Skip to main content

सोटा उर्फ स्टॉप ऑनलाईन ट्रॅश अ‍ॅक्ट

कांदा संस्थान, दि. २२. अलिकडेच मराठी संस्थळांवर आलेल्या विडंबनांच्या लाटेतून ग्रामसभेत एक ठराव पुढे आला आहे. न-विनोदी विडंबनांवर बंदी घालावी, अशी मागणी करणारा एक मोर्चा अलिकडेच ग्रामपंचायतीसमोर आला होता, त्यातून या ठरावाचा जन्म झाला आहे. या ठरावाच्या संदर्भात मिडीयाकडे ग्रामपंचायतीचं आलेलं पत्रः

"विनोदाची परंपरा महाराष्ट्र आणि मराठी भाषेला नवीन नाही. चिं.वि.जोशी, पु.ल.देशपांडे, यांसारख्या विद्वान साहित्यिकांनी शिकलेल्या मध्यमवर्गाच्या विसंगत मानसिकतेवर बोट ठेवण्यासाठी विनोदाचा आधार घेतला. आचार्य अत्र्यांनी पद्य विडंबनांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मराठी ग्रामीण भागाच्या जीवनातल्या विसंगतींवर द.मा.मिरासदार, शंकर पाटील यांसारख्या ज्येष्ठ लेखकांनी खुमासदार शैलीत विनोद केलेला आहे. सारस्वतांची विडंबनांची ही उज्ज्वल परंपरा केशवकुमारांच्या मागून आंतरजाल या माध्यमावर केशवसुमार यांच्यासारख्या मंडळींनी पुढे सुरू ठेवली तर विसंगतींवर विनोदी गद्य-भाष्य करण्याची परंपरा भडकमकर मास्तर, फारएण्ड, आणि अलिकडेच अवतारप्राप्त झालेले खवचट खान यांनीही उज्ज्वल ठेवलेली आहे. कोटीकेसरी नंदन यांच्या ७०% खरडीही उत्तम प्रकारच्या कोट्यांनी संपृक्त असतात. विनोदाचं महत्त्व सांगणारे धनंजय, चिंतातुर जंतू यांचे निबंधवजा लेखन, प्रतिसाद आणि क्वचित उदाहरणं ही अभ्यासनीय आहेत. मराठी भाषेतल्या विनोदाला मरण नाही; जसे चांगले विनोदी लेखक आहेत तसेच विद्वान वाचकही मराठी भाषा आणि भाषेतल्या विनोदाला लोकाश्रय देणारे आहेत. उत्तम विनोदी लिखाणास विद्वानांनी अनेकविध पद्धतीने दाद दिलेली आहे; या विनोदवीरांची यथामति नक्कल करण्याचेही प्रयत्न झालेले आहेत.

"पण अलिकडच्या काळात या विनोदाची पातळी खालावल्याची तक्रार अनेक बाजूंनी येत आहे. विडंबनासाठी विडंबन, विचार पटले नाहीत म्हणून केलेले दिशाहीन विडंबन वाढण्याचे प्रकार अनेकदा दिसून आलेले आहेत. सामान्य वाचकांनी अशा लिखाणाला सुरूवातीला कदाचित गांगरून उचलून धरल्याचे दिसले, पण पुढे त्यासंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत. अशा बुद्धीहीन विडंबकांच्या यादीत गावातले मान्यवर विद्वान, श्री. धनंजय, हे ही सामील होत आहेत का अशी शंकाही अनेकांना यावी असे लिखाण त्यांच्या हातून घडले होते. पुढे श्री. धनंजय यांनी, बुद्ध्याच बुद्धीहीन विडंबन लिहील्याचे जाहीर करून आपली त्यामागची भूमिका स्पष्ट केल्यामुळे हा वाद वेळीच मिटला. त्या चर्चेतून विडंबन-लेखनाबद्दल काही गंभीर विचार होऊन क्वालिटी कंट्रोल होईल अशी आशा आम्हाला होती. पण रद्दी विडंबनांची सद्दी संपत नसल्याचे लक्षात येत आहे. अनेक सुजाण नागरिकांनी पत्र लिहून आणि मोर्चात सहभागी होऊन अशा विडंबनाविरोधात आवाज उठवलेला आहे. नागरिकांच्या मागणीमुळेच आम्ही या कायद्याचा मसूदा तयार केला आहे. आपल्या पत्रातून आपण हा मसूदा जाहीर करावा आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया मागवाव्यात अशी विनंती आहे. कायद्याचा मसूदा पुढीलप्रमाणे:

स्टॉप ऑनलाईन ट्रॅश अ‍ॅक्ट (सोटा):

१. मराठी आंतरजाल आणि छापील माध्यमातून प्रकाशित होणार्‍या सर्व लेखनाच्या विडंबनांना सोटा लागू होईल.

  • हे विडंबन इतर कोणत्याही भाषेत असेल,
  • शुद्धलेखनाचे नियम पाळलेले असतील वा नसतील,
  • मराठीची कोणतीही बोली भाषा या विडंबनात वापरलेली असेल

२. या विडंबनात विनोद, विचार आणि बुद्धीचातुर्याची किमान पातळी नसेल तर आणि/किंवा

  • या विडंबनास कांदा संस्थान घटना मुद्दा क्रमांक १६१ अन्वये विनोदहीन विडंबन करण्याचा प्रयत्न आणि/किंवा
  • घटनेचा मुद्दा क्रमांक ३१४ अन्वये व्यक्तीगत मानहानीकारक मजकूर असेल आणि/किंवा
  • घटनेचा मुद्दा क्रमांक २७२ अन्वये कोणीही स्त्री, पुरूष, पशु आणि यंत्रांप्रती हीनत्त्व दर्शवणारा असेल
  • घटनेचा मुद्दा क्रमांक π/२ (ही नवीन घटनादुरूस्ती आहे) दारू, बायको, मोठं पोट, खादाडी वगैरेंपलिकडे विडंबक जात नाहीत तेव्हा तसले विषय वापरणारे विडंबक लिखाणदेखील बाय डिफॉल्ट न-विनोदी समजले जाईल. हे लेखन खरोखरच विनोदी आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी संपादकांवर असेल.

३. अशा विडंबनाचे प्रकाशन आंतरजालावर झालेले असल्यासः

  • लेखकाचे सदस्यत्त्व रद्द होईल; पण लेखकाला इतर आयडी घेऊन संस्थळावर आलेल्या सर्व पाककृती बनवून खाव्या लागतील.
  • संपादक मंडळावर या विडंबनाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना आपल्या संपादकपदाचा तत्परतेने राजीनामा द्यावा लागेल आणि त्यांना पुढचे तीन वर्षे, तीन महिने आणि तेरा दिवस सदर संस्थळावर प्रकाशित झालेल्या प्रत्येक धाग्यावर धागा आणि प्रतिसादांचाही संपूर्ण अभ्यास करून वैचारिक प्रतिक्रिया द्यावी लागेल.
  • सदर संस्थळास सल्लागार मंडळ असल्यास सल्लागारांना संपादक म्हणून नेमण्यात येईल आणि त्यांना सामान्य सदस्य या नात्याने मिळणार्‍या प्रतिसाद, खरडी आणि व्यनी या सोयी मिळणार नाहीत.

३अ. असे विडंबन छापील माध्यमात प्रकाशित झालेले असल्यासः

  • सदर प्रकाशनास पुढचे चार महिने सर्व वितरण फुकट करावे लागेल, त्यांना कोणत्याही प्रकारे साहित्याची विक्री करता येणार नाही.

४. अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यास:

  • संपूर्ण जबाबदारी प्रकाशक आणि/किंवा संस्थळ मालक-चालकांची असेल.
  • अशी तक्रार निर्भेळ हेतूने झालेली नसल्यास, ते सिद्ध करण्याची जबाबदारी लेखक आणि संपादकांची असेल.
  • तक्रारीचा हेतू त्रास देणे असा सिद्ध न झाल्यास लेखक आणि प्रकाशक, संस्थळ-चालक तक्रारकर्त्यांची तक्रार करू शकत नाहीत. हेतू शुद्ध असल्यास तक्रारीमुळे झालेले नुकसान भरून दिले जाणार नाही.
  • अशा विडंबनांवर पाठ थोपटणारे प्रतिसाद देणार्‍या वाचकांस विनोदबुद्धीहीन समजून त्यांना चार महिने वाचनाहारावर ठेवले जाईल. या वाचनांमधे नुकतेच टंकलेखन शिकलेले हौसे-नवसे आंतरजालीय लेखक, स्वयंघोषित विज्ञानवादी आणि नाडीशास्त्र यांचे आणि/किंवा यांच्यावरचे आंतरजालीय आणि छापील साहित्य यांचा समावेश असेल.

"

सदर पत्र कांदा संस्थानच्या ग्रामसभेच्या सरकारी पेपरात छापून आल्यानंतर आमच्या वार्ताहरांनी ठिकठिकाणी जाऊन लोकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेतला. आमच्या राजकीय विश्लेषकाला मिळालेली माहिती अशी:

बुद्धीहीन विनोद हा माणूसकीच्या विरोधात असून आम्ही "पांचट -- विंडबनाशी युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू" असा ग्रामपंचायतीचा यासंदर्भातला पवित्रा आहे. या कायद्यासाठी आश्चर्यकारकरित्या सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत. दोन्ही पक्षांच्या ग्रामसेवकांनी विधेयकाच्या बाजूने आघाडी उघडलेली आहे. विधेयक पास होण्यासाठी ग्रामसभेत निदान दोन तृतीयांश बहुमत लागेल, पण आत्ताच पाच सप्तमांश ग्रामसेवकांनी विधेयकासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सामान्य ग्रामस्थांशीही आमचे वार्ताहर जाऊन बोलले. अनेक ग्रामस्थांनी आपण होऊनच आमच्या वार्तापत्राशी संपर्क साधून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. संपादक मंडळातल्या एकीचं म्हणणं पडलं, "... हा अत्यंत अन्याय्य कायदा आहे. लेखक काहीतरी वाईट लिहिणार याची जबाबदारी संपादकांवर का? या कायद्यामुळे संपादकांना खरोखरच सर्व लेखन वाचून त्यातलं न-विनोदी लिखाण काढून टाकावं लागेल. इतकं काम करण्याची अपेक्षा करणं बरोबर नाही. आधीच आम्ही इतर सर्व जबाबदाऱ्या संभाळून हे काम करतो. आम्हालाही घरदार, मुलंबाळं आहेत याचा विचार व्हावा."

एका सामान्य वाचकाची प्रतिक्रिया, "ही कल्पना उत्तम आहे. मात्र अंमलबजावणी कितपत चांगल्या रीतीने होईल याबद्दल मला शंका आहे. मुळात संपादकांना चांगल्या वाईटातला फरक कळतो हे गृहितक बरोबर आहे का? संपादक काही लेखन करतात म्हणून संपादक बनतात का त्यामागे काही इतर व्यक्तीगत कारणं आहेत?"

एका विडंबकाची प्रतिक्रिया "बाटली, दारू, प्रेयसीचा बाप, हावरटपणा विडंबनांत वापरायचा नाही? च्यायला, मग लिहायचं काय? त्या कवींना म्हणावं, तुम्ही लिहून दाखवा कविता प्रेम, नातं, निसर्ग, पाऊस वगैरे न वापरता. हा कायदा विडंबकांच्या पोटावर पाय देणारा आहे. साला 'सोटा' लावायचा तर भिकार कविता लिहिणाऱ्यांना लावा." या विडंबकाची पुढची प्रतिक्रिया विडंबनातूनच येईल असे त्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. "बघतो, कोण माझं काय वाकडं करतो ते!" अशी एक जहाल प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली.

पण एकंदरीतच बर्‍याचश्या संस्थळांवरच्या व्यवस्थापनांची यामुळे पाचावर धारण बसली आहे. मात्र काहींनी आधीपासूनच विडंबनांनाच बंदी घातलेली आहे. "आम्हाला या कायद्यामुळे काहीही फरक पडणार नाही. अहो आमची प्रकृतीच विनोदाला पोषक नाही. हा, आता एकंदरीतच ट्रॅश लिखाणाला बंदी आली तर मात्र आमची पंचाइत होईल." तसे भाग्यवान व्यवस्थापक सोडले तर बाकी सगळ्यांनाच आपल्या कपाळी हा सोटा बसेल याची भीती वाटते आहे. सदर बातमीच्या जालीय आवृत्तीतून अधिकाधिक वाचकांच्या प्रतिक्रियाही समजतील अशी आम्हांस आशा आहे.

आडकित्ता Sat, 21/01/2012 - 21:21

In reply to by धनंजय

धनंजय या जालीय आयडीच्या नेहेमीच्या प्रकृतीच्या येक्झ्याक्ट्ली विरूध्द आहेत. सबब ही आयडी जाली आहे. ब्लॉक करावी.

नगरीनिरंजन Fri, 20/01/2012 - 09:30

चिं.वि.जोशी, पु.ल.देशपांडे वगैरे उथळ लोकांची भलामण करून आणि मराठी सस्थळांवरील कोण ते केशवसुमार, नंदन, धनंजय वगैरे थिल्लर लोकांची उदाहरणे देऊन कांदा संस्थानाच्या ग्रामपंचायतीने आपली धर्म,संस्कृती आणि साहित्य रक्षणाची उज्ज्वल परंपरा धुळीस मिळवलेली पाहून अपार दु:ख झाले.
सोटाचा तपशील वाचताना तर ग्रामपंचायतीने सोटा चक्क उलटा धरला आहे हे कळले. दारू, बायको, मोठं पोट, खादाडी याचा वापर विडंबनात करायचा नाही तर काय आपले पवित्र कायदे आणि तीर्थयात्रांचा करायचा काय?
कांदा संस्थानच्या ग्रामपंचायतीचे डोके ठिकाणावर आहे काय?

अर्थातच मसुदा पूर्ण फसलेला आहे. हा मसुदा पुन्हा एकदा मुळातून लिहावा अथवा खळ्ळ-खट्याक आंदोलन (किंवा उपोषण) केले जाईल असा इशारा या प्रतिसादातून दिला जात आहे. नंतर तक्रार चालणार नाही.
शिवाय नव्या मसुद्यात कॅन्सर अवेअरनेससारख्या गोष्टींच्या बाबतीत कोणी विनोद केला तर त्याचीही खरडपट्टी काढली जावी हे अंतर्भूत करायला विसरू नका.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 10:22

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन यांच्यासारख्या अनुभव लोकांकडून कांदा ग्रामपंचायतीस काही भरीव योगदानाची अपेक्षा होती. त्याऐवजी त्यांनी फक्त प्रच्छन्न टीका करण्याचा मार्ग स्वीकारलेला पाहून खेद झाला. निदान त्यांनी उपोषण केल्यास फक्त खाण्या-पिण्याचेच उपोषण करावे आणि लेखन-उपोषण वगैरे करू नये, खळ्ळ-खट्याक केल्यास किमान स्वतःच्याच घरात काय ती तोडफोड करून माझ्या घरी समंजसपणाच दाखवावा ही अपेक्षा.

शिवाय नव्या मसुद्यात कॅन्सर अवेअरनेससारख्या गोष्टींच्या बाबतीत कोणी विनोद केला तर त्याचीही खरडपट्टी काढली जावी हे अंतर्भूत करायला विसरू नका.

हो हो ... या भरीव योगदानाबद्दल कांदा ग्रामपंचायत आपली सदैव ऋणी असेल.

बाकी ऋ हे आमचे आवडते लेखक आहेत, त्यांनी लेखन अविनोदी (न-विनोदी नव्हे!) करत रहावे ही विनंती!

आजपासून धनंजय हे आमचे आवडते प्रतिसादक आहेत. तेव्हा आमच्या प्रत्येक धाग्याची लिंक त्यांच्या खरडवहीत आपोआप जाईल अशी व्यवस्था ऐसीअक्षरे प्रशासन आणि कांदा ग्रामपंचायतीने (नस्त्या पंचाईती त्यांना कशाला?) करावी अशी विनंती.

नगरीनिरंजन Fri, 20/01/2012 - 10:39

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नगरीनिरंजन यांच्यासारख्या अनुभव लोकांकडून कांदा ग्रामपंचायतीस काही भरीव योगदानाची अपेक्षा होती. त्याऐवजी त्यांनी फक्त प्रच्छन्न टीका करण्याचा मार्ग स्वीकारलेला पाहून खेद झाला

ग्रामपंचायतीच्या निर्णयांना नंदीबैलासारखी मान डोलावून मान्यता देणे म्हणजे योगदान नव्हे इतपत अनुभव आम्हाला नक्कीच आहे. एसटीडीवर बंदी आणण्याचा अतिपवित्र निर्णय घेणारी तीच का ही ग्रामपंचायत असा प्रश्न पडल्याने आम्हाला टीका करणे भाग आहे. खुद्द समर्थ रामदास स्वामी "टवाळा आवडे विनोद" असे म्हणून गेलेले असताना आणि नवविडंबनकार आपल्या न-विनोदाने विनोदाचा सडेतोड अपमान करत असताना त्याला विरोध करणारा कायदा ग्रामपंचायत करत असेल तर आम्ही त्या पापात वाटेकरी नाही हे स्पष्टपणे जाहीर करत आहोतच शिवाय असा कायदा होऊ नये म्हणून स्वतःचे संस्थळ काढण्याचा लाक्षणिक निर्णय घेऊन तो लाक्षणिक अर्थाने रहित करत आहोत.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 20:44

In reply to by नगरीनिरंजन

खुद्द समर्थ रामदास स्वामी "टवाळा आवडे विनोद" असे म्हणून गेलेले असताना आणि नवविडंबनकार आपल्या न-विनोदाने विनोदाचा सडेतोड अपमान करत असताना त्याला विरोध करणारा कायदा ग्रामपंचायत करत असेल तर आम्ही त्या पापात वाटेकरी नाही

वाल्या कोळ्याच्या कुटुंबाप्रमाणे निरंजन यांना आपले वाटा कमी करता येणार नाही. निरंजन यांनी वेताळकथा लिहून आधीच आपलं विनोदाबद्दलचं प्रेम दाखवलं आहे. त्यांचं लेखन वाचून पोट धरून हसायला आलं नाही तरी चेहेर्‍यावर स्मित येतंच.

खुद्द रामदासांनी "टवाळा आवडे विनोद" असं म्हटलं असेल, पण आता जमाना बदलला आहे. रामदासस्वामींचे अनेक सल्ले आवडत असले तरी रस्त्याने खात जाणे आणि विनोद करणे याबाबतीत आम्ही वेगळे गुर्जी केलेले आहेत.

ऋषिकेश Fri, 20/01/2012 - 09:06

विनोदी लेखकांच्या यादीत आमच्या लेखनाला न बसविल्याने आम्ही मोर्चाच्या विरोधी मोर्चा काढायचा बेत आखत आहोत. सोटाला आमचा विरोध नाही पण आम्ही विनोदी नाही असे म्हटल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे जर आम्हाला हवा तसा सोटा बनणार नसेल तर आम्हाला रस्त्यावर (पक्षी धाग्यावर) उतरावे लागेल

मंदार Fri, 20/01/2012 - 15:00

In reply to by ऋषिकेश

विनोदी लेखकांच्या यादीत आमच्या लेखनाला न बसविल्याने आम्ही मोर्चाच्या विरोधी मोर्चा काढायचा बेत आखत आहोत. सोटाला आमचा विरोध नाही पण आम्ही विनोदी नाही असे म्हटल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यामुळे जर आम्हाला हवा तसा सोटा बनणार नसेल तर आम्हाला रस्त्यावर (पक्षी धाग्यावर) उतरावे लागेल

तंतोतंत.

आमच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून नाकाने कांदे सोलतेय मेली.. अशी कुजबूज ऐकू आली हो पलिकडे!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 20:35

In reply to by मंदार

आमच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून नाकाने कांदे सोलतेय मेली..

मंदार यांच्यासारख्या रसिक आणि कवीबुद्धीच्या ज्येष्ठ सदस्याने आधी नाकाने कांदे सोलणे याचा अर्थ नीट सांगावा अशी विनंती.

बाकी ऋ आणि मंदार हे आमचे आवडते अ-विनोदी लेखक आहेत. दोघांनाही अधूनमधून विनोद करण्याचा झटका येतो पण त्यांची गणना विनोदी लेखकांत व्हावी अशी इच्छा असल्यास त्यांनी महिन्यात एकतरी विनोदी लिखाण करावे. सव्वा महिन्यात एक ही फ्रीक्वेन्सी चालणार नाही. ;-)

बाकी निखिल देशपांडे हे आंतरजाल आणि संगणकद्वेष्टे असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे.

मंदार Fri, 20/01/2012 - 21:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कांद्याशी मतबल!

बाकी तुम्ही आम्हाला रसिक (प्रत्येक मराठी वाचक/आंजा सदस्य हा बाय डिफॉल्ट रसिकच असतो, म्हणजे थोडक्यात तुम्ही अगदीच सर्वसाधारण, अगदीच 'हे' वगैरे आहात), कवि(कधीकधी विनोदी)बुद्धीचे, ज्येष्ठ (थोडक्यात रुक्ष, रखरखीत कंटाळवाणा वगैरे) इ. इ. उपाध्या बहाल केल्याने आम्ही बेमुदत उपोषण आणि मौनव्रत जाहीर करतो. (सध्या फ्याड आहे म्हणे याचं)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 21:59

In reply to by मंदार

तुमच्या बेमुदत उपोषण आणि मौनव्रताचा आम्ही जहाल निषेध करून तुमच्या विरोधात कांदा ग्रामपंचायतीवर मोर्चा नेणार आहोत. या मोर्चाचे नेतृत्त्व खुद्द कांदेप्रेमी श्री. श्री. नंदन यांनी करावे अशी मी त्यांना जाहीर विनंती करत आहे.
तरीही तुम्ही म्हणताच आहात तर तुम्हाला आम्ही अरसिक, काव्यभंजक आणि बालबुद्धी अशी विशेषणे बहाल करतो आहोत.

निखिल देशपांडे Fri, 20/01/2012 - 10:53

कांदा संस्थानाच्या ग्रामसभेच्याअ बरखास्त्तीची मागणी आम्ही करतो...

अशोक पाटील Fri, 20/01/2012 - 13:07

हा प्रतिसाद 'स्वगत' आहे अशी चेतावणी देत आहे.

("च्यामारी, ह्या पोरीची/मुलीची/युवतीची/बाईची - whichever is applicable - पीएच.डी. नेमकी कोणत्या विषयातील आहे ? भारतात होती तोपर्यंत ठीक होती असे हिचे जालीय मित्र म्हणतात, पण टिंबक्टूला गेल्यापासून हिच्या आयॅम्बिक पेन्टॅमीटरमध्ये वेगळीच इच्छासुनीते उमटत असल्याचे चित्र समोर येत आहे.")

अशोक पाटील

श्रावण मोडक Fri, 20/01/2012 - 17:10

In reply to by अशोक पाटील

होतं हो असं. माणसं प्रेमात पडली की असं काही तरी होत राहतं. सध्या ती कांदा संस्थानाच्या राजकुमारांच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळं ती इच्छासुनीतं वगैरे उमटताहेत. ;)

मी Fri, 20/01/2012 - 13:20

नविन कायद्याप्रमाणे विडंबनाची व्याख्या काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 20:45

In reply to by मी

गुड क्वेश्चन. पण वेगळ्या लिखाणाचा प्रेरणा असा उल्लेख केल्यास सदर लिखाणास विडंबन समजले जाण्याची दाट शक्यता आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 20:47

In reply to by नितिन थत्ते

आम्ही कांदा संस्थानाच्या आतल्या गोटातले असल्यामुळे आम्ही केलेली विडंबनं ही कांदा संस्थानाच्या पंचक्रोशीत नेहेमीच विनोदी समजली जातील.

पैसा Fri, 20/01/2012 - 20:03

सिद्ध झाले तर शिक्षा काय असेल?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 20:47

In reply to by पैसा

मसुद्यात मुद्दा क्रमांक ३ वाचणे. त्यात वेगवेगळ्या लोकांना एकाच प्रकारच्या कायदेभंगासाठी वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या आहेत.

पैसा Sun, 22/01/2012 - 11:47

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळ्या गुन्हेगाराना किंवा आरोपीना एकच सिक्षा झाली पाहिजे. फक्त पाकृ करून खायचीच नाही तर आंजावर येणारा प्रत्येक पाण्चट लेख/कविता, विडंबन गंभीरपणे वाचून त्याचं रसग्रहण सादर केलं पाहिजे आणि संस्थळावरील प्रत्येक लेखाला छान, सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. हीच योग्य शिक्षा ठरेल.

(बादवे, "कांदा न खाण्याचा" चातुर्मास कधी सुरू होतो हो?)

............सा… Fri, 20/01/2012 - 20:09

>> विडंबनासाठी विडंबन, विचार पटले नाहीत म्हणून केलेले दिशाहीन विडंबन वाढण्याचे प्रकार अनेकदा दिसून आलेले आहेत. सामान्य वाचकांनी अशा लिखाणाला सुरूवातीला कदाचित गांगरून उचलून धरल्याचे दिसले, पण पुढे त्यासंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे येत आहेत. >>

मस्त ग अदिती :)
गांगरुन उचलून धरल्याचे दिसले =)) =))

खवचट खान Fri, 20/01/2012 - 21:02

>>>खवचट खान यांनीही उज्ज्वल ठेवलेली आहे

संपूर्ण लेखात या असंदर्भ आणि चारित्र्यहनन करणार्‍या वाक्याची काय गरज होती हे समजले नाही. आम्ही उज्ज्वल काय इतर कुणालाही ठेवलेली नाही. 'I did not have any relations with that woman' या रत्नागिरी कोर्टात केलेल्या विधानाचा आम्ही पुनरुच्चार करतो. चोवीस तासांत जर सदर वाक्य लेखातून काढले गेले नाही तर 'सोडा'चा (Stop Online Dirt-throwing Act) बडगा दाखवून हे संकेतस्थळ बंद करण्यास भाग पाडू अशी नोटीस आम्ही काणे वकिलांमार्फत बजावत आहोत.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/01/2012 - 21:35

In reply to by खवचट खान

खवचट खान यांची बिनशर्त माफी मागून, त्यांनी रत्नागिरी कोर्टात जाण्याच्या आतच शेपूट घालण्यात आलेली आहे. लेखन नको पण काणे वकील आवरा.

पिवळा डांबिस Sat, 21/01/2012 - 03:06

संपादक मंडळावर या विडंबनाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना आपल्या संपादकपदाचा तत्परतेने राजीनामा द्यावा लागेल...
बाकी 'प्रशासकां'ना 'संपादक' म्हणणं हेदेखील 'संपादकत्वाच' विडंबनच नाही का!!!;)
(कोण आहे रे तिकडे? आमच्या चपला काढून तयार ठेवा!!!!!)
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 21/01/2012 - 03:57

In reply to by पिवळा डांबिस

(कोण आहे रे तिकडे? आमच्या चपला काढून तयार ठेवा!!!!!)

काका, मला (तुमच्याच चपलांपासून) वाचवा!

Churchill Sat, 21/01/2012 - 05:08

बरं मग या कायद्याच्या निषेधार्थ ऐसी अक्षरेच्या लोगोवर काळे पट्टे मारणार का साईट २४ तास बंद ठेवणार?

राजेश घासकडवी Sun, 22/01/2012 - 11:40

या निर्णयाचं स्वागत. आंतरजाल जितकं कचराविरहित होईल तितकं चांगलं. जो कोण उठतो तो आपण खाल्लेल्या भेळेच्या कागदावरची अक्षरं वेडीवाकडी करतो आणि लोकांना वाचण्यासाठी तो कचरा देतो. कोणीतरी हे थांबवायलाच हवं.

मात्र हा कायदा चांगला असला तरी लो एमचा क्राइम करणारा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ऑनलाइन ट्रॅश स्टॉप करायची तर ती केवळ विडंबनांपुरतीच मर्यादित का? भंगार कविता, आणि कंटाळवाणे लेख काही कमी आहेत का? त्यांना का या कायद्यापासून मुक्ती? पंधरा शब्दांच्या गहन चर्चाप्रस्तावांचं काय? आणि 'माझं डोकं दुखतंय, काय करावं?' वगैरेसारख्या डोकेदुखी निर्माण करणाऱ्या प्रश्नांना बरं सोडलंय? माझ्या मते हा सगळा कचरा काढून टाकायला पायजेलाय. तेव्हा हा कायदा अधिक व्यापक करावा अशी मी मागणी करतो.

चला, पळतो. मला आता सोटा ला विरोध करण्यासाठी जमलेल्या विडंबकांसमोर भाषण द्यायचं आहे. तिथे मी लोटा (लीव्ह ऑनलाइन ट्रॅश अलोन) असा नवीन प्रस्ताव मांडणार आहे.

... Sun, 22/01/2012 - 23:46

हायला हा सोटा भारीच आहे
=)) =)) =))

रच्याकने प्रतिसादाचे विडंबन हा एक मुद्दा राहिला आहे अस वाटतं

बाकी गुर्जीनी या कायद्याच नावाचचं विडंबन केल्यानं त्याना योग्य ती शिक्षा फर्मावण्यात यावी असा ठराव मांडत आहे

Nile Mon, 23/01/2012 - 04:54

हुच्चभ्रुंना, फुटकळ विडंबनाने का होईना पण, सामान्य लोकांनी जमवलेले हास्य-प्रतिसाद बघवेनात की काय? आपल्याचा विडंबनांना वाहवा मिळावी या करिता केलेल्या या क्रुर कायद्याचा निषेध करतो.