Skip to main content

... आणि माझी काशी झाली! (भाग ३)

गेल्या भागातला शेवटचा परिच्छेद पुढीलप्रमाणे-

या सगळ्यात एक चांगली गोष्ट म्हणजे, तिथल्या मराठीभाषकांशी आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांचं थोडासा हिंदीसारखा हेल असणारं, हिंदी शब्दांची अधून-मधून पेरणी करणारं मराठी फारच रोचक वाटलं. त्यांच्या भाषेच्या व्याकरणातल्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा, हे पहिल्या दोन दिवसांत थोडं थोडं लक्षात येऊ लागलं. पण तसं करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने, आम्ही त्यातले ४-५ मुद्दे निवडले आणि त्यावर फार पद्धतशीरपणाचा आग्रह न धरता, मिळेल तेवढा, मिळेल तसा डेटा जमवायचा असं ठरवलं. यामागे काही तांत्रिक आणि काही व्यावहारिक कारणे होती. नेमके कोणते मुद्दे निवडले, भाषा नेमकी कशी होती, याचं मला खोलात वर्णन आत्ता करता येणार नाही. त्यामुळे क्षमस्व.

___________________________________________________________________________________

तिथली मराठी ऐकून डोक्यात सुरू झालेली विचारांची चक्रं, आजेसरांशी त्यावरून झालेल्या सैद्धांतिक चर्चा, त्यातून मिळणारा आनंद, त्याचा कैफ हे सारं शेवटच्या मराठी घराकडून गेस्ट हाऊसला पोहोचेपर्यंत उतरणीला लागलं. ते जोरजोरात वाजणारे भोंगे, सगळीकडे भरून राहिलेली घाण नजरेस पडणं, त्यातून चाललेली अडथळ्यांची शर्यत, वाहनांचा त्रास, आपण स्त्री असून ही जागा आपल्यासाठी सुरक्षित नाहीये याच्या सततच्या जाणीवेने मनात फेर धरून राहिलेली भीती. मधेच या सगळ्याने जीव कीटून गेला आणि गटातल्या इतर सर्वांच्या कूर्मगतीचा मला वैताग येऊन मी एकटीच तरतरा पुढे चालू लागले. पण पुढचं वळण येताच हे सुरक्षित नाहीये, काही झालं तरी आपण इथे आपल्या गटातल्या लोकांवर अवलंबून आहोत ही जाणीव झाली आणि मी पुन्हा वैतागून थांबले. तिथल्या या पुरुषावलंबित्वामुळे स्वतंत्रपणे, एकटीने सगळीकडे फिरण्याची आवड असणार्‍या मला सर्वांत जास्त चीड आली.

वाराणसीवरचा हा वैताग १-२ दिवस टिकला. पण कोणत्याही ठिकाणी जास्त काळ राहिल्यावर त्या ठिकाणाचे वरवर पटकन न दिसणारे पैलू हळूहळू समोर येतात. तसंच माझंही झालं.

आत्ताच म्हटल्याप्रमाणे मला सर्वाधिक त्रास होत होता तो पुरुषावलंबित्वाचा. गटातल्या इतरांच्या आणि माझ्या फिरण्याबद्दलच्या आवडीनिवडी फारशा सारख्या नव्हत्या. शिवाय आमच्यात बोलण्याजोगे विषय कमी होते. त्यामुळे मला कुठेतरी जायचं असल्यास त्यांना ओढून नेणं मला त्रासाचं वाटत होतं. त्यात पुन्हा ती सगळीच माणसं खूप छान, मदत करणारी आणि मनाने अगदी साधीसुधी आणि मला आवडलेली असली, तरी त्यांच्या सोबतीत मला एक बारीकसा त्रास होत होता.

पुण्या-मुंबईतले अ‍ॅकॅडेमिशियन तरुण मुलगे हे अ‍ॅकॅडेमिशियन तरुण स्त्रियांशी एकतर काहीशा स्त्रीदाक्षिण्यमिश्रित बरोबरीने वागतात किंवा 'बस मुली, मला काडीमात्रही समजत नसलेल्या आणि ज्या विषयात तू तज्ञ आहेस अशा विषयाबद्दल चार उद्बोधक गोष्टी तुला सांगून तुझा उद्धार करतो' अशाप्रकारे वागतात. अलीकडेच घडलेले दोन किस्से. माझा पहिला लेख पेपरात छापून आला म्हणून अभिमानाने मी आमच्या जवळ राहणार्‍या आणि मला अत्यंत आवडणार्‍या एका बाईंना तो दाखवायला गेले. त्यांचे चिरंजीवही त्याच वेळी घरी आले. चिरंजीवाचा माझ्या अभ्यासविषयाशी काडीमात्र संबंध नाही, पण त्याच्या उपस्थितीत मी उच्चारलेलं पहिलं विधान घेऊन, माझं पुढचं बोलणं तोडून तो थेट स्वगत बोलू लागला. मी त्याला थांबवून त्याचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला, तर त्याने मला बोलूच दिलं नाही असं ४-५दा झाल्यावर मी गप्प राहिले. त्याचं भलंमोठ्ठं स्वगत शेवटी संपलं आणि तो म्हणाला, 'तुझ्या एकूण बोलण्यातून तुझा नेमका विचार काय आहे तेच मला समजत नाहीये.' त्यावर मी शांतपणे म्हणाले, 'त्याचं कारण कदाचित असं असेल की मी अजून माझं बोलणं तुला सांगितलेलं नाहीये.' समोर बसलेल्या काकू खुदूखुदू हसायला लागल्या.

दुसरी मजा माझ्या एका भा.वै. मित्राची. त्याच्या वागण्यात हा प्रकार दिसत नसला, तरी त्याचं वागणं स्त्रीदाक्षिण्याने ओतप्रोत भरलेलं. दरवाजा उघडून आधी मला आत जाऊ देणं वगैरे वगैरे. शेवटी कंटाळून मी त्याला एक दिवस सांगितलं, की तू मला तुझ्याहून आणि तुझ्या मित्रांहून वेगळ्या प्रकारची व्यक्ती समजतोयस आणि हे सतत तुझ्या वर्तनातून जाणवून देतोयस. मला ते नको वाटतं. त्याने माझं ऐकलं खरं पण त्यातही स्त्रीदाक्षिण्याचाच भाग जास्त असावा असा मला दाट संशय आहे.

असो, तर मुद्दा हा, की एकीकडे पुण्या-मुंबईच्या मुलांची ही तर्‍हा आणि दुसरीकडे वाराणसीच्या आमच्या गटातल्यांची दुसरीच तर्‍हा. एक आजेसर सोडले, तर बाकीचे सगळे गावाकडचे, शेतकरी कुटुंबांतले होते. त्यांना मुलींशी बरोबरीने वागण्याचा तितका अनुभव नसावा. ते मला सतत बिचकून होते. मी कितीदाही विरोध केला तरी मला 'मॅडमच' म्हणत होते आणि मला एखाद्या अज्ञात आणि अनप्रेडिक्टेबल एंटिटीसारखे आदरयुक्त भीतीने वागवत होते. कितीही प्रयत्न केला, तरी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पाच होत नव्हत्या. त्यामुळेही बाहेर जाताना त्यांच्यावर अवलंबून रहाणं नको वाटत होतं.

मग वैतागून तिसर्‍या दिवशी मी एकटीच बाहेर पडले. म्हटलं, च्यायला, बघुया काय होतंय ते. काहीही झालं नाही. मी नेहमीच्या खानावळीत सुखरुप पोहोचले. तिथे नाश्ता करून माझ्या खोलीवर सुखरूप परतले. मला एकदम मोकळा श्वास घेता येऊ लागल्यासारखं वाटलं. नंतरच्या दिवसांत मी अधिकाधिक अंतरं एकटीने फिरून पाहणे, संध्याकाळी एकटीने फिरून पाहणे, अजिबात माहीत नसलेल्या जागी एकटीने जाऊन पाहणे असे प्रयोग केले. मला कुठेही काहीही त्रास झाला नाही. मीच नाही, तर बर्‍याचशा परदेशी स्त्रियाही एकट्या फिरत असलेल्या मी पाहिल्या. अर्थातच, इथले पुरुष सद्गुणांचे पुतळे-बितळे आहेत असा माझा गैरसमज क्षणभरही झाला नाही. नंतर स्थानिक बायकांशी बोलल्यावर माझ्या शंकेला पुष्टी मिळाली. तिथे मुलींची छेडछाड होण्याचं प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे ७-७.३०च्या आत मुलींना घरी परतावं लागतं असं त्यांनी सांगितलं.

थोडासा विचार केल्यावर नेमकं काय होत असावं याचा अंदाज मला आला.
_______________________________________________________________________________

वाराणसीच्या लोकांचं निरीक्षण केल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, किमान आम्ही राहत होतो त्यातरी भागातल्या साधारण ९०% किंवा कदाचित जास्तच लोकसंख्येचं पोट हे बाहेरून येणार्‍या पर्यंटकांवर अवलंबून होतं. कोणी रिक्षा वगैरे चालवून पैसे कमावत होतं, कोणी गेस्ट हाऊस उघडून किंवा आपल्या ४-५ मजली वाड्यातल्या खोल्यांत उतारूंची सोय करून पैसे मिळवत होतं, कोणी खाद्यपदार्थ विकून कमाई करत होतं, कोणी बनारसी साड्या विकून तर कोणी कर्मकांडं करून. असं असल्यामुळे पर्यटकांपैकी कोणाला त्रास देऊन आपल्या पायावर कुर्‍हाड मारून न घेण्याइतपत शहाणपणा त्यांच्यात होता. स्थानिक मुली मात्र तितक्या नशीबवान नाहीत. त्यांची छेडछाड केली तर तिथल्या समजाला एवढा मोठा फरक पडत नव्हता.

हा आपला माझा एक अंदाज.

ते काहीही असो. मला एकटीला फिरता येऊ लागल्यामुळे मला बरंच बरं वाटलं. दरम्यान एक दिवस मला साक्षात्कार झाला आणि तिथे नेमके कोणते पदार्थ खावेत ते कळलं. तिथे मोमोजचं प्रस्थ बर्‍यापैकी आहे. मोमोज वाफवलेले असल्याने तेलाचा त्रास नाही. त्यामुळे ते खायचे आणि जोडीला पराठे खायचे. आधी मी पराठे खाणं टाळत होते, कारण मेनूवर पनीर आणि आलू एवढेच पराठी दिसत होते. पण आम्ही १-२ खानावळींची नेहमीची गिर्‍हाईकं झाल्यावर मी त्यांना मेनूवर नसलेला प्याज पराठा बनवायला सांगू लागले आणि तेही मला तो मुळीच खळखळ न करता बनवून देऊ लागले. नंतर एका चांगल्या रेस्तराँचा शोध लागल्यावर चिकन बिर्याणी वगैरे मांसाहारी पदार्थही खायला मिळू लागले.

अशा प्रकारे पोटाची शांती झाल्यावर तर माझा बराचसा वैताग कमी झाला.

मग मी अधिक शांतपणे वाराणसीकडे निरखून पाहू लागले. काही दिवसांत आमच्या असं लक्षात आलं की इथे कायदासुव्यवस्था नावाचा प्रकार फारसा अस्तित्वात नाहीये. सरकारने पाण्याची लाईन घालून दिलीये, पण त्याला २-३ दिवसांनी कधीतरी पाणी येतं आणि येतं ते पाणी घाणेरडं असतं. त्यामुळे घर विकत घेताना किंवा भाड्यावर घेताना, तिथे बोअरवेल आहे का हा त्या भागातला मुख्य प्रश्न आहे. त्याचप्रमाणे, सरकारने वीजही घराघरात पोहोचवली आहे. पण ती कधीही जाते आणि कधीही येते. मोदी वाराणसीत आलेले ते दोन दिवस वीज एकदाही गेली नाही. पण ते वाराणसीतून बाहेर पडले, आणि त्यांच्यामागून वीजही गेली.

पोलिसांचं अस्तित्व फक्त व्ही.आय.पी. लोक येणार असतील तेव्हा त्यांची सुरक्षा पाहण्यासाठी आणि सामान्य जनतेला त्रास देण्यासाठी आहे असं दिसत होतं. मन मानेल तशी वाहतुक रोखायची, मन मानेल तेव्हा गेस्ट हाऊसेसची बुकिंग्ज रद्द करायची असा इथला कायदा.

दूधासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात मेच्या आसपास दूधाचे भाव ९० रु. लीटर होतात. पर्यटकांना लस्सी आणि रबडी विकणारी ही जनता घरात मिल्कपावडरने चहा बनवते. त्यांच्याकडचे भाज्यांचे दर साधारण आपल्या इथल्या दरांएवढेच. आणि सर्वसामान्यांचं जीवन मात्र अधिक खडतर. ६० ते १०० रु. मिळवण्यासाठी म्हातारे सायकल-रिक्षावाले तीन किलोमीटरचा चढ सायकल-रिक्षात ४-५ व्यक्ती बसवून पार करतात.

आजारी पडलं तर बोळांच्या आत रुग्णवाहिका येऊ शकत नाही. आग लागली तर अग्निशमन दलाचा उपयोग होऊ शकत नाही. खाजगी रुग्णालये खूप महाग आणि सरकारी रुग्णालयात भरती करून घ्यायला ओळख लागते.

जे तिथल्या सर्वसामान्यांनी आम्हाला सांगितलं तेच मी इथे सांगते आहे. मी स्वतः यातल्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतलेला नाही.

सहाजिकच, सरकारचा इथे फारसा उपयोग नसल्याने इथल्या जनतेने आपल्या परीने कोपिंग मेकॅनिजम्स विकसित केलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून की काय, प्रत्येकजण आपल्याला वाटेल तसा कारभार करतो. दुसर्‍याच्या सोयीचा विचार करत नाही. आणि दुसरा आपल्या सोयीचा विचार करेल अशी अपेक्षाही फारशी दिसत नाही. हीच मानसिकता त्यांच्या रहदारीतही दिसून येते. सायकलरिक्षाचालकांना उतारावर ब्रेक दाबण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि त्या समोरच्या गाडीवर धडकतात. यावर ऑटोरिक्षावाल्यांनी काढलेला उपाय म्हणजे आपल्या रिक्शाच्या भोवती, सायकलचं चाक ज्या उंचीवर धडकू शकतं, त्या उंचीवर एक लोखंडी पट्टी लावून घेणं. जेणेकरून धडकेने ऑटोचं नुकसान होणार नाही.

बाईकवाले तर सरळ बाईकचे आरसे आतल्या बाजूला पूर्णपणे वळवून, ते न वापरताच गाडी चालवता॑त. गाड्यांच्या टकरा होतात, पण त्यांतल्या एकाही गाडीचा चालक दुसर्‍याकडे रागाने बघत नाही. हे असंच होणार हे त्यांनी बहुधा स्वीकारलं असावं. हे सगळं जाणवल्यावर माझ्या लक्षात आलं, की वाराणसीत शांततेत जगायचं असेल, तर इथे एक विशिष्ट मानसिकता अंगी बाणवणं आवश्यक आहे. आपण आपल्याला हवं तेच करायचं. दुसर्‍यांच्या त्रासाचा वा सोयीचा विचार करायचा नाही आणि दुसरे आपल्या त्रासाचा वा सोयीचा विचार करतील अशी अपेक्षा ठेवायची नाही. हे लक्षात आल्यावर मी ते लगेच अंमलात आणलं आणि वाराणसीतले माझे उर्वरित दिवस बरेचसे सुखात गेले.
___________________________________________________________________________________________

मधली एक गंमत सांगायची राहिली. एके दिवशी सकाळी बाहेरून काकाकुवाचा आवाज आला म्हणून मी बाल्कनीत गेले. मला काकाकुवा तर दिसला, पण माझ्या फोनच्या कॅमेर्‍यावरून त्याचं चांगलं छायाचित्र काढता आलं नाही. पण आजूबाजूचं वातावरण फारच छान दिसत होतं.

थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की माकडांचा एक मोठा कळप गच्च्यांवरून उड्या मारत चालला आहे. त्यांची मजा पाहत काही वेळ तशीच उभी राहिले. थोड्या वेळाने सहज म्हणून नजर डावीकडे वळवली आणि लक्षात आलं की मी ज्या कठड्यापाशी उभी होते त्यापासून फूटभर अंतरावर एक माकड उन्ह खात बसलं होतं. मी आधी घाबरले. पण विचार केला की हे तर खूपच शांत दिसतंय. आपण अचानक काही हालचाल केली तर मात्र ते बिथरेल. म्हणून मी माझा पाय घासून त्याला ऐकू जाईल इतपत मोठा पण ते दचकणार नाही इतपत बारीक आवाज केला. त्याने अपेक्षेनुसार माझ्याकडे पाहिलं. मी त्रास देईन का याचा अंदाज घ्यायला काही क्षण ते माझ्या नजरेला नजर मिळवून रोखून पाहत राहिलं. मी जागेवरून तसूभरही हलले नाही आणि थोडीही हालचाल केली नाही. थोड्या वेळाने त्याने आपली मान दुसरीकडे हलवली. पण मी तशीच निश्चल उभी राहिले. त्याने काही सेकंदांनी परत माझ्याकडे वळून पाहिलं आणि मी तशीच उभी राहिलेली पाहून मी निरुपद्रवी असल्याची खात्री त्याला पटली. मग आम्ही दोघंही निश्चिंत झालो. मी हळूहळू कठड्याकडे सरकले. त्याने माझी दखल घेतली नाही. त्याचे भरपूर फोटो काढले तरीही त्याने माझी दखल घेतली नाही.

तिथे इतरही वेगळे प्राणी-पक्षी दिसले. करड्या रंगाचे कोणतेसे पक्षी होते. कवडे असावेत. साळुंक्या खूप. पण दिसायला वेगळ्या. आपल्याकडच्या साळुंक्या तपकिरी आणि पिवळ्या रंगाच्या असतात, तर तिथल्या साळुंक्या करड्या आणि पिवळ्या रंगाच्या होत्या. त्यामुळे त्यांना पाहून छोटे पेंग्विन्स आकाशातून उडून चाललेत असंच वाटत होतं. मधेच पोपट नजरेस पडत होते.

प्रत्येक घरात किमान एक उंदीर दिसत होता. बकर्‍या, शेळ्या होत्या. याखेरीज मला चक्क तीन बारकुडी मुंगुसंही दिसली. तीही एका घराबाहेर.

वाराणसीत ४ प्राणी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात- माकडं, कुत्री, गाई आणि माणसं. इथे रस्त्यांवरून फिरणार्‍या गाई आणि बैल हे कोणा विशिष्ट व्यक्तीच्या मालकीच्या नसतात. ते इथे आणून सोडलेले असतात. पण आपल्याकडच्या गाई-बैलांपेक्षा तिथले गाई-बैल बर्‍यापैकी उंच आणि धष्टपुष्ट. मला वाटतं, वाराणसीत सर्वांत सुखात कोणी राहत असेल, तर त्या म्हणजे गाई.

मी सुरुवातील प्रत्येक गाईला पाहून बिचकत होते. पण वाराणसीत ८ दिवस राहून मी फारच सराईत झालेय. गाईंच्या अंगाच्या अगदी जवळून पलीकडे जाणे, त्या जागा देत नसल्यास त्यांच्या तोंडासमोरून हात हलवून त्यांना दुसर्‍या दिशेला हाकण्याचा प्रयत्न करणे वगैरे गोष्टी आता मी करू शकते. म्हशी मात्र अजूनही डेंजर वाटतात.

शेवटच्या दोन दिवसांत मला एक नवीनच शोध लागला. रोज सकाळी आजूबाजूच्या गच्च्यांवर काही लोक विशिष्ट आवाज काढत काहीतरी जोरजोरात हलवत असलेले दिसायचे. मला वाटायचं की ते माकडांना हाकलतायत. नंतर कळलं की कबुतरांचे थवे एका विशिष्ट प्रकारे प्रशिक्षित करण्याचं काम ती माणसं करत असतात. तिथल्या श्रीमंतांना हा नवाबी शौक आहे. एकजण सांगत होता, की तो पहाटे चारला उठतो आणि सगळं आटपून काही तास हेच काम करतो. त्याच्याकडची सगळी कबूतरं पांढरी आहेत. पण दुसर्‍या कुणाचं पांढरं कबुतर जर चुकून त्याच्या गच्चीवर आलं, तर त्याला ते बरोब्बर कळतं. मग तो आपल्या कबूतरांना एक विशिष्ट शीळ घालतो. ती ऐकोन त्याची कबूतरं एका विशिष्ट दिशेला वळतात आणि ते वाट-चुकलेलं कबूतर वेगळ्या दिशेला वळतं. त्यावरून ते त्याचं कबूतर नसल्याची खात्री पटते. मग त्याला खाली आणण्याची म्हणे एक विशिष्ट पद्धत असते. अशी दुसर्‍यांची कबूतरं आपल्या गच्चीवर आली, तर ती सन्मानाने परत केली जातात, पण त्यात त्या चुकलेल्या कबूतराच्या मालकाची नाचक्की असते, कारण कबूतर वाट चुकलं म्हणजे त्याला प्रशिक्षण नीट दिलं गेलं नव्हतं असा त्याचा अर्थ होतो. याचा उपयोग काय असं विचाराला, तर वाराणसीत दिवसभर चालू असणार्‍या कर्मकांडांप्रमाणेच याचाही उपयोग शून्यच.

असो.
__________________________________________________________________________________________

आणखी एक मजा म्हणजे, पहिल्याच दिवसानंतर मला तिथले मुख्य रस्ते आणि आम्ही गेलेलो ते सर्व बोळ पाठ झाले. मी आधी पायाखालून घातलेले बोळ कुणालाही पत्ता विचारावा न लागता आरामात शोधू शकत होते. इतकंच नव्हे, तर कुठून शॉर्टकट निघू शकत असेल असे अंदाज बांधून पाहिले, तर ते थोड्या फार फरकाने बरोबर निघाले.

कुठून कुठे जायला सायकल-रिक्षा वापरता येईल (म्हणजे चढ लागणार नाही), कुठे जायला चालत जावं लागेल ते मला कळू लागलं. कोणत्या वेळी कोणत्या खानावळीत काय मिळेल, कोणत्या वेळी कोणत्या टपरीवरची लस्सी प्यावी हेही मला कळू लागलं.

वाराणसीत पोहोचून आठवडा झाला तरी मी अजून गंगा पाहिली नव्हती. शेवटी एकदा मी आणि आजेसर ब्रह्माघाट ते शिवाला घाट एवढं अंतर घाटावरून पायी चालत गेलो. त्या एकूण अनुभवाने मनात खूपच वेगवेगळे भाव आले. एकतर गंगेचा वाराणसीतला अख्खाच्या अख्खा किनारा त्या महान लोकांनी दगड घालून बांधून काढलाय. त्यात दक्षिण गोव्यात एक चौ. किमी. परिसरात आढळणार्‍या क्रूसांची संख्या कमी वाटावी एवढी शिवलिंगे त्या घाटावर होती. गंगा अपेक्षेप्रमाणे आणि काही ठिकाणी अपेक्षेबाहेर घाणेरडी होती. या पाण्यात डुबकी मारायचं धारिष्ट्य लोक नक्की का करतात?

काही होड्यांच्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या बँकांनी आपापले लोगो रंगवून आपली जाहिरात केली होती.

मधेच एका ठिकाणी जमिनीवर झोपलेल्या भीष्म पितामहांचा एक अजब पुतळा कुणीतरी बांधून ठेवला होता.

मधे मधे भिंतींवर सुंदर ग्राफिटी दिसत होती.

मधे एका ठिकाणी 'गोहत्या करनेवालों को फासी दी जाय' अशी घोषणा रंगवलेली.

थोडं पुढे गेल्यावर खचून पाण्यात एक तृतीयांश बुडालेलं आणि मागच्या बाजूला कललेलं एक देऊळ दिसलं.

मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र या घाटांवर रचून ठेवलेली लाकडं आणि जळणार्‍या चिता पाहिल्या.

एका ठिकाणी एका प्रचंड उंच भिंतीच्या डोक्यावर आपली मुळं सोडून उभा राहिलेला मोठ्ठाला पिंपळ दिसला.

एका भिंतीवर एका 'स्पिरिच्युअल कॅफे'ची जाहीरात केलेली दिसली.

जटाधारी भारतीय साधूंसोबत जटाधारी गोरेही दिसले.

एका ठिकाणी 'Salon De The Vishnu' अशी पाटी पाहून मी आणि आजेसर जोरात हसलो.

(या सर्व गोष्टींचे फोटो मागाहून टाकेन.)

मला आवडलेली एकमेव गोष्ट म्हणजे, घाटावर दोन ठिकाणी बनारस हिंदू विद्यापीठाच्या दृश्यकला विभागाच्या विद्यार्थ्यांनी घाटाची रंगवलेली चित्रे विकायला ठेवली होती.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मला सुचलं की त्यातलं एखादं चित्र माझ्या आवडत्या सरांना भेट द्यावं. म्हणून मी धावतपळत घाटाकडे गेले, तर ती चित्रं कुठेच दिसली नाहीत. पण गंगेच्या आरतीचं अजब दृश्य मात्र पहायला मिळालं. एका घाटावर कडेने ५-६ पुजारी उभे राहून कवायती केल्याप्रमाणे पूजा करत होते. त्यांच्यामागच्या घाटावरच्या पायर्‍या आरती पहायला आलेल्या लोकांनी खचाखच भरलेल्या होत्या. आणि त्यांच्या समोर पाण्यातून भरपूर होड्या आरतीकडे तोंड करून उभ्या केल्या होत्या आणि काही लोक त्या होड्यांत बसून आरती पाहत होते.

या घाटावर पाय ठेवण्यापूर्वी धार्मिकता इतकी अंगावर कधीच आली नव्हती.
____________________________________________________________________________

मी आस्तिक नाही, धार्मिक तर मुळीच नाही. त्यामुळे मी कधी वाराणसीला जाईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण फील्डवर्कच्या निमित्ताने गेले. सुरुवातीचे दोन-तीन दिवस त्या वातावरणाचा खूपच त्रास झाला, पण तिथल्या लोकांच्या समस्या कळल्यावर लोकांवरचा राग निघून गेला.

पण कर्मकांडांच्या इतक्या आहारी जाणार्‍या, स्वतंत्र विचाराला दूर सारणार्‍या, जातीव्यवस्था अजूनही कडकपणे पाळणार्‍या, बायकांना स्वयंपाकघराबाहेर गरजेपुरते बोलावणारे आणि त्या समोर आल्या तरी 'ही माझी पत्नी' अशी ओळख करून देण्याची किंवा तिच्या अस्तित्त्वाची साधी दखलही न घेणारे पुरुष आणि पलीकडच्या बोळातलाही पत्ता सांगू न शकणार्‍या स्त्रिया यांच्या तिथल्या पुरुषप्रधान संस्कृतीवर माझा राग निश्चितच आहे.
____________________________________________________________________________

असो, मुंबईत घरी पोचल्यावर मी घराची कडी वाजवली आणि दार उघडलं जाईपर्यंतच्या वेळात आम्ही जिन्यात जी कचराकुंडी ठेवतो, त्यात मी वाराणसीत वापरलेल्या, वाराणसीतल्या त्या घाणीतून फिरलेल्या चपला आधी टाकून दिल्या आणि मगच घरात शिरले.

समाप्त

ऋषिकेश Fri, 14/11/2014 - 16:04

छान.

भागांचा वेग दृष्ट लागण्यासारखा असला तरी लांबीकमी होत चाललीये.
त्यापेक्षा जरा वेळ घेऊन अधिक लांबीचे भाग वाचायला आवडतील!

माहितगारमराठी Fri, 14/11/2014 - 17:12

संदर्भासाठी प्रमाण साहित्यात अंतर्भाव करता येईल एवढ्या बारकाईने प्रवासवर्णनातील निरीक्षण नोंदवता आहात. हाही भाग आवडला उर्वरीत भागाची प्रती़क्षा

नंदन Fri, 14/11/2014 - 17:41

तिन्ही भाग आवडले.

सरकारचा इथे फारसा उपयोग नसल्याने इथल्या जनतेने आपल्या परीने कोपिंग मेकॅनिजम्स विकसित केलेली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून की काय, प्रत्येकजण आपल्याला वाटेल तसा कारभार करतो. दुसर्‍याच्या सोयीचा विचार करत नाही. आणि दुसरा आपल्या सोयीचा विचार करेल अशी अपेक्षाही फारशी दिसत नाही.

नेमकं निरीक्षण. लेख काशीच्याच संदर्भात असल्याने सरकार = देव आणि कोपिंग मेकॅनिजम्स = बोकाळलेल्या रूढी, असं सब्स्टिट्यूशन फिट बसेल का?; असा एक प्रश्न मनात डोकावून गेला.

अवांतर -
एखाद्या एनाराय सदस्याने काशीबद्दलची हीच निरीक्षणं कुठल्याही मराठी संकेतस्थळावर मांडली असती, तर ठरावीक आयडींच्या काय ठरावीक प्रतिक्रिया आल्या असत्या; हा चुकार कल्पनाविलासही त्याच वेळी मनात डोकावून गेला :)

बॅटमॅन Fri, 14/11/2014 - 17:53

In reply to by नंदन

एखाद्या एनाराय सदस्याने काशीबद्दलची हीच निरीक्षणं कुठल्याही मराठी संकेतस्थळावर मांडली असती, तर ठरावीक आयडींच्या काय ठरावीक प्रतिक्रिया आल्या असत्या; हा चुकार कल्पनाविलासही त्याच वेळी मनात डोकावून गेला

अगदी अगदी. पण याला दुसराही एक पैलू आहे. जनरलायझेशन जास्त होते तिथेच शिव्याही जास्त बसतात. वाराणसीत गेलोय तर वाराणसीला शिव्या घातल्यावर पब्लिक फार काही बोलणार नाही (नेहमीचे यशस्वी कलाकार वगळता), पण तेवढ्या आधारे अख्ख्या देशाला जजमेंटल चष्म्यातून पाहिल्यावर लोक खवळणारच. चूक दोन्हीकडून होते कैकदा. अनेक एनारायही बाहेरच्या देशात जाण्याआधी भारत फिरलेले नसतात त्यामुळे तेही आपल्या देशाबद्दल तसे अनभिज्ञच असतात. पुणे-मुंबै-फारतफार कोकण ही महाराष्ट्राची आणि रूरल नॉर्थ इंड्या ही महाराष्ट्राबाहेरील भारताची कल्पना असलेले कैक एनाराय बघितलेले आहेत. त्यांचा चष्मा अरुंद असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांचं विवेचन आणि त्याचा प्रतिकार दोन्हीही तितक्याच आवेशाने होतात. इलाज नाही. :)

अरविंद कोल्हटकर Fri, 14/11/2014 - 20:05

अतिशय चित्तवेधक वृत्तान्त.

वर वर्णिल्यासारखीच गंगा मी वाराणसीमध्ये आणि हरिद्वार-हृषीकेशमध्ये पाहिली आहे. तिच्याकडे पाहून मनात येते की जगन्नाथ पंडिताने गंगालहरी काव्यात वर्णिलेली गंगा कोठे गेली?

अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा
विलोलद्वानीरं तव जननि तीरं श्रितवताम्।
सुधातः स्वादीयः सलिलभरमातृप्ति पिबतां
जनानामानन्दः परिहसति निर्वाणपदवीम् ॥६॥

आपले मोठे राज्य तृणवत् टाकून डोलणार्‍या लव्हाळ्यांनी व्याप्त अशा तुझ्या काठाचा आश्रय घेणार्‍या आणि अमृताहून स्वादिष्ट असे तुझे जल तृप्त होईपर्यंत पिणार्‍या जनांचा आनंद मोक्षपदवीकडे उपेक्षेने पहातो.

विशालाभ्यामाभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं
न याभ्यामालीढा परमरमणीया तव तनु:।
अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयो-
र्ययोर्नान्तर्यातस्तव लहरिलीलाकलकल:॥

तुझी परमरमणीय तनु ज्यांनी पाहिली नाही अशा विशाल नेत्रांचा उपयोग काय? ज्याच्या कानांवर तुझ्या लहरींची खळखळ पडली नाही अशा माणसाच्या कानांचे ते एक दूषण आहे.

ह्याच गंगेकडे पाहून भर्तृहरि वैराग्यशतकामध्ये आर्त शब्दांनी विचारतो -

कदा वाराणस्याममरतटिनीरोधसि वसन्
वसान: कौपीनं शिरसि निदधानोऽञ्जलिपुटम्।
अये गौरीनाथ त्रिपुरहर शम्भो त्रिनयन
प्रसीदेत्याक्रोशन्निमिषमिवनेष्यामि दिवसान्॥

असे दिवस मला केव्हा दिसतील जेव्हा मी ह्या सुरनदीच्या तीरावर कौपीन धारण करून आणि मस्तकाञ्जलि होऊन 'हे त्रिपुरहर त्रिनयन गौरीनाथ शम्भो, मजवर प्रसन्न हो' असा आक्रोश करीत दिवसच्या दिवस क्षणवत् व्यतीत करीन?

हारुन शेख Fri, 14/11/2014 - 21:05

तीनही भाग वाचले. खूप छान उतरलाय अनुभव.

अवांतर - आचार्य धर्मानंद कोसंबिंच्या आत्मचरित्रात ते काशीत संस्कृत शिकत असतांनाचे काशीचे विस्तृत वर्णन त्यांनी केलेय. 'आत्मनिवेदन' की कायसे नाव आहे पुस्तकाचे. छान आहे. मिळाल्यास जरूर वाचा.

बॅटमॅन Fri, 14/11/2014 - 21:15

In reply to by हारुन शेख

माहितीकरिता धन्यवाद!!!!

काशीचे मस्त वर्णन सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतू नामक आत्मचरित्रातही येते. फार सुंदर वर्णन आहे, तिथेच आहोत असे वाटायला लावण्याइतपत प्रत्ययकारी. काशीबद्दल त्यांना खरी आत्मीयता आहे हे ते वाचताना कळून येते.

हारुन शेख Sat, 15/11/2014 - 16:46

In reply to by बॅटमॅन

ते आत्मचरीत्र इथे वाचू शकाल. 'जीवनसेतू' आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे काय असलयास दुवा देऊ शकाल का. आगाऊ धन्यवाद.

बॅटमॅन Mon, 17/11/2014 - 17:57

In reply to by हारुन शेख

धन्यवाद!

जीवनसेतू आनलैन कुठे आहे माहिती नाही. पाहिले जरा पण कुठे दिसले नाही. पुण्यात वा अन्यत्र चौकशी करावी लागेल. जुने पुस्तक आहे, आता औटॉफप्रिंटच असेल बहुधा. पण मिळाले तर सोडू नये. मला तरी अतिशय आवडले.

अनुप ढेरे Fri, 14/11/2014 - 21:54

याचा उपयोग काय असं विचाराला, तर वाराणसीत दिवसभर चालू असणार्‍या कर्मकांडांप्रमाणेच याचाही उपयोग शून्यच.

कबूतरांच्या त्या खेळाबद्दल असा प्रश्न पडणं हे विचित्र वाटलं. तसं म्हटल तर गाणं ऐकण, खेळ खेळणं, याचाही काही उपयोग नाही.

मिहिर Fri, 14/11/2014 - 22:29

भाषाविज्ञानाच्या क्षेत्राभ्यासाची ओळख, प्रदेशाचे वर्णन, मनात आलेले विचार सहजपणे मांडणारी लेखमाला आवडली. आभार.

मिसळपाव Sat, 15/11/2014 - 03:17

काय सुंदर प्रवासवर्णन आहे हे. 'समाप्त' वाचल्यावर खट्टू करणारं लिखाण! तुमच्या पुढच्या कामाला शुभेच्छा.....आणि पुढच्या तुमच्या एखाद्या शहर-भेटीचा असा सुरेख वॄतांत आम्हाला वाचायला मिळावा अशा आम्हाला शुभेच्छा :-)

अंतराआनंद Sat, 15/11/2014 - 08:47

तिन्ही भाग सुंदर.

बर्‍याच दिवसांनी ऐसीवर आल्याबरोबर ही इतकी सुंदर लेखमालिका वाचायला मिळाली. खुप छान वाटलं. थोडक्य़ात आणि चित्रदर्शी लिखाण. छान शैली आहे तुमची. वाराणसीत शांततेत जगण्यासाठी जी अलिप्ततेची मानसिकता लागते तीच भारतातल्या अनेक छोट्या शहरात लागते. लोकं तुमचा विचार करत नाहीत तुम्ही त्यांचा करावा ही अपेक्षा धरत नाहीत.

भाषाविज्ञानाबद्द्ल जास्त वाचायला आवडेल.

'न'वी बाजू Sun, 16/11/2014 - 01:11

In reply to by ॲमी

फोटो बघण्यास उत्सुक!

वर लेखात माकडाच्या फोटोसेशनचा ज़िक्र झालेला आहे, ती चित्रमाला पाहण्यास उत्सुक आहे.

शिवाय,

मधे एका ठिकाणी 'गोहत्या करनेवालों को फासी दी जाय' अशी घोषणा रंगवलेली.

याचाही फोटो पाहावयास आवडेल. (या घोषणेच्या बरोब्बर खाली कोणी 'लाँगहॉर्न ष्टेकहौस' किंवा गेला बाजार 'बर्गर किंग'ची जाहिरात रंगविल्यास बहार येईल, नाही?)

(अवांतर: मागे दीडएक वर्षापूर्वी एकदा प्यारिस भटकायला गेलो होतो, तेव्हा तेथेही सीनच्या काठी भिंतीवर की पुलाखाली कुठेशीक लांबवरूनसुद्धा दिसेल अशी साधारणतः 'No marriage for homos!' अशा काहीशा मसुद्याची फ्रेंच भाषेतील घोषणा कोणीतरी रंगवून ठेवलेली पाहिल्याचे अजूनही आठवते. तेव्हा मला वाटते फ्रान्समध्ये समलिंगी विवाहांस कायदेशीर मान्यता असावी की नसावी, यावर सार्वमत घेतले जात होते. थोडक्यात काय, इतरांनी एखादी गोष्ट करण्याविरोधात अतिरेकी मते बाळगण्याची आणि ती अशी जगजाहीर करण्याची वृत्ती जागतिक असावी. शिवाय, जगाला यात काय घेणेदेणे, हा मुद्दाही विचारात न घेण्याची पद्धत अतिसामान्य आणि मानवी. असो चालायचेच.)

धनंजय Mon, 17/11/2014 - 17:37

वर्णन आवडले. सध्याची उच्चशिक्षणसंस्थांतील रीतभात, आणि तिचा वाराणसीमधील सामान्य रीतभातींशी होणारा स्पर्श, हे सगळे वाचायला रंजक होते.

पुढे कधी वेळ झाल्यावर मारवाडी क्रियापदांबाबत छोटासा परिच्छेद लिहून द्याल, अशी आशा आहे.

(अनेक आख्यातांमध्ये = tense/moodमध्ये मारवाडीमध्ये क्रियापद लिंग आणि वचनानुसार चालते, हे अन्य संस्कृत-प्राकृतोद्भव भाषांसारखेच. मूळ संस्कृत-प्राकृतांत ही कृदंते होती, म्ह्णजे नामे-विशेषणे होती, आणि नामां-विशेषणांसारखे त्यांना लिंगविकरण असणे व्युत्पत्तीसह चिकटून आले. मूळ संस्कृत-प्राकृत "तिङन्ते" - यांना वचन असते, पण लिंग नसते - अशी एखाद-दोनच आख्याते आधुनिक भाषांमध्ये आलेली आहेत. मराठीतील रीतिभूतकाळ "मी शिके, आम्ही शिकू, तू शिकस, तुम्ही शिका, तो/ती/ते शिके, ते/त्या/ती शिकत" आणि आज्ञार्थ "मी शिकू, आम्ही शिकू, तू शिक, तुम्ही शिका, तो/ती/ते शिको, ते/त्या/ती शिकोत" हे इतकेच बिगर-लिंग-विपरणामाने दिसतात. मारवाडीमध्ये "म्हे शिकू" हे सामान्यवर्तमानकाळ अर्थाचे रूप दिसते आहे, आज्ञार्थाचे नव्हे. हे हिंदीतील जुनाट वर्तमानकाळातील रूप "मैं सीखूँ" सारखे आहे. हे रूप सुद्धा लिंगविपरिणामित होत नसावे, असे माझे मत आहे.)

विवेक पटाईत Mon, 17/11/2014 - 19:55

लेख आवडला, बाकी त्यात मी वाराणसीत वापरलेल्या, वाराणसीतल्या त्या घाणीतून फिरलेल्या चपला आधी टाकून दिल्या आणि मगच घरात शिरले. इतनी नफरत अच्छी नहीं ताई. बेचार्या चपलांचा काय कसूर. इतके दिवस तुम्हास्नी घाणी पासून वाचविले आणि तुम्ही... स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता आल्या असत्या.

माहितगारमराठी Mon, 17/11/2014 - 22:05

In reply to by विवेक पटाईत

बाकी त्यात मी वाराणसीत वापरलेल्या, वाराणसीतल्या त्या घाणीतून फिरलेल्या चपला आधी टाकून दिल्या आणि मगच घरात शिरले. इतनी नफरत अच्छी नहीं ताई. बेचार्या चपलांचा काय कसूर. इतके दिवस तुम्हास्नी घाणी पासून वाचविले आणि तुम्ही... स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता आल्या असत्या.

माझा एक मित्र मुंबईला जाऊन आला की प्रत्येक मुंबई चक्करनंतर एक पायताणांचा जोड डिस्कार्ड करतो, त्या पैकी एक कारण उपरोक्तच असते. जेव्हा त्याची पायताणे कारनेच प्रवास करून येतात तेव्हाही तो तसेच का करतो, असे विचारले असता फक्त स्माईल देऊन मौन राहतो. त्या त्याच्या मौनाच गूढ मला अजून उलगडलं नाहीए.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/11/2014 - 01:29

सुंदर.

फोटो या भागात नाहीत याचा खरंतर आनंदच झाला. आणि शेवटचं वाक्य अतिशय प्रभावी आहे.