Skip to main content

राजकीय कोलांटउड्या

राजकीय कोलांटउड्या हा विषय आपल्या सर्वांना काही नवा नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे सुमारे पाचेक मिनिटाच्या अंतरावर दोन बातम्या वाचल्या ज्यामधे या पुनःपुन्हा आढळणार्‍या घटनांचं प्रत्यंतर यावं :

पहिली घटना आहे, अमेरिकेच्या रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारांपैकी रिक सँटोरम यांच्या बद्दलची. दुवा : http://www.huffingtonpost.com/2012/02/27/rick-santorum-church-state_n_1…
आदल्या दिवशी सँटोरम साहेब म्हणाले : "मला अशा अमेरिकेचं स्वप्न आहे ज्यांमधे चर्च आणि सरकार यांच्यामधलं नातं अतूट, संपूर्ण, सर्वसमावेशक असेल. चर्च आणि सरकार यांच्यामधे नाते नसण्याची कल्पना मला सैतानी वाटते. खरं सांगायचं तर चर्च-सरकारना विलग ठेवणं ही अशी गोष्ट आहे , की जिच्या निव्वळ कल्पनेनेच मला ओकारी येते. "
त्याच्या पुढच्याच दिवशी सँटोरम म्हणतात : "मी चर्च आणि सरकार या गोष्टींना पूर्णपणे विभक्त ठेवण्याच्या पक्षातला आहे. चर्चला सरकारी कामात ढवळाढवळ करण्याचा कसलाच अधिकार नाही."

सँटोरम साहेबांची वरील दोन विधाने पहाता , सँटोरम साहेबांनी "ओकारी काढण्याचा" छंद आत्मसात केला आहे असे म्हणावे काय ?

.
दुसरी घटना आहे आपल्या पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममतादींची : दुवा : http://timesofindia.indiatimes.com/india/We-are-sorry-for-calling-strik…

ममतादी म्हणतात की, "काही महिन्यांपूर्वीपर्यंत आमचा पक्ष जेव्हा विरोधी पक्ष होता, तेव्हा आम्ही जे काही बंद घडवून आणले त्याबद्दल आम्हाला माफ करा. सध्याच्या विरोधी पक्षीयांनी २८ फेब्रुवारीला दिलेले बंदचे आवाहन बेकायदेशीर आहे. लोकांनी त्याला प्रतिसाद देऊ नये. बळाचा वापर करून बंद पाळणार्‍यांवर आम्ही कठोर बळ वापरून कारवाई करू. "

ममतादींच्या या पवित्र्यानंतर ढोंग, दुटप्पीपणा, सरड्याप्रमाणे रंग बदलणे, वारा वाहील तशी पाठ इत्यादि इत्यादि म्हणी/वाक्प्रचारांना रद्दबातल ठरवून त्यांच्या जागी "ममतागिरी" ही एकमेव संज्ञा लागू करावी अशी मागणी मी करतो.

रमाबाई कुरसुंदीकर Tue, 28/02/2012 - 13:14

छान मुक्तक आहे रे मुक्तसुनिता.

रोचना Tue, 28/02/2012 - 23:21

ममतादींच्या या पवित्र्यानंतर ढोंग, दुटप्पीपणा, सरड्याप्रमाणे रंग बदलणे, वारा वाहील तशी पाठ इत्यादि इत्यादि म्हणी/वाक्प्रचारांना रद्दबातल ठरवून त्यांच्या जागी "ममतागिरी" ही एकमेव संज्ञा लागू करावी अशी मागणी मी करतो.

खरंय. झी बांग्ला चॅनेलवर "दादागिरी" म्हणून एक गेम-शो होतो. आधी सौरव गांगूली ते चालवायचा, आता मिठून चर्कवर्ती करतो. त्याचे नाव बदलून दीदीगिरी ठेवायला हवे. कॉम्पेर आमच्या लाडक्या सीएम-दीदी!

बंद अयश्स्वी झाला असं दीदी सगळीकडे सांगत फिरताहेत (एका नवीन वर्क कल्चर चा जन्म वगैरे...). सरकारी हापिसात आज हजर न राहिल्यास सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये व्यत्यय आणला जाईल अशी धमकी दिली होती. असं एकाच दिवसाच्या सुटीबद्दल करता येतं का? असा हुकूम कायदेशीर आहे की नाही याबद्दलही चर्चा सवत्र होत होती.

पण एरवी आमच्या घरासमोर रहदारीमुळे होणारा त्रास आज अजिबात झाला नाही. सगळं कसं शांत होतं. मुलं संध्याकाळी फुटबॉल खेळत होती, लोक फिरत होते, एकही हॉर्न ऐकू नाही आला. हे शहरही एकेकाळी राहणेबल होते, याची कल्पना आली...

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 29/02/2012 - 06:08

In reply to by रोचना

कृपया ममतादींबद्दल काहीही वाईटसाईट बोलणं बंद करा. मॉमतादी आहेत म्हणून बंगाली संस्कृतीमधे चिक्कार विनोद होत आहेत असं मी ऐकून आहे. (गेल्या दोनेक महिन्यांत संथाली स्वातंत्र्यसैनिकांचं नाव एका रस्त्याला देण्यावरून ममतादींनी काही विनोद केला होता.)

अवांतरः
कोणे एकेकाळी, मनसेचं पहिलं खळ्ळं-खट्यॅक नुकतंच होऊन गेल्यानंतर, एक बंगाली कलीग आणि माझ्यात झालेला संवाद:
कलीगः राज ठाकरे बंगाली कसा काय नाही याचं मला आश्चर्य वाटतं!
मी: .... (चेहेर्‍यावर "अरे तुला नक्की काय चावलंय?" असा भाव)
कलीगः (स्वत:च) ... बरोबर आहे म्हणा! एक मॉमतादी आहे ते काय कमी पडतंय का?

आतिवास Tue, 28/02/2012 - 23:34

पण असा दुटप्पीपणा ही काही एकटया दीदींची खासियत नाही. या विशेषणासाठी अनेकजण दावेदार आहेत; थोडा इतिहास पाहिला की एकेक नावं येतील समोर! हा एक पंथ आहे आणि दीदी त्याच्या एक समर्थ अनुयायी आहेत असं मात्र नक्की म्हणता येईल!!

Churchill Wed, 29/02/2012 - 05:20

एखाद्या माणसाचं मत बदलू शकतं. कितीएक कट्टर अल्कोहोलिक आपल्या पोरांना सांगतात ना, की दारू वाईट म्हणून... मतात झालेला बदल हा चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी हे बघायला नको का? आता सॅंटोरम का कोण जो आहे त्याने म्हटलं की काल मला असं वाटत होतं, आज मला असं वाटतंय. तर यात का तक्रार करावी? ममतादीदींनी तर सरळ आपण बंद करून चूक केली होती असं स्पष्ट म्हटलेलं दिसतंय. त्यांना रिकव्हरिंग बंदोहोलिक म्हणा हवं तर. पण सहानुभूती द्या.

जो तो उठतो तो राजकारण्यांना ठोकताना दिसतो. तीदेखील माणसंच आहेत. त्यांना आपलं म्हणा.

नंदन Wed, 07/03/2012 - 03:36

कोलांटउड्या आणि त्या आपल्याला का आवडत नाहीत, त्यांच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा पक्षनिहाय असतो आणि त्यांचा राजकारण्यांच्या शासनशैलीवर होणारा परिणाम याबद्दलचा एक वाचनीय लेख.