Skip to main content

भारतात एस.टी.डी. (सेक्शुअली ट्रान्समिटेड डीसीजेस) वर बंदी

कांदा संस्थान, दि. ३१. मिसळपाववर झालेल्या या चर्चेमुळे कांदा संस्थानाच्या ग्रामपंचायतीमधे श्वेतपत्रिका पारीत केली. आगामी जिल्हा परिषद निवडणूका झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाची सत्ता आली की ही श्वेतपत्रिका जिल्ह्यात कायदा म्हणून लागू करण्याचा विचार संस्थानाच्या प्रवक्त्या सु.श्री. रतिचंद्रिकादेवी म. बाणकोटे यांनी जाहीर केला. या संवेदनशील कायद्याद्वारे ग्रामपंचायत आणि पुढे जिल्हा हद्दीत एस.टी.डी.वर अर्थात 'सेक्शुअली ट्रान्समिटेड डीसीजेस'वर बंदी घालण्यात आली आहे.

"यापुढे भारतीय संस्कृतीचा कोणत्याही प्रकारे होणारा अवमान सहन होणार नाही. कांदा संस्थान ग्रामपंचायत आणि पुढे संपूर्ण जिल्ह्यातले सर्व रस्ते, घरं, दुकानं, हॉटेलं, सोमरसपेय्यस्थळं आणि अगदी वेश्यागृहांमधेही भारतीय संस्कृतीची अवहेलना होऊ नये यासाठी एस.टी.डी.वर बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या नागरीकांना या स्वैराचार, पाश्चात्य संस्कृती आणि पाखंडीपणापासून वाचवण्याची जय्यत तयारी ग्रामपंचायतीने केलेली आहे. शेवटी हा भारतीय संस्कृतीच्या महानतेचा प्रश्न आहे", रतिचंद्रिकादेवी यांनी पुढे भर घातली.

ग्रामपंचायतीच्या बैठकीत मुख्यत्त्वेकरून या श्वेतपत्रिकेच्या कायदेशीर आणि घटनेशी सुसंगत असण्यावर चर्चा झाली. जुने ग्रामपंचायत सदस्य आणि युवा आघाडीचे अनुभवी वकील अ‍ॅड. उपहास मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चर्चा पार पडली. तामिळनाडू राज्याप्रमाणे आलटून पालटून दोन प्रमुख पक्षांच्या हातात ग्रामपंचायत असताना अ‍ॅड. उपहास मारणे हे गेली अनेक वर्षे सातत्याने प्रमुख विरोधी पक्षाचे ग्रामसभा उपनेते राहिलेले आहेत. त्यांनी या श्वेतपत्रिकेच्या कायदेशीरपणाबद्दल हवाला दिल्याने ही चर्चा फार वाढली नाही. "नागरिकांच्या भारतीय संस्कृतीपालन या प्रमुख अधिकारावर गदा येताना मी पाहू शकत नाही. गरज पडेल तर आपण सर्वोच्च न्यायालयातही जाऊन भांडण करू", असं विधान त्यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 'गरीबी हटाव' या कार्यक्रमावर आधारित 'एस.टी.डी. हटाओ' अशी घोषणा बनवावी असाही विचार पुढे आला होता. पण पाखंडी लोकांची री ओढण्याऐवजी काहीतरी सबळ आणि सशक्त उपायांनी संस्कृतीरक्षण व्हावे यावर सभासदांचा भर होता.

यासाठी नागरिकांना काही सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तयार कपडे आणि कापडांच्या सर्व दुकानांत, तसेच सर्व शिंप्यांकडे 'एसटीडीवर संपूर्ण बंदी आणि भारतीय संस्कृती महान आहे' असं लिहीलेल्या टोप्या आणि स्त्रियांसाठी डोकं झाकायचं फडकं वा ओढणी मिळेल. पावसाच्या दिवसांत सर्व रंगांच्या छत्र्यांवर असा संदेश छापलेला असेल. 'एसटीडी'ची भीती नसल्यामुळे आता तरूण, तरूणी आणि सर्व वयातील आबालवृद्धांना तसल्या प्रकारची प्रतिजैविके घेण्याची गरज रहाणार नाही. शिवाय एच्.आय्.व्ही. आणि एड्सला घाबरण्याचं काही कारणच उरणार नाही. भारतात एड्सचा प्रचार अतिशय वेगाने होत आहे असे बाष्कळ आरोप आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसारख्या पाश्चात्य देशांच्या जीवावर चालणार्‍या भारतीय संस्कृतीद्वेष्ट्या संस्था आता करू धजणार नाहीत, असा विश्वास सुश्री बाणकोटे आणि अ‍ॅड. रडके यांनी व्यक्त केला. अशी श्वेतपत्रिका आणि भविष्यात कायदा करणारी कांदा संस्थानाची ग्रामपंचायत ही जगातली पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

'एसटीडी'चा धोका नसल्यामुळे आता निरोध वा काँडोमचा उपयोग फक्त संततीतिनियमनासाठीच होईल. संस्थानाच्या ग्रामपंचायतीत विकल्या जाणार्‍या सर्व निरोधांच्या पाकीटांवर असं लिहीणं अत्यावश्यक केलं जाईल. पाकीटांची छपाई बदलण्यासाठी सर्व उत्पादकांना दीड आठवड्यांचा कालावधी दिलेला आहे. या कालावधीनंतर छपाई बदललेली नसल्यास त्या निरोधाच्या ब्रँडवर बंदी घातली जाईल.

'एसटीडी'चा धोका नसल्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व वेश्यावस्त्याही निरोगी होतील. सर्वसाधारणतः वेश्यावस्त्या रोगराईने त्रस्त असतात असं जगभर दिसतं. पण सदर कायद्यातून नगरवधूंनाही दिलासा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या ग्रामपंचायतीत स्त्रियांचा संपूर्ण आदर केला जातो. ग्रामपंचायतीच्या प्रवक्त्याही एक स्त्रीच आहेत. अशी नियुक्ती करणारीही कांदा संस्थानाची ग्रामपंचायत ही जगातली पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कांदा संस्थानाच्या हद्दीत नगरवधूंना गर्भवती होण्याचाही कायदेशीर हक्क आहे याकडे सुश्री बाणकोटे यांनी लक्ष वेधून घेतलं.

औषधांचे कारखानदार आणि विक्रेते यांनी या कायद्याचा क्षीण विरोध करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणात विकली जाणारी प्रतिजैविके आता 'एसटीडी' बंदीमुळे कालबाह्य होणार आणि त्यांचे उत्पन्न बुडेल अशी रास्त भीती त्यांना होती. शिवाय निरोधाच्या पाकीटाची छपाई बदलल्यामुळे उत्पादनखर्च वाढून निरोधाची किंमत वाढून विक्री घटेल अशीही भीती औषध विक्रेत्यांना आहे. यावर उपाय म्हणून सर्व नागरिकांवर दिवसाला दहा पैसे एवढा 'एसटीडीबंदी कर' लादून त्यातून काही कल्याणकारी योजना राबवण्याचा विचार होता; तो कराचा पैसा औषध विक्रेते आणि निरोध उत्पादकांना देण्याचा निर्णय ग्रामसभेने घेतला.

आमचा प्रतिनिधी गावात या संदर्भात गावकर्‍यांच्या मुलाखती घेत असता मिळालेल्या काही रोचक प्रतिक्रिया:
आत्माराम या सरकारी कर्मचार्‍याचं मत पडलं, "अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. लवकरच असा निर्णय व्यापक, देशपातळीवर घेतला जाईल अशी आशा आहे." रूपाताई या देवळातून बाहेर पडणार्‍या नोकरदार महिलेच्या मते, "आजपर्यंत भारतीय संस्कृतीची होणारी अक्षम्य हेळसाण्ड या निर्णयाने थोडीतरी कमी होईल अशी आशा आहे. कान्दा संस्थानात धार्मिक वातावरण आहे; पण इथे अजून जास्त धार्मिक आणि अध्यात्मिक हवा असावी. कान्दा संस्थानात फक्त आणि फक्त पूजा व्हावी." लोकलज्जेस्तव संतापलेल्या रूपाताईंची संपूर्ण प्रतिक्रिया देता येणे शक्य नसल्यामुळे फक्त सारांशच दिला आहे. सुपर्णा या तरूण मातेनेही या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले, "पाल्य पार्टीला जात असेल तरीही पालकांना त्याच्या लैंगिक आरोग्याची काळजी करण्याची गरज रहाणार नाही". पाश्चात्य कपडे घातलेल्या काही तरूण आणि मध्यमवयीन स्त्री-पुरुषांनी मात्र या निर्णयावर नाव जाहीर न करण्याच्या अटीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. "आधीच आपल्याकडे धर्म, संस्कृतीच्या नावाखाली लैंगिक प्रेरणा, ज्या असणं अतिशय नैसर्गिक आहे, दाबून ठेवल्या जातात. अगदी मुलगा-मुलगी हातात हात घालून गेले तरी हे लोकं वळून वळून बघतात. या कायद्यामुळे काहीही चांगला फरक पडणार नाही. पण काळ सोकावण्याची भीती वाटते."
हा आक्षेप आमच्या वार्ताहराने सुश्री बाणकोटे यांच्या कानावर घालताच त्यांना अ‍ॅड. रडके यांनी एक सुधारणा सुचवली. "एसटीडीवर बंदी घातली असली तरी खरजेवर आणि त्वचारोगांवर बंदी घातलेली नाही. पुरूषांनी खुशाल स्त्रियांना धक्के द्यावेत, त्यातून काही एसटीडी पसरणार नाहीत. आणि असा कायदा पारीत झाला नाही तरी हरकत नाही, आपण पुढच्या श्वेतपत्रिकेत याचा समावेश करूच", असं ठोस आश्वासन सुश्री रतिचंद्रिकाबाई म. बाणकोटे यांनी पत्रकारपरिषदेत दिलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/01/2012 - 21:14

कोलॅबोरेटीव्ह प्रोजेक्टमधल्या मदतीसाठी काही मित्रांचे आभार. या निरागस लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची नावं त्यांना विचारूनच जाहीर करण्यात येतील.

राजेश घासकडवी Fri, 06/01/2012 - 21:59

कांदा संस्थानच्या निर्णयाचं सहर्ष स्वागत. निरोगी लैंगिक जीवनासाठी सरकारपातळीवर काहीतरी सकारात्मक पावलं टाकली जात आहेत हे अतिशय आनंददायी आहे. एसटीडीला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहेच. तो बेकायदाच केल्यावर या राज्यातून निघून जाण्याशिवाय त्याला पर्याय रहाणार नाही याची खात्री आहे. मग सर्वच जनता निरोगी होईल. इतका सोपा उपाय इतर राज्यांनी केलेला नाही याचं आश्चर्य वाटतं. मला वाटतं त्यामागे नेतृत्वाच्या द्रष्टेपणाचा अभाव आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव ही दोन कारणं असावीत.

हे चांगलं पहिलं पाऊल असलं तरी अनेक सुधारणा करता येतील.

१. एसटीडी साठी करण्यात येणाऱ्या टेस्ट्सवर बंदी. बासच राहिला नाही तर बासुरीची काय गरज आहे?
२. एसटीडी देणाऱ्याबरोबरच घेणाऱ्याला कडक शिक्षा.
३. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एसटीडी नष्ट करण्यासाठी एक जनलोकपालाचं स्थान निर्माण केलं जावं.

जसजसं सुचेल तसतशी अजून भर घालेनच.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/01/2012 - 22:22

In reply to by राजेश घासकडवी

श्रीमान राजेश घासकडवी यांचा प्रतिसाद अतिशय विचार करण्यालायक आहे. श्री. राजेश यांनी फक्त वाहवा अथवा टीका न करता कांदा संस्थानासाठी सकारात्मक सूचनाही केलेल्या आहेत. सदर कृतीची सैद्धांतिक पातळीवर मांडणी करण्याचा श्री. राजेश यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगाच आहे. आमचे इतर वाचकही श्री. राजेश यांचा आदर्श ठेवतील अशी आशा आहे.

श्रीमान राजेश यांनी सुचवलेले उपाय आम्ही आमच्या पत्रकारांच्या माध्यमातून संस्थानाच्या प्रवक्त्यांपर्यंत पोहोचवूच. त्यातही त्यांचा दुसरा आणि तिसरा उपाय अतिशय जालीम पद्धतीने एसटीडीचे निवारण करतील अशी आशा आहे.

पैसा Fri, 06/01/2012 - 23:07

मला वाटलं बी यस एनेलचा एस्टीडी! काय बोलून राहिले राव तुम्ही! का वाचकांच्या निरागस मानांवर अस्ले संस्कार करताय! ;)=)) =))

ऋषिकेश Mon, 09/01/2012 - 09:45

आमी ऐकुन आहोत की महाराष्ट्राने देशाला जसे आरटीआय दिला तसएच हा कायदाही देईल अश्या आशेन कोणा वृद्ध व्यक्तीने एएस्डी निर्मुलन कायदा झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी घोषणा देऊन रामलीला मैदानात उपोषण केल्याची खबर आहे.

मी Mon, 09/01/2012 - 17:25

हाहाहा! छान उपहासिक लेख.

समिक्षकाच्या* भुमिकेतुन - लेख अजूनथोडा खुमासदार चाल्ला असता, थोडा गंभीर वाटतो, उपहास नेमका कशाचा आहे हे कळले नाही.

माझे २ पैसे - एसटीडीबंदीच्या वर्षपुर्तीच्या संमरंभात बोलताना बाळ बाणकोटे ह्यांनी सांगितले "एसटिडीबंदी लागू केल्यापासुन गावात एकपण एसटिडी रुग्ण अढळला नाही हा बंदीचा आणि संस्क्रुतिचा माफ करा संस्कृतिचा विजयच आहे, तरी गेल्यावर्षापासुन गावात एका अज्ञात रोगामुळे अनेकजण दगावले आहेत, ह्या रोगावर कुठलाही इलाज सापडत नसल्याने त्याचे नामकरण फॅन्सर असे करण्यात आले आहे, फॅन्सरवरिल इलाजासाठी लागणार खर्च बंदीकरातुन घ्यावा असे एकमताने ठरविण्यात आले, त्यामुळे बंदीकर वाढवुन ३३% करण्यात आला आहे, तरी सर्व गावकर्‍यांनी सहकार्य करावे हि विनंती. आता, एसटिडीबंदी लागू करणार्‍या सर्व थोर समाजसुधारकांना श्रध्दांजली वाहून सभेचे कामकाज तहकूब करण्यात येइल."

*समिक्षक -स्वैपाक कप्पाळ करता आला तरी कशात काय कमी आहे हे खात्रिने सांगणारा.

Nile Mon, 09/01/2012 - 21:15

In reply to by मी

समिक्षकाच्या* भुमिकेतुन - लेख अजूनथोडा खुमासदार चाल्ला असता, थोडा गंभीर वाटतो, उपहास नेमका कशाचा आहे हे कळले नाही.

असेच. अनियनच्या धर्तीवर विडंबंनं करताना ते थोडंसं सोपं करून लिहायला हवं असं मला वाटतं. अनियनची विडंबंनं 'नर्डी' असतात. त्याशिवाय कंटेक्स्ट, थोडासा कंटेक्स्ट भारतीय करून लिहायला पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/01/2012 - 21:47

ऋ: अशासारख्या पॉझीटीव्ह बातम्यांमुळेच जगण्याचे बळ येते. अशी उत्तम बातमी सांगितल्याबद्दल आभार.

मी: उपहास विनोदी विचारांचा आहे. भारत काय तो महान आणि अमेरिका किंवा पाश्चात्य (अ)संस्कृती, दुराचारामुळे कसे भोग भोगावे लागतात असं काही वाचनात आलं की मौज वाटते. मुळात ज्या विचारांना दुराचार, वगैरे म्हटलं आहे ते खरोखरच वाईट आहेत का, हिंदी चित्रपटात दाखवलेले बलात्कार क्षम्य आणि इंग्रजी चित्रपटातले प्रेम अश्लील, आमची हेलन सभ्य पण त्यांची हाल बेरी उत्तान यातला तर्क मला नेहेमीच विनोदी वाटतो. अशा विचारांना विरोध करून काडीमात्र फरक पडत नाही हा अनुभव तुम्हाला आणि मलाही नवीन नाही. मग थोडा वेळ मजाच का करू नये?

तुमची समीक्षा मात्र भारी आहे. बाळ बाणकोटेंचे विचार आवडले.
माझ्या डोक्यातलं रतिचंद्रिकाबाईंचं चित्र म्हणजे साधारणतः 'शाळा' चित्रपटातल्या बेंद्रीणीचं. शिवाय संस्कार, संस्कृती म्हणजे काय याबद्दल डोक्यात चिक्कार गोंधळ, तर्काशी संपूर्ण फारकत, नैसर्गिक उर्मींनाही संस्काराच्या नावाखाली दाबून ठेवणे आणि मग मनासारखा "पुरूष" मिळत नाही म्हणून झुरत रहाणे. आणि मग त्याचाच तोरा मिरवणे ... त्यामुळे बाळ बाणकोटेंना मी रतिचंद्रिकाबाईंचा भाऊ बनवून टाकेन. ;-)

Nile: मला स्वतःला 'नर्डी' विडंबनंच जास्त भावतात. त्या मानाने हे विडंबन फारच सुगम झालं आहे असं मलाच वाटतं. आपण डोकेफोड करून मतपरिवर्तन वगैरे काही होणार नाही याची मला खात्री आहे. निदान आपल्याला उच्च कोटीच्या विनोदाचा आनंद तरी मिळावा.

राजेश घासकडवी Wed, 11/01/2012 - 17:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी हा लेख गंभीर म्हणून वाचला होता आणि आता तुम्ही सांगताय की हा उपहासात्मक आहे म्हणून? तोही आपल्या परंपरंपवित्र भारतीय संस्कृतीचा? आपली भारतीय संस्कृती महान आहे हे वैदिक कालापासून ठरलेलं आहे, तसं अनेक थोर ऋषिमुनींनी लिहून देखील ठेवलेलं आहे. आणि तुम्ही उठून तिची निंदा करता? कुठे फेडाल हे पाप?

पुराणकालात भारतात एसटीडीवर बंदी होतीच. उगीच का कृष्णाला सोळा सहस्र एकशे आठ बायका करता आल्या? कोणालाही एसटीडी झाल्याचा उल्लेख दिसतो का? नाही ना, मग झालं तर सिद्ध. कारण एव्हिडन्स ऑफ ऍबसेन्स इज ऍबसेन्स ऑफ एव्हिडन्स. पण नंतर कलियुग सुरू झालं, आणि सगळ्या थोर परंपरांची पायमल्ली सुरू झाली. कलियुगरूपी दुःशासनाने भारतीय संस्कृतीरूपी द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला आहे. आणि तुम्ही द्रौपदीची चेष्टा करायला लागला आहात हे क्लेषदायक आहे. चेष्टा करायची तर त्या दुःशासनाची, कलियुगाची करा.

तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचं इतकं स्तोम माजवता, पण कलियुगाबरोबरच त्यांचा उदय झाला हे विसरू नका. म्हणूनच अमेरिकेसारख्या देशातून वासनांनी लडबडलेल्या साहित्याची निर्मिती होऊन संपूर्ण जगाला विटाळते. एकवस्त्रा, रजस्वला असलेली भारतीय संस्कृतीही त्या विटाळातून सुटलेली नाही. तुम्हाला माहीत आहे का, अमेरिकेत दर ३९ सेकंदाला एक पॉर्न तयार होते. याउलट अजून त्या एका वस्त्राप्रमाणे संस्कृती जपून ठेवलेल्या भारतात दर ३९ सेकंदाला एक पोर तयार होतं. जन्माला घालणाऱ्या आयांची ही संस्कृती आहे. तेव्हा खबरदार जर तिची चेष्टा केलीत तर.

या द्रौपदीला वस्त्रं द्यायला संभवामि युगे युगे म्हणून साक्षात कृष्णच अवतीर्ण होणार आहे. श्री. श्री. सुवर्णानंद पितळेंना त्याचा साक्षात्कार देखील झालेला आहे. अन्यथा त्यांचे पेपर कोणी टाकले असते? ऑ ऑ?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/01/2012 - 21:55

In reply to by राजेश घासकडवी

घास्कीगुर्जी हे आमचे गुर्जी आहेत. गुर्जी हे स्वतःच एवढे महान आहेत की एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःलाच त्यांची महानता आणि म्हणून गुर्जी हे उपनाम का हे माहित नाही.

असो. तर पूजा आणि सैपाकाची पथ्य सांगणारे आमचे गुर्जी अतिआध्यात्मिक आणि पोचलेले असूनही आम्हां ('मी' आणि मी) इहवादी लोकांच्या संवादात त्यांनी का पडावे? त्यांचे हे वर्तन माझ्यासाठी अतिशय अनपेक्षित आणि दु:खदायक आहे. गुर्जींना श्री. श्री. सुवर्णानंद पितळेंच्या साक्षात्काराबद्दल अधिक माहिती असावी असे त्यांच्या प्रतिसादातून दिसते. कृपया त्यांनी त्यावर अधिक भाष्य करावे; जमल्यास एक नवा धागाच त्यावर काढावा. पण कृपया आम्हां ('मी' आणि मी) इहवादी पामरांच्या दोन घटकांच्या करमणूकप्रधान आणि म्हणून हीन असणार्‍या संवादांकडे दुर्लक्ष करावे ही विनंती.

गुर्जींकडून आम्हांस (इथे फक्त मीच) अधिक अपेक्षा आहेत.

राजेश घासकडवी Wed, 11/01/2012 - 22:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्हां ('मी' आणि मी) इहवादी लोकांच्या संवादात त्यांनी का पडावे?

का पडावं? कारण उघड आहे. आपल्याच शिष्येकडून आपल्या शिकवणीची खिल्ली उडलेली पाहिल्यावर कोणाच्या हृदयाला यातना होणार नाहीत? वरचं वाक्यच घ्या - या मी, मी म्हणून अहंकारच बळावल्याचं जाणवतं. काळजाला घरं पडतात अशाने.

या इहवादापोटी, चंगळवादापोटीच समाजमूल्यांचा ऱ्हास होतो. आत्म्याचं अधःपतन होतं. भोगवादाचा प्रादूर्भाव झाला म्हणूनच कलियुग आलं. निर्मय, त्यागी जीवन जगल्याखेरीज ते जाणार नाही. हे सत्य ठाऊक असूनही तुम्ही चंगळवादाचं समर्थन करत आध्यात्मिकांची चेष्टा करत आहात. धिक्कार असो तुमचा.

तुम्ही आत्तापर्यंत काही गुरुदक्षिणा दिलेलीच नाही म्हणून, नाहीतर मी ती परत केली असती.

आणि हो, श्री. श्री. सुवर्णानंद पितळे यांच्या आध्यात्मिक तेजाचा तुम्हाला प्रत्यय आलेला नाही म्हणून तुम्ही अशा कुजकट स्वरात त्यांच्याविषयी बोलत आहात. तेव्हा मी आता त्यांच्याविषयी एक स्वतंत्र लेख लिहून त्यांचे प्रताप जगासमोर आणण्याचा निश्चयच केला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/01/2012 - 22:57

In reply to by राजेश घासकडवी

इहवाद आणि अध्यात्म वेगवेगळे आहेत याची जाणीव परमपूज्य घासरुद्धगुर्जींना का होऊ नये? एकीकडे गुर्जी, तुम्ही गुरूदक्षिणेची, इहवादाबद्दल बोलता, एकीकडे अध्यात्माबद्दल. तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीच्या ज्ञानाबद्दल आज मला संशय येत आहेत.
स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय देवावर विश्वास ठेवता येणार नाही, असं खुद्द विवेकानंदांनीच म्हटलं आहे. तर स्वतःची ओळख पटवणे, 'मी' कोण आहे हे समजून घेणे याला तुम्ही अहंकार म्हणता? तुम्हाला 'मी'ची जाणीव झाली नसेल तर तुमची पाटी चांगदेवासारखीच कोरी आहे. तुम्हाला मी गुरूदक्षिणा दिली नाही याचा मला आनंद आहे, दिली असती तर परत घेता आली नसती!

श्री. श्री. सुवर्णानंद पितळे यांच्या आध्यात्मिक तेजाचा तुम्हाला प्रत्यय आलेला आहे ना, मग लिहा की त्यांच्याबद्दल! उगाच का या हवेत बातां मारता? का हे पितळे गुर्जीही आडनावाप्रमाणेच??

राजेश घासकडवी Thu, 12/01/2012 - 04:00

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐहिक सुखासाठी एसटीडीवर बंदी घालायची आहे तर तुम्हाला. हे तर स्वैराचाराला आमंत्रण आहे. उद्या तुम्ही म्हणाल की एड्सवरही बंदी घाला. म्हणजे कोणावरच कसलाच निर्बंध रहाणार नाही. पाप्यांच्या पापांमध्ये वाढ करण्यापेक्षा एसटीडी असलेला परवडला.

गुरुदक्षिणा ही गुरुच्या ऐहिक लाभासाठी द्यायची नसून शिष्याच्या कृतज्ञतेची खूण म्हणून द्यायची असते. तीही तुम्ही दिली नाहीत. तेवढा कृतघ्नपणा पुरे नाही म्हणून वर 'परत घेता आली नसती' असं म्हणून टळलेल्या धनवियोगाबद्दल आनंद दर्शवता आहात. एकंदरीत इतकं शिकूनही तुमचं मडकं कच्चंच राहिलं.

पितळेंविषयी लिहिणारच आहे. माझे सगळेच शिष्य काही तुमच्यासारखे सडके नसतात. मी दिलेल्या शिक्षणाचं त्यांनी चीज केलं. तुमच्यासारखे पवित्र भारतीय संस्कृतीच्या चेष्टेवर उतरले नाहीत...

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 12/01/2012 - 22:12

In reply to by राजेश घासकडवी

तुम्हाला इहवाद आणि स्वैराचार यांच्यातला फरक समजत नाही आणि वर आम्हीच सडके! चालू द्या तुमचा हा भडकेपणा.

राजेश घासकडवी Fri, 13/01/2012 - 18:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुद्दे संपले की ही सडके भडके वगैरे भाषाच फक्त शिल्लक रहाते. तुम्हालाच भारतीय संस्कृतीचं पावित्र्य कळलेलं नाही म्हणून तुमची अमेरिकन रडारड सुरू आहे. संस्कार नावाची गोष्ट कंट्रोल करते भारतात म्हटलं! खरं तर भारतात एसटीडीला बंदी घालून काय उपयोग? तुमच्या अमेरिकेतच घालायला हवी. भारतात शुचितेला महत्त्व आहे. शुचिता म्हणजे शुद्धपणा! ज्यांना लैंगिक भुक ही शुद्धते पेक्षा जास्त महत्वाची वाटते त्यांना काय फरक पडणार? विवाह हे आपल्या संस्कॄतीत बंधन आहे आणि संस्कार देखील त्यामुळे शुचितेला महत्व असणे यात गैर ते काय?

त्यापेक्षा पितळेंची कीर्तनं ऐका...

मी Wed, 11/01/2012 - 17:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उपहास विनोदी विचारांचा आहे. भारत काय तो महान आणि अमेरिका किंवा पाश्चात्य (अ)संस्कृती, दुराचारामुळे कसे भोग भोगावे लागतात असं काही वाचनात आलं की मौज वाटते. मुळात ज्या विचारांना दुराचार, वगैरे म्हटलं आहे ते खरोखरच वाईट आहेत का, हिंदी चित्रपटात दाखवलेले बलात्कार क्षम्य आणि इंग्रजी चित्रपटातले प्रेम अश्लील, आमची हेलन सभ्य पण त्यांची हाल बेरी उत्तान यातला तर्क मला नेहेमीच विनोदी वाटतो. अशा विचारांना विरोध करून काडीमात्र फरक पडत नाही हा अनुभव तुम्हाला आणि मलाही नवीन नाही. मग थोडा वेळ मजाच का करू नये?

हे आवडलं.

तुमची समीक्षा मात्र भारी आहे. बाळ बाणकोटेंचे विचार आवडले.
माझ्या डोक्यातलं रतिचंद्रिकाबाईंचं चित्र म्हणजे साधारणतः 'शाळा' चित्रपटातल्या बेंद्रीणीचं. शिवाय संस्कार, संस्कृती म्हणजे काय याबद्दल डोक्यात चिक्कार गोंधळ, तर्काशी संपूर्ण फारकत, नैसर्गिक उर्मींनाही संस्काराच्या नावाखाली दाबून ठेवणे आणि मग मनासारखा "पुरूष" मिळत नाही म्हणून झुरत रहाणे. आणि मग त्याचाच तोरा मिरवणे ... त्यामुळे बाळ बाणकोटेंना मी रतिचंद्रिकाबाईंचा भाऊ बनवून टाकेन

:प हे फार म्हणजे फारच आवडलं. असचं अजुन लिहिण्यासाठी आणि असाच विचार करण्यासाठी अनेक शुभेच्छा! :)

Nile Fri, 13/01/2012 - 06:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला स्वतःला 'नर्डी' विडंबनंच जास्त भावतात. त्या मानाने हे विडंबन फारच सुगम झालं आहे असं मलाच वाटतं.

नर्डी म्हणजे दुर्गम नाही. पण ते असो.

खवचट खान Fri, 13/01/2012 - 00:59

'प्रेग्नंसी इज अ सेक्शुअली ट्रांसमिटेड डिसीझ' असं कुठेतरी वाचलं होतं. तो या कायद्याअंतर्गत येतो का? बाणकोटेताईंचं काय मत??