Skip to main content

ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

लेखक - कै. गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर

प्रकाशक - डॉ. प . वि. वर्तक

बाबाराव सावरकरांनी लिहिलेल्या या एका अतिशय वादग्रस्त ठरू शकणाऱ्या विषयावरील पुस्तकाबद्दल लिहावेसे वाटले कारण विविध कारणास्तव लोकांपर्यंत पोहोचू न शकलेल्या या पुस्तकाविषयी, त्यात मांडलेल्या संशोधनाबद्दल वाचकांना कळावे. आंतरजालावर सर्फिंग करत असताना एके ठिकाणी या पुस्तकाविषयी माहिती कळल्यानंतर दुकानातून पुस्तक विकत घेताना यात काय विषय, कसा मांडला असेल या शंका वाचनानंतर दूर झाल्या.

कै श्री. गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकरांनी डिसेंबर १९४२ मध्ये लिहिलेल्या पुस्तकाला त्यांच्या हयातीत प्रसिद्धी मिळाली नाहीच पण त्यानंतरही प्रथमावृत्ती निघण्यास जानेवारी १९९९ पर्यंतचा काल लागला. दुसरी आवृत्ती डॉ प वि वर्तक यांनी २००६ साली प्रसिद्ध केली आहे. येशू ख्रिस्त हा मुळात हिंदूच होता व त्याने स्थापन केलेला पंथ "Christanity" हा हिंदू धर्माचाच अंश आहे हा विचार मांडणारं , सप्रमाण सिद्ध करणारं हे पुस्तक निश्चितच वाचनीय आहे.

ख्रिस्ताने लोकांना जमवून सुविचार सांगितले, त्याच्या या शिकवणीतून त्याच्या शिष्यांनी / अनुयायांनी एक पंथ निर्माण केला. येशू स्वतः ख्रिश्चन नव्हता कारण ख्रिश्चन धर्म त्याच्यानंतर सुरु झाला. साहजिकच येशू हा अन्यधर्मीय असला पाहिजे या भूमिकेतून सावरकरांनी केलेले संशोधन या पुस्तकातून अतिशय सुंदररित्या आपल्या समोर येते. कुठेही धार्मिक ना होता , त्रयस्थपणे मांडलेले विचार, संशोधन मनोज्ञ आहे. जगभरात विविध ठिकाणच्या चर्चमध्ये सापडलेली ख्रिस्ताची विविध छायाचित्रे, त्यासंबधीचे लेख , पत्र इत्यादी साधनांद्वारे ख्रिस्त हा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या हिंदू वैदिक / पारशी / यहुदी / बौद्ध / जैन / चीनी लोकांपैकी असला पाहिजे असा विचार बाबाराव मांडतात. नंतर विविध पुराव्यांद्वारे इतर शक्यता निकालात काढत , येशू ख्रिस्त हा मूळ हिंदू तामिळी ब्राम्हण होता हे अभ्यासपूर्ण विवेचनातून सप्रमाण दाखवून देतात.

येशू ख्रिस्त हा हिंदू तामिळी ब्राम्हण होता हे सिद्ध करताना तामिळी ब्राम्हणांच्या व तत्कालीन ख्रिस्ती समाजाच्या चालीरीती , स्थलनामे, वेशभूषा , वृत्ती यातील अनेक साम्यस्थळे बाबाराव दाखवतात तसेच ख्रिस्ताने सांगितलेले सुविचार हे मूळ वेदोक्त विचारांपेक्षा कसे वेगळे नाहीत हेदेखील सहजरीत्या सिद्ध करतात. हे सर्व मांडताना कुठेही कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश जाणवत नाही हे मात्र विशेष. प्रथमदर्शनी आश्चर्यकारक वाटणारी ही साम्यस्थळे अधिक विचारांती पटतात आणि इतिहासाच्या पुस्तकात सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ बौद्ध भिक्खू देश - विदेशात पाठविले हे सहजपणे मान्य करणारे आपण येशू ख्रिस्त हा आपल्याच पूर्वजांपैकी एक होता हे मान्य करताना का कचरतो या विषयीचे प्रश्न मात्र आपल्यापुढे उभे राहतात.

संपादक डॉ. प. वि. वर्तक , प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे आपल्या पूर्वकल्पना बाजूला ठेवून या पुस्तकातील पुराव्यांचा विचार केल्यास, बाबारावांचे विचार पटतात. मात्र १९०९ च्या आसपास अंदमानात, ब्रिटीशांच्या कैदेत असताना सावरकरांनी हे सर्व संशोधन केले आहे, त्या परिस्थितीत संशोधनावर किती आणि कुठल्या प्रकारच्या मर्यादा असू शकतील याचा विचार करूनच हे पुस्तक वाचायला हवे. "येशू ख्रिस्त हा हिंदू तामिळी ब्राम्हण होता , तो भारतात ज्ञानप्राप्तीसाठी काही काळ वास्तव्यास होता आणि आयुष्याचे शेवटी काश्मीरला येऊन त्याने समाधी घेतली" ही आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट सप्रमाण सिद्ध करतानाच, बाबाराव सावरकरांनी त्यांना उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनांद्वारे एक अफाट संशोधनकार्य उभे केले आहे आणि आता आपल्याला उपलब्ध असणाऱ्या carbon dating, DNA आणि इतर आधुनिक साधनांद्वारे हे संशोधन अधिक पुढे नेणे शक्य आहे याची जाणीव पुस्तक वाचताना नक्कीच होते व लेखक आणि संपादकांचा हेतू वाचकांपर्यंत पोचतो. धर्मकल्पना आणि त्याविषयीची आपापली मते बाजूला ठेवून एक उत्तम संशोधन म्हणूनतरी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

-----------------------------

आपण दिलेल्या प्रतिक्रियानंतर पुस्तकातील, साम्यस्थळे दाखवणारे काही उतारे येथे देत आहे ..

" ... मलबारात हिंदू स्त्रिया शुक्रवारी प्रातःकाली उठून भांडी कुंडी नि दरवाज्याच्या बाह्या यांना तांबडा रंग लावीत. एक्झोडस १२ मधील ७ नि ८ भागात ज्युनाही देवार्पण केलेल्या कोकराच्या रक्ताने भांडी कुंडी नि दरवाज्याच्या बाह्या रंगविण्यास सांगितल्याची आज्ञा आहे ..."

" ... निकोडेमसला ख्राइस्टने देवराज्यात प्रवेश करण्याकरिता दुसरा जन्म अत्यंत आवश्यक आणि अपरिहार्य आहे असे सांगितले होते. ब्राम्हणादिनाही द्विज म्हणजे दोन जन्म घेणारे म्हटले जाते .. पहिला जन्म शारीरिक नि दुसरा संस्कारात्मक , मानसिक जन्म होय. या अर्थाने (उपनयन विधी केल्या जाणाऱ्या ) त्रैवर्णीकाना द्विज - दोन जन्म घेणारे म्हणतात .. "

" ... जुना करार वाचला असता त्यावर चातुर्वार्ण्यात्मक समाजव्यवस्थेची छाया पडलेली दिसते. ज्यू नि ब्राम्हण या दोन्हीही जातीनी आपणाला इतरांमध्ये मिसळू दिलेले नाही. शारीरीकादी संयोगाने भ्रष्टता येते असे दोन्हीही जाती मानतात. हे साम्य कोठून आले ? "

" ... डीन फेरार हा ग्रंथकार लिहितो की ख्रिस्त हा ज्यू मुलगा होता नि वयाचे १२ वे वर्षी देवळात त्याचे दीक्षाग्रहण झालेले आहे. मनुस्मृतीत वैश्यांनी १२ वे वर्षी उपनयन करावे असा आदेश दिलेला सापडतो .. " ( दीक्षाग्रहण = उपनयन ????)

"... ज्यूंच्या गळ्यातील फिलाक्तेरीस म्हणजेच आपल्याकडील यज्ञोपवीत .. फिलाक्तेरीस हे हृदयाशी संलग्न असावे नि त्याचसाठी उपयीती पद्धतीने डाव्या खांद्यावरून बांधण्याची पद्धती ज्यूंमध्ये आमच्यासारखीच आहे ... देवसुद्धा फिलाक्तेरीस घालतात असे ज्यू मानीत .. आपल्याकडेही सर्व पुरुष देवता यज्ञोपवीत धारण करणाऱ्याच आहेत ... प्रत्येक ज्युने यज्ञोपवीत मंत्र सकाळ संध्याकाळी जपलाच पाहिजे (आपल्याकडील संध्यावंदन अथवा गायत्री करायचा विधी ) ...

याखेरीज भाषा , शब्द आणि त्यांचे अपरूप, विविध ठिकाणच्या चित्रातील ख्रिस्त आणि मेरी यांच्या बसण्याच्या पद्धती , पोशाख , ख्रिस्ताची यज्ञोपवीत / फिलाक्तेरीस धारण केलेली छायाचित्रे, अनेक छायाचित्रात दिसणारी ख्रिस्ताची सकच्छ (आपल्याकडील धोतर) वस्त्र धारण करण्याची पद्धत, काषाय वस्त्रातील ख्रिस्ताची काही छायाचित्रे इत्यादीविषयी अनेक साम्यस्थळे पुस्तकात विविध ठिकाणी कारणपरत्वे येतात. त्यासाठी मूळ पुस्तक वाचणे अधिक आनंददायी ठरावे.

राजेश घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे ख्रिस्त हा ज्यूंचा नेता होता हा विचार खोडून काढलेला नाही तर ज्यूंचा तामिळ भारतीयांशी असलेला संबध दाखवण्याचा बाबारावांचा प्रयत्न दिसतो ...
अतिवास यांनी म्हटल्याप्रमाणे "ब्राम्हणच का ?" या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही पण पुस्तकातील सर्व उल्लेख हे मनुस्मृतीच्या किंवा वेद काळातील आहेत त्यामुळे ब्राम्हण याचा अर्थ उच्चवर्णीय असा घेण्यास हरकत नसावी ...

राजेश घासकडवी Sun, 11/03/2012 - 17:51

ख्रिस्ताच्या जीवनावर प्रचंड अभ्यास झालेला आहे. शेकडो सच्चा अभ्यासकांचं मत एकीकडे असताना अशा पूर्णपणे वेगळ्या मतावर विश्वास ठेवणं जड जातं.

प्रथमदर्शनी आश्चर्यकारक वाटणारी ही साम्यस्थळे अधिक विचारांती पटतात

काही साम्यस्थळं इथे सांगावीत ही विनंती. येशू ख्रिस्त हा ज्यूंचा नेता होता हा प्रस्थापित विचार कसा खोडून काढला आहे हेही जाणून घ्यायला आवडेल.

आतिवास Sun, 11/03/2012 - 18:10

येशू म्हणजे कृष्ण असे कधीतरी वाचल्याचे आठवते - कुठे ते आठवत नाही. पण येशू तामिळ ब्राह्मण हे मात्र नवेच वाटले अगदी. त्या काळच्या मर्यादित माहितीवर आधारित बाबाराव सावरकरांनी लिहिले असेल, त्यामुळे त्या मर्यादांचे भान ठेवावे लागेल. पण असा विचार त्यांना कसा सुचला, किंवा त्यांना दिसलेले नेमके साम्यस्थळ याबद्दल पुस्तकातले एक दोन संदर्भ/उदाहरण दिले तर मार्गदर्शक होईल.

थोडे अवांतरः कोणत्याही प्रकारे जातीय चर्चेत जावे असा हेतू नाही. त्यामुळे गरज पडल्यास या मुद्याकडे दुर्लक्ष करावे. पण एक कुतूहल आहे - येशू हा तामिळ ब्राह्मणच का, दुसरा कोणी का नाही याबद्दल पुस्तकात काही विवेचन आहे का? धर्मसंस्थापक म्हणून भारतीय इतिहासातही 'ब्राह्मण' जातीत जन्माला आलेले लोक नाहीत असे दिसते. उपनिषदांतही क्षत्रियांनी ब्राह्मणांना ज्ञान दिले असे दिसते - त्यामुळे येशू ब्राह्मण हे जरा वेगळेच वाटले खरे.

नितिन थत्ते Sun, 11/03/2012 - 18:19

रोचक लेख आहे. पूर्वी पु ना ओक यांच्या पुस्तकात महंमद हा देखील हिंदूच असल्याचे वाचले होते.

दारासिंग या युगपुरुषाने हिंदूच धर्माचा पुरस्कार करणार्‍या स्टेनला मारले वाट्टं. ;)

सुनील Sun, 11/03/2012 - 20:18

बरं!

तात्पुरते मानून चालू की येशू हा तामिळ ब्राम्हण होता आणि त्याने सांगितलेले तत्वज्ञान हे हिंदूंचेच तत्वज्ञान आहे.

पुढे काय?

आजचे ख्रिस्ती जर असे मानत नसतील तर, हे सगळे निरर्थक आहे.

श्रावण मोडक Mon, 12/03/2012 - 10:12

In reply to by सुनील

येशूने सांगितलेलं तत्वज्ञान हिंदूंचेच आहे, या वाक्यात हा सारा विषय संपतो राव. तुम्ही त्याकडं दुर्लक्ष करून हा विषय उगाच का वाढवताय? ;)

अरविंद कोल्हटकर Sun, 11/03/2012 - 21:28

मीहि मूळ पुस्तक वाचलेले नाही पण तूर्तास मला राजेश घासकडवींसारखेच वाटते.

ख्रिस्ताच्या क्रूसावरच्या चित्रात INRI अशी अक्षरे असलेली एक पट्टी असते. पाँटिअस पायलेटने ती तेथे लावून घेतली अशी कथा आहे आणि तिच्या मागचे मूळ लॅटिन शब्द (Iesus Nazarenus, Rex Iudaeorum (Jesus of Nazareth, King of the Jews) असे आहेत. युरोपातील काही शेकडो वर्षांच्या पुराण्या ज्यू-द्वेषामागे ज्यू हे जीजसचे हत्या करणारे ही ख्रिश्चन श्रद्धा आहे.

हा सगळा पुरावा कसा खोडणार? The task does look daunting...एव्हढेच तूर्तास म्हणतो.

अर्थात ही अडचण ज्यांना काही शास्त्राधारित चर्चा करायची आहे त्यांच्यापुरतीच आहे. ख्रिश्चन धर्मच मूळची हिंदुधर्माची शाखा, का? तर 'Christianity' हा शब्दच मुळी 'कृष्णनीति' ह्या शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे असले 'शास्त्राधार' पुढे करणार्‍यांना काहीच अवघड नाही

खवचट खान Mon, 12/03/2012 - 02:27

In reply to by अरविंद कोल्हटकर

>>>ख्रिस्ताच्या क्रूसावरच्या चित्रात INRI अशी अक्षरे असलेली एक पट्टी असते.

यावरून तरी ख्रिस्ताच्या ब्राम्हण नाही तर निदान भारतीय असण्याला पुष्टी मिळत असावी असे वाटते. जसे आजचा उत्तर भारतीय स्माईल ऐवजी इस्माईल, किंवा स्त्री ऐवजी इस्त्री म्हणतो तसे त्या काळात NRI चा INRI असा अपभ्रंश गॅलिलीमध्ये होत असावा का? NRI म्हणजे नॉन रेसिडंट इंडियन हे तर सर्व जाणतात.

कुणी जाणकार यावर मार्गदर्शन करील ही अपेक्षा.

धनंजय Sun, 11/03/2012 - 22:27

ख्रिस्तकथा (बायबलमधली, मुसलमानी परंपरेतली नव्हे) ही इजिप्तपधील "होरस"च्या मिथकांपैकी एकाची आवृत्ती आहे, असे बिल माहरने त्याच्या "रिलिजुलस" माहितीपटात रेखाटून सांगितले आहे. म्हणजे कुमारिकेच्या पोटी जन्म, बारा शिष्य असणे, वगैरे, बरेच तपशील. उदाहरणार्थ : मेलेल्या लाझारुसला पुन्हा जिवंत केल्याची चमत्कार-कथा मूळ इजिप्शियन नावाचे आरामाइक रूप तितके बदलून...

(याबाबत गूगलशोध घेता असे दिसते, की बराच विवाद आहे.)

... Sun, 11/03/2012 - 22:55

मागे एकदा प्रेषित महंमद काश्मीरात वास्तव्याला असल्याचे वाचले होते
नो आँफेन्स टू दँट कम्युनिटी

बाकी आजकाल कोण काय शोध लावेल याची शक्यता नाकारता येत नाही

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/03/2012 - 01:56

In reply to by ...

अहो जाईताई, असं मोठ्याने बोलू नका. प्रेषित मोहम्मदाच्या वास्तव्याच्या नावाखाली काश्मीर पाकीस्तानने बळकावला तर?

रोचना Mon, 12/03/2012 - 12:17

In reply to by ...

मग भारताने जेरुसलेम युरोप वगैरे बळकावा काय

हा विचार विनोदी वाटतो खरा, पण या संशोधनाच्या पायाशी शेवटी असाच सर्वसमावेशक विचार असावा...

बाकी अनेक तमिळ ब्राह्मणांना स्वत:च्या समाजाची ज्यूं शी तुलना करण्याची सवय आहेच - स्वत:च्या जातीचे विधि संस्कार कट्टरपणे पाळणारे, स्वत:च्याच मायभूमीतून जगभर (बळजबरीने) हकलले गेलेले, गतकालाबद्दल अपराधी वृत्ती बाळगणारे, शांतपणे कुणाच्या आध्यात न मध्यात पडणारे, सर्वात बुद्धिमान, यशस्वी पण पैशाचा लोभ नसलेले, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे.

पण म्हणून खुद्द येशू ख्रिस्त, ज्यूंचा राजा हाच मुळात तमिळ ब्राह्मण होता, हे ऐकून त्यांना ही बहुदा आश्चर्य होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/03/2012 - 01:55

मला व्यक्तीशः या विषयात (धर्म, इतिहास, इ) फार रस, अभ्यास नाही. बाबा बर्व्यांनी चर्चेत पुस्तकातली काही उद्धृते दिल्यावर काही रस वाटत आहे. काही विस्कळीत मुद्दे:
१. २००० वर्षांपूर्वी (आताचा) दक्षिण भारत, तमिळनाड आणि (आताचा) इस्रायल+पॅलेस्टाईन यांच्यात काही व्यापार आदी संबंध होते का? असले तर दोन संस्कृतींमधलं साम्य रोचक असलं तरी आश्चर्यकारक वाटत नाही.
२. लॅटीन आणि संस्कृतमधेही साम्य आहे. द्राविडी भाषा मात्र तेवढे साधर्म्य दाखवत नाहीत.
३. भौगोलिक विस्तार पहाता तेव्हाचे ज्यू हे आताच्या अरबांशी अधिक जवळचे मानावेत का? (ज्यू लोकं जेरूसलेममधून बाहेर पडले, अगदी सायबेरियापर्यंत पोहोचले, त्यामुळे त्यांच्यात आता, इस्रायलमधील ज्यूंमधे, वांशिक सरमिसळ झालेली असणार.) तेव्हा अरब अर्थातच मुस्लिम नव्हते.
४. ख्रिस्ताची आई (वडील नाहीत असं मानलं जातं) आणि इतर नातलग हे पेगन असू शकतात का?
५. जैन, बौद्ध आणि शीख हे हिंदू धर्माचेच पंथ असं काही हिंदू मानतात. जैन, बौद्ध आणि शीखांपैकी निदान काही लोकांना हे मान्य नाही. नक्की कोणाचं खरं मानायचं?
६. हिंदू आई-वडलांच्या पोटी जन्माला आलेले अनेक लोक स्वत:ला निधर्मी मानतात. कागदोपत्री तसं जाहीर करतात. इतर हिंदू धर्मीय हे मानतातच असं नाही. नक्की कोणाचं खरं मानायचं?
७. ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम इथे झाला अशी मान्यता आहे. आयुष्याचा शेवटचा काळ (जो फार कमी आहे) त्याने काश्मीरात घालवला हे जरी खरं असेल तरीही पॅलेस्टाईनमधेच वास्तव्य करणार्‍या माणसाला कितपत तमिळ किंवा भारतीय म्हणावे? पूर्वज कोकण, सह्याद्रीचा घाटमाथ्याचा, पठाराचा भाग इथले असले तरीही मुंबईतच लहानाची मोठी झालेली व्यक्ती अस्सल मुंबईकरांचे जे काही असतील ते गुण-दोष दाखवताना दिसत नाही का? चेहेर्‍याची ठेवण, वर्ण वगैरे मला थोड्या गौण बाबी वाटतात. त्या काळात दळणवळणही अतिशय अप्रगत होतं. आता अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या मुलांना गणपती, दिवाळी बघून माहित आहेत.
८. या सर्व अभ्यासाचा 'तेव्हाचा' नक्की उद्देश, कार्यकारणभाव काय असावा? शुद्ध इतिहास संशोधनच मानावे का? कारण बाबाराव सावरकर हे इतिहास संशोधक म्हणून फार प्रसिद्ध नाहीत. (त्यातून तेव्हाचा भारताचा इतिहास समजण्यासाठी मदत निश्चित होईल.)
९. हे सर्व संशोधन आता १०० वर्ष जुनं आहे आणि त्यानंतर या विषयात चिक्कार संशोधन झालेलं आहे. तरीही 'आता' त्यावर कितपत विश्वास ठेवावा?

... अशा संदर्भात काही टिप्पणी वाचायला आवडेल.

मन Mon, 12/03/2012 - 11:28

तुम्ही बायबल(जुना करार+ नवा करार) वाचलत?(मिळेल त्या भाषेत)
हे सगले लफडे एका गोष्टीमुळे होते आहे ते म्हणजे नव्या करारात ख्रिस्ताचा उल्लेख आहे ख्रिस्तजन्मापासून ते त्याच्या बाराव्या वर्षापर्यंत.
वय वर्श १२ ते २८-३० जीझसचा काहीही उल्लेख नाही. गायब झालेले जोसेफ सुताराचे बारा वर्षाचे पोर अचानक तिशीला टेकल्यावरच रंगमंचावर पुन्हा प्रकटते ते ज्ञानी,तत्वज्ञ्,साक्षात्कारी वगैरे होउनच.
त्यामुळे ह्या १८ वर्षांबद्द्ल कल्प्नाशक्तीला व हवेतल्या तर्कांना फुल्ल स्कोप आहे.ह्यातले विकिवरचे http://en.wikipedia.org/wiki/Lost_years_of_Jesus हे पान उपयुक्त ठरावे.
http://en.wikipedia.org/wiki/Mormonism इथे म्हटल्याप्रमाणे जीझस हा फार पूर्वी तत्कालिन जगाला ज्ञात नसलेल्या अमेरिकेला दर्शन देउन गेला होता!!
कित्येक आधुनिक मुस्लिम नवधार्मिक समजुतींनुसार इस्लामचे महंमदाच्यापूर्वीचे प्रवक्ते भारतात येउन गेले. त्यांनी सांगितलेला पवित्र संदेश भारतीयांनी पार विद्रूप करून वेगळ्याच रुपात लिहिला, तो म्हणजे भारतीयांची मूर्तीपूजा व वेद. त्याचा मूलाधार हा महंमदापूर्वीचे प्रेषितच होते!!(१,२४,००० हा प्रसिद्ध प्रेषितांचा आकडाही ते लग्गेच तोंडावर फेकतात.)
थोडक्यात हल्ली सर्वच नवधार्मिक लोक आमचा धर्म मूळ्,शुद्ध वगैरे होताच, व इथूनच दुसरीकडे गेला. पण थोडासा बदललेल्या व छेडछाड केलेल्या रुपात प्रचलित झाला हे अहमिकेने सिद्ध करु पाहतात. सर्व बाजूंनी भरपूर वाद्-विवाद व व्यर्थ श्रम होतात. ही थिअरीसुद्ध त्यातीलच एक वाटते आहे.
आदिती काकूंच्या शंका रास्त वाटल्या.

भाषांतील साम्ये, आहारविहारातील तुरळक साम्ये ह्यांनी ठाम तर्काप्रत येणे म्हणजे गंमतच आहे. कुणी हेच संबंध वापरुन जीझस काश्मीरला येउन गेला म्हणतो, कुणी म्हण्तो तो पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरात राहिला, कुणी म्हणतो तो तिबेटला जाउन बौद्ध तत्वज्ञान शिकून आला, आणि आता हे:- तामिळी ब्राम्हण प्रकरण. ह्या सर्वांस म्हणतात conspiracy theory. असलेल्या अंधारावर कल्पनांचे इमले चढवण्याचा हा उद्योग आहे.
पूर्वी सात्-आठ वर्षापूर्वीपर्यंत मीही असल्या प्रकारांनी फार प्रभावित वगैरे होत असे.नंतर समजले सिद्ध करायचेच तर काहीही करता येइल.
(हो. का ही ही. "मराठी वाङ्मयाचा गाळिव इतिहास" ह्यात पुलंनी "टपाल" ह्या प्राकृत शब्दापासून "पोस्ट" हा शब्द कसा आला ते "सप्रमाण" सिद्ध केले आहे!)
कालच माझ्या कंपनीत पुस्तक प्रदर्शनातील सात्-आठशे पानांचे पु ना ओक ह्यांचे धम्माल पुस्त्क फुक्टात वाचून काढले.त्यांच्या म्हणण्यानुसार आमचे थोर पूर्वज भारतातच नव्हे तर सर्वत्र पसरले होते्ए सर्वत्र म्हणजे मला पामराला पाक्-अफगाण्,नेपाळ म्यानमार किम्वा कंबोडिया वगैरे वाटले. पण ओक काकांनी नुसते शब्द शब्द वापरून दक्षिण अमेरिकेतील माया इंकाही कसे आर्य आहेत्,उत्तर अमेरिकेतील रेड इंडिअन्स कसे आर्य आहेत्,चीन्-जपान, सर्व स्कँडिनेविअन देशही कसे वैदिकच आहेत हे सांगायला सुरुवात केली. अरे समुद्राबाहेर राह्णार एसगळेच वैदिक होते असा निश्कर्ष काढायचा का? तुम्हाला वाचायचे असेल तर वाचा खुशाल. झंडु बामचा खप वाढेल तितकाच.

नगरीनिरंजन Mon, 12/03/2012 - 11:56

In reply to by मन

असे लिखाण अत्यंत मनोरंजक असल्याने मला फार आवडते.
मेक्सिको म्हणजेच पाताळ आहे.
तिथे डोंगरावर दिसणारा त्रिशूळाचा आकार म्हणजे दिशादर्शक आणि डोंगरावरच्या पट्ट्या म्हणजे विमानांची धावपट्टीच आहे.
शिवाय तिथल्या एका पठारावर हनुमानाचे भव्य चित्र आहे.
असे अनेक शोध लागलेले आहेत.

दक्षिण भारतातून मध्यपूर्वेत जाणार्‍यांचा इतिहास इतका प्राचीन असेल असे वाटले नव्हते. शिवाय त्या काळी समुद्र ओलांडणे पाप समजत असल्याने या तमिळ ब्राह्मणाला धर्मबहिष्कृत केले गेले असावे आणि बिचार्‍याला नवा धर्म काढण्याशिवाय गत्यंतर उरले नसावे.

वैमानिक हत्ती Tue, 07/08/2012 - 15:03

हा लेख चर्चा ऐवजी मौजमजा या सदराअंतर्गत लिहिला असता तर ते अधिक योग्य झाले असते.