Skip to main content

मध्यमवर्गीयांच्या कपातली वादळं: H1Bचा रोलरकोस्टर

 

तुम्हाला शाडनफ्रॉइडं हा शब्द माहीत आहे का?

नसेल तर थुत् तुमच्या जिंदगानीवर वगैरे काही नाही. तुम्हाला शब्द माहीत असायची काही गरज नाही; कारण शब्दाचा अर्थ आपण सगळे रोजच्या रोज जगतो. त्याचं प्रमाण बदलत असेल. पण कमॉन, शाडनफ्रॉइडंचा अनुभव तुम्हाला नसेल तर थुत् तुमच्या जिंदगानीवर, असंही नाही. पण कधी तरी मला 'थुत तुमच्या जिंदगानीवर' असं लिहायचं होतंच.

कालचा दिवस माझ्यासाठी जरा उशिरा सुरू झाला. मी गेल्या आठवड्यात कामासाठी कॅलिफोर्नियाला गेले होते. तिथे झोपायला उशीर होत होता, आणि मी जेटलॅगच्या धोपटमार्गानं सकाळी पाच वाजता उठत होते. उरलेली झोप शनिवारी पूर्ण करायचा विचार होता. पण सुरुवात झाली तीच नव्या बातमीमुळे. H1B व्हिजासाठी वर्षाकाठी एक लाख डॉलर खर्चावे लागणार.

आता इथे काडेचिराईतपणा करण्यावाचून पर्याय नाही. एक लाख डॉलर म्हणायचं का शंभर हजार? डॉलर हे चलन जगाच्या ज्या भागांत वापरलं जातं तिथे एक लाखाला १०० हजार म्हणतात. मग एक लाख म्हणा किंवा शंभर हजार म्हणा, आकडा एकच असतो. शिवाय लिहिताना १०० हजार लिहायचं का शंभर हजार?

या वाक्यातला काडेचिराईपणा क्र. २: माझ्याकडे वैध अमेरिकी व्हिजा नाही. मी अमेरिकेत राहते; मी अमेरिकी नागरिक नाही; मला दर तीन वर्षांनी मिळतो तो I-797 नावाचा कागद असतो. तो अमेरिकेत काम करणयाचा परवााना असतो. व्हिजा हा पदार्थ लागतो तो अमेरिकेत (किंवा कुठल्याही परदेशात) प्रवेश करण्यासाठी. जर अमेरिकेतून (किंवा इतर कुठल्याही परदेशातून) बाहेर पडलंच नाही तर व्हिजा हा पदार्थ मिळवणं कठीण असतं आणि त्याची उपयुक्तताही फार नसते. म्हणजे जर अमेरिकेत शिरायचंच नसेल तर व्हिजा कशाला हवा? अमेरिकेत राहताना अमेरिकेतून बाहेर पडलंच नाही, तर अमेरिकेत शिरता कसं येईल?

तर व्हिजासाठी एक लाख डॉलर लागणार, असं आपण सध्या बोलीभाषा म्हणून मान्य करू. (मी हल्ली आपले प्रिय मित्र **** यांच्याबरोबर काही काम करत आहे. त्यांचीही थोडी नक्कल करावी म्हणून हा काडेचिराईतपणा! त्यांचं नाव लिहीत नाही - to protect the innocent.)

तर दिवस सुरू झाला तो या H1Bच्या बातम्यांमुळे. माझ्यासाठी कुणी तरी वर्षाला एक लाख डॉलर खर्च करणार, हे माझ्या अजूनही पचनी पडत नाही. मे महिन्यात मला बोनस मिळाला, त्याची रक्कम बघून माझे डोळे पांढरे झाले होते. अर्थात, त्यांतला एक तृतियांश माल सॅमकाकांनी लंपास केला हे निराळं!

माझ्यासाठी कुणी वर्षाला एक लाख डॉलर खर्च करणार नाही, म्हणजे माझी नोकरी टिकणार नाही. नोकरी टिकणार नाही तर व्हिसा नाही. व्हिसा नाही तर अमेरिकेत राहाता येणार नाही. अमेरिकेत नाही तर परत भारतात. भारतात म्हणजे ठाण्यालाच. पण ते घर तर नोव्हेंबरात विकायचं ठरवलं आहे. मग आजोळी, जांभिवलीला जाता येईल. तिथे इंटरनेट कसं असतं? काम तर घरूनच करायचं असतं, म्हणजे रस्ते भिकार असले तरी काय फरक पडतो! शिवाय तिथे घराच्या शेजारीच राजा नाला आहे. घराच्या आजूबाजूला परस आहे, तिथे भाजीपाला आणि फुलं लावता येतील. तिथे कोनफ्लावर लागेल का चांगलं? कोनफ्लावर हे माझं आता अत्यंत आवडतं फूल झालं आहे. तसा मला मोगराही खूप आवडतो. पण त्याला पाणी लागतं, नाही तर फुलं येत नाही. कोनफ्लावरला फार ऊन मानवत नाही. कोनफ्लावर निराळं आणि कोनफळ निराळं. कोनफळ हे फळ नसतं. ते मूळ असतं. रताळ्याचं भावंडं म्हणता येईल. आई करायची कोनफळ, जानेवारीत. चिरायची कटकट फार व्हायची. इथे चिरलेलं फ्रोजन कोनफळ मिळतं. पण बरा अर्था ते खात नाही, म्हणून मीही त्या फंदात पडत नाही. एकदा केलं होतं, पण ते शिजायला खूप वेळ लागला होता. आई करायची तेव्हाही खूप वेळ लागायचा का? भारतात आव्होकाडो मिळतात का? नसतील मिळत तर तिकडे टाको कसे खाणार? आणि 'ओल्ड एल पासो'चा टाको मसालाही?  टाको नाही तर सोमवारी संध्याकाळी काय जेवायचं? सोमवारचं संध्याकाळचं जेवण टाळून वजन कमी होईल का? पण तिकडे जांभिवलीला, म्हणजे रायगड जिल्ह्यात थंडी फार नसते. फ्रीज वगैरे होत नाही. मग तिकडे आव्होकाडोची झाडंही लावता येतील. आव्होकाडो इथून घेऊन जाता येतील, बियांसाठी. आव्होकाडोच्या बिया म्हणायच्या का बाठी? बाठी फक्त आंब्याच्या असतात. कैरीची कोय असते. आव्होकाडोचं बी तसं आकारानं चांगलंच मोठं असतं, टेण्या गोट्याेपक्षाही मोठं असू शकतं. मग आव्होकाडोची बाठ म्हणता येईल का, का आठळी म्हणायचं? त्याला अंकुर फुटला की आव्होकाडोचं झाड वाढून ते बाजायला किती वर्षं लागतात? नारळ बाजतात, ते आव्होकाडोही बाजतात का? नारळाला बी नसते. घरी खूप बिया आणून ठेवल्या आहेत. येत्या वसंतात मी लाल माठ लावायच्या विचारात होते. टेक्सासातला लाल माठ हा जोक एकदा करून झाला आहे. पण त्या बिया कुणाला देता येतील का? आणि छोटीछोटी रोपं घरी कुंड्यांमध्ये आहेत, ती कुणाला द्यायची का विकायची? घर विकल्यावर नवे लोक येतील ते फुलझाडांची आणि बागेची निगा राखतील का झाडं उपटून यडपट गवत लावतील तिथे? ते अंजिराचं झाड तसं लहान आहे अजून. त्याला वरून पाणी घालावं लागतं, रविवारी. नाही तर त्याची सगळी पानं गळतील. भारतात बियांची अबोली सहज मिळेल. ती इथे मिळत नाही. इथे बरंच काही मिळतं. खरं तर बाहेर खायचं तर इथे खूप सोपं आहे. मसालेदार पदार्थ सहज टाळता येतात. कॅलिफोर्नियात खाण्याची थोडी पंचाईतच होते, तिथे शाकाहारी काही सहज मिळत नाही. सगळ्यावर मेले डुकराचे तुकडे नाही तर कोंबडीचे पंख!

तर तुम्ही विचाराल की एवढी वर्षं अमेरिकेत आहेेस, अजून ग्रीन कार्ड नाही? शाडनफ्रॉइडं. तसं असेलच असं नाही. कदाचित तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटलं असेल. बरोबरच आहे. तुम्ही तर्क वापरत आहात. पण अमेरिकी इमिग्रेशन आणि तर्क यांचा फार काही संबंध नाही.

मराठी लोकांना माहितीपर लेखन खूप आवडतं म्हणे. तर ही माहिती. भारतात बसून ती फार मिळत नाही. किंवा असं मला वाटतं.

हा जो H1B व्हिजा असतो तो काही विशेष कौशल्य असेल तर मिळतो. मेलानिया ट्रंप लग्न होण्याआधी मॉडेल होती, आणि तीही तेव्हा या H1B व्हिजावरच अमेरिकेत मॉडेल म्हणून काम करत होती, तेव्हा तिची आणि श्रीयुत डॉनल्ड ट्रंप यांची ओळख झाली.

तसं डॉक्टर, इंजिनियर आणि डेटा सायंटिस्टांनाही H1B व्हिजा मिळू शकतो.

दर वर्षाला ८५,००० का कायसेसे H1B वाटले जातात. बहुतेक वर्षी यापेक्षा किती तरी जास्त लोकांना व्हिजा हवा असतो. म्हणून त्याची लॉटरी काढतात. "राम, राई, साई, सुट्ट्यो". सुरुवातीला ६५,००० लोक निवडतात. मग अतिशिक्षित - मास्टर्स आणि पचडी केलेले - लोकांना वेगळं काढून आणखी २०,००० वेळा राम, राई, साई, सुट्ट्यो करतात.

हा H1B एकदा मिळाला की तीन वर्षांचा असतो. मग तो एकदा रिन्यू होतो, आणखी तीन वर्षांसाठी. नंतर काही नाही. या सहा वर्षांमध्ये ग्रीन कार्डाच्या चारपैकी पहिल्या दोन पायऱ्या पार पडल्या असतील तर हा व्हिजा कितीही वेळ रिन्यू करता येतो. ते जे ८५,००० असतात, त्यांत हे रिन्यू केलेले मोजत नाहीत.

ग्रीन कार्डाची पहिली पायरी असते ते लेबर सर्टिफिकेशन. या सगळ्या प्रकारांत मी काडेचिराईतपणा करणार नाहीये. मला ही सगळी माहिती काठाकाठानंच आहे. शिवाय जे लोक अजून व्हिसावाले आहेत, त्यांना हे माहीत असतंच. जे लोक त्यांतले नाहीत, त्यांना काय करायच्येत काडेचिराईती तपशील!

लेबर सर्टिफिकेशनच्या वेळेस ते तपासतात की या परदेशी व्यक्तीऐवजी कुणी अमेरिकी नागरिक मिळेल का? त्याचं उत्तर नकारार्थी आलं तर आपण स्वतःला तीसमारखां समजू शकता. पण तसं म्हणायची काही गरज नाहीये. अर्थव्यवस्था दमदार असली - म्हणजे आता श्रीमान डॉनल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात असते तशी - की नोकऱ्या जात नाही. अर्थव्यवस्था आजारी असली - म्हणजे डेमोक्रॅटांकडे सत्ता आल्यावर असते तशी - की नोकऱ्या धडाधड जातात.

मग पुढची पायरी काही तरी असते. ती पायरी पार पडली की मिळते प्रायॉरिटी डेट. काल संध्याकाळी मी बघितलं त्यानुसार EB2 या कॅटेगरीत ज्या भारतीय लोकांना १ डिसेंबर २०१३च्या आधी ही पायरी पार पाडली आहे, त्यांना आता पुढच्या पायरीवर जाता येईल. EB1 म्हणजे संशोधन करणारे वगैरे. EB3 म्हणजे पदवी नसलेले किंवा कमी अनुभव असलेले.

तिसरी ते चौथी पायरी तशी काही महिन्यांतच पार पडते म्हणतात. तेव्हा ग्रीन कार्ड मिळतं.

थोडक्यात पहिल्या दोन पायऱ्यांसाठी दोनेक वर्षं लागतात, म्हणे. दोन ते तीन यासाठी भारतीयांना खूप जास्त वेळ लागतो. तीन ते चार याला धरू फार तर एखाद वर्ष लागतं. दुसऱ्या पायरीवरचे भारतीय कागदोपत्री non-immigrant statusवर असतात. पण अर्थातच त्यांना ते बदलून हवं असतं.

किती वर्षं अमेरिकेत आहेस, यानं काय फरक पडतो? तो कोपऱ्यावरचा लतीफ अंडीवाला माझ्या जन्माच्या आधीपासून भारतात आहे. तिथे, ठाण्यातच तो जन्माला आला. पण त्याचं भारतीयपण अस्सल समजलं जातं का?

कालची सकाळ सुरू झाली ती या बातम्यांनीच. इलॉन मस्क H1B व्हिजाच्या बाजूनं बोलत होता म्हणे. तोही असाच H1B व्हिजा घेऊनच आला आहे. मेलानिया ट्रंप, इलॉन मस्क आणि संहिता जोशी. शाडनफ्रॉइडंची आणखी एक संधी.

"अरे, आपण गेल्या महिन्यात पोतंभर काळे वाटाणे आणून ठेवले आहेत, टाकोसाठी. ते संपवावे लागणार."
"अरे, आपण माझ्यासाठी नवीन गाडी घ्यायचा विचार करत होतो. मला तशीही नवी गाडी नकोच होती. आता आहे तीच पाकटवता येईल." झालंय असं की गाडीचा एअरबॅगचा दिवा गेले काही महिने लागला आहे. मी गाडी चालवते ती आठवड्यातून दोनदा. शुक्रवारी कधीमधी दुपारचं जेवायला मी बाहेर जाते (आणि बऱ्या अर्ध्यासाठी घेऊन येते, तर क्रिस मला 'गुड वाईफ' म्हणाला होता. "मी गुड काहीही नाहीये. कुठे अपेक्षांचं ओझं स्वतःवर लादून घ्यायचं!", असं मी त्याला म्हणाले होते.) आणि शनिवारी फार्मर्स मार्केटात. आठवड्याला सगळं मिळून १५ मैल होत नसतील. वसंत आणि हेमंत ऋतूंमध्ये कधी झाडं आणायला जाते. हव्ये कशाला नवीन गाडी! शिवाय नवीन गाडी आणली की ती ठोकल्यावर आणखी वाईट वाटणार. नवीन गाडीवर पक्षी शिटले की वाईट वाटणार! नवीन गाडी जुनी होईस्तोवर बरा अर्धाही वापरणार आणि माझी सगळी सेटिंगं बदलून ठेवणार. शिवाय अमेरिकी बाजारात छोट्या आकाराची प्लगिन हायब्रिड उपलब्धच नाही. मग काय विकत घ्यायचं? रणगाडा? शिवाय, एवढे पैसे मिळवूनही बाई किती साधी (कंजूष) आहे, हे कसं म्हणता येणार? नकोच होती ती नवीन गाडी!
"अरे, ठाण्यातलं घर विकायचं चाललं होतं आमचं. इथल्या घराचं कर्ज सहज फेडता येईल ना आपल्याला!"

"आव्होकाडो आहेत घरात. तू गेल्या आठवड्यात नव्हतीस म्हणून खाल्ले नाहीत. तेच खाऊ येत्या आठवड्यात."
मी मनात "त्याच्या बिया लावून बघायला पाहिजेत. बिया, आठळ्या का बाठी?"

मग मी दुपारभर ऐसीच्या दिवाळी अंकासाठी एका लेखावर काम केलं. माझा नाही, मी फक्त भाषेवर काम केलं. दुपारी बरा अर्धा घरी बाहेर गेला होता, तो संध्याकाळी आला. "मी आणखी स्पष्टीकरण वाचलं. आता म्हणे, फक्त नव्या पिटीशनसाठी एक लाख डॉलर लागणार! आपल्या नोकऱ्यांवर काही फरक पडेलसं वाटत नाही."

"एक लाख डॉलर?"
"शंभर हजार. तुला अजिबात मराठी येत नाही असा वागू नकोस!"
"किती प्लॅन करत होतीस तू! आधी सगळं वाचून तरी घ्यायचंस!"
"ते काय फुकट घालवणारे का मी!" मी काहीही फुकट घालवत नाही. शॉवरमधून गरम पाणी यायच्या आधी जे थंड पाणी येतं, ते मी बादलीत गोळा करून मोगऱ्याला घालते. बाहेर पाऊस असेल किंवा फ्रीज झालं असेल तर ते पाणी फ्लशसाठी वापरता येतं.

मग बऱ्या अर्ध्याच्या सूचनेबरहुकून मी सध्याच्या प्रायॉरिटीच्या तारखा बघितल्या. "बघ, तुला म्हणालो नव्हतो का, श्रीयुत डॉनल्ड ट्रंप यांच्या काळात पटापट पुढे जातील तारखा!"
"खरंच की ते सत्तेवर आल्याला काय, ९ महिने झालेत जेमतेम. ही तारीखही नऊएक महिने पुढे गेल्ये की!"


आजची सकाळ झाली ती आपल्या सर्वांचे मित्र **** (याही निरागसाचं नाव मी सांगणार नाही) यांच्या चौकशीनं. "आपल्यातले कोणकोण H1Bवर आहेत?"

त्यांना ही सगळी माहिती दिली. बऱ्या अर्ध्याची प्रायॉरिटी डेट काय तेही सांगितलं. "याबद्दल मला ऐसीवर लेख लिहायला न सांगण्याबद्दल तुझ्यावर तिर्री कृपा होईल."

मग आणखी एक मित्र म्हणाले, "सत्यनारायण घाला आता." त्यांना जे उत्तर दिलं तेच इथेही लिहिते.

"मी गोंधळ घालणार. मनोहर जोशी वऱ्हाडी देशस्थ होते." मग त्यावर पुस्ती जोडली. "आता तुम्ही म्हणाल की या सगळ्या प्रकरणानंतर गोंधळ घालणं ही स्वस्त, अपेक्षित कोटी आहे. नाही, तसं नाही. ही पुरुषसत्ताक पद्धत आहे. यात जात आली, तीही वडलांचीच. जातीपासून सगळा पुरुषप्रधान जामानिमा आहे. एरवी काय, दारूची बाटली तोंडाला लावून भांडवलशाही स्त्रीवादही जोपासता आला असताच ना!"

 

सई केसकर Mon, 22/09/2025 - 06:47

ही काल कोथरूड परिसरात ऐकू येणारी दुसरी प्रतिक्रिया. परवा संध्याकाळी इथे सगळ्या न्यूज चॅनेलांनी १ लाख डॉलर/वर्ष अशी बातमी इमाने इतबारे दिली. पण मी सकाळी बीबीसी लावलं होतं तिथे व्हाईट हाऊसकडून आलेलं स्पष्टीकरण सांगत होते. पण लोकसत्ता वगैरे पेपरात रात्रीचीच बातमी आली होती. अशात भाजी घेऊन झाल्यावर कर्वेनगरमध्ये एका काकूंकडे गेले.त्यांनी मला असं का होतं आहे त्याबद्दल दिलेली काही स्पष्टीकरणं:
१. खरंतर मोदी पुतिनच्या गाडीत खूप वेळ बसला तेवढी एकच बातमी बाहेर आली..पण आतली बातमी माहिती नाही कुणाला (यांना आहे!). CIA चा मोदीला खलास करायचा प्लान होता.
२. मोदी म्हणाले आहेत की या ट्रम्प प्रकरणाचा मला वैयक्तिक फटका बसणार आहे (मोदी हिरे निर्यात करतात किंवा कारपेटं, कोलंब्या निर्यात करतात याबद्दल काहीच माहिती नव्हती मला) पण तरी मी देशाचं नुकसान होऊ देणार नाही. त्याचाच हा पुढचा भाग आहे.
३. शेवटी आईला एखादी गोष्ट करायला भाग कसं पडायचं? तिच्या मुलांना त्रास द्यायचा.

हे सगळं सांगून झाल्यानंतर "नशीब, आमच्या **** आणि **** २०११ सालीच सिटीझनशिप घेतली. त्यांना काही चिंता नाही. पण मग नात्यातली ३ ४ नावं घेऊन ते एचवन वर आहेत अशी माहिती दिली.

मग मी त्यांना म्हणाले कुणालाच काही चिंता नाहीये. सकाळी बीबीसी वर सांगत होते की हे सगळं फक्त नव्या व्हिसाला लागू आहे. मग काकूंचा चेहरा थोडासा पडला.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/09/2025 - 00:12

In reply to by सई केसकर

काकूंचा चेहरा पडला कारण एवढा विचार केला त्यांनी. तो फुकट घालवला श्रीमान ट्रंप यांनी.

'न'वी बाजू Sat, 27/09/2025 - 08:43

In reply to by सई केसकर

तरी बरे, ‘आमचा/ची xxx सिटिझन’ असणाऱ्या, झालेच तर नात्यातली दोघेतिघे एच१बीवर असणाऱ्या काकू स्वतःला ‘मध्यमवर्गीयां’तच गणतात.

Which goes on to prove: आम्ही नेहमी जे बोंबलून बोंबलून सांगत असतो, ते: ‘मध्यमवर्गीय’ हे आर्थिक स्थितीचे designation नसून मानसिक स्थितीचे/वृत्तीचे designation आहे.

पण लक्षात कोण घेतो?


‘मध्यमवर्गीय’ म्हणजे नक्की कोण? ‘आमच्या जमान्या’त (बोले तो, साधारणतः माझ्या अगोदरच्या पिढीपर्यंत), ज्याला अगदीच दोन वेळच्या खाण्यापिण्याची भ्रांत असण्याइतकीही ज्याची आर्थिक परिस्थिती वाईट नाही (परंतु त्यापेक्षा चांगलीही नाही) असा, चाळीतल्या एवढ्याश्या खोलीत नाहीतर वाड्यातल्या एवढ्याश्या खणात गोतावळ्यासह भाड्याने राहणारा, बहुतकरून पेचेक टू पेचेक जगणारा (परंतु त्यातूनसुद्धा क्वचित जमले तर जमेल तशी माफक चैन करू पाहणारा, मात्र त्याच वेळेस ‘कर्ज’ नावाच्या संकल्पनेस प्रचंड घाबरणारा), स्वतःच्या मालकीचे घर — किंवा, देव न करो, परंतु, चारचाकी वाहन — असण्याची कल्पनाही करू न शकणारा असा जो इसम असे, तो सामान्यतः स्वतःची गणना मध्यमवर्गीयां’त करून घेत असे. पुढे याची आर्थिक परिस्थिती थोडीशी सुधारली. चाळीतून नाहीतर वाड्यातून बाहेर पडून फ्लॅटमध्ये (अजूनही बहुधा भाड्याच्याच, परंतु हळूहळू सुधारत्या परिस्थितीबरोबर कधीकधी ओनरशिपच्यासुद्धा) राहू लागला. (बंगला बांधण्यापर्यंत त्याची मजल बहुधा अद्यापही गेली नव्हती.) गिरगावातून अगोदर दादरला नि मग विलेपार्ले-गोरेगाव-बोरिवली नाहीतर मुलुंड-डोंबिवली-बदलापूर असल्या दूरच्या उपनगरांत, किंवा सदाशिव-नारायण-शनवारातून अगोदर डेक्कन-कर्वेरोड-प्रभातरोड-एरंडवणे नि मग कोथरूडला नि आणखीही पुढे स्थलांतरित होऊ लागला. (त्याचवेळी, दूरवरच्या उपनगरांतील गुजराती-मारवाडी बंधू, ‘धंद्याला जवळ, नि म्हणून सोयिस्कर पडते’, म्हणून गिरगावातल्या चाळींतल्या याने सोडलेल्या एवढ्याश्या नि जुनाट, तोडक्यामोडक्या जागा अवाच्या सवा किंमत देऊन घेऊ लागले, नि त्यांची डागडुजी नि कायापालट करून तेथेच गिरगावात येऊन स्थायिक होऊ लागले. परंतु तो पूर्णपणे वेगळा मुद्दा.) चारचाकी वाहन घेण्याची याची ऐपत अद्यापही जरी नसली, तरी गेला बाजार दोनचाकी स्कूटर (किंवा अगदीच नाही तरी मोपेड तरी) याच्या नि याच्या पोरांच्या ढुंगणांखाली दिसू लागली. याची पोरेही कॉलेजनंतर (किंवा कॉलेजला दांडी मारून) उडप्याच्या हॉटेलात डोसे (किंवा, याच्या वाढत्या ऐपतीबरोबर, क्वचित इतरत्र सँडविचे-मिल्कशेक-ज्यूस (किंवा गेला बाजार पावभाजी तरी)) हादडताना सर्रास दिसू लागली.

मात्र, तरीही हा स्वतःची गणना ‘मध्यमवर्गीयां’तच करीत राहिला.

पुढे याची आर्थिक परिस्थिती हळूहळू आणखीही जसजशी सुधारत गेली, तसतसा क्वचित्प्रसंगी हा (चक्क कर्जबिर्ज काढून! — नि फेडूनसुद्धा!) modest बंगलेसुद्धा बांधून राहू लागला. कधीकधी चारचाकी वाहन विकत घेण्यापर्यंतही याची मजल जाऊ लागली. (फार कशाला, क्वचित्प्रसंगी याच्या खिशात क्रेडिटकार्डेसुद्धा दिसू लागली.) मात्र, स्वतःबद्दलची ‘मध्यमवर्गीय’ ही प्रतिमा काही याच्या टाळक्यातून पुसली जायला तयार नाही!


कोथरुडात राहणाऱ्या, ‘आमचा/ची xxx सिटिझन’ असणाऱ्या, झालेच तर नात्यातली दोघेतिघे एच१बीवर असणाऱ्या काकू या अंबानी-अदानींसारख्या गडगंज श्रीमंत नसतीलही. (किंबहुना, नसणारच. अन्यथा, कोथरुडात कशास झक मारावयास राहतील?) मात्र, त्या ‘मध्यमवर्गीय’ कशापायी?

त्या तर सुखवस्तू!

असो चालायचेच.

सई केसकर Sun, 28/09/2025 - 22:05

In reply to by 'न'वी बाजू

१. सुखवस्तू असल्याने वारंवार बाहेरून जेवण मागवायचं आणि ते ज्यातून येतं ते प्लॅस्टिकचे डबे धुवून एका खणात ठेवायचे
२. आपलं चांगलं व्हावं असं वाटणारे पण आपल्या शेजाऱ्याचं खूप वाईट झालं तर आपलं अजून चांगलं झालं असं समजणारे
३. प्रशांत दामलेची नाटकं आवर्जून बघणारे आणि सगळ्यांनी ती बघावीत म्हणून प्रयत्न करणारे
४. आपण एकदा "बसूया" म्हणत म्हातारे गोळा करून मुलानी अमेरिकेहून आणून दिलेल्या ड्युटी फ्री ब्लॅक लेबलमध्ये थम्सअप ओतून पिणारे.
५. गूळ, साखर, साबुदाणा, बटाटे, ज्वारीची भाकरी, भात हे सगळं डायबेटिसला "चालतं" असं पटवून देण्यासाठी सतत व्हॉट्सॲपवरून रीळ शोधून दाखवणारे
६. आपल्या मुलांनी अमेरिकेत किती घरं घेतली. त्यातली किती भाड्याने दिली, भारतात किती घरं भाड्याने दिली आहेत ही सगळी माहिती पुन्हा पुन्हा सांगणारे
७. दरवर्षी अमेरिकेहून परत आले की आता काय आम्ही परत जाणार नाही कारण २२ तास प्रवास झेपत नाही असं म्हणून परत.पुढच्या वर्षी २२ तासांचा प्रवास करून अमेरिकेला जाणारे.
८. अमेरिकेहून परत आल्यावर आठ दिवस सतत तिथल्या.आणि इथल्या रस्त्यांची तुलना करणारे (तरीही गणपती, नवरात्र वगैरे सणांना होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल चकार शब्दही न काढणारे)
९. पेशवाई, श्रेयस, झालंच तर कृष्णा डायनिंग, सुखकर्ता वगैरे तद्दन बामणी जेवण विकणाऱ्या हॉटेलच्या बाहेर लाईन लावून लावून उभे राहणारे आणि रंगात आले की कृष्णाचं थालीपीठ विरुद्ध श्रेयसचा मोदक अशी साधकबाधक चर्चा करणारे. शिवाय थाळीची किंमत भागीले पदार्थांची संख्या असं काढून सगळ्यात फायद्याची कोणती हेदेखील माहिती असणारे.
अजून बरीच लिहिता येतील पण सध्या मला सर्दी झाली आहे. खूप वेळ खाली बघता येत नाही सायनस ब्लॉक झाल्याने.

मारवा Mon, 22/09/2025 - 20:56

नुसत्या H1B ची जानकारी घ्यायची म्हटलं तरी
किती मोठा प्रवास करावा लागतो
लेखिकेचा भाजीपाला, स्वगते, इरिटेटिंग झाकलेली नावे, शेवटापर्यंत न सांगितलेले विचित्र शब्दांचे अर्थ, स्वतःच हसून घेतलेले विनोद, हे कमी म्हणून मध्येच टाकलेले (इरिटेटिंग फोटो ) त्यातल्या त्यात लतिफ अंड्यांवाल्याच्या निमित्ताने अचानक मारलेली असंबद्ध हाळी.
पण तरीही मी नेटाने चिवटपणे लेख वाचून संपवलाच कारण एकच H1B व्हिसा.
बरं एवढ सगळ वाचूनही बाई आनंदी झालिये का दुःखी तेही कळायला मार्ग नाही.
वैताग हो वैताग
असो.

ज्यांना लोक मध्यम वर्गीय समजता ते गरीब ह्या श्रेणी मध्येच येतात.

कारण ह्यांच्या कडे येणार आर्थिक source वर ह्यांची बिलकुल हुकूमत नसते. सरकारी निर्णय किंवा दुसऱ्या कोणत्या ही कारणाने ह्यांचे आर्थिक source पूर्णपणे बंद होऊ शकतात.

अति श्रीमंत, हेच फक्त श्रीमंत ह्या वर्गात येतात ह्यांच्या आर्थिक source वर ह्यांची पूर्ण हुकूमत असते.

आणि10 हजार ते 2 ते 3 लाख महिना कामावणारे हे अति गरीब ह्या श्रेणी मध्येच येतात.

श्रीमंत जी लोक त्यांना त्यांची सर्व संपत्ती कुठे कुठे आहे हे पण माहित नसते.
पूर्ण आयुष्यात ते त्यांच्या मालकीच्या काही संपत्तीत (रिअल estate) मध्ये एकदा पण जात नाहीत.

त्यांच्या च मालकीच्या किती तरी बँक खात्यात ते एकदा पण व्यवहार करत नाहीत.

दुकानदार, मोठं मोठे सरकारी अधिकारी.
खासगी क्षेत्रात कम करणारे मोठे अधिकारी ह्यांना श्रीमंत म्हणतं येत नाही.

कथेतील काकू गरीब श्रेणी मध्येच येतात. मध्यम वर्गीय श्रेणी मध्ये पण येत नाहीत

'न'वी बाजू Mon, 29/09/2025 - 06:10

In reply to by Rajesh188

कारण ह्यांच्या कडे येणार आर्थिक source वर ह्यांची बिलकुल हुकूमत नसते. सरकारी निर्णय किंवा दुसऱ्या कोणत्या ही कारणाने ह्यांचे आर्थिक source पूर्णपणे बंद होऊ शकतात.

मुद्दा विचार करण्यालायक आहे. परंतु, अतिश्रीमंतांनासुद्धा (म्हणजे, ज्यांना तुम्ही ‘श्रीमंत’ म्हणता, त्यांनासुद्धा) हे (कदाचित बऱ्याच कमी प्रमाणात, कदाचित इतक्या सहजासहजी नाही, परंतु) लागू होत नाहीच काय?

साधे उदाहरण घ्या. फाळणीच्या वेळेस घरदार सोडून निर्वासित म्हणून जे आले, ते सर्वच जण दरिद्री नसावेत. त्यातले काहीजण चांगले गडगंज श्रीमंतसुद्धा असावेत.

भरपूर पैसा असला, की काय वाटेल ते (अगदी सरकारपर्यंतसुद्धा) विकत घेता येऊ शकते, हे व्यवहारात अनेकदा दिसून येत असेलही. परंतु, लाखातील नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णव वेळा ते चालले, म्हणून लाखाव्या वेळेस ते चालेलच — नि प्रत्येकच प्रतिकूल परिस्थितीत इंश्युरन्स म्हणून ते कामी येईलच — याची ती ग्यारंटी असेलच, असे सांगता येणार नाही, नव्हे काय?

 

 

'न'वी बाजू Mon, 22/09/2025 - 22:56

या वाक्यातला काडेचिराईपणा क्र. २: माझ्याकडे वैध अमेरिकी व्हिजा नाही. मी अमेरिकेत राहते; मी अमेरिकी नागरिक नाही; मला दर तीन वर्षांनी मिळतो तो I-797 नावाचा कागद असतो. तो अमेरिकेत काम करणयाचा परवााना असतो. व्हिजा हा पदार्थ लागतो तो अमेरिकेत (किंवा कुठल्याही परदेशात) प्रवेश करण्यासाठी. जर अमेरिकेतून (किंवा इतर कुठल्याही परदेशातून) बाहेर पडलंच नाही तर व्हिजा हा पदार्थ मिळवणं कठीण असतं आणि त्याची उपयुक्तताही फार नसते. म्हणजे जर अमेरिकेत शिरायचंच नसेल तर व्हिजा कशाला हवा? अमेरिकेत राहताना अमेरिकेतून बाहेर पडलंच नाही, तर अमेरिकेत शिरता कसं येईल?

हा काडेचिराईतपणा (बव्हंशी) ठीकच आहे. ('बव्हंशी' अशासाठी, की यात थोडी भर टाकता येईलही, परंतु, प्रस्तुत संदर्भात ते महत्त्वाचे नाही.) मुद्दा हा आहे, की हा संज्ञासंभ्रम केवळ सामान्य भारतीयांच्याच नव्हे, तर बहुतांशी सामान्य अमेरिकन नागरिकांच्या ठायीसुद्धा आढळतो.

(किंबहुना, अमेरिकेत (१) या सगळ्या रामरगाड्यातून जावे लागणारे परकीय नागरिक, तथा (२) इमिग्रेशनप्रक्रियेशी संबंध येणारे तुरळक अमेरिकी नागरिक (इमिग्रेशनशी संबंधित वकील, इमिग्रेशनखात्याशी संबंधित अधिकारी, झालेच तर एच१बीवर लोकांना नोकरीवर ठेवणार्‍या धंद्यांमधील संबंधित अधिकारी), असे काही थोडेथोडके अपवाद वगळल्यास, सामान्य अमेरिकी नागरिक हा या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असतो.)

सांगण्याचा मतलब, सामान्य अमेरिकी नागरिक हा सामान्य भारतीय नागरिकाइतकाच (किंबहुना, अनेकदा त्याहून अनेक पटींनी) अडाणचोट असतो. (आणि, सर्वज्ञतेचा आव तर त्याहूनही कितीतरी पटींनी अधिक (पुणेरी लोकांना लाजवेल, इतक्या प्रमाणात) असतो. 'Illegal immigrant' या संज्ञेच्या विरुद्धार्थी संज्ञा म्हणून अनेक अमेरिकन नागरिकांच्या तोंडी 'legal citizen' असा (न-)शब्दप्रयोग ऐकलेला आहे. चालायचेच.)

काल संध्याकाळी मी बघितलं त्यानुसार EB2 या कॅटेगरीत ज्या भारतीय लोकांना १ डिसेंबर २०१३च्या आधी ही पायरी पार पाडली आहे, त्यांना आता पुढच्या पायरीवर जाता येईल. EB1 म्हणजे संशोधन करणारे वगैरे. EB3 म्हणजे पदवी नसलेले किंवा कमी अनुभव असलेले.

असेच काही नाही. तत्त्वतः (माझ्या कल्पनेप्रमाणे; चूभूद्याघ्या.) मास्टर्स डिग्री किंवा त्याहून अधिक पदवी धारण करणारे आवेदक हे EB2करिता पात्र असावेत, हे खरेच. (EB2चा फायदा असा, की एकंदर प्रोसेसिंगला लागणार्‍या वेळाच्या तुलनेत, EB1 > EB2 > EB3.) परंतु, केवळ उच्च पदवी असणे हे (EB2करिता) पुरत नाही. त्याचबरोबर, ज्या नोकरीसाठी (EB2खाली) ग्रीनकार्डचा अर्ज केला जात आहे, त्या नोकरीकरिता ती उच्च पदवी संबंधित, उपयुक्त, तथा आवश्यक आहे, हेदेखील सिद्ध करावे लागते, अन्यथा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता असते.

आता, भले तुम्ही पीएचडीधारक असाल, परंतु, केवळ सॉफ्टवेअर कुटण्याकरिता पीएचडीची आवश्यकता तथा उपयुक्तता ती काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतोच. या कारणास्तव (निदान 'आमच्या वेळे'स तरी) अनेक भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या (बहुधा वकिलाच्या सल्ल्याने) उच्च पदवीधारक उमेदवारांची ग्रीनकार्ड आवेदनेसुद्धा EB3खालीच करीत असत. (आता ट्रेंड बदलला असल्यास कल्पना नाही.)

तसेही, मला वाटते, EB3करिता किमान पात्रता बॅचलर्स डिग्रीधारक ही असावी. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, 'पदवी नसलेले' हे बरोबर वाटत नाही. ('(तुलनेने) कमी अनुभव असलेले' हे ठीक.)

दोन ते तीन यासाठी भारतीयांना खूप जास्त वेळ लागतो.

याला कारण असे आहे, की दर वर्षी किती नवी ग्रीनकार्डे जारी केली जाऊ शकतात, त्याला मर्यादा आहे, वार्षिक कोटा आहे. जेव्हा तुम्ही दुसरी पायरी पूर्ण करता, तेव्हा त्याचा अर्थ तुम्ही (ज्या कॅटेगरीतून ग्रीनकार्डकरिता आवेदन केलेले आहेत, त्या कॅटेगरीखाली) ग्रीनकार्ड जारी करण्यास पात्र आहात, यावर अधिकृत शिक्कामोर्तब होते. मात्र, ग्रीनकार्ड जारी होत नाही. कोटा उपलब्ध झाल्याशिवाय ग्रीनकार्ड जारी केले जाऊ शकत नाही. त्यामुळे, तुम्ही एका प्रकारच्या वेटिंग लिस्टमध्ये जाता. (या वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही (कॅटेगरीप्रमाणे कमीजास्त, परंतु) 'य' वर्षे तंगत राहू शकता. या काळात जर तुमच्या एच१बी स्टेटसची मुदत (सहा वर्षांच्या अधिकतम मुदतीपर्यंत पुनर्नवीकरण करूनसुद्धा) संपली, तर पूर्वीच्या काळी गाशा गुंडाळून अमेरिकेबाहेर पडावे लागत असे, आणि (तुमचा नोकरीदाता कबूल असेल, तर) अमेरिकेबाहेर राहून प्रक्रिया चालू ठेवून वाट पाहता येत असे. सध्याच्या नियमांनुसार, मात्र, एकदा का तुम्ही ही पायरी ओलांडली, की मग एच१बीच्या सहा वर्षांच्या मुदतीनंतरसुद्धा (ग्रीनकार्ड उपलब्ध होईपर्यंत) एच१बी स्टेटसचे पुनर्नवीकरण करीत राहता येते.)

आता, जसजसा कोटा उपलब्ध होत जातो, तसतशी बॅकलॉगमध्ये असलेली ग्रीनकार्डे जारी केली जात राहतात. दर महिन्यात इमिग्रेशनखाते जाहीर करते, की अमूकअमूक तारखेअगोदर ज्यांची पहिली पायरी (लेबर सर्टिफिकेशन) पूर्ण झाली, असे उमेदवार आता तिसर्‍या पायरीकरिता (म्हणजे प्रत्यक्ष ग्रीनकार्ड जारी होण्याकरिता) पात्र आहेत. (तिसर्‍या पायरीत उपलब्ध कोट्यातून प्रत्यक्षात ग्रीनकार्ड जारी करण्यासाठी आवेदन केले जाते. आधीच्या पायर्‍या या केवळ या तिसर्‍या पायरीकरिता पात्र होण्यासाठी. या तिसर्‍या पायरीत आवेदन केल्यापासूनसुद्धा प्रत्यक्ष ग्रीनकार्ड मिळायला वेळ लागू शकतो.) ही वर जी 'अमूकअमूक तारीख' म्हटली, तिला 'कटऑफ डेट', आणि ती गाठण्याला 'प्रायॉरिटी डेट करंट होणे' म्हणतात. ('प्रायॉरिटी डेट' बोले तो, पहिली पायरी (लेबर सर्टिफिकेशन) पूर्ण झाले, ती तारीख. प्रायॉरिटी डेट ही कटऑफ डेटच्या अगोदर आली, की प्रायॉरिटी डेट करंट झाली.)

आता, ही कटऑफ डेट ही सर्वांकरिता सारखी नसते. एक तर ती प्रत्येक कॅटेगरीकरिता वेगळी असते. शिवाय, (नक्की तपशील ठाऊक नाही, परंतु) कोठल्याही देशाला एका वर्षी उपलब्ध वार्षिक कोट्याच्या इतक्याइतक्या टक्क्यांहून अधिक ग्रीनकार्डे जारी करायची नाहीत, असा काहीतरी नियम असल्याकारणाने (चूभूद्याघ्या.), आणि ग्रीनकार्डाची मागणी वेगवेगळ्या देशांत कमीअधिक असल्याकारणाने, काही देशांकरिता हा कोटा पुरून उरतो (आणि त्यामुळे ते देश कायमच करंट असतात), तर काही देश हे वर्षानुवर्षे बॅकलॉगमध्ये राहतात.

या जागतिक मागणीच्या पॅटर्नांस अनुसरून, जगातील देशांचे वेगवेगळे गट करण्यात आलेले आहेत. या गटांना 'चार्जेबिलिटी एरिया' म्हणतात. भारत, चीन, मेक्सिको, (बहुधा फिलिपीन्ससुद्धा) अशा (ग्रीनकार्डाकरिता) प्रचंड मागणी असलेल्या देशांचे आपापले स्वतंत्र चार्जेबिलिटी एरिया आहेत (जे बहुतांश कॅटेगर्‍यांकरिता नेहमीच वर्षानुवर्षे बॅकलॉगमध्ये राहतात), तर उर्वरित जग हा एक समाईक चार्जेबिलिटी एरिया आहे (जो बहुतांश कॅटेगर्‍यांकरिता सामान्यत: नेहमीच करंट असतो).

थोडक्यात, तुमची कटऑफ डेट काय असेल (आणि त्यानुसार दुसरी पायरी ओलांडल्यावर तुम्हाला किती काळ वेटिंगलिस्टमध्ये तिष्ठत राहावे लागू शकेल), हे दोन गोष्टींवर अवलंबून असते: (१) तुमची कॅटेगरी, आणि (२) तुमचा चार्जेबिलिटी एरिया.

यात पुन्हा एक गंमत आहे. तुमचा चार्जेबिलिटी एरिया हा तुमच्या नागरिकत्वाच्या देशावरून ठरत नाही, तर तुमचा जन्म कोणत्या देशात झाला, यावरून ठरतो. म्हणजे, तुम्ही जर भारतीय नागरिक असाल, परंतु तुमचा जन्म हा (उदाहरणादाखल) नेपाळ, ब्रिटन, केनया, सिंगापूर, ब्राझील, अथवा न्यूझीलंडमध्ये झाला असेल, तर तुम्ही 'उर्वरित जगा'त मोडता, नि तुम्हाला फार काळ तिष्ठावे लागत नाही. मात्र, तुम्ही जर (उदाहरणादाखल) ब्रिटिश नागरिक असाल, परंतु तुमचा जन्म जर भारतात झाला असेल, तर तुमचा चार्जेबिलिटी एरिया हा 'भारत' राहील, नि तुम्हाला वर्षानुवर्षे वाट पाहात राहावी लागेल.

तीन ते चार याला धरू फार तर एखाद वर्ष लागतं.

आजकाल एका वर्षातच जर होत असेल, तर प्रगती आहे, म्हणावे लागेल. (माझ्या खेपेस जवळजवळ दोन वर्षे लागली होती.)

अर्थव्यवस्था दमदार असली - म्हणजे आता श्रीमान डॉनल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळात असते तशी - की नोकऱ्या जात नाही. अर्थव्यवस्था आजारी असली - म्हणजे डेमोक्रॅटांकडे सत्ता आल्यावर असते तशी - की नोकऱ्या धडाधड जातात.

हा हा हा!

यातली खोच अशी आहे, की सत्ता जेव्हा डेमोक्रॅटांकडून रिपब्लिकनांकडे (उदा. ट्रंपकडे) जाते, तेव्हा, डेमोक्रॅटांनी आपल्या कारकीर्दीत दमदार केलेली अर्थव्यवस्था त्यांना आयती मिळते. तिची ते आपल्या कार्यकाळात पूर्ण वाट लावून कारकीर्दीअखेरपर्यंत तिला पार आजारी पाडून टाकतात. त्यानंतर मग डेमोक्रॅट पुन्हा जेव्हा सत्तेवर येतात, तेव्हा रिपब्लिकनांनी वाट लावून आजारी पाडलेली अर्थव्यवस्था त्यांना मिळते, आणि त्यांची आख्खी कारकीर्द तिला पुन्हा दमदार करण्यात जाते.

त्यामुळे, (१) रिपब्लिकनांच्या (उदा., ट्रंपच्या) काळात अर्थव्यवस्था दमदार असते, तर (२) डेमोक्रॅट सत्तेत येतात, तेव्हा अर्थव्यवस्था आजारी असते, हे अक्षरशः खरे आहे.

(परंतु, काळजी नको. आता ट्रंप आला आहे. इतःपर डेमोक्रॅट निवडून येणार नाहीत (किंबहुना, निवडणुकाच होणार नाहीत), याकरिता, तथा, डेमोक्रॅटच काय, परंतु साक्षात ब्रह्मदेवाचा बाप जरी पृथ्वीवर अवतरला, तरी तोही पुनश्च सुधारू शकणार नाही, इतकी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची वाट लावण्याकरिता, ट्रंप सज्ज आहे. ट्रंप हय, तो साला कुछ भी (ना)मुमकिन हय.)

झालंय असं की गाडीचा एअरबॅगचा दिवा गेले काही महिने लागला आहे.

माझा गेली कित्येक वर्षे लागलेला आहे. सव्वा हजार खर्च येईल, म्हणताहेत. (आख्खे मॉड्यूल बदलावे लागेल, म्हणून सांगताहेत.)

जाऊद्या, झाले!

कॅलिफोर्नियात खाण्याची थोडी पंचाईतच होते, तिथे शाकाहारी काही सहज मिळत नाही.

अं... कॅलिफोर्नियात नक्की कोठे होतात म्हणे आपण?

(नाही म्हणजे, मी असताना (सर्का १९९३) इतकीही वाईट परिस्थिती असल्याचे आठवत नाही. (निदान व्हॅलीत तरी.))

सगळ्यावर मेले डुकराचे तुकडे नाही तर कोंबडीचे पंख!

हे वर्णन कॅलिफोर्नियापेक्षा (निदान एके काळी तरी) आमच्या जॉर्जियाला अधिक लागू होते. (बोले तो, चवळीची उसळ नाहीतर 'कॉलर्ड ग्रीन्स' नावाच्या त्या भयाण पाल्याची पालेभाजी जरी केली, तरी त्यातसुद्धा डुकराचे बारीकबारीक तुकडे टाकतील! नाही म्हणजे, डुकराचे (खाण्याकरिता) एरवी मला वावडे नाही, परंतु, चवळीची डुक्कर पेरून उसळ किंवा डुक्कर घातलेली पालेभाजी ही संकल्पना मला (खाऊ शकत असलो, तरीही) अद्यापही रुचत नाही. असो.)

भारतात आव्होकाडो मिळतात का? नसतील मिळत तर तिकडे टाको कसे खाणार? आणि 'ओल्ड एल पासो'चा टाको मसालाही?

१. एकंदर भारताबद्दल कल्पना नाही, परंतु, पुण्यात अव्होकाडो मिळतात, असे मागे एकदा अबापट म्हणाल्याचे आठवते खरे.

२. 'टाको' बोले तो... '** ऑल्वेज़ चिकन्स औट'वाले?

३. टाकोत 'एल पासो'चा टाको मसाला? अर्‍यार्‍यार्‍यार्‍यार्‍यार्‍यार्‍या!

असो चालायचेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/09/2025 - 00:16

In reply to by 'न'वी बाजू

सविस्तर टाको/आव्होकाडो/कॅलिफोर्निया विषयांबद्दल संध्याकाळी दुकान बंद केल्यावर लिहेन.

श्रीमान डोनाल्डचंद्रजी ट्रंपसाहेब यांना नावं ठेवायचं कारण नाही, हे बजावून ठेवते.

'न'वी बाजू Tue, 23/09/2025 - 01:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रीमान डोनाल्डचंद्रजी ट्रंपसाहेब यांना नावं ठेवायचं कारण नाही, हे बजावून ठेवते.

नावे कोठे ठेवली? प्रशंसाच तर केली आहे!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 23/09/2025 - 06:02

In reply to by 'न'वी बाजू

श्रीयुत डॉनल्डचंद्रजी पवारसाहेब हे जगातले सगळ्यांत थोर नेते आहेत. आणि त्यांना नोबेल पुरस्कार मिळायची गरज नाही. ते नोबेल पुरस्काराला मिळणार का, असा खरा प्रश्न विचारला पाहिजे.

असो. 

तर मी कॅलिफोर्नियात फोलसम नामक लालेलाल भागात जाते. तेच ते फोलसम जिथे तुरुंग आहे, किंवा होता, आणि तिथे जॉनी कॅशनं गाणं गायलं होतं. हल्लीच तिथे बर्नी आणि एओसीची रॅलीही झाली होती म्हणे. तिथे आमचे सहकर्मचारी जिथे कुठे जेवायला जायचं सुचवतात तिथे खाण्यासारखं काही असेलच तर ते गोडाचं काही असतं. 

ज्या ऑफिसात बसून काम करते, बरेचदा झोपा काढते, तिथे चालत जायच्या अंतरावर साधी कापुचिनोही मिळत नाही. ड्रिप कॉफी मिळते, ते वाईट चवीचं चिखलाचं पाणी असतं.

आणि तुमचा काय राग 'ओल्ड एल पासो'वर? 

मी इंग्लंडात असताना तिथला स्कॉटिश मित्र मला टाको करून खायला घालायचा. मी त्याच्याकडून शिकले आणि अमेरिकेत येऊन बऱ्या अर्ध्याला खायला घातलं. आता कुणी भारतीय लोक घरी जेवायला येणार असतील तर आम्ही त्यांना हे टाकोच खायला घालतो. विशेषतः भारतातून आलेल्या भारतीयांना. 'टॉर्चीज'चे टाको शनि‌वारी आणतो, सोमवारी संध्याकाळी घरचे. आता तेच खाऊन तुम्हाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. एवढे सगळे black bean घरात आणून ठेवले आहेत, व्हिजाची लफडी झाली तर तोवर रोज तेच खाऊन संपवून मगच जाऊ, असा विचारही मी करत होते; त्यात 'ओल्ड एल पासो'चा मसाला घालून मज्जा येते. त्यांचे तळलेले टाकोही चांगले असतात. खाऊन बघा एकदा!

त्यावर ओर्टेगाचा लाल सॉस आणि स्थानिक दुकानातला टोमाटियोचा हिरवा सॉस घालून क्रिसमस टाको खाल्ल्याशिवाय आमच्याकडे सोमवार संपत नाही. 

Rajesh188 Tue, 23/09/2025 - 09:09

हे इतके साधं असावं, लोकांनी ते अवघड करून समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मीडिया नी सोपी गोष्ट पहिली अवघड केली आणि मग ती अवघड माहिती लोकांना दिली.
Visa म्हणजे दुसऱ्या देशात प्रवेश कारण्यासाठी दिलेले अधिकार पत्र.

मग त्या visa चे अनेक प्रकार,
नोकरीं साठी, फिरायला, व्यवसाय करायला, व्यवसाय निमित्त फक्त काही दिवस भेट देण्यासाठी

H1b visa हा नोकरीं साठी दिले जात असलेलं अधिकार पत्र.
ट्रम sir बोलले h1b visa वर 88 लाख शुल्क लागेल.

ह्याचा अर्थ सरळ होता ज्यांना आज पासुन h1b visa वर अमेरिकेत प्रवेश करायचा आहे त्यांना हे शुल्क लागू होईल.

ऑलरेडी अमेरिकेत असणाऱ्या लोकांना ते शुल्क लागू होणार नाही ( हा दुसरा भाग समजून घेण्याचा असतो प्रत्येक वाक्याचे दोन भाग असतात एक स्पष्ट दिसतो तो आणि दुसरा गुप्त असतो पण तो समजून घ्यायचा असतो )
. आणि जे अमेरिकेत आहेत पण त्यांच्या visa ची मुदत संपली आहे त्यांना शुल्क लागेल.

पण लोकांनी अर्थ काढला h1b visa वाल्या सर्वाना हे शुल्क लागू होईल.
सोपं अवघड केले.

मीडिया नी पण अशा थाटात बातम्या दिल्या की सहज गैर समाज पसरवलं की सर्रास सर्व h1b वाल्याना 88 लाख भरायचे आहेत.

तिरशिंगराव Tue, 23/09/2025 - 09:46

schadenfreude याचा उच्चार शाडनफ्राइडा असा दाखवतोय गुगल.
शाडनफ्रॉइडं हे वाचल्यावर एकदम 'होडन सावर' या वाचलेल्या शब्दाची आठवण झाली. तेंव्हाही मी न समजल्यामुळे अर्थ विचारला होता. असो. अर्थ सांगण्याचा काडेचिराईतपणा करणार नाही.
लहानपणी एक कठपुतळीचा खेळ पाहिला होता. त्यांत एक बाहुलं आडवं पडलेलं असतं. पण कोणाचंही काही वाईट झालं की ते आपल्या पोटावर बांधलेल्या ड्रमवर वाजवायचं!

Rajesh188 Tue, 23/09/2025 - 14:42

ट्रम जो आकड तांडव करत आहे, अमेरिके च हित जपतो अशा valgana करत आहे.

त्या h1b visa अंतर्गत एकूण अमेरिका मध्ये निर्माण होणाऱ्या नोकऱ्या पैकी किती टक्के नोकऱ्या येतात?

. h1b visa अंतर्गत अमेरिका मध्ये service सेक्टर मध्ये उपलध असलेल्या स्वयं रोजगार मध्ये किती एकूण क्षेत्र च्या किती टक्के क्षेत्र येते.

आणि दोन्ही क्षेत्रात किती टक्के हिस्सा भारता सहित बाकी विदेशी नागरिकांनी काबीज केला आहे?

खरे आकडे माहित पडले तर अमेरिकन च ट्रम्प च विरोध करतील.
अमेरिकन अंध भक्त नसतील तर

'न'वी बाजू Tue, 23/09/2025 - 17:18

In reply to by Rajesh188

अतिशय चांगले मुद्दे!

नव्या एच१बीकरिता प्रतिवर्षी जास्तीत जास्त ८५,०००ची मर्यादा आहे. (६५,००० सामान्य, २०,००० उच्चपदवीधर.) एकूण लोकसंख्येच्या (किंवा फॉर्दॅट्मॅटर एकूण वर्कफोर्सच्यासुद्धा) तुलनेत हा आकडा (माझ्या मते) फार मोठा नसावा.

शिवाय, हा व्हिसा वाटेल त्या क्षेत्रात नोकरीसाठी उपलब्ध होत नाही. (उदा., आमच्या अटलांटाच्या महानगरपालिकेत सफाईकामगाराच्या नोकरीसाठी, किंवा पेट्रोलपंपावर गल्ला सांभाळण्याच्या नोकरीसाठी, किंवा कोपऱ्यावरच्या किराणामालाच्या दुकानात शेल्फावर सामान मांडण्याच्या नोकरीसाठी, झालेच तर मॅकडॉनल्ड्समध्ये बर्गर भाजण्याच्या नोकरीसाठी — फार कशाला, किराणामालाच्या दुकानात किंवा मॅक्डॉनल्ड्समध्ये मॅनेजरच्या नोकरीसाठीसुद्धा — एच१बी व्हिसा दिला जात नाही. काही ठराविक क्षेत्रांतच, जेथे स्थानिक मनुष्यबळ पुरेसे नाही — आणि employersना काही प्रमाणात मनुष्यबळ आयात करू देणे गरजेचे आणि/किंवा हिताचे आहे, असे सरकारचे मत आहे, अशा ठराविक क्षेत्रांतील नोकऱ्यांकरिताच एच१बी जारी केला जाऊ शकतो. (या क्षेत्रांत सॉफ्टवेअरक्षेत्राचा मोठा वाटा आहे, परंतु तेवढे एकच क्षेत्र नाही. नर्सिंग, विद्यापीठांतील प्रोफेसर, फार कशाला, तुटवड्याच्या काळात क्वचित्प्रसंगी सरकारी शाळांमधील शालेय शिक्षकांच्या नोकऱ्यांकरितासुद्धा लोकांना एच१बीवर आणण्यात आलेले आहे.)

झालेच तर, या व्हिसाकरिता employee आपण होऊन स्वतंत्रपणे आवेदन करू शकत नाही. एखाद्या संभाव्य employerने त्याच्या वतीने अगोदर सरकारदरबारी अर्ज करून मान्यता मिळवावी लागते. त्या मान्यतेच्या बळावर employee केवळ त्या विशिष्ट employerकडेच नोकरी करू शकतो. (Employee अगोदरच अमेरिकेत असेल, तर केवळ त्या मान्यतेच्या बळावर केवळ त्या employerकडे नोकरी करू शकतो; मात्र, अमेरिकेतून बाहेर पडल्यास (किंवा, अगोदरच अमेरिकेत नसल्यास) अमेरिकेत (पुन्हा) प्रवेश करण्यासाठी ती मान्यता उपयुक्त नसते; त्याकरिता (त्या मान्यतेच्या आधारावर) अमेरिकेच्या एखाद्या वकिलातीत जाऊन एच१बी व्हिसा मिळवावा लागतो. अगोदर अमेरिकेत असताना मान्यता मिळाल्यास एच१बी व्हिसाची गरज नसते; केवळ मान्यता पुरते. थोडक्यात, मान्यता ही नोकरी करण्यासाठी, तर व्हिसा हा केवळ अमेरिकेत जाण्यायेण्यासाठी. मान्यता आणि व्हिसा ही दोन स्वतंत्र documents आहेत, नि ती जारी करणारी सरकारी खातीसुद्धा भिन्न आहेत. मात्र, मान्यतेच्या documentशिवाय एच१बी व्हिसा (गरज असल्यास) मिळू शकत नाही.)

वर म्हटल्याप्रमाणे, ही मान्यता एका विशिष्ट employerबरोबर नोकरीशी बांधलेली असते. समजा, तुम्ही ती नोकरी सोडलीत, किंवा त्या employerने तुम्हाला नोकरीवरून कमी केले, किंवा तुम्ही नोकरी बदलून दुसऱ्या employerकडे नोकरी करायचे म्हटले, तर ती जुनी मान्यता त्याकरिता बाद ठरते. (किंबहुना, अनेकदा तुमचा जुना employer सरकारदरबारी कळवून ती मान्यता रद्दबातल करवून घेऊ शकतो. परंतु, त्याने तसे नाही जरी केले, तरीसुद्धा, ती जुनी मान्यता नव्या ठिकाणी नोकरीसाठी वैध नसते.) नव्या employerने तुमच्या वतीने नवे आवेदन करून नव्याने मान्यता मिळवावी लागते. (ही नवी मान्यता ८५,०००च्या कोट्यात मोजली जात नाही, कारण, आकडेवारीच्या दृष्टीने, ते अगोदर असलेली मान्यता केवळ दुसऱ्या employerकडे transfer केल्यासम गणले जाते.) हे नवीन आवेदन हे जुनी मान्यता बाद झाल्यापासून काही ठराविक अल्पमुदतीच्या आत करावे लागते, अन्यथा तुमचा रहिवास अवैध ठरतो. त्यामुळे, समजा तुम्ही एच१बीवर नोकरी करीत आहात, नि तुमची जर नोकरी गेली, तर त्या अल्पमुदतीच्या आत तुमच्याकरिता नवे आवेदन करणारा नवा employer शोधावा लागतो (नि त्या नव्या employerने ते नवे आवेदन त्या ठराविक मुदतीत करावे लागते), अन्यथा, ते होऊ न शकल्यास, तुम्हाला गाशा गुंडाळून अमेरिकेतून काढता पाय घ्यावा लागतो.

(याव्यतिरिक्त, हंगामी शेतकामगारांसाठी तात्पुरता व्हिसा असाही एक प्रकार असतो, परंतु तो एच१बीमध्ये मोडत नाही. ती वेगळी कॅटेगरी आहे.)

खरे आकडे माहित पडले तर अमेरिकन च ट्रम्प च विरोध करतील.
अमेरिकन अंध भक्त नसतील तर

इथे मात्र तुम्ही चुकता!

खरे आकडे, पाहायचेच झाले तर, उघड्यावर आहेत. आणि, अमेरिकन लोक अंधभक्तीत भारतीयांना कमी पडतात, अशी जर तुमची समजूत असेल, तर ती साफ चुकीची आहे. (शिवाय, इथे अमेरिकेत जी उजवी अपप्रचारयंत्रणा आहे, आणि तिच्यातून ज्या पातळीवरचा धडधडीत अपप्रचार पद्धतशीरपणे चालतो, त्या तुलनेत, तुमचे ते मोदी काय नि भाजप काय नि आयटी सेल काय नि काय काय, ही सर्व मंडळी म्हणजे बच्चे आहेत; नव्हे, संत आहेत!)

असो चालायचेच.

अहिरावण Tue, 23/09/2025 - 19:49

In reply to by 'न'वी बाजू

>>> तुमचे ते मोदी काय नि भाजप काय नि आयटी सेल काय नि काय काय, ही सर्व मंडळी म्हणजे बच्चे आहेत; नव्हे, संत आहेत

हा हा हा

सांगा त्या झोकसत्ताच्या झंपादकांना... दिवसरात्र मोदी बीजेपीच्या नावाने ठणाणा करत असतो....

Rajesh188 Fri, 26/09/2025 - 13:05

भावि्तव्य घडवण्यासाठी आणि अर्थीक प्रगती करण्यासाठी येथेच का जावं लागत.
हा प्रश्न जो पर्यंत पडत नाही तो पर्यंत असेच कोन कोणाला दम देईल, असेच कोणाला तरी वाटेल आमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत.
असेच कोणाला तरी वाटेल आमच्या वर आक्रमन होत आहे आमचे अस्तित्व धोक्यात आहे.

चांगले जीवन, उत्तम आर्थिक संधी, उच्च दर्जा च life, ह्या साठी इथेच का जावं लागत.
1) अमेरिका आणि europian देशात च का जावं लागते.
2) mumbai, पुणे, बंगलोर, हैद्राबाद मध्येच का जावं लागत.

कारण ही शहर सोडून आणि वरील देश सोडून बाकी प्रदेशात उत्तम सुविधा नाहीत.

लोकना त्यांचा भाग विकसित करण्या मध्ये एक रुपयाचा intrest नाही.
तेथील नेते भ्रष्ट आहेत त्यांच्या कडे दूर दृष्टी नाही.

जनता विकास च्या बाजू नी नाही.
जात, पात, आणि बाकी विविध फालतू गोष्टीत च ते अडकलेले आहेत त्या मुळे त्याच लायकीचे त्यांचे नेते आहेत.

मग विकसित देश असतील किंवा शहर त्यांनी ह्यांच्या चुकांची शिक्षा का भोगावी असा विचार उभाळून येणार च.
जसा आज अमेरिकन लोकात आला आहे.
भारतात भारतीय लोक पोट भरू शकत नाही किंवा भारत आपल्या लोकांना नोकऱ्या, व्यवसाय देऊ शकत नाही ह्या मध्ये अमेरिका च काही दोष नाही मग त्यांनी का सहन करावे.

तसें देशा अंतर्गत पण प्रगत शहर, प्रगत राज्य असा च विचार करतात.

केनिया का गरीब आहे?
त्यांना प्रगती नको आहे.
पाकिस्तान का धर्मांध आहे.

तेथील लोकांना तेच हाव आहे.
सोमलिया का गरीब आहे.

कारण तेथील लोकांना प्रगती नको आहे दुसरे विषय त्यांच्या साठी जास्त महत्वाचे आहेत.

सुनियोजित विकास भारताचा भारतीय सरकार नी केला असता,.
अशाच प्रगत विचाराच्या लोकांना भारतीय लोकांनी मत देऊन सत्ता दिली असती.
भारतीय मीडिया नी स्वत ची जबाबदारी नीट पार पाडली असती.
भारतीय, प्रशासन, न्याय व्यवस्था मध्ये kam करणारया लोकांनी जबाबदारी च भान ठेवून प्रामाणिक kam केले असते तर आज भारताला अमेरिका पुढे लाचार होण्या ची वेळ आली नसती.

तीन ऋतू, उत्तम हवामान, उत्तम जमीन, हुशार लोक असणारा हा भारत हा आज उत्तम स्थिती मध्ये असता.

फक्त अमेरिका सारख्या एका देशाने सहकार्य करणे सोडून दिले तर लाखो भारतीय लोकांचं आयुष्य बरबाद होत असेल तर.
भारत इक कमजोर देश आहे, आपला पाया खूप ठिसूळ आहे.

Fukat valgana करण्यात काही अर्थ नाही त्याला मूर्ख पणा समजला जाईल.