अण्णा, काय केलंत हे?
लेखकः सुधीर काळे, जकार्ता
३ ऑगस्ट २०१२ रोजी उपोषणाची सांगता करण्याचा अण्णांचा निर्णय मनाला विषण्णतेचा चटका लावून गेला. असे वाटले कीं अतीशय पूजनीय, साक्षात् त्यागमूर्ती असलेल्या ज्या व्यक्तीला सार्या देशाने एका उत्तुंग आसनावर (pedestal) बसविले होते त्या व्यक्तीने सार्या राष्ट्राचा आज जणू अवसानघातच केला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील उपोषणानंतर तर त्यांनी मला "संभवामि युगे युगे" असे अर्जुनाला सांगणार्या भगवान श्रीकृष्णाची आठवण करून दिली होती. पण मुंबईच्या त्यांच्या उपोषणाकडे जनतेने केलेल्या दुर्लक्षामुळे मनात शंकेची पाल चुकचुकतच होती. ज्या दिवशी "टीम अण्णा"ने उपोषण सुरू केले त्याच दिवशी ’सकाळ’ने दिलेल्या त्याबद्दलच्या बातमीखाली लिहिलेल्या माझ्या प्रतिसादात मी लिहिले होते कीं उपोषण सुरू करण्याच्या आधी जरूर तो सारासार विचार "टीम अण्णा"ने केलाच असणार आणि अशा विचारांती उपोषण सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे तर ते उपोषण त्यामागील हेतू साध्य होईपर्यंत त्यांनी ’आमरण’ चालू ठेवावे अन्यथा आताच थांबवावे. पण झाले विपरीतच! केवळ १० दिवस उपोषण करून आपला कुठलाही हेतू साध्य झालेला नसताना अचानकपणे उपोषणाची सांगता करणे म्हणजे केवळ या आंदोलनाच्याच नव्हे तर अशा सार्या भावी आंदोलनांच्या परिणामकारकतेवर अक्षरश: बोळा फिरविण्यासारखे आहे.
या वेळी "टीम अण्णा"चे सगळेच आडाखे चुकलेले दिसतात.
"टीम अण्णा"पैकी चौघांनी अण्णांच्या चार दिवस आधीपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला ही पहिली मोठी चूक. कारण अण्णा उपोषणाला बसेपर्यंत या बिचार्या अनुयायांच्या उपोषणाला जनमानसाने कांहींही किंमतच दिली नाहीं. त्यामुळे त्यांचे चार दिवसांचे उपोषण वायाच गेले. अण्णा उपोषणाला बसल्यानंतर जनता पुन्हा त्यांच्या आंदोलनात भाग घेऊ लागली होती. ३ ऑगस्ट रोजी त्यांची तब्येतही ठणठाणीत होती. त्यांचे उपोषण पाचव्या दिवसात प्रवेश करते होईपर्यंत त्या आधी चार दिवस उपोषण सुरू केलेल्यांची तब्येत ढासळू लागली होती. त्यामुळे या आंदोलनाचा दबाव सरकारवर पडण्याऐवजी तो दबाव तब्येत ढासळू लागलेल्या "टीम अण्णा"च्या चार कार्यकर्त्यांवर पडला व त्यांची पंचाईत झाली. अरविंद केजरीवाल हे एक अतीशय मनस्वी आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत असे मला मनापासून वाटते. ते डावपेच आखण्यात आणि वातावरणनिर्मितीतही कल्पक आणि कुशल आहेत. पण अद्याप त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि नेतृत्वात अण्णांच्या व्यक्तिमत्वाची आणि नेतृत्वाची उंची नाहीं, अण्णांना मिळालेली महनीयता अद्याप त्यांना प्राप्त झालेली नाहीं. आज जे महनीयतेचे तेजस्वी वलय फक्त अण्णांच्या डोक्यामागे आहे ते या कार्यकर्त्यांच्या डोक्यामागे नाहीं! सध्या त्यांची तपश्चर्याही तेवढी नाहीं. त्यामुळे त्यांच्या प्राणांना अण्णांच्या प्राणाइतकी किंमत सरकारने (व जनतेनेही) दिली नाहीं. त्यामुळे आजच्या घडीला तरी एक स्वतंत्र आंदोलक म्हणून नव्हे तर केवळ अण्णांचे सहाय्यक म्हणूनच त्यांना जनता ओळखते आणि म्हणूनच चार दिवस आधीपासून उपोषण सुरू करण्याचा त्यांचा डावपेच पार चुकीचा ठरला व हे आंदोलन सुरू होता-होताच पराभवाच्या भोवर्यात सापडून गटांगळ्या खाऊ लागले. या चुकीच्या डावपेचांमुळे हे आंदोलन विजयी होण्याची आशा ते सुरू होण्याआधीच मावळली होती.
दुसरी चूक झाली उपोषण सोडण्याच्या कारणांची! कोण कुठली २३ ’आदरणीय’ माणसे एक आवाहन करतात काय आणि "टीम अण्णा" आपले उपोषण थांबवते काय! काय किंमत आहे या २३ जणांना अशा आंदोलनाबाबत निर्णय घेण्याची? अणांना उपोषण सोडायची गळ घालण्याऐवजी या सर्व आदरणीय व्यक्तींनी अण्णांच्या मांडीला मांडी लावून उपोषणाला बसायला हवे होते. ते राहिले बाजूला. ही मंडळी अण्णांना आवाहन काय करतात आणि कालपर्यंत "ही आत्महत्या नसून ते आमचे भारतमातेच्या चरणी केलेले बलिदान आहे, आमच्या तोंडात अन्न कोंबले तर आम्ही ते थुंकून देऊ व घशाखाली उतरू देणार नाहीं" अशा घोषणा करणारी "टीम अण्णा" उपोषण आवरते काय घेते, सारेच विपरीत व अनाकलनीय. कसेही करून उपोषणाच्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी शोधलेली ती जणू एक तरकीबच होती असे कुणाला वाटले तर त्यात काय आश्चर्य?
आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली. ऑगस्ट २०११च्या उपोषणाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रसिद्धीमुळे, त्याला जनमानसातून मिळालेल्या बुलंद समर्थनामुळे, पाठिंब्यामुळे आणि शेवटी त्या उपोषणाच्या यशस्वी सांगतेमुळे सार्या "टीम अण्णा"ला एक उन्मादच चढला असावा व ’ग’ची बाधाही झाली असावी. त्या उन्मादाच्या भरात "टीम अण्णा"ने अनेक चुका करून स्वत:च आपले अवमूल्यन करून घेतले. "टीम अण्णा"ची अनेक निवेदने खूपदा दर्पोक्ती वाटावी इतकी उद्धट होती. पाठोपाठ "टीम अण्णा"त फाटाफूटही होऊ लागली. कारण उच्चपदस्थ व आदरणीय माणसे जमा करणे सोपे असले तरी त्यांच्यात एकमत घडवून आणणे व एकी कायम ठेवणे महा कर्मकठीण. प्रत्येकाला आपल्यालाच काय ते समजते, बाकीच्यांनी त्यांच्या आदेशाचे निमूटपणे पालन करावे असेच अशा लोकांपैकी बर्याच जणाना वाटते. आपापल्या क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशामुळे त्यांच्याभोवती ’होयबां’चा गराडाही असतो. त्यामुळे अशा अनेक व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्यात एकमत होणे अशक्यच. अण्णांसारखा दृढनिश्चयी नेताच त्यांना एकत्र ठेवू शकतो. पण इथे असे झाले नाहीं असेच दिसते.
त्यात किरण बेदीने वरच्या वर्गाच्या तिकिटाचे पैसे घेऊन खालच्या वर्गाने प्रवास करून पैसे वाचविल्याच्या बातम्याही बाहेर आल्या. भले ते पैसे त्यांनी सत्कार्यासाठी वापरले असतीलही. पण या घटनेमुळे त्यांचे चारित्र्यहनन तर नक्कीच झाले. अशा कांहीं घटनांमुळे वैतागून असेल, पण अण्णांनी अचानकपणे दोन-एक आठवडे "मौनव्रत" आरंभले. हेतू कितीही उदात्त असला तरी त्याचा परिणाम अण्णांच्या डोक्याभोवतीच्या उदात्ततेच्या वलयाचे तेज कमी होण्यातच झाला. परिणामत: मुंबईला आरंभलेल्या त्यांच्या उपोषणाला जनमानसातून अगदीच किरकोळ प्रतिसाद मिळाला.
माझ्या मनात आले कीं महात्मा गांधींनी जेंव्हां-जेंव्हां उपोषण केले तेंव्हा-तेंव्हां ते एकट्याने केले. त्यांना "टीम-गांधी"ची तशी गरज भासली नाहीं. "एकला चलो रे" हाच त्यांचा खाक्या होता. त्यांनी अनुयायी मिळविण्याचा प्रयत्नही केला नसावा. कदाचित् गांधीजींना अनुयायांची गरजच भासली नसेल. त्यांचे हेतूच इतके उदात्त असायचे आणि त्यांचा निर्धारही इतका दृढ असायचा कीं त्यांच्या चळवळी नेहमी "लोग मिलते गये, कारवाँ बढता गया"च्या थाटात वाढतच जायच्या. त्यामुळे त्यांना अनुयायांची कधी ददात पडल्याचे कुठे वाचनात आलेले नाहीं. महात्माजींच्या पावलावर पाऊल टाकणार्या अण्णांच्या लक्षात ही गोष्ट आली होती कीं नाहीं हे मला माहीत नाहीं, पण सर्व घटनांकडे पहाता नसावी असेच वाटते. महात्माजींच्या अनुयायात पं. नेहरू, वल्लभभाई यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे, वजनदार नेते असूनही ते सारे महात्माजींच्या शब्दाबाहेर नसत. महात्माजींच्या निर्णयांचे पूर्णपणे आज्ञापालन केल्यामुळे व त्यांच्या एकछत्री कारभारामुळे महात्माजींना यशही मिळत गेले. त्यामुळे त्यांच्या शब्दाला एक तर्हेचा वजनही प्राप्त होत गेले. आज काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या आणि शिवसेनेत बाळासाहेबांच्या शब्दाला ते स्थान आहे. अण्णांच्या शब्दांनाही तो मान मिळाला असता पण कां कुणास ठाऊक, तो मिळाला नाहीं किंवा त्यांनी तो वापरला नाहीं हेच खरे!
आज भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी बाहेरच्या शत्रूची गरज नाहीं. बजबजलेल्या भ्र्ष्टाचारामुळे तो आतूनच पोखरला जात आहे. अशा वेळेला अण्णांनी हाती घेतलेले व्रत यशस्वी होणे फारच जरूरीचे आहे. नाहीं तर आणखी ४०-५० वर्षात भारत परत एकदा गुलामगिरीता तरी जाईल किंवा त्याचे तुकडे पडतील व ते एकमेकांच्या उरावर बसतील. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला यशाशिवाय दुसरा पर्यायच असू शकत नाहीं. इतके उदात्त व अतीशय निकडीचे ध्येय पुढे ठेवून सुरू केलेले आंदोलन असे कुणाच्याही अवसानघातामुळे असे मागे घेणे देशाला परवडणारेच नाहीं. या आंदोलनाला यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. अण्णांच्यावर आहे. त्यांच्या "टीम अण्णा"तील सभासदांवर आहे. सर्व नेत्यांनी एकत्र बसून डावपेच आखून सध्याची भ्रष्ट व्यवस्था मोडून काढून तिथे स्वच्छ व्यवस्था स्थापणे व सध्याच्या भ्रष्ट सरकारला "चले-जाव"चा महात्माजींचाच आधीचा आदेश देऊन त्यांना पिटाळून लावणे ही दोन उद्दिष्टे समोर ठेवून त्यात यश मिळविले पाहिजे. अन्यथा या देशाचे कांहीं खरे नाहीं.
अण्णांना एक कळकळीची विनंती. कुणीही कांहींही म्हणोत पण आपल्याला जे योग्य, उदात्त वाटते त्याच्यावर विश्वास ठेवून आंदोलन पुन्हा उभे करा. "हतो वा प्राप्यसी स्वर्गं, जित्वा वा भोक्ष्यसे महिं, तस्मादुत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चय:॥" असे सांगून अर्जुनाला युद्धाला तयार करणार्या भगवान श्रीकृष्णाचेच शब्द आठवून आणि उद्दिष्ट सफल होईपर्यंत पाऊल मागे घेणार नाहीं हा दृढनिश्चयाने आंदोलन पुन्हा उभे करा. अण्णा, अंतिम विजय तुमचाच आहे कारण सत्य तुमच्याच बाजूला आहे! आणि शेवटी "सत्यमेव जयते", सत्याचाच विजय होतो!!
खरे आहे. या लेखात लिहिलेल्या
खरे आहे. या लेखात लिहिलेल्या बर्याच गोष्टी गेल्या वर्षीही बोलल्या जात होत्या. त्यावेळी त्या बोलणारे सरकारचे हस्तक आणि भ्रष्टाचार्यांचे पाठीराखे आहेत असे म्हटले जात होते.
माझ्या वैयक्तिक मते डिसेंबरमध्ये लोकसभेत जे काय लोकपाल/जोकपाल विधेयक मंजूर झाले तेव्हा अणांनी धोरणीपणे आमचा विजय झाला असे म्हणायला हवे होते आणि काही काळ थांबून तो लोकपाल सशक्त बनवण्यासाठी थोडं थांबून लढा पुढे चालू ठेवायला हवा होता. पण दे वेण्ट फॉर ओव्हरकिल. आणि मग गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं अशी अवस्था आली. जनलोकपाल सोडाच जोकपालही आलाच नाही.
दुसरी चूक झाली ती राजकीय पक्षांचा पाठिंबा ओळखण्यात झाली. भाजप सारखे पक्ष अण्णांच्या खांद्याला खांदा लावून एप्रिल आणि ऑगस्टमध्ये आंदोलनात उतरले होते. ते खरोखर जनलोकपाल आणण्यासाठी होते असा भ्रम अण्णा आणि त्यांच्या टीमने शेवटपर्यंत बाळगला. भाजपचा लोकपालाला असलेला पाठिंबा विरोधी पक्षाचे राजकीय कर्तव्य म्हणून होता. जोवर विधेयक आणले जाण्याची शक्यता नव्हती तोवरच हा पाठिंबा होता. विधेयक सादर होताच तो पाठिंबा गळून पडला. संसदेतील त्यावेळची चर्चा ज्यांनी पाहिली असेल त्यांना हे दिसलेच असेल की भाजपने लोकपाल कायदा सशक्त करण्याची मागणी केली नाही. तर त्यातल्या काही तरतुदी डायल्यूट करण्याची मागणी केली होती. शिवाय लोकायुक्त २५२ की २५३ कलमाखाली यावर वाद घातला होता. आणि राज्यसभेत तर जो लोकायुक्त कायदा करण्याचं आश्वासन संसदेने लोकायुक्त ऑगस्टमध्ये अण्णांना दिलं होतं तो लोकायुक्तच त्या कायद्यातून रद्द करण्याची मागणी केली. म्हणजे वेळ येताच भाजपने लोकपाल कायदा अस्तित्वात येऊ नये अशा प्रकारे सरकारला साथ केली.
देशातल्या तमाम (१२० कोटी) जनतेचा पाठिंबा असल्याचा क्लेम सोडून द्या.
राजकीय पक्ष उभारण्याचं आव्हान तर आणखीच अवघड आहे. प्रादेशिक पक्षांना प्रत्येक मुद्द्यावर धोरण असण्याची गरज नसते. तेलगू देसम तेलगू लोकांचे हित एवढ्या मुद्द्यावर उभा राहू शकतो. तसेच अकाली दल, द्रमुक यांचे. राष्ट्रीय पर्याय देणार्या पक्षाला देशातल्या प्रत्येक विषयावर धोरण असाबे लागेल. तशी तयारी अजून अण्णा टीमने केली आहे असे वाटत नाही. नुसता स्वच्छ चारित्र्याचा मुद्दा पुरेसा नाही.
१००% मान्य
या लेखात लिहिलेल्या बर्याच गोष्टी गेल्या वर्षीही बोलल्या जात होत्या. त्यावेळी त्या बोलणारे सरकारचे हस्तक आणि भ्रष्टाचार्यांचे पाठीराखे आहेत असे म्हटले जात होते.
अगदी १००% बरोबर. गेल्या वर्षी जो हिस्टेरिया तयार केला गेला होता त्यात टिम अण्णाविरूध्द काही बोलले की तो माणूस ताबडतोब भ्रष्टाचार्यांचा समर्थक ठरत असे. उठल्यासुटल्या उपोषणे करून लोकशाही मार्गाने लोकांचा जनादेश मिळवून निवडून आलेल्या सरकारला वेठिस धरायचा मार्ग मान्य नसेल तर तो माणून स्वतः भ्रष्टाचाराचा समर्थक कसा बनतो हे मला न उलगडलेले कोडे आहे.
मतात (अजूनपर्यंत) बदल नाही
२०११ मध्ये जे लोक (मी धरून) अण्णा मेथडला विरोध करीत होते ते केवळ सुधारणा संसदेच्या माध्यमातून यायला हव्यात आणि त्यासाठी राजकारणात उतरावे असे म्हणत होते. त्या दृष्टीने माझ्यासारखे लोक आम आदमी पार्टी विरोधात नव्हते.
आआपाविषयी मतात (अजूनपर्यंत) काहीच बदल नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती सोडल्यास अजून इतर मुद्द्यांवर आआपा ने काही धोरण सांगितलेले नाही.
देशव्यापी पक्षाचे अजून खूप दूर आहे.
१२० कोटींचा पाठिंबा (इव्हन विथ पिंच / फिस्ट्फुल ऑफ सॉल्ट) खूप दूर आहे. दिल्लीत काँग्रेस आणि भाजप दोन्ही भ्रष्ट आहेत असे सांगणार्या आआपा ऐवजी लोकांनी भाजपला खूपशी आणि काँग्रेसला काही मते दिलीच आहेत.
आम आदमी पक्ष पर्याय म्हणून देशभरात उभा राहिला तर चांगलेच आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. निदान सध्यातरी त्यांचा कागद स्वच्छ आहे. तो तसाच रहावा अशी अपेक्षा आहे. आमच्या मतदारसंघात आआपाने उमेदवार उभा केला तर मत देईन.
विषाद समजला
लेखकाचा विषाद समजला.
पुढील वाक्य ठीक वाटत नाही :
महात्मा गांधींनी जेंव्हां-जेंव्हां उपोषण केले तेंव्हा-तेंव्हां ते एकट्याने केले. त्यांना "टीम-गांधी"ची तशी गरज भासली नाहीं. "एकला चलो रे" हाच त्यांचा खाक्या होता. त्यांनी अनुयायी मिळविण्याचा प्रयत्नही केला नसावा. कदाचित् गांधीजींना अनुयायांची गरजच भासली नसेल.
महात्मा गांधींची प्रसिद्ध उपोषणे काँग्र्सचे नेतृत्व/संघटन हाताशी असताना झाली.
जातीचा उल्लेख का?
टिळकांच्या मागच्या महाराष्ट्रातल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर नेतृत्त्वाला शक्यतोवर सांभाळून घेण्याचा गांधींचा प्रयत्न होता.
ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर म्हणजे सगळेच आले की. मग मुद्दामून जातीचा उल्लेख करायचे कारण समजले नाही. त्यावेळी महाराष्ट्रात जसे आघाडीचे ब्राम्हण पुढारी होते तसेच विठ्ठल रामजी शिंदे,एस.के.बोले यासारखे ब्राम्हणेतर पुढारी पण होतेच.तेव्हा गांधींजींचा सर्वच प्रकारच्या नेतृत्वाला सांभाळून घ्यायचा प्रयत्न असेल तर मुद्दामून जातींचा उल्लेख का हे समजले नाही.
आपल्या प्रतिसादाला उत्तर
आपल्या प्रतिसादाला उत्तर म्हणून हा शेर देतो (याच शेराच्या शेवटच्या दोन ओळी मूळ लेखात मी दिल्या आहेत)
मैं अकेला चला था
जानिब-ए-मंझिल मगर,
लोग तो मिलते गये,
कारवाँ बनता गया|
('जानिब-ए-मंझिल'म्हणजे ध्येयाकडे, ध्येयाच्या दिशेने)
माझ्या वाचनावरून मला असे वाटते कीं गांधीजी मागेही न वळता आपल्या उद्दिष्टाकडे जात. पण त्यांच्या ध्येयाने, विचारांनी आणि त्यांच्या नि:स्वार्थीपणामुळे प्रेरित झालेले उस्फूर्तपणे "लोग तो मिलते गये, कारवाँ बनता गया" हेच खरे.....
दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश विरोधी चळवळ गांधीजींनी जवळ-जवळ एक हाती चालविली होती. पोलिसांकडून मारही खाल्ला होता. बेन किंग्जली या नटाने साकार केलेले ते मार खाल्ल्याचे दृष्य पहाताना माझ्या अंगावर शहारे आले होते हेही मला नीट आठवते.
थोर नेते अनुयायांवर अवलंबून नसतात. अण्णासुद्धा अद्याप महात्माजींच्या इतके थोर नसले तरी त्यांच्याकडे अनुयायी आपोआप आकृष्ट होतात असेच मला वाटते.
शी ! यावेळच्या आंदोलनाला कै
शी !
यावेळच्या आंदोलनाला कै मज्जाच नै आली...
सरकारला शिव्या नाहीत... सरकारला गुढगे टेकवत शरण आणल्याची भावना नाही...
प्रभातफेर्या नहीत, घोषणा नाहीत...
मेडिया कवरेजही तेवढे नाही...
क्रांती होता होता रहिली ...
...
लाष्ट टाईम संध्याकाळच्या फेर्य आणि घोषणाबाजीनंतर सुकलेले घसे क्याफे माँडेगारमध्ये गारेगार बीयरने ओले करताना जाम धमाल यायची...
असो... पुढल्या वेळी नवीन काहीतरी सापडेल..
हा लेख आताच 'ई-सकाळ'वर प्रकाशित झाला आहे
हा लेख आताच 'ई-सकाळ'वर प्रकाशित झाला आहे. दुवा आहे:
http://online2.esakal.com/esakal/20120816/5683344458547640765.htm
धन्यवाद, काळे
भ्रष्टाचार आणि तत्त्वे
दिल्लीच्या निवडणूकीत आपने भाजपची काही मते खाल्ली, पण काँग्रेसची सर्वात जास्त खाल्ली. ज्या लोकांना भाजप जातीयवादी (ब्राह्मणी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारा) वाटतो, ते केवळ शहरातले जास्त शिकलेले लोकच नाहीत तर मुस्लिम, दलित, इतर उच्चवर्णीय असे बरेच ग्रामीण पण आहेत ज्यांना ब्रह्मविरोध हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो. काँग्रेस भ्रष्ट आहे असे वाटत असूनही ते नाईलाजाने तिला मत देत. ही सगळी/बरीच मते आपला गेली. आप देशभरात आली तर भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. भाजप आपल्या मतांची /विचारांची आहे पण असहनीय रित्या भ्रष्ट आहे असे वाटणारे लोक त्यामानाने कमी आहेत.
ब्राह्मणविरोध हा मुद्दा असता
ब्राह्मणविरोध हा मुद्दा असता तर विठ्ठलराव गाडगीळ, मधू दंडवते (५ वेळा खासदार) असे अनेक लोक निवडून येऊ शकले नसते. पहिल्या संसदेत तर ६५% ब्राह्मण खासदारच होते(यात भूमिहारही आले). भाजप ला विरोध असण्याचं कारण उघड आहे. त्यांचा ज्या गोष्टींना विरोध आहे त्या लोकांना आपल्या वाटत होत्या. सामान्य माणसाला मतदानाचा अधिकार देणारी राज्यघटना हा त्यांच्या कुचेष्टेचा विषय आहे. त्यातूनच राज्यघटनेवर लघवी करणारं व्यंगचित्र अण्णांच्या आंदोलनात येतं. याला व्यक्तीस्वातंत्र्य म्हटलं जातं. याउलट फक्त आणि फक्त अवहेलनाच नशिबात आलेल्यांनी त्यांच्या कानावर पडलेल्या भाषेचा वापर करून आपली अभिव्यक्ती जाहीर केली तर ते असभ्य ठरतात... थोडंसं अवांतर आहे, पण हा मुद्दा पोहोचवायला हवा होता असं वाटलं.
मात्र सातत्याने लोकांच्या भावना भडकावून आणि नव पिढी आपल्या मताची घडवून आणणे याला काही गुण दिलेच पाहीजेत. या पिढीला आपण कुणाला ताकद देतो आहेत याची कल्पना असेल का ?
अरविंद केजरीवाल, भूषण पितापुत्र या सर्वांचा संघाशी संबंध आहे आणि रामलीला आंदोलनाना संघाचा पूर्ण पाठिंबा होता हे लपून राहीलेलं नाही. तसच कुठल्याही वर्तमानपत्रातल्या बातमीखालच्या प्रतिक्रियांमधे केजरीवाल आणि मोदी यांचे पाठीराखे म्हणून त्याच त्या व्यक्ती दिसून येतात. भाजपविरोधी मतांची मॅनेजमेंट म्हणून आम आदमी पार्टीची योजना असावी का ? त्यासाठीच हे सर्व घडवून आणले असावे का ?
काहीही असो. आम आदमी पार्टी कडून सध्याची गुंडशाही, भ्रष्टाचार संपवून झाडू मारण्याचं काम होणार असेल तर एकदा त्यांना संधी द्यायला हरकत नाही असं माझं मत आहे. मात्र जिथे आणि ज्या घटकांचा विकासच झाला नाही, तशी इच्छाच बाळगली गेली नाही त्यांच्या कल्याणाची हमी देणारी व्यवस्था हिडन अजेण्डा म्हणून बदलण्याचा विचार असेल तर तो हाणून पाडायला हवा.
ज्यांना अजून किती काळ आम्ही टॅक्स भरायचा असे विचार मांडायचेच आहेत त्यांनी एकदाच हा विचार करायला हवा कि महाराष्ट्रात झालेला विकास जा बिहार आणि उत्तर प्रदेशात झाला असता, इथल्या प्याभूत सुविधांसाठी (धरणं, वीजन्र्मिती केंद्र वगैरे वगैरे ) हा निधी तिकडे वळवला गेला असता तर महाराष्ट्रातल्या जनतेला बिहारमधे जायची पाळी नसती आली का ? इथे आठ पदरी सोडाच, साध्या मुरमाच्या रस्त्यांसाठी हात पसरावे लागले असते. म्हणूनच आपला विकास झाला आहे तर आपल्याला सिंगापूर बनण्याची घाई समजू शकते, पण बिहारमधून येणा-याला परप्रांतीय हा शब्द परराष्ट्रीय सारखा वापरून विकासाची फळं चाखू देण्यास विरोध कुठल्या तोंडाने आपण करतो ?
जनलोकपालच्या लाटेवर स्वार होऊन या मुद्द्यांना हरताळ फासण्यात येईल ही भीती आहेच.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/28332?page=4
आता आपण खूपच पुढे आलेलो आहोत, पण मागे वळून पाहताना मनोरंजक ठरेल म्हणून अण्णांचं आंदोलन चालू असताना अण्णांना पाठवलेलं अनावृत्त पत्र या निमित्ताने इथे पुन्हा द्यावंसं वाटलं.
टीम अण्णांकडून फारशी आशा नव्हती
टीम अण्णांकडून फारशी आशा नव्हती. ती का नव्हती यासाठी इतरत्र आणि वेगळ्या संदर्भात व्यक्त केलेलं हे मत पुन्हा उद्धृत करतो -