आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ७
पंचविसाव्या मूव्हपर्यंत
दोघांचाही खेळ नुकत्याच झालेल्या गिरी - राड्जाबोव्ह यांच्या ताष्कंद मधल्या याच वर्षी खेळलेल्या गेमप्रमाणे झाला. कॉमेंटेटर वरती म्हणतात.
The game GM Giri - GM Radjabov from the recent Tashkent FIDE GP 2014 continued 14...Bxg5 15. Bxg5 Rg6 16. h4 f6 17. exf6 gxf6 18. Bf4 Nxh4 19. f3 Rd8 20. Kf2 Rxd1 21. Nxd1 Nf5 22. Rh1 Bxa2 23. Rxh5 Be6 24. g4 Nd6 25. Rh7 f5 26. g5 Nf7 27. Rh5 Rg8 28. Kg3 Rh8 29. Rxh8+ Nxh8 30. Bxc7
हा खेळ ड्रॉ झाला होता.
इथपर्यंत आनंद एका प्याद्याने पुढे आहे. पण ते थोडंसं आभासी आहे. त्याचं सी७ वरचं प्यादं तकलादू आहेच, शिवाय एफ६ वरचं प्यादंही एकटं पडलेलं आहे. आता यापुढे त्याला ती आघाडी धरून ठेवणं कठीण जाईल असं वाटतं. त्याच्या वजिराच्या बाजूला जी चार प्यादी पडून आहेत त्यांचा गाडा हलता करून पुढे नेता आला तर कार्लसेनसाठी ते धोक्याचं ठरू शकेल. पण सध्या तरी सगळे मोहरे राजाच्या बाजूला लागलेले आहेत. हे प्यादं वाचवता येईल का? निदान त्याबदल्यात कार्लसेनचं एक प्यादं मिळवता येईल का?
उंटाची कुरबानी
तिसाव्या मूव्हविषयी लिहित असतानाच आनंदने दोन प्याद्यांच्या बदल्यात उंट कुरबान करून प्रचंड धक्का दिलेला आहे.
मला वाटतं दोन आघाड्यांवर लढत कार्लसेनची दोन प्यादी पुढे येणं थांबवता येणार नाही असं लक्षात आलं असावं. ती डोकेदुखी नष्ट करून टाकून डाव एका बाजूला खेळण्यासाठी आनंदने ती धोकादायक प्यादी घालवून टाकली. सर्व इंजिनं या मूव्हला वाईट मूव्ह म्हणत आहेत. आता आनंद दोन प्याद्यांनी पुढे आहे, तर कार्लसेन एका घोड्याने. आनंदची प्यादी घट्ट चिकटलेली आहेत. राजा आणि हत्तीच्या जोरावर त्याला ती पुढे नेता येतात का हे पहायचं.
उंट दिल्यापासून
उंट दिल्यापासून सर्वच इंजिनं तोच स्कोअर कायम दाखवत आहेत. यावरून इंजिनांची मर्यादा दिसून येते असं वाटतं. गेल्या अठरा मूव्ह्ज डाव तिथेच स्थिरावला आहे, पुढच्या अठरा मूव्ह्जमध्येही काही बदल होणार नाही. मग नक्की काय झालं तर स्कोअर बदलेल? आनंदच्या बालेकिल्ल्याला भेद देणं कार्लसेनला अनेक प्रयत्नांतूनही शक्य होत नाहीये. डाव अडकलेला आहे. हे अडकलेपण इंजिनांना ओळखता येत नाही बहुतेक.
कार्लसेनला सी४ खेळून आनंदच्या प्याद्यांसमोर तटबंदी उभारायची आहे, तर आनंदला सी७ प्यादं दुबळं होऊ न देता ए प्यादं पुढे ढकलायचं आहे. जोपर्यंत या खेळी करायला पोषक काही मिळत नाही तोपर्यंत बचावात्मक खेळ चालू आहे. त्यामुळे त्याच त्याच खेळी होत आहेत. कोणीतरी धोका पत्करून काहीतरी वेगळं केल्याशिवाय किंवा कोणीतरी चूक केल्याशिवाय हा डाव ड्रॉकडेच चाललेला आहे.
एकदाचं एक प्यादं हललं
हा डाव साचून राहात होता. कार्लसेनचा प्रयत्न आनंद काही चूक करतो आहे का हे बघण्याचा होता. अर्थातच आनंदने आपले मोहरे पूर्णपणे बचावात्मक पद्धतीने वापरल्यामुळे कार्लसेनला काहीच करता येत नव्हतं. हत्ती बरोबरीत घेणं कार्लसेनला परवडणार नाही, कारण चार प्याद्यांची पुढे येणारी फळी एकटा घोडा रोखून धरू शकत नाही. पण त्याचबरोबर लागोपाठ वीसेक चाली एकही प्यादं न हलवता किंवा एकही मोहरा काबीज न करता झाल्या होत्या. अशा पन्नास चाली झाल्या तर डाव ड्रॉ होतो. कार्लसेनला ते करायचं नाही असं दिसतं आहे. म्हणून त्याने सी४ वर प्यादं पुढे नेलं. आता नव्या ठिकाणी डाव खोळंबून राहतो की अजून पुढे जातो हे पाहायचं.
साठाव्या चालीनंतर
साठाव्या चालीनंतर नवीन घड्याळ सुरू झालं. यात पुढच्या डावासाठी १५ मिनिटं आणि प्रत्येक चालीसाठी १५ सेकंद मिळतात. सध्या कार्लसेनकडे दीड तास आहे, तर आनंदकडे सदतीस मिनिटं.
आता आनंदच्या प्याद्यांचा गाडा एक घर पुढे सरकला आहे. जसा अजून पुढे सरकेल तशी राजाची मागची बाजू कमकुवत होईल. पुढच्या काही खेळी प्रचंड महत्त्वाच्या आहेत.
वरचं लिहून पूर्ण झालं नव्हतं
वरचं लिहून पूर्ण झालं नव्हतं त्यात डाव पुढे सरकला. आनंदकडे अजूनही कार्लसेनच्या घोड्यासाठी दोन प्यादी आहेत. आणि ती कार्लसेनसाठी धोकादायक ठरू शकतात. मात्र आता आनंदकडे वेळ कमी शिल्लक आहे. प्रत्येक चाल केल्यावर घड्याळात ३० सेकंद वाढतात. पण कार्लसेनकडे पाचपट वेळ आहे. त्यामुळे पुढच्या अनेक खेळी आनंदला अचूक आणि त्याही ३० सेकंदांच्या आत कराव्या लागतील. सहा तास उलटून गेल्यावर दमल्यामुळे त्याच्या हातून चूक होऊन इतक्या सुंदर डावाला गालबोट लागू नये असं मनापासून वाटतं.
या डावातल्या इंजिनांचा ग्राफ
या डावातल्या इंजिनांचा ग्राफ बघितला की त्यांच्या मर्यादा आणि एकमेकांमधले फरक दिसून येतात. हुदिनी मटेरियल अॅडव्हांटेजला प्रचंड महत्त्व देत असावा. याउलट कोमोडो आणि स्टॉकफिश इतर व्हेरिएबल्सचा विचार अधिक करत असावेत. उंटाच्या बदली दोन प्यादी दिल्यावर साटकन सगळे वर गेले. मात्र कोमोडो आणि स्टॉकफिशचा ग्राफ हळूहळू नंतर खाली आला. याउलट हुदिनी शेवटच्या मूव्हपर्यंत पांढऱ्याला प्रचंड जास्त पॉइंट देत होता.
बर्लिन डिफेन्स
गेल्या डावातल्या सिसिलियन डिफेन्सऐवजी आनंदने बर्लिन डिफेन्सने सुरूवात केली.
इथे पहिल्या नऊ मूव्ह्जपर्यंत आत्तापर्यंतच्या इतिहासात काय झालं याची माहिती दिसते. ९. .... केइ८ या खेळीपर्यंत पोचलेल्या ५९ डावांत पांढरा जिंकण्याचं प्रमाण २३.७% आहे, ड्रॉ होण्याची प्रमाण ७१.२% आहे, तर काळा जिंकण्याचं प्रमाण ६.१% आहे.
तिथे हेही दिसून येतं की या ९ मूव्ह्जपर्यंतचा खेळ हा सर्वाधिक वेळा खेळलेल्या गेलेल्या खेळांपैकीच आहे.