Skip to main content

प्रिय 'प्र' ...

प्रियतम 'प्र',

आज सकाळी सहस्ररश्मीने माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर अलगद फुंंकर मारली. मी डोळे उघडले आणि तत्क्षणी तुझी आठवण मला घायाळ करू लागली. 'प्र', राजा का रे गेलास मला सोडून? खिडकीत जाऊन उभी राहिले, वाऱ्याने त्याच्या मुलायम पावलांनी माझ्या अंगाअंगावर अलगद पावले उमटवली. जणूकाही तुझाच रेशमी स्पर्श 'प्र'!! सारं मन ... सारं तन थरारून उठलं. एक अलवार शिरशिरी आली. काय करत असशील असा विचार करत ब्रश करायला घेतला. आरशात स्वतःचे रुपडे पाहिले. हीच का ती मी... जिच्यावर तू आपल्या प्राणांची कुडी ओवाळलीस. आणि मी माझ्या पंचप्राणांची ज्योत तुझ्या आत्म्यासमोर तेवत ठेवली. हो!! तीच ती मी. तुझी... फक्त तुझीच प्र! प्र अरे तू फुलवलंस मला. माझ्या मनमोराचा पिसारा तूच डौलाने उघडलास. माझ्या मनाच्या कळीला तुझ्या मोरपंखी प्रेमाने अलगद खुलवलं. माझं देहभान तू झालास. या जगतावर मला त्या परमेशाने फक्त तुझ्याचसाठी पाठवलं रे!

आता तू जवळ नाहीस प्र. पण असं जाणवतंय की आपण एकच आहोत. जणू मी नदी... आणि तू वारा. माझ्या अंगाला स्पर्श करत माझी काया झंकारणारा मरुत्दूत... तूच तो. प्र, वीण घट्ट आहे रे आपल्या नात्याची. तू दोरा आहेस या वातीचा, तू गंध आहेस या मातीचा, तू सत्यवान आहेस या सतीचा. माझ्या साऱ्या साऱ्या संवेदना तू उजळवून टाकल्या आहेस. मन कसं फुलपाखरू होऊन बागडतं आहे तुझ्या आठवणीत.

उठले... आंघोळीला गेले. शॉवर चालू केला आणि विचार तरंगला मनात. तू असा जलधारांसारखा बरसशील माझ्यावर, नाही? या विचारांनी सिंदूरलाली चढली गालांवर... तुझं हे लाजाळूचं रोपटं पार हळवं होऊन गेलं. शॉवरच्या पाण्यात माझ्या अर्धोन्मिलीत नेत्रांतल्या जलधारा कधी मिसळून गेल्या ते उमजलंच नाही मला प्र!!!

बाहेर आल्यावर डोळ्यात काजळ रेखताना उमगलं की माझ्या नशीबावर पण तू या काजळरेषेसारखा उमटला आहेस. आज तू भेटणार नाहीस मला!!! अजून एक आठवडा नाही. काय करू रे??? तुला काही झालं तर!!! वेडं मन सैरभैर झालं. काळेकुट्ट ढग निळ्याभोर आकाशात जणू दाटून यावेत! दुःखाने मन पार हेलावून गेलं. पोखरलेल्या उदार, उद्विग्न, असहाय्य मनगंगेला दिलासा म्हणून तुझा फोटो बघितला पर्समधला.

परत एकदा हिरव्याकंच पाचूसारखं मन थरारलं. असं वाटलं जणू फोटोतूनच तू बघतोयस माझ्याकडे! काळीज चिरत गेली तुझी प्रेमनजर. फोटोला कृष्णतीट लावली. नजर न लागो माझ्या प्रला! त्या राधेच्या विरहवेदनाच भोगल्या जणू!!!

पुन्हा मन बहरलं!!! अंगांग फुललं. तृषार्त जमिनीवर पोपटी अंकुर खुलला जणू. कारणच तसं होतं. मोबाईल वाजला आणि त्यावर नाव आलं ... Pra calling!!!

तुझीच,

वीणा
७ फेब्रुवारी २०१५

Node read time
2 minutes
2 minutes

'न'वी बाजू Sat, 07/02/2015 - 20:04

हे काय आहे नेमके?

वृन्दा Sat, 07/02/2015 - 21:53

In reply to by 'न'वी बाजू

:D नेमके ;)

धर्मराजमुटके Sat, 07/02/2015 - 22:26

अहो एवढं रोमँटीक लिवलय तर जरा नाव बी रोमँटीक घ्यायचं की ! प्र काय प्र ? आम्ही शाळेत असताना प्रश्न चे लघुरुप म्हणून प्र. लिवायचो नी उत्तर चे लघुरुप म्हणून उ लिवायचो त्याची आठवण आली. गेलाबाजार राजा, सोनुल्या, छकुल्या तरी म्हणायचं किंवा लेटेस्ट फॅशनप्रमाणे 'माय बेबी', 'जानू' 'डियर' तरी ?
आणी अजून एक प्रियकराला जलधारा नका म्हणू बरे ! त्या आज केरळात बरसतात तर उद्या कोकणात. काय भरोसा त्यांचा ?

अस्वल Sun, 08/02/2015 - 00:43

रोम्यँटिक लिखाण हा आपला प्रांत नव्हे. तेव्हा आम्ही पास.

प्रामाणिक शंका -लेखिकेच्या नावातील पी.डी. हे प्रवीण वणे चं लघुरूप आहे का? लिखाणाची शैली दवणेसरांशी मिळतीजुळती आहे.
शिवाय "प्र" फॉर ... प्रवीण..
तेव्हा अजून लेख वाचायला आवडतील हे वेगळं सांगायलाच नको.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/02/2015 - 07:53

लेखन विनोदी आहे, वाचताना क्वचित हसायला येईल अशी शंकाही उत्पन्न झाली.

पण कोणत्याही प्रथितयश, प्रतिभावंत वा लोकप्रिय लेखकांची अशी थट्टा करावी का? मुद्दाम एखाद्या व्यक्तीची शैली उचलून तसंच लिहिताना नक्की काय साधायचं आहे याचा विचार करावा, ही विनंती.

मेघना भुस्कुटे Sun, 08/02/2015 - 08:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असहमत.
आधीच ऐसीवर ललित लेखनाला पुरेसा वाव मिळत नाही. कधी कुणी काही लिहिलंच तर त्याच्यावर लोक आवेशानं तुटून पडतात. अवांतराच्या माळा लागतात.
अशा वेळी 'थट्टा करताना जरा विचार करावा' अशी कानपिचकी खुद्द अदितीकडून बघून आश्चर्य वाटलं.

असो.
वीणाबाईंना शुभेच्छा. अस्वल म्हणतंय तसं हे विडंबनात्मक लेखन असेल, तर प्रयत्त अशक्य भारी आहे! या पत्रांची मालिकाच वाचायला आवडेल. जरूर् लिहा.

बॅटमॅन Sun, 08/02/2015 - 21:10

In reply to by मेघना भुस्कुटे

अवांतराच्या माळा लागतात.

ललितादि विषयांवर अवांतर होणार नायतर काय काथ्याकुटावर?

(अवांतरादि श्रेण्याही आम्हांलाच मिळणार नायतर काय ऐसीप्रिय विचारसरणीवाल्यांना?)

ॲमी Mon, 09/02/2015 - 08:31

In reply to by मेघना भुस्कुटे

अस्वल म्हणतंय तसं हे विडंबनात्मक लेखन असेल, तर प्रयत्न अशक्य भारी आहे! >> +१. मलातर हे अदितीचंच काम वाटतय ;-) माझ्याकडून ५ तारका!

मेघना भुस्कुटे Mon, 09/02/2015 - 10:44

In reply to by ॲमी

अदिती? आय डाउट. तिच्यात उद्धटपणा आणि टारगटपणा आहे. पण साहित्यिक टायपाचा नैय्ये. मला ही काही 'आशावादी' संपादकांची कृष्णतीट - अर्र, च्च च्च - कृष्णकारस्थान - वाटतंय.

वृन्दा Sun, 08/02/2015 - 19:56

In reply to by नितिन थत्ते

राजा वगैरे आपण लिहीत नाही बर का
____
तेच आहे ना राजकारण - साम्य्/भांडवल वाद-कॉर्पोरेट धनदांडगे हे सगळे विषय माझ्याकरता फार सरमिसळीचे असतात. त्यातील fine detailed फरक मला कळत नाहीत. तसेच या रोमँटीक लिखाणाच्या शैलीतील फरक त्यात रुची नसणार्‍यांना कळत नसावेत. :)

प्रथमेश नामजोशी Sun, 08/02/2015 - 10:15

शीर्षक वाचून धडकीच भरली होती खरंतर. ऐसीवरील काही मित्रमंडळी 'प्र' म्हणतात ना मला, म्हणून. पण, वाचून हुश्श झालं. :) ;)

पी. डी. वीणा Sun, 08/02/2015 - 18:47

नवीनच सुरु केलय लि़खाण.....म्ह्ट्ल बघुया आवडतय का कुणाला.... धाकली बहिण म्हणून सांभाळून घ्या......!!!

अनु राव Mon, 09/02/2015 - 10:55

असले सेंटी सेंटी लिखाण माझ्या अल्पमतीला कळत नाही त्यामुळे पास.
लेखीकेला विनंती इतकीच आहे, जे काही लिहाल ते कोणी पूर्ण वाचुन काढु शकेल असे लिहीलेत तर बरे होइल.

अस्वल Mon, 09/02/2015 - 11:20

In reply to by अनु राव

आमचीही-
आपल्याला उर्फ लेखिकेला विनंती इतकीच आहे, जे काही लिहाल ते कोणी पूर्ण वाचून काढू शकेल असे लिहिलेत तर बरे हो
;)

राजेश घासकडवी Mon, 09/02/2015 - 16:45

मग तो कॉल घेतला की नाही? प्र आणि वीणाचं तनो/मनो/धनो जे काय असेल ते मीलन झालं की नाही? पुढचं लवकर लिहा ब्वॉ.

राही Mon, 09/02/2015 - 17:48

प्र वीण(आ). द.
असं असेल तर अगदीच पीजे.

ऋषिकेश Mon, 09/02/2015 - 20:28

ऐसीवर स्वागत!
विविध प्रकारचे ललित लेखन ऐसीवर येते आहे हे चांगलेच आहे. अशा शैलीचा एक खास वाचकवर्ग आहेच आहे.
==
मला पत्र आवडले. फार गोग्गोड वगैरे असले तरी अश्या प्रकारच्या पत्रांनी विव्हळात आपल्या प्रियकराची/प्रेयसीची वाट पाहणार्‍या काही गुलाबी व्यक्ती परिचित असल्याने वर अनेकांना संशय आहे तशी मौजमजा वाटली नाही. आणि असलीच तर उच्च आहे!
==

प्र, वीण घट्ट आहे रे आपल्या नात्याची

इथे अक्षरश: फुटलो!

येऊ दे असेच काही
--

अवांतरः आधी फक्त "प्रिय" या व्यक्तीसाठी जालावर झालेलं लेखन प्रसिद्ध आहेच. हे त्याच्याशी संबंधित काही?

शहराजाद Tue, 10/02/2015 - 07:13

जिच्यावर तू आपल्या प्राणांची कुडी ओवाळलीस

प्राण कुडीच्या आत असतात असे माहित होते. प्राणांची कुडी कशी काय ओवाळली असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करून सोडून दिला. :)

लेख आवडला.

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 13:47

आतापर्यंत आम्हाला कविता कळत नाहीत असा आमचा गैरसमज होता. आता लेखन हे ललित आहे कि विडंबन हे देखिल कळत नाही हा नवा दोष कळला आहे.

मन Tue, 10/02/2015 - 15:04

तुषार, पी डी वीणा व बॉटबॉय ह्यापैकी एक (किंवा कदाचित त्याहून अधिक ) मागे घासुगुर्जींचेच डोके आहे असे वाटते.
दुसर्‍याच्या शैलीत लिहून मिश्किलपणा करण्याचं पोटेंशियल त्यांच्याकडे आहे ; असं मला वाटतं.

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 15:12

In reply to by अजो१२३

हर्मिट क्रॅब या ऐसीवरील सर्वांत सभ्य आयडी असाव्यात. तरीही त्यांनी मल्टिपल आयडी घेतलेच की. सबब सभ्यपणा आणि डुआयडी यांचा संबंध नाही.

'न'वी बाजू Tue, 10/02/2015 - 18:15

In reply to by बॅटमॅन

नाही म्हणजे, हर्मिट क्रॅब यांनी सभ्य असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु, त्यांना ऐसीवरील सर्वात सभ्य आयडी म्हणणे हा ऐसीवरील इतर सभ्य आयडींचा अपमान नव्हे काय?

'हर्मिट क्रॅब' हा ऐसीवरील सभ्यतेचा मानदंड कधीपासून झाला?

..........

जे/ज्या कोणी असतील ते/त्या. आम्हीं त्यांत मोडत नाही; सबब तेवढी आतील कडी लावण्याची कृपा कराल काय?

'हर्मिट क्रॅबपेक्षा सहापट सभ्य!!!'

बॅटमॅन Tue, 10/02/2015 - 18:17

In reply to by 'न'वी बाजू

नाही म्हणजे, हर्मिट क्रॅब यांनी सभ्य असण्यास प्रत्यवाय नाही, परंतु, त्यांना ऐसीवरील सर्वात सभ्य आयडी म्हणणे हा ऐसीवरील इतर सभ्य आयडींचा१ अपमान नव्हे काय?

खांद्यांवर चिपा असतील तर कुठलीही गोष्ट अपमाणच वाटनार.

तदुपरि ते आमचे मत आहे असे 'असाव्यात' या क्रियापदातून ध्वनित होत नाही काय?

अजो१२३ Tue, 10/02/2015 - 18:07

In reply to by नगरीनिरंजन

घासकडवी मोप सज्जन असतील पण उसंत सखूंइतकी विनोदबुद्धी त्यांना नसावी. आलेखबुद्धी आणि विनोदबुद्धी एकाच मेंदूत सुखाने नांदू शकत नसाव्यात.

अर्धवट Mon, 23/02/2015 - 13:03

आयला, ही गंमत आतापर्यंत पाहिलीच नव्हती.. आत्ताच सगळ लेखन वाचून काढलं... काय प्रतिभा, काय प्रतिभा... आहाहाहा... माघात भाद्रपद उभा केलाय की..

अजो१२३ Wed, 25/02/2015 - 11:48

In reply to by बॅटमॅन

कालिदासाने यक्षाला, त्याच्या सुंदर बायकोला, त्यांच्या नगरीला, घराला ज्या ज्या उपमा दिल्या आहेत त्या * त्या यक्षाला आणि त्याच्या बायकोला झेपतीलच असे नाही.
==================
त्या दोन 'त्यां'चा अर्थ काढण्यासाठी 'त्यां'त थोडे थांबावे लागते. तिथे कॉमा दिला तर वाक्यरचना चुकते वाटते.

गब्बर सिंग Wed, 25/02/2015 - 02:48

In reply to by वृन्दा

काय ओ ? "मेरे अंग लग जा बालमा" (मेरा नाम जो...) सारखी सोप्पी सोप्पी गाणी सोडून ही गीता दत्त यांची गाणी का खणून काढताय ??

गब्बर सिंग Wed, 03/02/2016 - 02:48

गेल्या कुठे या वीणामॅडम ? अस्वलरावांनी मागे त्यांना विचारले होते की "तुम्ही प्रेमपत्रं लिहिण्याच्या ऑर्डरी स्वीकारता काय ?". त्यावर आधारित स्टार्टप सुरु केला की काय वीणामॅडम नी ?

( तिकडे खफ वर गेल्या आठवड्यात ऑनलाईन शॉपिंग ची चर्चा चालली होती तिचा व या स्टार्टप चा काही संबंध आहे का ? )