Skip to main content

तोरई (दोडके) + कोथिंबिर सूप

आज सकाळी सौ. दोडक्याची भाजी बनवत होती. मी विनंती केल्यावर सौ.ने मुगाची डाळ भाजीत टाकली. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 250 ग्राम, उरले. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. माझ्या सुपीक डोक्यात विचार आला, आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविणार होती. कोथिंबिर कापल्या नंतरच्या काड्या उरलेल्या होत्या. मी कड्यांसोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला. एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पाणी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोह्या सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. दोडक्याची भाजी न खाणारे छोटे बच्चे ही, हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो.

टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता).

आवड/नावड

'न'वी बाजू Tue, 09/12/2025 - 17:03

वेदकाळात सूप होते काय?

सूप ही मेकालेची देणगी नव्हे काय?

मारवा Tue, 09/12/2025 - 18:33

In reply to by 'न'वी बाजू

Chicken soup for soul या ग्रंथाचे वाचन करा.
जमल्यास पिता पिता वाचून बघा
We learn from observing nature. A seed produces after its kind. Apple seeds produce apples, not bananas. Grape seeds produce more grapes, not a harvest of onions. Seeds of love produce crops of love.
सदरहू ग्रंथातील एक सुंदर सुविचार
तुम्ही संस्कृतीसंमत सोमरस सुद्धा प्राशन करू शकतात

'न'वी बाजू Thu, 11/12/2025 - 05:12

In reply to by मारवा

नाही म्हणजे, माझे सुपाशी एकंदरीत काहीही वाकडे नाही, परंतु… चिकन सूप!!! अऽऽऽघ!!!!!!

(आमच्या बाजूस ‘चिकन सूप’ या द्रव्याचा आजारी पडण्याशी पारंपरिक, सांस्कृतिक असा घनिष्ठ संबंध आहे. किंबहुना, ‘चिकन सूप फॉर द सोल’ या (पुस्तकाच्या) शीर्षकाची प्रेरणादेखील याच सांस्कृतिक परंपरेतून उद्गम पावली असावी. बोले तो, आजारी पडलेले सोल लवकर बरे होऊन त्याला ताकद यावी, या कथित (आणि, एकमेव!) कारणास्तव त्या बिचाऱ्या सोलावर भडिमार करण्याचे ‘चिकन सूप’, अशा अर्थाने. (‘आपल्या’कडे कसा आजारी माणसावर परंपरेने साबूदाण्याच्या लापशीचा भडिमार करतात, अगदी तस्से. किंबहुना, हेदेखील तितकेच बेक्कार लागते. आणि, तितकेच कॅरेक्टरलेस! इकडे चिकन सूप कोणी आवर्जून, हौशीने मागवून वगैरे पीत असेल, याबद्दल प्रचंड साशंक आहे. किंबहुना, कधी रेष्टॉरंटांतून वगैरे पाहिल्याचे आठवणीत नाही. (अर्थात, माझ्या निरीक्षणांची मर्यादा ही केवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपुरती किंवा फार फार तर उत्तर अमेरिका खंडापुरती सीमित आहे, हे ओघानेच आले.)))

असो चालायचेच.

मारवा Thu, 11/12/2025 - 20:23

In reply to by 'न'वी बाजू

तुमच्या एकंदरीत लेखनशैलीवरून गैरसमज झाला.
म्हणजे शाकाहारी जसे त्यांनी खाल्लेल्या अन्नामुळे सात्विक असतात तितके तुम्ही "पुरेसे सात्विक" तुमच्या काहीशा हिंसक लेखनशैलीमुळे वाटत नाही.
तुम्ही पटाईत यांचा सूप try करा.

'न'वी बाजू Thu, 11/12/2025 - 20:55

In reply to by मारवा

शाकाहारी??? आणि, मी?????? कधीपासून, म्हणे?

(तुम्ही काय मध्यंतरी कम्युनिस्ट वगैरे झालात काय?)

(चिकन सूपला ‘अऽऽऽघ!’ म्हटले, ते शाकाहारी वगैरे असल्यामुळे नव्हे. (फॉर द रेकॉर्ड, मी गोगलगायीपासून ते गायीपर्यंत बऱ्याच वेड्यावाकड्या गोष्टी खाऊ शकतो, नि कधीकधी खातोसुद्धा.) चिकन सूपला ‘अऽऽऽघ!’ म्हटले, ते (आमच्या इकडले) चिकन सूप हा ‘अऽऽऽघ!’ म्हणण्याच्याच लायकीचा, अंगावर शहारे आणणारा प्रकार असतो, म्हणून. (पियो, तो जानो!))

असो चालायचेच.

मारवा Tue, 09/12/2025 - 18:37

In reply to by 'न'वी बाजू

Chicken soup for soul या ग्रंथाचे वाचन करा.
जमल्यास पिता पिता वाचून बघा
We learn from observing nature. A seed produces after its kind. Apple seeds produce apples, not bananas. Grape seeds produce more grapes, not a harvest of onions. Seeds of love produce crops of love.
सदरहू ग्रंथातील एक सुंदर सुविचार
तुम्ही संस्कृतीसंमत सोमरस सुद्धा प्राशन करू शकतात

विवेक पटाईत Wed, 10/12/2025 - 15:50

In reply to by मारवा

सोमरस सोम लता पासून बनते. दूध आणि दही आज मध मिसळून प्राशन केले जात होते. सोमरस पिऊन स्वप्निल अनुभव येणार नाही. बाकी हिवाळ्यात सूप पिण्याचा आनंद आहे.

सई केसकर Tue, 09/12/2025 - 19:30

In reply to by 'न'वी बाजू

त्यात आर्य स्त्रिया ज्वारी, बाजरी वगैरे श्रीधान्यांचा कोंडा काढायच्या. आणि मग मूठ मूठ भरून जात्यात टाकून दळायच्या आणि आर्य पुरुषांना भाकरी खाऊ घालायच्या.
जे सुपात असतात ते कधी ना कधी जात्यात जातात या म्हणीचा प्रत्यय आज येतो आहे. आज स्त्रिया स्वैराचारी झाल्या आहेत आणि पुरुषांवर संसार टिकवायची जबाबदारी आली आहे. पण विश्वाच्या हिशोबात हे परिवर्तन घडायला लागणारा काळ म्हणजे केवळ एक क्षण. आता मोदीजी आले आहेत. तर ते पुन्हा स्त्रियांना जात्यावर बसवणार आहेत. त्यासाठी त्यांनी श्रीज्ज्वला योजना काढली आहे. स्त्रियांनी जातं वापरल्याने त्यांचे ट्रायसेप आणि कोर मसल टोन होणार हा एक अधिकचा फायदा. त्यामुळे त्या शयनेशु रंभा या कॅटेगरीतही बसतील
#ट्रॅडवाइफ

'न'वी बाजू Thu, 11/12/2025 - 06:18

In reply to by सई केसकर

आता मोदीजी आले आहेत. तर ते पुन्हा स्त्रियांना जात्यावर बसवणार आहेत.

म्हणजे, ‘जात नाही, ते जाते’ याचा स्त्रियांना पुनःप्रत्यय येणार, म्हणायचा तर.

'न'वी बाजू Wed, 17/12/2025 - 18:47

In reply to by सई केसकर

त्यामुळे त्या शयनेशु रंभा या कॅटेगरीतही बसतील

शयनेषु रंभा… (पोटफोड्या ष. फरक आहे.)

नाही म्हणजे, तुम्हाला (इतःपर) ट्रोल करण्याची इच्छा नव्हती.  ((उप)भोगा आपले (माझ्या सिद्धीतून प्राप्त झालेले) नव-पौरुष — जगाच्या अंतापर्यंत!) परंतु, तुम्ही हे ज्या पद्धतीने लिहिले आहेत, त्यावरून, ती रंभा शयनात (अंथरुणात) शू करीत असल्याचा भास होतो, म्हणून (दुरुस्ती करण्यावाचून) राहवले नाही, इतकेच.

(अवांतर पृच्छा: रंभा वय वर्षे किती? नाही म्हणजे, अंथरुणात शू करते, म्हणून विचारले… (पॅंपर्स, की डिपेंड?))

सई केसकर Thu, 18/12/2025 - 16:57

In reply to by 'न'वी बाजू

अहो ट्रोल कसलं? याला मी फुकट शिक्षण समजते.
आता वेदकाळातली रंभा म्हणजे ८ - १० वर्षांची असेलच की.
काही लोकांना लागतो वेळ.

त्या काळात कुठले आले होते डायपर (असतीलही म्हणा. उद्या महामहिम काहीतरी पुरावा उपसून :बघा! आमच्या संस्कृतीत डायपर होते!: असं सांगू लागतीलही. रच्याकने, माझ्या या संगणकाची अवतरण चिन्हं उमटायची बंद झाली आहेत म्हणून मी ती वापरत नाही. पण ऑफिसचा बराच डेटा अजूनही याच संगणकावर असल्याने हा सोडून नवा घेतलेला वापरायला घेतलाच नाहीये. त्यामुळे अवतरण चिन्हं नसणे हे माझे अज्ञान नाही.

अजून अवांतर, मी नवमाता होते तेव्हा माझ्या पोराला डायपर न वापरता कापड वापरून पर्यावरणाचे संरक्षण करायचा निर्णय मी पहिले १० दिवस घेतला होता. त्यावेळी मला एका आजींनी बाळाला डायपरसारखं एक धोतर नेसविण्याचा धडा दिला होता. तसं मी आठ दिवस करून बघितलं आणि मग पर्यावरण गेलं XXXX असा निर्णय घेतला. त्यानंतर मी आदर्श मातेच्या आणखीन बऱ्याच निकषांवर नापास झाले. पण पहिले काही पराभव मनावर कोरले जातात. त्यामुळे डायपरची जाहिरात बघितली की मला अजून अपराधी वाटतं.

'न'वी बाजू Thu, 18/12/2025 - 21:40

In reply to by सई केसकर

आता वेदकाळातली रंभा म्हणजे ८ - १० वर्षांची असेलच की. काही लोकांना लागतो वेळ.

अर्थात. रंभा आयुष्यात कधी न कधी डायपरात शी-शू करणारी शिशु असणारच. ती शक्यता नाकारण्यात हशील अर्थातच नाही, इतकी ती उघड आहे.

परंतु, तेवढी एकच शक्यता नाही. वेदकाळापासून ते आजतागायत ती इंद्राच्या दरबारात थयाथया नाचीत आहे, म्हटल्यावर, ती ॲडल्ट डायपरात शी-शू करणारी जख्ख थेरडीसुद्धा असू शकते. (म्हणूनच विचारले, ‘पँपर्स’, की ‘डिपेंड’?) (काय त्या इंद्रालासुद्धा ॲडल्ट डायपरात हगणाऱ्यामुतणाऱ्या रंभेचा नाच पाहण्याची हौस, कळत नाही. There is no accounting for taste, हेच खरे!)

परंतु, का, कोण जाणे, ‘शयने शू रंभा’ हे आम्हांस त्या बालमुत्र्या रंभेचेच वर्णन असावेसे वाटते. बहुधा शिशुवर्गात नाहीतर पाळणाघरात ती नॅपटाइममध्ये अंथरूण ओले करीत असावी, नि तिच्या शिशुवर्गात (किंवा पाळणाघरात) हे सर्वज्ञात झाले असावे. आणि म्हणून, शिशुवर्गातल्या (अथवा पाळणाघरातल्या) तिच्याबरोबरच्या मुलांनी तिचे नाव (‘अंथरुणात शू करणारी रंभा’ अशा अर्थाने) ‘शयने शू रंभा’ असे पाडले असावे, नि तेच पुढे रुळले असावे. (शिशुवर्गातली मुले दुष्ट नसतात, म्हणून कोणी सांगितले?)

किंवा, पूर्वीच्या काळी लोक संयुक्त कुटुंबांत राहात असत, आणि, संयुक्त कुटुंबांच्या सनातन परंपरेस अनुसरून, प्रत्येक हगल्यापादल्या गोष्टीची चर्चा ही तर व्हायचीच. तद्वत, रंभा अंथरुणात शू करते, या बाबीची चर्चा तिच्या संयुक्त कुटुंबात झाली असलीच पाहिजे. आणि, त्या चर्चेच्या ओघात, (आणि, पुन्हा, परंपरेस अनुसरून) कुटुंबातील एखाद्या दिवट्या नातलगाने (बहुधा एखादा काका, वगैरे. किंवा, कदाचित, साक्षात रंभेचा जन्मदाता बाप!) कुत्सितपणे तिचे नाव ‘शयने शू रंभा’ असे पाडले असले पाहिजे, इतकेच नव्हे, तर पदोपदी, चारचौघांत, येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक पै-पाहुण्यासमोर त्याचा ज़िक्र करून ते प्रचलित केले असले पाहिजे. (संयुक्त कुटुंबे ही परंपरेने हलकट नसतात, म्हणून कोणी सांगितले? आणि, abuser हा बहुधा अतिनिकटवर्तीय कुटुंबापैकी असतो, या त्रिकालाबाधित नियमास ही केस तरी अपवाद नक्की काय म्हणून असावी?)

काही लोकांना लागतो वेळ.

तुमचा समंजसपणा वाखाणण्यासारखा आहे. दुर्दैवाने, समाजात असा समंजसपणा दुर्मिळ आहे, असे खेदाने म्हणावे लागते. चालायचेच.

उद्या महामहिम काहीतरी पुरावा उपसून :बघा! आमच्या संस्कृतीत डायपर होते!: असं सांगू लागतीलही.

अगदी!

फार कशाला, परंतु, त्यांच्या (किंवा, त्यांना नेमून दिलेल्या) अजेंड्यास जर पूरक असले, तर उद्या कदाचित साक्षात पटाईतकाकासुद्धा या विषयावर (इकडूनतिकडून उचललेल्या पोतेभर संस्कृत श्लोकांसहित) एखादा लेख पाडून हे ‘सप्रमाण सिद्ध’ करून दाखवतीलही; कोणी सांगावे!

अजून अवांतर, मी नवमाता होते तेव्हा माझ्या पोराला डायपर न वापरता कापड वापरून पर्यावरणाचे संरक्षण करायचा निर्णय मी पहिले १० दिवस घेतला होता. त्यावेळी मला एका आजींनी बाळाला डायपरसारखं एक धोतर नेसविण्याचा धडा दिला होता. तसं मी आठ दिवस करून बघितलं आणि मग पर्यावरण गेलं XXXX असा निर्णय घेतला.

असे पाहा. आपणही पर्यावरणाचा भाग आहोत, हे एकदा का लक्षात घेतले, की मग आपले जीवन जी गोष्ट शक्य (किंवा, किमानपक्षी, सह्य) करते, ती गोष्ट पर्यावरणाकरिता तितकीही वाईट म्हणता येणार नाही, नव्हे काय?

दुसरी गोष्ट म्हणजे, डायपरबद्दल जो पर्यावरणविषयी आक्षेप घेता येतो, तसाच काहीसा आक्षेप सॅनिटरी पॅड्सबद्दल घेता येणे शक्य आहे. म्हणून काय सर्व रजःक्षम स्त्रियांनी सॅनिटरी पॅड्स वापरणे सोडून देऊन पूर्वीच्या काळातल्या बायकांप्रमाणे कापडे वापरावीत (आणि, तीचतीच कापडे पुन्हापुन्हा धुवून, वाळवून वापरावीत), असे म्हणाल काय? (असा पुरस्कार मी करीत नाही, याची कृपया नोंद घ्यावी. (पटाईतकाकांबद्दल सांगवत नाही.))

आणि मग, सॅनिटरी पॅड्स हे एकदा का कोशर ठरविले, की मग, सॅनिटरी पॅड्स गधा, फिर डायपर क्यूँ नहीं गधा? असा प्रश्न ओघाने येतोच.

(बाकी, पर्यावरणवाद्यांबद्दल म्हणाल, तर काहीश्या mixed feelings आहेत. एक तर स्वतःस ‘पर्यावरणवादी’ म्हणविणारे हे (नेहमीच नव्हे, परंतु अनेकदा) ‘पर्यावरणवादी’ म्हणून masquerade करणारे, पर्यावरणवाद्याच्या कातड्यातले परंपरावादी असतात. (आणि, परंपरावादी हे परंपरेनेच स्त्रीशत्रू असतात, हे मी तुम्हाला नव्याने सांगायला नको., ) तसे जे नसतात, त्यातील अनेक जण हे केवळ ‘पर्यावरण’ या संकल्पनेने obsessed असतात, पछाडलेले असतात. झालेच तर, ‘पर्यावरण’ हा सध्याचा बझवर्ड आहे; तो उच्चारला, की समाजात आपला भाव वधारतो, नि आपली पोळीही भाजून घेता येते, हे जाणून त्याप्रमाणे वागणारे अनेक धूर्त असतात. (पैकी काही राजकारणी, नि सत्ताधारी राजकारणीसुद्धा असतात.) एवढे सगळे गाळून जे उरतात, ते मूठभर प्रामाणिक पर्यावरणप्रेमी. Sometimes they make sense, sometimes they don’t. (उलटपक्षी, Traditionalists almost never make sense. चालायचेच.) त्यामुळे, पर्यावरणाबद्दल जर कोणी काही सांगू लागले, तर ते ऐकून घ्यायचे. परंतु, लगेच त्यावर भाळून जायचे नाही. आपल्याला जर ते पटले (आणि/किंवा सोयिस्कर असले), तर (आणि तरच) ते स्वीकारायचे; अन्यथा, गा*** *ड ही सर्वसमावेशक जागा आहेच.)

त्यानंतर मी आदर्श मातेच्या आणखीन बऱ्याच निकषांवर नापास झाले.

हे निकष नक्की कोण ठरविते?

त्यामुळे डायपरची जाहिरात बघितली की मला अजून अपराधी वाटतं.

हेच, हेच!!! तुम्ही स्वतःला अपराधी वाटून घेता, म्हणून फाजील लोकांचे फावते! या बाबतीत तुम्हीच स्वतःच्या सर्वात वाईट शत्रू आहात. (तुम्हाला अपराधगंड शिकविणारे नव्हेत.)

असो.


तळटीपा:

इंद्राचा ‘दरबार’???? सावरकर थडग्यात गरागरा फिरू लागले की नाही, ऑलरेडी?

थयाथयाच नाचतात ना? असो. शब्द वापरून पाहायचा होता; वापरला. Posterity पाहून घेईल.

उद्या समजा एखादा स्ट्रिपटीज़ पाहायला गेला, नि तिथे त्या नाचणारणीने अंगावरचा ॲडल्ट डायपर३अ काढून दाखवला. पाहणारास कसे वाटेल? (परंतु, पाहणारा आमचा इंद्र असल्यास, त्यास त्यातूनही काही kinky pleasure प्राप्त होऊ शकेल, याबद्दल खात्री आहे.)

३अ भरलेला, की रिकामा, हा फार पुढचा प्रश्न.

After all, they are a mob, aren’t they?

कु-परंपरांच्या receiving endला, more often than not, स्त्रिया असतात, हे निरीक्षण फेटाळू शकाल काय? सतीप्रथा, केशवपन, वगैरे obvious, big-ticket candidates तूर्तास बाजूस ठेवा. साधी मुलाला डायपरऐवजी धोतर बांधण्याची परंपरा घ्या. म्हणजे वारंवार फरश्या पुसणे आले. त्या पुसणार कोण? धोतराच्या परंपरेचा पुरस्कार करणारे (बहुतकरून पुरुष) तर काही फरश्या पुसायला येणार नाहीत! फार कशाला, मुलाला धोतर बांधायला शिकवणाऱ्या (पारंपरिक) आज्यासुद्धा वेळप्रसंगी फरश्या पुसायला सरसावणार नाहीत; ते काम (परंपरेने) मुलाच्या आईवरच येऊन पडणार. म्हणजे, अडकली. बसलीये दिवसभर फरश्या पुसत. बाकीचे कामधंदे नि आपले आयुष्य सोडून. बाकी, ही (केवळ) हिंदू समाजावरची, हिंदू परंपरांवरची टीका नव्हे. कोठल्याही समाजात जा, परंपरा आणि परंपरावादी हे (परंपरेनेच) by and large स्त्रीशत्रू असतात, असे निरीक्षण आहे. But that does not make the fact any better, or any more tolerable, does it now? पण लक्षात कोण घेतो?

यात परंपरावादी स्त्रियासुद्धा आल्या. म्हणजे, पटाईतकाका कदाचित सॅनिटरी पॅड्सऐवजी कापडांचा पुरस्कार करतीलही, सांगवत नाही, अशा अर्थाचे विधान मी मघाशी केले खरे. परंतु, पटाईतकाकू तरी नक्की कशाचा पुरस्कार करतील, हे (छातीठोकपणे) सांगवते काय? The female of the species is not necessarily savvier than the male. (अर्थात, कदाचित यामागे पिढ्यान्‌पिढ्यांच्या conditioningचाही भाग असू शकतोच म्हणा.)

आमच्या एका कॉलेजकालीन मित्राचे महात्मा गांधींबद्दलचे मत या संदर्भात चिंत्य होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, ‘अहिंसा’ या संकल्पनेबद्दल (संकल्पना अर्थातच वाईट नाही, परंतु) हा मनुष्य इतका obsessed होता, की, उद्या जर का गजराच्या घड्याळाचे उत्पादन करण्याच्या प्रक्रियेत याला येन केन प्रकारेण, ओढूनताणून ‘अहिंसा’ घुसडता आली असती, तर तेथेदेखील त्याने ती घुसडली असती. नि वर त्याचा जिथेतिथे पुरस्कार केला असता. असो.

फारा वर्षांपूर्वी, महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी, पर्यावरणवादाचा झटका येऊन काही फतवे जारी केले होते, असे आठवते. आता, वास्तविक, प्लॅस्टिकच्या पिशव्या, झालेच तर स्टायरोफोमचे डबे, आदींचा समाजातील वाढता वापर हा केवळ पर्यावरणासच नव्हे, तर एकंदरीतच समाजास (सार्वजनिक स्वच्छता तथा आरोग्य, नगरव्यवस्थापन, आदि सर्वच दृष्टींनी) घातक आहे, आणि म्हणून त्या वाढत्या वापरास आळा घातला पाहिजे, हे धोरण म्हणून केवळ योग्यच नव्हे, तर स्तुत्य आहे. परंतु, अंमलबजावणी? (किंवा, अंमलबजावणीची पद्धत?) ‘इतःपर तुमच्याजवळ जर प्लॅस्टिकची पिशवी आढळली, तर पहिल्या अपराधाकरिता शिक्षा म्हणून तुमचा बुल्ला छाटू, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधाकरिता शिरच्छेद करू!’ (Well, भाषा अगदी शब्दशः अशी अर्थातच नव्हती, परंतु… भावना लक्षात आली असेलच.) वास्तविक, प्लॅस्टिकच्या पिशव्या नि स्टायरोफोमच्या डब्यांना पर्याय निर्माण करून, त्यांना उत्तेजन देऊन हे हाताळता आले असते. परंतु, नाही. आम्ही फक्त फतवे काढणार. ते पाळायचे कसे, ती तुमची डोकेदुखी. आणि, नाही पाळता आले, तर, डोकेदुखीवर शिरच्छेद हा सर्वोत्कृष्ट उपाय आहेच, नि तो पुरविण्यास आम्ही सज्ज आहोच. हे कसले पर्यावरणवादी? हे फक्त (सध्या पर्यावरणवादाची चलती आहे, म्हणून) पर्यावरणवादाच्या नावावर आपली हुकूमशाही लादू पाहणारे perennial हुकूमशहा. चालायचेच.

मारवा Fri, 19/12/2025 - 14:11

In reply to by 'न'वी बाजू

सन्माननीय अपवादात अतुल देऊळगावकर हे नाव सर्वात अगोदर डोळ्यासमोर येते. मी त्यांची व्याख्याने आवर्जून बघतो. त्यांचा व्यासंग ,त्याहून त्यांची तळमळ मनाला भिडते.
बाकी बरेचसे पर्यावरणवादी चू असतात हे खरे आहे.
काही पर्यावरणवादी "Greatness thrust upon them" यात सर्वात irritating म्हणजे ग्रेटा थेनबर्ग नावाची मुलगी.
काय ते अवडंबर मला वाटतं काही युनो आणि ग्रीनपीस का काय ते इत्यादी सारख्या एजन्सी असे नमुने प्लॅनिंग करून निर्माण करीत असावेत का ? अशी शंका मला नेहमी वाटते. म्हणजे तिला असेलही पर्यावरणाची चाड मात्र त्याचं असं हे फार systematic idol creation केलं जातं असावे बहुदा मेसेज पोहोचविण्यासाठी इत्यादी.

विवेक पटाईत Sat, 13/12/2025 - 16:17

In reply to by 'न'वी बाजू

वेदकाळातहोय, भारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये 'सूप' (सूपा किंवा युष) चा उल्लेख आढळतो. विशेषतः 'भोजनकुतूहल' (Bhojanakutuhalam) या १७व्या शतकातील संस्कृत ग्रंथात सूपाच्या तयारीबाबत संदर्भ आहेत. हा ग्रंथ रघुनाथद्वारा लिहिला गेला असून, तो भारतीय खाद्यशास्त्र आणि आयुर्वेदावर आधारित आहे. यात 'सूप प्रकरण' (Soopa Prakaran) आहे, ज्यात विविध दाळी-आधारित सूपांच्या रेसिपी आणि त्यांचे आरोग्यदायी गुणधर्म वर्णन केले आहेत.
भोजनकुतूहलमधील काही उल्लेख: मुद्ग सूपा (Mudga Soopa): हिरवी मूग दाळ, साखर, तूप आणि एला (कार्डमम) यांचा वापर करून तयार केले जाते. हे हलके पचनशील असते आणि सिद्ध अन्न प्रकरणात (Siddha Anna Prakaran) वर्णन आहे. माष सूपा (Masha Soopa): उडीद दाळ (माष), हिंग, आले आणि मीठ यांचा वापर. हे पेय (पान) म्हणून घेतले जाते आणि जास्त मल निर्माण करणारे असते. सामान्यतः सूप हलके, पचनास सोपे असून, कमकुवत पचन किंवा आजारी व्यक्तींसाठी उपयुक्त सांगितले आहे. यात धान्ये, डाळी आणि भाज्या एकत्र करून मंद मसाल्यांसह तयार केले जाते.
प्राचीन ग्रंथांमध्ये 'सूपा' हा शब्द दाळ किंवा मांसाच्या रसाचे पातळ पेय किंवा ब्रॉथसाठी वापरला जातो, जे आयुर्वेदानुसार दोष संतुलनासाठी महत्त्वाचे आहे (उदा. पित्त शामक).
इतर प्राचीन ग्रंथांतील उल्लेख:
• सूप शास्त्र (Supa Sastra): विशेषतः सूपांवर आधारित एक संग्रह ग्रंथ.
• रसदर्पण (Rasadarpana): "सूपा (खारट सूप), चांगले शिजवून आणि उकळट घेतल्यास हलके आहार होते" असे श्लोक आहे.
• महाभारत आणि चरक संहिता सारख्या ग्रंथांमध्येही युष (सूप) चा उल्लेख आहे, ज्यात पिठला भात, लांब मारू, सुके आले आणि डाळिंबाचा रस यांचा वापर करून तयार केलेले चवदार सूप वर्णन केले आहे.

'न'वी बाजू Fri, 19/12/2025 - 21:09

In reply to by विवेक पटाईत

विशेषतः 'भोजनकुतूहल' (Bhojanakutuhalam) या १७व्या शतकातील संस्कृत ग्रंथात सूपाच्या तयारीबाबत संदर्भ आहेत.

समजा, मानले. तरीसुद्धा, १७व्या शतकात म्हणजे वेदकाळात???

१७वे शतक बोले तो शिवाजीमहाराजांचा काळ नव्हे काय? म्हणजे, वेदांची रचना शिवाजीमहाराजांच्या काळात झाली काय? कदाचित, शिवाजीमहाराजांनी कमिशन करून लिहवून घेतले असतील? (की औरंगजेबाने? बोले तो, ‘मुघल आक्रांत्या’ने?)

अरे हो, शिवाजीमहाराजांचा काळ म्हणजे औरंगजेबाचाही काळ, नव्हे काय? (औरंगजेब हा शिवाजीमहाराजांचा समकालीन, अशी निदान माझी तरी समजूत होती. (चूभूद्याघ्या.) अर्थात, मी इतिहास काँग्रेसच्या काळात शिकलो; त्यामुळे, कदाचित ती चुकीचीही असू शकेल.) म्हणजे याचा अर्थ, भले औरंगजेबाने कमिशन करून वेद लिहवून घेतले असोत वा नसोत, परंतु, वेदांची रचना ही ‘मुघल आक्रांता’ हिंदुस्थानात नुसता आल्यावरच नव्हे, तर येऊन चांगला पाचसहा पिढ्या प्रस्थापित झाल्यानंतर मग झाली??? (म्हणजे, ‘मुघल आक्रांता’ सोडा, परंतु, हिंदुस्थानात पहिला मुसलमान येण्याअगोदर वेदांची रचना मुळात झालेलीच नव्हती???)

बरे झाले, सांगितलेत ते! बरेच काही नवीननवीन शिकायला मिळाले. आभार!

तिरशिंगराव Wed, 10/12/2025 - 07:55

इथेच नव्हे तर अनेक ठिकाणी, पाककृतींचे वर्णन करताना बहुसंख्य लोक, शिजवायच्या भांड्यात हे टाकले, ते टाकले असं लिहितात. लहानपणापासुन, भाजीत मीठ ,तिखट किंवा अन्य काहीही पदार्थ घातले, असं ऐकण्याची संवय असल्यामुळे, ही शब्दरचना कायम खटकते. ताटात अमुक वाढ असं म्हणण्याऐवजी, पोळी टाक, भाजी टाक हे कानाला कायम खटकते.
वर्तमानपत्रात बातम्या वाचतानाही साधारण असाच अनुभव येतो. लहान मुलगा किंवा मुलगी यांच्यासंबंधी काही दु:खद बातमी असली तरी , चिमुरडा, चिमुरडी असे शब्द वापरतात. अशा वेळी, चिमुकला,चिमुकली हे शब्दही मराठी भाषेत आहेत याची नवपत्रकारांना माहितीच नसते.
हम्म!

'न'वी बाजू Thu, 11/12/2025 - 12:14

In reply to by तिरशिंगराव

हा ‘घालणे’ विरुद्ध ‘टाकणे’ प्रकार माझ्या कल्पनेप्रमाणे स्थानिक बोलींतील शब्दप्राधान्याचा प्रश्न असावा. दोन्हीं पर्यायांत खरे तर गैर असे काहीही नाही.

माझ्या समजुतीप्रमाणे, मुंबईचे लोक शक्यतो ‘घालणे’ म्हणतात, तर पुण्याचे लोक त्याऐवजी ‘टाकणे’ म्हणतात. (झालेच तर मुंबईचे लोक ‘लादी’ म्हणतात, तर पुण्याचे लोक ‘फरशी’ म्हणतात. पुण्यात ज्याला ‘दुसरा मजला’ म्हणतात, त्याला मुंबईत ‘पहिला माळा’ (किंवा, क्वचित्प्रसंगी, ‘पहिला मजला’) म्हणतात. चालायचेच.)

उलटपक्षी, ‘घालणे’ या शब्दप्रयोगातून पुणेकराच्या मनःचक्षूंसमोर अनेकदा काही अश्लील संकेत आपोआप उभे राहतात, जे मुंबईकराच्या बाबतीत (तितकेसे) होत नाही. आणि, बोलीभाषेत मुंबईकर ‘मी तिथे गेलेलो’सारखे वाक्प्रयोग सर्रास वापरतात, जे ऐकून टिपिकल पुणेकरास अंगावरून झुरळ गेल्यासारखे वाटते.

प्रत्येक स्थानिक बोलीचा बाज वेगळा असतो, आणि, आपल्याला ज्याची सवय असते, त्याहून वेगळे काही ऐकू आले, की आपल्याला ते चमत्कारिक वाटते, इतकेच. पण तो कोणाचातरी स्थानिक ‘नॉर्म’ असू शकतो. (Earthworm या प्राण्याकरिता मराठीत गांडूळ, गांडवळ, दानवे, आणि काडू, इतके विभिन्न स्थानिक पर्यायी प्रतिशब्द आहेत, याची तुम्हाला कल्पना होती काय?)

असो चालायचेच.

(अतिअवांतर: हा मजल्यांच्या मोजणीच्या बाबतीत जो मुंबई-पुणे भेद आहे, अगदी तस्साच भेद इंग्रजीत इंग्लंड-अमेरिका तत्त्वावर आहे.)

चिमुरडा, चिमुरडी असे शब्द वापरतात. अशा वेळी, चिमुकला,चिमुकली हे शब्दही मराठी भाषेत आहेत याची नवपत्रकारांना माहितीच नसते.

बादली-बारडी… Same difference.

सई केसकर Thu, 11/12/2025 - 16:15

In reply to by 'न'वी बाजू

माझा नवरा मध्यप्रदेशमधला आहे. एकदा आमचं खूप भांडण चाललं होतं तेव्हा तो अगदी कळकळीच्या समजुतीने म्हणाला.
हे बघ, आपल्याला पुढे वाढायचं आहे.

आय वाझ लाईक, what? टाइम्प्लिस.

तर ते, हमे आगे बढना है याचं भाषांतर होतं.
तसंच: अचार डाला (याचं का कोण जाणे पण लोणचं टाकलं असं भाषांतर करतात. डालना = घालणे असं मला वाटतं)
खिलौने + खेळणी = खेळवणी
सेब + फळ = शेवफळ (सुरुवातीला तिथली शेवही प्रसिद्ध आहे म्हणून मला वाटलं होतं कुणी मला शेवेचा लाडू आणून देणार आहे. तर सफरचंद कापून दिलं)
आणि एखाद्याशी गप्पा मारल्या = मी तिच्याशी गोष्टी करून घेतल्या (?)
ले लो चं भाषांतर म्हणून घेऊन घेतलं.
दे दो चं भाषांतर म्हणून देऊन दिलं

हे सगळं लक्षात आल्यावर आमची फॅमिली भाषा मी हिंदी केली.

'न'वी बाजू Fri, 12/12/2025 - 08:30

In reply to by सई केसकर

नाही म्हणजे, मध्यप्रदेशातील मराठीभाषकांची मराठी (वास्तविक, तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला पाहिजे.) ही काही औरच असते, याबद्दल तशी कल्पना आहे, परंतु तरीही, ‘पुढे वाढायचे आहे’ हा प्रकार (पुणेरी मराठीत सांगायचे तर) केवळ उच्च आहे.

नमन!

मारवा Thu, 11/12/2025 - 18:32

In reply to by 'न'वी बाजू

मी तसाही मराठी माणूस जन्माने नसल्याने मला न्यूनगंड बाधत नाही म्हणजे मी थोडा गेंड्याच्या कातडीचा सुद्धा आहे. पण तरीही माणूस आहे शेवटी.
एकदा पुण्यात नवसदाशिवात एका ठिकाणी वास्तव्यास होतो. तेथील आजी म्हणाल्या " अरे दिवे मालवले का ? "
तेव्हा मात्र मी फारच बुजून गेलो होतो माझा भाषिक आत्मविश्वास ढासळला होता म्हणजे अर्था च्या बाबतीत नाही पण आपण असं मराठी कधीच बोलू शकणार नाही या अर्थाने.
तुम्ही तो महागुरूंचा अजरामर video बघितलाय का? ज्यात ते अरे दत्ता आला का ? असे पुन्हा पुन्हा बोलून दाखवतात तसे मी मग कुठेही संधी मिळाली की अरे दिवे मालवले का ? असे विचारत सुटलो होतो.

anant_yaatree Thu, 11/12/2025 - 19:54

In reply to by मारवा

शाळेत असताना (मुंबईत) एकदा मित्राकडे वार्षिक परीक्षेच्या अभ्यासासाठी गेलो होतो. संध्याकाळ झाल्यानंतर त्याच्या अभ्यासाच्या खोलीतून बाहेर येताना त्याची आई म्हणाली, " खोलीतला दिवा काढून आलात ना रे ?".

दिव्याचा स्विच बंद करताना आजही कधी कधी आपण दिवा "काढतोय" असं वाटतं.

'न'वी बाजू Thu, 11/12/2025 - 20:24

In reply to by anant_yaatree

संध्याकाळ झाल्यानंतर त्याच्या अभ्यासाच्या खोलीतून बाहेर येताना त्याची आई म्हणाली, " खोलीतला दिवा काढून आलात ना रे ?".

हो, ‘दिवा काढणे’ असा वाक्प्रचार मुंबईकरांच्या (विशेषेकरून, अगोदरच्या पिढ्यांतील मुंबईकरांच्या) तोंडून अनेकदा ऐकण्यात आलेला आहे खरा. (औरंगजेबाने संभाजीमहाराजांचे डोळे काढले होते, त्याची आठवण होते.)

(आणि, का, कोण जाणे, परंतु दिव्याच्या बल्बला ‘ग्लोब’ म्हणून संबोधतात. असो.)

मारवा Thu, 11/12/2025 - 20:30

In reply to by anant_yaatree

पुण्याला एक वेगळी मराठी काढून द्यावी असे नेहमी वाटते
ती ग्रेस यांची ओळ आहे मग वेगळे आभाळ द्यावे अशा पाखरांना (नीट आठवत नाही चूकभूल देणे घेणे)
कारण इतरांना आपल्या मराठीत काही भेसळ झाली तर चालते पण पुणेकरांना आपल्या पुणेरी मराठीत खडा आलेला खपत नाही.
( तिथे असत्या तर पुणेकर आजींनी अक्कल काढली असती मुबईकर आईची दिवा काढल्यावर)

नंदन Sat, 13/12/2025 - 13:38

In reply to by 'न'वी बाजू

क्रियापदांच्या (भौगोलिक, वाक्यांतल्या नव्हे) स्थानवैशिष्ट्यांबद्दल चाललेल्या चर्चेसंदर्भात, ट्रेव्हर नोआचं हे सौथाफ्रिकनइंग्लिश आठवलं: https://youtube.com/shorts/x3YBbhHf5DQ?si=BzjtRsoAlsgYMZBh