ध्यान ...एक अनुभव - ३

मन अन शरीर यांची निसर्गाने अगदी सूक्ष्म स्तरावर एकमेकात गुंफण केलेली आहे. मन विरसलेले असेल तर शरीर दुखणाईत होते. मन प्रसन्न असेल तर दुखणी दूर पळतात, हा सामान्य अनुभव आहे. इंद्रिये अन बुद्धी यांचीही मन-शरीराच्या दोऱ्यात ओवणूक झाली आहे. एकाची ओढाताण दुसऱ्यावर परिणाम करते. असे म्हटले जाते की मन हे हत्तीप्रमाणे बलशाली आहे. योग्य मार्गाने नेले तर अतिशय विधायक कार्य मन करू शकते. परंतु अंकुश नसलेला हत्ती जसा वनाचा विध्वंस करू शकतो तसे अंकुश नसलेले मन जीवनाचा विध्वंस करू शकते. मनाचे वर्णन कुणीसे अगदी चपखल केले आहे... आधीच मर्कट, तशात मद्य प्याला मग त्याला वृश्चिकदंश झाला अन त्यात भूतबाधा झाली. त्यानंतर त्याचे जे वर्तन होईल तितकेच मन चंचल आहे. या चंचलतेचा प्रतिघात(impact) शरीर व बुद्धी यांच्यावर होतो. शरीरात Fatigue निर्माण होतात. बुद्धी भ्रमून जाते. ध्यानातून मन स्थिर झाले की हे सर्व थांबते. जाणीवा स्वच्छ होतात. Instincts सहज वर येऊ लागतात. शरीराचे, मनाचे राखीव उर्जास्त्रोत उपलब्ध होतात.
समजा आपण प्रचंड थकलो आहोत. एकाही पाउल चालण्याची शक्ती नाही. थकून बाकावर बसलो असता एक पिसाळलेला कुत्रा आपल्या दिशेने आला. आपण काय करू ? एक सेकंदही ना थांबता उठून पळू लागू की नाही ? हीच शरीराची राखीव शक्ती. तसेच समजा दिवसभर काम करून खूप थकवा आला आहे. बुद्धीने शरणागती पत्करली आहे. डोळे अक्षरे वाचताहेत पण मन अर्थ उमगण्याच्या पलीकडे कंटाळून गेलं आहे. आपण जरा स्थान बदलतो इतक्यात एक आवडत्या विषया वरचं आर्टीकल नजरेस पडतं . कुतूहल चाळवलं जातं. नकळत हात ते उचलतात. मन अन बुद्धी पुन्हा कामाला लागते. पण आता श्रम जाणवत नाहित. ही मनाची राखीव शक्ती ! ध्यानात ती गवसते.
‘ध्यान’ या शब्दाचा अर्थ काय ?
ध्यान या शब्दाचा मला उमगलेला अर्थ काहीसा असा आहे. ध्यान म्हणजे Attention ! Pay attention to yourself. Pay attention to your body and mind.
अन ध्यान करणे म्हणजे नेमके काय करणे ? ध्यानाचा प्रयत्न कसा करावा ?
खरं सांगायचं तर, ध्यान केले जात नाही, तर ते होते. आपण फक्त स्वस्थ बसावे लागते. काहीच न करणे म्हणजे ध्यान..! शरीराच्या अन मनाच्या सर्व क्रिया थांबणे म्हणजे ध्यान. सर्व प्रयत्न सोडून देणे म्हणजे ध्यान.
तसे पहिले तर ध्यानाच्या पद्धती असंख्य आहेत. मार्ग अनेक पण लक्ष्य एक ! त्यातही सर्वसाधारणपणे प्रचलित असलेल्या पद्धती तीन आहेत.
एक, श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यान करणे. श्वासाच्या मार्गावर, गतीवर पूर्ण लक्ष पुरवायचे. पण ही काहीशी अवघड वाटते. यामुळे श्वासाचा नैसर्गिक ओघ काहीसा डिस्टर्ब झाल्यासारखे वाटले. म्हणजे उगाचच कुणी आपल्याकडे रोखून बघितले तर आपल्या हालचाली कशा अनैसर्गिक होतील, तसे.
दुसरी, बाह्य वस्तूवर लक्ष केंद्रित करून ध्यान करणे. जसे की ज्योतीवर अथवा मूर्ती / चित्र यांच्यावर. याला ‘आलंबन’ पद्धत म्हणतात. म्हणजे काही वेळ त्या वस्तूकडे पहायचे अन नंतर डोळे मिटून तिची प्रतिमा मनासमोर आणायची. तिच्याशी मनाने एकरूप व्हायचे. यात एकाग्रता व्हायला काहीसा वेळ लागतो, असे लक्षात आले.
तिसरी पद्धत मनातल्या विचारांचे निरिक्षण करायचे. साक्षीभावाने पहात रहायचे. त्यांच्यात न गुंतता फक्त अवलोकन करायचे. ही पद्धत परिणामकारक आहे. पण यात मनाचा तोल काटेकोरपणे सांभाळणे जमले पाहिजे. विचारांना प्लसही नाही अन मायनसही नाही अशा पद्धतीने हाताळता येणे आवश्यक आहे.
हरित ध्यान (Green Color Meditation ) या एका चौथ्या पद्धतीत अशी कल्पना केली जाते की चमकदार हिरवा प्रकाश शरीरामध्ये आस्ते आस्ते भरला जात आहे. त्यातून पेशींना संजीवनी मिळते आहे. वेदना हळू हळू शमत आहेत. शरीर नव्या उत्साहाने भारीत होत आहे, इ. इ. या पद्धतीत मनाची शक्ती पूर्णपणे शरीराकडे वळवून तिचा दुखण्यावर उपचारासाठी वापर केला जातो. आता ध्यान ही काही उपचार पद्धती नव्हे. पण शरीराची अवस्था निरुद्धतेकडून शिथिलतेकडे नेण्याचे काम ध्यानात होत असल्याने अनियमिततेमुळे होणारी किरकोळ दुखणी, अकारण होणाऱ्या वेदना यांचा उपचार ध्यानातून होऊ शकतो. ‘स्थिती’ मध्ये उर्जा साठवली जाते, तर गतीमध्ये ती खर्च होते. जागृत अवस्थेत शरीर अन मन दोन्हींचे अणुरेणु गतिमान असतात. उर्जा खर्च होते, तर ध्यानामध्ये शरीर, मन , सर्व अंतर्गत यंत्रणा यांची गती जवळ जवळ शून्य होते. उर्जा (potential) साठवली जाते.
इथे एक लक्षात घेतले पाहिजे की Physical Dis-order मधून येणारे दुखणे जसे की Viral Infection, रोग-विकार इ. चा उपचार ध्यानातून होणार नाही. तथापि भौतिक उपचाराला अधिक परिणामकारक बनवण्याचे कार्य मात्र साध्य होईल. हृदयविकार, मधुमेह, उच्च –नीच रक्तदाब अशा दुखण्यांचा उपचार मात्र ध्यान अन योग्य आहार-विहार यातून होऊ शकतो. माझ्या स्वत:च्या अनुभवाव्यतिरिक्त याची आणखी काही उदाहरणे माझ्या समोर आहेत.
ध्यानाबाबतचे हे सर्व विश्लेषण माझ्या अल्प अनुभव, अभ्यास अन आकलनानुसार मांडते आहे. प्रत्यक्षात ती पुरातन प्रक्रिया फार वेगळ्या स्तरावर कार्य करते. झोप घेतल्यानंतर उत्साही कसे अन का वाटते, याचे विश्लेषण कुणी यथार्थपणे करु शकेल का ? तसेच ध्यानात हे सर्व कसे होते हे सांगणे कठीण आहे.
पद्धत कोणतीही असो, परिणीती एकच.... निर्विचार अवस्था. पाण्याने भरलेल्या एखाद्या ग्लासमधले ढवळलेले मातीचे कण जसे कालांतराने आपोआप खाली बसावेत, तसे शरीराचे अन मनाचे अणुरेणु हळू हळू स्तब्ध व्हावेत. मनाच्या अन शरीरातील पेशी पेशीच्या सर्व गती शून्य होणे . निवळशंख पाण्यासारखे मनाचे अंतरंग स्वच्छ व्हावे.
आता हे समजायचे कसे ? ते जाणवतं असं. आतले व बाहेरचे सर्व आवाज एकदम शांत होतात. इंद्रियांच्या संवेदना बंद होत नाहीत पण एखाद्या जाड काचेआडून आल्यासारख्या मंदावतात. शरीराची जाणीव जाते. एक प्रकारची बधिरता येते. म्हणजे हात-पाय आहेत की नाहीत, असे वाटते. इच्छा केली तरी चटकन हात अथवा पाय हलवता येत नाही. एक बंधन जाणवते. ही स्वाभाविक अवस्था असते. त्यामुळे घाबरून जाऊ नये.
शरीर व मनात सर्वत्र एक संतुलित अवस्था जाणवते. ही अवस्था किमान १० मिनिटे टिकली पाहिजे. मग ‘ध्यान’ होते. अन असे ध्यान रोज नियमितपणे २५ मिनिटे केल्यानंतर साधारणपणे तीन आठवड्यांनी त्याचे सकारात्मक परिणाम जाणवू लागतात. ध्यानाची वेळ शक्यतो एकच असावी. जसे की जेवणाची किंवा व्यायामाची ठराविक वेळ असते, तशी. तर त्याचे रिझल्ट्स जास्त खोल मिळतात.
प्रथम वेळी ध्यान करताना मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. नंतर त्याप्रमाणे एकांतात करावे. ध्यान करताना कुठेही अस्वस्थता, वेदना, तणाव इ. वाटले तर योग्य व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. चुकीच्या पद्धतीने ध्यान म्हणजे काय याचे विश्लेषण पुढच्या लेखात.
(क्रमश: )

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (5 votes)

प्रतिक्रिया

निर्विचार अवस्था ही गोष्ट प्रत्यक्षात शक्य आहे का? किती ही ठरवल की मनात विचार आणायचे नाहीत तरी मनात विचार आणायचे नाहीत हा विचार मनात असतोच ना?
हरित ध्यान हे ऑटो सजेशन या प्रकारचे आहे काय?

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

निर्विचार अवस्था ही गोष्ट प्रत्यक्षात शक्य आहे का? किती ही ठरवल की मनात विचार आणायचे नाहीत तरी मनात विचार आणायचे नाहीत हा विचार मनात असतोच ना?
याबद्दल थोडेसे...
स्नेहांकिताने ध्यानाबद्दल सविस्तर आणि सोप्या शब्दांत सांगितलेले आहेच. तरी माझे हे अनुभूतितून उमटलेले थोडे शब्द...
घाटपांडे सर,
तुमचा प्रश्न छान आहे. पण येथे हे जरुर सांगावेसे वाटते आहे की निर्विचार ही अवस्था शक्य आहे.
कारण आपल्या मनात विचार येतो आहे की नाही हे आपल्या स्वतःलाच कळत असते.
ध्यानात आपण तटस्थपणे मनात येणार्‍या विचारांकडे फक्त पहायचे असते. सुरुवातीला वादळांसारखे विचार एकामागोमाग येत राहतात.
काही दिवसांच्या अभ्यासाने हा प्रवाह हळू हळू संथ होतो. नंतर पूर्णपणे विचार येणे बंद होतात. त्यावेळी आपल्याला तटस्थपणे पहात असताना ते नक्की जाणवते.
अर्थात मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. तरीसुद्धा प्रत्यक्ष अनुभुति ही शब्दातीत असते. कारण मनाच्या पातळीवर चालू असलेल्या प्रत्येक पैलूचे मूल्यांकन शब्दब्द्ध करणे हे एक आव्हानच असते. ध्यानाच्या या प्राथमिक अवस्थेला तुम्ही येऊन पोहोचलात की मग तुमचा ध्यानातला खरा प्रवास सुरु होतो असे म्हणायला हरकत नाही.

बाकी "हरित ध्यान हे ऑटो सजेशन या प्रकारचे आहे काय?" याबद्दल अधिक सांगण्यासाठी अधिकारी व्यक्ती स्नेहांकिता. Smile

निर्विचार अवस्था अर्थात शक्य आहे. आपल्याला तिची सवय नसल्याने ती साधणे सुरुवातीला कठीण जाईल. पण सरावाने ती सहज साध्य होते.
ती टिकवणे मात्र अभ्यासानेच जमते.
हरित ध्यान या प्रकाराला ऑटो सजेशन पेक्षा self viewing म्हणणे योग्य ठरेल. याबद्दल उत्सुकता असल्यास खरडवहीत links देते.

निर्विचार अवस्था ही गोष्ट प्रत्यक्षात शक्य आहे का?

काही प्रमाणात नक्कीच शक्य आहे. डेल्टा फेजमध्ये विचार नसतात. दोन विचारांमधला अवकाश हळुहळु वाढवत नेला की निर्विचार अवस्था साधणं शक्य होतं.

शाळकरी वयापासून मारूनमुटकून अभ्यासाला बसवल्यावर झाडाकडे नाहीतर पक्ष्यांकडे नाहीतर खिडकीच्या गजांकडे बघून लागणारी तंद्री यापेक्षा निराळी असते का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तंद्री यापेक्षा निराळी असते का?

तंद्री ही ध्यानाची १ली पायरी Smile

ह्याबाबत गविंना quote करण्याचा मोह आवरत नाही.
प्रश्न :- मन निर्विचार झाल्याचा अनुभव कोणी घेतला आहे काय?
गविकाकांचं उत्तर :-
हो. प्रयत्नपूर्वक अशी अवस्था आणता येते.

"अरे.. काय मस्त निर्विचार अवस्था आलीय.." ,

"एकदम सक्सेसफुल झालं आपलं मेडिटेशन.."

"कसं शांत शांत वाटतंय.."

"आता परत नाही ना सुरु होणार विचार?"

असे सर्व विचार निर्विचार अवस्थेत येतात..
Smile
.
सविस्तर चर्चा :-
http://www.misalpav.com/comment/322090#comment-322090
.
टिप :- मी वरीलपैकी कुठल्याही भूमिकेशी सहमत नाही; असहमतही नाही.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्नेहांकिता यांच्या वरील लेखातील "शरीराच्या अन मनाच्या सर्व क्रिया थांबणे म्हणजे ध्यान." हे वाक्य पूर्णपणे चुकीचे आहे. शरीराच्या सर्व क्रिया थांबणे म्हणजे मृत्यु. ध्यानात मरणे अपेक्षित नसते. Smile

आणि अणूरेणूंची हालचाल थांबण्याचं काय? ती थांबली तर -२७३ सेल्सियसला माणूस जिवंत रहातो का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सॉरी, तर्कतीर्थ, आपण म्हणता ते बरोबर आहे.
येथे मला शरीराच्या अन मनाच्या सर्व 'ऐच्छिक' क्रिया असे अभिप्रेत आहे.

आधीच मर्कट, तशात मद्य प्याला मग त्याला वृश्चिकदंश झाला अन त्यात भूतबाधा झाली. त्यानंतर त्याचे जे वर्तन होईल तितकेच मन चंचल आहे. या चंचलतेचा प्रतिघात(impact) शरीर व बुद्धी यांच्यावर होतो. शरीरात Fatigue निर्माण होतात. बुद्धी भ्रमून जाते.

अशा ध्यानापूर्वी भ्रमित आणि भूतबाधित मनाला ध्यानासारखी एक पवित्र आणि शांती/क्रांतीकारक गोष्ट करावीशी वाटते.

मात्र

ध्यानातून मन स्थिर झाले की हे सर्व थांबते.

ध्यानानंतर ही मर्कटलीला (माकडचाळे) वगैरे बंद होणे अपेक्षित असूनही ध्यानानंतर पुन्हा मन मर्कट-मद्य वगैरेंच्या आधीन होते हे कसे काय?

ध्यानानंतर ही मर्कटलीला (माकडचाळे) वगैरे बंद होणे अपेक्षित असूनही ध्यानानंतर पुन्हा मन मर्कट-मद्य वगैरेंच्या आधीन होते हे कसे काय?

...?
...? लेखात असे लिहिलेले नाही. तथापि मनाची स्थिर अवस्था जागृतीत टिकणे अपेक्षित नाही. ते पुन्हा प्रवाही झाल्याशिवाय दैनंदिन व्यवहार करणे शक्य नाही.

मी ध्यान अनेक वर्षे आचरत आहे. मला शरीराचे भान न जाणवणे व पराकोटीची शांतता हे अनुभव सुलभतेने निर्माण होतात पण ही अवस्था का ढळते हे स्मजले नाही तसेच ध्यान झाल्यावर माझ्यात कोणतेही सकारात्मक वा नकारात्मक बदल कमी अथवा जास्त होत नाहीत हे कसे ?

actions not reactions..!...!

ध्यानाविषयी कसलाही आकस न ठेवता, ध्यान करणार्‍या आणि न करणार्‍या व्यक्तींच्या मेंदूतील क्रियांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. असा अभ्यास कोणी केला असल्यास त्याविषयी वाचायला आवडेल. नानावटींच्या लेखात याचा उल्लेख आहे, पण जास्त तपशील नाही.

एक‌च‌ बुद्ध्
बाकी सारे क्रुद्ध !

फारच कमी कष्टात हे सापडलं.

लेख वाचला.. "चुकीच्या पद्धतीने ध्यान म्हणजे काय याचे विश्लेषण पुढच्या लेखात" येणार असल्याने जास्त लिहित नाही.

मात्र "निर्विचार अवस्थेतील ध्यान" आणि "गाढ झोप" यातील फरक अजूनही म्हणावा तसा लक्षात आलेला नाही. कारज "आपण जागे आहोत" हा विचारही मनातून काढून टाकल्यावर झोपच लागली ना?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कारज "आपण जागे आहोत" हा विचारही मनातून काढून टाकल्यावर झोपच लागली ना?

नक्की का? जागृत अवस्थेत विचारशून्यता साधण्यात तत्वतः तरी काही अडचण दिसत नाही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अगदी असंच काही म्हणता येणार नाही ऋषिकेश.
उदा. आपण एखादा चित्रपट पाहताना फक्त अवलोकन करत असतो. विचार बाजूला राहतात. आता प्रतिक्रियाही बाजूला ठेवा. मग फक्त दृश्य अन पाहणारा शिल्लक राहते. ही निर्विचारसदृश्य अवस्था म्हणता येईल.

ध्यानाच्या दोन तीन पद्धतीचं जास्त प्रचलित आहेत. ध्यान करण्या साठी सर्व जण तीच तंत्रे वापरून बघतात आणि काही दिवसांनी सोडून देतात. 'विज्ञान भैरव' हा शैव पंथातील एका ग्रंथात ध्यानाच्या ११२ पद्धती दिल्या आहेत. पैकी कोणते ना कोणते तंत्र आपल्याला जरूर सूट होते. या ग्रंथावर ओशोंचे फार सुरेख विवेचन आहे. जालावर PDF सहज मिळते. जिज्ञासूंनी ही तंत्रे आचरून बघावीत.