बॉटबॉय टेस्ट
बॉटबॉय टेस्ट
'बेख्डेल टेस्ट' आणि त्यावरून स्त्रियांना जालावर मिळणारे झुकते माप पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. सगळ्या गोष्टी स्त्रिया आणि स्त्रीवाद्यांना सोयीच्या असणे हे आम्हांस अजिबात मंजूर नाही. या षडयंत्राविरोधात आवाज उठवणे आम्हांस अत्यावश्यक वाटते. "The Demise of Manhood" या प्रसिद्ध निबंधात, स्टॅनफर्ड विद्यापीठाचे बहुचर्चित प्राध्यापक फिलीप जिंबार्डो म्हणतात -
Men are constantly receiving conflicting messages from parents, Hollywood, educational institutions, and peers about appropriate and acceptable male behavior.
समाज आणि याच समाजाने निर्माण केलेली कला आजच्या पुरुषांना स्त्रैण बनवते आहे. हे सगळं बदलण्याची एक सुरूवात म्हणून आम्ही या पुरुषद्वेष्ट्यांना शह देण्यासाठी निराळी चाचणी सुचवत आहोत. या चाचणीनुसार कोणत्याही चित्रपट, कादंबरीचा मर्दपणा किती हे लक्षात यावा अशी आमची इच्छा आहे.
आम्ही सुचवत असलेली 'बॉटबॉय टेस्ट' येणेप्रमाणे:
कोणत्याही कलाकृतीने आमची 'बॉटबॉय टेस्ट', तथा बॉटे पास होणेंसाठी पुढीलपैकी एकतरी अट पूर्ण करणे अत्यावश्यक आहे -
१. चित्रपटात एक तरी मर्द, बॉडीबिल्डर किंवा दाढी-मिशी राखणारा पुरुष पाहिजे.
२. पुरुषांचा आपसात संवाद होताना त्यात
ळ. त्यांनी बरीच दारू पिताना दाखवले पाहिजे. किंवा
क्ष. लैंगिक संदर्भातल्या शिव्या आल्या पाहिजेत. किंवा
ज्ञ. कोणत्याही स्त्रीबद्दल लैंगिक शेरेबाजी केली पाहिजे.
३. पुरुषांमधे पुरेपूर मारामारी होऊन सार्वजनिक, खासगी मालमत्तेचे नुकसान झाले पाहिजे.
आमची ही चाचणी आम्ही आधी पाहिलेल्या अनेक चित्रपटांवर लावून पाहिली. त्यातून विदा कमी पडू नये म्हणून गेल्या काही दिवसात, चाचणी तयार करत असतानाही आम्ही काही चित्रपट पाहिले. यातून आम्हाला असे लक्षात आले की -
१. ९९ टक्क्यांपेक्षा जास्त हिंदी चित्रपट 'बॉटे'मधे पास झाले.
२. चित्रपटांनी 'बॉटे'चे जेवढे जास्त निकष पूर्ण केले तेवढे जास्त गल्ला त्यांनी जमा केला.
२अ. चित्रपटांनी 'बॉटे'चे जेवढे जास्त निकष पूर्ण केले, चित्रपट पाहताना तेवढी जास्त मजाही आली.
३. परदेशी चित्रपटांमधे 'बॉटे' पास होण्याचं प्रमाण हिंदी चित्रपटांच्या निम्मे आहे.
४. 'बॉटे' पास होणाऱ्या पाश्चात्य चित्रपटांनी बाकी चित्रपटांपेक्षा जास्त गल्ला जमा केला.
५. 'बॉटे' पास होणाऱ्या चित्रपटांना इतर चित्रपटांएवढीच पारितोषिकं मिळाली. यात आम्ही सगळ्या प्रकारची पारितोषिके मोजली आहेत. पाल्मेडी'ऑर पासून आयफा पर्यंत सगळी.
यावरून तीन सरळसोट निष्कर्ष निघतात -
१. 'बॉटे' पास होणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांना अधिक परतावा मिळतो.
२. 'बॉटे' पास होणाऱ्या चित्रपटांना अधिक लोकप्रियता आणि समीक्षकप्रियता मिळते.
३. 'बॉटे' निर्माण करायला लागण्याचे कारण पाश्चात्यांचा प्रभाव हे आहे. फक्त निम्मेच परदेशी चित्रपट 'बॉटे'मधे पास होतात. मुलांचे पुरुषत्त्व जपण्यासाठी, त्याचे वर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त चित्रपट 'बॉटे'मधे पास व्हावेत. याचा अर्थ ही परदेशी संस्कृती भारतीय चित्रपटकला आणि चित्रपट व्यावसायिक दोघांचे सर्व बाजूंनी नुकसान करणारी आहे. आपण तिचा प्रभाव आपल्यावरून कसा पुसता येईल याची आता काळजी सुरू केली पाहिजे.
आगामी निवडणूकांमधे जो पक्ष 'बॉटे'चा सेन्सॉर बोर्डात अंगीकार करेल त्यांनाच मत द्या अशी आपल्याला कळकळीची विनंती.
जय हिंद, जय महाराष्ट्र
स्त्रीवादी जगतात पुरुषांची
स्त्रीवादी जगतात पुरुषांची होणारी घुटन वर्णन करण्याबद्दल बॉटबॉय यांचे अभिनंदन, आणि ऐसीवर स्वागतही. बिचाऱ्या पुरुषांना समाजात मोठं होताना अनेक वाईट शिकवणी मिळतात. उदाहरणार्थ,
- अर्थार्जन करण्याची, आणि पर्यायाने तुमच्या स्त्रीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी तुमची आहे.
- तुमच्या मनाच्या मोठेपणापेक्षा तुमच्या स्नायूंचा मोठेपणा, आणि खांद्यांची रुंदी अधिक महत्त्वाची आहे.
- तुमच्या भावनांना स्त्रियांप्रमाणे अश्रू आणि गॉसिपमधून वाव देण्याची मुभा नाही. निदान भरपूर दारू प्यायल्याशिवाय तरी हे अलाउड नाही.
या सर्व बंधनांतून मुक्त होण्यासाठी सिनेमाच्या माध्यमातून पलायनवाद आला नाही तरच नवल. हे पलायन साध्य करण्यासाठी सिनेमांना कसा पैसा व प्रसिद्धी मिळते हे दाखवणाऱ्या बॉटेची दखल बेटे (बेख्डेल टेस्ट) प्रमाणेच घेतली जाऊन त्याबाबत विकीपीडिया पेजही तयार व्हायला हवं.
वा...आवडले आहे
वा...आवडले आहे