निबंधस्पर्धा - मी पाहिलेला व्हॅलेन्टाईन्स डे
ऐसीवर स्पर्धा घेण्याची एक उज्ज्वल परंपरा आहे, याची सर्व ऐसीकरांस जाणीव असेलच. उदाहरणार्थ हे दोन धागे पहा - कवितास्पर्धा आणि (आणखी एक) कवितास्पर्धा. दोन धागे काढले म्हणजे परंपरा तयार होत नाही असा एक आक्षेप घेतला जाऊ शकतो याची जाणीव आम्हांस आहे. तर मग आमचं स्पष्टीकरण असे की परंपरा कधी पॉप कल्चरमधून निर्माण होतात आणि परंपरा निर्माण कराव्या लागतात. दोनांचे तीन झाले की परंपरा, कुटुंबव्यवस्था, lineage तयार होतात. तर ऐसीच्या उज्ज्वल स्पर्धापरंपरेत भर घालण्यासाठी ही तिसरी स्पर्धा.
या स्पर्धेचं स्वरूप थोडं व्यापक आहे. शीर्षकात निबंधस्पर्धा असा उल्लेख आहे, पण स्पर्धेसाठी गद्य, पद्य, फोटो, चित्रं, व्हिडीओ अशा कोणत्याही प्रकारची एंट्री चालेल. विषय आहे - मी पाहिलेला व्हॅलेन्टाईन्स डे. आपण सादर करत असणाऱ्या व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी असण्याची अथवा लांबून पाहण्याची आवश्यकता नाही. कल्पनेतला किंवा आपल्याला कायम हवाहवासा वाटलेला व्हॅलेन्टाईन्स डे याबद्दल आपण लेखन, चित्रण करू शकता. इतरांच्या व्हॅलेन्टाईन्स डे कलाकृतीही सदस्यांच्या रसास्वादासाठी आणि/किंवा स्पर्धकांचा हुरूप वाढवण्यासाठी प्रतिसादांमधून शेअर कराव्यात.
स्पर्धेचे नियम -
१. स्पर्धेसाठी फक्त स्वतःचं लेखन, स्वतः काढलेली चित्रंच द्यावीत.
२. स्पर्धेसाठी एंट्री देण्याची अंतिम तारीख, भावेप्र सोमवार, १६ फेब्रुवारी संध्याकाळ ६:००
३. शक्यतो या धाग्यात प्रतिसाद म्हणूनच एंट्री द्याव्यात. पण लेखन पुरेसं मोठं (>२०० शब्द) असल्यास स्वतंत्र धागा काढायलाही हरकत नाही.
४. स्पर्धाकाळात आलेले यथोचित धागे, 'स्पर्धेसाठी' असा उल्लेख नसला तरीही स्पर्धेत मोजले जातील. त्यामुळे ज्या सदस्यांना स्पर्धेबाहेर रहायचे असेल त्यांनी स्पर्धाकाळात ऐसीवर या प्रकारात बसेल असं लेखन, चित्रण प्रकाशित करू नये; १६ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत थांबावे.
५. स्पर्धेसाठी निदान एक एंट्री देणे बंधनकारक आहे, पण कमाल मर्यादा नाही.
६. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ऐसीसदस्या रुची परीक्षक असतील.
७. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल; पण इच्छा असल्यास सदस्यांनाही मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येईल.
८. रुची यांनाही स्पर्धेत भाग घेण्याची मुभा असेल.
९. स्पर्धेतली गंमत वाढवण्यासाठी एकमेकांना खरडवह्या आणि व्यनिंमधून उत्तेजन देण्याचे प्रयत्न करावेत. हे उदारमतवादी परंपरेला साजेसंही ठरेल.
विजेत्या सदस्य/सदस्यांचे फ्लेक्सबोर्ड लावून अभिनंदन करण्यात येईल.
ज्या सदस्यांना स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा आहे पण काही कल्पना सुचत नाहीत त्यांनी (सर्वद्वेष्टा) सदस्य नाईल यांचा हा धागा वाचून काढावा - वॅलेंटाईन्स डे...
काही वर्षांपूर्वी डेटींग साईट
काही वर्षांपूर्वी डेटींग साईट काय जॉइन केली, नवेनवे नमुने पहावयास मिळू लागले. प्रत्येक V-Day एकेक राशीचा स्वभाव कळू लागला. पण अजुनही कुठे जमलं नाही यावरुन हे लक्षात आले असेलच की प्रत्येक राशींचे नेमके दुर्गुण पहावयास मिळाले ;)
कर्क
कर्क राशीचा, V-Day अजुन कुठे साजरा होणार अर्थातच त्याच्या घरी - home sweet home मध्ये साजरा करण्याचे ठरले. ठरल्या वेळीच्या थोडी अगोदरच मी हजर राहीले. दार उघडताच त्याने मेहनतीने व निगुतीने बनविलेल्या sweet-corn-chicken-soup & Egg-fried-rice च्या सुगंधाने स्वागत केले. आल्याआल्या मला फुले व chocolates भेट म्हणून दिली. मी वेडी झाले. अन मीठी मारुन एक चुंबन अंकीत करणार तोच कोणाची तरी चाहूल लागली. पहाते तो त्याचे आई-वडील बाहेर आले. त्याने ओळख करुन दिली. अन ती संध्याकाळ त्याच्या कुटुंबाबरोबर व्यतित झाली.
प्रत्येक V-Day त्याच्या आईवडीलांबरोबर व्यतित होऊ नये या दूरदर्शीपणातून त्याच्यावर काट मारली गेली.
मिथुन
आम्ही धमाल करायचो. विदुषक होता तो. थट्टेखोर अन एकदम दिलखुलास, विनोदी प्राणी. मला खूप आवडायचा. चतुरस्त्र आवडी होत्या, वाचन होते, एकदा बोलायला लागला की समोरच्याला गुंतवून ठेवण्याचे कसब होते.
पण V-Day ला त्याने मला भेट दिली, अन मी ती उघडली. रिकामे खोके होते त्यामुले माझा चेहरा पडला, गोंधळला अन त्या चेहर्याचा खिदळत या महाशयांनी फोटो काढला. बरं काढला ते काढला तो फेसबुकवर टाकून जोक्स मारले.
या incorrigible प्रँकमुळे काट मारली गेली.
सिंह
एका पॉश रेस्तराँमध्ये ऊंची मद्य व त्या रेस्तराँ च्या खास खास डिशचा आस्वाद घेत आमची भेट सुरु झाली. मला डिझायनर पर्फ्युम त्याने भेट दिला. पण ५ च मिनिटात त्याने स्वतःबद्दल जी माहीती सांगण्यास सुरुवात केली अन नंतर मला एवढेच आठवते की मला बोलायची संधीच मिळाली नाही.
या narcissism मुळे काट मारली गेली.
मेष
धडाडीचे, उमदे, attitude मुळे आहे त्या ऊंचीपेक्षा अधिक ऊंच वाटणारे अफलातून व्यक्तीमत्त्व होता तो. आम्ही एका रेस्तराँमध्ये खाणे मागविले. पण खाणे येण्यास ऊशीर होऊ लागला, मी म्हटलं इथून दुसरीकडे जाऊ. अन तसे आम्ही बाहेर पडलोही पण जायच्या आधी या महाशयांनी वेटरची, मॅनेजरची खरडपट्टी काढून, कल्ला केला. अगदी अटीतटीचे भांडण झाले.
या शीघ्रकोपी स्वभावामुळे नकार दिला गेला.
मीन
आम्ही एका आर्ट गॅलरीला भेट दिली. तिथे पेंटींग्स चे एक प्रदर्शन लागले होते, व पेंटर बाई जातीने हजर होत्या, लोकांशी गप्पा मारत होत्या. माझ्या डेटने, त्या बाईंशी बोलण्यातच पूर्ण वेळ घालविला, अगदी माझ्या समोर फ्लर्ट केल्याने साहजिकच हा V-Day देखील फसला :(
कन्या
तो अगदी अभ्यास करुन तयारीनिशी आला होता. त्याने उत्तम पण स्वस्त रेस्तराँ शोधून तिथे नेले होते. खरं तर सगळं आलबेल चालले होते, बिलही आम्ही तूतुमीमा केले होते. पण निघताना त्याने मला फॉर्वर्ड करण्याकरता त्याचा रेझ्युमे दिला व ही मखलाशी केली की आपल्या भविष्याकरताच तो चांगली नोकरी शोधतो आहे. "आपले भविष्य" My Foot! व्हॅलेन्टाइन डे लाही इतकी हिशेबी वागणारी व्यक्ती मला चालणार नव्हती. असो.
कुंभ
तो दुसरी की तीसरी Ph.D. करत होता. अन आमचा V-Day त्याच्या प्रबंधाच्या गप्पा मारण्यातच निघून गेला, कोमेजला. अति अभ्यासू स्वभावाच्या कुंभ डेटवरही काट मारण्यात आली.
वृश्चिक
मस्त डेट झाली. अगदी रोमँटीक नाही म्हणता येणार पण decent. शेवटी त्याने भेट दिली. उघडून बघते तो काय -lingerie होती अन पुढे त्याचा प्रश्न होता - My place or your place? तिथूनही पळ काढण्यात आला. ;)
अजून वृषभ, तूळ, धनु, मकर राहील्या आहेत. त्यामुले अजुनही आशेचा किरण आहे.
आशानाम मनुष्याणां काचिदाश्चर्य शृंखला
बद्धा यया प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगूवत्
हेच खरे.
१३ फेब्रुवारीच्या रात्रौ लिहिलेल्या काही वासर्या
वासरी : १
"हम्म. सेंट्रल बाँबेमधल्या - आय मीन मध्य मुंबईमधल्या - शाखाप्रमुखांची मीटिंग फार लांबली नाही बरं झालं. संधाकाळी डॅडच्या चॉपरवरून थोडा वाद झाला. डॅडला नि मला एकाचवेळी चॉपर पाह्यजे म्हणजे च्यायला त्रासच. ("चॉपर"वरून म्हणजे हेलिकॉप्टरवरून - छोटा राजनकाका किंवा गवळीकाका वापरायचा तो चॉपर नाय काय) डॅडला "करून दाखवलं !" सीरीजमधल्या आणखी एका किल्ल्यावरनं फोटो काढायचे होते आणि मला ... मला अर्थातच माझ्या आयटमकडे जायचं होतं. विक्रोळीला राहात असली तरी काय झालं. अरे, शेवटी उद्याचा दिवस काय आहे ! नुसताच लेक्ससमधून किंवा मर्सेडीजमधून गेलो तर आपली शान गेली ना. शिवाय बुकेसुद्धा जिनीवातून येणारे आज रात्रीच. ते आमचे उपसंपादक जाणार होते नाहीतरी विथड्रॉवलकरता तिथल्या बँकेत, तं मी म्हणालो येताना ट्युलिप्स आणा थोडे. च्यायला आमच्या आजोबांनी पण असले पोपट लोक जमा करून ठेवलेत. ट्युलिप म्हणजे कळेना काय त्याना ! शेवटी यश चोप्राच्या सिनेमाच्या डिव्हीडीज् पाठवल्या. श्या: संघटना बांधायची नि चालवायची म्हणजे असल्या डाऊनमार्केट लोकांशी डील करावं लागतं. तर मुद्दा आहे उद्याचा. स्पेशल दिवस हे काय वेगळं सांगायचं की काय ! आमच्या आजोबांनी आणि विशेष करून काकाने नको तिथे बूच मारून ठेवलं आणि आमची च्यायला कॉलेजमधली काही वर्षं फुकट गेली. आता मीच यात लक्ष घालून जरा कायतरी बरं करणार आहे. एनीवे. सकाळी युवाब्रँचची मीटिंग संपली की पहिलेछूट चॉपरवरून विक्रोळी वुइथ ट्युलिप्स. जैहिं. जैम."
... क्रमशः.
__/\__ सुंदर!!ट्युलिप म्हणजे
__/\__ सुंदर!!
ट्युलिप म्हणजे कळेना काय त्याना शेवटी यश चोप्राच्या सिनेमाच्या डिव्हीडीज् पाठवल्या. श्या: संघटना बांधायची नि चालवायची म्हणजे असल्या डाऊनमार्केट लोकांशी डील करावं लागतं.
=))
आमच्या आजोबांनी आणि विशेष करून काकाने नको तिथे बूच मारून ठेवलं आणि आमची च्यायला कॉलेजमधली काही वर्षं फुकट गेली. च्यायला आमच्या आजोबांनी पण असले पोपट लोक जमा करून ठेवलेत.
हाहाहा
परकायाप्रवेश छान जमला आहे :) अजुन वासर्या येऊ द्यात.
हम्म्म्म...
युवा सेनेच्या अध्यक्षाने इंग्रजीतून लिहिलेले पत्र वाचून अचंबायचे, की एका 'मराठी माणसा'कडून अस्खलित इंग्रजीतून लिहिले गेलेले पत्र पाहून आनंदायचे, या दुग्ध्यात तूर्तास आहे.
मला वाटते पहिल्या भागातील आयरनीपेक्षा दुसर्या भागातील अचीव्हमेंट ही ('मराठी माणसा'करिता) अधिक महत्त्वाची आहे.
(च्यायला, शिवसेनेशी संबंधित कोणाची वक्रोक्तिपूर्ण आणि वामहस्त का होईना, पण प्रशंसा आयुष्यात कधी करेन, असे वाटले नव्हते. देवा, आणखी कसलेकसले दिवस दाखवायचे राहिले आहेत रे बाबा!)
माझ्या फँटसीतील व्हॅलेन्टाईन डे
आत्तापर्यंत, व्हॅलेन्टाइन डे कसा आवडेल याचा विचारच कधी केला नव्हता.
पण आज विचार केला की कसा व्हॅलेन्टाइन्स डे मला आवडेल/आवडला असता. अन काही मुद्दे लक्षात आले ते म्हणजे माझा आदर्श व्हॅलेन्टाइन डे हा Double date च असेल. खूप गप्पा mutual bonding अन friendship असलेला असेल. म्हणजे लग्न होण्याआधी माझ्या प्रिय व्यक्ती (मित्रा)समवेत तो मी व्यतित करीन. So it's a fantasy.
आम्ही चौघे मे बी गोव्याला जाऊ. ते ही कार बुक करुन, पहाटे पहाटे गुलाबी थंडीत निघून. जुनी जुनी गाणी प्ले करत, कारमध्ये ऐकत. खूप गप्पा होतील, गप्पांमधून दुसर्या जोडप्याच्या नात्याची गहीराई, खोली,dynamics आम्हाला कळेल, आम्हाला काही शिकायला मिळेल & vice versa. कार चालविण्याच्या टर्न्स घेतल्या जातील त्यामुळे कोणी एकच व्यक्ती दमणार नाही तर कामाचे वाटप होईल.
मुख्य खूप गप्पा-गाणी-खेळीमेळीचे वातावरण असेल. वाटेत चहाकरता, जेवणाकरता थांबू, छानशा स्पॉटवर फोटो सेशनही करु. इतकी निसर्गरम्य वाट असेल पक्षी, कोल्हा, चितळ काही तरी दिसेल, फुलांचे थवे असतील, गर्द वनराईने सुशोभित रस्ता असेल.
गोव्याला हॉटेलमध्ये पोचल्यावर आम्ही समुद्रकिनारी भटकू, मुख्य म्हणजे आम्ही दोघी अगदी सुंदर, मस्त, स्वच्छंद दिसत असू अन आमचे respective मित्र आमच्यावर बेहद लट्टू असतील. अर्थात गोव्यात हिरवळीची प्रचंड competition असेल. अन जर त्यांची नजर जरा इकडेतिकडे wander होऊ लागली तरी मत्सरापेक्षा आम्ही दोघी ते थट्टेत घेऊ.
आम्ही जेवणात रुचकर माशांवर ताव मारु हवं तर ते दोघं माशांबरोबर अन्य काही ड्रिंक्सही प्रिफर करतील एनीवे : ) आम्ही दोघी व्हर्जिन पिनॅकोलाडा घेऊ.
चिक्कार मजा येईल. खूप फोटो काढू, आनंदाचे क्षण शेअर करु. हा व्हॅलेन्टाइन डे अगदी मेमोरेबल असेल. जर Renaissance हॉटेलमध्ये गेलो तर कॅसिनोमध्येही जुगार खेळू. अगदी खूप पैसे लावून नाही पण थोडे पैसे लावून नक्की थ्रिल उपभोगू.
फोटो साभार - नेट
वासरी ४: जिमच्या खिडकीतून
वासरी ४: जिमच्या कट्ट्यावरून पुलाकडे पहाताना
भेंडी व्ही-डेला स्टड दिसलं पाहिजे असं पोत्या म्हणत होता. आपल्याला पटलं - ती म्हणजे कपड्यांत भरलेलं हत्यार आहे. पोत्या तिला एल एम जी म्हणतो. कुठल्याही डियोपेक्षा अंगाचा गंध पोरींना पागल बनवतो म्हणे. पोत्या काहीतरी पुराणातलं सांगत होता, पण माझ्या डोक्यात प्लॅन चालू होता. साला पोत्या, बोर करतो, पण डोकं आहे साल्याला.
आज सकाळीच जिमला उगवलो. इन्स्ट्रक्टर पार उताणाच पडला मला पाहून. भराभ्भर बायसेप ट्रायसेप मारल्या. टीशर्ट टाईट आहे. खरं तर आज स्क्वॉट्सचा दिवस होता, पण म्हटलं आज मिळालाच चान्स तर पाय दुखताहेत असं नको!
टीशर्ट घालून पाहिला. थोडं पोट बाहेर आलंय. च्यायला! दुपारचं पोत्याबरोबर स्टेपिनला बसणं बंद केलं पाहिजे. शर्ट काढून तसाच उघडा जिमच्या कट्ट्यावर गेलो. बेस्ट जागा आहे. सिटप्स मारता मारता उठून बसलो, की पूल दिसतो, पलिकडे कॉलेज. जमिनीवर उताणा पडलो, की निळं आकाश. गुलाबी स्वप्न - एल एम जी चं.
एका सिटपमध्ये पुलावर गुबगुबीत बोचा दिसला. ए पोत्या! मी खच्चून हाक मारली. पोत्याने मागे वळून बघितलं. साला लोद्या - व्ही-डेला पण तसाच गबाळचोट.
पण पोत्या पुलावर म्हणजे कोणाला तरी भेटायला आला असणार. कोणे म्हणून सिटप्स थांबवून बघत बसलो.
तर..
पुलाच्या दुसर्या टोकाशी पिवळ्या ड्रेसमध्ये तीच. ती एल एम जी!
साली....
(सत्यकथेवर आधारित. नावं अर्थातच बदललेली आहेत, खर्या क्यारेक्टर्सनी हे वाचलं तर माझ्या जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.)
वासरी ५: रीबटेबल
वासरी ५: रीबटेबल प्रिझंप्शन
ती हाताच्या तळव्यात हनुवटी ठेवून एकटक पहात होती. काहीही कळलं नव्हतं बहुतेक तिला.
"हे बघ, सोपा आहे हा फॉस वर्सेस हारबॉटल रूल." मी परत प्रयत्न केला, "कंपनीच्या बाबतीत काही गैरकृत्य घडलं, तर कंपनीच कोर्टात जाऊ शकते. शेअरहोल्डर नाही."
तिची नजर तशीच स्थिर. माझ्याकडे बघणारे दोन टपोरे डोळे.
"याला काही एक्सेप्शन्स असतात. म्हणजे मायनॉरिटी शेअरहोल्डर..." मी परत प्रयत्न केला.
"तुमचा अटेम्ट कधी आहे सर?" तिने अचानक विचारलं.
आयसीएसाय काही मला पास करायला मागत नव्हतं. हा चौथा अटेम्ट जूनमध्ये. इकडे डिग्रीविना क्लास पण चालेनात. ही एकच विद्यार्थिनी. फ्रस्ट्रेशन सालं...
ती बाकावरून उठून जवळ आली.
"सर, पास झालात की लग्न कराल माझ्याशी?!"
बस्स! टचकन डोळ्यांत पाणी आलं माझ्या. ती "पास झालात की" म्हणाली; "पास झालात तर" नाही...
मी मिठीत घेतलं तिला. "नक्की. प्रॉमिस." घशात काहीतरी दाटून आलं होतं.
कितीतरी वेळ आम्ही तसेच उभे होतो. तिचा उष्ण उ:श्वास माझी छाती उबारून टाकत होता.
पण...पण...
"लग्नाचं वचन मी देऊ शकणार नाही..."
"का?" तिने वर पाहिलं. "दुसरी कुणी..."
"नाही, तसं काही नाहीये." मी दुखावलो. "सोशल काँट्रॅक्ट्स आर नॉट एन्फोर्सेबल. बॅल्फोर वर्सेस बॅल्फोर. नाईन्टीन नाईन्टीन. टू के बी फाईव सेवंटीवन." मी छाती काढून म्हणालो.
"एवढंच ना?" ती छातीवर डोकं घुसळत म्हणाली. "ते रिबटेबल प्रिझंप्शन असतं. तेवढी रिस्क घ्यायला मी तयार आहे!"
(परत सत्यकथा. ख.क्या.हे.वा. तर माझ्या जिवाला धो.उ.हो.श.)
माझा आवडता डे - वॅलेंटाईन डे.
१४ फेब्रुवारीला वॅलेंटाईन डे असतो. मला वॅलेंटाईन डे खूप आवडतो. पण मला १३ फेब्रुवारी अजून जास्त आवडतो कारण की दुसर्या दिवशी वॅलेंटाईन डे असतो.
१४ फेब्रुवारीला संत वॅलेंटाईन ह्यांनी त्यांच्या गल्फ्रेंडला प्हइल्यांदा प्रपोज केले होते. पण ती मानली नाही आणी संत वॅलेंटाईन ह्यांनी मग ही आयडिया शोधून काढली. की आधीच काय ते कळलं तर बरं होईल. असा त्यांनी हा सेफ डे शोधून काढला म्हणून त्यांच्या नावावर हा दिवस असतो. माझा संत वॅलेंटाईन ह्याना प्रणाम. ते खूपच महान होते. पण जगाने त्यांना नीट ओळखले नाही.
.
दर वॅलेंटाईन डे ला मी खूप गडबडीत असतो. पप्पा दगडफेक करायला गावच्या बाजारात गेले की मी दुसर्या बाजूला जातो. इथे दुकानं नाहीत त्यामुळे पप्पा इकडे येत नाहीत. इथे माळावर आम्ही सगळे वॅलेंटाईन डे साजरा करतो. शैलूला मी ह्यावेळी हा मजकूर थुंकी लावून लावून खोडला आहे.. पप्पांनी दुकानं वेगैरे फोडायच्या आधीच आम्ही कार्डं आणून ठेवतो. पण माझं कार्ड बबनपेक्षा डेंजर आहे. बबन त्याच्या गल्फ्रेंडला आयटम म्हणतो. हे चूक आहे. संत वॅलेंटाईन ह्यांनी अशासाठी दीवस बनवला नाही. बबनच्या तर इथे जोरदार खोडाखोडी झाल्यामुळे पान फाटले आहे.
.
पप्पांच्या साहेबांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या गावात तरी वॅलेंटाईन डेचा विरोध असाच चालू ठेवावा म्हणजे पप्पा एक दिवस तरी पूर्णवेळ बिझी रहातील.
मुंबईत पाहिजे तर वॅलेंटाईन डे ची बंदी काढावी पण इकडे काढू नये. असा हा वॅलेंटाईन डे. मला खूप आवडतो.
ता.क - जय हिंद जय महाराष्ट्र आपण नेहेमी म्हणतो पण जय संत वॅलेंटाईन म्हणत नाही. जय संत वॅलेंटाईन. तुम्ही खुप महान होता. पण जगाने तुम्हाला ओळखले नाही.
१४ फेब्रुवारीला वॅलेन्टाईन डे
१४ फेब्रुवारीला वॅलेन्टाईन डे असतो असं अक्श्या म्हणतो. शाळेत आम्हाला हे शिकवलेलं नाही. माझा शाळेत पहिला नंबर येतो पण अक्श्याला सगळं माहित असतं. शाळेत शिकवत नाहित ते पण सगळं अक्श्याला माहित असतं. तो शाळेत जातो असं सांगून बबनकडे टीव्ही बघत बसतो. तो खोटं बोलतो हे त्याच्या पप्पांना समजत नाही. अक्श्याचे पप्पा आणि माझे पप्पा दोस्त आहेत. १४ फेब्रुवारीला ते दोघे एकत्र कुठेतरी जातात. पप्पा १३ तारखेला दारू पिताना "खाडाखोड फोडतो एकेकाची, तरच नावाचा सुभान्या" असं काहीतरी बरळत असतात. मला तेव्हा पप्पांची खूप भीती वाटते. पण मी अक्श्याची आठवण काढते. मग मला निस्तं गारगार वाटतं.
मला व्हॅलेन्टाईन डेला अक्श्या गिफ्ट देतो. पण बाजाराकडं जाऊ नको म्हणतो. मला नवे कपडे घाल म्हणतो. पण मी नाई त्याचं ऐकणार. मी थोडा जुनाच, लाल ड्रेस घालती, तो मला थोडा घट्ट होतो. त्यात मी माल दिसती असं सुमी मला म्हणते. शेतावर जायला नवीन कपडे कशाला! आई नंतर ओरडती. अक्श्याला काही समजत नाही. टीव्हीवर दाखवत नाहीत असं काही. मला पप्पा आणि आई टीव्ही बघू देत नाहीत. टीव्हीमुळे मी बिघडेन असं त्यांना वाटतं. ते मला रोज अभ्यास करायला लावतात.
अक्श्याला काहीच समजत नाही. गेल्या वर्षी वॅलेन्टाईन डेला तो माझ्या आणि त्याच्या पप्पांच्या नावानं निस्ती वचवच करत होता. ते दोघं तिकडे बाजार फोडायला गेले म्हणून आमाला शेतावर जाऊन खाडाखोड गंमत करता आली. अक्श्यानं मला कार्डं दिलं. त्यात गुलाबी बदाम होता, आणि आय लौ यू लिहिलंवतं. मी त्याला आय लौ यू म्हणत नाही. सुमीच्या ताईनं आमाला तसं शिकवून ठेवलंय. 'आय लौ यू' म्हटलं की अक्श्या माझं ऐकनार नाही असं ताई म्हणती. लाल ड्रेस घातला की बोलायची गरज नाही असं ताई म्हणती. ताईला खूप अनुभव आहे. ती शाळेत असताना पप्पा बाजारात तोडफोड करायला जायचे नाहीत. त्यामुळे ती जुन्या पोस्टाच्या दिशेला जायची. "तुमचं बरं आहे, शेतात मस्त लपता येतं," असं ताई म्हणती.
मला वॅलेन्टाईन्स डे खूप आवडतो. महिन्यातून एकदा तरी वॅलेन्टाईन्स डे असला पाहिजे असं मला वाटतं. पप्पा दारू रोजच पितात. वॅलेन्टाईन्स डेच्या तोडफोडीत पप्पांनी कधीतरी गुत्ताच फोडला तर ...
-- शैलू
अक्श्या:>>ए कॅड्या.. गोवा
अक्श्या:
>>
ए कॅड्या.. गोवा आह्य का? दे ना म बेन्या.
ऐक.. आज मिल्या भेटलंतं. येडं झालंय ते. आज माज्या कॉलरला हात लावायलं होतं. मी पन म्हनलं आज बुकणाच पाडायचा या झळ पोरग्याचा.
विचारत होता शैलीचं. सरळ बोल्ला तेवढा वेळ सरळ बोल्लो. मग ह*रं कॉलरला हात घालायलं तेव्हा मग बोल्लो "मिल्या.. सरळ बोलायचं बग..एकदम सरळ पायजे"
मग लगेच ** फाटली आणि तिथेच नरम आलं. नुस्त्या आवाजान फाटली त्याची.
शैलीची माझी फ्रेंडशिप आह्य का लव्हशिप म्हणून विचारायलं ते मग..
म्हणलो.. **ड्या.. लवशिप करीन नायतर नुस्ती **** .. पुन्न्हा तोंड उघडून विचार म मी हितंच गाडतो ब तुला.
म निपचितच झालं एकदम.
तेवा झालं गप खरं पुडे डाळ नासणार हे कायतरी.. पच.. थूत..
एकच आह्य का गोवा? दे ना खिशात एक आनि.
व्हॅलेंटाइनचा गाळीव इतिहास - सुर्शापांडू
.
.....त्या काळी हे लोक एकमेकांना प्रेमपत्रे लिहीत - आता तुम्ही म्हणाल, की ही प्रेम म्हणजे काय भानगड आहे, पत्रे हे काय प्रकरण आहे. तर प्रेम म्हणजे अशी भावना की ज्यात नसलेले लोक तिला भानगड किंवा प्रकरण म्हणत. आणि त्यात असलेले काही लोक वर्षातल्या एका विशिष्ट दिवशी, लाल/गुलाबी रंगांतून जे व्यक्त करीत ते - या दोहोंत नसलेले लोक अल्पसंख्य असल्याने लवकरच नामशेष झाले असावेत असा कयास आहे - पत्र हे निव्वळ एक साधन होते. झाडे तोडून त्यापासून ते बनविले जाई - तसेच त्या विशिष्ट दिवसाआगोदर पांढऱ्या कबुतरांची मागणी अचानक वाढे. आता तुम्ही विचाराल की असे का? तर अभिजन आणि बहुजन यांसाठी अनेकदा केवळ दाण्यांवर जगत ती पत्रवाहक म्हणून काम करत. या बहुमोल कार्याची दखल घेत समस्तजन त्यांना यथावकाश पी-जन असे म्हणू लागले - या दिवसाचा कालांतराने निदर्शनास आलेला परिणाम म्हणजे या दिवसानंतर साधारण नऊ महिन्यांत नवी लोकं जन्माला येण्याचे प्रमाण अचानक वाढे१. त्यामुळे त्या दिवसाला 'बाळंतिण दिवस' असे नाव पडले - कालांतराने ही दिनप्रथा मरहट्ट प्रांतातून पाश्चिमात्य देशांत पसरून त्याचा बाळंतिण-वाळंतिन-वॅलंतिन-व्हॅलेंटाइन असा भाषिक अपभंश२ होत गेला - आजही उत्खननात सापडलेल्या बदामाच्या आकाराच्या फुग्याष्मांवर त्याच 'व्हॅलेंटाइन' नावाची मुद्रा आढळते, हे उदाहरणार्थ थोरच - आता तुम्ही म्हणाल की हे सर्व ठीक आहे पण ते लाल/गुलाबी काय आहे? आणि हे फुगे कोण ? तर त्यावर अजून संशोधन चालू आहे.….
१. ते कसे यावर प्रकाश टाकणारे काही अनुभवसिद्धसंशोधनपर आणि काहीसे सांकेतिक लेख सापडले आहेत - अनुक्रमे १, २.
२. त्यापूर्वी हजारो वर्षे अश्याच प्रकारे 'वाल्मिकी'चा 'वाल्या' झाल्याचे पुरावे आहेत. वानगीदाखल - 'इवान'चे 'वान्या' होणे.
- आद्यैतिहासकार सुर्शापांडू यांच्या दप्तरांतून साभार.
हॅहॅहॅ, क्यॅहिहीऽऽ म्हायती
हॅहॅहॅ, क्यॅहिहीऽऽ म्हायती नसताना नुस्त्या मतांच्या जोरावर वाट्टेल ते शेरे छातीठोकपणे मारण्याची 'पुरोगामी' प्रंप्रा आहे ऐसीची, तिला जागून दिला हो शेरा ठोकून, इतकं क्याय मनावर घेता? झाली आमची थोडी प्रसिद्धी, तुमच्या कशाला पोटात दुखायला हवांय, आं? ;)
असो, पण आता कुणीतरी जाब विचारणारं आहे म्हण्टल्यावर कायतरी तणतणत पळ काढायचीही प्रंप्रा आहे, तिला जागून पळ काढत्ये, कसें?
व्हॅलेंटाइन दिनाच्या गाळीव इतिहासाला आव्हान - प्रा.डॉ.षिर्षपांडू
.. माझे आद्य मित्र व प्राचीन गुरूबंधू (ज्यांना स्वतःला आद्य इतिहासकार म्हणवून घ्यायची सवय आहे असे) श्री सुर्शापांडू यांनी व्हॅलेंटाइन दिवस हा बाळंतीण दिवस या वरून आला आहे. ते इतिहासकार असल्याने त्यांना ज्या त्या ठायी इतिहासच दिसत असतो. आमचे सद्य गुरूवर्य श्री श्री श्री पांडू यांनी कथन केल्याप्रमाणे हा दिवस भारतीय परंपरेतील महत्त्वाचा दिवस आहे हे खरे पण त्याची सुरुवात फार प्राचीन नाही तर अर्वाचिन किंबहुना आधुनिक भारतातील आहे. भारताची संतपरंपरा मोठी आहे. काश्मिरात प्रभूने देह ठेवला हे माहिती आहेत. त्यामुळे त्यांची उपखंडावर अनन्यसाधारण कृपादृष्टी आहे. त्यांच्या जन्मानंतर साधारण १८८८ वर्षांनी महाराष्ट्रातून उत्तर प्रांतात गेलेल्या संत वासंती यांना झ.वि.वर्तकांनी भविष्यातून स्वप्नात येऊन दर्शन दिले व सांगितले की येता १४ फेब्रुवारी हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी एका धनिक व्यक्तीने प्रेमाचा उसासा टाकला तर त्यातून मिळणारे फळ अखिल भारताना पहिले अपत्य देईल. या गुप्त संदेशाची फोड करणे संत वासंती देवींना फारसे कठीण गेले नाही. त्यांनी तडक अलाहाबादेतील एक आद्य धनिक श्री रेडपर्ल नेर्हू यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पत्नी सौ.क्वीन स्वरुपा यांनाही या महान कार्यात सहभागी करून घेतले. आणि १४ फेब्रूवारी १८८९ रोजी या दांपत्याने टाकलेल्या प्रेमाच्या उसास्यामुळे बरोब्बर ९ महिन्यांनी १४ नोव्हेंबर १८८९ रोजी भारताला आपले पहिले 'राजबालक' मिळाले.
जसे रामाच्या आख्यानाला रामायण म्हटले जाते तसे या बालकदिनाच्या आख्यानाला बालकदिनायन म्हणले जाऊ लागले तर समाप्ती झाली त्या दिवसाला बालदिन!
ते ज्या दिवशी सुरू झाले त्या १४ फेब्रूवारीला बालदिनायन-व्हालदिनाईन-व्हॅलेंटाईन असा अपभ्रंश झाला (मात्र १४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणूनच कायम राहिला)
तर असे श्री रेडपर्ल नेर्हू व सौ क्वीन स्वरूपा यांच्या अतिशय महत्त्वाच्याअ प्रेमाच्या उसास्याची आठवण म्हणून हा व्हॅलेंटाइन दिवस भारतभरात साजरा केला जातो. या पंथातील लोकांचे वाढदिवसही सहसा नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीतच असतात.
-अर्वाचिन राजकीय इतिहासकार प्रा.डॉ.षिर्षपांडू
हर हर हर! किंवा खरं तर येशू
हर हर हर! किंवा खरं तर येशू येशू येशू! हे काय चालवलंय माझ्या नावाने या लोकांनी? हे आकाशातल्या बाप्पा, यांना क्षमा कर कां कीं यांना कळत नाही हे किती महाभयानक पाप करत आहेत ते! माझं आयुष्य रोममधल्या ख्रिश्चनांची आपापसात लग्नं लावण्यात गेलं. माझ्या कार्याला बिनख्रिश्चन राजवटीकडून विरोध होता. पण मी तमा बाळगली नाही. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मी लोकांना ख्रिश्चन करण्यात आणि त्यांची लग्नं लावण्यात पुढाकार घेतला जेणेकरून पवित्र पुस्तकाचा संदेश पुढच्या पिढीत जाईल. त्यासाठी मी एका धनिक न्यायाधीशाच्या आंधळ्या मुलीला चमत्काराने डोळे दिले. रोमच्या राजाला, क्लॉडियसला माझं हे वागणं आवडलं नाही म्हणून त्याने मला तुरुंगात घातलं. पण मी माझ्या कार्यापासून डळमळीत झालो नाही.
१४ फेब्रुवारी २६९ हा माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट व्हॅलेंटाइन्स डे होता. कारण त्या दिवशी राजाज्ञेने मला चौकात नेलं गेलं, आणि दगड, काठ्या-लाठ्यांनी मारण्यात आलं. तरीही मी मेलो नाही आणि त्या बिचाऱ्यांचे हातपायही दुखायला लागले म्हणून शेवटी माझं डोकं उडवून टाकलं. पण मी जरी भौतिक अर्थाने मेलो असलो तरी आठवण म्हणून जगभरात जीवंत आहे. माझी आठवण काढून तरुण युगुलं म्हणे प्रेम करतात! व्हॅलेंटाइन्स डे म्हणजे म्हणे प्रेमाचा दिवस! आता मला वाटतं की माझा जन्मच झाला नसता तर बरं झालं असतं. माझं नाव हे अशा गलिच्छ दिवसाला देण्याची बुद्धी तरी कोणाला झाली नसती. प्रत्येक १४ फेब्रुवारीला माझ्या नावाने बिनलग्नाचे तरुण तरुणी गळ्यात गळे घालतात तेव्हा मला क्लॉडियसचे मारेकरी सतत लाठ्या-काठ्यांनी हाणताहेत असं वाटतं.
पण अजूनही माझी आशा संपलेली नाही. भारतासारख्या पवित्र देशात अजूनही काही पवित्र विचार करणारे गृहस्थ शिल्लक आहेत. १४ फेब्रुवारीला जे कोण रस्त्यात गळ्यात गळे घालून दिसतील त्यांची लग्नं लावून देण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. इतकंच काय तर ज्यांनी निव्वळ प्रेमाचा उच्चार केला आहे अशांनाही ताबडतोब लग्नबंधनात बंदिस्त करण्याची त्यांचा प्रयत्न असणार आहे. हे ऐकून माझ्या थडग्यात वळणाऱ्या सापळ्याला क्षणभर तरी विश्रांती मिळेल! हे येशू, तू त्यांचे हात बळकट कर! आणि अशा लग्न झालेल्या जोडप्यांना किमान पाच ते दहा मुलं जन्माला घालण्याची सुबुद्धी दे!
भारतासारख्या पवित्र देशात
भारतासारख्या पवित्र देशात अजूनही काही पवित्र विचार करणारे गृहस्थ शिल्लक आहेत. १४ फेब्रुवारीला जे कोण रस्त्यात गळ्यात गळे घालून दिसतील त्यांची लग्नं लावून देण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. इतकंच काय तर ज्यांनी निव्वळ प्रेमाचा उच्चार केला आहे अशांनाही ताबडतोब लग्नबंधनात बंदिस्त करण्याची त्यांचा प्रयत्न असणार आहे.
निव्वळ थोर.
माझी वी
आजची चौदा तारीख लक्षांत रहावी, म्हणून सकाळी गजर लावला. सकाळी अर्धा तास अंथरुणातच व्यायाम केल्यावर जमिनीवर पाय टेकता आले. रात्री धुवून ठेवलेली कवळी आणखी पांढरी दिसावी म्हणून डिटर्जंटने घासली. सकाळचा चहा पिऊनही ढिम्म काही हलत नव्हतं. म्हणून येरझारा घालायला सुरवात केली. शेवटी पेपराने आपले काम चोख बजावले. पेपर वाचताक्षणी, आंघोळीसकट टु इन वन काम झाले. आज माझ्या 'वी'ला सकाळीच बोलावले होते मी, 'रामकृष्ण' मधे. आजकाल संध्याकाळी काय गर्दी असते. त्यांत आज तर नुसता तरुणाईचा सळसळाट! आता आणखी चांगले हॉटेल कसे परवडणार या पेन्शनीत. जेवायच्या ऐवजी ब्रेकफास्टलाच बोलावण्याची नामी कल्पना माझीच. साडेआठला ये, म्हणून सांगितले होते. पण तरी आवरेपर्यंत पावणे नऊ झालेच. वाटेत एक निशिगंधाचा बुकलेट(शिंगल बुके हो) घेतला. वरच्या मजल्यावर पोचेपर्यंत धाप लागली. गुडघ्यातही चमका मारत होत्या.
समोरच्या टेबलावर माझी 'वी' आरशांत बघून लिपस्टीक लावत होती.मला बघताच घाईघाईने पर्समधे टाकली, पण त्यांत तिचा चष्मा खाली पडला. तो घ्यायला मी आणि वेटर एकदमच वाकलो. कपाळमोक्ष झाला. शिवाय काटकोनातून सरळ व्हायला प्रचंड वेदना झाल्या. पण 'वी' च्या गोड हंसण्यापुढे ते किरकोळ होते. 'वी' ला तिचा आवडता मसाला डोसा आणि मला चावता/गिळता येण्यासारखी इडली मागवली. तिला निशिगंधाचा बुकलेट खूपच आवडला. ती रजनीगंधातलं गाणं गुणगुणूं लागली. एकदम म्हणाली, तो गेल्यापासून आज प्रथमच बाहेर पडते आहे. मी उगाचच आवंढा गिळला. मग तीच म्हणाली, तू का उगाच सुतकी चेहेरा करतोयस ? तो सुटला आणि मीही सुटले! गाडी भलत्या वळणावर जाऊ नये म्हणून मी कॉफी मागवली. खाणं संपलं, कॉफी संपली. तरी माझा काही विषयाला हात घालायला धीर होईना. शेवटी तीच म्हणाली, अरे, पण आज एवढे आग्रहाने का बोलावलेस ते सांग ना. तिच्या चेहेर्यावर एक मिष्किल हंसु होते. काही नाही गं, सहज बोलावलं, मी बोलून गेलो.
मग तिनेच विषयाला हात घातला. असा कसा रे तू प्र ? आमच्या घरी यायचास तेंव्हापासून तुझे डोळे बोलत होते. माझ्याविषयी एवढं आकर्षण होतं तर एकदा तरी विचारायचं होतं! नंतर आयुष्यभर एवढ्या वेळा भेटलो. प्रत्येक वेळेस मला तेच प्रेम दिसायचं तुझ्या डोळयांत, पण एकदाही बोलून दाखवलं नाहीस. माझं लग्न ठरलं तेंव्हा वाटलं होतं, आता तरी धावत येशील. पण नाही आलास. तो गेला तेंव्हा माझ्यापेक्षा तूच जास्त रडलास! आधी एकदा जरी विचारलं असतंस, तरी मी बाबांना भाग पाडलं असत . आज व्हॅलेंटाईन डे आहे, मी अजूनही तुझ्या आयुष्यांत येईन, अशी तुला आशा आहे. म्हणून तू आज बोलावलंस, खरं ना? तिने माझे हात हातात घेऊन विचारलं. माझे डोळे भरुन आले. तिच्याशिवाय लग्न न करता एकट्याने वाट बघितली, त्याचे फळ मिळणार असे वाटून गेले. पण तिच्या पुढच्या वाक्यांनी मी स्तब्ध झालो.
मलाही तुझाबद्दल खूप वाटतं रे! पण ही नातवंडांची जबाबदारी. त्यातून माझ्या मुलाला आणि सुनेला मुळीच आवडणार नाही. रागावू नकोस, आपण वरचेवर भेटत जाऊ, पण माझा नाईलाज आहे रे, तेवढा समजून घे. आणखी बरंच काही बोलली. पण मन बधिर झाले होते. मी मुकाट्याने बिल दिले आणि तिच्याच आधाराने जिना उतरलो.तिला रिक्शांत बसवून दिले आणि कोमेजलेल्या निशिगंधाचा वास घेत एकटाच घराकडे चालू लागलो.
उत्तम प्रतिसाद
स्पर्धेला मिळालेला भरगोस प्रतिसाद आशादायक आहे आणि निकाल लावणे अतिशय कठीण होणार आहे असे दिसते (असं म्हणण्याची परंपरा आहेच तशीही). आतापर्यंत आलेल्या एंट्र्यात काही अतिशय लक्षवेधी प्रतिसाद आहेत आणि अनेक मात्तब्बरानी आपली हजेरी लावली आहे असं असूनही कथा/ललितलेखन हा ज्यांचा हक्काचा प्रांत आहे किंवा विषय ज्यांच्या हृदयाच्या जवळचा आहे अशा काही मात्तबर सदस्यांनी आपल्या एंट्रया न पाठविल्याने थोडी नाराजी आहे पण अजूनही वेळ आहे त्यामुळे त्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाहीर आवाहन करत आहे. बघताय काय, सामील व्हा.
सत्ता बर्याच पतित गोष्टींना
सत्ता बर्याच पतित गोष्टींना पावन करुन घेते. स्वदेशी, स्वधर्म वैगेरे बाणा असणारे तर टॅबू वाटणार्या गोष्टींना अगदी लीलया स्व-साज चढवतात. मग मार्केटचा आवडता वॅलेंटाईन डे ला आपल्या संस्कृतीचा साज चढवणे आलेच. म्हणूनच ’ऐसी’करांकडे प्राणप्रतिष्ठा केलेल्या व्हॅलेंटाईनसाठी ही आरती.
चाल:- आरती साईबाबा..किंवा आरती ज्ञानराजा
व्हॅलेंण्टाइनची आरती.
आरती वॅलेंटाईना
विदेशी प्रेमदेवा.
अवतीर्ण झालासी
बळ आम्हा देण्या.
आरती..
फेब्रुवारी चतुर्दशी
नित्य नियमाने येशी
उडवीत प्रेमधूळ.
उसासे नेहमी़चे
निवती तुझ्या दर्शने
येई धीटपण.
तुझ्याही कारणे
आरती...
तुझी करती प्रतिक्षा
आतुर प्रेमजोड्या
आठही दिवस.
सगुण साकार प्रेम
भरुनी भवताल.
टेडी ,चॉकलेट, रोज
वचन आणि किस,
प्र-वीण दिवाळी.
करीती मिठीने साजरी
लावूनी प्रेम-हीना.
आरती..
संस्कृती रक्षीण्या
त्यांना देउ आम्ही शिक्षा
लावूनी लग्न त्यांचे.
लोळवू धर्मबुडव्या
राखू परंपरा
देउनीया चोप
खुळ्या प्रेमीजना.
होउ भक्तीत लीन
पुज्य गतकाळाच्या.
आरती...
हिरा है सदा के लिये !
चमेली आणि चंदू लौकिकार्थाने प्रेमाने संसार वगैरे करत होते . चंदू अत्यंत व्यवहारी असल्याने वाढदिवस असो किंवा लग्नाची अॅनिव्हर्सरी कोणत्याच कारणाने चंद्याने चमेलीला भेटवस्तू देऊन लाडावून ठेवले नव्हते.तिला हॉटेलिंग ,सिनेमा आणि शॉपिंग आवडत असूनही तो बरेचदा बोलण्यात गुंगवून तो सफाईने तिचे मनोरथ हाणून पाडत असे. तिला अफाट बोलणे आणि अचाट हसणे या वेडामुळे संमोहित झाल्यागत इतर आवडीच्या गोष्टींचे तात्पुरते विस्मरण होत असे.गोग्गोड बोलून खळ्या पाडून हसले कि आपली चमेली, मनोरथ हाणून पाडले असले तरी वादावादी न करता विसरून जाते हे चंदुला माहीत होते. तिची मैत्रीण तिला अनेकदा सावध करायची, अबे पागल , तू हसते आणि त्याचे फावते. जरा गंभीरपणे आपल्याला हवे ते कसे काढून घेता येते वगैरे शिकवायचा ती क्षीण प्रयत्न करायची.
एकदा चमेली अन चंदू मुलाला भेटायला त्याच्या गावी गेले होते.जवळजवळ २४ तासांचा प्रवास करून ते पोहोचले आणि असह्य पायदुखी मुळे १५ मिनिटे चालत जाण्याइतके अंतर असून चमेली म्हणे आपण ऑटो करून जाउया .म्हणून चौकशी केली तर ऑटोवाले १२० रु म्हणाले . मग कंजूस माणूस कसला जातोय तो म्हणे चल पायीच जाऊ नाहीतरी पाय दुखताहेतच आणि काय वेगळ होणार नाहीये.उद्या ठीक होतील कदाचित या वयात दुखणीखुपणी चालूच रहाणार आहेत म्हणे.नुसती बसून आणि झोपून तर होतीस म्हणे मग इतर लोकं अन तो स्वतः काय ट्रेन मध्ये नृत्य अन व्यायाम करीत आले होते कि काय तिला कळेना.
त्यांचे मूल पण सवाई कंजूस निपजल्याने त्यालाही १२० रुपये म्हणजे जणू कोट्यावधी रुपये वाटू लागले मग चमेली नाईलाजाने पाय ओढत त्या गलिच्छ रस्त्यावरून चालू लागली.इतके पैसे कमावून जर पाय दुखत असतील तेंव्हाही ऑटोने जाऊ शकत नसू तर त्या पैशांचा
उपयोग काय आहे हे तिला कळेनासे झाले.तिथे त्यांचे रोजच बस अन ऑटो करण्यावरून खटके उडू लागले.शेवटी कधीकधी ती ऑटो ठरवून बसू लागली अन मग तो निमूटपणे बसत असे फॉर ए चेंज .
एकदा ती कंटाळून म्हणे जा फूट, निघ इथून, माझे मी बघून घेईन, तर तो जगातला सगळा निरागसपणा एकवटून म्हणे, तुझे सगळे तु एकटीच बघशील का ग ? मला पण नीट बघू दे न !!!ओह गॉड ती रस्त्यावरच इतकी हसली कि म्याड झाली . मग आल्यावर मैत्रिणीला गम्मत सांगितली तर ती म्हणे ,तु म्याड आहेस, हसून सगळे त्याच्या पथ्यावर पडते न.चमेली म्हणाली,जाउदे ग हसण्यापुढे सर्व काही फिजूल आहे .
यावर्षी अचानक तिला साक्षात्कार झाला च्यायला ,नवरे प्रेमाने बायकोला व्हॅलेंटाईन या उधारीच्या सणाला सुद्धा हिऱ्यांचे दागिने भेट म्हणून देतात. आपलं मख्खीचूस नवरा नामे प्रकरण भेटवस्तूसाठी आजन्म एक खडकू खर्च करेल तर शप्पथ ! तिला भयंकर संताप आला.तिने चंदुला फर्मान सोडले ,ते काही नाही मला हिऱ्यांचे दागिने हवेतच ! एक अंगठी आणि कर्णफुले ! चंदू गोड हसून हो म्हणाला. रात्री आपोआप उशीराच घरी आला.तो पर्यंत दुकाने बंद झाली होतीच .चमेलीने विचारले." काय रे , माझ्या हिऱ्यांचे दागिने आणलेस का ? " तर तो मोहक हसून गाणे गाऊ लागला ...
तू हिरे ... तू हिरे ..... तुझ्याविना मी कसे जगू ....
निकालाची तारीख
काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे निकालाची तारीख दिनांक १८ फेब्रुवारी रात्री १० (भा.प्र.वे.) पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. क्षमस्व!! दरम्यानच्या काळात कोणाला अजून प्रवेशिका पाठवायच्या असल्यास त्याची मुदतही उद्या संध्याकाळ ६ (भा.प्र.वे.) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
निकाल
स्वगतः च्यामारी, क्या सोचके परीक्षक होनेको मंजूरी दे दी! नंबर तीन आणि एकापेक्षा एक भारी एन्ट्रीज, कोणलापण नंबर दिला की बाकीचे रडारड करणार. आयडिया: सगळे नंबर विभागून देऊया!
प्रकटः स्पर्धेला मिळालेला भरगोस आणि दर्जेदार प्रतिसाद पहाता निकाल तयार करण्यासाठी बराच विचार करावा लागला. अनेक प्रतिसादकांच्यात चुरस होती व कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून अनेक नंबर विभागून द्यायचे ठरविण्यात आले.
उसंत 'सखूबाईंची चंदूचमेली 'च'ची प्रेमकथा' नेहमीप्रमाणे आवडलीच पण त्यात आवश्यक (सखूबाईंच्या शैलीतला) खवचटपणा जरा कमी पडला म्हणून त्यांना नंबर दिला नाही. विक्षिप्तबाई आणि राजेशराव यांना मुद्दामून नंबर दिला नाही कारण संपादकांना मर्जीत राखण्यासाठी नंबर दिल्याचा आरोप होईल पण माझ्या हातात असते तर पयला लंबर त्यांनाच विभागून दिला असता याची त्यांनी नोंद घ्यावी.
तर निकाल खालीलप्रमाणे
क्रमांक तीन (विभागून)- हर्मिट क्रॅब यांची राशीभविष्यवाली असफल प्रेमकथा (यांचा "आम्हाला फ्लेक्स मिरवायचा आहे" हा प्रांजळपणा फार आवडला आहे, प्रांजळपणा मराठी संस्थळांवर औषधालाही सापडत नसल्याने हे फारच विशेष!) आणि) अस्वलरावांचा निबंध (किती ति निरागसपणा)
क्रमांक दोन (विभागून)- मुक्तसुनित यांची वासरी एक (हे पण संपादक असल्याची अफवा कानावर आली आहे पण ते जसे धूमकेतूप्रमाणे ऐसीवर येतात ते पाहून ती अफवाच असल्याची खात्री असल्याने त्यांना नंबर दिला आहे), अमुकरावांचा निबंध (काय अभ्यास, काय ते संदर्भसंपृक्त लिखाण, खरंतर पहिलाच नंबर यायचा पण थोडा संक्षिप्त होता) आणि अंतराआनंद यांची आरती (वाचून धन्य झालो इतकेच म्हणेन!)
प्रथम क्रमांक (अर्थातच विभागून)- तिरशिंगराव यांची उतारवयीन असफल प्रेमकथा (ट्रॅजिडी आणि कॉमेडीचं अफलातून मिश्रण) आणि आदूबाळ यांची वासरी पाच (पर्सनल फेवरिट, त्यांच्या वासर्यांपैकी नक्की कोणत्या वासरीला पहिला नंबर द्यावा हाच एक संभ्रम होता, उच्च दर्जाचा विनोद.)
सर्व प्रतिसादकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन!
रिझल्ट उत्तम आहे पण...............
रिझल्ट उत्तम आहे, सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. :D> यात रुचीवर अन्याय झाला आहे, तिला व्हेलेंटाईनविभूषण :love: असा विशेष पुरस्कार देण्यात यावा अशी नम्र विनंती आहे. विभागाकार चुकला आहे का? पहिला नंबर दोनने विभागल्यावर दुसऱ्या नंबराला चारने विभागूनवगैरे द्यायला हवे होते नै का ? ;)
आहा ! धन्यवाद. परिक्षक आणि
आहा ! धन्यवाद. :)
परिक्षक आणि प्रतिसादकांचे आभार.
रुचीवर अन्याय झाला आहे, तिला व्हेलेंटाईनविभूषण Love असा विशेष पुरस्कार देण्यात यावा अशी नम्र विनंती आहे
अनुमोदन. भन्नाट कहाणी आहे.
अजो, आरती एवढी आवडल्याबद्द्ल खास धन्यवाद. पण गद्य, पद्य या लिखाणाच्या प्रत्येक प्रकाराची स्वतःची वैशिष्ठ्ये असतात त्यामुळे त्यांच्यात खरंतर स्पर्धा नसतेच. त्यामुळे निकाल मान्यच.
(No subject)