुळे सगळ्यांची छान संबंध असले तरी 'या बायकांचं असंच असतं, त्यांना भलती सूट देऊ नये' वगैरेवर तिचा आतून ठाम विश्वास होता. शिवाय 'पगार वेळेवर दिलाच पाहिजे. माझी एक तारीख कधी चुकत नाही. पण काम चोख व्हायला हवं. नसते लाड चालणार नाहीत' अशी स्पष्ट भांडवली भूमिका होतीच. पगार वेळेवर देतो हे चांगलंच आहे, पण पगार 'किती' असावा यावर तिचा वेगळा दृष्टीकोन अर्थातच नव्हता.

पन्नास वर्षांचं अंतर असणाऱ्या आम्हा दोघांबाबत विचार करताना मला वाटतं की जशी तिची मला कधीकधी 'कटकट' व्हायची तशी माझीही तिला होत असणारच. वेळेवर आंघोळ न करणं, मोजे न धुणं, 'हा शर्ट कुठे मळलाय?' ही कायमस्वरूपी भूमिका असणं, व्यायामाचा आळस करणं, रात्री उशीरा घरी येणं, कामात चालढकल करणं या सगळ्याचा तिला त्रास झाला असणारच. वीस-बावीस वर्षांच्या वयात प्रत्येकाला आजूबाजूच्या लोकांविषयी 'हे लोक असं का वागतात?' हाच प्रश्न सारखा पडत असतो. त्याची कारणंही सबळ असू शकतात, पण स्वतःकडे क्रिटिकली बघणं होत नाही कारण ते वयच एका अलौकिक मुग्धतेचं असतं. असो.

घरात आजी असणं याला एक अर्थ होता. एक परिमाण होतं. आजारी माणूस आणि त्याची सेवा हा एक स्वतंत्र विषय आहे. तो अनुभव आपल्याला पुष्कळ काही शिकवतो हा माझा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येकाने तो घ्यावा. तो अनुभव अगदी आनंददायकच असतो असं नाही, कारण आजारी माणसामध्ये जी स्वभाववैशिष्ट्ये विकसित होतात ती तापदायक असू शकतात. पण त्यातला आत्मिक आनंद फार मोठा आहे हे खरं. आजीच्या शेवटच्या आजारपणात तिचं सगळं करणं, तिला हळूहळू मृत्यूकडे जाताना बघणं यात अनेक गोष्टी गुंतलेल्या होत्या. त्या अनुभवावर तर स्वतंत्रपणेच लिहिता येईल. पण हिंडती-फिरती असतानाची आजी आठवली की हे परिमाण स्पष्ट होत जातं. जिवंत माणूस त्याच्या गुण-दोषांसह जिवंत असतो. पण माणूस 'असणं' अनेक शक्यतांना जन्म देतं. मग त्यात जिव्हाळा, संवाद, संघर्ष - सगळंच आलं. आजीबरोबर हे सगळं व्हायचं. संघर्षाचं प्रमाण कधी वाढत असलं तरी जो संवाद होता तो प्रामाणिक होता याचं मला बरं वाटतं.

आजीमध्ये जे आधुनिक आणि जुनाटपणाचं मिश्रण होतं त्याचं मला आश्चर्य वाटायचं. लग्न झाल्यावर एकदा केव्हातरी काही निमित्ताने आम्ही दोघांनी तिला वाकून नमस्कार केला तेव्हा आशीर्वाद देताना ती 'पहिला मुलगाच हवा आहे' असं ती स्पष्टपणे म्हणाली होती. आणि वर 'हो, मी स्पष्ट बोलतेय' हेही होतं. मी लग्नाआधीच आपल्याला मूल नको असा निर्णय घेतला होता आणि तसा प्रस्ताव हिच्यासमोर ठेवला होता. त्याला हिने लगेच मान्यताही दिली होती. अशा आशीर्वादानंतर कालांतराने आजीला आमचा हा निर्णय सांगितल्यावर तिला अर्थातच वाईट वाटलं होतं. पण मला अपेक्षित होती तितकी तिची प्रतिक्रिया तीव्र नव्हती. याबाबतीत मघाशी ज्या मैत्रिणीच्या आजीचा उल्लेख केला त्यांचाही एक किस्सा सांगण्यासारखा आहे. या मैत्रीणीला दोन मुली. दुसरी मुलगी झाल्यावर 'देव परीक्षाच बघत असतो' अशी आजीची प्रतिक्रिया. मुलगा होऊ दे असं मागणं मागणाऱ्या आजीचं तर्कशास्त्र असं की 'मुलगा काय अन मुलगी काय - दोन्ही सारखेच, पण मागताना चांगलंच मागावं की!' आजी लोकांचं हे 'मुलगा फिक्सेशन' एकूणच जबरदस्त! आणि मुलीवर प्रेम नाही असं नाही, पण त्यांच्या मेंदूचा एक कोपरा 'मुलगा झाला' या बातमीने जो उल्हसित होतो त्याला तोड नाही. माझ्या एका मित्राला पहिली मुलगी. दुसरा मुलगा. त्याला मुलगा झाल्याचं कळल्यावर माझ्या आजीचा चेहरा लक्षणीयरित्या खुलला आणि ती 'जिंकलं एकदाचं' असं म्हणाली होती! (हा आनंद अतिसूक्ष्म रूपात आजीनंतरच्या पिढीतल्या काही बायकांमध्येही असतो असं माझं निरीक्षण आहे.)

आजीला माझ्याबद्दल किती कळायचं याची मला शंकाच आहे. 'नोकऱ्यांची धरसोड करणारा' ही एक ओळख होती माझी. 'विद्वान' अशीही एक उपरोधिक ओळख (जे ती अर्थातच 'हा स्वतःला फार शहाणा समजतो' याला पर्याय म्हणून म्हणायची!) एखादा लेख कुठे छापून आला की ते मासिक कौतुकाने शेजाऱ्यांना, पाहुण्यांना दाखवायची. लेखात काय आहे हे तिला माहीत नसायचं. कविता वगैरे तर फारच दूरचा प्रांत. 'गाणं' तिला आवडायचं. 'कविता' तिच्या दृष्टीने बहुधा मुलीसारखी असावी!

आजी 'प्रथम व्यवहार, मग बाकी सगळं' यावर श्रद्धा असणारी आणि मी व्यवहाराचं महत्त्व (कदाचित नाईलाजाने) मानणारा, पण माणसातल्या उर्मींना पहिला मान देणारा. एक गोष्ट मात्र खरी की आजीचा हिशेबीपणा, नीटनेटकेपणा, शिस्त याचा मला फायदा झाला. त्या अर्थी ती मॅनेजमेंट गुरू होती! माझ्यातला कमालीचा विस्कळीतपणा आटोक्यात यायला आजीचं मोठं योगदान आहे.

आजीच्या पिढीतले बरेचसे लोक त्यांच्या शिस्तशीर जगण्यामुळे सुखी असावेत. किंवा शिस्तशीर जगणं हाच त्यांच्या आनंदाचा एक भाग असावा. टिळक टँकवर एकदा एक सीनियर काका भेटले होते. 'गेली वीस वर्षं रोज सकाळी सहा वाजता पोहायला येतो!' असं त्यांनी म्हटल्यावर त्यांच्याबद्दल मला एकदम कंटाळायुक्त आदर वाटू लागला होता. आजीच्या आखीव दिनक्रमाविषयी मला असंच काहीसं वाटायचं. मात्र एक उल्लेखनीय गोष्ट ही की तिने कधी कुठली तक्रार केली नाही. आपलं एकटीचं आयुष्य नीट आखून जगत राहिली. तिचं घराबाहेर पडणं बंद झाल्यावर तिचा घरातला दिनक्रम सुरू झाला होता. आम्ही दोघं दिवसभर बाहेर. घरात तिचे काही बारीक-सारीक उद्योग चालायचे. पुढे जेव्हा ती अगदी अंथरूणाला खिळली तेव्हाही 'कंटाळा येतो दिवसभर' असं कधीकधी म्हणायची ती अगदी सहज म्हणून, त्राग्याने अजिबात नाही. शेवटच्या दिवसात 'मला लवकर मरण येऊ दे म्हणून प्रार्थना करा' असं म्हणायची. मात्र दिनक्रम अचूक सुरू होता. तिला मी साधारण एक दिवसाआड आंघोळ घालायचो. आंघोळ झाली की नीट केस वगैरे विंचरून पावडर लावायची. टिकली लावायची. क्वचित केव्हातरी 'आज वडापाव आणतोस का?' अशी फर्माईशही व्हायची!

मी आईबरोबर जितकी वर्षं राहिलो त्याहून जास्त काळ आजीबरोबर राहिलो. अतिशय घट्ट धारणा असलेली आजी आणि सगळ्याच धारणा लवचीक असणारा मी. 'मग त्यात काय झालं?' हा माझा आवडता प्रश्न आणि 'हे असंच व्हायला पाहिजे' हे तिचं मत. आपण भारत देशात एका विशिष्ट वर्गात, विशिष्ट शहरात, विशिष्ट पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात राहतो म्हणून आपण 'विशिष्ट' घडलो, यात आपलं कर्तृत्व काय हा मला सतावणारा प्रश्न तर असे प्रश्न पाडून न घेता 'मी जे काही केलं ते माझ्या हिमतीवर. पैसे नव्हते तेव्हा काटकसर केली आणि पैसे साठवले. कुणाहीकडे काही मागितलं नाही' असं सांगत दिवाळी-होळीचे पैसे मागायला आलेल्यांना वाटेला लावणारी आजी. 'आहे हे काँम्प्लिकेटेड आहे' हा माझा विचार आणि 'आहे हे असं आहे' हा तिचा विचार. ती आजारपणात जेव्हा माझ्या मावशीकडे राहायला जायची तेव्हा तिला महिन्याचे पैसे द्यायची! तिच्या आजारपणातला सगळा खर्च तिच्याच खात्यातून झाला. म्हणजे अधिक पैसे लागले असते तर आम्ही होतोच, पण ते तसे लागलेच नाहीत. आणि याची नोंद मीही घेतली खरी!

दोन अनोळखी माणसांची भेट, दोन माणसांतला वाद, दोन समूहातला संघर्ष म्हणजे 'दोन विश्वांची' टक्कर असते. स्पष्ट विरोधी भूमिकांमध्ये तर हे दिसतंच, पण प्रेमाच्या नात्यांमध्येही हे दिसतं. आजीच्या शेवटच्या दिवसात तिच्याजवळ असताना मला काय वाटायचं? ती काही असामान्य व्यक्ती नव्हती. पण ती माझी आजी होती. सहवासाने माणसाच्या भावना बहुधा टोकदार होतात. आणि तो माणूस नाहीसा झाला की इतर टोकं बोथट होत जात आपुलकीचं टोक अधिक तीव्र होतं. आजी म्हणजे एक 'काळ', 'स्वभाव', 'पद्धत' असं बरंच काही होती. खरकट्या भांड्यात पाणी घालून ठेवावं, घासलेली भांडी वाळत टाकताना आत थोडी हवा जाईल अशा बेताने पालथे घालावीत, उद्या करायच्या कामांची यादी आज रात्रीच टेबलावर तयार असावी किंवा भिंतीवरच्या पाटीवर लिहिलेली असावी, कॅलेंडरचा उपयोग आपलं एक नवीन कॅलेंडर बनवण्यासाठी कसा करावा, घरातल्या वाणसामानाच्या डब्यांवर घारीसारखी नजर कशी ठेवावी, स्वयंपाकघरातलं लॉजिस्टिक्स कसं सांभाळावं, घड्याळ डोळ्यांना कसं बांधून घ्यावं, स्वछता म्हणजे नक्की काय अशा अनेक गोष्टी मी तिच्याकडून शिकलो. खाड्कन मनातलं बोलायचा स्पष्टवक्तेपणा सोडून!

तिला आजारपणात त्रास झालाच. पण खूप जास्त नाही. गँगरिनने एक पाय निकामी होऊ लागल्यावर त्याचा काही भाग कापायचा निर्णय आंम्ही घेतला आणि त्यानंतर काही दिवसातच ती गेली. ती गेल्याचं मला सकाळी तिला उठवायला गेलो तेव्हा कळलं. रात्रीत कधीतरी ती गेली. त्याआधी तिने मला हाक मारली असेल का? रात्री ती हाक मारायची किंवा जवळचं पाणी प्यायचं भांडं वाजवायची. त्या रात्री तिने हाक मारली नव्हती. भांड्याचाही आवाज ऐकू आला नव्हता. त्यामुळे तो प्रश्न मला त्रास देत राहिला. अस्वस्थ करत राहिला. अजूनही ते आठवलं की मला अस्वस्थ व्हायला होतं. ती जातानाच्या क्षणी मी तिच्याजवळ नव्हतो याचा त्रास होत राहतो.

आजीचा मृत्यू अनपेक्षित नव्हता. त्यामुळे ती गेल्यानंतर आम्हाला कुणाला खूप धक्का असा बसला नाही. एखादा अपेक्षित मृत्यू झाल्यावरही जेव्हा लोक खूप रडतात तेव्हा मला त्याचं काहीसं आश्चर्य वाटतं. अर्थात ते रडणं खरोखरीच मनापासून असेल तर चांगलंच. बरेच दिवस अंथरूणाला खिळलेला माणूस जातो तेव्हा त्याची सेवा करणाऱ्यांना सुटल्यासारखं वाटत असणार हेही सत्य आहे. मला तसं वाटलं का? याचं प्रामाणिक उत्तर 'हो' असं द्यावं लागेल. पण माणसाचं 'वाटणं' इतकं एकरेषीय नसतंच. अमुक घटनेनंतर 'तुम्हाला काय वाटलं?' हा फार अवघड प्रश्न आहे. 'आता आजी नाही' याचा संबंध फक्त 'आता आपलं काम कमी झालं' याच्याशीच फक्त नव्हता. मला तीव्रतेने वाटलं ते हे की आपल्याकडून ती आजारपणात कधी दुखावली तर गेली नसेल ना? आणि तसं झालं असेल तर तिने परत यावं. मी पुन्हा सगळं व्यवस्थित करेन. हे वाटणं अर्थातच तर्काच्या पलिकडचं. पण तर्काच्या पलीकडेच बहुधा आपण स्वतःशी खरं बोलतो! विद्युतदाहिनीत नेईपर्यंत मी अगदीच शांतपणे सगळं करत होतो. रात्री झोपताना मात्र मला तिच्या आठवणीने काहीतरी वेगळं वाटू लागलं. ती असताना घरात देव होते. ती पूजा करायची. मी लहानपणी केव्हातरी पूजा केली असेल. नंतर भावाचा संपूर्ण अभाव निर्माण झाला आणि देवपूजा हा समीक्षेचा विषय बनला. पण आजी गेल्यावर मी तिचा फोटो फ्रेम करून भिंतीवर लावला आणि अनेक वर्षांनी प्रथमच कुठल्यातरी फोटोपुढे हात जोडले. मुख्य म्हणजे ते करताना मला कमालीचं शांत वाटत होतं. मला ते मनापासून करावसं वाटत होतं. माणसाचं पृथ्वीवर असणं हा उत्क्रांतीचा एक भाग आहे आणि त्यामागे कुठलंही प्रयोजन नाही ही माझी धारणा आहे. (तीही अर्थात लवचीक आहे!) आपल्या अस्तित्वाबाबत विचार करताना उत्क्रांतिवाद दाखवतो ती दिशा मला योग्य वाटते. त्यातून कदाचित सगळीच्या सगळी उत्तरं मिळत नसली तरी. शरीर आणि जाणीव यासह असलेलं सजीवांचं अस्तित्व जडातूनच विकसित झालं आहे हे मला पटतं. मात्र 'जाणीव' ही गोष्ट आपल्याला आपल्याचपासून काहीसं वेगळं पाडते खरी. जाणीव हीदेखील जडातूनच आली आहे हे पटतं, पण जाणीवच बहुधा वेगवेगेळे प्रश्नही उपस्थित करते. आज आजीचा फोटो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तिची आठवण आली की मी तिच्या फोटोला हात लावून नमस्कार करतो. 'नमस्कार करणे' ही क्रिया आपोआप झाल्यासारखी होते. काही क्षण डोळे मिटतो. त्यावेळी मला एक अव्यक्त जोडलेपण जाणवतं. शांतपणे कॉटवर पाय हलवत बसलेली आजी आठवते. तिचे खास टोमणे आठवतात. आजारपणातली तिची असहायता आठवते. आणि अखेरीस तिच्या माझ्या नात्यातलं सगळं पुसलं जाऊन तिच्याविषयीचं प्रेम उरतं. हे सगळं होत असताना मला वाटतं की मी थोडा माझ्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेर येतो. आणि कदाचित तिथे थोडा वेळ असायला मला आवडतं.

आजीला आम्ही 'इन्ना' म्हणायचो. आमचं (म्हणजे आजीचं) घर पुण्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी असल्याने मित्रांना जमण्यासाठी सोयीचं होतं - आहे. कॉलेजच्या दिवसांपासून 'इन्नाच्या घरी जमू' हे परवलीचं वाक्य होतं. आजही क्वचित तसं म्हटलं गेलं की मला बरं वाटतं. 'इन्नाचं घर' ही आमच्या घराची ओळख आहे. 'शेरलॉक' या बीबीसीवरील मालिकेत (अ स्कँडल इन बेलग्रॅव्हिया) मिसेस हडसनला होम्सच्या शत्रूकडून इजा झाल्यावर वॉटसन सुचवतो की त्यांनी काही दिवस दुसरीकडे राहायला जावं. त्यावर होम्स म्हणतो, "मिसेस हडसनने बेकर स्ट्रीट सोडायचा? नो! इंग्लंड वुड फॉल!" इन्नाचं तिच्या घरात असणंही काहीसं असंच आहे. त्या घरात तिला सर्वस्वी अनोळखी असे मार्क्स आणि आंबेडकर आलेले आहेत, देव नाहीसे झालेले आहेत. विचारांच्या पातळीवरचा माझा प्रवास तिच्या दृष्टीने दूरचा झाला असला तरी आमचं घर नाव घेताना तरी 'इन्नाचं घर' म्हणूनच ओळखलं जाईल. का ते माहीत नाही, पण मी तिच्याहून वेगळा असलो तरी माझीही ती मूक इच्छा आहे. याचं कारण बहुधा असं असावं की तसं नाही झालं तर द हाऊस मे नॉट फॉल, बट आय वुड फील लिटल पेन!

Node read time
12 minutes
12 minutes

राजेश घासकडवी Tue, 04/02/2014 - 15:51

तुकड्यातुकड्यांतून दिसणारं आजीचं चित्र आवडलं. हे तुकडे तर्कनिष्ठ स्वच्या खिडकीच्या चौकटीतून, त्यावरच्या गजांच्या सावल्यांनी तुटून आत येणाऱ्या कवडशांसारखे आणि आतून बाहेर नजरेला पडणाऱ्या भिंतीवरच्या चित्रांसारखे दिसतात. हे एका अर्थाने लेखाचं बलस्थान आणि कच्चा दुवा, दोन्ही आहे. लेखकाच्या प्रकृतीशी बहुतांशी विरोधाभासी विचार बाळगणाऱ्या आजीचे काही चकित करून जाणारे प्रश्न लेखकाच्या वैचारिक बैठकीच्या शेजारी ठेवल्यामुळे खुलून दिसतात - कधी कॉंट्रास्टमुळे तर कधी बेमालूम संगतीमुळे. हे बलस्थान. कच्चा दुवा अशासाठी म्हटलं की 'मला दिसलेली आजी' हे चित्र दाखवताना कधी कधी लेखकाचा चष्मा थोडा पुढे येतो, एखाद्या पदार्थात लसूण पुढे यावा तसा. काही ठिकाणी भावनेचा ओलावा जास्त होईल की काय, आपल्या वैचारिक बैठकीला विसंगत ठरेल की काय अशी शंका आल्यासारखं वाटलं. पण लिखाण करताना चष्म्यांचे फायदे होतात तसेच तोटेही.

प्रकाश घाटपांडे Tue, 04/02/2014 - 16:30

In reply to by राजेश घासकडवी

काही ठिकाणी भावनेचा ओलावा जास्त होईल की काय, आपल्या वैचारिक बैठकीला विसंगत ठरेल की काय अशी शंका आल्यासारखं वाटलं.

येस्स! अनेक पुरोगाम्यांमधे आपले वर्तन वा लिखाण हे आपल्या विवेकवादी अश्रद्ध प्रतिमेशी विसंगत होईल की काय असे भय असते. काही लोक ते कबूल करतात काही लोक नाही. प्रतिमांमधे अडकण्याचे भय हे मला नेहमीच वाटत.

बॅटमॅन Tue, 04/02/2014 - 17:33

In reply to by प्रकाश घाटपांडे

येस्स! अनेक पुरोगाम्यांमधे आपले वर्तन वा लिखाण हे आपल्या विवेकवादी अश्रद्ध प्रतिमेशी विसंगत होईल की काय असे भय असते. काही लोक ते कबूल करतात काही लोक नाही. प्रतिमांमधे अडकण्याचे भय हे मला नेहमीच वाटत.

काका द मार्मिक!!!!

मन Tue, 04/02/2014 - 18:09

In reply to by बॅटमॅन

विवेकवाद्यांच्या कंपूतील छुप्या भाविकांचा निषेध असो. किंवा :-
विवेकवाद्यांच्या अस्तनीतील छुप्या भाविकांना उघडं पाडलच पाहिजे.
.
.
(स्वतःला भाविकांच्या कंपूतील छुपा विवेकवादी समजणारा ) मनोबा

बॅटमॅन Tue, 04/02/2014 - 18:21

In reply to by मन

विवेकवाद्यांच्या कंपूतील छुप्या भाविकांचा निषेध असो. किंवा :-
विवेकवाद्यांच्या अस्तनीतील छुप्या भाविकांना उघडं पाडलच पाहिजे.

अरे अरे अरे, त्यांनाही आपलं म्हणा.

पण तो ताण दिसतो खरा. रावसाहेब म्हणतात त्याप्रमाणे ही बाजू अंमळ कुचकुचतच स्वीकारली जाते.

मन Tue, 04/02/2014 - 15:52

लिखाण आवडलं.
आजी ब्राह्मण असून अंडाकरी करत असे म्हणजे तुम्ही म्ह्णता तसं ते आधुनिक - परंपरा ह्यांचं मिश्रण असणार.
(खरं तर आपण सगळेच अशी मिश्रणच असतो. एक माणूस एका बाबतीत पुढारलेला , पोक्त वगैरे असला, तरी तोच माणूस वेगळ्या फूटपट्टीवर भलताच खुजा किम्वा बराच वेगळा ठरु शकतो. )

ऋषिकेश Tue, 04/02/2014 - 16:23

न बघितलेल्या आजी आवडल्या - पोचल्या आणि जाण्याचे वाईटही वाटले.
लेखाचेवटचे दोन परिच्छेद तर कळसाध्यायच -- फारच 'जमून आलेत'.
मस्त!

बिपिन कार्यकर्ते Tue, 04/02/2014 - 17:09

.

मी Tue, 04/02/2014 - 17:25

लेखात शांता शेळकेंच्या 'वडीलधारी माणसे' मधील 'वहिनी' भेटत राहिली, माझा वाचक म्हणून तो एक कमीपणा असू शकेल.

मिसळपाव Tue, 04/02/2014 - 19:00

वाचनखूण साठवली आहे. नेमक्या, साध्या शब्दात बरंच काहि मांडलं आहेस. माझ्या आजीची आठवण करून दिलीस.

...अतिशय घट्ट धारणा असलेली आजी आणि सगळ्याच धारणा लवचीक असणारा मी. 'मग त्यात काय झालं?' हा माझा आवडता प्रश्न आणि 'हे असंच व्हायला पाहिजे' हे तिचं मत....

अशी काहि वाक्य फारच ओळखीची वाटली!

सुचिता Tue, 04/02/2014 - 21:58

खुपच आवडलं ... आजी चे व्यक्तीमत्व तसे गुंतागुंतीचे आहे आणि ते तुम्ही मस्त च रंगवलेले आहे. लेख वाचून माझ्या आजी ची आठवण झाली. ती बरीच वेगळी होती तरीही .

सुचिता Tue, 04/02/2014 - 21:58

खुपच आवडलं ... आजी चे व्यक्तीमत्व तसे गुंतागुंतीचे आहे आणि ते तुम्ही मस्त च रंगवलेले आहे. लेख वाचून माझ्या आजी ची आठवण झाली. ती बरीच वेगळी होती तरीही .

उत्पल Thu, 06/02/2014 - 11:21

प्रतिसादाबद्द्ल सर्वांचे मनापासून आभार...

राजेश, तुझं विश्लेषण पटलं...माझा चष्मा थोडा जास्त पुढे आला आहे. पण भावनेचा ओलावा मी जाणीवपूर्वक कमी केला आहे असं मात्र नाही. आजी गेल्यावर मी आजवर रडलो नाही. पण मला तिची आठवण येते, भावनाविवश व्हायला होतं हे खरं आहे.

प्रकाश घाटपांडे, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. म्हणूनच आपल्याला जे वाटतं ते प्रामाणिकपणे सांगावं असा मी प्रयत्न करतो...आजीच्या फोटोपुढे हात जोडल्यावर मला बरं वाटलं हे मी त्यामुळेच आवर्जून लिहिलं...

राजेश घासकडवी Thu, 06/02/2014 - 11:30

In reply to by उत्पल

पण भावनेचा ओलावा मी जाणीवपूर्वक कमी केला आहे असं मात्र नाही.

जगणारे आपण आणि लेखनातून इतरांच्या मनात तयार होणारी प्रतिमा या दोन वेगळ्या गोष्टी असतात. लोकांपर्यंत पोचताना आपली लेखनाची जातकुळी आणि ते वाचताना त्यावर लोकांचे स्वतःचे चष्मे अशा दुहेरी फिल्टरमधून मूळ भावना जातात. कुठल्याही माध्यमासाठी हे खरं आहे. तेव्हा गैरसमज नसावा. मी जे लिहिलंय ते या विशिष्ट लेखाविषयी.

सुमित Thu, 06/02/2014 - 15:41

मस्तंच... आवडला लेख खूप...
वाचून "माझी आजी" आठवली मला... डोळे काहीसे पाणावले देखील... खूप साधर्म्य आहे या घटनांमध्ये...

धन्यवाद...

सोकाजीरावत्रिलोकेकर Fri, 07/02/2014 - 17:39

भावनाविवश व्हायला होतं हे खरं आहे.

त्या भावना तंतोतंत पोहोचवण्यात लेख अगदी यशस्वी झाला आहे. छान आणि ओघवते!

- (आज्जीचा [दोन्ही] सहवास न लाभलेला) सोकाजी

ॲमी Fri, 07/02/2014 - 18:27

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

- (आज्जीचा [दोन्ही] सहवास न लाभलेला) सोकाजी
>> मी पण तुमच्यासोबत :-).
तरी आमचा एक फंडा आहे, पेसिमिस्ट म्हणा हवं तर its always better not to have relationship than to have a bad one.

मन Fri, 07/02/2014 - 18:30

In reply to by ॲमी

you will missout the flavor in your life then.

बॉस,
जीवन आहे, तिथं वेदना आसणारच.
संवेदना ह्या शब्दातच वेदना अंत्॑र्भूत आहे. जिवंत असण्याचं ते लक्षण आहे.
सोडून देता येत नाहित गोष्टी अशा.
(भाकरी करताना पोळूनही पुन्हा भाकरी करण्यास व खाण्यास तयार असणारा ) मनोबा

बॅटमॅन Fri, 07/02/2014 - 18:32

In reply to by मन

जरूरी नाही आजिबात. करपलेले नाते असेल तर तसा अनुभव नकोच असे वाटणे साहजिक आहे अगदी. तू करतोस तसा जेनेरिक दावा करणे बरोबर नाही.

मन Fri, 07/02/2014 - 18:42

In reply to by ॲमी

मी कुथे दवणे किंवाअ साने ....
खयं इंद्राचो ऐरावत नि खयं शामभट्टानु तट्टाणी ....
मी तसं काही बनलो तर बक्कळ पैसा नक्की कमावेन उपदेश करुन.

नंदन Sat, 08/02/2014 - 09:41

In reply to by बॅटमॅन

>>> अर्र बाकी असूदे पण अनुस्वार ख वर असतो बे, य वर नै (लोळून हसत)
+१

छिद्रान्वेषी मोड सुरू>

शिवाय शामभट्टानु हे संबोधन झाले. मालवणीतही 'शामभट्टाची' असाच षष्ठीचा प्रत्यय आहे.

छिद्रान्वेषी मोड समाप्त>

बॅटमॅन Sat, 08/02/2014 - 15:52

In reply to by नंदन

अन षष्ठीचा प्रत्यय 'नु' लावला तर अपरांतापेक्षा गुर्जरी प्राकृत होते. शिवाय अपरांतात शामभटांनु असे अनुस्वारयुक्त संबोधनच वापरतील, नैका?

-व्याक्रणस्पार्टन.

'न'वी बाजू Sat, 08/02/2014 - 04:25

In reply to by मन

दवण्यांबद्दल कल्पना नाही, पण सानेगुरुजींनी उपदेश करून बक्कळ पैसा कमावला असावा असे वाटत नाही.

(दवण्यांबद्दलही साशंकच आहे.)

मन Sat, 08/02/2014 - 16:00

In reply to by 'न'वी बाजू

त्यांनी नसेल्ल कमावला. पण त्यांच्या बाळबोध क्लासेस एक विशिष्ट फॅन फॉलोइंग होतं.
तर हल्ली असे बाळबोध धडे द्यायचेही पैसे घेतात; कधी कन्सल्टन्सीच्या नावानं तर कधी काउन्सिलिंगच्या नावानं.
संस्कार वर्गाला चाटे कोचिंग क्लासेस सारखं ब्रॅण्दिंग करावं असं कैक दिवसापासून मनात आहे.

ऋषिकेश Mon, 10/02/2014 - 10:41

In reply to by मन

जीवन आहे, तिथं वेदना आसणारच.
संवेदना ह्या शब्दातच वेदना अंत्॑र्भूत आहे. जिवंत असण्याचं ते लक्षण आहे.
सोडून देता येत नाहित गोष्टी अशा.

ज्ञानामृत हा पाजी! हा पाजी पाजी पाजी!! ;) (साभार पुलं)

बॅटमॅन Mon, 10/02/2014 - 12:48

In reply to by ऋषिकेश

ज्ञानामृत हा पाजी! हा पाजी पाजी पाजी!!

मास्तर पाजी! किती तरी पाजी! अहो ज्ञानामृत पाजी!

एतत्सदृश व्हर्जन वाचल्याचे स्मरते.

ऋषिकेश Mon, 10/02/2014 - 14:17

In reply to by बॅटमॅन

आभार. माझी अक्षरी स्मरणशक्ती अगदीच तकलादु आहे.
इथे सगळा फोटोग्राफिक मामला असल्याने तुझे बरोबर असण्याची शक्यता प्रबळ! :)

राजेश घासकडवी Mon, 10/02/2014 - 14:25

In reply to by बॅटमॅन

ते चिं. वि. जोशींच्या चिमणरावाचे चऱ्हाटमध्ये आहे बहुतेक. माझा सेकंडचा प्रवास. त्यात त्याला एक भाषण न देता येणारा माणूस भेटतो, आणि चिमणराव त्याच्या जागी भाषण द्यायला जातो. त्याच्यासमोर पोरं आळवून आळवून म्हणतात.

'हैबतखान पठाण पाजी... कितीतरी पाजी... कितीतरी पाजी...
ज्ञानामृत सर्वांना... '

तेव्हा हैबतखान बनून गेलेला चिमणराव हसत असतो, आणि खरा हैबतखान रागाने लाल होतो असं काहीतरी आहे.

बॅटमॅन Mon, 10/02/2014 - 14:27

In reply to by राजेश घासकडवी

एक्झॅक्टलि!!!! ते पुलंच्या पुस्तकात नाही असे वाटत होते, पण नक्की कुठे ते लक्षात नव्हते. धन्यवाद गुर्जी!

ऋषिकेश Mon, 10/02/2014 - 17:02

In reply to by बॅटमॅन

मी म्हणतोय ते पुलंच्याच कोणत्याशा प्रयोगात आहे.
ते प्रमुख पाहुणे असतात, त्याच्या स्वागतगीतात त्या ओळी येतात.

मयुरा Sat, 08/02/2014 - 04:09

आज्जी आवडुन गेली.

आता एका आजी ला चार ने गुणा म्हणजे एक मोठी गँग तयार होते तसं काहीसं माझं होतं. दोन्हीही आजी आणि आजोबा वयाच्या वीस वर्षांपर्यंत होते.
जाती विषयक मतांवर पूर्ण सहमती. घरी आलेल्या प्रत्येकाची आडनावावरुन ओळ्ख परेड व्हायची. एकदा आडनाव कळलं की गळ्यातुन येणारे अस्पष्ट हुंकार बरचं बोलुन जायचे.
पण काही इलाज नव्हता. भाव, भावना, संघर्ष ह्यांनी किती ही टोक गाठलं तरी नेहमीच आधार वाटावा अशीच व्यक्तीमत्व होती. पॅकेज डील जबरदस्त होतं.

--
मयुरा.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/02/2014 - 08:22

लेख आवडला आणि फक्त लाईकची प्रतिक्रिया देणं जीवावर आलं. न देण्यापेक्षा ते बरं म्हणून तेवढं लिहीते.

शेवटचे दोन परिच्छेद माझ्या वर्तनाच्या, स्वभावाच्या अगदी उलट असले तरीही आवडले.

नंदन Sat, 08/02/2014 - 09:42

आवडला. आजीइतकाच स्वतःकडेही पाहणारा.