ही राजभाषा असे!
रोचना यांनी सुरु केलेल्या 'सध्या काय वाचताय?' या धाग्यात एक भर टाकण्याऐवजी हा स्वतंत्र लेख लिहावासा वाटला, कारण हा विषय फक्त एक नवे पुस्तक इतका नाही असे मला वाटले. वेगवेगळ्या निवडणुका तोंडावर आल्याने भारतात / महाराष्ट्रात विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यातलीच एक खेळी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवडक भाषणांचे 'ही राजभाषा असे!' हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. तरुण मनांवर गारुड घालण्याचे राज ठाकरे यांचे कौशल्य सर्वश्रुतच आहे. साधे, सोपे बोलायचे, बोलतांना श्रोत्यांना प्रश्न विचारुन त्यांच्याकडून (आपल्याला हवी ती) उत्तरे काढून घ्यायची आणि मुख्य म्हणजे 'ठाकरी' हे जिला विशेषण लावले गेले आहे ती बेबंद, मुक्त, शिवराळ भाषा वापरायची हे तंत्र राज ठाकरे यांनी आपले काका बाळ ठाकरे यांच्याकडून सहीसही उचलले आहे. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे, ते बोलतातही धाडसाने. 'एकदा आमच्या हातात सत्ता द्या, कसा महाराष्ट्राचा कायापालट होत नाही ते बघतो..' असली त्यांची जनतेला आवाहन करणारी वाक्ये असतात. त्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण तरुणांचा एक मोठा गट आता शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसकडून मनसेकडे वळताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बदलाची नांदी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भाषणांचे हे पुस्तक मला फार महत्त्वाचे वाटले आणि मी ते लगोलग मागवून घेतले.
हे पुस्तक कोणत्याही पूर्वगृहांशिवाय वाचायचे असे ठरवूनच हातात घेतले. त्यामुळे उत्तम निर्मितीमूल्ये, उमद्या, तरुण, चेहर्यावरुन आत्मविश्वास ओसंडत असलेल्या राज ठाकरेंचे फोटो (आणि शंभर रुपये ही किंमत!) हे सगळे मला सुरवातीलाच फार आकर्षक वाटले. पुढे एकामागोमाग ही सहा भाषणे वाचली आणि मन कडवटून गेले. बाळ ठाकरेंच्या भाषणांबद्दल पूर्वी कुणी तरी म्हटले होते 'या भाषणातील पहिल्या वाक्याचा दुसर्या वाक्याशी काहीतरी संबंध होता, दुसर्याचा तिसर्याशी किंचित संबंध होता, पण पहिल्याचा तिसर्याशी सुतराम संबंध नव्हता..' राज ठाकरेंनी आपल्या काकांकडून हे कसबही सहीसही उचलले आहे. पण विचार करुन सूत्रबद्ध बोलणे आणि सभेचे फड जिंकणे या वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात. जनतेला निस्ती करमनूक करनारी भासने लई आवडत्यात. 'मी एक नवीन अलार्म क्लॉक घेतलंय. रोज सकाळी त्याचा गजर वाजतो 'पवार्र...' की जनतेचा त्यावर हशा. आराराबा, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांची स्टेजवरुन नक्कल केली की जनता खूष. (बाळ ठाकरेंनी तर सोनिया गांधींनाही या नकलेतून सोडले नव्हते.) जितके शिवराळ, बीभत्स बोलाल तितक्या अधिक हशा आणि टाळ्या - मग ती 'बांबू' या शब्दावरची कोटी असो, संभाजी ब्रिगेडला -बी ग्रेड, सी ग्रेड असे म्हणणे असो, अमरसिंगांना बेडूक म्हणणं असो, लालूप्रसाद यांच्या अंगावरील केसांबद्दल गलिच्छ टीका करणं असो - जनतेला हे सगळे लई आवडते. मग या वक्त्याचा काय विचार आहे, त्याचा स्वतःचा असा काय अभ्यास आहे, असले प्रश्न जनतेला पडत नाहीत. राज ठाकरे यांनी हे नेमके जोखले आहे. गर्दीचा बुद्ध्यांक मुळातच कमी असतो, आणि गर्दी हेच राज ठाकरेंचे मोठे बलस्थान आहे. त्यातून त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे. 'टी शर्ट आणि जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी मला (माझ्या!) महाराष्ट्रात बघायचा आहे' असे ठाकरे म्हणाले की गर्दीत शिट्ट्या आणि टाळ्या झाल्याच. या सगळ्याला 'माझे आजोबा...' ही एक भावनिक फोडणी असली की मग काय झालेच.
राज ठाकरे यांच्या या पुस्तकाने मला फार निराश केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला पाच वर्षे झाली. पाच वर्षे महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल याचा आमचा 'अभ्यास' सुरु आहे, असे राज ठाकरे म्हणतात. महाराष्ट्राच्या कायापालटाची 'ब्ल्यूप्रिंट' मनसेकडे आहे, असेही ते म्हणतात. पण एकूण त्यांच्या भाषणांमधील उथळपणा, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन तडजोड करण्याची तयारी आणि मग्रूर, मस्तवाल शिवसेनोद्भव भाषा हे सगळे वाचल्यानंतर राज ठाकरे यांच्या देखण्या, भाबड्या चेहर्यामागचा पवारट, पतंगरावी महत्त्वाकांक्षी राजकारणी मला दिसू लागला. त्या दृष्टीने हे पुस्तक डोळे उघडवणारे आहे असे म्हटले तरी चालेल.
People get the government they deserve आणि A group of lions led by a donkey will always be defeated by a group of donkeys led by a lion ही दोन वाक्ये मला आवडतात. ठाकरेंच्या या पुस्तकाने मला ही दोन्ही वाक्ये नव्याने आठवली. प्रवीण टोकेकरांचा सहभाग असलेले हे पुस्तक राज ठाकरेंप्रमाणेच दिसायला आहे देखणे, पण ते वाचून झाल्यावर मला 'खासबाग मिसळ' असे नाव वाचून आत जावे आणि चकचकीत टेबलावर कडक युनिफॉर्ममधल्या वेटरने पिठाळलेले फरसाण, रोगट फुळकवणी रस्सा, जाडजाड कापलेला कांदा आणि काड्याकाड्यांची कोथिंबीर असली मिसळ आणि आंबूस वासाचा पाव आणून द्यावा तसे वाटले.
भारी
प्रवीण टोकेकरांचा सहभाग असलेले हे पुस्तक राज ठाकरेंप्रमाणेच दिसायला आहे देखणे, पण ते वाचून झाल्यावर मला 'खासबाग मिसळ' असे नाव वाचून आत जावे आणि चकचकीत टेबलावर कडक युनिफॉर्ममधल्या वेटरने पिठाळलेले फरसाण, रोगट फुळकवणी रस्सा, जाडजाड कापलेला कांदा आणि काड्याकाड्यांची कोथिंबीर असली मिसळ आणि आंबूस वासाचा पाव आणून द्यावा तसे वाटले.
हे जबर :)
ठाकरी शैली
खुद्द राज ठाकरे हेच शिवसेनाद्भव असल्याने त्यांची भाषणातली भाषा ही शिवसेनाद्भव आहे यात काही आश्चर्य नाही. किंबहुना त्यांचा टार्गेट मतदारसंघ लक्षात घेता त्यांनी वापरलेली भाषा ही अचूक आणि परिणामकारक आहे यात संशय नाही. त्यांनी सोज्ज्वळ आणि अलंकारिक अटलबिहारी स्टाईल भाषणे दिली तर ती त्यांच्या टार्गेट मतदारांवर परिणामकारक ठरतील का यांत संशय वाटतो. त्यामुळे हे जर ते जाणीवपूर्वक करीत असतील (असावेत, कारण खाजगी संभाषणात ते शालीन आणि आदरपूर्वक असतात) तर ते एक कुशल राजकीय नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही.
दुसरे म्हणजे कोणत्याही राजकीय भाषणांत साहित्यिक उच्च मूल्ये सहसा मिळत नाहीत (अपवाद आहेत!). ठाकरे काका-पुतण्यांचे सोडा पण आचार्य अत्र्यांसारख्या प्रस्थापित साहित्यिकाच्याही राजकीय भाषणात फारशी साहित्यिक उच्च मूल्ये मिळत नाहीत, शिवराळपणाच जास्त दिसतो. पुलंसारख्या साहित्यिकाच्या भाषणांची पुस्तके निघाली पण त्यामध्ये त्यांनी आणीबाणोत्तर निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या भाषणांना (त्यातली दोन मी स्वतः ऐकली आहेत आणि त्यात फारशी साहित्यिक मूल्ये नव्हती!) जागा मिळालेली नाही...
महाराष्ट्रातील सर्व मराठी मतदार एकगठ्ठा कुणा (कोणत्याही) एका नेत्याच्या मागे जाईल अशी आज परिस्थीती नाही. त्यामुळे नेत्याचा स्वतःचा अभ्यास आणि विचार जाणून घेऊ इच्छिणार्या मतदारांसाठी चिंतन शिबिरं वगैरे आहेत. टाळ्या/ शिट्ट्या मारून रांगडा आनंद घेणार्यांसाठी ठाकरे आहेत. पैशाचं राजकारण करू इच्छिणार्यांसाठी एक सोडून दोन काँग्रेस आहेत!! सर्वेपि सुखिनः सन्तु!!
बाकी परीक्षण उत्तम आहे. हे परीक्षण वाचून पुस्तक विकत घेण्याची तीव्र इच्छा झाली. असावीत अशी पुस्तकं संग्रही! आपल्या जीवनातला ताण हलका करायला उपयोगी पडतात!!
पुस्तक परीक्षण (का लेख?)
पुस्तक परीक्षण (का लेख?) आवडल्याचं वेगळं सांगत नाही. ऋ आणि पिडांकाकांच्या प्रतिक्रियाही आवडल्या.
पुढे एकामागोमाग ही सहा भाषणे वाचली आणि मन कडवटून गेले.
छे, छे, राजसाहेबांची भाषणं म्हणजे कविता असतात. पुरवून पुरवून वाचायच्या असतात. (हे मी सांगत्ये, ते ही कोणाला, संजोप रावांना!)
ही जनतेची इच्छा...
राज ठाकरे यांच्या भाषेविषयी खेद व्यक्त केला आहे तो अनाठायी आहे असे वाटते. त्यापेक्षा अशी भाषा ऐकायला जी गर्दी जमते त्याविषयी खेद व्यक्त करायला हवा होता.
लोकांनाच असे बोललेले आवडते. माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांची श्री. कुमार केतकर यांनी घेतलेली मुलाखत सह्याद्री वाहिनीवरून प्राईम टाईममध्ये प्रसारित झाली होती. मी ती पाहिली. मा. श्री. चव्हाण साहेब अतिशय अभ्यासू, संयत व परिणामकारक बोलले. किती जणांनी ती मुलाखत पाहिली? अशा सभ्य, सुसंस्कृत, विद्वान व्यक्तींना ऐकायला येथील जनतेला आवडते का?
दुसरे असे की राज ठाकरे यांच्या भाषणात "खिल्ली उडविणे" हा मुख्य भाग असतो. पण त्यांना तशी संधी का प्राप्त होते याचाही विचार व्हावा. प्रस्थापित गोष्टींमध्ये असणार्या विसंगतींवर ते बोट ठेवतात आणि विनोद निर्मिती करतात.
एकदा त्यांनी त्यांच्या एका भाषणात सांगितले :-
कारला सीटबेल्ट लावायचा कायदा आहे. मग असा कायदा रिक्षाला का लागु होत नाही. रिक्षाला तर दरवाजेही नसतात
म्हणजे धोका अधिक असतो. थोडक्यात कायदे करणारे लोक वस्तुस्थिती न जाणताच कायदे करतात.
कायदा गाढव असतो वगैरेसारख्या विधानांना पुष्टी मिळते ती अशा कायदे करणार्यांमुळेच.
जर अशा विसंगतीच नसतील तर राज साहेबांना अशी संधीच मिळणार नाही. बाकी जीवनातल्या विसंगतींकडे कोणी कसे पाहावे हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. मुन्शी प्रेमचंद अशा विसंगती दाखवून वाचकांच्या डोळ्यातून पाणी काढीत तर शरद जोशी ओठांवर हसू फुलवित. राज यांनी दुसरा मार्ग पत्करला आहे आणि जनता त्यांना प्रतिसाद देते आहे. जर जनतेने प्रतिसाद द्यायचा बंद केला तर राजभाषा कदाचित बदललेली असेल.
जनतेच्या कलाने घ्यावे लागते
जनतेच्या कलाने घ्यावे लागते
फक्त सत्तेसाठी.
खरे नेते जनतेला योग्य तो मार्ग दाखवतात. तसे आता कोणी उरले नाही ही आपल्या लोकशाहीची उणीव म्हणता येईल. पण म्हणून असलेल्यांच्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करण्याची गरज नाही.
लोकशाहीला असलेले इतर पर्याय अजुनही घातक आहेत.
होय. विशेषत: झुंडशाही.
समर्थन नाहीच; पण टीकादेखील व्यर्थच
पण म्हणून असलेल्यांच्या वागण्या-बोलण्याचे समर्थन करण्याची गरज नाही. >>
समर्थन अजिबात करीत नाहीये. तुम्ही कदाचित माझा मूळ प्रतिसाद वाचलेला नाही. माझं म्हणणं इतकंच जनतेकडून प्रतिसाद मिळतोय तोवर ही मंडळी अशीच बोलणार, वागणार. आपण अरण्यरूदन करुन त्यांच्या भाषणात फरक पडणार नाही. त्याच प्रतिसादात मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या मुलाखतीचा संदर्भ दिलाय. किती लोक अशा अभ्यासू माणसाला ऐकतात? लोकांच्या सुधारण्याची गरज आहे. नेते आपोआप सुधारतील किंवा सुधारलेलेच नेते ऐकले आणि चर्चिले जातील.
याबाबत राष्ट्रवादीचं उदाहरण देतो. गेल्या महापालिका निवडणूकीच्या वेळी आमच्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीने जनतेच्या अनुरूप उमेदवार दिले. पेठ क्रमांक २५ नवनगर हा भाग पांढरपेशा जनतेचा. इथे आर. एस. कुमार या सुसंस्कृत, सालस, अजातशत्रू व अतिशय नम्र असलेल्या व्यक्तिस उमेदवारी दिली तर शेजारचाच आकूर्डी गावठाण हा भाग (कसा आहे ते लिहीत नाही - तेथील जनतेला वाईट वाटेल) येथून जावेद खान या कुख्यात गुन्हेगाराला उमेदवारी दिली. अशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात जनतेच्या "टाईप"चे उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी प्रचंड संख्येने सत्तेत आली. आताही तसेच होईल असे दिसते.
पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर अशा उमेदवारांना पक्षांनी नाकारले तरी जनता निवडून कशी काय देते?
पक्षांना तत्वनिष्ठ राहून जागा गमावणे परवडत नाही. आता तुम्ही कोणाला दोष देणार? नेत्याला? पक्षाला की जनतेला?
वळचणीचं पाणी
ठाकरी शैलीनं गर्दी खेचली जाते, पण सत्ता फारशी हाती येत नाही असा अनुभव असतानाही जर राज ठाकरे यांना तोच कित्ता गिरवायचा असेल तर त्याला आपण बापडे काय करणार? भाषणं संकलित करून त्यांचं पुस्तक काढताना पाचकळ विनोद आणि बीभत्स कोट्या संपादित झाल्या असतील अशी एक किंचित आशा होती. भाषणांचं पुस्तक छापून त्याद्वारे स्वतःच्या भूमिकेला थोडं बौद्धिक अधिष्ठान आणि गांभीर्य देण्याचा यथाशक्ती प्रयत्न असेल असंही वाटलं होतं. पण अखेर वळचणीचं पाणी वळचणीलाच गेलेलं तुमच्या पुस्तक परिचयातून जाणवलं.
पुस्तकाची फार छान समीक्षा
पुस्तकाची फार छान समीक्षा केली आहे.
हे पुस्तक कोणत्याही पूर्वगृहांशिवाय वाचायचे असे ठरवूनच हातात घेतले. त्यामुळे उत्तम निर्मितीमूल्ये, उमद्या, तरुण, चेहर्यावरुन आत्मविश्वास ओसंडत असलेल्या राज ठाकरेंचे फोटो (आणि शंभर रुपये ही किंमत!) हे सगळे मला सुरवातीलाच फार आकर्षक वाटले. पुढे एकामागोमाग ही सहा भाषणे वाचली आणि मन कडवटून गेले.
=> यु सेड इट. अगदी अशीच अवस्था झाली पुस्तक वाचून.
बाळ ठाकरे यांचा राईज अॅन्ड फॉल व्हायला चाळीस वर्षं लागली. आता एकंदरच लोक प्रत्येक बाबतीत अधीर असतात. त्यामुळे राज ठाकरेंचा राईज अॅन्ड फॉल दहा वर्षातच आटपेल असे वाटते.
जबरी
भाबड्या चेहर्यामागचा पवारट, पतंगरावी महत्त्वाकांक्षी राजकारणी मला दिसू लागला.
परीक्षण आवडले. वरील वाक्य तर खासच. अशा वेगवेगळ्या नांवांच्या आणखी पण अनेक वृत्ती आपल्या राजकारणात आहेत.
पण आज राजकारणात असे लोक आहेत की मत द्यायला जावे तर 'दगडापेक्षा वीट मऊ' या विचाराने त्यातल्यात्यात बर्या उमेदवाराला निवडावे लागते.' कुणीही लायक नाही', असा पर्याय जरी ठेवला तरी तो वापरुन काही फायदा होईल असे मला वाटत नाही.
:)
:) हे वाचल्यावर पुस्तकाकडून असलेल्या अपेक्षा पुर्ण झाल्या असेच म्हणतो ;)