Skip to main content

आभाळाच्या फळ्यावर

धूमकेतूच्या खडूने
आभाळाच्या फळ्यावर
काहीबाही लिहीण्याची
होता ऊर्मी अनावर

चांदण्यांच्या ठिणग्यांची
घेतो मदत जराशी
चित्रलिपी सजविण्या
लिहीतो मी जी आकाशी

रात्र होते जशी दाट
तशा काही अनवट
मिथ्यकथा नक्षत्रांच्या
उजळती माझी वाट

झळाळते तेजोमेघ
गूढ कृष्णविवरांशी
बोलताना, जोडतो मी
नाळ आकाशगंगेशी

भेट विराटाशी थेट
माझ्या नक्षत्रभाषेची
रोमरोमातून तिच्या
रुणझुण ये सूक्ष्माची

लागे उगवतीपाशी
जेव्हा उषेची चाहूल
माझ्या नक्षत्रभाषेची
फिकटते चंद्रभूल

तिरशिंगराव Thu, 21/10/2021 - 11:52

खाण्याचं काय करता ? की सूर्याच्या तव्यावर भाजता पोळी ?

anant_yaatree Thu, 21/10/2021 - 14:17

कुणाचे खातो ।....
Btw चांदणचुरा खातो अन् आकाशगंगाजल पितो

'न'वी बाजू Thu, 21/10/2021 - 20:11

In reply to by anant_yaatree

शाकाहारी काय?

(आकाशगंगाजलाची मद्यार्कशेकडेवारी किती?)

anant_yaatree Thu, 21/10/2021 - 22:23

In reply to by 'न'वी बाजू

ब्रह्माण्ड-शाकभक्षी (brahmovo-vegetarian)

(टक्केवारीबाबत अनभिज्ञ. पण भूलोक व स्वर्लोक यांच्यामधील सीमारेषेवर अनंतकाळ तरंगत ठेवण्याइतपत पावरफुल असल्याचा अनुभव)