Skip to main content

मैत्रीण : जगण्यातली, मनातली आणि कवितेतली

पुरूषाची मैत्रीण म्हटलं की आपल्याकडे थोडं सावरून बसायची पद्धत आहे. शंभर एक वर्षांपूर्वी 'मैत्रीण' हार्ट अ‍ॅटॅक देत असेल. आता फक्त सावरून बसण्यापर्यंत आलो आहोत हे एक चांगलंच. शिवाय आज विशीतली बरीच (सगळी नव्हे) मुलं-मुली मैत्री, आकर्षण, लैंगिकता याबाबतीत पुष्कळच 'सुलझे हुए' आहेत, अधिक थेटपणे या गोष्टींना सामोरं जात आहेत असंही मला वाटतं. किमान आजच्या अभिव्यक्तीतून, चित्रपट-नाटक, फेसबुक अशा माध्यमातून जे चित्र समोर येतंय ते तरी असं आहे. आणि ते आश्वासकही आहे. आज छत्तीस पूर्ण केलेला मी 'आमच्या वेळच्या' गोष्टी आठवतो तेव्हा मला आंतरिक पातळीवर फारसा फरक दिसत नाही, पण अभिव्यक्ती, आकलन - विशेषतः आजच्या मैत्रिणींचं मुलं आणि त्यांचं 'टेस्टॉस्टेरॉन प्रेरित' वागणं याचं आकलन - याबाबतीत मात्र फरक दिसतो. मैत्रिणीचा विचार करताना जगण्यातली, मनातली आणि कवितेतली अशा तीनही आघाड्या मिळून ती पूर्ण होते का असा मी विचार करतोय. अशी जर ती पूर्ण होत असेल तर प्रत्येक आघाडीवर ती थोडी थोडी अपूर्णच आहे असं म्हणावं लागेल. पण ते तसं नाही बहुधा. जगण्यातली अपूर्ण आहे, मनातली पूर्ण आहे आणि कवितेला पूर्णत्वाची भाषाच चालत नाही, त्यामुळे तिथे हा प्रश्नच नाही!

'व्हेन हॅरी मेट सॅली' या चित्रपटातलं 'स्त्री आणि पुरूष मित्र होऊ शकत नाहीत' हे एक गाजलेलं वाक्य/विचार. ('मैने प्यार किया'मध्ये पुढे ते आपण रीतसर वापरलं.) एखादं सार्वकालिक सत्य किंवा सत्यांश असावा असं वाटायला लावणारा हा विचार पुढे पुष्कळच चर्चिला गेला. हे सार्वकालिक सत्य आहे का याबाबतीत मी ठाम नसलो (एकूणात मी फारच कमी बाबतीत ठाम असतो) तरी हॅरीचं पुढचं म्हणणं मला पटतं. सॅली त्याला 'का' असं विचारते तेव्हा तो म्हणतो की 'द सेक्स पार्ट ऑल्वेज गेट्स इन द वे'. मला ते पटतं कारण 'सेक्स पार्ट'चा अर्थ कायम लैंगिक भूक असा असत नाही. तीही असू शकते पण स्त्री आणि पुरूषामधलं 'सेक्शुअल टेंशन' अतिसूक्ष्म, अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपात का होईना जागं असतं. दोन मित्रात किंवा दोन मैत्रीणीत (ते समलिंगी नसतील तर) ते असत नाही. 'दृष्टी' चित्रपटात हा विचार 'स्त्री और पुरूष के बीच हमेशा एक उत्तेजना रहती है' अशा, आशयाच्या अधिक जवळ जाणाऱ्या समर्पक शब्दांत येतो. या उत्तेजनेला एक आदिम परिमाण, योग्य-अयोग्यच्या पलीकडे असा एक विस्तृत अर्थ आहे. स्त्री-पुरूष मैत्रीमधलं ते एक परिमाण आहेच असं मला वाटतं. अर्थात हे सगळं मान्य करूनही दोघांमधल्या निखळ मैत्रीची, ती मैत्री वर्षानुवर्षे टिकल्याची उदाहरणे सापडतील. ऑन-ऑफ होणारा 'लिंगभाव' गृहीत धरून मैत्रभाव चांगला आकार घेऊ शकतोच.

माझ्या बाबतीत हे झालं आहे का? तर हो. पण मी तरी म्हणेन की उत्तेजना पूर्णपणे गैरहजर होती, असते असं अगदी ठामपणे सांगता येणार नाही. उत्तेजनेमागे कदाचित 'नेचर'पेक्षा 'नर्चर'चा वाटा मोठा असेल, पण 'मैत्रीण' आणि 'मित्र' यात एखाद्या तंतूइतका फरक पडतोच. मैत्रिणीबरोबर मी अजून सिनेमाला गेलेलो नाही. म्हणजे फक्त ती आणि मी असे दोघं. किंवा संध्याकाळी अचानक मित्राकडे जाऊन दोघांनी भेळ खायला बाहेर पडणं हे मैत्रीणीच्या बाबतीत घडलेलं नाही. खरं तर 'हे होणं शक्य नाही' असं एक गृहीतक वातावरणीय संस्कारांमधून तयार झाल्याने ती मर्यादा आपल्या आपणच घालून घेतली गेली होती. (आता हा लेख एखाद्या मैत्रिणीला दाखवून तिला सिनेमाला येतेस का असं विचारून बघतो!)

'मुलगी' हा व्यक्तीविशेष काहीसा नीट समजायला लागला तो काळ साधारण माध्यमिक शाळेतला. त्यादरम्यान सगळेचजण भावनिक-लैंगिक विकासाच्या फ्रॉइडियन मार्गावरून चालत असतात. आमची मराठी माध्यमाची मुला-मुलींची एकत्र शाळा असली तरी मुलं-मुली एकत्र येणं हे दृश्य दुर्मीळच होतं. अर्थात एक-दोन निवडक मुलींशी मैत्री होती. अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, वाचन याबाबतीतच जास्त संवाद असायचा. एखाद्या मुलीविषयी वाटणारी विशेष आस्था - शाळास्तरीय प्रेम - मित्रांकडे व्यक्त व्हायचं तसं ते एका मैत्रिणीकडेही व्हायचं. पण एकूण सगळा मामला तसा 'सीरियस' नसल्याने (देवदास शाळेच्या वयात होत नाहीत, ती वेळ अजून यायची असते) त्यावेळेला आवडलेल्या मुलीच्या आठवणीतच रमून अभ्यासाला लागणे हा बहुतेकांचा ठरलेला मार्ग होता. पण एकूणात 'मुलगी'भोवती असलेलं वलय, 'मुलीवर इम्प्रेशन मारलं पाहिजे' हा स्वयंभू विचार, सौंदर्यामुळे पडणारी विकेट आणि हळूहळू प्रविष्ट होऊ लागलेलं शरीराचं आकर्षण या एकत्रित भेळेचा आस्वाद घेताना शाळा संपली. दहावीच्या परीक्षेच्या आधी एका विशेष उल्लेखनीय मुलीने हस्तांदोलन करून 'बेस्ट विशेस' दिल्या तेव्हा परीक्षेआधीची धडधड द्विगुणीत झाल्याचं स्मरतं. मला नेहमी वाटतं की मुलाची ओळख आधी 'मित्र' म्हणून होते आणि मुलीची ओळख आधी 'मुलगी' म्हणून होते यातच बहुधा 'मित्र' आणि 'मैत्रीण' वेगळे होण्याची बीजं आहेत.

तर मुलगा हा मित्र होताच कारण आजूबाजूला असणारी मुलं दुसरं काही होऊच शकत नव्हती. मुलगी मैत्रीण झाली पण 'मुलगीपण' पूर्णपणे गेलं नाही. तिच्याही मनातून आणि आमच्याही. मैत्रीची सुरूवात - गप्पा, सिनेमा, नाटक, गाणी, चर्चा, पुस्तकं अशी 'जेंडर न्यूट्रल' असली तरी. मित्राकडे रात्री गच्चीवर झोपायला जायचा कार्यक्रम ठरला की मैत्रीण अर्थातच कटाप. मैत्रीण असेल तर एका दिवसाची ट्रिप किंवा ट्रेक. नाहीतर दोन-तीन दिवसाचा ट्रेक. आणि ठरला तरी किमान दोन ते तीन मुली असतील तर. घरून मुलींना परवानगी मिळण्यात अडचण येते त्यात सावधगिरीचा हेतू असतो हे मान्य, पण आज असंही वाटतं की ही बंधनं काही अंशी सैल केली असती तर? कदाचित ते आव्हानही ठरलं असतं आम्हाला. कारण मग अशी बंधने काढूनही मित्रत्वाचं नातं टिकू शकतं हे वरच्या पिढीला दाखवून द्यावं लागलं असतं. मैत्रीणीच्या बाबतीत एक सीमारेषा ओलांडली की परिणाम फारसे चांगले होत नाहीत या भीतीमुळे मैत्रीण शब्दाला एक अलार्म बेल जोडली गेली आणि ती आमच्याही डोक्यात वाजेल याची काळजी घेतली गेली. आपल्याकडच्या आया, मावश्या, आत्यांना जी काळजी वाटते तीच हॅरी बोलून दाखवतो - सेक्स पार्ट ऑल्वेज गेट्स इन द वे!

जे मित्राकडून मिळतं किंवा मिळालं ते मैत्रिणीकडून मिळतं का? मिळालं का? मैत्रीण अधिक 'डाऊन टू अर्थ' असल्याने की काय कुणास ठाऊक पण मित्राला किंवा मला भिडलेली 'कोसला' मैत्रिणीला तितक्या तीव्रतेने भिडली नव्हती. किंवा कोसलाचा विषय निघाला आहे असं मैत्रिणीच्या बाबतीत तेव्हा फार झालं नाही. बरं, 'कोसला' बाजूला ठेवू - कारण ती मुलांच्या भावविश्वाला जास्त जवळची आहे. 'सावित्री' घेऊ. तिचाही विषय कधी निघाला नाही. अर्थात एक खरं की साहित्यात प्रत्येकाला आपल्याइतकाच रस असला पाहिजे अशी काही माझी अट नव्हती. आणि नाहीही. पण वाचन करणारे वाचलेल्यावर काहीच बोलत नाहीत तेव्हा मला जर विचित्र वाटतं. म्हणजे पुस्तक वाचून बाजूला ठेवून द्यायचं? थोडीसुद्धा चर्चा नाही? एक मात्र आवर्जून सांगतो -माझ्याकडची 'कोसला' दोन मैत्रिणींनीच मला दिलेली वाढदिवसाची भेट आहे. (त्याअर्थी मैत्रीण चांगलीच शहाणी! ‘मुली. मुली चांगल्याच असतात.’ हा कोसलातलाच आत्मप्रत्यय देणारी!) साहित्याचा हा एक धागा मैत्रिणीच्या बाबतीत अनेक दिवस सुटल्यासारखा वाटायचा. पुढे फेसबुक मैत्रीच्या टप्प्यावर मात्र अशा मैत्रिणी भेटल्या आणि आनंद झाला. 'डाऊन टू अर्थ'पणाची आणखी एक झलक म्हणजे नाटक-सिनेमा पाहून झालं की मित्रांना त्यावर कधी एकदा बोलतोय असं व्हायचं. मैत्रीण त्यात असायची, पण किती 'आतून' याची जरा शंका आहे. मैत्रीण किंचित अलिप्त, समयसूचक वागणारी, 'जायची वेळ झाली' असं पटकन म्हणणारी, गप्पात रेंगाळण्याची सीमारेषा आमच्याहून अलीकडे असणारी अशी होती याचं कारण तिचं 'नेचर' की 'नर्चर'? (हेही तिच्याशी बोलतोच आता!)

'नेचर' आणि 'नर्चर'चा गुंता सोडवणं हे महाकठीण काम! स्त्रीवादी दृष्टीकोन सांगतो की प्रत्येक गोष्ट लिंगभावावर आधारलेली असते आणि 'पुरूष' आणि 'स्त्री' हे 'घडतात'. त्यांचं नैसर्गिकीकरण स्त्रीवाद नाकारतो. म्हणजे मैत्रभावातही लिंगभाव निहीत असला पाहिजे. म्हणूनच मी मित्राकडे बघतो तसं मैत्रिणीकडे बघत नाही का? तिच्याशी बोलताना, तिच्याकडे बघताना 'ही मुलगी आहे, हिचं काहीतरी वेगळं आहे' असं वाटतं का? आणि वेगळं म्हणजे आमच्या दोघांमध्ये असलेला दोन अवयवांचा फरक की अजून काही वेगळं? मला वाटतं की मैत्रीण आणि मित्र यात गुणात्मक फरक नाही असाही अनुभव येत असला आणि स्त्री-पुरूष फरक हा स्त्रीवादी दृष्टीने 'नैसर्गिक फरकाचा' मुद्दा नसून हा फरक 'घडवण्यात' येतो असं जरी असलं तरी 'उपजत', 'निसर्गतः' असंही काही असतं जे भिन्नत्वाची जाणीव प्रबळ करतं. हा वेगळेपणा भौतिक आहे, 'फॉर्म'शी संबंधित आहे असं मला नेहमी वाटतं. मित्र आणि मैत्रीण यात गुणात्मक फरक नसेल, पण दृश्य फरक तर असेल? मैत्रीण माझ्या 'विरुद्ध' दिसण्यातली, माझ्या 'विरुद्ध' पोताच्या आवाजात बोलणारी असल्याने मैत्रीणीचा सहवास, तिचं मतप्रदर्शन, तिची अभिव्यक्ती याची कधीकधी वेगळी नोंद घेतली जाते खरी. त्याची सुरूवात बहुधा मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्राची 'मित्र' म्हणून नोंद घेण्याने आणि मैत्रिणीची 'मुलगी' म्हणून नोंद घेण्याने होते. आणि हे पूर्णतः संस्कारित नाही, यात नैसर्गिकता आहे असं मला वाटतं.

एका टप्प्यानंतर मैत्रीतील नेहमीची लक्षणे वागवत चालणारं जगणं वेगळं वळण घेतं आणि तुम्ही काही मूलभूत शोधू लागता. म्हणजे बुद्ध व्हायच्या मार्गाला लागता असं नव्हे, पण आपापल्या औकातीतला बुद्ध व्हावं असं वाटू लागतं. 'रूटीन' कुणाला चुकत नसतंच, पण रूटीनमधलं काही बदलता येईल का असा विचार सुरू होतो. हा प्रवास बऱ्याच लोकांचा होतो. माझाही झाला. इथे गंमत अशी होते की बाकी मित्र-मैत्रिणी अशा मूलभूतकडे वळले नसतील किंवा त्यांचं 'मूलभूत' आणि आपलं 'मूलभूत' यात फरक असेल तर ते काहीसे परके वाटू लागतात. आपला प्रवास आता जरा वेगळा होतो आहे आणि आपल्याला ऐकू येतात त्या 'ड्रम-बीट्स' आजूबाजूच्या प्रत्येकाला ऐकू येतातच असं नाही आणि त्यात आपले मित्र-मैत्रिणीही असतील ही जाणीव व्हायची एक वेळ येते. ती आली तेव्हा त्याने मैत्रभावाला अजिबातधक्का बसला नाही, पण आता गप्पांमध्ये आपण तितकेसे रमत नाही, आपले विषय वेगळे झाले आहेत हे जाणवू लागलं. मैत्रिणी संसारात, नोकरीत रमल्या आणि मी लग्नानंतर तीन वर्षांनी नोकरी सोडून संपादकीय कामात पडलो. (तीही नोकरीच, पण तिथे आर्थिक उद्दिष्टांपेक्षा वैचारिक उद्दिष्ट अधिक महत्त्वाचं होतं). विशीतली आणि लग्नापूर्वीची पुस्तकं बदलू लागली आणि मार्क्स-आंबेडकर-डार्विन वगैरे लोकांशी ‘मूलभूत हितगुज’ होऊ लागलं. मैत्रीणीच्या रूटीनमध्ये फारसा फरक पडला नव्हता. मित्रही अधिकाधिक पगार मिळवू लागले आणि अस्मादिक मात्र तात्विक प्रश्नांशी झटापट करू लागले. या सगळ्यात मैत्री अभंग राहिलीच, पण वर म्हटलं तसं गप्पांमध्ये काहीसं 'डिसकनेक्शन' येऊ लागलं.

मनातली मैत्रीण बहुधा इथे आकार घेऊ लागली. कारण आता स्वतःबद्दलचं काहीतरी कळलेलं होतं. (बायको म्हणून जी घरी आली तिच्या रूपाने मनातल्या मैत्रीणीला जवळची एक मैत्रीण भेटली. आणि ती एक मोठीच गोष्ट घडली! 'बायकोतली मैत्रीण' हा मात्र वेगळ्या लेखाचा विषय!)

मनातली मैत्रीण कशी आहे? शोधक वृत्तीची आहे. काही मूलभूत शोधणारी, बोलणारी, करणारी आहे. परखड आहे. 'आपण कुठे आहोत' याचा खल करणारी आहे. कपड्या-दागिन्यांपेक्षाही कवितेत, विचारात, पुस्तकात, उत्तरांच्या शोधात रमणारी आहे. प्रयोग करणारी आहे. बेधडक आहे. बंडखोर आहे. आपल्या एवढ्याशाच जगण्यात काही वेळा अशा येतात जिथे आपण ताठ उभं राहणं गरजेचं असतं. अशा वेळांचा मान राखणारी आहे. भडाभडा बोलणारी आहे. सुरक्षित जगण्याच्या, कुटुंबाच्या बाहेरचं बघणारी आहे. प्रश्न विचारणारी आहे. परिस्थितीवर ठसा उमटवणारी आहे.

मनातली मैत्रीण नीटशी भेटली नाही याचं एक कारण माझाही शोध कमी पडला, मी माझी जागा सोडून तशी मैत्रीण शोधायला गेलो नाही हेही आहेच. पण पुन्हा मगाचचा मुद्दा आहेच. मैत्रिणीशी मित्राशी वागतो तसं वागताना येणारं अवघडलेपण आणि त्यामुळे खंडित होणारा मैत्रीण शोध!

मैत्रिणीचं प्रतिबिंब कवितेत कसं पडलं? पहिल्या-वहिल्या कविता हृदयाचा बांध फोडून वगैरे लिहिलेल्या. त्यात 'तिच्या' आठवणींचे उमाळेच अधिक. पण चांगली गोष्ट ही की कविता त्यातच अडकली नाही आणि तिने व्यापक पट मांडायची मुभा दिली. त्याने थरारून जायला झालं. खरं तर उत्तम भंकस करावी, काहीएक दर्जेदार विनोदी लिहावं ही माझी पहिली आकांक्षा. पण कवितेनं जे रिंगणात खेचलं आणि घुमवलं ते अशक्य होतं. हृदयाचे उमाळे थोडे थंडावल्यावर मग कवितेतली ‘ती’ शांतपणे, समतोल प्रतिस्पर्धी म्हणून आली. पण ती मैत्रीण होती का? होती. बाई म्हणून होती. वेश्या म्हणून होती. पण बहुतेकदा 'ती' होती. कवितेतून वेश्या आली, तिच्या जगण्याचे ओरखडे आले, तिच्या काव्यात्म अस्तित्वाने 'इंपोटंट इंटलेक्च्युअल'ही सिद्ध झाला. पण मनातल्या 'मैत्रीणी'बाबतचं ('ती' किंवा प्रेयसीबाबतचं नव्हे) काही अजून तरी आलं नाही खरं. वेश्या म्हणजे तरी कोण? मनाच्ता तळातला संघर्ष, व्यक्तिगत अनुभव, शरीराच्या गरजेची स्थितीबद्ध सांस्कृतिक गोची आणि या सगळ्याकडे बघत विकट हास्य करणारी, बेदरकार काळजाची आणि तरी हतबल वेश्या. मला ती कायम मैत्रीण वाटतेच. सगळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय सोस गळायला लावणारी एक जुनी मैत्रीण. फक्त ती स्वतः कमी बोलते, तिच्याबद्दल आम्हीच जास्त बोलतो. तिने एक मोठंच ऐतिहासिक प्रश्नचिन्ह उभं केलं आहे आणि ते सोडवण्याच्या कृतीकार्यक्रमाचा हिस्सा असल्यासारखं आम्ही बोलत असतो. ही मैत्रीण कवितेतून बरेचदा येत राहिली.

कविता म्हणजे एक खतरनाक गोंधळच. आणि कवितेतून ‘तिचं’ येणंही तसंच. तिचं येणं प्रातिनिधिकही असतं. म्हणजे ही नक्की कोण? मनातली, प्रत्यक्षातली की आणखी कुणी? असा प्रश्न पडतो. जेव्हा ती बाई असते तेव्हा स्पष्ट असते. वेश्या असते तेव्हाही स्पष्ट असते. 'ती' मात्र तितकीशी स्पष्ट नसते. बहुधा माझं मध्यमवर्गीय जगणं याला कारणीभूत असावं! पण एकूणात कवितेतून स्त्रीरूप सुटणं अवघडच. जगताना दिसलेलं, अनुभवलेलं, दुखलेलं असं बरंच काही आणि मग प्रतिमांकित कविता. त्यातून 'ती' कशी सुटेल? कवयित्रीच्या बाबतीत 'तो' सुटणं अवघड आणि कवीच्या बाबतीत 'ती'!

मैत्रिणीची जागा एकूणात ही अशी. गोंधळाच्या, विषादाच्या, अपेक्षांच्या, उद्वेगाच्या वेळा सांभाळणारी. मैत्रभाव कधी न्यूट्रल, कधी 'जेंडर्ड' ठेवणारी.

मैत्रिणीकडून माझ्या अपेक्षा मात्र खूपच आहेत. वेगळ्या जगाचं स्वप्न बघण्याचा मार्क्सवादी स्वप्नाळूपणा मनात पुरेपूर उतरल्यावर किंवा गांधी-विनोबांच्या वैचारिक आकर्षणातून एखादं दार प्रकाशित झाल्यासारखं वाटू लागल्यावरही मैत्रीण - बाई म्हणून, समवयस्क मैत्रीण म्हणून, बायको म्हणून, वेश्या म्हणून प्रश्नांकित मुद्रेने उभी राहतेच. तिच्या मुद्रेवरील प्रश्न पुसणं मनात किंवा कवितेत काही अंशी शक्य होतं. पण माझ्याकडून ते प्रत्यक्षात पुसले जात नाहीत. अशा वेळी मला वाटतं मैत्रिणीनेच उठावं आणि प्रसंगी हाती शस्त्र घेऊन हे प्रश्न पुसावेत.

ती उठली तर बहुधा मी अधिक आश्वस्त होईन. आणि मग कदाचित आज रात्री गप्पा मारायला घरी ये आणि उद्या सकाळी कॉफी घेऊनच जा असं म्हणण्याचं माझं धाडसही होईल. शिवाय पहिलं आमंत्रण स्वीकारताना, माझ्या घरी येतानाही तिने प्रश्न पुसायचं शस्त्र आणलं तरी मला वाईट वाटणार नाही!

पुरूष स्पंदनं (दिवाळी २०१३)

Node read time
9 minutes
9 minutes

ऋषिकेश Tue, 31/12/2013 - 17:06

In reply to by चिंतातुर जंतू

'कवितेत, विचारात, पुस्तकात, उत्तरांच्या शोधात रमणारी' किंवा 'सुरक्षित जगण्याच्या, कुटुंबाच्या बाहेरचं बघणारी, प्रश्न विचारणारी, परिस्थितीवर ठसा उमटवणारी' स्त्री कोणत्याही वयाची असली तरी, आणि माझ्या कोणत्याही वयात मला आवडेल असं वाटतं

.
आपली आवड इतकी नेमकी समजू शकलेल्या भाग्यवान जीवांचा (का इथे जंतूंचा म्हणावे? ;) ) मी प्रचंड हेवाही करतो व त्यांचा आदरही वाटतो.
आपल्याला काय-कोण आवडते याचे काही हिशोब मनी बाळगावेत आणि त्या परिमाणांना छेद देणार्‍या वेगळ्याच स्वभावाच्या व्यक्तीने आयुष्यात यावे आणि बघता बघता (अविश्वसनीयरित्या) आमच्यातील परिचय चांगल्या मैत्रीत बदलावा असे आतापर्यंत एकापेक्षा अधिकवेळा झाले आहे. तेव्हापासून अशी चौकट मनातही बनवणे सोडून दिले आहे.

(अगदी बायको म्हणून कशी मुलगी हवी/आवडेल हे घरच्यांनी विचारल्यावर मराठी भाषा बर्‍यापैकी समजणारी व मला समजणारी किमान एक भाषा बोलणारी, किमान ग्रॅज्युएट, आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी असलेलती या व्यतिरिक्त एकही मर्यादा/चौकट आखून देऊ शकलो नव्हतो :( )

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 17:07

In reply to by ऋषिकेश

आपल्याला काय-कोण आवडते याचे काही हिशोब मनी बाळगावेत आणि त्या परिमाणांना छेद देणार्‍या वेगळ्याच स्वभावाच्या व्यक्तीने आयुष्यात यावे आणि बघता बघता (अविश्वसनीयरित्या) आमच्यातील परिचय चांगल्या मैत्रीत बदलावा असे आतापर्यंत एकापेक्षा अधिकवेळा झाले आहे. तेव्हापासून अशी चौकट मनातही बनवणे सोडून दिले आहे.

प्रचंड अनुमोदन.

बॅटमॅन Tue, 31/12/2013 - 15:34

In reply to by मी

हे थोडं पौंगडावस्थेतील दिवास्वप्न (फॅन्टसाइझिंग) वाटलं, ह्या अपेक्षांची खरचं गरज आहे असं मला वाटत नाही.

नेमके हेच म्हणायचे होते त्यावर बोट ठेवलेत.

अजो१२३ Tue, 31/12/2013 - 15:41

In reply to by बॅटमॅन

लेखकाने अगदी वेगवेगळ्या complexities चे रोबोट बनवावेत आणि त्यावेळेस त्यांची अधिकाधिक complex specifications अपेक्षावित तसा काहीसा प्रकार वाटला.

मेघना भुस्कुटे Tue, 31/12/2013 - 15:52

अजून एक समांतर कविता आठवली. (कवितासंग्रह कुठला आठवत नाही.)

माझ्या मित्रा...

ऐक ना,

मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ,
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वार्‍याचा वावर
आणि मुक्त असण्याची
त्यात, एक मंद पण, निश्चित ग्वाही.

कितींदा पाहिलेय मी हे स्वप्न
झोपेत आणि जागेपणीही!

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस
अर्धे फुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही

हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला जाशील माझ्यासाठी
तर प्रेमिक असशील;
समजशील जर, शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील?

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसर्‍या स्वप्नाकडे
समजून हेही - की ते हाती येईल न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे,
धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल;
तर मग तू कोण असशील?

मित्र असशील माझ्या मित्रा!

- अरुणा ढेरे

उत्पल Mon, 06/01/2014 - 10:51

लेखावरील विविध प्रतिक्रिया आणि आनुषंगिक चर्चेबद्दल सर्वांचे आभार...

मन Mon, 06/01/2014 - 11:17

In reply to by उत्पल

नकोत आभार; हवेत असेच अधिक लेख.
शपथ वहा शपथ वहा शपथ वहा....

उत्पल Mon, 06/01/2014 - 11:20

जरूर...मन, मी मनावर घेईन!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/01/2014 - 20:57

लेखाचा विषय आणि लेखही आवडला.

विशेषतः हा भाग: मुलाची ओळख आधी 'मित्र' म्हणून होते आणि मुलीची ओळख आधी 'मुलगी' म्हणून होते यातच बहुधा 'मित्र' आणि 'मैत्रीण' वेगळे होण्याची बीजं आहेत.

एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला होता तेव्हा दोघांचीही या बद्दल सहमती होती. मी त्याच्याकडे आधी पुरुष म्हणून पाहिलं होतं, त्याने माझ्याकडे स्त्री म्हणून. (हे असंच असतं आणि त्यात काहीही गैर नाही हे मान्य करायला मला थोडा वेळ लागला.) तरीही काही काळानंतर आमचं मैत्र जुळलं. आमच्यातलं, स्त्री आणि पुरूषामधलं 'सेक्शुअल टेंशन' जेव्हा जाणवेनासं झालं तेव्हा आमची मैत्री झाली असं निदान त्याबाबतीत म्हणेन.

सगळ्याच मित्रांच्या बाबतीत असं झालं नाही. काहींशी झालेली मैत्री जालावरची असल्यामुळे शारीर अस्तित्त्वाचा भाग फारच उशीराने आला.