Skip to main content

सूर्य - १

सूर्य हा आपल्या सगळ्यात जवळचा तारा. सूर्याला अनेक प्राचीन संस्कृतींमधे देवाचे रूप दिलेले आहे; आणि सर्वांनाच आपले अस्तित्त्व सूर्यामुळे आहे याची जाणीव होती. सूर्याच्या शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यासालाही बराच मोठा इतिहास आहे. या लेखमालेतून हा इतिहास न पहाता सूर्याची थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

हा फोटो आहे सूर्याच्या "शांत" पृष्ठभागाचा. सूर्याचा "शांत" पृष्ठभाग असा रवाळ का दिसतो, "अशांत" पृष्ठभाग कसा दिसतो, याचे कारण अर्थातच सूर्याच्या आतल्या भागात ज्या घडामोडी चालतात ते आहे. ही कारणे समजून घेण्यासाठी सूर्याच्या अंतर्भागाची माहिती करून घेऊ.

पण सूर्यावर आपल्याला दिसतं त्याहीपेक्षा सूर्याच्या अंतर्भात अनेक जास्त घडामोडी चालतात, त्याचाही विचार या लेखमालेत करू. या लेखात आपण सूर्याच्या अंतर्भागाची ढोबळ रचना कशी असते ते पाहू.

सूर्याच्या अभ्यासातून ताऱ्यांबद्दलच्या अनेक गोष्टींचा अभ्यास करता येतो. उदा: ताऱ्यांमधे कोणत्या प्रक्रियेतून ऊर्जा तयार होते, ऊर्जेचे वहन कोणत्या प्रकारे होते, चुंबकीय क्षेत्राचा ताऱ्यावर काय परिणाम होतो, इ. ताऱ्यांंच्या केंद्रात चार हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियमचा अणू बनतो. ही प्रक्रियाही एका वाक्यात सांगता येईल पण आपण इथे थोड्या विस्ताराने समजून घेऊ. त्यासाठी आधी आपण अणूच्या आतल्या रचनेबद्दल अगदी थोडक्यात माहिती घेऊ या.

आकृती क्रमांक १: हायड्रोजन आणि हेलियम अणूंची रचना

प्रत्येक मूलद्रव्य, उदा. ऑक्सिजन, कार्बन, लोखंडं, तांबं, सोनं, चांदी, हे अणूंचे बनलेले असतात. अणूचे आणखी छोटे तुकडे करता येत नाहीत असा समज खूप काळापर्यंत होता, जो चॅडविकने इलेक्ट्रॉनचा शोध लावल्यावर पूर्णतः मागे पडला. अणूची रचना कशी असते याचे कार्टून बाजूच्या चित्रात आहे. डाव्या बाजूच्या चित्रात हायड्रोजनच्या अणूचे चित्र आहे. त्या अणूच्या केंद्रात एक प्रोटॉन असतो. प्रोटॉनवर एक एकक एवढा धनभार असतो. हायड्रोजच्या अणूचे केंद्र एक प्रोटॉन एवढेच असते. त्याच्याबाहेर एक इलेक्ट्रॉन केंद्राभोवती प्रदक्षिणा घालत असतो. इलेक्ट्रॉनवर एक एकक, म्हणजे प्रोटॉनएवढाच, पण ऋणभार असतो. म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवर अगदी उलट भार असतात. याशिवाय अणू केंद्रात न्यूट्रॉन हा ही कण असतो (हायड्रोजन वगळता इतर सर्व अणूकेंद्रांमधे हा कण असतो.) न्यूट्रॉनवर कोणताही भार नसतो.

या तिन्ही कणांपैकी न्यूट्रॉन हा कण सगळ्यात जड असतो, किंवा त्याचे वस्तूमान सगळ्यात जास्त असते (साधारण ०.००० ... अशी २७ शून्य आणि १६ एवढे, किंवा १.६ X १०-२७ किंवा १.६ गुणिले दहाचा वजा सत्तावीसावा घात!), त्याखालोखाल प्रोटॉनचे वस्तूमान भरते. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे वस्तूमान जवळजवळ सारखीच आहेत. इलेक्ट्रॉनचे वस्तूमान मात्र खूप कमी असते. इलेक्ट्रॉन प्रोटॉनपेक्षा साधारण २००० पट हलका असतो.

आकृती क्र १मधे उजवीकडे हेलियमचा अणू दाखवला आहे. मूलद्रव्यांमधले हे दोन अणूक्रमांकाचे द्रव्य. हेलियमच्या अणूत प्रत्येकी दोन इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. मूलद्रव्यांचे वर्गीकरण त्याच्या केंद्रात किती प्रोटॉन्स आहेत त्यावरून केलं जातं. हायड्रोजनच्या केंद्रात एक प्रोटॉन म्हणून त्याचा अणूक्रमांक एक, हेलियमच्या केंद्रात दोन प्रोटॉन म्हणून हेलियमचा अणूक्रमांक दोन. जर एखाद्या हायड्रोजनच्या अणूकेंद्रात एका प्रोटॉनबरोबर एक न्यूट्रॉन आला तरीही ते केंद्र हायड्रोजनचंच रहातं, आणि त्याला जड हायड्रोजन किंवा ड्यूटेरियम असं म्हणतात. या साठी वैज्ञानिक संज्ञा आहे समस्थानिक. ड्यूटेरियम हे हायड्रोजनचं समस्थानिक (isotope = अणूकेंद्रातली प्रॉटॉन्सची संख्या समान पण न्यूट्रॉन्सची संख्या असमान) आहे.

उजवीकडे दिलेल्या आकृतीत (चित्र विकीपीडीयावरून घेतलेलं आहे.) दाखवल्याप्रमाणे यात सुरूवातीला दोन हायड्रोजनचे अणू (इथे प्रत्येक ठिकाणी दोन प्रोटॉन्स असंही समजता येईल) एकत्र येतात आणि त्यातून एक न्यूट्रीनो (या कणांचे वस्तूमान नगण्य असते) आणि एक पॉझिट्रॉन (इलेक्ट्रॉनचा प्रतिकण/antiparticle) बाहेर पडतो आणि मुख्य घटक बनतो तो म्हणजे ड्यूटेरियमचे किंवा जड हायड्रोजनचे केंद्रक.

आकृती क्रमांक २: हायड्रोजन फ्यूजनचे कार्टून

या ड्यूटेरियमच्या केंद्रात एका प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो (साध्या हायड्रोजनमधे फक्त एक प्रोटॉनच असतो.) या ड्यूटेरियमबरोबर एक प्रोटॉन (साधा हायड्रोजन) एकत्र येतो आणि त्यातून पुन्हा एक प्रकाशकण (photon) बाहेर पडतो आणि मुख्य घटक बनतो तो म्हणजे ट्रीटीयम अथवा सर्वात जड हायड्रोजनचे केंद्र, यात असतात दोन न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन. अशी दोन ट्रीटीयमची केंद्रके एकत्र येतात आणि मुख्य घटक बनतात हेलियमचे एक केंद्रक आणि दोन साध्या हायड्रोजनची केंद्रके अथवा दोन प्रोटॉन्स. एकूण सहा प्रोटॉन्स एकत्र येऊन त्यातून दोन पॉझिट्रॉन्स, दोन न्यूट्रीनोज, दोन प्रोटॉन्स, एक हेलियमचे केंद्रक आणि ऊर्जा बाहेर पडते. यातली ऊर्जा वगळता इतर सर्व कणांचे वस्तूमान पाहिली असतात प्रक्रियेच्या शेवटी ०.७% (म्हणजे एक हजारात सात भाग) वस्तूमान कमी पडतं आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर होतं. हेच सूर्य आणि इतर सुस्थितीतल्या पण साधारण सूर्याएवढं वस्तूमान असणाऱ्या ताऱ्यांचे इंजिन. इतर जड ताऱ्तांच्या इंजिनाची सविस्तर माहिती आपण नंतर घेऊ.

या ऊर्जेचे वहन दोन प्रकारांनी होते. केंद्राच्या जवळ प्रारण (radiation) क्रियेद्वारे ऊर्जेचे वहन होते. सूर्याच्या त्रिज्जेच्या सर्वात आतल्या एक चतुर्थांश भागात सूर्याचे केंद्र आहे. गाभ्याच्या बाहेरच्या बाजूस ऊर्जेचे वहन प्रकाशकणांच्या रूपात होतं. प्रकाश दोन रुपांमधे असू शकतो, तरंग किंवा कण. त्याचं कणस्वरूप म्हणजे फोटॉन्स. हे फोटॉन्स सूर्याच्या गाभ्यातली ऊर्जा वाहून प्रारण विभागामधून अभिसरण विभागाच्या तळाशी आणतात. प्रारण विभागात हायड्रोजनच्या अणूंवर हे प्रकाशकण आदळतात, हायड्रोजनचे अणू प्रकाशकणांमधली थोडी ऊर्जा शोषून घेतात आणि प्रकाशकणांच्या प्रवासाची दिशा बदलते. हा दिशाबदल घडत नसता तर हे अंतर कापण्यासाठी प्रकाशकणांना काही सेकंदही लागले नसते, त्याऐवजी काही लाख वर्ष लागतात. आणि प्रकाशकणांची ऊर्जा कमी होऊन, गॅमा किरणांच्या स्वरूपात असणारी ऊर्जा दृष्य प्रकाशाच्या स्वरूपात दिसते. प्रारण विभागाच्या बाहेर सूर्यामधल्या वायूची, हायड्रोजनची घनता कमी होते त्यामुळे बाहेर वेगळ्या प्रकारे ऊर्जावहन होते.

आकृती क्रमांक ३: सूर्याच्या अंतर्रचनेचे कार्टून

आकृती क्रमांक ३ मधे दाखवल्याप्रमाणे, बाहेरच्या भागात ऊर्जेचे वहन अभिसरण (convection) या प्रकाराने होते; ज्या प्रकाराने पाणी उकळताना ऊर्जेचे वहन होते त्याला अभिसरण असे म्हणतात. खालच्या भागातल्या द्रव्याला ऊर्जा मिळाली की ते गरम होऊन वरच्या भागात येते आणि वरच्या भागातले थंड द्रव्य खाली जाते. यामुळे पाणी उकळताना बुडबुडे दिसतात तसेच बुडबुडे सूर्याच्या पृष्ठभागावरही दिसतात. वरच्या फोटोत सूर्याचा 'दाणेदार' पृष्ठभाग दिसत आहे. हे सर्व convection bubbles आहेत. जो भाग जास्त पांढरा आहे तिथे जास्त ऊर्जा आणि उष्णता आहे आणि काळसर भाग पांढऱ्या भागाच्या मानाने थंड आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान आहे ५००० केल्व्हीन. तुलना करायची असल्यास पाणी १०० सेल्सियस, म्हणजे ३७३ केल्व्हीन या तापमानाला उकळते. लोखंड १८११ केल्व्हिनला वितळते आणि ३१३४ केल्व्हीनला लोखंडाची वाफ होते. (केल्व्हीन या एककात तापमान सांगताना अंश केल्व्हीन असं म्हणण्याची पद्धत नाही.) या अभिसरण विभागाचेही तीन भाग पडतात. त्यात सर्वात खाली मोठे बुडबुडे असणारा भाग असतो आणि वर सर्वांत कमी उंचीचे बुडबुडे असतात. हाच सूर्याचा आपल्याला नेहेमी दिसणारा पृष्ठभाग.

पुढच्या भागात आपण सूर्याचा "अशांत" पृष्ठभाग कसा दिसतो आणि तो तसा का असतो याची माहिती घेऊ.

पूर्वप्रकाशित लेखनाचे संकलन
पुढचे भाग: सूर्य - २ सूर्य - ३ सूर्य - ४

धाग्याचा प्रकार निवडा:

नरेंद्र गोळे Sat, 17/12/2011 - 14:43

अदिती,

लोकप्रबोधनार्थ लिहिलेल्या एका नव्या तांत्रिक मालिकेचे सहर्ष स्वागत!

"शांत" पृष्ठभागाचे चित्र असे म्हणून चालणार नाही. साध्या डोळ्यांनी पाहिल्यावर असे दिसत नाही. कशाने पाहिल्यावर चित्र असे दिसते ते सांगायला हवे.

कार्टून म्हणजे काय? सादरीकरण, आविष्करण, प्रकटन, अभिव्यक्ती, चित्रण, रेखाटन की आणखी काही?
कार्टून म्हणजे सामान्यांच्या परिभाषेत व्यंगचित्र! तुम्हालाही तेच म्हणायचे आहे काय?

ट्रीटीयम म्हणजे काय? तुम्हाला ट्रिशियम म्हणायचे आहे काय?

फोटॉन म्हणजे प्रकाशकण! त्याला प्रकाशकण असेच संबोधता येणार नाही का?

नव्या मालिकेच्या सहजसोप्या भाषेतील सुरस लेखनास हार्दिक शुभेच्छा!

मन Sat, 17/12/2011 - 16:22

"सूर्य" ह्या अगदि "hot" आणि nuclear fusion ह्या अगदि "स्फोटक" विषयाला हात घातलास की. :)
मस्तय लेख.

स्मिता. Sat, 17/12/2011 - 16:50

धाग्याला श्रेणी देता येत नाही म्हणून इथे दिलीये. सुरुवात वाचून पूर्ण लेखमाला वाचण्याची उत्सुकता वाटतेय.

बहुतेक ठिकाणी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत शब्द लिहिलेलेच असले तरी काही ठिकाणी फक्त मराठी संज्ञा वापरल्या आहेत. त्यांच्यापुढे किमान एकदा कंसात इंग्रजीतूनही लिहिल्यास आम्हाला असलेल्या तोकड्या ज्ञानासोबत रिलेट करता येईल.

सानिया Mon, 19/12/2011 - 00:51

मागे एकदा सूर्यावर ३डी चित्रपट पाहिला होता त्याची आठवण झाली. मुलांना चाचून दाखवले पाहि़जे!

पुलेशु!

ऋषिकेश Mon, 19/12/2011 - 09:06

छानच! माहितीपूर्ण आहे.
वर नरेंद्र गोळे यांनी म्हटल्याप्रमाणे जे सोपे तांत्रिक शब्द आहेत ते मराठीत देता येतील. शिवाय स्मिता यांच्या सुचनेसुसार इंग्रजी शब्द (देवनागरीत)कंसात लिहिले की अर्थ लगेच कळेल.

आकृत्यांसाठी घेतलेली मेहनत उठून दिसतेय. चित्रांचा स्रोत सांगण्याची पद्धतही अनुकरणीय.

आनंद घारे Tue, 20/12/2011 - 17:25

सूर्याच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची संधी या लेखाने दिली आहे.

"खालच्या भागातल्या द्रव्याला ऊर्जा मिळाली की ते गरम होऊन वरच्या भागात येते आणि वरच्या भागातले थंड द्रव्य खाली जाते"
असे अभिसरणाबद्दल लिहिले आहे. सूर्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास अभिसरण विभागामधील तुलनात्मक आतल्या भागातील द्रव्य ऊष्ण झाल्यामुळे प्रसरण पावून हलके होते आणि बाहेरच्या भागाकडे जाते आणि बाहेरच्या भागातले कमी ऊष्णतामान व जास्त घनता असलेले द्रव्य आतल्या बाजूला जाते असे म्हणता येईल. ही क्रिया गुरुत्वाकर्षणामुळेच होत असावी.
फ्यूजन रिअॅक्शन फक्त मध्यभागी असलेल्या गाभ्यातच होत असते का? त्या भागातले तपमान किती अंश असते?
सूर्याच्या अंतरंगाचा हा नकाशा तर्कसंगत विचाराने बनवला आहे की काही निरीक्षणावरून आपल्याला त्याची प्रचीती मिळते?

गवि Tue, 20/12/2011 - 17:33

उत्कृष्ट लेख..

मला नेहमीच एक शंका येते. आत्ताच्या निरिक्षणांवरुन आपले शास्त्रज्ञ सांगतात की अजून अमुक कोटी वर्षं सूर्य याच प्रमाणात उष्णता देत राहील.. मग हळूहळू थंड होईल.. मोठा होईल.. मग पृथ्वीची सध्याची कक्षाच त्याच्या आत जाईल इतका त्याचा आकार मोठा होईल..

वगैरे.

सूर्य आत्तापेक्षा २० टक्के जरी थंड किंवा गरम झाला, तरी आपण गोठू किंवा उकळू..

असं सर्व असताना, म्हणजे आपलं अस्तित्वच या सूर्याच्या जसं आहे तसं राहण्यावर अवलंबून असताना, अशी शक्यता नाही का की काही कारणाने अचानक या अणुक्रियेचा वेग झपाट्याने वाढू शकेल किंवा कमी होऊ शकेल आणि अनेक पट वेगाने सूर्यातले अण्विक मटेरियल संपायला लागेल..किंवा एकसमयावच्छेदेकरुन एकाक्षणी सर्वाचाच स्फोट होऊन जाईल.

सर्व अंदाज हे अंदाजच आहेत का?

माझा प्रश्न मला नीट मांडता आला नसावा..

मन Wed, 21/12/2011 - 15:51

In reply to by गवि

२० टक्के म्हणजे जरा जास्तच वाटतात मालक. माझा शरीरशास्त्र,जीवसृष्टीचा वगैरे अभ्यास नाही पण आपली जगायची marjin ही फक्त दोन्-पाच टक्केच असावी असे वाटते. अर्थात, वातावरणातील बदल हळूवार होत गेल्यास काही सजीव त्यातही उत्क्रांत होउ शकतील.(??)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/12/2011 - 10:11

प्रतिसाद देण्यास किंचित उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.

सर्वप्रथम, सूचना आणि माहितीपूर्ण प्रतिसाद देणार्‍या गोळेकाका आणि घारेकाकांचे आभार.

"शांत" पृष्ठभागाचे चित्र असे म्हणून चालणार नाही. साध्या डोळ्यांनी पाहिल्यावर असे दिसत नाही. कशाने पाहिल्यावर चित्र असे दिसते ते सांगायला हवे.

Hα या नावाच्या फिल्टरमधून हे चित्र घेतलेलं आहे. या फिल्टर्स किंवा त्यामागच्या भौतिकशास्त्राची माहिती पुढच्या भागांमधे येईल त्यामुळे इथे देत नाही. थोडक्यात, ६५६.२८ नॅनोमीटर्स या तरंगलांबीला (दृष्य प्रकाशाची तरंगलांबी ४०० -निळा ते ७००-लाल नॅनोमीटर्स एवढी असते) हा फोटो दुर्बिणीच्या* सहाय्याने काढला आहे. सूर्याकडे पहाताना आधी योग्य फिल्टर्स वापरावेत नाहीतर गॅलिलेओप्रमाणे दृष्टीनाश होऊ शकतो.

कार्टून म्हणजे काय? सादरीकरण, आविष्करण, प्रकटन, अभिव्यक्ती, चित्रण, रेखाटन की आणखी काही?

गुड क्वेश्चन! ;-) इथे कार्टूनचे यथार्थ भाषांतर कोणी सुचवेल काय? साधारणतः schematic या अर्थाने कार्टून हा शब्द अनेक पाठ्यपुस्तकांमधे वाचलेला आहे. सामान्य लोकांना स्कीमॅटीकपेक्षा अधिक माहितीचा असल्यामुळे तो वापरला

ट्रीटीयम म्हणजे काय? तुम्हाला ट्रिशियम म्हणायचे आहे काय?

होय, tritium. उच्चारांमधे असा फरक होणं शक्य आहे. कॅल्सियम, पोटॅसियम असेही उच्चार माझ्या तोंडात आणि त्यामुळे हातात 'बसल्या'मुळे उच्चारभिन्नता होऊ शकते. त्याला उपाय म्हणून कंसात इंग्लिश स्पेलिंग देता येईल.

फोटॉन म्हणजे प्रकाशकण! त्याला प्रकाशकण असेच संबोधता येणार नाही का?

होय, लेख संपादित करून त्यात संज्ञा बदलते.

ही क्रिया गुरुत्वाकर्षणामुळेच होत असावी.
फ्यूजन रिअॅक्शन फक्त मध्यभागी असलेल्या गाभ्यातच होत असते का? त्या भागातले तपमान किती अंश असते?
सूर्याच्या अंतरंगाचा हा नकाशा तर्कसंगत विचाराने बनवला आहे की काही निरीक्षणावरून आपल्याला त्याची प्रचीती मिळते?

होय, गुरूत्वाकर्षणामुळेच गाभ्यातले तापमान आणि दाब वाढून ही क्रिया घडते. गाभ्यातले तापमान असते साधारण १,५०,००,००० (अक्षरी दीड कोटी) केल्व्हीन. या तापमानाला हायड्रोजनचा प्लाझ्मा असतो, बाहेरचा इलेक्ट्रॉन निघून जातो आणि अणूकेंद्र तेवढी रहातात.
सूर्याच्या अंतरंगाचा नकाशा दोन्ही पद्धती थोड्या प्रमाणात वापरून बनवला आहे असं म्हणता येईल. फार जास्त डीटेल्स असणारं चित्रं मी इथे वापरलेलं नाही, पण पुढच्या भागांमधे ते लिहीण्याचा प्रयत्न करते आहे.

काही कारणाने अचानक या अणुक्रियेचा वेग झपाट्याने वाढू शकेल किंवा कमी होऊ शकेल आणि अनेक पट वेगाने सूर्यातले अण्विक मटेरियल संपायला लागेल..किंवा एकसमयावच्छेदेकरुन एकाक्षणी सर्वाचाच स्फोट होऊन जाईल.

गुरूत्वाकर्षण आणि आतून बाहेर पडणार्‍या उर्जेच्या बॅलन्स (मराठी?) मुळे हे शक्य नाही. पुढच्या भागांमधे हे लिहीण्याचा विचार आहेच.

स्मिता, ऋ आणि इतर सर्वचः मी आठवीपासून पुढे सायन्स शिकत आले आहे, त्यामुळे मला आपोआप इंग्लिश शब्दच सुचतात. जिथे कुठे प्रतिशब्द देण्याची गरज आहे ते लक्षात आणून देत जा.

*खूप पूर्वी हा फोटो इमेज सर्च वापरून शोधला होता, त्यापुढे माहिती, उदाहरणार्थ फोटोत सूर्याचा किती भाग दाखवलेला आहे, चटकन मिळाली नाही.

नरेंद्र गोळे Wed, 21/12/2011 - 15:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती,

प्रतिसादाखातर धन्यवाद! मराठी शब्द वापरण्याची इच्छा असेल तर........

गुड क्वश्चन = चांगला प्रश्न
फिल्टर = गाळणी
स्किमॅटिक = संरचना, मांडणी, आराखडा, साधनजुळणी, रचना, ढाचा
हायड्रोजन = उदजन (उदकाचा म्हणजे पाण्याचा जनक ह्या अर्थाने)
प्लाझ्मा = प्राकल
नॅनो = अब्जांश
इलेक्ट्रॉन = विजक
फ्यूजन = संदलन
फिजन = विदलन
फोटो = प्रकाशचित्र
बॅलन्स = संतुलन
डिटेल्स = तपशील
रिअ‍ॅक्शन =प्रतिक्रिया
न्यूक्लिअर = आण्विक
मटेरियल = पदार्थ
सायमलटेनियसली = एकसमयावच्छेदेकरुन
रिफ्लेक्शन = प्रतिबिंब
इमेज = प्रतिमा
फिगर = आकृती
सर्च = शोध

मिहिर Wed, 21/12/2011 - 21:30

In reply to by नरेंद्र गोळे

फ्युजन आणि फिशन साठी मला संदलन आणि विदलन पेक्षा संमीलन आणि विघटन/भंजन जास्त चांगले वाटतात. 'सायमलटेनियसली' ला 'एकसमयावच्छेदेकरुन' पेक्षा साधे 'एकाच वेळी' म्हणायला चांगले वाटते. प्लाझ्मासाठी शालेय पुस्तकात 'अयनायू' शब्द वाचल्याचे आठवते आहे.
हायड्रोजन, इलेक्ट्रॉन यांना असे मराठी शब्द काढण्याची गरज मला वाटत नाही. या संज्ञांबाबत असे होत नाही की, जर इंग्रजी येत असेल तर अर्थ नावावरून कळेल. त्या संज्ञेचा अर्थ जाणून घ्यावाच लागेल. अशा वस्तुलक्षी संज्ञासाठी वेगळे शब्द बनवण्याची गरज वाटत नाही. अशोक केळकरांनी त्यांच्या 'वैखरी' या पुस्तकात 'परिभाषेची परिभाषा' लेखात याचे छान विवेचन केले आहे.

मूळ लेख आवडला हे वेगळे सांगायची गरज नाहीच. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/12/2011 - 00:25

In reply to by मिहिर

"अणूकेंद्रकाचे भंजन" (+संमीलन) असे शब्दप्रयोग बहुदा आपटेसरांच्या पुस्तकांमधेच वाचले आहेत. विघटन यात का कोण जाणे, अणूभौतिकी नाही तर रेणूंवर होणारी रासायनिक क्रिया असण्यासारखं वाटतं. संदलन-विदलन हे शब्द मी आजच पहिल्यांदा वाचल्यामुळे मला आधी वाचलेले शब्दच ओळखीचे आणि त्यामुळे चांगले वाटले. या संकल्पना मी नेहेमीच इंग्लिशमधे वाचल्यामुळे मराठी शब्द चटकन आठवत नाहीत. त्यामानाने प्रारण, अभिसरण हे शब्द आठवतात.
अयनायू हा शब्द तसा बहुभाषिक वाटला तरी यथार्थ वाटतो. आयन्सचा (ion) द्रायू (fluid=द्रव+वायू) म्हणून अयनायू हा शब्द समजायला सोपा वाटला. पहिली तीन वर्ष वगळता मी विज्ञान हे सायन्स म्हणूनच शिकल्यामुळे माझं यात अनेकदा lost in translation होतं.

मिहीर, 'वैखरी'बद्दल स्वतंत्र काही लिहू शकशील का?

नरेंद्र गोळे Sat, 24/12/2011 - 11:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अयनायू हा शब्द तसा बहुभाषिक वाटला तरी यथार्थ वाटतो.>>>>> अयनायू = अयन + आयू. आयू चा अर्थ मला आयुष्य असा माहीत आहे.

आयन्सचा (ion) द्रायू (fluid=द्रव+वायू) म्हणून अयनायू हा शब्द समजायला सोपा वाटला.>>> वाक्याच्या पहिल्या अर्ध्या भागावरून दुसरा अर्धा भाग अयनायू कसा काय येऊ शकतो?

नरेंद्र गोळे Thu, 22/12/2011 - 11:03

In reply to by मिहिर

मिहिर,
.
त्वरित कणाचे आदळवण्याने घडवून आणलेल्या विदलनासंबंधित सहा आण्विक प्रक्रिया अस्तित्वात आहेत.
.
आपाती कणाच्या वाढत्या ऊर्जेसोबत होणारे परिणाम, अनुक्रमे खालील प्रक्रियांत परिणत होत जातात.
.
१. परस्परस्वभावांतरण (transmutation): लक्ष्य अणुगर्भाचा अण्वांक बदलून त्याचे परस्परस्वभावांतरण घडून येते
.
२. 'अनावरण' आणि 'उचल' (stripping and pickup): यात आपाती कणातील हिस्सा लक्ष्य अणुकेंद्र खेचून घेते किंवा आपाती कणच लक्ष्यातील कणाची उचल करतो
.
३. विदलन (fission): आपाती कणाच्या प्रग्रहणामुळे संयुक्त अणुगर्भ तयार होऊन मग तो जवळपास सारख्या आकाराच्या दोन अणुकेंद्रकांत विभाजित होतो
.
४. विखंडन (spallation): यात लक्ष्य अणुकेंद्रकाचे अनेक लहानमोठे तुकडे होतात
.
५. विदारण (fragmentation): यात लक्ष्य अणुकेंद्रकाचे अनेक छोटे छोटे तुकडे होतात
.
६. विखुरण (scattering): यात आपाती कण लक्ष्यास लवचिक (प्रत्यास्थ) धडक देऊन ऊर्जा-विनिमय करतो, त्यामुळे त्याची दिशा बदलून तो विखुरला जातो
.
संपूर्ण विज्ञान व तंत्रज्ञान मराठीत आणावयाचे असेल तर विचारपूर्वक शब्दयोजना करून मुळातील अर्थ नीट व्यक्त करावे लागतात.
ज्याला केवळ फिजनचीच चर्चा करायची आहे ते त्याला अणुभंजन, अणुविखंडन इत्यादी सुचेल ते शब्द योजून मोकळे होत असतात.
जाणकार व्यक्तींनी अभ्यासाच्या फलस्वरूप सुचवलेले शब्द स्वीकारण्यानेच नवे विज्ञान मराठीपर्यंत पोहोचण्याची शक्यता सशक्त होईल.
.
भंजन शब्द मुळात हिंदीच्या प्रभावातून आलेला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 22/12/2011 - 22:47

In reply to by नरेंद्र गोळे

३. विदलन (fission): आपाती कणाच्या प्रग्रहणामुळे संयुक्त अणुगर्भ तयार होऊन मग तो जवळपास सारख्या आकाराच्या दोन अणुकेंद्रकांत विभाजित होतो

विदलन असा न समजणारा, वापरात नसणारा शब्द बनवण्यापेक्षा विभाजन हा साधा शब्दच का नको?

भंजन शब्द मुळात हिंदीच्या प्रभावातून आलेला आहे.

काय फरक पडतो? "मूर्तीभंजन", "प्रतिमाभंजन" इत्यादी शब्द आता मराठीत रूढ झालेले नाहीत का? संस्कृतप्रचुर शब्द चालतात, पर्शियन, अरबी मूळ असणारे शब्द मराठीतलेच म्हणावेत असे झाले आहेत. तर मग हिंदीचा प्रभाव असणारे शब्द का नकोत? नागपूर, इंदौर, ग्वाल्हेर भागातल्या लोकांचं मराठीच हिंदीचा प्रभाव असणारं असतं. आणि मग तसं असेल तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे शब्द का नकोत? लेप्टॉन, हॅड्रॉन, फर्मिऑन, म्यूऑन, मेसॉन, पायॉन, क्वार्क (टॉप, बॉटम, अप, डाऊन, स्ट्रेंज, चार्म) अशा शब्दांचं भाषांतर मुळात करावंच का?*
बोसॉनला मराठी बोस्कण म्हणणार का?

घारेकाकांना पडलेले प्रश्न मलाही पडलेले आहेत.
असो. मी भाषाअभ्यासक नाही. माझ्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे खगोलशास्त्र; दोन इंग्लिश शब्द वापरून का होईना मुख्य मुद्दा, माहिती वाचकांपर्यंत पोहोचणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

*अवांतर: बोरीस येल्तसिन गेले अशी बातमी एका सकाळी बीबीसीवर पाहिली. माझी एक घरमैत्रिण चिनी होती. नक्की कोण गेलं हेच तिला समजेना. तिने मला विचारलं, "तुम्ही भारतात त्यांना काय म्हणता?" मला या प्रश्नाचा अर्थच समजला नाही. थोड्या वेळाने दुसरा चिनी घरमित्र आला. त्याच्याकडून तिला समजलं की "येलित्सिन गेले." मग तिला बातमीचा अर्थ समजला.

नरेंद्र गोळे Fri, 23/12/2011 - 20:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती,

शब्दांच्या वापराबद्दल कुठलाही आग्रह धरण्याचा माझा हेतू नाही.

खालील यादीतील पूर्वापार चालत आलेले शब्दही लोक इंग्रजीत वापरतात. त्याबाबतही माझा कुठलाही आग्रह नाही. बरेच लोक इंगजी शब्द आणि मराठी क्रियापदे वापरून वाक्ये लिहितात. तशी भाषाही हल्ली स्वीकारली जाते. तेव्हा ती तुमची निवड झाली. लेखक स्वतःची शैली, शब्द आणि भाषा निवडण्यास स्वतंत्र असतो. राहावा. हीच माझी धारणा आहे.

गुड क्वश्चन = चांगला प्रश्न
फिल्टर = गाळणी
स्किमॅटिक = संरचना, मांडणी, आराखडा, साधनजुळणी, रचना, ढाचा
हायड्रोजन = उदजन (उदकाचा म्हणजे पाण्याचा जनक ह्या अर्थाने)
फोटो = प्रकाशचित्र
बॅलन्स = संतुलन
डिटेल्स = तपशील
रिअ‍ॅक्शन =प्रतिक्रिया
मटेरियल = पदार्थ
रिफ्लेक्शन = प्रतिबिंब
इमेज = प्रतिमा
फिगर = आकृती
सर्च = शोध

“विदलन” हा शब्द मी बनवलेला नाही.
“विस्तारित शब्दरत्नाकर”, लेखक वा.गो.आपटे (ह.अ.भावे), वरदा प्रकाशन, १९९५, ह्या पुस्तकात दिलेला आहे.
मी अन्य पुस्तकांतही त्याचा वापर झालेलाही पाहिलेला आहे.

माहिती वाचकांपर्यंत पोहोचणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. >>> हो. माझ्याही दृष्टीने. म्हणून तर मी सर्वप्रथम मजकूराचे स्वागत केले.

नरेंद्र गोळे Sun, 25/12/2011 - 07:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भंजन शब्द मुळात हिंदीच्या प्रभावातून आलेला आहे.>>> काय फरक पडतो? >>>>>
हिंदी ही मायमराठीची सख्खी बहीण. तेव्हा हिंदीत जर नवे/पर्यायी शब्द आधीच अस्तित्वात असतील, चिकित्सा होऊन स्वीकारले गेलेले असतील, तर त्यांचा विचार मराठीतील पर्यायी शब्द निवडण्याकरता प्राधान्याने करावा. असेच माझे मत आहे.

संस्कृतप्रचुर शब्द चालतात, पर्शियन, अरबी मूळ असणारे शब्द मराठीतलेच म्हणावेत असे झाले आहेत.
तर मग हिंदीचा प्रभाव असणारे शब्द का नकोत? नागपूर, इंदौर, ग्वाल्हेर भागातल्या लोकांचं मराठीच हिंदीचा प्रभाव असणारं असतं. >>>>>
नागपूर एकेकाळी (स्वतंत्र भारतात) मध्यप्रदेशाची राजधानी होते. मी नागपूरचा आहे. माझी हिंदी सशक्त आहे. मी भांडायला लागलो तर शब्द हिंदीत फुटतात. "हिंदी विज्ञान परिषदे" च्या त्रैमासिकात लिहिलेला "आभासी उपकरणन" हा माझा लेख पारितोषिकास पात्र ठरला आहे. तरीही त्या लेखात मी मराठी शब्द मिसळलेले नाहीत. इथेही माझ्या लिखाणातून माझी हिंदीची ही पार्श्वभूमी तुम्हाला, मी सांगितली नसती तर कदाचित समजलीही नसती. माझे अनेक इंग्रजी शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यात कुठेही मी मराठी किंवा हिंदी शब्दांची सरमिसळ केलेली नाही. सांगायचे एवढेच की प्रत्येक भाषेची शुद्धता ही तिच्याकरता मोलाचीच असते. असावी. अर्थात लेखक सरमिसळीची भाषा वापरण्यासही मुखत्यार असतो. ती त्याची निवड असते.

आणि मग तसं असेल तर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे शब्द का नकोत? लेप्टॉन, हॅड्रॉन, फर्मिऑन, म्यूऑन, मेसॉन, पायॉन, क्वार्क (टॉप, बॉटम, अप, डाऊन, स्ट्रेंज, चार्म) अशा शब्दांचं भाषांतर मुळात करावंच का?>>>> मी हल्ली "सोर्सबुक ऑन अ‍ॅटोमिक एनर्जी" ह्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करत आहे. (करावाच कशाला? हा प्रश्न मला शिवलेला नाही!) त्याच्या एकूण २० पैकी १० प्रकरणे करून झालेली आहेत. आपण म्हणता त्याच प्रश्नांची उत्तरे मीही शोधत आहे. मी हल्ली ह्या निष्कर्षांप्रत पोहोचत आहे की, पर्याय सर्व उपलब्ध असावेत. मायबोलीचा, शुद्ध भाषेचा, प्रमाण भाषेचा, सरमिसळीचा, लोकभाषेचा, समजेल त्या भाषेचा. अंतत: शुद्ध, प्रमाणित, मातृभाषाच संवादक्षमतेत सरस ठरते. म्हणून पूर्वी माझा शुद्ध, प्रमाणित, मातृभाषेचा आग्रह असे. आज मला आग्रह करावासा वाटत नाही. कारण तीच जर संवादक्षमतेत सरस ठरणार असेल तर लोक आपोआपच ती स्वीकारतील, ह्याबाबत मला संशय उरलेला नाही.

ऋषिकेश Fri, 23/12/2011 - 12:05

In reply to by नरेंद्र गोळे

अवांतरः
हे शब्द संस्कृत वाटत नाहित का? असल्यास जर संस्कृतमधुन शब्द घेतलेले चालतात तर इंग्रजीतून का नाहीत? शेवटी परभाषिकच शब्द ते!
बाकी वरील शब्द वापरून मी शिकलो असतो तर गोडी लागण्याऐवजी विज्ञानाची भिती वाटली असते असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/12/2011 - 21:47

In reply to by नरेंद्र गोळे

शालेय पुस्तकांमधे आजकाल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हायड्रोजन यांच्यासाठी काय शब्द वापरतात? आमच्या एन.सी.ई.आर.टी.च्या सातवीपर्यंतच्या मराठीतल्या पुस्तकात हे शब्द असेच वापरायचे. अणूरचना शिकल्यापासूनच हे शब्द मी मराठीही आहेत असं मान्य केलं आहे. संदलन, प्राकल वगैरे शब्द रोजच्या वापरातल्या शब्दांपैकी नसून उसने आणल्यामुळे मला अगदीच बोअर वाटले. त्यापेक्षा वापरात असलेले इंग्लिश शब्दच मला सुटसुटीत वाटतात. Fusion music / फ्यूजन संगीत हा शब्दही सर्वमान्य आहे, त्याऐवजी संदलन संगीत असं म्हटलं तर अर्थबोध होणं कठीणच आहे.
प्रकाशकण हा शब्द उसना आणल्यासारखा वाटत नाही, शब्दावरून लगेच अर्थ समजतो म्हणून आवडला.

रिअ‍ॅक्शन =प्रतिक्रिया हा शब्द थोडा जपून वापरावा लागेल. कारण रासायनिक प्रक्रिया, अणूगर्भीय प्रक्रिया असे शब्दप्रयोग वापरात असल्याचं वाचलं आहे.
मटेरियल = पदार्थ. साधारणतः matter ला पदार्थ असं वाचलेलं आहे. उदाहरणार्थ कृष्ण पदार्थ म्हणजे dark matter. वैज्ञानिक लिखाणात, विशेषतः खगोल-भौतिकशास्त्रात matter किंवा mass हे शब्द material पेक्षा जास्त वापरले जात असल्यामुळेही असेल.

ऑक्सिजनला प्राणवायू हा शब्द पाठ्यपुस्तकांमधे वाचलेला आहे. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणार्‍या काही धातूंची नावंही मराठी आहेत, उदा: लोह, तांबं. पण उदाहरणार्थ निकल, कॅडमियमसाठी (रीचार्जेबल बॅटरीजमधे बर्‍याचदा निकलचे संयुग-कॅडमियमचे इलेक्ट्रोड्स असतात) इतर मराठी शब्द वापरात असल्याचं मला माहित नाही. कार्बनला काही ठिकाणी कर्ब ('ब'चा उच्चा पूर्ण) म्हटल्याचं वाचलेलं आहे; पण सोडीयम, पोटॅसियम, कॅल्सियम हे शब्द असेच वापरल्याचं पाहिलेले आहेत.

Simultaneously किंवा एकसमयावच्छेदेकरुन हा शब्द मात्र मी व्यक्तिगत भीतीमुळे वापरणं टाळते.

आनंद घारे Thu, 22/12/2011 - 21:53

In reply to by नरेंद्र गोळे

अ‍ॅ‍क्शन - रिअ‍ॅक्शन = क्रिया - प्रतिक्रिया हे पदार्थविज्ञानात ठीक आहे, पण रसायनशस्त्रात प्रतिक्रिया हा शब्द योग्य वाटत नाही. आजकाल मराठी पुस्तकात कोणता शब्द वापरतात?
न्यूक्लियस या शब्दाचा मराठी प्रतिशब्द काय आहे? न्यूक्लियर म्हणजे आण्विक कसे?
एकसमयावच्छेदेकरुन इतका अगडबंब शब्द कशाला? 'एकाच वेळी' चालणार नाही का?

नरेंद्र गोळे Fri, 23/12/2011 - 19:33

In reply to by आनंद घारे

अ‍ॅ‍क्शन - रिअ‍ॅक्शन = क्रिया - प्रतिक्रिया हे पदार्थविज्ञानात ठीक आहे, पण रसायनशस्त्रात प्रतिक्रिया हा शब्द योग्य वाटत नाही. आजकाल मराठी पुस्तकात कोणता शब्द वापरतात?>>>>>> हे शब्द सर्वच विज्ञानांमध्ये, पूर्वीही वापरले जात आणि आजही वापरले जात आहेत.

न्यूक्लियस या शब्दाचा मराठी प्रतिशब्द काय आहे? >>> अणुकेंद्रक, अणुगर्भ

न्यूक्लियर म्हणजे आण्विक कसे? >>>> न्यूक्लियर म्हणजे खरे तर अणुकेंद्रकीय. मात्र अनेक संदर्भांत 'आण्विक' हा शब्द प्रचलित आहे. उदाहरणार्थः रासायनिक आणि आण्विक ऊर्जांची पट्टीच वेगवेगळी असते.

एकसमयावच्छेदेकरुन इतका अगडबंब शब्द कशाला? 'एकाच वेळी' चालणार नाही का?>>>>> चालेल की. किंबहुना चालतोच. मी वर शब्दांच्या यादीत एवढ्याचकरता दिला आहे, कारण तो शब्द प्रतिसादांत, इथेच कुणीतरी वापरलेला होता!

मी Wed, 21/12/2011 - 15:09

उत्तम लेख.

एक शंका - सुर्याच्या ह्या रचनेची माहिती किंवा अंदाज कोणी/कसा लावला/मिळविला हे सांगता येइल काय? कि साधारणपणे सर्वच तार्‍यांची रचना सारखी असते (तुम्ही देखिल लेखात हे सांगितले आहेच) तरीदेखिल ही माहिती कशी मिळविली असेल ह्याची माहिती संक्षिप्त स्वरुपात सांगितली तरी चालेल.

नरेंद्र गोळे Wed, 21/12/2011 - 15:48

In reply to by मी

डॉ.जयंत नारळीकर ह्यांची मूळ मराठीत प्रसिद्ध झालेली खालील दोन पुस्तके ह्या विषयांवरले आधिकारिक भाष्य समजले जावे.....

१. आकाशाशी जडले नाते, डॉ.जयंत नारळीकर, राजहंस प्रकाशन, द्वितियावृत्ती पुनर्मुद्रण: ३१ ऑक्टोंबर १९९८, किंमतः रु.८००/- फक्त
२. नभात हसरे तारे, अजित केंभावी, डॉ.जयंत नारळीकर व मंगला नारळीकर, राजहंस प्रकाशन, प्रथमावृत्ती: मे २००८, किंमतः रु.२००/- फक्त

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 21/12/2011 - 21:22

In reply to by नरेंद्र गोळे

ही दोन्ही पुस्तकं मी वरवर चाळली आहेत. त्यात वापरलेले अनेक मराठी शब्द मला खटकले. ९० च्या दशकांत मी मोहन आपटे यांची खगोलशास्त्र, संगणक, भौतिकशास्त्र या विषयांवर मराठीत लिहीलेली पुस्तकं वाचत मोठी झाले. तेव्हा वापरात असणार्‍या अनेक शब्दांच्या जागी केंभावी, नारळीकर आणि नारळीकर यांनी मराठीत वेगळेच शब्द वापरले आहेत. Star cluster यासाठी तारकागुच्छ/तारकापुंज हा शब्द मी तरी अनेकदा वापरला ऐकला आहे, त्या शब्दाच्या जागी नवाच शब्द वापरला आहे; कोणता ते आठवत नाही. दीर्घिका हा शब्द galaxy साठी आधी अनेकदा वापरला गेला असताना अभ्रिका असा शब्द वापरला आहे. हा कदाचित मुंबई आणि पुणे असाही फरक असेल. पण त्यामुळे माझं अनेकदा "lost in translation" झालं. कदाचित औपचारिक शिक्षण सुरू असताना ही पुस्तकं बघितल्यामुळेही असेल मला ही पुस्तकं फार आकर्षक वाटली नाहीत. 'आकाशाशी जडले नाते' प्रकाशित झालं तेव्हा पाहिलं होतं. कोणत्याही एका विषयाबद्दल पुरेशी माहिती देत नाही त्यामुळे हे पुस्तक तोकडं असल्याचं मत तेव्हा झालं.

मराठीतली मोहन आपटे यांची पुस्तकं जास्त आवडतात; त्यांनी सूर्य, सूर्यमाला, विश्वरचनाशास्त्र (cosmology) या विषयांवर २००-३०० पानांची पुस्तकं लिहीली आहेत. या यादीत भर पडली असल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्या पुस्तकांत चांगल्यापैकी संकलन आहे. आपटे सर एक उत्तम शिक्षक आहेत आणि त्यांच्या माहितीपूर्ण पुस्तकांचं रंजनमूल्यही उच्च आहे. त्याशिवाय, चालू घडामोडींबद्दल पराग महाजनीचे लेख लोकसत्तात अधूनमधून असतात; त्याचं आकलन, भाषा आणि माहिती देण्याची पद्धत मला आकर्षक वाटते. परागचं 'तारकांच्या विश्वात' हे पुस्तकही प्रसिद्ध झालेलं आहे.

अज्ञात Sat, 24/12/2011 - 02:12

वाचतेय. या भागातील माहिती तशी ( रिलेटिव्हली = मराठी शब्द ?) प्राथमिक असली तरी विषयाची सुरुवात चांगली आहे. काही मराठी शब्द वाचायला क्लिष्ट वाटले तरीही मला स्वतःला भाषा आवडतात त्यामुळे नवे शब्द शिकायला मिळाले याचा आनंदच आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत....

आळश्यांचा राजा Sat, 24/12/2011 - 21:23

स्तुत्य उपक्रम.वाचतोय.

मला एक शंका आहे. पारिभाषिक संज्ञांविषयी. प्रत्येक वैज्ञानिक संज्ञेला भाषांतरीत पर्याय शोधायचा "आटापिटा" करायलाच हवा का? या विषयात रुची असणारे लोक इंग्रजी जाणणारे असतात. त्यांना किमान माफक इंग्रजी तरी नक्कीच समजते. विखंडन, विदारण वगैरे ठीक आहे. पण मग असे होते, की हेही लक्षात ठेवा, विषयही समजून घ्या. अजून एखादा संदर्भ इंग्रजीमध्ये वाचायला मिळाला की पुन्हा ते विखंडन म्हणजे काय ते बघा, याने उत्साह कमी होतो.

माझ्या बाबतीत हे झाले आहे. दहावीपर्यंत मराठी माध्यमातील विज्ञानाची पुस्तके वाचली होती. अकरावी बारावीत इंग्रजीत तेच विषय वाचले. दहावीपर्यंत वाचलेले शब्द डोक्यात साठवून वेळ वाया घालवला असे वाटून गेले. तो एक "युस्टेशियन नलिका' असा शब्दप्रयोग जीवशास्त्रात वाचला होता. त्या नलिकेची फक्त ट्यूब झाली, बाकी युस्टेशियनला मराठी पर्याय नसल्याने तो एक व्याप कमी झाला होता.

इंग्रजी ही काही आवाक्याबाहेरची भाषा मुळीच नाही. भारतात तरी कुणासाठीही नाही. त्यामुळे विज्ञान सोपे करुन सांगणे हा उद्देश असेल तर ते या पारिभाषिक व्यापामुळे खरेच सोपे होतेय का हे तपासले पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 25/12/2011 - 10:16

In reply to by आळश्यांचा राजा

सर्व (नवीन) प्रतिसादकांचेही आभार.

आ.रा.: सहमत आहे. निदान विज्ञानाच्या बाबतीत तरी एक पुस्तक वाचलं की काम झालं, सगळं समजलं, असं कधीच होत नाही. चार पुस्तकं वाचावी लागतात, अनेक कोर्सेस घ्यावे लागतात, माहिती अद्ययावत ठेवावी लागते आणि आपल्याला हवी असणारी माहिती बहुदा इंग्लिशमधेच उपलब्ध असते. ट्यूबची नलिका किंवा नळी झाली तरी भाषांतरात हरवल्यासारखं होत नाही (अरेरे, lost in translation चं भाषांतर काय भीषण वाटतंय! ;-) ). युस्टेशियनला मराठी शब्द शिकवला नाही तेच बरं झालं. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन इत्यादी कणांसाठी पारिभाषिक शब्द बनवण्याचे खटाटोप करण्यापेक्षा मला विज्ञान जास्त महत्त्वाचं वाटतं.
असा अनुभव मला आला नाही कारण आमच्या शाळेत आठवीपासून एका तुकडीला विज्ञान आणि गणित इंग्लिशमधे होतं. आम्हाला संपूर्ण वर्गालाच इंग्लिश येत नाही हे शिक्षकांना माहित असल्यामुळे भौतिकशास्त्राच्या वर्गात स्पेलिंग टेस्ट्सही व्हायच्या.

गोळेकाका, तुम्हाला हा मुद्दा पटत नसेल तर तुम्ही तुमचे मराठी शब्द वापरा; इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रीनो, प्लाझ्मा वगैरे शब्द माझ्या मते मराठीतही आहेत, त्यामुळे मी हे शब्द वापरते. विष्णूसहस्रनाम म्हणणार्‍या समाजात एकाच वस्तूला दोन नावं असण्यास विरोध असू नये.

पुढचा भाग लिहीते आहे, लवकरच टाकते.

सागर Thu, 19/01/2012 - 11:07

आदिती,

एक सुरेख लेखमाला तू सुरु केली आहेस. त्याबद्दल तुझे धन्यवाद.

माझाही हा आवडीचा विषय आहे, पुढील आठवड्यापासून जास्त जोमाने सहभागी होईन

या धाग्यावर चर्चा करणार्‍या सर्वांनाही धन्यवाद, अशा सकारात्मक चर्चेमुळे भाषा आणि ज्ञान दोन्हींचे संवर्धन होते आहे :)