Skip to main content

सागर तळाशी

सागर तळाशी | तुटल्या केबल*
त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ ||

बाह्य जगताशी | संबंध तुटला
येरू डोकावला | आत तेव्हा || २ ||

अनाहत नाद | आला समेवर
कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ ||

स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात
ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||

~~~~~~~~~~~~
*Submarine Internet cable.

'न'वी बाजू Fri, 26/09/2025 - 07:30

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही नक्की तपशील माहीत नाहीत, परंतु… Submarine Internet cable असे गुगलून त्याखाली आशियाई क्षेत्रातील एवढ्यातल्या काही बातम्या सापडतात का, ते बघा.

(मीही तेच केले — वर अनन्त_यात्रींनी तळटीप दिली, म्हणून. फारसा काही तपशील हाती लागला नाही, परंतु, युरोप आणि आशिया यांना जोडणारी कुठलीशी समुद्रतळावरची केबल तुटली होती, ज्यायोगे भारत तथा आग्नेय आशियातील इंटरनेट काही काळाकरिता काही अंशी बोंबलले होते, एवढा अर्थबोध अंधुकसा झाला. आपल्या भागात (पश्चिम गोलार्धात) याची झळ पोहोचण्याचा प्रश्न नसल्याकारणाने, आपल्यापर्यंत याची माहिती पोहोचण्याची शक्यता सुतराम् नव्हती. त्यामुळे, तुम्ही किंवा मी याबद्दल अनभिज्ञ असणे — आणि, परिणामी, ही कविता आपल्या दोघांच्याही डोक्यावरून जाणे — यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

उलटपक्षी, कवीला या घटनेची झळ प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे पोहोचली असावी, जेणेकरून कवीला त्यावर कविता स्फुरली असावी. कदाचित, कवीच्या दृष्टीने ही घटना त्याबद्दल व्यक्त व्हावेसे वाटण्याइतकी महत्त्वाची असेलही. तसेही, कवीला कशाबद्दल व्यक्त व्हावेसे वाटावे, नि कोठली घटना कवीला व्यक्त होण्याइतकी महत्त्वाची वाटावी, हा सर्वस्वी कवीचा प्रश्न आहे, नि ते स्वातंत्र्यही त्याला आहे. तसेच पाहायला गेले, तर, ‘पश्चिम महाराष्ट्रात कोठेतरी, दूरवर पसरलेल्या हिरव्या गवतावर एक फूल डोलत होते’, ही काही आंतरराष्ट्रीय महत्त्वाची बातमी नव्हे. झालेच तर, ‘ग्यालरीतल्या, पाण्याने भरलेल्या पिंपात उंदीर जाऊन मरून पडले’ ही बातमी काही तुम्हाला (मुंबईच्या डेटलाइनीसहित) ‘न्यूयॉर्क टाइम्सा’त छापून आलेली आढळणार नाही. परंतु, या घटनांवर कोणीतरी रचलेल्या कविता एके काळी प्रचंड भाव खाऊन गेल्याच ना? तसेच आहे हे काहीसे!

शेवटी, ज्याचे जळते, त्यालाच कळते. चालायचेच.)