Skip to main content

धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण

धुरंधर : रागाचे आणि बदल्याचे राजकारण 

अविनाश गोडबोले

 

Dhurandhar film poster

आदित्य धर यांचा ‘धुरंधर’ हा चित्रपट गेले अनेक आठवडे गाजतोय. भारत-पाकिस्तान संबंध, भारताच्या गुप्तचर संस्था, त्यांची विशेष कामगिरी आणि सैन्य या विषयावरचे चित्रपट नेहमीच प्रसिद्ध होतात आणि जनतेमध्ये लोकप्रिय होतात. ‘धुरंधर’ तरीही या विषयावरच्या इतर सिनेमापेक्षा वेगळा आहे. गेल्या काही वर्षांत पठाण, एक था टाइगर, एजेंट विनोद, उरी , राझी  त्याचप्रमाणे शेरशाह, बॉर्डर, लक्ष्य अशा चित्रपटांमध्ये भारत-पाकिस्तान युद्धे आणि गुप्तचरांच्या कारवाया हे विषय दाखवले होते. तरीही धुरंधर एका वेगळ्या प्रकारचा सिनेमा आहे. युद्धविषयक चित्रपट राष्ट्रवाद, सैनिकांचे शौर्य आणि राष्ट्रीय एकता ह्या विषयांवर केंद्रित असतात. पण धुरंधर बघताना राष्ट्रीय एकतेच्या विषयाला फाटा दिला आहे असं वारंवार वाटतं

 

शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत मॅककार्थ्यीझम नावाची प्रक्रिया सुरु होती. जोसेफ मॅककार्थी ह्या रिपब्लिकन सेनेटरने स्टेट डिपार्टमेंटमधील (परराष्ट्र विभाग) सोविएत हेर पकडण्यासाठी एक मोहीम रेटली. अमेरिकन मूल्यांपेक्षा वेगळ्या वागणाऱ्या लोकांच्या याद्या त्यात तयार केल्या गेल्या. त्यानंतर ही मोहीम प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था, गैरसरकारी संस्था (NGOs),  विचारवंत यांच्यापर्यंत पोहोचली होती. पण तेंव्हा साम्यवादाला विरोधाचे कारण दाखवत संरक्षण खर्च, विनाकारण वाढवलेली सोविएत रशियाची भीती, वंशवाद या विषयांवर डेमोक्रॅट आणि इतर लोक जे बोलत होते त्यांना एकदम देशविरोधी ठरवले गेले. ह्या मोहिमेअंतर्गत अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांचे नागरी स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आणि एकूणच देशात अविश्वासाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण केले गेले

 

धुरंधरमध्ये अजय संन्याल ह्या भूमिकेत आर माधवन भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासारखी भूमिका करताना दिसतो. ह्या व्यक्तिरेखेचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे आणि जे भारतात चालू असलेल्या मॅककार्थ्यीझमची भूमिका पार पाडतं. संन्याल एका फ्रेममध्ये म्हणतात की “भारताचे सर्वात मोठे शत्रू भारतीयच आहेत, आणि पाकिस्तानी यात दुसऱ्या क्रमांकावर येतात.” ह्या वाक्याचा जनमानसावर मोठा प्रभाव दिसून येतो. धुरंधर सिनेमा आल्यानंतर त्याविषयी समीक्षकांच्या परीक्षणांवर लोकांची बारीक नजर आहे. अनुपमा चोप्रा यांनी सिनेमावर टीका केल्यानंतर त्यांच्यावर गलिच्छ शब्दांत टीका करून त्यांना पाकिस्तानधार्जिणे ठरवले गेले. त्यामुळे परीक्षणाचा तो विडिओ युट्युब आणि इतर माध्यमांतून त्यांना काढून टाकावा लागला. अशीच टीका सुचरिता त्यागी यांच्यावर झाली आहे

 

धुरंधरच्या सुरुवातीला ‘हा सिनेमा काल्पनिक आहे आणि सर्जनशील स्वातंत्र्याच्या अंतर्गत येतो’ असे अस्वीकरण दाखवले आहे. पण तरीही १९९९च्या IC-८१४च्या अपहरणाच्या केसपासून ते २६/११च्या हल्ल्यांपर्यंतचे अतिरेकी, त्यांचे सूत्रधार, त्यांची नावे आणि फोटो खरे दाखवले आहेत. १३ डिसेंबर २००१च्या संसदेवरच्या हल्ल्याची पुनर्निर्मिती दाखवत त्यात आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये मेलेल्या अतिरेक्याच्या धडाचे उडलेले तुकडे दाखवले आहेत. हे अतिरेकी भारतीय अधिकाऱ्यांना “तुम्ही हिंदू कसे नाजूक आहात” असे चिथवताना दाखवलेले आहे२६/११च्या हल्ल्यातील अतिरेकी आणि त्यांचे सूत्रधार यांच्यातील संभाषणांचे खरे रेकॉर्डिंग ऐकवले आहे, ज्यात महिला, मुले, अमेरिकन आणि यहुदी नागरिकांना टार्गेट करून मारावे अश्या सूचना दिल्या गेल्या, ते आपण पुन्हा एकदा ऐकतो. पण, १९९९ मध्ये भारतीय विमानाचे अपहरण का झाले? २००१ साली भारताच्या संसदेवर हल्ला का झाला? त्या वेळी कोणाचे सरकार होते? २६/११ ची पूर्वसूचना असताना सरकारी आणि पोलीस यंत्रणा गाफील का होती, असे प्रश्न एकदाही कोणी विचारताना दिसत नाही

 

पण हे सगळं होत असताना कराचीतील लियारी भागातील कथाकथन आणि दृश्यदर्शन, तिथले आपल्याच आईची हत्या करणारे आणि आपल्या बलुची जमातीतल्या लोकांना क्रूरपणे मारणाऱ्या पाकिस्तानी सैन्याशी हातमिळवणी करणारे गुंड, ISIचे सूत्रधार, तिथली एकूणच अराजकता यांचे आपल्याला दर्शन दिले जाते. आपण ज्या शत्रूचा सामना करतोय तो कसा विचित्र, अमानुष आहे आणि त्याच्यात कधीही आणि काहीही बदल होणार नाही हे जनतेला दाखवण्याचा हा आटापिटा आहे हे समजायला फारसा वेळ लागत नाही. पण हे बघताना आपण मुंबईतली टोळीयुद्धं विसरतो, आपल्याच देशातील भाषावाद विसरतो, आपल्या शहरात राजरोसपणे होणारी हत्याकांडे विसरतो, ९०च्या दशकातील बिहारमधील रणवीर सेना आणि इतरांनी लढलेली जातियुद्धंसुद्धा विसरतो, आणि आपला शत्रू कसा क्रूर आहे आणि आपल्या आसपास राहणारे लोक कसे त्यांना समर्थन आणि साहाय्य देतात याची आठवण आपल्याला वारंवार होते

 

दुसरा विषय असा, की देशभक्तीचे सिनेमे पुष्कळदा तरुण आणि शाळकरी मुलांसाठी असतात. पण धुरंधरमध्ये ज्या प्रकारे हिंसाचाराचे प्रदर्शन केले आहे ते बघून मोठ्या माणसांना पण असह्य वाटतं. शत्रूची विकृती आणि क्रूरता दाखवण्यासाठी फोडलेली डोकी आणि वाहणारे रक्त दाखवण्याची गरज नसते. ‘सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स’, किंवा ‘डाय हार्ड’मधला हिंसाचार वेगळा, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ आणि ‘१९१७’चा, ‘बुक थीफ’चा हिंसाचार वेगळा, ‘१२ इयर्स अ  स्लेव्ह’, ‘जँगो अनचेन्ड’चा वेगळा, आणि ‘किल-बिल’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा वेगळ्या प्रकारचा हिंसाचार आपण बघितला आहे. आपण ‘सत्या’, ‘वास्तव’ आणि ‘कंपनी’मधली टोळीयुद्धंसुद्धा बघितली आहेत. पण धुरंधरचा प्रकार काहीतरी वेगळा आणि विचित्र आहे

 

धुरंधरला मान्यता देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने महात्मा फुले यांच्यावर बनलेल्या सिनेमावर आक्षेप घेतले होते. त्यातील अनेक दृश्यं आणि संवाद बदलायला लावले होते. तसाच पोलिसांमधील जातीयवाद, हिंसाचार, स्त्रीद्वेष, आणि पोलिसांची सांप्रदायिक मानसिकता आणि भ्रष्टाचार दाखवणाऱ्या ‘संतोष’ नावाच्या सिनेमाला त्याच सेन्सॉर बोर्डाने इतके बदल आणि कट्स सुचवले की इतके बदल केल्यास थिएटरमध्ये सिनेमा दाखवणे निरर्थक होईल असा निर्णय त्याच्या दिग्दर्शकाने घेतला.  

 

ज्यांनी दहशतवादावर चांगलं काम केलंय अशा एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांशी ह्या सिनेमावर चर्चा करण्याची संधी नुकतीच मिळाली. त्यांच्या मतानुसार कराची हे पाकिस्तानी सत्तेचे केंद्र दाखवणे आणि तिथल्या गुंडांचे महत्त्व अवाजवी मोठे असल्याचे दाखवणे हा एक खोडकरपणा आहे. लाहोर, पंजाब प्रांत आणि पंजाबी भाषा पाकिस्तानी सत्तेचे केंद्र आहे. पाकिस्तानचे १८ पैकी १२ सेनाप्रमुख पंजाब प्रांतातले होते. त्यांच्या मतानुसार धुरंधर हा सिनेमा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ची पाकिस्तान आवृत्ती म्हणून फक्त मनोरंजनासाठी बघावा

 

एकीकडे धुरंधर प्रसिद्ध आणि लोकप्रिय होताना, दुसरीकडे त्रिपुरातील एक युवकाची डेहराडूनमध्ये वंशद्वेषाच्या हल्ल्यात हत्या झाली, बांगलादेशमधल्या हिंदूंच्या मृत्यूंची कारणे दाखवत काश्मिरी शाल विक्रेत्यांना व्यापार करण्यास प्रतिबंध केला गेला. पश्चिम बंगालमधील एका नागरिकाची ओडिशामध्ये बांग्लादेशी असल्याच्या आरोपावरून हत्या केली गेली आणि बरेलीमध्ये एका मुलीच्या वाढदिवसासाठी जमलेल्या युवकांमधील मुस्लीम युवकांना ‘लव्ह जिहाद’ करत असल्याच्या आरोपावरून मारहाण झाली. ह्या सगळ्या घटना भारतात गेल्या १० दिवसांत घडल्या आहेत

 

शेवटी :

भारतातल्या १९९९ नंतरच्या सगळ्या आतंकवादाच्या घटना हाफिज सईदने घडवून आणल्या आहेत, ज्याला भारताने IC-८१४च्या अपहरणानंतर सोडले होते. पण म्हणून तेंव्हाचे सरकार देशद्रोही ठरते का? आणि, न्याय आणि बदला यांत आपण काही फरक करायचा की नाही? इतिहासातील चुका शोधायच्या ठरवलं तर आत्मपरीक्षण करायचं की शत्रूंना दोष द्यायचा? जनमानसाला अस्वस्थ करून, इतरांची भीती दाखवून आणि आपल्या चुका लपवून केले जाणारे ध्रुवीकरण आजच्या भारताचे आणि एकूणच जगाचे सत्य आहे. धुरंधर सिनेमा ह्या भीतीच्या व्यापक राजकारणाचा भाग आहे यात काही शंका नाही

  

अविनाश गोडबोले

लेखक जिंदल स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स अँड ह्यूमॅनिटीज, जिंदल ग्लोबल युनिवर्सिटी, सोनीपत, हरयाणा इथे प्राध्यापक आहेत. या लेखातले विचार वैयक्तिक आहेत.


 

सई केसकर Thu, 01/01/2026 - 15:30

चकचकीत वेष/केशभूषा, जुनी आणि नवी गाणी बरोबर उचलून केलेला साउंडट्रॅक, पुष्पा, ॲनिमल अशा सिनेमानंतर भारतीय सिनेमाने उचललेला स्त्रीद्वेष आणि हिंसा यांचा एक यशस्वी फॉर्म्युला : हे सगळं या सिनेमात आहे. पण सरळ सरळ propaganda म्हणून ओळखू येणाऱ्या सिनेमाला कुणी हेरगिरी, कुणी मसाला सिनेमा वगैरे म्हणत सुटलं आहे.
त्यातलं जे गाणं प्रसिद्ध होतंय कारवां की तलाश है ते मूळ गाणं ऐकलं तर त्याचे शब्द या सिनेमाच्या संदेशाशी अजिबात सुसंगत नाहीत. पण ते सोयीस्करपणे वगळले आहेत.

'न'वी बाजू Thu, 01/01/2026 - 19:24

In reply to by सई केसकर

पण सरळ सरळ propoganda म्हणून ओळखू येणाऱ्या सिनेमाला

आता यापुढे हे असलेच सिनेमे यायचे. (तसाही, हा trend नवा नाही.)

त्यातलं जे गाणं प्रसिद्ध होतंय कारवां की तलाश है ते मूळ गाणं ऐकलं तर त्याचे शब्द या सिनेमाच्या संदेशाशी अजिबात सुसंगत नाहीत. पण ते सोयीस्करपणे वगळले आहेत.

Signs of the times!

((१) पब्लिक (by and large) बिनडोक आहे, आणि (२) पब्लिकला (you and I notwithstanding) असलेच पिच्चर पाहिजेत, त्याला काय करणार?)

सई केसकर Thu, 01/01/2026 - 21:07

In reply to by 'न'वी बाजू

हल्ली लोक काश्मीर फाईल्स किंवा केरळ फाईल्स किंवा अजून.कोणकोणत्या फाईल्स मुलांना दाखवतात कारण त्यांना सत्य कळायला हवं.
It is a depressing place to be. पण आपण काय करू शकतो?
या सिनेमात सन्यालच्या तोंडी आपल्याला एक ताकदवान असा नेता हवा अशी एक तमन्ना दिली आहे. आणि मार्चमध्ये याचा भाग २ येणार आहे. म्हणजे त्यात कदाचित आपले मोदीझी कसे अवतरले वगैरे गोष्ट असेल.
बाकी रणवीर सिंगचा अंबाडा मात्र छान आहे. हल्ली पुण्यात सगळीकडे पुरुषांच्या टाळक्यांवर असे धुरंधर अंबाडे दिसतात. Signs of the times. त्यावर सिनेमा बघायला जाताना कुण्या स्त्रीने गजरा माळताना बघितलं की वर्तुळ पूर्ण होईल.

'न'वी बाजू Thu, 01/01/2026 - 22:11

In reply to by सई केसकर

या सिनेमात सन्यालच्या तोंडी आपल्याला एक ताकदवान असा नेता हवा अशी एक तमन्ना दिली आहे.

Heil ______! (गाळलेल्या जागा कशाही भरल्या, तरी फरक पडत नाही. दुर्दैवाने, हा trend तूर्तास जागतिक आहे. आमच्याकडेही याहून फारशी वेगळी परिस्थिती नाही.)

I guess, people don’t realize what a (relatively) great thing Democracy is, until they (themselves throw it away, and) lose it. (And, with some people, not even then.)

(भारतात हुकूमशाहीला admire करणारा एक strong undercurrent काही गोटांत प्रचलित आहे. किंबहुना, ‘भारतात लष्करी हुकूमशाहीच पाहिजे; भारतीय लोकांची लोकशाहीची लायकी नाही’ असल्या छापाची आर्ग्युमेंटेही या गोटांतून ऐकलेली आहेत. असल्या लोकांना ‘मग जावा की पाकिस्तानात!’ हे प्रत्युत्तर समर्पक जरी असले, तरी उपयुक्त नाही. कारण, हे लोक पाकिस्तानात जाणार तर नाहीतच, परंतु पाकिस्तानसदृश परिस्थिती भारतात आणतील. चालायचेच.)

(पाकिस्तानविरुद्ध जाहीर विधाने करण्याची जी एक वाईट खोड भारतीय सेनाप्रमुखांमधून आजकाल बोकाळू लागली आहे, ती या दृष्टीने मला चिंताजनक वाटते. म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध जाहीर वक्तव्ये करण्यास माझा आक्षेप नाही, परंतु, अशी विधाने ही केवळ भारतीय नागरी नेतृत्वाच्या सर्वोच्च पातळीवरील अधिकृत (तथा जबाबदार) सूत्रांकडून यावीत; लष्करप्रमुखांचे ते काम अथवा जबाबदारी नव्हे, तथा त्यांनी आपली पायरी सोडून बोलू नये. आणि, काहीही झाले, तरी लोकनियुक्त नागरी नेतृत्वाच्या लष्करावरील आधिपत्यास चुकूनदेखील धक्का लागता कामा नये. भारतीय लष्कर हे तसे बऱ्यापैकी शिस्तशीर आहे, नि भारतीय लष्कराची तशी (म्हणजे नागरी प्रशासनावर कुरघोडी करून राज्यकारभार ताब्यात घेण्याची) परंपरा नाही, वगैरे आजपर्यंतचे conventional wisdom आहे खरे, आणि, आजतागायत ते परीक्षेस उतरले आहे, हेही खरे. परंतु, ही सुखावस्था भविष्यातही राहील, याची काय शाश्वती? (किंबहुना, आजवर ही सुखावस्था आहे, याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय नागरी राजकीय नेतृत्वाने (भले ते कोठल्याही पक्षाचे असो) आजवर आपले आधिपत्य jealously guard केलेले आहे, नि लष्कराला कधीही वरचढ अथवा डोईजड होऊ दिलेले नाही, हे आहे. भविष्यात ही सुस्थिती राहीलच, हे कोणी सांगावे?) आणि, भारतीय नागरिकांनीच (किंवा, त्यांच्या लोकनियुक्त प्रशासनाने) जर लष्कराला गरजेपेक्षा अधिक डोक्यावर चढवून त्याचबरोबर लोकशाही कचऱ्याच्या कुंडीत फेकून द्यायचे ठरविले, तर त्यांना कोण अडविणार? असो.)

(हिंदुस्थानची फाळणी झाली, ही एका दृष्टीने चांगली गोष्ट म्हटली पाहिजे. म्हणजे, Pakistan’s post-Independence history should be — should have been — a permanent warning for Indians. If Indians pay heed to it, that is. पण लक्षात कोण घेतो?)


(आणि, ‘ताकदवान असा एक नेता’च जर पाहिजे, तर मग इंदिरा गांधी काय वाईट होती? तिने यांच्या पूर्वसूरींची (pardon my expression, but) चांगलीच मारून ठेवली होती; तिला का शिव्या घालतात मग? ती बाई होती म्हणून? तिने तरी वेगळे काय केले मग?)

असो चालायचेच.

'न'वी बाजू Thu, 01/01/2026 - 18:58

चित्रपट अद्याप पाहिलेला नाही. (अटलांटा परिसरात किमान तीन (कदाचित अधिकही) थेटरांतून (म्हणजे मल्टिप्लेक्से, अर्थात) सध्या चालू आहे, परंतु, सर्वात पुढच्या (स्क्रीनच्या सर्वात जवळच्या) रांगेतील सीटा वगळता उर्वरित थेटरे हाउसफुल्ल असतात. आधीच असला पिच्चर, तशातहि पुढच्या रांगेतून (मान वाकडी करून) पाहायचा; नक्को रे बाबा!) पुढेमागे गर्दी जर ओसरली नि पिच्चर तोवर जर चालू राहिला, तर कदाचित पाहीनही, कदाचित पाहणार नाही. (‘सावरकर’ लागला होता, त्या वेळेस, काहीही झाले तरी पाहायचा नाही, असे ठरविले होते. या खेपेस तितकीही टोकाची भूमिका नाही. ‘काय शिंची भानगड आहे, ते तरी पाहू!’ म्हणून पाहीनही, कदाचित. नंतर शिव्या घालीनही — किंवा घालणारही नाही, कदाचित — परंतु, जमल्यास पाहीनसुद्धा. मात्र, त्याकरिता फाइट मारण्याइतका उत्साह नाही. असो.)

परंतु,

संन्याल एका फ्रेममध्ये म्हणतात की “भारताचे सर्वात मोठे शत्रू भारतीयच आहेत, आणि पाकिस्तानी यात दुसऱ्या क्रमांकावर येतात.”

एका अर्थाने (म्हणजे, संन्याल/दोभाल ज्या अर्थाने म्हणतात, त्या अर्थाने नव्हे अर्थात, परंतु तरीही) हे विधान खरेच आहे की! सध्या भारतात जो राजकीय माहौल चालू आहे, त्याचे जे सूत्रधार आहेत, ते पाकिस्तानी थोडेच आहेत? भारतीयच तर आहेत सगळे!

पण लक्षात कोण घेतो?


तळटीपा:

हं, ती ‘रथयात्रा’ वगैरे काढून या माहौलाला सर्वप्रथम जोर ज्यांनी दिला, त्या अडाणचोट सद्गृहस्थांना, by a stretch of logic, ‘पाकिस्तानी’ म्हणता येईलही कदाचित.१अ परंतु, नाही. त्यांची पार्श्वभूमी अथवा राजकीय दृष्टिकोन काहीही असो, परंतु, ते आता भारतीय नागरिक आहेत, हे आम्ही मानतो१ब, त्यामुळे, त्यांना(सुद्धा) आम्ही ‘पाकिस्तानी’ म्हणणार नाही.

१अ तसेही, पाकिस्तानी एजंट असल्यासारखेच वागतात कधीकधी, म्हणा. म्हणजे, ती ‘रथयात्रा’ काढण्याचे जे दूरगामी परिणाम भारतावर झाले, those would have been far beyond ISI’s wildest wet dreams! वास्तविक, त्या एकाच कामगिरीसाठी त्यांच्या ‘स्वर्गादपि गरीयसी’ अशा ‘जननी जन्मभूमि’ने आपला सर्वोच्च नागरी बहुमान (‘निशान-ए-पाकिस्तान’) त्यांना बहाल करायला पाहिजे होता. (पूर्वी माजी भारतीय पंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांना बहाल केला होता, तसा.) पण लक्षात कोण घेतो? पाकिस्तानात गुणांचे चीज होत नाही, हेच खरे.

१ब भले तीच courtesy श्रीमती सोनिया गांधी यांच्याप्रति दाखवायला प्रस्तुत सद्गृहस्थ तयार नव्हते, तरीही.

(पाकिस्तानचे माजी पंतप्रधान) श्री. नवाझ शरीफ यांच्या कारकीर्दीत, ‘जो मोदी का यार है, गद्दार है, गद्दार है’ अशी एक घोषणा त्यांच्याविरुद्ध (म्हणजे, श्री. नवाझ शरीफ यांच्याविरुद्ध) पाकिस्तानात लोकप्रिय होती. थोड्या वेगळ्या अर्थाने ही घोषणा भारतातसुद्धा चपखल लागू व्हावी. काय म्हणता?

'न'वी बाजू Thu, 01/01/2026 - 19:45

भारतातल्या १९९९ नंतरच्या सगळ्या आतंकवादाच्या घटना हाफिज सईदने घडवून आणल्या आहेत, ज्याला भारताने IC-८१४च्या अपहरणानंतर सोडले होते. पण म्हणून तेंव्हाचे सरकार देशद्रोही ठरते का?

अर्थात!

पुढे बोला.


(शिवाय, त्याच तालिबानबरोबर आता गळ्यात गळे घालणे चालू आहे. म्हणजे, कदाचित ती काळाची गरज आणि/किंवा realpolitik असू शकेलही. (मला ठाऊक नाही.) परंतु, Public memory is short या उक्तीचे याहून चांगले उदाहरण दुसरे ते काय सापडावे?)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/01/2026 - 03:59

अशा सिनेमांबद्दल जरा थांबून आणि संयतपणे लिहिणारे लोकही फार सापडत नाहीत. विरोधी मतातले लोक फार नसणार, हे आता अपेक्षितच आहे. पण विरोध करणारेही ज्या सात्त्विक संतापानं लिहितात त्याचा कंटाळा येतो.

'न'वी बाजू Fri, 02/01/2026 - 04:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण विरोध करणारेही ज्या सात्त्विक संतापानं लिहितात त्याचा कंटाळा येतो.

ऐकतोय.

'न'वी बाजू Fri, 02/01/2026 - 19:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(Still better.)

सिनेमा न पाहताच पो-पिंक टाकून झाली.

विवेक पटाईत Fri, 02/01/2026 - 17:01

मी स्वतः प्रधानमंत्री कार्यालयात असताना अस Dult आणि Mk नारायण पीए राहिलेलो आहे. प्राध्यापक म्हणजे वास्तवाचे ज्ञान असायला पाहिजे. पुरोगामी लोकांना सत्य पचत नाही.

'न'वी बाजू Fri, 02/01/2026 - 17:26

In reply to by विवेक पटाईत

मी स्वतः प्रधानमंत्री कार्यालयात असताना अस Dult आणि Mk नारायण पीए राहिलेलो आहे. 

मग आता सेवानिवृत्तीनंतर आयटीसेलची पार्टटाइम पाट्याटाकूगिरी, झालेच तर ‘पतञ्जलि’ची भाडोत्री प्रवक्तेगिरी करायची वेळ का आली आहे, म्हणे? पेन्शनीतून पोटापाण्याचा खर्च निघत नाही काय?

(अतिअवांतर: ‘रॉ’शी संबंधित लोक सहसा या गोष्टीचा डांगोरा पिटत हिंडत नाहीत, असा स्वल्पानुभव आहे.)

'न'वी बाजू Fri, 02/01/2026 - 18:24

In reply to by विवेक पटाईत

Personal jibes aside,

प्राध्यापक म्हणजे वास्तवाचे ज्ञान असायला पाहिजे.

ते प्राध्यापक जरी असले, तरी त्यांना ‘रॉ’च्या अंतर्गत कार्यप्रणालीचे इत्थंभूत ज्ञान असण्याची अपेक्षा (supposedly दुलातांचे माजी पीए असूनसुद्धा) कशी काय करू शकता बुवा? या गोष्टी सहसा गोपनीय नसतात काय? गोपनीय असणे, बाहेरच्या माणसांना याची माहिती उपलब्ध नसणे अपेक्षित नसते काय? स्वतः तुम्ही ‘वास्तवाच्या ज्ञाना’चे तपशील लोकांना सांगत हिंडाल काय? (हिंडत असलात, तर गोपनीयतेच्या तरतुदींखाली तुमच्यावर कारवाई का होऊ नये?)

(मुळात ‘आपण दुलातांचे (नि आणखी कोणाकोणाचे) पीए होतो’ या गोष्टीची (ती कदाचित by itself जरी गोपनीय नसली, तरीसुद्धा) जाहीर वाच्यता करण्याचे प्रयोजन काय? (‘औचित्य’ वगैरेची गोष्ट तर तूर्तास सोडूनच देऊ.) स्वतःची टिमकी वाजविण्यासाठी? स्वतःची लाल करण्यासाठी? की ‘मला आतली इत्थंभूत माहिती आहे’ असे भासविण्यासाठी? (Which, I seriously doubt. म्हणजे, तुम्ही दावा करता, त्याप्रमाणे तुम्ही खरोखरच दुलातांचे (नि आणखी कोणाकोणाचे) पीए होतात, हे क्षणभर खरे जरी मानले, तरीसुद्धा, ‘रॉ’ ही जर (संकीर्ण भाजप प्रशासनांखाली बट्ट्याबोळ होण्यापूर्वीची) एक legendary कार्यक्षम, आदरणीय, दबदबा असलेली वगैरे गुप्तहेरसंघटना जर असेल, तर कोठलीही माहिती ही संघटनेअंतर्गत जरी झाली, तरीसुद्धा need to know basisवरच वितरित होत असणार, एवढी मूलभूत गोष्ट आम्हालासुद्धा कळते. त्यामुळे, दुलातांचे पीए वगैरे जरी असलात, तरी अगदी वरवरच्या पातळीवर वगळता कोठल्याही विशेष माहितीला तुम्ही privy असाल, याबद्दल प्रचंड साशंक आहे. (अर्थात, मोदी है, तो साला कुछ भी मुमकिन है, त्यामुळे, काही सांगवत नाही, हे खरेच; परंतु, दुलात हे तसे जबाबदार सद्गृहस्थ वाटतात. (चूभूद्याघ्या.)) आणि, समजा काही कारणास्तव काही विशेष माहितीस तुम्ही privy जरी झालात, तरीसुद्धा, तिची वाच्यता तुम्ही करणार नाही. (किंबहुना, काही विशेष माहितीस आपण privy आहोत, या गोष्टीचीही वाच्यता तुम्ही करणार नाही. (गरज काय?)) (अर्थात, हे सगळे म्हणजे तुम्ही जर जबाबदार कर्मचारी असलात, तर. Which, by all appearances, is extremely doubtful.) आणि, त्या परिस्थितीत, तुम्हाला समजा काही विशेष माहिती जरी असलीच, तरीसुद्धा, (उदाहरणादाखल) प्रस्तुत प्रोफेसरमजकुरांस ती असण्याची अपेक्षा नक्की कशी करता येईल, हा प्रश्न उरतोच.) असो.)

(बादवे, सरकारी कर्मचाऱ्यांना (मग भले तूर्तास ते सेवारत असोत, की सेवानिवृत्त) काही आचारसंहिता वगैरे भानगड नसते काय हो? अर्थात, तूर्तास मोदींचे सरकार आहे, म्हटल्यावर काय वाटेल ते शक्य आहे, त्यामुळे, कोणी सांगावे, नसेलही कदाचित. चालायचेच.)

सई केसकर Fri, 02/01/2026 - 19:40

जे वास्तव धुरंधरमध्ये दाखवलं आहे ते आम्ही त्यापेक्षा चांगल्या प्रकारे फरीद झकारिया यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये बघितलं आहे. अजूनही बऱ्याच चांगल्या वास्तववादी फिल्म्स आहेत. त्या डॉक्युमेंट्रीमध्ये कुणी पोरीला मागे बसवून सुपरबाईक उडवत नव्हतं. इंडियन एअरलाइन्सच्या हायजॅकबद्दलही Ditto. आणि या सगळ्या फिल्म्समध्ये नॉर्मल माणसाला नॉर्मल बंदूक वापरून घायाळ केल्यावर भौतिकशास्त्राच्या नियमांनी जे काही व्हायला पाहिजे ते होतं. एखाद्याच्या मेंदूतच बॉम्ब ठेवल्यासारखी डोकी फुटून त्यांतून रक्ताची कारंजी उडत नाहीत.
त्या डॉक्युमेंट्री जर प्रत्यक्ष फुटेज वापरून केलेल्या असल्या तर अनेकदा असे प्रसंग ब्लर करून दाखवण्याची माणुसकी त्यांना असते.
बाकी धुरंधरचा परिणाम असा आहे की लोकांना पाकिस्तानी गुंडच अधिक आवडतो आहे. शेवटी (स्वतःच्या पोराबरोबर जानवं घालून धोतर नेसून इन्स्टावर फोटो मिरवणाऱ्या) माधवनने फ्रस्ट्रेट होऊन असं म्हणल्याचं ऐकलं की जे अक्षयची तारीफ करत आहेत त्यांना धुरंधर समजलाच नाही. आता धरने दाऊदवर सिनेमा काढावा. म्हणजे भारतीयांना दाऊद आवडायला लागेल. एकीकडे अक्षय खन्नाचे कौतुक आणि दुसरीकडे प्रखर देशभक्ती. कसं जमतं काय माहित. माणसाला हिंसा आवडते. आणि ती unapologetically करणारे आवडतात. मग ते पाकिस्तानी का असेनात!

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 03/01/2026 - 08:22

In reply to by सई केसकर

(स्वतःच्या पोराबरोबर जानवं घालून धोतर नेसून इन्स्टावर फोटो मिरवणाऱ्या) माधवनने ...

एकेकाळी तो बरा दिसायचा, असं माझं मत होतं. तीच बाब सोनू निगमची. मग टाळ्या-थाळ्या प्रकार झाले आणि आम्ही पुन्हा "हा आमचा जॉन अब्राहम, आमचं याच्यावर भारी प्रेम" याकडे वळलो!

'न'वी बाजू Sun, 04/01/2026 - 17:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

“सुसंगति सदा घडो
सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो
विषय सर्वथा नावडो”

या (आमच्या आजोबाकाळात लोकप्रिय असलेल्या) सुभाषितातली सुसंगती.

बाकी चालू द्या.

गोगोल Sun, 25/01/2026 - 07:11

In reply to by सई केसकर

>> जे वास्तव धुरंधरमध्ये दाखवलं आहे ते आम्ही त्यापेक्षा चांगल्या प्रकारे फरीद झकारिया यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये बघितलं आहे. अजूनही बऱ्याच चांगल्या वास्तववादी फिल्म्स आहेत. त्या डॉक्युमेंट्रीमध्ये कुणी पोरीला मागे बसवून सुपरबाईक उडवत नव्हतं. इंडियन एअरलाइन्सच्या हायजॅकबद्दलही Ditto. आणि या सगळ्या फिल्म्समध्ये नॉर्मल माणसाला नॉर्मल बंदूक वापरून घायाळ केल्यावर भौतिकशास्त्राच्या नियमांनी जे काही व्हायला पाहिजे ते होतं. एखाद्याच्या मेंदूतच बॉम्ब ठेवल्यासारखी डोकी फुटून त्यांतून रक्ताची कारंजी उडत नाहीत.
त्या डॉक्युमेंट्री जर प्रत्यक्ष फुटेज वापरून केलेल्या असल्या तर अनेकदा असे प्रसंग ब्लर करून दाखवण्याची माणुसकी त्यांना असते.

डॉक्युमेंट्री वायली नी व्यावसायिक सिनेमा वायला .. प्रत्येक गोष्टीमध्ये भौतिकशास्त्राचे नियम वापरले तर सिनेमॅटीक लिबर्टी च काय?

>> बाकी धुरंधरचा परिणाम असा आहे की लोकांना पाकिस्तानी गुंडच अधिक आवडतो आहे. शेवटी (स्वतःच्या पोराबरोबर जानवं घालून धोतर नेसून इन्स्टावर फोटो मिरवणाऱ्या) माधवनने फ्रस्ट्रेट होऊन असं म्हणल्याचं ऐकलं की जे अक्षयची तारीफ करत आहेत त्यांना धुरंधर समजलाच नाही.

अहो ताई अक्षय अभिनेता वायला आणि त्याने केलेला रेहमान डकैत वायला... त्याच्या परफॉर्मन्स ची लोक तारीफ करत आहेत.
काय राव तुमच्या सारख्या झंटल(वू)मन लोकांना हे समजावून सांगाव लागत?

Rajesh188 Sat, 03/01/2026 - 22:09

आता च्या भारतीय cinema वर चर्चा करणे म्हणजे फालतू गोष्टी साठी वेळ वाया घालवणे आहे.
मुळात खूप कमी लोक भारतीय cinema बघतात.
500 कोटी व्यवसाय म्हणजे दीड ते दोन कोटी लोकांनी च तो cinema बघितलेला असतो भारताची लोकसंख्या आज नक्की 150 कोटी आहे.
बघा किती टक्के लोक cinema बघतात. Minus मध्ये किती zero लागतील ते..

अस्वल Sun, 18/01/2026 - 02:06

धुरंधर पाहिला नाहीये-
पण आजकालच्या टिकटॉकी जमान्यात जिथे लोकं मिनिटभराचे विडिओ बघताना कंटाळतात, तिथे एक सिनेमा ३.५ तास लांब असूनही लोक आवडीने बघतात, म्हणजे सिनेमा उत्तम आहे (क्राफ्ट म्हणून नक्कीच.)
त्यातला विषय न पटणारा असो, बटबटीत वगैरे असेल आणि प्रचारकीदेखील.
पण चित्रपट उत्तम आहे ह्यात दुमत नसावं.

शिवाजी महाराज पकाऊ होते, ह्या आशयाचा उत्तम चित्रपट निघू शकतो- आणि तो बहुसंख्य लोक ३.५ थेटरात बसून त्यातून आनंद घेत असतील तर चित्रपट यशस्वी आहे, आणि दिग्दर्शक/कलाकार ह्यांनी चोख कामगिरी केलीये.

अक्षय खन्नाचा अभिनय आवडणं आणि देशभक्त असणं ह्यात काय विरोधाभास आहे ते मात्र कळेना.

सई केसकर Tue, 20/01/2026 - 06:31

In reply to by अस्वल

>>>अक्षय खन्नाचा अभिनय आवडणं आणि देशभक्त असणं ह्यात काय विरोधाभास आहे ते मात्र कळेना.

अक्षय खन्ना यानं पाकिस्तानी रेहमान डकेतचं काम केलं आहे..त्याच्या हातून भयानक हिंसा होताना दाखवली आहे. त्याच्या पैशाच्या आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असण्याच्या पायी ताजचे स्फोट घडवून आणण्यात यश आलं असं सुचवण्यात आलं आहे. तरीही बाहेर येताना लोक त्यालाच नावाजताना दिसतात. त्यामुळे ज्या व्यक्तीबद्दल घृणा उत्पन्न व्हावी त्याच्याबद्दल आदर वाटतो याचं बहुधा माधवनला दुःख झालं.
पण लोकांना हिंसाचार बघायला आवडतो. तो कुणाही हातून घडो. अशी अंदाधुंद हिंसा करू शकणाऱ्या लोकांबद्दल पुरुषांना कदाचित मत्सरही वाटत असेल. मग ती सिनेमात का असेना.

गोगोल Sun, 25/01/2026 - 07:00

In reply to by सई केसकर

या न्यायाने तर मग गेली ५० एक वर्षे लोक गब्बर सिंग ला पण डोक्यावर घेऊन आहेत त्याचे काय?

विरोध करायचा म्हणून केवळ निव्वळ निरर्थक विरोध करण्याने जे योग्य मुद्दे असतात त्यांचीही धार कमी होते.
तो ध्रुव राठी च खूप नाव ऐकून त्याचा थोडासा व्हिडियो बघितला. तो हि असाच काहीतरी बडबडला की म्हणे भारत सरकारची ऑफिशियल भूमिका "आम्ही पाकिस्तानात काहीही घातपात करत नाही" अशी असताना तुम्ही सिनेमात असा सगळं दाखवून बेसिकली मान्य करताय की आम्ही हे करतो. ते ऐकल्यावर व्हिडियो बंद केला. त्याची खरडपट्टी काढणारा वीडियो खुद्द पाकिस्तानातील जर्नलिस्टनिच अपलोड केला आहे.

सई केसकर सारख्या सुलझे हुए आयडी से ये उम्मीद नही थी

सई केसकर Sun, 25/01/2026 - 07:57

In reply to by गोगोल

अक्षय खन्ना आवडणाऱ्यांना धुरंदर कळला नाही असं माधवन (त्यातला डोभाल) म्हणत होता!
माझं असं म्हणणं आहे की लोकांना हिंसा आवडते. त्यामुळे त्यांना अक्षय खन्ना आवडला यात काही आश्चर्य नाही. तुमच्या गब्बरला ही हे लागू आहे.

गोगोल Sun, 25/01/2026 - 20:57

In reply to by सई केसकर

आमच्या सारख्या अभागी जीवांनी कधी इन्स्टा, टिकटॉक, आणि इतरही असे अनेक सोशल मीडिया अकाउंट्स कधी उघडलेच नाहीत. असायला फक्त फेसबुक आणि लिंक्ड इन आहेत ज्यावर जायला प्रचंड कंटाळा येतो. उगाच कशाला लोकांचं काय मजेत चाललंय म्हणून कुढत बसायचं. त्यापेक्षा त्यातल्या त्यात अनामिक सोशल मीडिया म्हणजे हॅकर न्यूज, रेडिट आणि तोंडी लावायला मराठी साईट्स त्याच काय ते. त्यामुळे माधवन लंगोट धोतर जानवं घालून काय बोलतो त्याची काहीही कल्पना नाही (तसाही त्याचा स्क्रीन टाइम पाच मिनिट्स पेक्षा ज्यास्त नसावा).

हिंसा हि प्रत्येक मेमल मध्ये कुठंतरी आदिम स्तरावर बेक्ड इन असावी याबद्दल दुमत नसाव.
पहा: डॉल्फिन्स, ओरका पासून ते ग्रेट एप्स आपल्या भक्ष्याबरोबर कसा खेळ करतात ते. किंवा खर म्हणजे कशाला पाहता?

>> अशी अंदाधुंद हिंसा करू शकणाऱ्या लोकांबद्दल पुरुषांना कदाचित मत्सरही वाटत असेल.

या गोधडी वाक्याला मात्र आक्षेप आहे. लेस्बियन्स कपल्स मध्ये सर्वात ज्यास्त हिंसा होते हे सांगितलं तर सर्व फेमिनिष्ठ लोक धावत धावत तो डेटा कसा मिस इंटरप्रिट झालाय आणि कशा लेस्बियन बायका पूर्ण आयुष्यात सगळ्यात ज्यास्त हिंसा रिपोर्ट करतात आणि तो पुरुषच करतात हे सांगायला येतील.

तर त्यांना एव्हढंच सांगायचंय की निदान बायका जे रिपोर्ट करतात ते बाकीचे गाम्भीर्याने घेतात. हेटेरो कपल्स मध्ये जेव्हा स्त्री पुरुषावर हिंसा करते तेव्हा त्याला कोणीही सिरियसली घेत नाही. आणि त्यातही "छोरीयो से पिटके आगया" हा ही फेक्टर आहेच. त्यामुळे पुरुष पण हे सगळं उघड पणे बोलू शकत नाहीत. तों दा बु मा वगैरे.

सोर्स: स्वानुभव

असोच, याविषयावर ज्यांनी त्यांनी आपापली मत बनवून घेतलेली असतात त्यामुळे कुणी काहीही बोललं तरी इतरांची मत बदलत नाहीत. तसाही या पोस्ट मॉडर्न जगात, आधी आपली मत बनवायची असतात आणि मग त्या अनुषंगाने डेटा इंटरप्रिट करायचा असतो. सो असोच.

सई केसकर Mon, 26/01/2026 - 07:52

>>सोर्स: स्वानुभव :(

माझा बायस असूच शकेल. त्याबद्दल काही दुमत नाही. माझ्या आजूबाजूला जे मित्र होते ते सगळे ॲक्शन सिनेमांचे फॅन होते..नवऱ्याचीही (माझ्या दृष्टीने) या क्षेत्रात questionable अभिरुची आहे. त्याला गायपट्ट्यातली हिंसा दाखवणाऱ्या ott मालिका खूप आवडतात. काल आम्ही रोजा बघत होतो तर त्यानं मला विचारलं की त्यात सगळ्यात कोण आवडतं. माझं उत्तर अर्थात अरविंद स्वामी होतं. पण त्याला सगळ्यात पंकज कपूरचे काम आवडले..
असो. ते गोधडी वाक्य चुकीचं असेलही.

अस्वल Fri, 30/01/2026 - 03:11

अक्षय खन्नाच्या अभिनयाला लोकांनी दाद दिली असणार.
चित्रपट न पाहता, केवळ चर्चा ऐकून मला तर वाटलं होतं खन्नाच मुख्य भूमिकेत आहे म्हणून- म्हणजे बाकीच्यांपेक्षा नक्कीच उजवं (की ऐसी आहे म्हणून डावं म्हणावं?) काम केलं असणार त्याने.
माधवन शुद्ध ज-ळ-ला आहे, लोल.
===
कर्नल हान्स लांडा - Inglourious Basterds मध्ये मला तरी त्याचं काम प्रचंड आवाडलं, त्या खालोखाल शुशाना -
असो.
असे बरेच असतील.
निव्वळ भयानक हिंसा आणि सेक्स जास्त विकलं जातं हे तर खरं आहेच. ओटीटीवर ह्याचा सुकाळ उगा नाही दिसत (घ्या - स्पार्टाकससारखी वाह्यात सॉफ्टपॉर्न मालिका)

'न'वी बाजू Fri, 30/01/2026 - 05:31

In reply to by अस्वल

निव्वळ भयानक हिंसा आणि सेक्स जास्त विकलं जातं हे तर खरं आहेच. ओटीटीवर ह्याचा सुकाळ उगा नाही दिसत (घ्या - स्पार्टाकससारखी वाह्यात सॉफ्टपॉर्न मालिका)

अगदी!

उदाहरणादाखल, सांप्रतकाळी ज्या मराठी सीऱ्यली चालू आहेत, त्यांपैकी एकजात सर्वांत कधी ना कधी कोणते ना कोणते स्त्रीपात्र कोणाच्या ना कोणाच्या तरी सणसणीत कानाखाली वाजवताना आढळते.

आता, याला ‘सेक्स’ या सदरात गणता येईल, किंवा कसे, याबद्दल कदाचित दुमत असू शकेलही. मात्र, ज्या प्रकारे मराठी प्रेक्षक असली दृश्ये केवळ चवीचवीनेच नव्हे, तर पराकोटीच्या आतुरतेने पाहताना आढळतात, ते लक्षात घेता, किमानपक्षी ‘निव्वळ भयानक हिंसा जास्त विकली जाते’ या भागाशी सहमत होणे अपरिहार्य वाटते.

परंतु, चालायचेच!!!


तळटीपा:

माझ्या मते, गणता यावे. कारण, एखाद्या स्त्रीपात्राऐवजी एखाद्या पुरुषपात्राने कोणाच्या तरी सणसणीत कानाखाली वाजवल्याने कदाचित तितकी मजा येणार नाही.१अ त्यामुळे, sex does play a role in the appeal for this kind of thing, असे म्हणावेसे वाटते. (चूभूद्याघ्या.) परंतु, ते एक असो.

१अ पाहा कल्पना करून.

हल्लीच्या भाषेत ‘दर्शक’. किमान या कारणासाठी तरी भारताचे टुकड़े-टुकड़े होऊन स्वतंत्र महाराष्ट्र होण्यास आपला फुल्ल पाठिंबा आहे. नि हे म्हणे निघालेत महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करायला. हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदित्वखोरी२अ करायला. पण लक्षात कोण घेतो? तर तेही एक असो.

२अ शब्दसंकल्पना आपल्याला जाम आवडली. त्याबद्दल अबापट यांचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.

सई केसकर Fri, 30/01/2026 - 05:37

In reply to by अस्वल

>>कर्नल हान्स लांडा - Inglourious Basterds मध्ये मला तरी त्याचं काम प्रचंड आवाडलं, त्या खालोखाल शुशाना -
असो.
+१
रहमान डकईतचे character समीक्षकी भाषेत "व्यामिश्र" आहे. पण तरीही त्यात ८०% एआय हिंसा आहेच. २०% व्यामिश्रता असेल.

@spolier alert@
उदाहरणार्थ त्याच्या एंट्रीच्या सीनमध्येच तो त्याच्या बायकोकडून मुस्काडित मारून घेतो. मोठं होण्याची आस आणि आपल्या लोकांशी गद्दारी या दोन पर्यायांमध्ये अडकलेला वगैरे. काहीसा दुःखी पण प्रचंड हिंसा करणारा वगैरे. एकदा एखाद्यावर विश्वास ठेवला की पूर्ण विश्वास ठेवणारा.
@@ spoiler alert ends@@

बाकी taratino च्या सिनेमातली अती हिंसा कधीकधी हिंसेचीच खिल्ली उडवणारी असते असं मला वाटतं. उदाहरणार्थ inglourius चा ओपनिंग सीन.