Skip to main content

आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ११

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 17:38

कार्लेसेनची गेल्या काही डावांतली ठरलेली ओपनिंग झाली. रुय लोपेझ, वजिरावजिरी करून काळ्याचं कॅसलिंग मोडायचं, आणि इ प्यादं पाचव्या घरात नेऊन ठेवायचं. दोघांच्याही दहा मूव्ह्ज आपापल्या पहिल्या दोन मिनिटांत झालेल्या आहेत. तेव्हा कोणीच टाइम प्रेशरखाली बराच काळ येणार नाही.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 17:51

आनंदचा प्रयत्न राजा बी७ घरात नेऊन प्याद्यांच्या मागे सुखरूप ठेवायचा आणि हत्ती बाहेर काढायचा असा आहे. त्यासाठी ९.... बिशप डी७, ११... किंग सी८, १२... सी५ आणि १३... बी६ अशा पद्धतशीर खेळी केलेल्या आहेत. यावर हल्ला करण्यासाठी कार्लसेनने हत्ती डी फाइलमध्ये आणून उंटावर नेम धरला आहे. सी५ या खेळीनंतर डी४ हे घर बळकट करणं, आणि एकंदरीतच डी फाइलवर काबू मिळवणं असे उद्देशही त्यात आहेत. अर्थातच आनंदला उंट सी६ मध्ये आणून मग राजा बी७ मध्ये न्यावा लागेल.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 18:02

कार्लसेनने १४ रूक एफ इ१ खेळून इ प्याद्याला अजून एक जोर निर्माण केलेला आहे. त्यावर सध्या काळ्याचा काहीच हल्ला नाही तेव्हा बहुधा ही एफ३ वरचा घोडा हलवण्याची तयारी असावी. त्या प्याद्याच्या वाटेत असलेलं आनंदचं एफ७ प्यादं दुर्बळ आहे. त्यावर घोड्याने हल्ला करण्यासाठी असलेली एकमेव सोपी जागा - जी५ - ही आनंदने एच६ वर प्यादं नेऊन बंद केलेली आहे. तेव्हा कार्लसेन उजवीकडचा घोडा फिरवून डावीकडे आणेल असं वाटतं. कदाचित पटाच्या डावीकडे झालेल्या काळ्या चार प्याद्यांच्या तटबंदीला खिंडार पाडायचं आणि त्याचबरोबर डी५ प्याद्याला जोर देत राहायचं असा सध्याचा टॅक्टिकल प्लान दिसतो.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 18:30

कार्लसेनच्या १६ सी४ या मूव्हनंतर डाव दोन भागांत विभागला गेलेला आहे. पांढऱ्या सोंगट्यांची जी तटबंदी झालेली आहे त्यापलिकडे पांढऱ्या सोंगट्याही जाऊ शकत नाहीत. त्याआधीच्या आनंदच्या जी५ या मूव्हमुळे ही तटबंदी जास्तच बळकट झालेली आहे. आता तटाच्या आत दोघेही आपापले मोहरे योग्य जागी आणून ठेवतील. आणि एक साताठ मूव्हनंतर ही तटबंदी फोडण्याचा प्रयत्न होईल.

तीनही इंजिनांच्या ग्राफकडे बघितलं तर खेळ किंचित काळ्याच्या बाजूकड झुकत असलेला दिसतो आहे. पुढे काय होतं पाहूच

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 18:41

सोळाव्या मूव्हनंतरच्या पुढच्या मोर्चेबंदीमध्ये आनंदचा ए फाइलमधला हत्ती डी फाइलवर येऊन घोड्यावर जोर देणं, कार्लसेनचा दुसरा हत्ती डी फाइलमध्ये येणं, आनंदचा काळा उंट जी७ वर सरकून हत्तीला मोकळीक करून देणं, आणि एचमधला हत्ती जी८ मध्ये आणून राजासमोरच्या प्याद्यावर नेम धरणं अशा गोष्टी होतील असं वाटतं. मग जी आणि एच मधली काळी प्यादी पुढे सरकवून तिथून राजावर हल्ला करता येतो.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 20:01

तेविसाव्या मूव्हनंतर डाव अजूनही काहीसा कोंडलेला आहे. पण लवकरच स्फोट होऊन मारामाऱ्या सुरू होणार असं दिसतं आहे. कार्लसेनचे दोन घोडे पुढे पोचलेले आहेत, त्यांना हुसकावून लावणं शक्य नाही, तेव्हा घोडा आणि उंट देऊन ते नाहीसे करणं होणार. त्याचबरोबर पटाच्या डाव्या बाजूला प्याद्यांची मारामारी होऊन तिथला मार्ग मोकळा होणार. तसंच पांढऱ्याची जी४ खेळी बराच काळ होणार होणार या परिस्थितीत आहे. मार्गातला घोडा बाजूला काढल्यामुळे ती आता कधीही करता येईल. मग तिथल्या प्याद्यांच्या ताब्यासाठी मारामारी होईल.

बहुधा दहाएक खेळींनंतर प्रत्येकी चार प्यादी, एक उंट किंवा घोडा आणि एक हत्ती शिल्लक राहिलेले दिसतील.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 20:10

पंचविसाव्या खेळीनंतर आनंदने डी५ वरती बसलेल्या पांढऱ्या घोड्यावर स्क्रू आवळायला सुरूवात केली आहे. कार्लसेनचे तीन आणि आनंदचे तीन जोर त्यावर आहेत. आनंद त्यावर अजून जोर आणू शकतो, आणि त्याचबरोबर कार्लसेनचा एक घोड्याचा जोर उंट देऊन नष्ट करू शकतो. तो घोडा हलवणं भाग आहे, त्यामुळे त्याच्या मागचं प्यादं पांढऱ्याला घालवावं लागणारसं दिसतं. त्याचबरोबर, आनंदने राजा हलवून बी फाइल आपल्या हत्तींसाठी मोकळी केलेली आहे.

पुन्हा एकदा ग्राफ्सकडे बघताना पाचव्या ते दहाव्या मूव्हला कार्लसेनचं जड असलेलं पारडं हळूहळू आनंदच्या बाजूला झुकताना दिसतं आहे.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 20:45

आनंदने हत्ती देऊन उंट घेतला! त्यातून अजून एखादं प्यादं मिळेल कदाचित. आणि त्याच्या प्याद्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. आतापर्यंतचा डाव जणू काही कमी रोचक होता जणू काही!

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 21:00

बत्तीसाव्या मूव्हला शेवटी तो डी५ वरचा घोडा हलला, आणि आनंदला कार्लसेनच्या दुबळ्या झालेल्या प्याद्यांवर हल्ला करण्याची संधी मिळाली. आता उरलेलं प्यादं खाऊन आनंदला आपली मोकळी झालेली प्यादी पुढे सरकवता येतात का ते पाहायचं. हे सोपं असणार नाही. कारण कार्लसेन आपली हत्तीची जोडी वापरून राजावर हल्ला करत काही प्यादी गट्टम करण्याचा प्रयत्न करणार.

राजेश घासकडवी Sun, 23/11/2014 - 21:26

एक्श्चेंज सॅक्रिफाइसनंतरच्या खेळी बघताना ज्याला इंग्लिशमध्ये 'वॉचिंग स्लोमोशन ट्रेन रेक' म्हणतात तशी अवस्था झालेली आहे. आनंद अजूनही खेळतो आहे. पण त्या खेळाला नक्की काय अर्थ आहे कळत नाही. हत्तींची आणि उंट-घोड्याची अदलाबदल करताना कार्लसेनने दोन प्यादी मारली. हत्ती, एक पुढे गेलेलं प्यादं विरुद्ध उंट आणि एक पुढे गेलेलं प्यादं अशी परिस्थिती केली.