फोडणीचे मार्शमेलो
* अनिवार्य अनावश्यक पाल्हाळ *
एक दिवस मुलगा म्हणाला, "आई मार्शमेलो म्हणजे काय?"
त्यानं एका अमेरिकन कार्टूनमधल्या पात्रांना मार्शमेलो काठीला लावून शेकोटीवर भाजून खाताना बघितलं होतं. आपल्या मुलाला मार्शमेलो म्हणजे काय माहिती नाही आणि त्याला ते सहजी खायला मिळत नाहीत यामुळे माझं मातृहृदय हेलावलं. त्यात तो हा प्रश्न विचारताना मिश्र डाळींची धिरडी खात होता. मार्शमेलो म्हणजे काय विचारणारा निरागस मुलगा, तो प्रश्न विचारतानाच इतका डाऊन मार्केट आणि गावंढळ प्रकार खातो आहे हे बघून मला अचानक 'आपण कुठे आलो आहोत?' असं झालं. आपला मुलगा नाश्त्याला बीटाचे पराठे, दुपारच्या जेवणांत लाल भोपळ्याचं भरीत आणि रात्री ताकातला पालक खातो; आणि टीव्हीवर मार्शमेलो बघतो हा किती टोकाचा अन्याय आहे त्याच्यावर - असा विचार करत शेवटी आपला भारतात स्थायिक व्हायचा निर्णय चुकला असावा का - इथपर्यंत मी आले.
त्या विकांताला मी तातडीनं जाऊन एका महागारड्या दुकानातून एक मार्शमेलोचं पाकीट घेऊन आले. ते पाकीट फोडून मुलाच्या स्वाधीन केल्यावर एखाद्या परग्रहावरून पडलेल्या वस्तूचं जसं निरीक्षण होईल तसं त्यानं त्या पाकिटाचं करायला सुरुवात केली. नंतर हळूच एक मार्शमेलो खाऊन बघितला.
मुलांना कितीही चांगला अभिनय करता येत असला, तरी त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही हे आया घास तोंडात जाताक्षणी सांगू शकतात. मुलाला आईनं ते पाकीट आणण्यासाठी किती खस्ता (दोन लशी घेतल्याचं सर्टिफिकिट व्हात्साप्पवर शोधून मॉलच्या सिक्युरिटीवाल्यांना दाखवणे) खाल्ल्या होत्या याची कल्पना होती. म्हणून इतर, सवयीचे नावडते पदार्थ खाल्ल्यावर तो अर्जुन कपूरसारखा अभिनय करतो, तसा न करता आज त्यानं रणवीर सिंगसारखा केला. मीही त्याच्या अभिनयावर विश्वास ठेवला कारण पाकिटात खूप मार्शमेलो होते.
"हे कशाचं बनलेलं असतं?"
"साखरेचं. आणि कॉर्नस्टार्च."
"हे गुड फूड असतं का बॅड फूड?"
"अर्थात बॅड. पण आपण हे पाकीट संपेपर्यंत त्याला गुड म्हणायचं आहे."
"भाजूया का हे आता? मी खाली जाऊन काठी शोधून आणतो"
"आपण हे पापड भाजायच्या चिमट्याने भाजू. आण इकडे."
भाजलेल्या अवतारात तो पदार्थ जरा जास्तच नावडता झाला. म्हणून मी त्याला तो हॉट चॉकलेटमध्ये चांगला लागेल असं सांगितलं.
संध्याकाळी भरपूर चॉकलेट (डलगोना कॉफीच्या मुस्काडीत मारेल इतके फेटून) त्यात गरम दूध घालून मार्शमेलो टाकणार इतक्यात मागून विनंतीवजा आवाज आला
"आई मला मार्शमेलो वेगळे देशील का? मी ते माझे मी चॉकलेटमध्ये घालतो"
मी आनंदानं सगळं साहित्य त्याच्या हवाली करून फेसबुक बघत बसले.
पुणे ग्रामीण भागातल्या आमच्या घराला एखाद्या कॅनेडियन स्की रिझॉर्टची झळाळी आल्यासारखं वाटत होतं मला. आणि आता रोज एक कप हॉट चॉकलेट असं करत आठवड्याभरात ते पाकीट संपवून आणि नवीन आणावं लागणार या आनंदात होते.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना संत्रं उचलायला गेले, तर त्याची साल एकदम आतच गेली. बघते, तर आतलं संत्रं खाऊन त्यात दोन मार्शमेलो गुंडाळून ठेवले होते. हे काय आहे, असं विचारल्यावर मात्र काकुळतीला येऊन आपल्याला मार्शमेलो कुठल्याच रूपात आवडले नसल्याची कबुली मिळाली.
माझ्या हातातल्या त्या तुकतुकीत पांढऱ्या कापसासारख्या पदार्थाकडे बघून आमच्या सासूबाईंचं आवडतं वाक्य आठवलं,
"आंबट न होणाऱ्या दह्यावर आणि मुंग्या न लागणाऱ्या गोड पदार्थावर कधीही विश्वास ठेवू नये"
हे असलं कृत्रिम खाद्य आपल्या मुलाला आवडलं नाही हे ठीकच असं वाटून घेऊन समाधान वाटावं तोपर्यंत अन्न वाया घालवू नये (ते दोन घास उरलं असलं तरी छोट्या छोटया अनंत वाट्यांमध्ये घालून फ्रीज भरून टाकावा) ही सासूबाईंचीच शिकवण आठवली. मग मी आधी आलेल्या असल्या प्रकारच्या परिस्थितीला कसं तोंड दिलं होतं ते आठवलं आणि फोडणीचे मार्शमेलो करायचं ठरवलं. एखाद्या उरलेल्या पदार्थाला दुसऱ्या दिवशी फोडणी घातली की सगळे खाली मान घालून तो पदार्थ खातात असा माझा अनुभव आहे. आदल्या दिवशी घरच्या स्त्रीने खपून केलेल्या पोळ्या/भात वगैरे न खाता बाहेर सामोसे नाहीतर 'अचानक' बटर चिकन खाऊन येणारे लोक दुसऱ्या दिवशी गुमान फोडणीचं काहीही खातात.
**** अनिवार्य अनावश्यक पाल्हाळ समाप्त ****
पाककृती (फोडणीचे मार्शमेलो)
जिन्नस
१ वाटी कात्रीने कापलेले मार्शमेलो (यांचं वैशिष्ट्य असं, की आपल्या घरात एक अजिबात धार नसलेली कात्री असते तिनेही हे कापले जातात)
३ टीस्पून सनफ्लॉवर तेल (खरंतर हा परदेशी प्रकार म्हणून मी ऑलिव्ह ऑइल वापरणार होते. पण त्यात फोडणी देऊ नये म्हणतात. व्हात्साप्पवर आलं होतं)
१ टीस्पून हिंग
हळद, जिरे, मोहरी, भरपूर कडीपत्ता, भरपूर हिरवी मिरची.
कृती
चिरलेले मार्शमेलो एका वाडग्यात घ्यावे.
फोडणीत कडीपत्ता आणि हिरवी मिरची चांगली चुरचुरू द्यावी आणि ती फोडणी वाडग्यात ओतावी.
गरम तेलामुळे मार्शमेलो वितळतात आणि छान मिळून येतात.
हे बघून मला यांची थालिपीठंही चांगली होतील असं वाटलं.
ती पुढच्या भागात.
हा पदार्थ म्हणजे android v#6 माहीत आहे.
लॉलीपॉपपेक्षा याचं कौतुक झालं होतं. म्हणजे की जास्तीचे apps मेमरी कार्डावर सिस्टम कार्ड समजून सरकवता येणे ही काढलेली सोय परत आणली गेली म्हणून.
पण फोडणीचं मार्शमेल्लो ही रेसपी आणि वर्णन वाचल्यावर तो काय पदार्थ असावा याची कल्पना आली. कलिंगडाची साल काढून आतल्या लाल गोड(कधीकधी) असणाऱ्या भागापर्यंत पोहोचताना जो किंचीत गोडसर पांढरा शुभ्र पदार्थ आसतो तेच मार्शमेल्लो. याची फोडणी घालून शिजवलेली भाजी हीच रेसपी.
सध्या यास फार मागणी आहे असं ऐकून आहे. याचे तुकडे परतून पीठ लावल्यावर भाजी होते ती पावात घालून खाण्याने पोट भरल्याची भावना होते पण साखर वाढत नाही. ही पावभाजी मला आवडते.
तर हा मेल्लो चॉकलेटाने अवगुंठीत करून कसा लागत असेल याची कल्पना करत आहे.
अन्नपुर्णेला आणि सासूला नमस्कार. धाकट्याचा अभ्यास आवडला.
ईईईईईईईईईई!!!!!!!!!!
आधी एक तर मार्शमॅलो बोले तो यक्क्! त्यात त्याला फोडणी?????? @#%$^*&^%*!!!!!!
('कशातही काहीही घालून खाणारे' अशी देशस्थांची एक व्याख्या ऐकलेली आहे. (ती अगदीच चूक आहे, असे (स्वत:च्या उदाहरणावरून) निदान मी तरी म्हणणार नाही; परंतु ते एक असो.) बायेनीचॅन्स देशस्थ वगैरे आहात काय? (आणि समजा असलात, तरीही, म्हणून काहीही??????))
एक दिवस मुलगा म्हणाला, "आई मार्शमेलो म्हणजे काय?"
सांगायचे नाहीत त्याला, एक अत्यंत भिकारxx प्रकार असतो, म्हणून?
(नाहीतरी प्रयोगाअखेरीस त्याच कन्क्लूजनाप्रत पोहोचला ना तोसुद्धा?)
आपल्या मुलाला मार्शमेलो म्हणजे काय माहिती नाही आणि त्याला ते सहजी खायला मिळत नाहीत
सुदैवी आहे!!! त्याच्या भाग्याचा मला हेवा वाटतो.
मार्शमेलो म्हणजे काय विचारणारा निरागस मुलगा, तो प्रश्न विचारतानाच इतका डाऊन मार्केट आणि गावंढळ प्रकार खातो आहे
आणि मार्शमॅलो म्हणजे अपमार्केट??????
भारतातली अपमार्केट नि डाउनमार्केटची ही कॉन्सेप्ट मला आजतागायत कळलेली नाही. तेथे मॅक्डॉनल्ड्ज़सुद्धा अपमार्केट ठरते (किंवा, निदान एके काळी तरी ठरायचे), नि लोक तेथे पोरांचे वाढदिवस काय करतील, नि डेटवर काय जातील! च्यामारी, डेटवर जाण्यासारखे आमचे वय राहिलेले नाही, म्हणून. (बोले तो, आमच्याकडे बघून आमची बायको सोडून दुसरी कोणीही आमच्याकडे फिरकणार नाही; बायकोसुद्धा केवळ नाइलाज म्हणून... असो!) नाहीतर, आम्ही जर कोणाला डेटवर म्हणून (ऑफ ऑल द प्लेसेस) मॅक्डॉनल्ड्ज़ला घेऊन गेलो असतो, तर... आमच्या डेटने तेथल्या तेथे काढता पाय घेतला असता, नि (आमची लेव्हल काय आहे, ते जोखून) पुन्हा उभ्या आयुष्यात आम्हाला तोंड दाखवले नसते! तर ते एक असो.
असा विचार करत शेवटी आपला भारतात स्थायिक व्हायचा निर्णय चुकला असावा का
भारतात स्थायिक होण्याचा निर्णय हा चुकीचा की बरोबर, या (वैयक्तिक) प्रश्नाबद्दल अर्थातच निदान मी तरी काही म्हणणार नाही, परंतु... तेथे मार्शमॅलो सहजी मिळत नाहीत, हा तो निर्णय चुकीचा असण्याचा निकष नक्कीच होऊ शकत नाही. (In fact, if there is anything at all that is right about that country... असो!)
"आंबट न होणाऱ्या दह्यावर आणि मुंग्या न लागणाऱ्या गोड पदार्थावर कधीही विश्वास ठेवू नये"
काळ्या कोकणस्थावर नि गोऱ्या देशस्थावर म्हणून ऐकले होते. ही आवृत्ती नवीन आहे. असो.
अन्न वाया घालवू नये (ते दोन घास उरलं असलं तरी छोट्या छोटया अनंत वाट्यांमध्ये घालून फ्रीज भरून टाकावा)
आणि मग त्या वाट्यांतला ऐवज दुसऱ्या दिवशी न खाता, फ्रीजमध्ये proliferate करीत जावा, नि त्याला छान बुरशी लागेपर्यंत अशा अनंत वाट्या आपण फ्रीजमध्ये डंपिल्या होत्या, हे विसरून जावे. फिल इट, फरगेट इट!
(बाकी काही नाही, तरी किमान ही संस्कृती तरी मिरच्यांच्या धुरीने fumigate केली पाहिजे. कदाचित उलट्या टांगलेल्या अच्युत गोडबोल्याच्यासुद्धा अगोदर! आणि हो, ही तुमच्या सासूबाईंचीच खासियत आहे, असे मानायचे काहीही कारण नाही. अन्न शक्य तोवर वाया घालवू नये, हे एक तत्त्व म्हणून एका मर्यादेपर्यंत समजण्यासारखे आहे, परंतु ते इतक्या इल्लॉजिकल टोकापर्यंत ताणण्यामागची सायकॉलॉजी काही केल्या समजत नाही. कदाचित sunken cost fallacy? की, त्या (वाया जाऊ घातलेल्या) अन्नाला स्वत:हूनही अधिक (अनाठायी) महत्त्व? परंतु ते असो.)
३ टीस्पून सनफ्लॉवर तेल (खरंतर हा परदेशी प्रकार म्हणून मी ऑलिव्ह ऑइल वापरणार होते...
आणि ऑलिव्ह ऑइल देशी??????
... पण त्यात फोडणी देऊ नये म्हणतात. व्हात्साप्पवर आलं होतं)
अतिअनाघ्रात ऑलिव्ह तेलात फोडणी देऊ नये. ते उष्णता हाताळू शकत नाही, नि तळण्याच्या तापमानाला त्यातील काही द्रव्यांचे विघटन होऊन काही निमविषारी पदार्थ तळणीत शिरतात, अशी थियरी आहे. फोडणीकरिता ऑलिव्ह तेल वापरायचेच असेल, तर हलके ऑलिव्ह तेल वापरावे.
अतिअनाघ्रात ऑलिव्ह तेल हे कच्चे खाण्यासाठी चांगले. एका बशीत ओतून त्यावर ताजी मिरपूड दळावी, नि इटालियन किंवा तत्सम लुसलुशीत पावाचे लचके तोडून त्यात बुचकळून खावेत. किंवा, लसणीच्या नाहीतर तिळाच्या नाहीतर शेंगदाण्याच्या चटणीत कालवावे, नि ताज्या गरमागरम भाकरीबरोबर (किंवा, न जमल्यास पोळीबरोबर) ते खावे. वाटल्यास भाकरीवरसुद्धा ओतावे. (देशस्थ!!!) किंवा, गनपावडरीत कालवावे, नि इडलीस लावून खावे. फोडणीकरिता मात्र हलके ऑलिव्ह तेल उपयुक्त.
(पण हे मी तुम्हाला का सांगतोय? हे तुम्हाला बहुधा अगोदरच ठाऊक असावे.)
१ टीस्पून हिंग
हळद, जिरे, मोहरी, भरपूर कडीपत्ता, भरपूर हिरवी मिरची.
मार्शमॅलोवर हिंग-हळद-जिरे-कढीपत्ता... आरारारारारा!
आणि, ते वितळलेले मार्शमॅलो नि हे सर्व रसायन यांचा लगदा... किती भयंकर लागत असेल, याच्या नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात.
परंतु, असो. आलिया भोगासी...
ता. क.
फोडणीची पोळी / फोडणीचा ब्रेड / फोडणीचा भात वगैरे प्रकार आमच्यात दही घालून खातात. तसाच हाही प्रकार दही घालून खाता येईल काय?
आणि हो, फो. पो., फो. ब्रे., फो. भा. वगैरे प्रकारांत कांदा घालतात, असे आठवते. (निदान आमच्यात तरी घालतात ब्वॉ.) या पाककृतीत मात्र कांदा हा अभावानेच डोळ्यांत भरला. ही या पदार्थाची जैन आवृत्ती समजावी काय?
राडा होईल म्हणून कांदा घातला नाही
आधीच तुम्हाला इतकी शिसारी वगैरे येते आहे. कांदा कशाला हवा आहे त्यात? कुणाला शंका असेल तर मी फोटो काढला आहे पाककृतीचा पण मला तो नेहमीप्रमाणे इथे चिकटविता आला नाही.
कुणाच्यातरी मदतीनं आज ते काम करीन. म्हणजे पदार्थ बघून अजून visceral reaction देता येईल तुम्हाला.
न बा
>>>>नाहीतर, आम्ही जर कोणाला डेटवर म्हणून (ऑफ ऑल द प्लेसेस) मॅक्डॉनल्ड्ज़ला घेऊन गेलो असतो, तर... आमच्या डेटने तेथल्या तेथे काढता पाय घेतला असता, नि (आमची लेव्हल काय आहे, ते जोखून) पुन्हा उभ्या आयुष्यात आम्हाला तोंड दाखवले नसते! तर ते एक असो.
'नबा जर कुणाबरोबर डेटवर गेले ' या काल्पनिक सिचुएशनमध्ये मॅक डॉनल्डपेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. तुम्ही प्रत्यक्ष संभाषणात तळटिपा कशा देणार? त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते पंचाहत्तर टक्के कमीच होईल. कदाचित त्यामुळे तुमची डेट यशस्वीसुद्धा होऊ शकते!
भजी
हो हो! अंड्यात बुडवून तळून भजीही करता येतील.
व्हेजिटेरियन लोकांसाठी अंड्या ऐवजी बेसन. आक्वाफाबा वापरण्यासाठी मार्शमेलोचे छोटे छोटे तुकडे करून आक्वाफाबाची इंटिग्रिटी न बिघडवता त्यात अलवारपणे घालता येतील. मग त्यात रोजमरी आणि सीसॉल्ट घालून बेक करता येईल. पण हे सगळं फॅन्सी माझ्या कुंपणाबाहेरचं आहे.
खुप छान.
ऑलिव्ह तेलाच्या फोडणीतच हे करून पाहिलं पाहिजे. दोन वाईट गोष्टी मिळून एक बरं सापडू शकतं!