आपली आधुनिकता - पार्थ चटर्जी

आपली आधुनिकता - पार्थ चटर्जी

लेखक - धनुष

(श्रीज्ञान हालदार ह्याच्या स्मृतीनिमित्त ३ सप्टेंबर १९९४ रोजी कलकत्त्यात पार्थ चटर्जी[] यांनी बंगाली भाषेत दिलेलं व्याख्यान. इंग्रजी भाषांतर १९९७ मध्ये लेखकाने प्रसिद्ध केले. त्याचा 'धनुष' यांनी केलेला अनुवाद.)

---

आजच्या व्याख्यानासंदर्भातल्या काही नेहमीपेक्षा निराळ्या गोष्टी नोंदवून आपण सुरुवात करू. सर्वप्रथम, माझ्याही नकळत, मी ज्ञान, प्राचीनत्व आणि अलंकृत भाषा - जे सामान्यपणे अशा व्याख्यानांसाठी पात्रतेचे निकष असतात - त्यांवर पात्र ठरू लागलोय; हे लक्षात येऊन मी फारच चकित झालोय. दुसरी गोष्ट म्हणजे, श्रीज्ञान हालदार, जो माझा विद्यार्थी आणि जेमतेम लहान भाऊ शोभावा अशा वयाचा होता, त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ, हे व्याख्यान आयोजित केलंय, हीदेखील एक असामान्यच बाब आहे. माझ्या स्मृतीप्रीत्यर्थ जर श्रीज्ञान हे व्याख्यान देत असता तर निश्चितच ती गोष्ट निसर्गनियमांनुसार आणि सामाजिक संकेतांना अनुसरून ठरली असती. प्रदीर्घ आणि दुर्धर आजाराला तोंड देत असतानाही आपल्या लहानशा पण वादळी आयुष्यात, श्रीज्ञान खोल वैचारिक जिज्ञासा आणि आपल्या तत्त्वांवर दृढ निष्ठा ठेवून जगल्याचे व्यापक पुरावे मागे ठेवून गेलाय. त्या तुलनेत माझी भाषा आणि विचार दोन्हीही तोकडे आहेत. ह्यात काही असामान्य असेल असं नव्हे, पण श्रीज्ञानच्या स्मृतीनिमित्त असलेल्या व्याख्यानाची सुरवात करण्याआधी, स्वतःच्या मर्यादा मान्य करून ती करावी असं मला वाटतं.

आपल्या आधुनिकतेची संकल्पना साकारताना

माझा विषय 'आधुनिकता' आहे पण विशेषतः ‘आपली’ आधुनिकता. हे विभाजन करताना मला मुख्यतः असं म्हणायचं आहे की अशा अनेक आधुनिकता असू शकतात ज्या आपल्या नव्हेत. थोड्या वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, आपल्या आधुनिकतेची काही खास अशी वैशिष्ट्ये आहेत. असं म्हणता येईल की इतर लोक ज्याला आधुनिक मानतात ते आपल्याला अस्वीकारार्ह वाटू शकेल आणि आपण आपल्या आधुनिकतेत जी मूल्ये जोपासतो ती कदाचित इतरांच्या दृष्टीने अजिबात आधुनिक ठरणार नाहीत. ह्या फरकांबद्दल आपण आनंद मानावा की शरमिंदे व्हावं, ह्या प्रश्नाकडे आपण नंतर येऊ. आपण आधुनिक कसे झालो किंवा ह्या आधुनिकतेची बीजं कशात आहेत तिथून आपण सुरुवात करूया.

१८७३ साली, राजनारायण बसू यांनी, ‘ते दिवस आणि हे दिवस’ ह्या पुस्तकात, इंग्रजी शिक्षणाच्या प्रस्थापनेपूर्वीच्या आणि नंतरच्या परिस्थितीची तुलना करून पाहण्याचा प्रयत्न केला. मॉडर्न म्हणण्यासाठी आधुनिक हा शब्द आज आपण बंगाली भाषेत वापरतो; तो एकोणिसाव्या शतकात प्रचलित नव्हता. तेव्हा प्रचलित असलेला शब्द होता: ‘नव्य’ (नवा). हे जे नवीन होतं, ते अगदी घनिष्टपणे इंग्रजी शिक्षण आणि (पाश्चात्त्य) विचार ह्याच्याशी निगडीत होतं. त्या काळी दुसरा शब्द जो बराच चलनात होता तो म्हणजे उन्नती. एकोणिसाव्या शतकातल्या युरोपीय संकल्पना डेवलपमेंट किंवा प्रोग्रेस ह्या अर्थानं उन्नती हा शब्द प्रचलित होता, ज्यासाठी आपण आज प्रगती हा शब्द वापरतो.

हे सांगण्याची आवश्यकता असू नये की राजनारायण बसू ह्यांचं शिक्षण ह्या नव्या पद्धतीत झालेलं होतं. ते एक समाजसुधारक होते आणि नव्या विचारांचा पुरस्कार करीत होते. 'ते दिवस' आणि 'हे दिवस' अशी तुलना करताना त्यांनीसात विषयांसंदर्भात काय बदल घडले, याबद्दल त्यांचे विचार सादर केले. आरोग्य, शिक्षण, उदरनिर्वाह, सद्गुणांची संकल्पना, सार्वजनिक जीवन, राज्यव्यवस्था, आणि धर्म ह्या सात विषयांसंदर्भात त्यांनी ही तुलना केली. ह्या सात विषयांवरील बसूंच्या चर्चेत अनेक परिचित संदर्भ पुन्हा पुन्हा प्रकट होतात - उदाहरणार्थ, ’त्या’ काळचे लोक साधे, सरळमार्गी, दयाशील, स्नेहशील आणि धर्मभीरू असत आणि हल्ली धर्म केवळ सणवार, दिखाऊपणा यापुरता मर्यादित झालाय; शिवाय लोक धूर्त, स्वार्थी आणि कृतघ्न झालेत.

"हल्ली लोकांशी बोलून त्यांच्या मनातले खरे भाव कळतच नाहीत. पूर्वी, घरी आलेला पाहुणा आणखी काही काळ राहावा अशी लोकांची इच्छा असे. त्या काळी लोक उत्तम आदरातिथ्य करता यावं यासाठी आपली चीजवस्तू गहाण टाकायलासुद्धा तयार असत. हल्ली पाहुणे मंडळींना कधी एकदा इथून निघतोय, असं होऊन जातं." असे आपल्या सामाजिकतेत झालेले अनेक बदल राजनारायण टिपतात.

पण 'त्या' आणि 'ह्या' दिवसांची तुलना करताना राजनारायण सर्वाधिक वेळ 'शरीर' ह्या विषयाला देतात. मला ह्या विषयावर थोडं सविस्तर बोलायचं आहे, कारण ही आपल्या आधुनिकतेतली एक कुतूहलजनक जागा आहे.

"कुणालाही विचाराल तर तो सांगेल की माझे वडील आणि आजोबा शरीराने फार सुदृढ होते. त्या काळच्या पुरुषांच्या तुलनेत हल्लीचे लोक फारच दुबळे आणि अशक्त झालेत. शंभर वर्षांपूर्वीचे लोक जर कुठल्या कारणाने परत आले, तर आपण किती खुरटे झालोत हे पाहून ते फारच आश्चर्यचकित होतील. आमच्या लहानपणी आम्ही डाकूंना पळवून लावणाऱ्या बायकांच्या गोष्टी ऐकायचो. हल्ली स्त्रिया तर सोडाच, पण पुरुषांच्या धैर्याच्या गोष्टीसुद्धा कानावर पडत नाहीत. साध्या कोल्ह्यालादेखील पळवून लावणं ह्या हल्लीच्या मंडळींना जमणार नाही."

थोडक्यात म्हणजे, लोक - आणि राजनारायण यांचा रोख उच्चभ्रू, भद्र वर्गाकडे आहे - हल्ली दुबळे, रुग्णाईत आणि अल्पायुषी झालेत.

एक क्षणभर थांबून बसूंना काय अभिप्रेत आहे याचा विचार करूया. जर 'हे दिवस' म्हणताना आपल्याला आधुनिक काळ आणि इंग्रजी राज्यापासून सुरू झालेली आधुनिक संस्कृती अभिप्रेत असेल तर लोकांचं आरोग्य खालावणं, हा ह्या नव्या संस्कृतीचा परिणाम म्हणावा का? नैतिकता, धार्मिक जीवन, सामाजिकता इत्यादी गोष्टींबद्दल निकृष्ट होत जाण्याच्या चर्चेला काही जागा दिसते; पण शरीर आणि आरोग्य ह्या अत्यंत भौतिक गोष्टींबद्दल विचार करताना कुणाला आजकालचे लोक पूर्वीच्या युगातल्या लोकांपेक्षा दुबळे किंवा खुरटे झालेत; असं का वाटावं?

[हे व्याख्यान ऐकताना] जर माझे इतिहासकार मित्र पेंगत नसले तर ते लगेच आपल्याला सांगतील की १८७३ मध्ये अजूनही ब्रिटीश भारतात आधुनिक वैद्यकाची विद्या आणि आरोग्यसुविधा केवळ युरोपीय समुदाय आणि लष्करापुरती सीमित होती आणि अजूनही बहुसंख्य लोकांपर्यंत ह्या सुविधा पोहोचलेल्या नव्हत्या. मग १८७३ मध्ये राजनारायण ह्यांच्याकडून आधुनिक वैद्यक विसाव्या शतकात आश्चर्यकारक प्रगती करेल, असं भविष्य वर्तवण्याची अपेक्षा कशी करता येईल?

हाच जर आक्षेप असेल तर आपण आणखी काही उदाहरणे पाहूया. प्रख्यात 'अमृत बझार पत्रिके'चे संस्थापक मोतीलाल घोष १९१२ सालच्या 'ऑल इंडिया सॅनिटरी कॉन्फरन्स'मध्ये भाषण करताना म्हणतात की साठ वर्षांपूर्वी, त्यांच्या लहानपणी, म्हणजे राजनारायण बसूंच्या भाषेत 'ह्या' दिवसांत[], बंगालमधल्या जशोर जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा जवळपास पूर्णपणे आजारमुक्त प्रदेश होता. योग्य पथ्य पाळून बरे होणारे बारीक तापासारखे आजार वगळले तर इतर कुठलेही आजार नव्हते. विषमज्वर बराच दुर्मीळ आजार होता आणि कॉलराचं तर नावही लोकांनी ऐकलेलं नव्हतं. देवीचा आजार अधूनमधून डोकं वर काढत असे, पण स्थानिक देशी वैदू त्यांच्या पारंपरिक लसी वापरून हे रोगी विनासायास बरे करीत असत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची कुठलीही कमतरता नव्हती. भरपूर भोजन मिळत असे आणि मुख्यतः निरनिराळे खेळ खेळत आपला दिवस व्यतीत करणाऱ्या निरोगी, आनंदी आणि सशक्त लोकांनी गाव फुललेलं असे. मी आणखी नजीकच्या भूतकाळातलीही उदाहरणे देतो. १९८२ मध्ये कम्युनिस्ट नेत्या मणिकुंतला सेन, बारिसाल इथल्या आपल्या बालपणाच्या स्मृतींविषयी लिहितात, "त्या विचारांनीच माझ्या डोळ्यात अश्रू येतात. हे अल्ला, तू आम्हांला ही तंत्रज्ञानाची संस्कृती का दिलीस? आमचा डाळभात, दूध आणि मासे ह्यांवर आम्ही किती सुखी होतो. आता मी ऐकते की सगळ्या बारिसाल मध्ये हल्ली हिल्सा मासा मिळत नाही!" आणखी नजीकच्या काळात कल्याणी दत्त १९९३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'थोड़ बोड़ी खाड़ा'[] ह्या पुस्तकात लहानपणी माजघरात पाहिलेल्या खाण्यापिण्याच्या इतक्या गोष्टी सांगतात की राजनारायण बसूंच्या ’त्या’ काळातले लोक अलीकडच्या, ५०-६० वर्षांपूर्वीच्या उत्तर कलकत्त्यातदेखील सुखरूप होते की काय, असे वाटू लागते. दत्त सांगतात की भरपेट जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी म्हणून लोक ३०/४० आंबे खात असत.

आणखीही बरीच उदाहरणे देता येतील. खरं तर मी राजनारायण बसूंच्या शब्दांना नवीन साज लेऊन, जर ते कुण्या समकालीन लेखकाचे मत आहे असं तुम्हाला सांगितलं असतं तर तुमच्यापैकी कुणालाही शंका आली नसती, कारण आपण सगळेच आपल्यापेक्षा आपल्या पूर्वीच्या पिढ्या कशा सुदृढ आणि सशक्त होत्या, अशी चर्चा करत असतोच.

प्रश्न असा आहे: ह्या सर्वथैव अवास्तविक कल्पनेला आपण गेली शंभर-एक वर्षे का कवटाळून बसलो आहोत? का असं काहीतरी आहे की आपल्या आधुनिक होण्याच्या ऐतिहासिक प्रक्रियेबद्दल लोकसंख्याशास्त्राच्या सांख्यिकीय भाषेत न सांगता येणारं काहीतरी आपल्याला म्हणायचं आहे? आपण पुन्हा राजनारायण बसू 'ह्या' काळातल्या लोकांचं आरोग्य खालावण्याची नेमकी कोणती कारणे सांगतात ते जरा बघू या.

राजनारायण पहिलं कारण देतात ते पर्यावरणीय बदलाचं.

"पूर्वी लोक हवापालटासाठी कलकत्त्याहून त्रिवेणी, शांतीपुर आणि इतर गावी जात असत. हल्ली मलेरियासारख्या हवेच्या प्रदूषणामुळे ('दूषित हवा' म्हणजे मिआस्मा. त्या काळी मलेरियाची शास्त्रीय व्याख्या ह्याच भाषेत सांगितली जाई.) ह्या गावांचं आरोग्य धोक्यात आलंय. अनेकानेक कारणांमुळे असं दिसतं की भारतात मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय बदल होत आहेत आणि ह्या बदलांचा लोकांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम न झाला तरच नवल".

दुसरं कारण म्हणजे अन्न: सकस अन्नाची कमतरता, कृत्रिम आणि अनुचित अन्नाचं सेवन आणि मद्यपानाचा अतिरेक.

"पूर्वी लोकांचा आहार केवढाला असे, ह्याच्या कित्येक गोष्टी आम्ही लहानपणी पाहिल्या आणि ऐकलेल्या आहेत. हल्लीचे लोक इतका आहार घेऊ शकत नाहीत".

तिसरं कारण म्हणजे श्रम: अतिरिक्त श्रम, अवेळी श्रम आणि व्यायामाचा अभाव.

"ह्यात काहीही शंका नाही की इंग्रजी राज्य आल्यापासून श्रमिकांची गरज मोठ्या प्रमाणावर वाढली. आपण इंग्रजांप्रमाणे श्रम करू शकत नाही; तरीही इंग्रज आमच्याकडून तशी अपेक्षा करतात. इंग्रजी श्रमपद्धती ह्या देशानुरूप नाही. आपल्या मालकांनी आपल्यावर लादलेलं 'दहा ते चार' असं कामाचं वेळापत्रक ह्या देशाच्या परिस्थितीला धरून नाही."

चौथं कारण म्हणजे जीवनपद्धतीत झालेले बदल: पूर्वी लोकांच्या गरजा मर्यादित होत्या, त्यामुळे त्यांना आनंदी राहणं शक्य होतं. आज आपल्या काळज्या आणि चिंता ह्यांना काही मर्यादाच उरलेली नाही.
"युरोपीय संस्कृती आपल्या देशात शिरली आणि तिच्यासोबत आल्या युरोपीय इच्छा, युरोपीय गरजा आणि युरोपीय चैनी. मात्र ह्या इच्छा आणि गरजा ह्यांची पूर्तता करण्याचं युरोपीय माध्यम - कारखाने आणि व्यापार - ते मात्र अजूनही स्वीकारलं जात नाही".

इथे राजनारायण दोन वृद्धांची तुलना करतात: एक देशी (व्हर्न्याक्युलर) वृद्ध आणि एक इंग्रजाळलेला (अँग्लिसाईज्ड) वृद्ध.

"इंग्रजाळलेला म्हातारा अकालीच म्हातारा झाला. देशी म्हातारा अजून झुंजूमुंजू असतानाच जागा होतो. अंथरुणावर पडल्या पडल्याच तो भजन म्हणतो: त्यानं त्याचं चित्त किती प्रसन्न होतं! अंथरुणावरून उठून मग तो प्रातःस्नान करतो; किती आरोग्यदायी सवय! आंघोळ संपवून तो बागेत जाऊन फुलं वेचतो; त्या फुलांचा सुगंध शरीराला किती पोषक असतो! फुलं वेचून झाल्यावर तो पूजा करतो; ह्यानं त्याचं मन शांत होतं आणि त्याचं शरीर आणि आत्मा दोघांनाही बळ मिळतं. दुसऱ्या बाजूला तो इंग्रजाळलेला म्हातारा रात्री उशिरापर्यंत जेवण करतो आणि दारू पिऊन उशिरा झोपतो. त्यानं कधीही सूर्योदय पहिला नाही आणि सकाळची शुद्ध हवा आपल्या श्वासात भरून घेतली नाही. सकाळी बऱ्याच उशिरा उठूनही, तो मोठ्या कष्टाने त्याचे डोळे उघडतो. रात्रीच्या मद्याचा अंमल अजून उतरलेला नाही, शरीर गळपटून गेलेलं आणि ही तर पुढच्या अनेक विपदांची निव्वळ सुरुवात असते! अशा प्रकारे, इंग्रजी जेवण, इंग्रजी मद्य आणि इतर अनेक इंग्रजी चालीरीतींच्या आहारी गेलेलं ह्या अँग्लिसाईज्ड म्हाताऱ्याचं शरीर अनेकानेक रोगांचं माहेरघर बनतं".

राजनारायण स्वतःच मान्य करतात की ह्या दृष्टांतात निश्चितच अतिशयोक्ती आहे. तरीही 'त्या' दिवसांपासून 'ह्या' दिवसांपर्यंतच्या संक्रमणात आरोग्य खालावण्याची जी कारणं राजनारायण सांगतात, त्यात एक तक्रार सतत आढळते : आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेत आपण स्वीकारलेली सगळीच साधनं आपल्या अनुरूप नाहीत. इंग्रजांच्या आधुनिकतेचं अविचारी अनुकरण करून आपण पर्यावरणाचा नाश, अपुरं अन्न, अतिश्रमाने होणारे आजार आणि बेशिस्त आणि अनियमित आयुष्य अशी संकटं ओढवून घेत आहोत. इंग्रजी चालीरीतींच्या अविचारी अनुकरणाचे अनेक दृष्टांत राजनारायण देतात; पुरेशा सकस अन्नाच्या अभावाचे हे उदाहरण पहा -

"दोन बंगाली बाबू एकदा विल्सन हॉटेलात जेवायला गेले होते. त्यातल्या एकाला गोमांसाची फार चटक होती. त्यानं वेटरला विचारलं, "वील हैं?". वेटर उत्तरला, "नहीं है खुदावंत…." मग त्यानं विचारलं, "बीफ स्टेक?", त्यावर तो वेटर पुन्हा उत्तरला, "वो भी नही हैं, सर". पुन्हा त्या भद्रगृहस्थाने विचारलं, "फिर ऑक्स टंग?" ह्यावर तो वेटर म्हणाला, "नही, सर". त्यावर त्या बाबूनं पुन्हा विचारलं, "कम से कम, काफ फूट जेली?" त्यावर तो वेटर पुन्हा नम्रतेने नाही म्हणाला. शेवटी त्या गोमांसप्रेमी बाबूने विचारले की "क्या आप के यहां गाय का कुछ भी नही मिलता?" हे ऐकून गोमांसाची फारशी आवड नसणारा दुसरा बाबू किंचित वैतागून वेटरला म्हणाला, "अगर आप के पास गाय का कुछ भी नही हैं, तो इनके लिये थोडा गोबर क्यों नही लाते?"

ह्या गोष्टीचं मर्म जे राजनारायण ह्यांना अभिप्रेत आहे ते म्हणजे गोमांस हे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण करतं आणि ते ह्या देशाच्या वातावरणाला अनुकूल नाही. दुसऱ्या बाजूला, दूध - जे ह्या देशाच्या पर्यावरणाला पूरक आणि पौष्टिक अन्न आहे - त्याची कमतरता निर्माण झाली आहे: इंग्रज कारभारी, मुसलमान आणि काही गोमांसप्रेमी बंगाली बाबू ह्यांनी 'गाई खाऊन टाकल्या आणि म्हणून दूध महाग झालं'.

राजनारायण यांची अनेक उदाहरणं आणि विश्लेषण, आज आपल्याला हास्यास्पद वाटेल. पण त्यांच्या सिद्धांताचा जो मुख्य मुद्दा : आधुनिकता ही देश, काळ, पर्यावरण आणि सामाजिक चालीरीती ह्या घटकांच्या निरपेक्ष असू नये, ह्यात काहीच हास्यास्पद वाटण्यासारखं नाही. निरनिराळ्या देशांच्या विशिष्ट परिस्थिती आणि चालीरीती-अनुरूप आधुनिकतेची रूपं बदलतील. खरं म्हणजे, राजनारायण यांचा मुद्दा किंचित ताणून, आपण असं म्हणू शकतो की खरी आधुनिकता विशिष्ट स्थळकाळानुरूप आधुनिकतेचं विशिष्ट रूप साकारण्यातून व्यक्त होते; म्हणजे विवेकी साक्षेपानं आधुनिकतेची आपल्याला पूरक असणारी साधनं ओळखायला हवीत किंवा नवी निर्माण करायला हवीत. किंवा, थोडं निराळ्या शब्दात सांगायचं तर, आधुनिकतेची वैश्विक आणि सर्वमान्य अशी काही व्याख्या असलीच तर ती आहे: सार्वत्रिक आधुनिकता आपल्याला विवेक आणि तर्काची पद्धत शिकवून, आपण आपल्या विशिष्ट परिस्थितीला अनुरूप असं आधुनिकतेचं रूप साकारावं यासाठी आपल्याला सक्षम करते.

पाश्चिमात्य आधुनिकता तिच्या स्वतःच्या शब्दात

'नेमकं काय करावं?' ह्याचा निर्णय करताना विवेक आणि तर्क कसा वापरावा? पाश्चात्त्य जगाने स्वतः या प्रश्नाची चिकित्सा कशी केली आहे, ते पाहूया. १७८४ मध्ये इमॅन्युअल कांट[] ने ’औफक्लारूंग’वर, म्हणजे आपण इंग्रजीत ज्याला एन्लाईटनमेंट (मराठीत समानार्थी संज्ञा 'प्रबोधन') म्हणतो, एक निबंध लिहिला[]. कांटच्या मते एन्लाईटंड होणं म्हणजे प्रगल्भ होणं, प्रौढ होणं, इतरांच्या अधिकारांतर्गत जगण्यापासून स्वतंत्र होणं आणि स्वतःच्या कृत्यांची जबाबदारी पत्करणं. जेव्हा माणूस स्वतंत्र असत नाही, तेव्हा स्वतःची विवेकबुद्धी न वापरता, तो त्याला जसं सांगितलं जाईल तसं वागतो. त्याला स्वतः जगाचं ज्ञान करून घेण्याची गरज भासत नाही कारण त्याच्या धर्मग्रंथात सगळंच लिहिलेलं असतं. योग्य-अयोग्य असा तरतमभाव करण्याचा प्रयत्न न करता तो धार्मिक प्रथा आणि परंपरेनुसार वागतो. आपण काय खावं आणि काय खाऊ नये, हेही त्याने त्याच्या डॉक्टरवर सोडलेलं असतं. इतिहासातल्या सगळ्या काळांत, बहुसंख्य माणसं ह्या अर्थानं अपरिपक्व असतात, आणि जगाचं पालकत्व पत्करलेल्या माणसांना हेच हवं असतं. बहुसंख्य माणसांनी स्वतःची विवेकबुद्धी न वापरता त्यांच्यावर अवलंबून राहावं हेच त्यांच्या सोयीचं असतं. ही स्वतःच्या विवेकावर आधारित स्वावलंबनाची गरज ही ह्या आधुनिक युगातच पहिल्यांदा व्यापक प्रमाणावर ओळखली गेली. आपण स्वतःच स्वतःवर घातलेल्या बेड्या तोडण्याची प्राथमिक अट स्वातंत्र्य आहे - विशेषतः नागरी स्वातंत्र्य - ह्या मुद्द्यावर एकवाक्यता होणे, हेही ह्याच काळात पहिल्यांदा घडलं. ह्याचा अर्थ असा नाही की, ह्या काळातले सर्व लोक मुक्त झालेत किंवा आपण एका एन्लाईटंड काळात जगत आहोत, पण आपला काळ हा प्रबोधनाचा काळ आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल.

कांटच्या ह्या निबंधाचं अतिशय रोचक वाचन फ्रेंच तत्त्वज्ञ मिशेल फुको[] ह्यानं केलंय. कांटच्या प्रबोधनाच्या ह्या चर्चेत नेमकं अभिनव असं काय आहे? फुको म्हणतो, एखादा तत्त्वज्ञ स्वतःला स्वतःच्या काळाचं अपत्य म्हणून पाहत होता ही गोष्ट पहिल्यांदाच घडत होती. तत्त्वज्ञान पहिल्यांदाच स्वतःच्या काळाशी संवाद साधत होतं. फुकोचा निष्कर्ष असा आहे की कांटचा काळ विशेष अनुकूल असल्यानेच त्याचं तत्त्वज्ञान आकार घेऊ शकलं. थोड्या वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, असं पहिल्यांदाच घडत होतं की एक तत्त्वज्ञ आपल्या काळाच्या जाणिवेला तात्त्विक अध्ययनाचा विषय बनवत होता; पहिल्यांदाच कुणीतरी स्वतःच्या काळातले ज्ञानसाधनेसाठी पूरक असलेले सामाजिक घटक तपासत होता.

ह्या आजच्या काळाची अशी कोणती व्यवच्छेदक वैशिष्ट्ये कांट नोंदवतो? फुको दाखवून देतो की इथे नव्या विचाराचं निराळेपण ठळकपणे दिसून येतं. ह्या काळाच्या वैशिष्ट्यांविषयी लिहिताना कांट जुन्या काळाच्या शवावर उभं राहून नव्या काळाच्या आगमनाचा उद्घोष करणाऱ्या कुठल्या युगप्रवर्तक घटनेचा उल्लेख करत नाही; किंवा तो हा काळ उद्याच्या क्रांतिकारक पर्वाची सुरुवात आहे, असंही सांगत नाही. किंवा हा काळ अजून उदय न झालेल्या काळाकडे जातानाचं संक्रमणपर्व आहे असंही कांट म्हणत नाही. वर्तमानाला अशा पद्धतीने ऐतिहासिक विकासाच्या भाषेत (म्हणजे एका युगाकडून दुसऱ्याकडे जाण्याच्या भाषेत) पाहणे हे कांटपूर्वीच्या युरोपीय विचाराचं, अगदी ग्रीकांच्या काळापासून एक ठळक लक्षण राहिलं आहे आणि ही पद्धत कांटनंतरही वापरात आहेच. कांटने वर्तमानाची वैशिष्ट्ये जाणून घेताना लावलेले सगळे निकष नकारात्मक आहेत हे त्याच्या मांडणीचं वेगळेपण आहे. प्रबोधनाचा अर्थ एक सुटका (किंवा मुक्ती): शिक्षकाच्या अधिकारांतर्गत जगण्यापासून सुटका, अवलंबित्वापासून सुटका. कांट इथे प्रबोधनाचं मूळ काय किंवा त्याचा उद्गम आणि ऐतिहासिक विकास ह्याची चर्चा करत नाही किंवा प्रबोधनाचं इतिहासदत्त कार्य काय; हाही त्याच्या पुढचा प्रश्न नाही. त्याचा विषय केवळ हा काळ त्याच्या स्वतःच्या संदर्भात आणि त्याला पूर्वीच्या काळापेक्षा निराळे रूप देणाऱ्या त्याच्या व्यवच्छेदक लक्षणांच्या संदर्भात पाहणे हाच आहे. वर्तमानाच्या ह्या अनन्यसाधारण वैशिष्ट्यांच्या आधारे प्रबोधनाची किंवा अधिक नेमकं म्हणायचं झालं तर, आधुनिकतेची व्याख्या करण्याचा कांटचा प्रयत्न आहे.
ह्या विधानाला अधोरेखित करून क्षणभर बाजूला ठेवू: मी त्याच्याकडे परत येईनच. आता कांटच्या निबंधातल्या आणखी काही रोचक बाबींकडे वळूया. स्वायत्तता आणि स्वावलंबत्व ही आता सर्वमान्य प्रमाणे आहेत असं आपण मान्य करू. असंही मान्य करू की अभिव्यक्ती आणि विचाराचं स्वातंत्र्य ही स्वावलंबित्वाची पूर्वअट आहे. पण विचारांच्या स्वातंत्र्याचा अर्थ असा नव्हे की रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक कृतीसंदर्भात आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणी लोक त्यांच्या मर्जीने काहीही करण्यास स्वतंत्र आहेत. अशी इच्छा करणंसुद्धा सामाजिक नियमनाची गरज नाकारणं आणि अराजकतेला आमंत्रण देणारं ठरेल. अर्थातच, प्रबोधनाच्या तत्त्वज्ञांना हे म्हणायचं नव्हतं. त्यामुळे व्यक्तीच्या स्वायत्ततेची आणि विचारस्वातंत्र्याची मागणी करताना त्यांना ह्या स्वातंत्र्याच्या मर्यादा सांगून, जिथे समाजमान्य पद्धतीने सामाजिक नियमन करणं गरजेचं आहे असे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले भाग स्पष्ट करणं आवश्यक होतं. आपल्या 'प्रबोधन म्हणजे काय?' ह्या निबंधात कांटदेखील ह्या नियमनाच्या जागा दाखवून देतो.

सामाजिक नियमनाचा आवाका निश्चित करताना, कांट विवेकाच्या वापराची दोन क्षेत्रांत विभागणी करतो. एकाला तो नाव देतो सार्वजनिक : जिथे सार्वजनिक विषयांची चर्चा होते, परंतु जिथे व्यक्तिगत किंवा विशिष्ट गटाच्या हितांकरिता विवेकाचा वापर अभिप्रेत नाही. दुसरं क्षेत्र म्हणजे खाजगी: ज्यात व्यक्तिगत आणि विशिष्ट समूहाच्या उद्देशांचा विचार होतो. पहिल्या क्षेत्रात, विचारांचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अपरिहार्यपणे महत्त्वाचं आहे, पण दुसऱ्या क्षेत्रात मात्र ते अजिबातच आवश्यक नाही. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना, कांट सांगतो की सरकारच्या आर्थिक धोरणांची 'सार्वजनिक' चर्चा होताना त्या विषयातल्या तज्ज्ञ व्यक्तींना अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळायलाच हवं; पण एक खाजगी व्यक्ती या नात्यानं, सरकारची आर्थिक धोरणे मला पटत नाहीत म्हणून मला कर न भरण्याचं स्वातंत्र्य असायला हवं; असं मी म्हणू शकत नाही. सैन्याची संघटना किंवा युद्धविषयक धोरणाची सार्वजनिक चर्चा होत असताना, एक साधा सैनिकसुद्धा त्यात सहभागी होऊ शकतो पण रणांगणावर मात्र त्याचं कर्तव्य स्वतःची खाजगी मते बाजूला ठेवून दिलेल्या आज्ञा पाळणं, हेच असतं. धर्मविषयक सार्वजनिक चर्चेत, एका धर्मपंथाचा सदस्य म्हणून मी त्या पंथाच्या धारणा आणि कर्मकांडं ह्यांवर सार्वजनिक चर्चेत टीका करू शकतो, पण माझ्या वैयक्तिक मर्यादेत मात्र मी त्या धर्ममताचा प्रचारक ह्या नात्यानं धर्मपीठानं स्वीकृत केलेली तत्त्वं आणि आचरणाचे नियम ह्यांचं पालन आणि प्रसार करायला हवा. 'खाजगी' क्षेत्रात कुठलंही विचारस्वातंत्र्य असू शकत नाही.

नंतरच्या काळात झालेल्या चर्चांमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक ह्या संकल्पना ज्या अर्थानं कांटने वापरल्या तो अर्थ फारसा प्रचलित झाला नाही. उलट उदारमतवादी सामाजिक तत्त्वज्ञानात खाजगी क्षेत्रात विचार, मत आणि सदसद्विवेकबुद्धी स्वातंत्र्यावर कुठलेही निर्बंध असू नयेत आणि सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक व्यवहारांत मात्र काही समाजमान्य नियम आणि निर्बंध पाळले जायला हवेत, ह्यावर साधारणपणे एकमत आहे. पण कांटनं केलेलं सार्वजनिक आणि खाजगी असं विभाजन कितीही निराळं असलं तरी त्याचा मुद्दा समजणे, आपल्याला फारसं अवघड असू नये. कांटच्या मते जेव्हा माझ्या कृत्यांचा संबंध मुख्यतः सार्वजनिक विषयांशी निगडित असतो, जेव्हा मी एका सामाजिक संघाचा किंवा संरचनेचा घटक म्हणून कृती करत असतो; सामाजिक चक्राचा केवळ एक आरा असतो; तेव्हा समाजमान्य नियम आणि कायद्याच्या चौकटींचं पालन करणं माझं कर्तव्य असतं. पण विवेकाच्या उपयोजनासाठी, खाजगी किंवा विशिष्ट हेतूंनी प्रेरित नसलेला, मुक्त आणि सार्वत्रिक (युनिव्हर्सल) असाही एक जीवनाचा भाग असतो. विचारस्वातंत्र्यासाठी, कला आणि विज्ञानाच्या संवर्धनासाठी योग्य अशी ती जागा असते - म्हणजेच वेगळ्या शब्दात सांगायचं तर, प्रबोधनासाठीची योग्य जागा.
इथं हे स्पष्ट करायला हवं की ह्या सार्वत्रिक मुक्त विचारक्षेत्रात - ज्याला कांट सार्वजनिक म्हणतो - व्यक्ती स्वतंत्र कर्ता असते. विचारस्वातंत्र्य ही खऱ्या प्रबोधनाची पूर्वअट आहे. ज्ञानाच्या शोधात असणाऱ्या आणि स्वतःच्या मर्यादित सामाजिक वर्तुळाहून उंचावण्याचा प्रयत्न करत एका सार्वत्रिक चर्चाविश्वात सामील होऊ पाहणाऱ्या व्यक्तीचं विचार आणि मतस्वातंत्र्य अबाधित असणं आवश्यकच ठरतं. ह्या मतांच्या अभिव्यक्तीच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी जशी त्या व्यक्तीने स्वीकारायला हवी, त्याच प्रकारे तिला स्वतःची स्वतंत्र मते आणि श्रद्धा असण्याचा परिपूर्ण अधिकार असायला हवा. मात्र ह्यात कसलीही शंका नाही की इथे कांट त्याच लोकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या हक्काचं संरक्षण करतोय, जे ज्ञानसाधनेची आणि विवेकाच्या वापरासाठी आवश्यक असणारी पात्रता बाळगून आहेत आणि जे हे स्वातंत्र्य जबाबदारीने वापरतील. कांटच्या निबंधाची चर्चा करताना, फुको ह्या मुद्द्याचा विचार करत नाही. ह्या थीमचं फुकोच्या स्वतःच्या विचारातले महत्त्व लक्षात घेता, खरं तर त्याने ही चर्चा करायला बराच वाव होता. ती थीम आहे: आधुनिक काळातले विशेषज्ञ आणि त्यांच्या सर्वव्यापी अधिकारांचा उदय.

शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होत असताना आणि सर्वांना शिक्षण आणि ज्ञानक्षेत्रात अनिर्बंध प्रवेश असावा, ह्या विचाराला सार्वजनिक सहमती मिळत असतानाच, विशेषज्ञांच्या सार्वभौमत्वाचा उदय होताना दिसतो. एका बाजूला आपण म्हणतो की, शिक्षणाच्या अधिकारांपासून किंवा ज्ञानाच्या वापरापासून धर्माधारित किंवा इतर सामाजिक पूर्वग्रहांधारित कुणाही व्यक्ती किंवा सामाजिक गटाला वंचित ठेवणे अयोग्य आहे, आणि दुसरीकडे आपण ह्याही गोष्टीवर जोर देतो की अमुक एका व्यक्तीचं मत इतरांपेक्षा अधिक स्वीकारार्ह आहे, कारण ती व्यक्ती संबंधित क्षेत्रातली तज्ज्ञ आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर प्रबोधनाची व्याख्या करताना, आपण विवेकाचं अधिष्ठान अनिर्बंध आणि सर्व क्षेत्रांना लागू केलं आणि त्याचवेळी कुठल्या विषयावर बोलण्याचा कुणाला अधिकार आहे ते स्पष्ट करणारी अधिकारांच्या विभागणीची एक गुंतागुंतीची संरचनासुद्धा तयार केली. ह्या अधिकारांचे मापदंड म्हणून आपण परीक्षा, पदव्या, उपाध्या अशा अनेक सन्मानचिन्हांचं वितरण केलं. अगदी जन्मापासून, खरं तर जन्माच्याही पूर्वी पासून, ते अगदी मरेपर्यंत आणि मरणानंतरही, आपल्या दैनंदिन आयुष्यात मार्गदर्शक म्हणून ज्यांना आपण स्वीकारलेलं असतं असे किती निरनिराळ्या तऱ्हेचे तज्ज्ञ लोक आपल्या आसपास असतात; ते नुसते आठवून पहा. कित्येक क्षेत्रात, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वागणं बेकायदेशीर आहे. जर माझ्या जवळ, वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसेल तर, एखाद्या फार्मसीच्या दुकानात जाऊन मी असं म्हणू शकत नाही की, "मला आशा आहे की तुम्हाला ज्ञानाच्या सार्वत्रिक अधिकाराची जाणीव असेलच. मी बरीचशी वैद्यकीय पुस्तकं वाचली आहेत आणि मला वाटते की मला ह्या अमुक एका औषधाची गरज आहे". शिक्षणाचा अधिकार सार्वत्रिक असलेल्या देशांत सरकारमान्य शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवणे बंधनकारक असतं; मी माझ्या मुलांना घरीच शिकवेन असा आग्रह धरता येत नाही. कोण कुठल्या विषयात तज्ज्ञ आहे ते ठरवण्याची पद्धतही व्यवस्थित सुनिश्चित झालेली आहे. आजच्या व्याख्यानाचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर मी इतिहास, सामाजिक तत्त्वज्ञान आणि संबंधित विषयांवर बोलतोय आणि ह्या विषयात रुची असल्यामुळे म्हणा किंवा नुसत्या सौजन्याने म्हणा, तुम्ही मला ऐकायला आला आहात. जर मी असं म्हटलं असतं की मी रेडिओ लहरी परावर्तित करण्याऱ्या वातावरणातल्या थराबद्दल किंवा डीएनए परमाणू\बद्दल बोलणार आहे तर मला निश्चितपणे रिकाम्या खुर्च्यांशी बोलावं लागलं असतं आणि माझे काही हितचिंतक मानसोपचार तज्ज्ञाकडे धावले असते.

गेल्या काही वर्षांत ज्ञानविषयक व्यवहार आणि सत्तेची तंत्रे ह्यांच्यातल्या परस्परसंबंधांच्या आकलनाकरिता मिशेल फुकोच्या लिखाणाने एक नवा आणि मार्मिक दृष्टिकोन आपल्याला दिला आहे, हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता असू नये. 'प्रबोधन म्हणजे काय?' ह्या प्रश्नाचं २०० वर्षांपूर्वी कांटने दिलेलं उत्तर प्रथमदर्शनी, अत्यंत सामान्य आणि चिरपरिचित भासणाऱ्या आधुनिक सामाजिक तत्त्वज्ञानाचं प्राथमिक विधान वाटू शकेल. तरीही, आज आपल्याला त्यात पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या, सार्वत्रिक (युनिवर्सल) चर्चाविश्वात भाग घेण्याच्या प्रक्रियेतील असमानता, विशेषज्ञांचे वाढते अधिकार आणि ज्ञानाच्या साधनांचा सत्तेची साधने म्हणून होणारा वापर ह्या मुद्द्याचं विश्लेषण आढळतं. प्रबोधनकालीन पाश्चिमात्य तत्त्वज्ञांच्या लिखाणात आधुनिकतेबद्दल लिहिताना - ती विवेकाचं आणि सार्वत्रिक उत्थानाचं युग आणेल - असा जो दुर्दम्य आणि भाबडा उत्साह उतू जाताना आपल्याला दिसतो, ते लिखाण जागतिक इतिहासातल्या गेल्या दोनशे वर्षांतल्या बीभत्सतांचे साक्षीदार म्हणून किमान आपल्या दृष्टीने - महान विचारवंत इमॅन्युअल कांटची माफी मागून मी म्हणेन - अजिबातच प्रगल्भ दिसत नाही. आज आपले आधुनिकतेच्या दाव्यांबद्दलचे संशय खुलेपणाने समोर येताना दिसतात.

आपली राष्ट्रीय आधुनिकता

पण ज्या प्रश्नाने आपण ह्या चर्चेची सुरुवात केली होती त्याचं समाधानकारक उत्तर अजूनही मी दिलेलं नाही. शंभर वर्षांहून अधिक काळ आपल्या आधुनिकतेचे सर्वात महत्त्वाचे प्रणेते प्रगतीपेक्षाही सामाजिक अवनतीविषयी उच्चरवात का बरं बोलतात? आरोग्य, शिक्षण, सामाजिकता किंवा नीतिमूल्यांत झालेल्या घसरणीबाबत बोलताना राजनारायण बसूंना कुठलीही उत्तर-आधुनिक विसंगती अभिप्रेत नव्हती हे निश्चित. आपण आधुनिक होत जाण्याच्या प्रक्रियेतच असं काहीतरी असलं पाहिजे ज्यामुळे आजही, आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाही, तिच्या मूल्यांविषयी आणि परिणामांविषयी आपले संशय फिटत नाहीत.

माझा मुद्दा असा की - आपल्या आधुनिकतेचा इतिहास वसाहतवादाच्या इतिहासात घट्टपणे गुंफला गेला असल्याकारणानं, वंश किंवा राष्ट्रीयत्व ह्यांच्या निरपेक्ष, विवेकाच्या मुक्त चिंतनाचं क्षेत्र अस्तित्वात असतं; ह्यावर आपली नि:संशयी श्रद्धा बसू शकली नाही. कुठल्या का कारणानं असेना, सुरुवातीपासूनच आधुनिक ज्ञानपद्धती आणि आधुनिक सत्तेची रियासत ह्यांत काहीतरी साटंलोटं आहे; आपण नेहमीच ह्या सार्वत्रिक आधुनिकतेचे केवळ ग्राहकच राहू; तिचे निर्माते म्हणून आपल्याला कधीच गांभीर्याने घेतलं जाणार नाही; असा काहीसा विचक्षण अदमास आपल्याला आला होता. मुख्यतः ह्या कारणाने, शंभर वर्षांहूनही अधिक काळ ही सार्वत्रिक आधुनिकता आणि आपण किमान आपल्या संदर्भात तिचे निर्माते होऊ शकण्याच्या असंभाव्य कल्पनेकडे, आपण डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला.

आपल्या इतिहासातलं एक उदाहरण घेऊ. हिंदू कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी - ज्यातले अनेक जण हेन्री देराझिओ ह्या मुक्त बुद्धिवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचारवंताच्या प्रेरणेनं १८२० च्या दशकात सुरू झालेल्या ‘यंग बेंगाल’ ह्या मूलगाम्यांच्या (रॅडिकल) सुप्रसिद्ध वर्तुळाचेही सदस्य होते - १८३८ मध्ये कलकत्त्यात सुरू केलेली 'सोसायटी फॉर द ऍक्विझिशन ऑफ जनरल नॉलेज' ही संस्था, आधुनिक ज्ञानाच्या साधनेला वाहिलेल्या ज्या संस्था आपल्याकडे सुरू झाल्या, त्यातल्या सुरुवातीच्या संस्थांपैकी एक होती. १८४३ साली हिंदू कॉलेजातच होत असलेल्या ह्या संस्थेच्या एक बैठकीत, 'ईस्ट इंडिया कंपनीचे गुन्हेगारीविषयक सद्यकालीन कायदे आणि पोलिस' ह्या विषयावर एक पेपर वाचला जात असताना, हिंदू कॉलेजातले इंग्रजी साहित्याचे एक नावाजलेले शिक्षक डी. एल. रिचर्ड्सन, रागारागाने उठले आणि रिपोर्ट सांगतो त्याप्रमाणे, त्यांनी पुढील तक्रार केली:

"शहराच्या मध्यवर्ती भागात, सरकारने ज्ञानसाधनेसाठी निर्माण केलेल्या ह्या वास्तूत उभं राहून, ह्या देशाच्या राज्यकर्त्यांना शोषणकर्ते आणि डाकू संबोधणे, हे त्यांच्या मते देशद्रोही कृत्य होतं. जर सरकारला भारतीय नेटिव्हांचा बौद्धिक विकास व्हावा अशी तळमळ नसती तर हे कॉलेज मुळात अस्तित्वातच आलं नसतं. अशा जागेचं रूपांतर सरकारविरोधी अड्ड्यात व्हावं, यासाठी ते परवानगी देऊ शकत नाहीत आणि अशा बैठकींना ह्या जागेनं दरवाजे बंद करायला हवेत."

ह्यावर, हिंदू कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि त्या बैठकीचे अध्यक्ष असलेल्या ताराचंद चक्रवर्तींनी रिचर्ड्सन यांची खरडपट्टी काढली:

"माझ्या मते, तुमचं वर्तन ह्या सोसायटीला अपमानास्पद आहे. तुम्ही तुमचे शब्द मागे घेणार नसाल आणि माफी मागणार नसाल, तर आम्हाला हे प्रकरण हिंदू कॉलेजच्या कमिटी पुढे न्यावं लागेल आणि गरज पडली तर खुद्द सरकारदरबारीही आम्ही दाद मागू. ह्या सार्वजनिक जागेचा वापर करण्याची परवानगी कॉलेजच्या कमिटी कडून आम्हाला मिळाली आहे. त्यात तुमचे कसलेही वैयक्तिक उपकार नाहीत. ह्या प्रसंगी तुम्ही केवळ एक श्रोते म्हणून उपस्थित आहात आणि ह्या सोसायटीच्या सभासदाला त्याचं मत व्यक्त करण्यात व्यत्यय आणण्याचा तुम्हांला कुठलाही अधिकार नाही."

नवशिक्षित बंगाली वर्गात रुजू लागलेल्या राष्ट्रवादी जाणिवेचं सुरुवातीचं उदाहरण म्हणून हा प्रसंग रूढ इतिहासात साधारणपणे सांगितला जातो. ह्या निरीक्षणात काहीच तथ्य नाही असं नव्हे; पण ते नवशिक्षित भारतीयाने त्याच्या इंग्रज गुरूला धैर्याने तोंड देणे ह्या उघड नाट्यात नाही. ह्या घटनेचं नेमकं मर्म कशात आहे? ते 'सरकारचं क्षेत्र' आणि 'ह्या सोसायटीचं क्षेत्र' ह्यांना एकमेकांपासून निराळं पाहण्यात आहे; आणि, जोवर आवश्यक ते नियम आणि प्रक्रिया पाळल्या जात आहेत, तोवर ह्या सोसायटीच्या सभासदांना त्यांचं मत - मग ते सरकारवर टीका करणारं असलं तरीही - व्यक्त करण्याचा संपूर्ण हक्क आहे, ह्या मागणीत आहे. आपण असं म्हणू शकतो की आपल्या आधुनिकतेच्या ह्या संस्थापक क्षणांत, रंग किंवा आपल्या राष्ट्रीयत्वाचा राजकीय दर्जा ह्यांपलीकडे मुक्त चर्चेचं एक सार्वजनिक क्षेत्र असू शकतं; आणि जर आपण चर्चेशी संबंधित विषयांत आपल्या क्षमतेचे पुरेसे पुरावे सिद्ध करू शकलो तर आपलं मत व्यक्त करता येण्याचा अनिर्बंधित हक्क आपल्याला प्राप्त होऊ शकतो, ह्यावर मनापासून विश्वास ठेवायला आपण तयार होतो.

भ्रमनिरास व्हायला अर्थातच फार वेळ लागला नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आधुनिक ज्ञानसाधनेसाठी 'राष्ट्रीय' सोसायट्या स्थापन होऊ लागलेल्या दिसतात. पूर्वीच्या लर्नेड सोसायट्यांमध्ये भारतीय आणि युरोपीय असे दोन्ही लोक असत. ह्या नव्या सोसायट्या मात्र केवळ भारतीयांसाठी होत्या आणि त्यांचा मुख्य उद्देश भारतीयांमध्ये, शक्य झालंच तर भारतीय भाषांमधून, आधुनिक विज्ञान आणि कलांचा प्रसार आणि संवर्धन करणे हा होता. वेगळ्या शब्दांत म्हणायचं तर, आधुनिक विचारांचं राष्ट्रीयीकरण करण्यासाठी, सार्वत्रिक/युनिव्हर्सल चर्चाविश्वापासून भिन्न अशा अवकाशात जिथे हे चर्चाविश्व आधुनिक तरीही राष्ट्रीय असेल; ह्या संस्था कार्यरत होत्या.

आजही ह्या प्रकल्पाचा पाठपुरावा केला जातोय. अर्थात त्याचं यश निरनिराळ्या क्षेत्रात निरनिराळं आहे. पण हा प्रकल्प शक्यतेच्या कोटीत का गणला गेला आणि त्या शक्यता नेमक्या कोणत्या परिस्थितीने नियंत्रित होत होत्या, हे आपण जोवर स्पष्ट करत नाही; तोवर आपल्या आधुनिकतेच्या वैशिष्ट्यांविषयी जो प्रश्न मी ह्या व्याख्यानाच्या सुरुवातीला विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही. आधुनिक ज्ञानक्षेत्रातल्या कुठल्याही शाखेच्या उपयोजनेच्या/व्यवहारांच्या आपल्या अनुभवाचं उदाहरण घेऊ. मी हे व्याख्यान आपलं शरीर आणि आरोग्य ह्या विषयांच्या चर्चेनं सुरू केलंय, त्यामुळे त्या विषयाला धरून, आपला आधुनिक वैद्यकाशी नेमका कसा परिचय झाला त्याची गोष्ट पाहूया.

इंग्रजी भाषा न जाणणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या माध्यमिक वर्गांत बसावं न लागता त्यांना पाश्चात्त्य वैद्यक शिकता यावं यासाठी १८५१ साली, 'कलकत्ता मेडिकल कॉलेज'मध्ये बंगाली विभाग सुरू करण्यात आला. वैद्यकीची सनद किंवा डॉक्टरांचा मदतनीस बनण्यासाठीचे कोर्सेस फारच यशस्वी झाले. पहिल्या वर्षी २२ विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या विभागाने १८६४ मध्ये इंग्रजी विभागाला मागे टाकलं. १८७२ मध्ये तर इंग्रजी विभागात शिकत असलेल्या ४४५ विद्यार्थ्यांच्या तुलनेत बंगाली विभागात ७७२ विद्यार्थी शिकत होते. १८६७ ते १९०० ह्या काळात, मुख्यतः विद्यार्थ्यांकडून मागणी असल्याने, जवळपास ७०० वैद्यकीय पुस्तकं बंगालीत प्रकाशित झाली.

पण हे कोर्सेस लोकप्रिय असतानाच, १८७० च्या सुमारास, व्हर्न्याक्युलर विभागात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल तक्रारी ऐकू यायला सुरुवात झाली. ह्या विद्यार्थ्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे सार्वजनिक हॉस्पिटलांत युरोपीय डॉक्टरांचे मदतनीस म्हणून काम करण्यास ते अपात्र आहेत, असा प्रचार सुरू झाला. हा तो काळ होता जेव्हा बंगालमध्ये नुकतीच हॉस्पिटलांची व्यवस्था आकाराला येत होती आणि 'जनरल मेडिकल कौन्सिल ऑफ लंडन' ह्या संस्थेच्या देखरेखीखाली ह्या व्यवस्थेचं व्यावसायिक नियंत्रण केलं जात होतं. विसावं शतक उजाडण्याच्या सुमाराला हॉस्पिटलं, मेडिकल कौन्सिल्स, औषधांची पेटंट्सं ह्या माध्यमांतून भारतात आधुनिक वैद्यकाचं संस्थात्मीकरण होत असताना, मेडिकल कॉलेजमधला बंगाली विभाग अचानक अस्तंगत झाला. १९१६ सालापासून आपल्या देशातलं वैद्यकीय शिक्षण हे केवळ इंग्रजीतूनच दिलं जातं.

पण आपली गोष्ट इथेच संपत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे, नेमक्या ह्याच काळात राष्ट्रवादी प्रेरणेतून आयुर्वेद आणि युनानी ह्यांसारख्या देशी वैद्यकव्यवस्थांना एक नवा शास्त्रीय आकार देण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत होते. ही संघटना ज्या चळवळीचं प्रतिनिधित्व करत होती, तिचा प्रयत्न मुख्यतः वैद्यकाच्या जुन्या अभिजात आणि नवीन ग्रंथांची संशोधित प्रत सिद्ध करणे; पारंपरिक पद्धतीने वैद्याच्या घरात उमेदवारी करून वैद्यकी शिकण्याच्या जुन्या प्रथेऐवजी व्याख्यानं, क्रमिक पाठ्यपुस्तकं, अभ्यासक्रम, परीक्षा आणि पदवी अशी रचना असणाऱ्या कॉलेजांच्या माध्यमातून वैद्यकी शिकवण्याची औपचारिक पद्धत रूढ करणे; औषधांना प्रमाणित करणे आणि औषध उत्पादकांना ह्या औषधांचं व्यावसायिक उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे अशा अनेक माध्यमांतून आयुर्वेदिक चिकित्सापद्धतींच्या ज्ञानाची नवी संरचना उभी करण्याचा होता. आयुर्वेदिक शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवताना आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक पद्धतीचा कुठल्या स्वरूपात आणि किती मर्यादेत स्वीकार करावा, ह्यावर ह्या चळवळीत अनेक चर्चा झाल्या, पण अगदी शुद्धतेचा आग्रह धरणारे लोकही हे आज मान्य करतात की इतर वैद्यकीय पद्धतींची उपकरणं किंवा तंत्रं ह्यांचा समावेश आयुर्वेदिक शिक्षणात व्हायला हवा. कारण एका वैद्यकपद्धतीनं दुसऱ्या वैद्यकपद्धतीपासून शिकणं हे विज्ञानाच्या मूलभूत सिद्धांताशी नैतिकदृष्ट्या सुसंगतच आहे; अर्थात, शास्त्रीय सत्याची सार्वत्रिकताच कुणी नाकारणार नसेल तर.

इथे आयुर्वेदिक पद्धतीसाठी एका नवीन अवकाशाची निर्मिती करत असताना विज्ञानाच्या सार्वत्रिकतेचा आधार घेतला जाताना दिसतो; ह्या पद्धतीची व्याख्या एका 'शुद्ध' परंपरेच्या तत्त्वानुसार होते आणि तरीही एक आधुनिक वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्षेत्र म्हणून तिची पुनर्रचनादेखील शक्य होते. सांस्कृतिक फरकांनी ज्ञानाची क्षेत्रं अनेक कप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत, असा इथे दावा केला जात नाहीये; किंवा "भारतीय आजारांसाठी" आयुर्वेदिक पद्धत ही अधिक उपयुक्त पद्धत आहे, असंही सुचवलं जात नाहीये. एका समान ज्ञानक्षेत्रात एक पर्यायी वैज्ञानिक पद्धत असल्याचा हा दावा आहे.

अर्थातच साहित्य आणि कलेच्या संदर्भात आपण अशा प्रकारचे, पर्यायी आधुनिकता निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. खरं तर, राष्ट्रवादाचा मूळ सांस्कृतिक प्रकल्प हाच आहे असंही आपण म्हणू शकतो: एका सुस्पष्ट राष्ट्रीय आधुनिकतेची निर्मिती करणं. ह्या आधुनिकतेचे घटक कुठले आणि आधुनिकतेपासून भेद दर्शवणारी चिन्हं कोणती, हे निश्चित करण्याचे कुठलेही सार्वत्रिक नियम अर्थातच नाहीत. निरनिराळ्या क्षेत्रांत अनेकानेक प्रयोग झालेत, अजूनही होत आहेत. माझा मुद्दा हा होता की धर्म, साहित्य, संस्कृती अशा सांस्कृतिक मानल्या गेलेल्या क्षेत्रांपुरते हे प्रयत्न सीमित नाहीत. विज्ञानासारख्या युनिवर्सल तर्काधारित क्षेत्रातही हे वेगळी आधुनिकता शोधण्याचे प्रयत्न झालेत. आपल्याला लक्षात ठेवायला हवं की 'रॉयल सोसायटी'चे फेलो असणाऱ्या, प्रफुल्ल चंद्र रेंसारख्या प्रथितयश शास्त्रज्ञालासुद्धा हिंदू रसायनशास्त्राचा इतिहास लिहावासा वाटला; तर जगदीशचंद्र बोस (हेसुद्धा ह्या सोसायटीचे फेलो होते) यांचा असा विश्वास होता की त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी केलेलं संशोधन हे त्यांना भारतीय तत्त्वज्ञानामुळे प्राप्त झालेल्या अंतर्ज्ञानाने प्रेरित झालं होतं. विशेषतः त्यांना असं वाटत असे की त्यांना वैज्ञानिक संशोधनाचं असं क्षेत्र सापडलं आहे जे खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पूरक आहे. जगदीशबाबूंच्या ह्या संशोधनाला वैज्ञानिकांमध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण मला असं वाटतं की जगदीशचंद्रांना ह्या दिशेने विचार करायला उद्युक्त करणारी गोष्ट कोणती असावी, हे जर आपण समजू शकलो तर आपल्या आधुनिकतेला चालना देणारी प्रमुख शक्ती कुठली ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल.

जागतिकीकरणाच्या काळातला सद्यकालीन इतिहास

जेव्हा केव्हा मी प्रबोधनाचा विचार करतो, तेव्हा मला कमलकुमार मजुमदार ह्यांच्या 'अन्तर्जलि यात्रा' ह्या कादंबरीतल्या सुरुवातीच्या अविस्मरणीय अशा ओळींची आठवण येते:

"प्रकाश दिसू लागतो, हळूहळू. आकाश शीतल, गर्द जांभळं आहे; एखाद्या डाळिंबाच्या रंगासारखं. आता काही क्षणांतच, आरक्त लालिमा सर्वत्र पसरेल आणि आपल्याला, ह्या पृथ्वीवरच्या सामान्य मर्त्य मानवांना, पुन्हा एकदा फुलांच्या उबेचा आशीर्वाद प्राप्त होईल. हळूहळू, प्रकाश दिसू लागतो".

आधुनिकता हे पहिलं असं सामाजिक तत्त्वज्ञान आहे, ज्याच्या उच्चारानं बहुतेक सामान्य जनांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्याची स्वप्नं तरळू लागतात. आधुनिक समाजातली सत्तेची रचना आता राज्यप्रमुखाच्या शब्दांद्वारा नव्हे तर विवेकाच्या सूचनेनुसार, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वर्तणुकीवर घातलेल्या शिस्तीतून सत्ता राबवते; आणि तरीही विवेकाच्या वस्त्रांनी सत्तासंबंधांचा झगा कितीही कौशल्याने विणला असला तरीही, स्वायत्ततेच्या आकांक्षा अजूनही सत्तेविरुद्ध लढत आहेत; सत्तेला प्रतिकार केला जातोय. आपण हे ही विसरता कामा नये की एक काळ होता, जेव्हा भारताला वसाहतीच्या जोखडात ठेवलं जावं ह्याचं समर्थन करण्यासाठी वापरण्यात येणारा आधुनिकता हा सर्वाधिक प्रभावशाली असा युक्तिवाद होता: आपल्याला सांगितलं गेलं की परकीय सत्तेचा अंमल आवश्यक आहे कारण सर्वात प्रथम, भारतीयांनी आधुनिक व्हायला हवं, आणि हे आधुनिकतेचंच तर्कशास्त्र होतं, ज्यामुळे एक दिवस आपल्याला वसाहतवाद असमर्थनीय असल्याचा शोध लागला. विवेकाचं ओझं, स्वातंत्र्याची स्वप्नं, सत्तेची आकांक्षा, सत्तेचा प्रतिकार - हे सगळेच आधुनिकतेचे घटक आहेत. सत्तेच्या जाळ्यापासून स्वतंत्र अशी आधुनिकतेची कुठलीही आश्वासित भूमी नाही. पर्यायानं कुणीच आधुनिकतेच्या बाजूने किंवा विरोधात असत नाही; आपण फक्त तिच्याशी जुळवून घेण्याची तंत्रं विकसित करू शकतो. काही वेळा ही तंत्रं उपयुक्त ठरतात, बऱ्याचदा विध्वंसक; तर काही वेळा ती सहिष्णू असतात. मात्र बहुतेकदा ही तंत्रे उग्र आणि हिंसक असतात. मी पूर्वी म्हटलं तसं, आपल्याला जे काही आधुनिक आणि विवेकाचं अधिष्ठान असणारं आहे ते संपूर्णपणे योग्यच असणार, ह्या आपल्या सरळमार्गी श्रद्धेचा त्याग बऱ्याच पूर्वी करावा लागला आहे.

कमलकुमारांच्या कादंबरीच्या अखेरीस अवनतीला लागलेला हिंदू समाज जणू नियतीच्या अदृष्ट आणि अपरिवर्तनीय प्रेरणांनी आलेल्या महापुरात लोटला जातो. जे जे जिवंत, सुंदर, दयाळू आणि उदार होतं ते सगळं ह्यात नष्ट होतं. एक अस्पृश्य तिला वाचवू शकत नाही कारण जे पवित्र आणि शुद्ध आहे त्याला स्पर्श करण्याची त्याला परवानगी नव्हती.

"केवळ एक डोळा, जणू एखाद्या विषारी वनस्पतीचं प्रतिबिंब बनल्यागत, त्या आपल्या पहिल्या सुखाच्या चवीच्या प्रतीक्षेत असलेल्या नववधूकडे पाहत होता. डोळा लाकडाचा होता, कारण तो बोटीच्या एका बाजूला रंगवलेला होता; पण तो कुंकवाच्या रंगात रंगवला होता आणि बोटीवर आदळणाऱ्या लाटांचं पाणी त्याला लागत होत. लाकडाचा तो डोळा आपले अश्रू गाळत होता. कुठेतरी, म्हणूनच, अजूनही ओढीची एक जाणीव शिल्लक होती".

ही ओढ हीच आपल्या आधुनिकतेला चालना देणारी गोष्ट आहे. जर आपण ह्या ओढीला एक मागासलेली वृत्ती म्हणून किंवा एखाद्या प्रतिकाराची आयुधं म्हणून पाहू गेलो तर हे आपल्या स्वतःवरच अन्याय केल्यासारखं होईल. उलटपक्षी आपल्या भूतकाळाच्या ओढीमुळेच आपल्याला आपला वर्तमानकाळ बदलावासा वाटतो; ते आपलं कर्तव्य वाटतं.

आधुनिकता आपल्यासाठी एखाद्या सुपर मार्केटमध्ये मांडून ठेवलेल्या पाश्चात्त्य वस्तुंसारखी आहे: पैसे द्या आणि तुम्हाला हवी ती वस्तू घ्या. तिथे कुणालाही असं वाटत नाही की आपण ह्या आधुनिकतेचे निर्माते आहोत. आपल्या वर्तमानासंदर्भातलं कडवट सत्य आपण ताबेदार असणे आणि स्वतःचे निर्माते स्वतः बनण्यास अक्षम असणं आहे. पण तरीसुद्धा आपल्या आधुनिक होण्याच्या इच्छेतूनच, आपण आपली स्वतंत्रतेची आणि सृजनशीलतेची आकांक्षा आपल्या भूतकाळात कल्पू लागतो. पण ह्या भूतकाळाला एक काल्पनिक भूतकाळ म्हणण्याची काहीच गरज नाही कारण सगळेच भूतकाळ काल्पनिक असतात. अपूर्णता आणि कमतरता ह्या वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या ‘ह्या’ दिवसांचा विरोधाभास दाखवण्यासाठी आपण सौंदर्य, समृद्धी आणि निरोगी सामाजिक सहजीवन ह्या वैशिष्ट्यांनी नटलेल्या आणि मुख्य म्हणजे आपली स्वतःची निर्मिती असलेल्या ‘त्या’ दिवसांचं चित्र उभं करतो. 'ते दिवस' आपल्या दृष्टीने, खराखुरा ऐतिहासिक काळ नसतो; आपल्या आजच्या वर्तमानानं निर्माण केलेल्या फरकाला अधोरेखित करण्यासाठी आपण त्या दिवसांचं चित्र रेखाटतो. लक्षात घेण्याजोगी गोष्ट हीच की पाश्चात्त्य आधुनिकतेच्या संस्थापनेच्या क्षणी बोलताना, कांट वर्तमानाला भूतकाळापासून मुक्ती/सुटकेच्या स्वरूपात पाहतो; तर आपल्यासाठी वर्तमानच अशी जागा आहे जिथून सुटका मिळावी असं आपल्याला वाटतं. ह्यामुळे आधुनिकतेशी जुळवून घेण्याची आपली तऱ्हा, ऐतिहासिकदृष्ट्या उत्क्रांत असलेल्या पाश्चिमात्य आधुनिकतांपेक्षा मूलभूतरीत्या वेगळी होऊन जाते.

आपली आधुनिकता ही पूर्वी पारतंत्र्यात असलेल्या लोकांची आधुनिकता आहे. ज्या ऐतिहासिक प्रक्रियांनी आपल्याला आधुनिक मूल्यं शिकवली त्याच प्रक्रियांनी आपल्याला आधुनिकतेचे दास बनवलं. त्यामुळे आधुनिकतेविषयी आपला दृष्टिकोन संदिग्धच असणं साहजिक आहे. राजनारायण बसूंपासून ते थेट आजच्या लेखकांपर्यंत, गेल्या दीडशे वर्षांत आपण आपल्या आधुनिक होण्याच्या अनुभवाचं ज्या प्रकारे वर्णन केलंय, त्यात ही संदिग्धता स्पष्टपणे व्यक्त झालेली दिसते. पण ह्या संदिग्धतेच्या मुळाशी आधुनिक व्हावं किंवा होऊ नये, अशा प्रकारची कुठलीही अनिश्चितता नाही. किंबहुना आपल्याला माहीत आहे की आपल्या आधुनिकतेचे स्वरूप घडवण्यासाठी, काही वेळा आपल्याला इतरांनी प्रस्थापित केलेल्या आधुनिकतांना नाकारण्याचं धैर्य दाखवावं लागेल; जे ह्या संदिग्धतेचं खरं कारण आहे. राष्ट्रवादाच्या युगात, असे [आपल्या आधुनिकतेच्या निर्मितीचे] अनेक प्रयत्न झाले ज्यात धैर्य आणि कल्पकता दिसून येते. अर्थातच ते सगळेच सारख्याच प्रमाणात यशस्वी झाले नाहीत. आज जागतिकीकरणाच्या युगात, कदाचित ते धैर्य एकवटण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. कदाचित आता पुन्हा आपल्याला आपल्या आधुनिकतेतले ‘ते दिवस’ आणि ‘हे दिवस’ असा विचार करण्याची वेळ आली आहे.

---

१- पार्थ चटर्जी हे भारतीय इतिहासाचे आणि राष्ट्रवादाचे अत्यंत नावाजलेले विश्लेषक आहेत. भारतीय इतिहासलेखनात क्रांतिकारी ठरलेल्या 'सबाल्टर्न स्टडीज्'च्या संस्थापक सदस्यांमध्येही त्यांचा समावेश होतो. ते न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात मानववंशशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आणि कलकत्त्यात 'सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस' या संस्थेचे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. १९९७ ते २००७ ह्या दरम्यान ते ह्या संस्थेचे डायरेक्टर होते. या खेरीज ते बंगाली भाषेतले प्रख्यात कवी, नाटककार आणि नटदेखील आहेत. मीरा नायर ह्यांच्या 'द नेमसेक' ह्या चित्रपटात त्यांनी एका "रिफॉर्म्ड हिंदू"ची भूमिका केली आहे. त्यांची काही निवडक पुस्तकं: Nationalist Thought and the Colonial World (1986); The Nation and its Fragments: Colonial and Post-colonial Histories(1993); A Princely Impostor? The Strange and Universal History of the Kumar of Bhawal (2003); The Black Hole of Empire: History of a Global Practice of Power (2012). प्रस्तुत अनुवाद त्यांच्या मूळ बंगाली व्याख्यानाच्या इंग्रजी रूपांतरणाचा शक्यतो शब्दश: अनुवाद आहे. अनुवादाला आनंदाने परवानगी दिल्याबद्दल मी प्राध्यापक चटर्जींचा अतिशय आभारी आहे. हा अनुवाद मूळ बंगाली संहितेशी ताडून पाहण्यात मला माझी मैत्रीण तानिया भट्टाचार्य हिची खूप मदत झाली, तिचेही मी आभार मानतो. प्राची देशपांडेनी मूळ बंगाली संहिता वाचून मराठी अनुवादासंदर्भात काही अतिशय मौलिक सूचना केल्या. त्यांचेही आभार. (नोट: इंग्रजी लेख 'Our Modernity' गुगलवरून सहज उपलब्ध होऊ शकेल. पण त्यानं माझ्या अनुवादाच्या भीषण मर्यादा उघड होतील त्यामुळे कृपया तो वाचू नका.)

२ - हा फरक लक्षणीय आहे. राजनारायण बसू १८७० च्या दशकात 'पूर्वीचे दिवस' आणि 'हे दिवस' असा फरक करत आहेत आणि १८७० च्या दशकातला काळ त्यांच्या दृष्टीनं निकृष्ट होत जाण्याचा काळ आहे; तर मोतीलाल घोष १९१२ साली पूर्वीचा काळ, म्हणजे बसूंचे "हे" निकृष्ट होत जाण्याचे दिवस किती रम्य होते त्याचं वर्णन करताहेत. चटर्जींचा मुद्दा असा की काळाच्या ह्या व्याख्या स्थिर राहत नाहीत, बदलत जातात.

३ - या वाक्प्रचाराचा अर्थ रोज त्याच तीन गोष्टी खाणं - "तेच तेच"

४ - इमॅन्युअल कांट (१७२४-१८०४) हा एक अत्यंत प्रख्यात जर्मन तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याला आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक मानलं जातं. नीतिशास्त्र (एथिक्स), ज्ञानप्रमाणशास्त्र (एपिस्टेमॉलॉजी), सौंदर्यशास्त्र (ऍस्थेटिक्स), अधिभौतिकशास्त्र (मेटाफिजिक्स) इतकंच नाही तर भूगोल (जॉग्रफी), इतिहास (हिस्ट्री), राजकीय तत्त्वज्ञान (पॉलिटिकल फिलॉसॉफी) आणि ईश्वरशास्त्र (थिऑलॉजी) अशा अनेक ज्ञानशाखांवर कांटच्या विचारांचा खोल प्रभाव पडला.

५ - "Was ist Aufklärung" ह्या मूळ जर्मन लेखाचा इंग्रजी अनुवाद "What is Enlightenment" ह्या नावानं झाला. तो इथे सापडेल: http://www.columbia.edu/acis/ets/CCREAD/etscc/kant.html

६ - मिशेल फुको (१९२६-१९८४) हा विसाव्या शतकातला फार महत्त्वाचा विचारवंत - तत्त्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक, विचारांचा इतिहासकार आणि आधुनिक समाजातल्या सत्तेच्या स्वरूपाचा मार्मिक टीकाकार - होऊन गेला. फुकोमुळे आधुनिक चर्चाविश्वाची (डिस्कोर्स) संकल्पना आमूलाग्र बदलली. मनोरुग्ण, गुन्हेगार आणि समलैंगिक किंवा सामाजिक रूढींच्या परिघावर वावरणाऱ्या इतर व्यक्तींबाबत विश्लेषण करताना फुको यांनी आधुनिक ज्ञानव्यवस्था आणि सत्तासंबंधांचे लागेबांधे स्पष्टपणे उकलून दाखवले. कांटच्या निबंधाच त्यांनी केलेलं वाचन इथे मिळेल: http://foucault.info/documents/whatisenlightenment/foucault.whatisenligh...

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

बाप रे, अर्ध्या धाग्यात धाप लागली.

अनुवाद सहज-प्रवाही झाला आहे मात्र. धापबीप विषयामुळे. सावकाशीनं वाचते आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनुवाद अतिशय आवडला. एकदम माहितीसंपृक्त तर आहेच, शिवाय निष्कर्षही मस्ताड आहेत.

अतिअवांतरः मूळ बंगाली संहिता कुठे मिळेल? मिळाल्यास वाचायला आवडेल. आगाऊच धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख वाचून प्रतिक्रिया देण्यापेक्षा पुन्हा एकदा वाचावा असं ठरवलं. तोपर्यंत ही फक्त पोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

> नेमक्या ह्याच काळात राष्ट्रवादी प्रेरणेतून आयुर्वेद आणि युनानी ह्यांसारख्या
> देशी वैद्यकव्यवस्थांना एक नवा शास्त्रीय आकार देण्याचे पद्धतशीर प्रयत्न
> होत होते.

देशी परंपरेतील वैज्ञानिक (वा प्राग्-वैज्ञानिक) शाखांची पार्श्वभूमी ठेवून विचारस्वातंत्र्य, संशोधन करून आधुनिकता निर्माण करावी, हे धोरण पटण्यासारखे आहे. काही बाबतीत ते शक्यही असू शकेल. उदाहरणार्थ भाषाविज्ञान. कदाचित न्याय-नव्यन्याय परंपरा. आणि गणित. न्याय (तर्कशास्त्र) आणि गणित यांच्या बाबतीत मात्र स्वतंत्र संशोधनाचे धुमारे म्हणण्यापेक्षा सध्याच्या ज्ञान-स्थितीशी पूलबांधणी ठरेल, असे वाटते. पण तरी उपयोगी ठरेल. (उदाहरणार्थ नव्यन्यायाच्या तर्कशास्त्रात मुळातच quantifier logic चालू होते, आणि propositional logic हे दुय्यम - हे माझे विधान सैल आहे, ते असो.)

परंतु वैद्यक, भौतिकशास्त्र (पदार्थविज्ञान) यांच्याबाबतीत असे करणे अशक्यप्राय आहे. भारतीय पारंपरिक शास्त्रे याबाबतीत युरोपियन पारंपरिक शास्त्रांपेक्षा चौकटीत, मूलभूत वर्णनांत फारशी वेगळी नाहीत :
भौतिक+पदार्थविज्ञान - आकाशात असलेले पृथ्वी-आप-तेज-वायू यांचे अणू
वैद्यक - तीन (किंवा चार) दोषांचा समतोल साधणे; धमन्यांमधून पुढे जाऊन दर स्पंदनात मागे येणारे रक्त, वगैरे

याच ठिकाणून विचारस्वातंत्र्याचे धुमारे फुटावेत, चुकीची दुरुस्ती करत ती सुधारत, काही योग्य दुरुस्त्या करत आज ही विज्ञाने अन्य चौकटीवर आलेली आहेत. थिजलेल्या भारतीय परंपरेतून पुन्हा तेच मौलिक प्रयोग करून (म्हणजे कोळसा जाळून पृथ्वी आणि तेज तत्त्वांच्या अणूंच्या वस्तुमानाचे गुणोत्तर काढणे, अन्य काही ज्वलने करून वेगळे गुणोत्तर मिळवणे, "पृथ्वी"चे अणू हे हे तत्त्व बाद करून अन्य मूलद्रव्ये असल्याचे प्रतिपादन करणे) हे आता अशक्यप्राय आहे. कारण त्या चुका, सुधार आणि हळूहळू-झालेले-बदल वापरणारी नवी वैज्ञानिक चौकट ही अभियांत्रिकीत वापरली जात आहे. आपले रोजचे जिणे त्यावर अवलंबून आहे.

हीच बाब जीवशास्त्र आणि वैद्यकाबद्दल. उदानवायु आणि प्राणवायु हे दोन्ही "वायु"चे उपप्रकार आहेत, हे मानण्यात बोजडपणा आहे, तसे केल्यामुळे अनेक व्याधी (त्यांच्या कारणात वा निराकरणात काहीएक संबंध नाही) त्या एकत्र येतात. त्या चौकटीने अडचण होते. त्याच प्रमाणे विवक्षित पदार्थांनी काही लोकांच्या अंगावर पित्त येते, तर अन्य लोकांचा कफ वाढतो, त्या दुखण्यांचे निराकरण एकाच औषधाने होते. अशा वेळी ती वस्तू पित्तज वा कफज आहे, आणि त्यावर औषध पित्तशामक किंवा कफशामक हवे असे दोन दोष मानणे उपचाराकरिता बोजड आहे. कारणही एक, निराकरणही एक, तर व्याधी/प्रक्रिया एक मानणे अधिक सुटसुटीत. अशा वैद्यकीय अनुभवांचे संकलन करत करत त्रिदोष-पंचवायु वगैरे चौकट हळूहळू बदलत न्यायची म्हणजे खूप वेळ लागेल. तोवर बरेच रुग्ण वेदनेत राहातील, मृत्यू पावतील.
श्वासोच्छ्वास संस्था आणि स्नायू-मज्जा संस्था या शरिरातील अन्य संस्थांसारख्याच एकमेकांना जोडलेल्या आहेत, शरिराच्या एका "वायु" उपसंस्थेच्या उपसंस्था नाहीत अशी प्रगती करणे
अ‍ॅलर्जी

अर्थात लेखकाचे मत वेगळे नाही :
> सांस्कृतिक फरकांनी ज्ञानाची क्षेत्रं अनेक कप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत,
> असा इथे दावा केला जात नाहीये; किंवा "भारतीय आजारांसाठी" आयुर्वेदिक
> पद्धत ही अधिक उपयुक्त पद्धत आहे, असंही सुचवलं जात नाहीये. एका
> समान ज्ञानक्षेत्रात एक पर्यायी वैज्ञानिक पद्धत असल्याचा हा दावा आहे.

अशा विज्ञानांच्या बाबतीत, मला वाटते, की "ही आधुनिकता आपल्या विचारस्वातंत्र्यामुळे मिळालेली नाही, परदेशाकडून लादलेली आहे" अशी आत्मग्लानी होत असेल, तर आत्मग्लानीचे निवारण अन्य प्रकारे केले पाहिजे. वाटल्यास काही बाबतीत तरी "मानवांपैकी कोणीही घेतलेली वैचारिक झेप म्हणजे आम्हीच (मानवांनी) घेतलेली झेप आहे, ही प्रगत आधुनिकता त्यामुळे आमची/आपलीच आहे," असे पटणे अगदीच कठिण नसावे. परंपरेशी पूलबांधणी आणि (नफा होत असताना तरी) मानवतेशी "तत्रापि जातम् इदं च मम" नाते सांगणे, या दोन्ही विचारधारा समांतर अंगीकारता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी नेमके!

वैद्यकातले डीटेल्स सोडले तर थोड्याफार फरकाने असेच म्हणायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धनंजयशी सहमत.

थोडे गुंतागुंतीचे भाषण आहे, साधारणपणे अशा भाषणांमागे संस्कृतीचा आणि पारंपारिकतेचा छुपा अजेंडा असतो, इथे भाषणात आलेली नावे, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची केलेली पाठराखण पण त्याच वेळेस औषधे, देशी वृद्ध आणि गोमांस-भक्षणा संबंधी दिलेली उदाहरणे ही 'सनातन-टिपिकल' आहेत. ह्या उदाहरणांना आणि त्यामागच्या विचारांना 'सामाजिक चालीरीती'(व इतर) च्या नावाखाली चालवले जाणे म्हणजे विवेक न वापरणेच होय.

अवांतर - ह्या लेखावर 'काही' प्रतिक्रीया कशा आल्या नाहीत ह्या विचारत पडलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी साहेब, माफ करा, अजिबात सहमत नाही, आणि धनन्जय रावान्शी ही थोडा मतभेद आहे. पण सविस्तर नन्तर लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

तर जगदीशचंद्र बोस (हेसुद्धा ह्या सोसायटीचे फेलो होते) यांचा असा विश्वास होता की त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी केलेलं संशोधन हे त्यांना भारतीय तत्त्वज्ञानामुळे प्राप्त झालेल्या अंतर्ज्ञानाने प्रेरित झालं होतं. विशेषतः त्यांना असं वाटत असे की त्यांना वैज्ञानिक संशोधनाचं असं क्षेत्र सापडलं आहे जे खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पूरक आहे. जगदीशबाबूंच्या ह्या संशोधनाला वैज्ञानिकांमध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण मला असं वाटतं की जगदीशचंद्रांना ह्या दिशेने विचार करायला उद्युक्त करणारी गोष्ट कोणती असावी, हे जर आपण समजू शकलो तर आपल्या आधुनिकतेला चालना देणारी प्रमुख शक्ती कुठली ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल.

असे कसे शक्य आहे ? खास भारतीय शास्त्रज्ञांसाठी पुरक असे संशोधनाचे क्षेत्र कसे असु शकते ? म्हण़जे एखादी ज्ञानशाखा एक्सक्लुझीवली एखाद्या विशीष्ट भौगोलिक क्षेत्रासाठी राखीव विशेष कशी असु शकते ?
त्याहुन अनाकलनीय भाग म्हणजे भारतीय तत्वज्ञान जी सर्वस्वी वेगळा विषय आहे त्याने प्राप्त झालेल्या इनसाइट्स मुळे संशोधन प्रेरीत कसे होते?
कुणी उलगडा करेल का ?
की आपला जुनाच परीचयाचा सनातन प्रचार आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वाचला. विषय अवजड आहे, हे आहेच. पण एका लेखकाबद्दल बोलणार्‍या दुसर्‍या लेखकाच्या मजकुराचं तिसर्‍या लेखकानं केलेलं भाषांतर, आणि त्यात चौथ्या-पाचव्या-सहाव्या लेखकांचे संदर्भ असा ढाचा असल्यामुळेही थोडा वेळ लागला असावा.

आता धागा समजल्यासारखा वाटतो आहे म्हटल्यावर प्रतिक्रियाही वाचल्या. पण धनंजयशी असहमती असण्याचं कारण कळलं नाही. त्यावर लिहीन असं धनुष म्हणाला आहे. त्याला लिहिण्याची आठवण करावी, हेही हा धागा वर काढण्याचं प्रयोजन. तर - लिहिता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लिहायच राहून गेलय खर.भारतीय विमानाची चर्चा रंगलेली असताना तर हया विषयावर लिहायला अजून मजा येईल. लिहीतो लवकरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

विषय आणि भाषा दोन्ही अवजड वाटले (ऑलरेडी दोनदा वाचून झाला आहे).

कांट वर्तमानाला भूतकाळापासून मुक्ती/सुटकेच्या स्वरूपात पाहतो; तर आपल्यासाठी वर्तमानच अशी जागा आहे जिथून सुटका मिळावी असं आपल्याला वाटतं.

हे वाक्य मात्र फारच पटले आणि ज्या भारतीयांनी स्वत:च्या आधुनिकतेचा स्वतंत्र विचार केला आहे अशांनाही असेच वाटते (पण विरुद्ध दिशेने) असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0