एका क्राईम रिपोर्टरची सुरस आणि चमत्कारिक मुलूखगिरी : भाग ३
स्पेशल ब्रांचमध्ये आम्हाला अधूनमधून चहा आणून देणारा एक कॉन्स्टेबल होता. त्याला गणेश म्हणू या. एकदा मी तिथे गेलो तेव्हाही तो चहा देत होता, पण चांगलाच लंगडत होता.
त्याच्या बॉसच्या भेटीनंतर मी त्याला शोधून काढलं.
“यार गणेश, क्या हुआ?”
“साब, सालों ने सॉलिड बजाया मेरे को.”
“मतलब?”
गणेशदेखील जवळजवळ सहा दिवस ऑफिसमध्ये होता. “कपडा छोडो, अंडरवेअर भी नही बदला था.”
“साब बोला, ठीक है, कल शाम को घर जा. मैं माझगाव में रहता हूं, ना?”
“तो?” मी त्याला विचारलं.
“अरे, ट्रेन चालू था. मैं डॉकयार्ड स्टेशन पे उतरा. सब जगह से आरएएफ वालें आये. और मिलिटरी भी. मैं मुफ्ती में था ना, तो मैं बोला मैं पुलीसवाला हूं. मेरे पास आयडेंटिटी भी है. लेकिन कोई सुना नहीं. मेरे पे टूट पडे.”
रॅपिड अॅक्शन फोर्सची संपूर्ण तुकडी त्याच्यावर बरसली. त्यांनी रात्री फिरताना सापडलेल्या एकमेव माणसाला मनसोक्त तुडवला. त्याच्या निषेधांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. तो त्यांना आपली ओळख पटवून देऊ शकेपर्यंत चांगलाच बडवला गेला होता.
त्याच्या लंगडण्याचं कारण हे होतं तर! आपले कायद्याचे संरक्षक किती संवेदनशील आहेत हे अशा घटनांमधून दिसतं. किंवा कदाचित, शहराच्या नाड्या ज्यांच्या हातात होत्या त्या गणवेशधारी दलावर किती ताण होता ते या घटनेतून जाणवेल.
जोगेश्वरीच्या उपनगरात दुसऱ्यांदा जातीय दंगली उसळल्या. हा राजकीय चिथावणीचा प्रकार होता आणि त्यात शिवसेनेने महत्त्वाची भूमिका बजावली. मी तिथे ग्राउंड रिपोर्टर नव्हतो.
यानंतर दाऊद टोळीने तो कुप्रसिद्ध आणि भयानक सूड घेतला. कोकण किनारपट्टीवरील मच्छिमार वापरत असलेल्या सोन्याच्या तस्करमार्गाने चेक देशात मूळ असलेलं स्फोटक आरडीएक्स तस्करी करून भारतात आलं.
या दंगलींनी ‘डी’ कंपनीमध्ये धार्मिक फूट पडली होती.
विस्मृतीत गेलेला एक सूक्ष्म मुद्दा सांगतो. अरुण गवळी टोळीचा सदस्य शैलेश हळदणकर याला ‘डी’ कंपनीच्या ज्या गुंडांनी गोळ्या घातल्या ते हिंदू होते. ‘डी’ कंपनीच्या त्या अंडरवर्ल्ड कारवाईचे शिल्पकार होते वसईचे सुभाष सिंग ठाकूर आणि भाई ठाकूर. ही घटना सप्टेंबर १९९२मध्ये घडली. अनेक अर्थांनी मुंबईतील टोळीयुद्धाची ही शेवटची घटना होती.
मार्च १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर काही महिन्यांतच मुंबईच्या संघटित गुन्हेगारी क्षेत्रामध्ये धार्मिक फूट पडली. छोटा राजनच्या माणसांना आणि टोळीतील इतर सर्व हिंदू सदस्यांना मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करवण्याच्या कटातून जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आलं. ‘डी’ कंपनीच्या नेहमीच्या कोकण किनारपट्टीमार्गे करण्यात येणाऱ्या तस्करी मार्गातले अनेक प्यादे हिंदू होते. आपण यावेळी ज्याची तस्करी करतो आहे ते सोनं नाही याची माहिती म्हणा किंवा जाण म्हणा त्यातल्या फार कमी लोकांना होती. इतर मुस्लिम खलाशांनाही नेमकं काय साहित्य आणलं जात आहे हे माहीत नव्हतं.
आणि मग… १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत खरेखुरे स्फोट झाले.
मी द डेलीच्या ऑफिसजवळ सोडणाऱ्या बसमध्ये होतो. मला लोक धावत येताना दिसले. हुतात्मा चौक रस्त्यावरून आमचे प्रेस फोटोग्राफर शैलेंद्र यशवंत पळताना मला दिसले. त्यांनी कॅमेरा वर धरला होता. बसमधून उतरताच मला दलाल स्ट्रीटवरून येणाऱ्या धुराचे लोट दिसले.
"शैलेंद्र, काय झालं?"
"शेअर मार्केटमध्ये स्फोट झाला आहे. आणि आता एअर इंडियाची इमारतही उडाली आहे असं ऐकतो. मी तिथेच चाललो आहे."
मीही शैलेंद्रपाठी धावू लागलो. मंत्रालयाजवळ कुठेतरी मला एक फोन बूथ दिसला. मी ऑफिसला फोन केला.
मयंकने फोन उचलला.
“ऐक, शिवसेना भवनातही स्फोट झाला आहे. शक्य असेल तर तिथे पळ.”
त्यानंतर फोन लाईन मेल्या. मी शिवाजी पार्कला कसा पोहोचलो हे आज मला आठवत नाही. पण माझ्याकडे नोटपॅड होतं आणि मी परिसरातील रहिवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. अर्धी विजार घातलेला एक सडपातळ माणूस फाटक उघडून बाहेर आला आणि मी काही प्रश्न विचारण्यापूर्वीच माझ्यावर बरसला.
“मादरचोद, तुमच्यासारख्या लोकांमुळेच शहरात हे घडतं. तुम्हीच लांड्यांना प्रोत्साहन देता.”
शिवसेना भवनाशेजारी एक पेट्रोल पंप होता. सुदैवाने स्फोटातून पंप बचावला. सेना भवन सुरक्षित राहिलं. स्फोटकांनी भरलेली गाडी पुरेशी जवळ पोहोचू शकली नाही. प्लाझा सिनेमात आणखी एक स्फोट झाला. तो तुलनेने कमी शक्तिशाली होता.
त्या अर्ध्या चड्डीतल्या तरुणाच्या आक्रमकतेमुळे बावचळून मी मागेमागे सरकलो आणि मागे उभ्या असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकाऱ्यावर जाऊन आपटलो.
“आप रिपोर्टर हो ना? मेरी गाडी में जा कर बैठो.”
जेव्हा अधिकारी गाडीत परत आला तेव्हा मी त्याला सांगितलं की माझं ऑफिस कुलाब्यात आहे. त्याने मला अग्निशमन दलाचं मुख्य कार्यालय असलेल्या भायखळ्यापर्यंत न्यायचं कबूल केलं.
आणि दंगलग्रस्त, घाबरलेल्या मुंबईत प्रवासाचं हे सर्वोत्तम साधन मला योगायोगाने मिळालं. वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने अग्निशमन गाडीसाठी एक वेगळी लेन मोकळी करण्यात आली होती. लाल दिवा चमकवत आमची गाडी सरसर इच्छित स्थळी पोचली.
शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर तीन दिवसांनी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मुंबईत आले. त्यात अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे बॉम्ब तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीम होती.
बातमीच्या शोधात इकडे तिकडे फिरत असताना मी ‘डायरेक्टरेट ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज'ला फोन करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी एमटीएनएल सर्व सरकारी संस्था आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे नंबर डिरेक्टरीत लिहीत असे. मी तिथल्या प्रमुखांचा नंबर फिरवला.
"मी द डेलीचा रिपोर्टर आहे. स्फोट होऊन पाच दिवस झाले आहेत. तुम्हाला त्या ठिकाणाहून काही नमुने मिळाले आहेत का?"
"सर, देखो ना. इतने दिन हो गये. एफबीआय टीम को भी उन्होने बुला लिया है. लेकिन अभी तक हमको सँपल्स नहीं भेजा गया है."
शहरातल्या सर्वात मोठ्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीला अद्याप स्फोटाच्या ठिकाणाहून नमुने मिळालेले नाहीत ही माहिती मला दिल्यामुळे त्या बिचाऱ्या माणसाला नोकरी गमवावी लागली. माझ्या एक कॉलमी बातमीत एवढंच लिहिलं होतं की शहरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या – म्हणजे जगातील सर्वात मोठ्या नागरी दहशतवादी हल्ल्याच्या – तब्बल पाच दिवसांनंतरही बॉम्बचे अवशेष आणि स्फोटाच्या ठिकाणचा मलबा (debris) अद्याप शहरातील प्रमुख फॉरेन्सिक लॅबपर्यंत पोहोचलेले नाहीत.
शहर शांत होऊ लागताच गाड्या, बस, बसथांबे, आणि रेल्वे स्थानकं अशा सर्व ठिकाणी सूचना आल्या – "कृपया काळजी घ्या. बेवारस सामान पोलीस किंवा रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्या. हा बॉम्ब असू शकतो."
तणावपूर्ण शांततेच्या काही दिवसांनंतर मला गांवदेवी पोलिस स्टेशनमधील एका ड्रायव्हर किंवा कॉन्स्टेबलचा फोन आला. आता नेमकं आठवत नाही; दक्षिण मुंबईतील इतर कोणी शिपाईही असेल. एका कॉन्स्टेबलने रस्त्यावर सापडलेली टिफिनसारखी दिसणारी बेवारस वस्तू उचलून आणली होती. त्याने कापडी पिशवी उघडली आणि त्यात जेवणाचा डबा असल्याचं पाहिलं. तो ती पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेला.
पोलिस स्टेशनच्या आतल्या टेबलावर त्या टिफीनचा स्फोट झाला. सुदैवाने तो कमी तीव्रतेचा इम्प्रोव्हायझ्ड स्फोटक होता आणि कोणालाही इजा झाली नाही.
दुसऱ्या दिवशीच्या द डेलीमध्ये मथळा होता : “जेव्हा पोलिसच बॉम्ब घरी आणतो…”
(क्रमशः)
हरीश नांबियार २०१६पासून इकॉनॉमिक टाइम्समध्ये पुनर्लेखन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे २००२मधल्या गुजरात दंगलीच्या आगेमागे ‘बुलेट’वरून केलेल्या भारतभ्रमणातील अनुभवांवर आधारित Defragmenting India: Riding a bullet through the gathering storm हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचा ॲमेझॉनवरील दुवा.