शेजारच्या काकांना भावना असल्याची झाली जाणीव.
पाषाण, पुणे, २६ ऑगस्ट.
शेजारचे काका तार्किक, कर्तव्यकठोर आणि नास्तिक असण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. शिवाय काका विद्यापीठात शिकवत असल्यामुळे त्यांचा सगळ्यांमध्ये दराराही आहे. रसल ते झिझेक आणि गामा पैलवान ते सावरकर अशी मोठी रेंज असलेल्या काकांना कॉलनीत सगळेच मानतात. कठीण प्रसंगी सगळेच काकांचा सल्ला घेतात. कॉलनीत सगळे जण 'भेजा फ्राय'चा आस्वाद घेत असताना काका मात्र आपली खुरटी दाढी कुरवाळत, लोकांना 'ल दिनर दिल काँ' अशा कुठल्याशा सिनेमाबद्दल सांगत होते. तेव्हापासून काकांना बऱ्याच भाषा येत असल्याची बातमीही कॉलनीमध्ये फुटली होती.
मात्र हल्लीच, मैत्रिणीबरोबर असताना काकांना आपले डोळे नीट काम करत नसल्याची जाणीव झाली. आपल्या डोळ्यांतून काही द्रव झिरपत आहे, असं वाटल्यामुळे काकांनी आपल्या मैत्रिणीला याबद्दल गूगल करायला सांगितलं. सदर मैत्रिणीनं गूगल करण्याजागी काकांनाच उलटेसुलटे प्रश्न विचारायला सुरुवात केली. "काका, तुम्ही जन्माला आलात तेव्हा तरी रडलात का", असाही प्रश्न तिनं विचारल्यावर काकांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला. काका आत्तापर्यंत एकदाही रडले नव्हते, हे सगळ्या कॉलनीलाच माहीत होतं. काकांच्या मैत्रिणीच्या मते काकांना हल्लीच भावना फुटल्या आहेत, आणि हृदय पिळवटणारे, रशियन सिनेमांतले प्रसंग पाहताना काका रडतात असंही तिनं काकांना सांगितलं.

काका शोधक वृत्तीचे असल्यामुळे काकांनी स्वतःवर प्रयोग सुरू केले. एक फ्रेंच विनोदी सिनेमा आणि एक रशियन ट्रॅजेडी सिनेमा यांतले प्रसंग काका एक-आड-एक बघून, आपण रडत आहोत का हसत आहोत हे ठरवायचा प्रयत्न करत होते. काकांच्या मैत्रिणीला ही पद्धत न पटल्यामुळे ती सिनेमा सुरू असताना सतत काकांना सल्ले देत होती. त्यामुळे काकांनी मैत्रिणीसमोर त्यांचा प्रयोग असफल होण्याची शक्यताही व्यक्त केली; तेव्हा काकांच्या डोळ्यांतून घळाघळ पाणी वाहत होतं.
काकांनी सदर प्रयोगाचं वर्णन आम्हांला सांगितलं तरी नेहमीप्रमाणे ह्या विषयावरही आपलं स्वतःचं मत सांगायला नकार दिला. काकांच्या शेजारी राहणाऱ्या चश्मावाल्यांच्या मतानुसार, काकांचे डोळे वयानुसार दमायला लागले आहेत. काकांच्या मैत्रिणीनं मात्र सदर घडामोडींबद्दल आनंद व्यक्त केला. आता काकांना डंप करताना खरी मजा येईल, असं तिचं म्हणणं पडलं.
पाषाणकर काका (व काकू)
सप्रेम दंडवत,
शेजारच्या काका/काकूंच्या (छुपी) भावनाप्रधानतेची व (उघड) पर्यावरणप्रेमाची इतकी जाहीर चिरफाड करू नये, ही विनंती. बिचारे आपल्यापुरते (जग सोडून जाण्याची वाट पाहत) आपल्या जगात राहतात. ते आपल्या पुतण्या/पुतणींच्या लाइफस्टाइलविषयी कधीही कमेंट्स करत नाहीत. टंकलेखनाचे योद्धे (कीबोर्ड वॉरिअर) असूनसुद्धा पुतण्या/पुतणींच्या लेखावर कधीच उलटसुलट लिहित नाहीत. आपल्या भावना, आपले पर्यावरण प्रेम, जोपासलेली जीवन मूल्ये यांचे कधीच जाहीर प्रदर्शन करत नाहीत. आपण बरे की आपले (निरर्थक) आयुष्य बरे. इच्छामरणाची/दयामरणाची सोय नसल्यामुळे त्यांना अजून थोडे फार जगू दे.
निदान पुतणीने शेजारधर्म पाळावा एवढीच माफक अपेक्षा. (कृ.ह.घ्या)
लो.अ.क.वि.
.
-पाषाणकर काका (व काकू)
सिमोन द बोउआर या स्त्रीवादी
सिमोन द बोउआर या स्त्रीवादी लेखिकेबद्दल काकांच काय म्हणण आहे?