चहा-बिस्किटाची प्रेमकहाणी

#संकीर्ण #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

चहा-बिस्किटाची प्रेमकहाणी

- प्रभाकर नानावटी

चहा-बिस्किटं

बासुंदीसारख्या भरपूर गोड असलेल्या व उकळून उकळून मूळ चवच नष्ट केलेल्या 'अमृततुल्य' कडक चहाबरोबर बिस्किट हवेच अशी एक मानसिकता रूढ झाल्याचे आपल्या लक्षात आले असेलच. मग त्या बिस्किटाची चव आणखी गोड, वा खारट वा तोंडात टाकल्याबरोबर लोण्यासारखी विरघळणारी, वा सपक, वा बेचव, वा शुंठ-वेलदोड्यासारखी घमघमणारी वा कुरकुरीत अशी काहीही असली तरी चालेल. चहा-बिस्किटाची चटक नसणारा भारतीय अगदीच विरळ असणार. चहाबरोबर 'बिस्कूट' हा 'देशी रोमान्स' आज आपल्या नित्य परिचयाचा वाटत असला तरी शंभर-दीडशे वर्षापूर्वी याच चहा-बिस्किटांच्या चवीचा आनंद लुटणाऱ्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागत होता हे सांगूनही खरे वाटणार नाही. कारण उच्च जातीवर्गाच्या धार्मिक रूढी-नियमामध्ये तो बसणारा नव्हता. प्रसंगी त्याच्यावर ज्ञाती (जाती) बांधवाकडून बहिष्कार घातला जात होता. प्रायश्चित्ताची रकम अदा केल्याशिवाय त्यांच्या घरच्या कुठल्याही सण-समारंभाला वा सुख-दुःखाच्या प्रसंगात कुणीही जात नव्हते. उच्च जातीच्या प्रत्येक गोष्टीचे (अंध)अनुकरण करणाऱ्या इतर जातीनेसुद्धा हाच कित्ता गिरवला होता. त्यामुळे इतर वर्गाकडूनसुद्धा बिस्किट-ब्रेडला विरोध सहन करावा लागला. परंतु बिस्किट व ब्रेड यांना इतका विरोध का सहन करावा लागला व नंतरच्या काळात बिस्किटाचे (व ब्रेडचेसुद्धा!) 'हिंदू'करण कसे झाले हे जाणून घेणे वाचकांना आवडेल म्हणून हा लेखनप्रपंच.

खरे पाहता हा भारतीय समाज पुरातन काळापासून कित्येक वर्षे बिस्किटसदृश असे काही तरी सकाळ-दुपारच्या नाष्ट्याबरोबर काहीना काही तरी खातच असेल. आपल्या विविधांगी समाजातील खाद्य पदार्थामध्ये विविधता होती. त्या त्या प्रदेशातील शेती, जंगल व पाळीव प्राण्यांच्या दूध-अंडी-मांस यासारख्या खाद्य उत्पादनानुसार खाण्याच्या सवयी रूढ झाल्या. त्यातही अरब, पारशी व नंतरच्या काळात पाश्चिमात्य देशवासी यांच्या स्थलांतरामुळे त्या त्या देशातील खाद्य पदार्थांची चव चाखली गेली. त्यातील आवडलेल्या काही पदार्थांना बनविण्याच्या पद्धतीत विविधता आली.

पोर्तुगीजानी गोव्यामध्ये बेकरीचा धंदा सुरू केला. त्या काळी बेकरी उत्पादनाला योग्य गव्हाचे पीठ मिळत नव्हते, ब्रेडच्या fermentationसाठी आवश्यक असलेले यीस्ट उपलब्ध नव्हते. योग्य प्रकारचे ओव्हन नव्हते. तरीसुद्धा ओव्हनऐवजी तंदूर, यीस्टऐवजी ताडी, व स्थानिक गव्हाचे पीठ वापरून ब्रेडसदृश 'पाव' तयार करण्यात येत होता. (नंतरच्या काळात इराणहून मैदा आल्यानंतर ब्रेडची गुणवत्ता सुधारली.) पावाच्या चवीची सवय त्यांनी स्थानिक ख्रिश्चन समाजाला लावली.

गोवा-पांडीचेरीमध्ये पोर्तुगीजांनी curd tarts व फ्रेच croissant आणल्याप्रमाणे ब्रिटिशांनी त्यांच्या छावण्या असलेल्या कलकत्ता, मद्रास, मुंबई, दिल्ली यासारख्या शहरात त्यांच्या देशातील ब्रेड, केक, बिस्किट इत्यादी बेकरी उत्पादनांची दुकानात सुरेख मांडणी करून स्थानिक उच्चभ्रूंचे लक्ष वेधले. बेकरीतील बहुतेक उत्पादने नाशवंत या सदरातल्या होत्या. अपवाद फक्त बिस्किटांचा. त्या दीर्घकाळ टिकत होत्या.

बिस्किट मात्र ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली खास भेट होती. ब्रिटनमधील औद्योगीकरणाच्या सुरुवातीच्या त्या कालखंडात हंट्ली अँड पामरसारख्या कंपन्यांनी ब्रिटनमधील यांत्रिकीकरणातून मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या बिस्किटांची वेळोवेळी आयात करून धंद्यात जम बसवला. सुरुवातीच्या त्या काळात बिस्किट हे उच्चभ्रू वर्गाचे खाद्य म्हणून नावलौकिक मिळवलेले खाद्य पदार्थ होते व त्याच्या किंमती गरीबांना परवडण्यासाऱख्या नव्हत्या. त्याचप्रमाणे त्या धार्मिकरित्याही निषिद्धही होत्या. त्यामुळे एतद्देशीयांना फक्त 'विंडो शॉपिंग' वर समाधान मानावे लागत होते.

हिंदू समाजामध्ये आहार पदार्थांना धार्मिक व नैतिक आयाम दिल्यामुळे या धर्माच्या जाती व्यवस्थेतील स्पृश्यास्पृश्यतेची सर्व प्रकारची बंधने या अन्नपदार्थांनासुद्धा चिकटवण्यात आली होती. भारतीय अन्नपदार्थांच्यातील चवींची वैविध्यता व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या अन्नपदार्थांची स्वीकृती व त्यांचे भारतीयीकरण असा शेकडो वर्षांचा त्यांचा इतिहास असला तरी कुठल्याही नवीन पदार्थाला विरोध ठरलेला होता. १९व्या शतकातील सनातनी हिंदूंना माहितीत नसलेल्या बिस्किट-ब्रेडसारख्या म्लेंच्छ (हा शब्दप्रयोग परदेशी, जातीबाह्य व आपल्यावर आक्रमण करणारे इत्यादींना सरसकटपणे केला जात होता) अन्नपदार्थाविषयी तिटकारा असणे स्वाभाविकच होते. त्यामुळे बिस्किट वा ब्रेड यांनासुद्धा त्यांनी जातीबाह्य ठरविले. यांचा स्पर्श (व चवही) त्यांना नकोसा वाटत होता. त्यांच्या मते बिस्किट, ब्रेडच नव्हे तर लिंबूपाणी व बर्फसुद्धा अपवित्र ठरल्या होत्या. त्यांच्या सेवनामुळे आपण रौरव नरकात जाऊ ही भावना त्यांच्या मनात घर करून होती. या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना त्यामुळे समाजबाह्य ठरवले जात होते.

biscuit

बाल-पाल-लाल या क्रांतिकारी त्रयीमधील बिपिनचंद्र पाल यांनी याविषयीचे अनुभव त्या काळच्या एका पत्रिकेत लिहिले आहेत. “इंग्रजी शिकलेले काही मध्यमवर्गीय सुशिक्षित भद्र लोक बंगालमधील एका शहरात आपल्या घरी चहा बिस्किट घेत आहेत, याचा सुगावा काही सनातन्यांना लागला. बाबा-पुता करून त्यांच्या तावडीतून सुटून बहिष्कारापासून वाचवून घेण्यात ते शेवटी यशस्वी झाले,” असे त्या घटनेचे त्यांनी वर्णन केले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनासुद्धा पुण्यातील पंचहौद ('ग्रामण्य') प्रकरणात मिशनऱ्यांच्या बरोबर 'चहा बिसकूत' खाल्ल्याच्या काही खोडकर लोकांच्या आरोपामुळे भरपूर मनस्ताप सहन करावा लागला.

बिस्किटाभोवतीच्या अशा प्रकारच्या कलंकामुळे कुठल्याही जातीचे लोक बेकरीमध्ये काम करण्यास तयार होत नसत. १६२३ साली गुजरातमध्ये इंग्रजांनी पहिली बेकरी सुरुवात केली. परंतु तेथील एकही हिंदू त्या बेकरीत काम करायला तयार झाला नाही. त्यांच्या मते ब्रेडमध्ये ताडी व अंड्यांचा वापर केला जात होता व हे दोन्ही पदार्थ अपवित्र मानले जात होते. मुस्लिम व काही अस्पृश्य जातीच्या कामगारांकडून काम करून घेतल्यामुळे सवर्ण हिदूंनी त्या बेकरीवर व बेकरीच्या उत्पादनावर बहिष्कार घातला. मुळात जातीस्तरावरील वरच्या जातीचा माणूस खालच्या स्तरातील माणसाच्या हातचे खाणे अशक्य कोटीतील गोष्ट होती. जातीनियमांची बंधनं पाळणे अनिवार्य होते. ही बंधनं न पाळल्यास त्यांना जातीच्या बाहेर ठेवले जाई. त्यामुळे त्या काळात एकाही सवर्ण हिंदूच्या मालकीची बेकरी नव्हती. कुणीतरी तसे प्रयत्न केल्यास त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात येत होते.

जाहिरात

भारतातील उद्योगव्यवस्था जातीभेदामुळे तेवढीशी प्रगती करू शकली नाही; विशेष करून आहारपदार्थाचे उत्पादन करणाऱ्यांना फारच कठिण काळ होता. येथील जातीव्यवस्थेतील जाचक अटीमुळे बेकरी उद्योग जास्त करून ख्रिश्चन व पारशांच्या हातात गेले. येथील कामगारवर्ग मुस्लिम समाजातून आलेला होता.

जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा समाजमन बंड करून उठते. १९व्या शतकातील समाजाचे असेच काही तरी झाले असावे. काही जण रूढी-परंपरांचे, त्यातील जाचक अटींचे पालन करण्यास नकार देऊ लागले, चिकित्सा करू लागले, प्रश्न विचारू लागले. युरोपच्या पश्चिमी देशातील पुरोगामी व आधुनिक विचार असलेली जीवनशैली त्यांना आकर्षित करू लागली. साधे वाटणारे हे बिस्किट या बंडाचे प्रतीक झाले. जातीव्यवस्थेला विरोध करण्यासाठी चहा-बिस्किट खाणे हे निमित्त ठरले. मोठ-मोठ्या शहरातील तरुण वर्ग छुपे-छुपे इराण्यांच्या हॉटेलमधील चहा-बिस्किटांचा आस्वाद घेऊ लागला. प्रार्थनासमाज वा ब्रह्मोसमाज या आधुनिक विचारांची चर्चा करणाऱ्या व त्याप्रमाणे आपली जीवनशैली बदलू पाहणाऱ्या मवाळ संस्थेतील सभांचा शेवट चहा-बिस्किट (वा काही वेळा शेरी व बिस्किट) यांनी होत असे. आंग्लाळलेली ही मंडळी सनातन्यांना धक्का देण्यात पुढाकार घेत होते. सनातन्यांच्या मते हिंदू धर्म बुडविण्यात बिस्किटाचा हातभार होता. हिंदूविरोधी बिस्किट राष्ट्रविरोधीसुद्धा समजले जाऊ लागले. त्याचप्रमाणे साहेबांची नक्कल करणाऱ्यावर त्यांचा राग होता. त्याचबरोबर चर्चमधील रविवारच्या प्रार्थनेची सांगता पाद्रीच्या हाताने पवित्र (holy) पाण्यात बुडवलेल्या बिस्किट खाण्यातून होत असे. गंमत म्हणजे जर जानवे वा कुठलेही जातीनिर्देशक खुणा खुंटीवर अडकवून मुस्लिमांच्या (वा म्लेंच्छांच्या) हातांनी बनविलेले बिस्किट-ब्रेड खाण्यास कुणाचीच हरकत नव्हती. अशा प्रकारच्या तडजोडी अनेक प्रकारच्या रूढीविरोधी कृत्यांना त्या काळी लागू केल्या जात होत्या.

(निषिद्ध समजलेल्या) बिस्किटाला होत असलेला हा टोकाचा विरोधच त्याला एका प्रकारे छुपे आकर्षण प्राप्त करून देत होता. त्याची एकदा तरी चव चाखून पहावी असे धाडसी विचार तरुण वर्गाच्या डोक्यात येत होते. युरोपियन 'साहेबां'च्यासाठी खास सजवलेल्या दुकानाच्या समोरील बिस्किटाच्या थप्पेच्या थप्पे शहरी मध्यम वर्गातील तरुणांना खुणावू लागले. हा तरुण वर्ग काही तरी युक्त्या-प्रयुक्त्या लढवत बिस्किटावर ताव मारू लागला. हिंदू उच्च जातीतील मुलं धार्मिक बंधनांना झुगारत हायस्कूल-कॉलेजातील आपल्या मुस्लीम मित्रांकडून बिस्किटं मागवून खाऊ लागले. घरातील मोठ्यांचा विरोध पत्करून चोरून खाल्लेल्या वस्तूंची चवच न्यारी असते, असे त्यांना वाटू लागले.

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात देशभरात ठिकठिकाणी बिस्किटाचे उत्पादन करणाऱे कारखाने निघाले. केरळमधील थलसेरी येथील एक व्यापारी, मांबल्ली बापू, ब्रह्मदेशमधून दूध, चहा व ब्रेड मागवून जहाजातून इजिप्तमधील ब्रिटिश सैनिकांना पुरवठा करणारा ठेकेदार होता. १८८०मध्ये त्यांनी रॉयल बिस्किट फॅक्टरी सुरू केली. १८९२मध्ये कलकत्ता येथील एका छोट्याशा खोलीत (व लहान ओव्हनवरची वापर करत) ब्रिटानियानी (मूळ नाव गुप्ता अँड कंपनी) स्वीट अँड फॅन्सी बिस्किटचे उत्पादन करून विक्री करू लागली. पहिल्या जागतिक युद्धाच्या सुमारास सुमारे आठ बिस्किटाच्या आठ कारखाने व अनेक बेकरी वेगवेगळ्या शहरात होत्या.

हळू हळू का होईना, बिस्किटाला समाजात मान्यता मिळू लागली. परंतु ते तितकेसे सोपेही नव्हते. हजारो पिढ्यापासून पाळत आलेल्या धार्मिक रूढी-परंपरा व नियमांनी यांच्या जीवनावर अधिकार गाजविलेला होता. आणि त्या नियमांची पायमल्ली करणे त्यांच्या जिवावर आले. परंतु या समस्येलाही एक नामी उत्तर शोधण्यात आले. त्याचे उत्तर शोधणाऱ्याचे नाव होते लाला राधा मोहन.

या लालांनी १८९८मध्ये दिल्ली येथे हिंदू बिस्किट कंपनी या नावाच्या एका कंपनीची स्थापना करून बिस्किटाचे उत्पादन व विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पुढील २० वर्षांत या कंपनीचे ५५ प्रकारची बिस्किटे बाजारात आली. त्यांची नावेही गमतीशीर होतीः कँटीन, कॅबीन, इंपीरीयल, करोनेशन इ.इ. त्याचबरोबर ही कंपनी ३० प्रकारचे केक्सचे उत्पादन करून विकत होती. या काळात या कंपनीला अनेक पारितोषकं मिळाली. पहिल्या जागतिक युद्ध काळात ब्रिटिश सैन्याला लागणाऱ्या मिलिटरी ग्रेडच्या बिस्किटांचा पुरवठा करणारी ती प्रमुख कंपनी होती.

परंतु लालाचे स्वप्न ब्रिटिश सैन्याला बिस्किटं पुरवण्यातील अव्वल कंपनी इतकेच मर्यादित नव्हते. त्याला जाती-पोटजातींच्या अस्मितेत अडकलेल्या हिंदूंच्यामध्ये बिस्किटाचा प्रसार करायचा होता. त्यासाठी त्यानी आपल्या कारखान्यासाठी फक्त उच्च (बहुतांश ब्राह्मणच) जातीच्या कामगारांची नेमणूक केली. त्यामुळे हिंदूना त्याची उत्पादनं प्रदूषित न वाटता पवित्र वाटू लागले या पवित्रतेच्या शिक्क्यामुळे बिस्किटांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली. १८९८च्या या कंपनीच्या जाहिरातीत बिस्किटे तयार करण्याच्या व पॅकेजिंगच्या प्रत्येक टप्प्यावर फक्त उच्चजातीचेच कामगार हाताळतील याची हमी दिली होती. त्याचप्रमाणे या बिस्किटासाठी फक्त दूधच वापरले जात असून कुठल्याही प्रकारचे पाणी वापरले जात नाही. असा उल्लेख होता. याचा परिणाम असा झाला की इतर छोट्या मोठ्या कंपन्यासुद्धा त्यांच्या बिस्किटांच्या नावापुढे 'हिंदू' असे लेबल चिकटवून ग्राहकामध्ये गोंधळ माजवू लागले. ग्राहकांना ही बिस्किटेसुद्धा हिंदू बिस्किट कंपनीचेच आहेत असे वाटू लागले. शेवटी वैतागून मूळ हिंदू बिस्किट कंपनीने आपले नाव बदलून दिल्ली बिस्किट कंपनी असे ठेवले. बिस्किटाच्या हिंदू नावाच्या लोकप्रियतेच्या फायदा घेत वेस्टर्न स्टाइल बिस्किटे बनविणारी ब्रिटानिया कंपनीसुद्धा हिंदू बिस्किट या नावाने आपला माल खपवू लागली. १९५१मध्ये दिल्ली बिस्किट कंपनीला ब्रिटानिया कंपनीने विकत घेतली.

याच कालखंडामध्ये हिंदू बिस्किटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळू लागली. १९१७ सालच्या अमेरिकेतील कॉलियर या साप्ताहिकात मॅडम लुई बॉकेटचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात तिने एका हिंदू ऑफिसरकडून पीठ, लोणी व चीज वापरून केलेल्या बिस्किटाची रेसिपी मिळविलेल्या हकीकतीचे वर्णन केले होते.युनायटेड प्रॉव्हिन्स (आताचा उत्तर प्रदेश)च्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर व शहरातील बाजारात बिस्किटांची विक्री होत असलेले वर्णन अतुलचंद्र चटर्जी यानी आपल्या १९०८साली प्रकाशित केलेल्या पुस्तकात केले आहे. मुस्लिम समाजालासुद्धा हिंदू बिस्किट खाण्यात काही गैर वाटत नव्हते व रेल्वेच्या प्रवासात लहान मुलं, अपंग व वृद्ध यांची खाण्यासाठी हिंदू बिस्किटाची मागणी वाढत होती, असे त्यांनी नमूद केले होते.

बिस्किटासंबंधीच्या समाजाच्या मानसिकतेत बदल होण्यात १९०५च्या सुमारास गांधीजींनी सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीचा वाटाही आहे. या काळात स्वदेशी वस्तूंचाच वापर करण्यास भर देण्यात आला होता. त्यामुळे या कालखंडात बिस्किटांचे काऱखाने ठिकठिकाणी सुरू झाले. कमी भांडवलावरील हे कारखाने स्थानिक लोकांना रोजगार देण्यात पुढाकार घेऊ लागले. व सामान्यांना परवडणाऱ्या दरात बिस्किटं विकणे शक्य होऊ लागले. नंतरच्या कालखंडात रोजगार मागे पडून जेबी मंघाराम व पार्ले कंपन्यानी यांत्रिकीकरणावर भर देत बिस्किटं स्वस्त दरात देऊ लागल्या.

भारतात फार कमी लोक असतील, ज्यांनी आयुष्यात एकदाही बिस्किट खाल्ले नसेल. यामुळे इतके वर्षे होऊनही बिस्किटाची लोकप्रियता कमी झालेली नाही. गरिबांपासून, श्रीमंतापर्यंत आणि गावापासून शहरापर्यंत प्रत्येक वर्गातील लोक हे बिस्किट खातात. ९०च्या दशकातील मुलांसाठी बिस्किट आणि चहा किंवा दूध हे एक खाण्याचे कॉम्बिनेशन होते.

आजही असे लोक आहे ज्यांची चहा पिण्याची सवय बिस्किटाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. अतिशय स्वस्त आणि चविष्ट हे बिस्किट केवळ भारतातच लोकप्रिय नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये ते आवडीने खाल्ले जाते.

अशा प्रकारे एके काळचा निषिद्ध समजलेला हा खाद्य प्रकार बघता बघता स्वतंत्र भारतातील प्रत्येक हिंदूंच्या घरात कसा काय प्रवेश केला हे कळलेच नाही.

चहाचा एक घोट घेतला की कामगाराला काम करण्यासाठी नवी रग येते.चहाचा एक घोट घेतला की अभ्यासासाठी रात्र सरून जाते..चहाचा एक घोट घेतला की कित्येक आठवणी ताज्या होतात..पण या चहा सोबत त्याच्या जोडीदारांना कसं विसरून चालेलं बरं..? हो जोडीदारच..म्हणजे बिस्किट हो..! आणि भारतातील बिस्किट उत्पादकांनी त्या बाबतीत भारतीय माणसावर फार मोठ्ठे उपकार केलेत असे म्हणायला काहीच हरकत नसावी.

बिस्किटांचे प्रकार

संदर्भ - The story of how Hindus stopped distrusting biscuits and began eating them

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दिल्ली/‘हिंदू’ बिस्किटांची माहिती रोचक. परंतु, या अनुषंगाने, तसेच लेखात पुढे गांधीप्रणीत ‘स्वदेशी’च्या पुकाऱ्याच्या उत्तरार्थ अनेकांनी ‘स्वदेशी’ बिस्किटकारखाने सुरू केले, असा जो मुद्दा आलेला आहे, त्या संदर्भात, अशाच प्रकारे ‘स्वदेशी’ बँडवॅगनवर आरूढ झालेल्या (आमच्या पुणेरी) ‘साठ्यां’चा नामोल्लेख मात्र विसरलात! (थोडक्यात, (आमच्या पुणेरी) साठ्यांना अनुल्लेखाने मारलेत.) बहुत नाइन्साफी है ये.

(अर्थात, चालायचेच!)

(बादवे, पुण्यात धंदा सुरू केलेल्या (आमच्या पुणेरी) साठ्यांनी, मध्यंतरीच्या (द्वितीय महायुद्धकालीन) रेशनिंग/राशनिंगच्या काळात, धंद्याला पुरेशी साखर मुंबई प्रांतात मिळायची बंद झाल्याकारणाने, आपला कारखाना लॉकस्टॉकअँडबॅरल हलवून काही काळ कराचीस स्थलांतर केले होते, नि तेथून बिस्किटांचे उत्पादन करीत, अशी काहीतरी ‌अर्धवट माहिती जालावरून मिळते. (सिंध मुंबई प्रांतापासून १९३५ साली विलग झाल्याकारणाने मुंबईचे रेशनिंगचे कायदे तेथे बहुधा लागू नसावेत. चूभूद्याघ्या.))

बासुंदीसारख्या भरपूर गोड असलेल्या व उकळून उकळून मूळ चवच नष्ट केलेल्या 'अमृततुल्य' कडक चहाबरोबर बिस्किट हवेच अशी एक मानसिकता रूढ झाल्याचे आपल्या लक्षात आले असेलच.

तपशील प्रचंड गंडलाय, असे सुचवावेसे वाटते.

चहाबरोबर बिस्कीट खाण्याची संकल्पना जरी तशी लोकप्रिय असली (किंबहुना, आपण म्हणता त्याप्रमाणे,’चहाबरोबर बिस्कीट हवेच’ अशी मानसिकता जरी बऱ्यापैकी रुजलेली असली), तरीसुद्धा, अमृततुल्य चहाच्या दुकानात/अमृततुल्य चहाबरोबर कोणी बिस्कीट खात नसावे. (आधी तो कप केवढासा. त्या तेवढ्याश्या कपभर चहाबरोबर एक बिस्कीटसुद्धा ‘मियाँ मूठभर, दाढी हातभर’ होईल! एका बिस्किटाबरोबर तो तेवढासा चहा पुरवूनपुरवून पितापिता नाकी नऊ येतील. त्यात ‘आपल्या लोकां’ना चहाबरोबर बिस्कीट खायचे, तर ते चहात बुडवूनच खावे लागते. एक तर त्या तेवढ्याश्या कपात अर्धे तर सोडाच, परंतु एकअष्टमांश बिस्कीटसुद्धा बुडणे अशक्य. त्यात पुन्हा, बिस्किटाची रुंदी आणि कपाचा व्यास लक्षात घेता, मुळात त्या कपात बिस्कीट शिरणे अशक्य. असो.)

सांगण्याचा मतलब, ‘चहाबरोबर बिस्कीट हवेच’ वगैरे ठीकच आहे, परंतु, ते घरच्या चहासोबत. ‘अमृततुल्य’वाल्या कोठल्याही ‘भुवना’त नव्हे. (किंबहुना, ही ‘भुवने’ मुळात बिस्किटे विकत असावीत, किंवा कसे, इथपासून साशंक आहे.)

——————————

चहात बिस्कीट बुडविण्याच्या ‘आपल्या लोकांच्या’ सवयीवरून आठवले. आमच्या लहानपणी, चहात बिस्कीट बुडवून खाणे, झालेच तर चहा बशीत ओतून पिणे, या गावठी पद्धती आहेत; मूळ इंग्रजी पद्धती तश्या नाहीत; मूळ पद्धतींप्रमाणे बिस्कीट हे चहाबरोबर नुसतेच खायचे असते, तर चहा हा कपातूनच प्यायचा असतो, बशी ही केवळ कप ठेवण्यासाठी किंवा फार फार तर चहा सांडू नये म्हणून खाली धरण्यासाठी असते, वगैरे समजुती आमच्या बालमनावर बिंबविण्यात आल्या होत्या. (आमच्या घरात हे दोन्ही प्रकार निषिद्ध नव्हते, नि खुल्लमखुल्ला चालत; परंतु, ‘खरी पद्धत’ काय, ते ठाऊक असावे, एवढाच सद्हेतू त्या बिंबविण्यामागे असावा. तर ते एक असो.) आता, यापैकी चहा बशीत ओतून पिण्याचा मुद्दा कदाचित बरोबर असेलही; चहा (किंवा कॉफी) बशीत ओतून फुर्रफुर्र करून पिताना भारताबाहेर माझ्या मर्यादित अनुभवांत निदान मी तरी कोणाला पाहिलेले नाही. मात्र, चहात बिस्कीट बुडवून खाण्याची पद्धत ही अस्सल देशीगावठी असण्याबाबत मात्र मी प्रचंड साशंक आहे.

बोले तो, चहात (किंवा कॉफीत) बिस्कीट बुडवून खातानासुद्धा भारताबाहेर मी स्वतः कोणाला खरे तर पाहिलेले नाही. मात्र, तसे करण्याची पद्धत ही अगदीच अकल्पनीय नसावी – किंबहुना, निदान काही गोटांतून तरी ती सर्रास प्रचलित असावी – असे सुचविणारा anecdotal evidence पुष्कळ उपलब्ध आहे.

Dunk या क्रियापदाचा अर्थ इंग्रजीच्या कोठल्याही जरा बऱ्या, पाश्चात्त्य शब्दकोशात तपासून पाहावा. (वीरकरांच्या इंग्रजी-टू-मराठी डिक्शनरीत इतकी उपयुक्त माहिती मिळू शकेल, याबद्दल साशंक आहे, परंतु, मिळाल्यास अलभ्य लाभ!)

मेरियम-वेब्स्टरप्रमाणे: (पहिलाच दिलेला अर्थ) to dip (something, such as a piece of bread) into a beverage while eating.

केंब्रिज शब्दकोश तर अधिक खोलात शिरतो: to put a biscuit, piece of bread, etc. into a liquid such as tea, coffee, or soup for a short time before eating it.

थोडक्यात, ‘चहात बिस्कीट बुडवून खाणे’ ही संकल्पना इंग्रजीभाषक जगतात अपरिचित नसावी. (कदाचित, तेथेसुद्धा ती बहुजनांत रूढ असून अभिजनांकडून नाके मुरडली जाणारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, ही ‘आपलीच गावठी पद्धत’ खाशी नसावी!)

(फार कशाला, आमच्या अमेरिकेत Dunkin Donuts नावाची एक साखळी आहे. डोनट, कॉफी (साधी तथा एस्प्रेसोयुक्त), झालेच तर तुरळक संकीर्ण ब्रेकफास्ट आयटम्स वगैरे मालमसाला तेथे मिळतो. (डोनट तथा साधी कॉफी यांकरिता अमेरिकेत परंपरेने नावाजलेली साखळी आहे. हल्ली एस्प्रेसोयुक्त कॉफीसुद्धा तेथे मिळू लागली आहे, तीसुद्धा बरी असते.) आता, तेथे मी कोणाला कॉफीत डोनट बुडवून खाताना आजतागायत पाहिलेले नाही. (कशास उगाच चांगला डोनट आणि चांगली कॉफी दोहोंचाही सत्यानाश करा?) मात्र, ‘कॉफीत काहीतरी बुडवून खाता येते’ या संकल्पनेच्या अस्तित्वाचा दाखला म्हणून मला वाटते एवढे पुरेसे आहे.)

——————————

नंतरच्या कालखंडात रोजगार मागे पडून जेबी मंघाराम व पार्ले कंपन्यानी यांत्रिकीकरणावर भर देत बिस्किटं स्वस्त दरात देऊ लागल्या.

हे नाव ऐकलेले आहे. एकेकाळी मला वाटते रेल्वेमार्गांवर बिस्किटांचा हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय असावा (आणि त्यास खपही बहुधा पुष्कळ असावा). मात्र, रेल्वेमार्गांबाहेर या ब्रँडचे नाव (निदान महाराष्ट्रात तरी, नि निदान मी तरी) फारसे ऐकलेले नाही. असे का असावे बरे?

====================

तळटीपा:

सुरुवातीच्या काळात, या बिस्किटांचे वितरण साठ्यांच्या मातुःश्री पुण्यात जातीने घरोघरी जाऊन करीत, नि जाहिरातसुद्धा केवळ वर्ड-ऑफ-माउथ पद्धतीने होत असे, अशी काहीतरी अर्धवट माहिती कोठूनतरी कधीतरी वाचनात आलेली आहे.

या शब्दाचा ‘खरा’ मूळ उच्चार ‘राशनिंग’ असा आहे, याबद्दल कल्पना आहे. मात्र, मराठीत या शब्दाचा उच्चार ‘रेशनिंग’ असाच करण्याची प्रथा पूर्वापार आहे. तिला वंदन.

या निमित्ताने, चिं. वि. जोश्यांच्या ‘तयारी’ या कथेतील एक प्रसंग आठवतो. (ही कथा नेमक्या कोठल्या संग्रहात आहे, याची माहिती मिळत नाही. मात्र, खुद्द चिं. विं. नी आपल्या मृत्यूच्या थोड्याच काळापूर्वी स्वतः केलेल्या ‘हास्यचिंतामणी’ या संकलनात तिचा अंतर्भाव आहे.) कु. सरला भिडे ही कराचीत एकटीच राहणारी एक महाराष्ट्रीय शिक्षिका. तिला मुंबईहून युनिव्हर्सिटीतून (बहुधा मॅट्रिकच्या; चूभूद्याघ्या.) परीक्षकपदासाठी बोलावणे येते, आणि त्याकरिता प्रश्नपत्रिकेकरिता काही प्रश्न काढून ते बरोबर न्यायचे असतात. ती प्रवासाच्या तयारीकरिता सामानाची बांधाबांध करीत असते, तेव्हा कराचीत राहात असलेली नि शाळेशी संबंधित तिच्या परिचयाची असलेली तमाम मराठी/गुजराती सहकर्मी/कनिष्ठ/वरिष्ठ मंडळी, मुंबईत कोणाला ना कोणाला तरी पोहोचवायला म्हणून काही ना काही सामान (शिवणयंत्रापासून ते मुंबईला दुरुस्तीला टाकण्याच्या मोडक्या व्हायोलिनपर्यंत३अ, मार्गे कोणाचेतरी मोठे पेंटिंग) तिच्या गळ्यात मारतात. तिला नाही म्हणता येत नाही. फार कशाला, वाटेत हैदराबाद (सिंध) येथील स्टेशनात, तेथील स्थानिक कॉलेजात प्रोफेसर असलेले एक मराठी प्रोफेसरसुद्धा कोणाच्यातरी ओळखीने तिला प्लॅटफॉर्मवर भेटायला येतात, तेदेखील मुंबईला पोहोचविण्यासाठी आणखी काही सामान तिला सुपूर्त करतात. नि या सगळ्या भानगडीत, कराची ते मुंबई रेल्वेप्रवासात, वाटेतील हैदराबाद (सिंध) तथा अहमदाबाद येथील (गेजबदलामुळे) गाडीबदलात, प्रत्येक गाडीबदलामध्ये रिझर्व्हेशनच्या नेहमीच्या सावळ्यागोंधळामध्ये दरवेळेस बर्थकरिता रेल्वेअधिकाऱ्यांस (त्रयस्थांमार्फत) दक्षिणा देताना, नि पुढे मुंबईला ते सामान (जेथे उतरलेली असते तेथे चाळीतल्या छोट्याश्या जागेत मावणे शक्य नसल्यामुळे) घरोघरी पोहोचविताना तिची कशी त्रेधातिरपीट उडते, नि एवढे करून ज्या परीक्षकपदासाठी म्हणून ती मुंबईला आलेली असते, त्याकरिता काढून ठेवलेले प्रश्नपत्रिकेचे प्रश्न कराचीलाच कसे विसरून आलेली असते, याचे रोमहर्षक वर्णन करणारी ही कथा आहे.

या कथेत, हैदराबाद (सिंध) येथील फलाटावर तिला भेटणारे सद्गृहस्थ, मुंबईस तूर्तास रेशनिंगमुळे चांगला गहू मिळत नसल्याकारणाने, मुंबईतील आपल्या नातेवाइकांना पोहोचविण्याकरिता म्हणून चांगला गहू एका हॅटबॉक्समध्ये भरून, त्या हॅटबॉक्सला कुलूपबंद करून तिला सुपूर्त करतात. वर ‘कोणी विचारले तर हॅट आहे म्हणून सांगा’ हेही ठेवून देतात. मुंबईच्या फलाटावर अपेक्षेप्रमाणे पोलीस तिला हटकतातच, नि ‘खोक्यात काय आहे’ म्हणून चौकशी करतात, त्यावर ‘हॅट असेल’ म्हणून उडवाउडवीचे उत्तर दिल्यावर त्याने समाधान न होऊन, हॅटबॉक्स उघडून दाखविण्यास पोलीस तिला सांगतात. त्यावर, ‘हे पहा, हॅटबॉक्स माझी नाही, तिची किल्ली माझ्याकडे नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांना विचारा; नि बाईमाणसांना त्रास देऊ नका, तुमच्या कॅरेक्टरची तरी आम्हाला काय खात्री?’ म्हणून ती उलट पोलिसालाच दटावते. पोलीससुद्धा, आजूबाजूस जमू लागलेल्या बघ्यांच्या गर्दीचा नूर पाहून, प्रकरणाचा अधिक पाठपुरावा करण्याच्या फंदात पडत नाहीत.

तर सांगण्याचा मतलब, युद्धकाळात मुंबई प्रांतात रेशनिंगचे कायदे होते, मात्र, सिंधमध्ये ते नव्हते, याचा हा एक साहित्यिक दाखला.

३अ तिच्या सहप्रवाश्यांपैकी कोणीतरी तिला ते वाजवून दाखवायची फर्माइश करते, त्यावरही स्पष्टीकरण तिला देत बसावे लागते.

जागतिकीकरणाच्या रेट्यात आतापावेतो कदाचित ही साखळी हिंदुस्थानापर्यंत येऊन पोहोचली असेलही. किंवा कदाचित नसेलही. असो. (किंवा नसो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह वाह. फारच छान प्रतिक्रिया आहे. तळटिपा वगैरे वाचायला अजून २-३ दिवस लागतील तरी वाचलेल्या माहितीवरून:
मी एका फ्रेंच बाईला नेहमी काळया कॉफीत बिस्कॉटी बुडवून खाताना बघितले आहे. ते बघून मला एकदम हायसं वाटलं होतं. लातेमध्ये बुडवूनही छान लागतं. मी आणि ती फ्रेंच बाई बऱ्याचदा एकत्र प्रवास करायचो. तेव्हा कॉफीत बिस्कॉटी बुडवून खाण्याची प्रथा आम्ही रूढ केली होती.
अमृततुल्य चहाबरोबर बिस्कीट खात नाहीत याला अनुमोदन. त्यापुढे लिहिलेला छोटा निबंध फार आवडला. पण अमृततुल्य चहाबरोबर (त्यात न बुडवता) क्रीमरोल खाण्याची प्रथा आहे. हा क्रीमरोल भारतीय कसा झाला याचीही एक सुरस कथा आहे पण मला कंटाळा आलाय आत्ता. शिवाय अमृततुल्य चहाची अजून एक साथीदार म्हणजे सिगरेट. तोही एक प्रकारचा रोलच म्हणा. शिवाय चहाटपऱ्या जी बिस्कीटं विकतात ती इतकी मोठ्या आकाराची, भयानक आणि सुक्यामेव्याने सुशोभित असतात की ती बुडवून खाण्यासाठी त्यांना बशीत झोपवून कपातला सगळा चहा त्यांवर ओतावा लागेल आणि मग चहा म्हणून वेगळा चहा विकत घ्यावा लागेल. असं कुणी करत नाही. मला असं करायची इच्छा झाली होती एकदोनवेळा पण मी लोकलज्जेस्तव ती दाबली.
यावरून अजून एक छोटी आठवण सांगून मी माझा निबंध संपवते. माझं आजोळ कोल्हापूर. तिथे बटर नावाचा प्रकार असतो जो चहात बुडवून खातात. त्याचा इतिहास भूगोल मला माहिती नाही. पण तो एक बटर कुठल्याच स्टँडर्ड चहाच्या कपात बुडत नाही. अशा बावळट आकाराची वस्तू का तयार करावी हा प्रश्न मी एकदा आजीला विचारला. तर आजी बाजारात बटर घेऊन गेली आणि तो मावेल असा मोठा (पोलका डॉट असलेला) सुंदर कप घेऊन आली. मग रोज सकाळी आजी कपात बटर ठेवायची आणि वरून चहा ओतायची. तो सगळा चहा त्यात गायब व्हायचा आणि मग मी चमच्याने तो चिखल खायचे. तो खाऊन झाला की पुन्हा एकदा चहा मिळायचा. पण रोज एकच बटर मिळायचा एवढी शिस्त पाळावी लागे. गेले ते दिवस. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा क्रीमरोल भारतीय कसा झाला याचीही एक सुरस कथा आहे पण मला कंटाळा आलाय आत्ता.

?

शिवाय अमृततुल्य चहाची अजून एक साथीदार म्हणजे सिगरेट. तोही एक प्रकारचा रोलच म्हणा.

पॉइंट आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रीमरोलचा उगम मुळात ऑस्ट्रियातला. तिथे त्यांना शाउमरोलेन म्हणतात. ब्रिटनमध्ये क्रीमहॉर्न्सही म्हणतात. त्यांचा आकार इंग्रजीत हॉर्न असं नाव असलेल्या गोष्टीचा आकार जसा असतो - एका बाजूला निमुळता आणि दुसऱ्या बाजूला रुंद - तसा असायचा आणि त्याची पेस्ट्री खूप नाजूक, खुसखुशीत असायची. इंग्रजांनी हे क्रीमहॉर्न भारतात आणले आणि सुरुवातीला ते फक्त कॅंटोन्मेंटमधल्या बेकऱ्यांमध्ये मिळायचे. नंतर मुसलमानी बेकऱ्यांतून त्यांचं बाहेरचं आवरण अधिक भक्कम करायचे प्रयोग झाले. क्रीमरोलचं बाहेरचं आवरण सरळ आणि कमी खुसखुशीत असतं, बहुधा कणीक जास्त मळत असावेत. पण त्यामुळे ते डझनावारी एकावर एक ठेवून विकता येतात. आणि खारी किंवा पॅटिस खाऊ लागल्यावर जसा चहूबाजूला त्या आवरणाचा सडा पडून डोकं फिरतं तसं क्रीमरोल खाताना होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत लेख हा मराठीत (किंवा ब्रिटिश इंग्रजीत) ज्याला बिस्कीट म्हणतात, त्या खाद्यवस्तूबद्दल आहे.

- अमेरिकन इंग्रजीत या खाद्यप्रकारास बिस्कीट म्हणून संबोधले जात नाही. (गोड असल्यास कूकी म्हणतात. (या प्रकारात पार्ले-जीपासून ते नानकटाईपर्यंत वाटेल ते येऊ शकते.) खारी (उदा. मोनॅको) असल्यास क्रॅकर म्हणतात. (मात्र, हिंदुस्थानात ‘खारी बिस्किटे’ म्हणून जो फुगविलेला प्रकार मिळतो, तो क्रॅकर या प्रकारात मोडत नाही.))

- उलटपक्षी, अमेरिकन इंग्रजीत ज्यास बिस्कीट म्हणून संबोधतात, त्या खाद्यप्रकाराचा गोड वा खाऱ्या इंग्रजी बिस्किटाशी काहीही संबंध नाही. हा एका प्रकारचा ठिसूळ पाव असून, शक्य तोवर ब्रेकफास्टला खाल्ला जातो. कधी लोण्याबरोबर, कधी अंड्यांबरोबर, कधी डुकराची चकती (सॉसेज पॅटी) मध्ये घालून, तर कधी डुकराचे तुकडे घातलेली पांढरीशुभ्र ग्रेव्ही वरून ओतून.

- बाकी, सोन्याची बिस्किटे वगैरे तस्करी अखाद्यसामुग्रीचा विचार येथे केलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाला थेट वायझेड म्हणायची सोय नाही त्या अमेरिकेचं कसलं कौतुक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वायझी म्हणालात, तर तुमच्या जिभेला काय भोके पडतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९व्या शतकातील सनातनी हिंदूंना माहितीत नसलेल्या बिस्किट-ब्रेडसारख्या म्लेंछ (हा शब्दप्रयोग परदेशी, जातीबाह्य व आपल्यावर आक्रमण करणारे इत्यादींना सरसकटपणे केला जात होता) अन्नपदार्थाविषयी तिटकारा असणे स्वाभाविकच होते.

साबूदाण्याची खिचडी बरी चालत होती? तीसुद्धा उपासाला?

भारतीय अन्नपदार्थांच्यातील चवींची वैविध्यता व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या अन्नपदार्थांची स्वीकृती

‘वैविध्यता’ चूक. एक तर ‘वैविध्य’ तरी म्हणा, नाहीतर ‘विविधता’ तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१८९०चा ऑक्टोबर महिना. गोपाळ विनायक जोशी (पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे पती) या तत्कालीन प्रागतिक विचारांच्या गृहस्थांनी पुण्यातील गुरुवार पेठेतल्या ‘पंचहौद मिशन’ या ठिकाणी एक व्याख्यान आयोजित करून, त्यासाठी लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, वि. का. राजवाडे अशा दिग्गजांसह अनेकांना निमंत्रित केलं. व्याख्यानानंतर चहापानाचा कार्यक्रम होता. त्यात टिळक-रानडे यांच्यासह अनेकांनी चहा घेतला.
नंतर ही बातमी ‘पुणे वैभव’ या दैनिकात छापून आल्याबरोबर ‘चहा पिणे, बिस्कीट खाणे’ हे धर्मबाह्य कृत्य केल्याबद्दल सनातनी खवळले. प्रथम हे ‘धर्मभ्रष्टते’चं प्रकरण शंकराचार्यांकडे नेलं गेलं, तेव्हा त्यांनी सोक्षमोक्ष लावण्यासाठी व्यंकटशास्त्री व बिंदुमाधवशास्त्री यांचं ‘ग्रामण्य कमिशन’ बसवलं. त्यांच्यासमोर वादी (सनातनी) आणि प्रतिवादी (टिळक-रानडे इत्यादी) यांनी आपापली बाजू मांडली. काही जणांनी प्रायश्चित्तही घेतलं. तथापि, पुढे या प्रायश्चित्ताबाबतदेखील वाद झाले आणि बहुसंख्य असलेल्या सनातनी मंडळींनी चहा प्यायलेल्या ४६ जणांना वाळीत (बहिष्कार) टाकलं.

हा बहिष्कार (तत्कालीन भाषेत: ग्रामण्य) इतका तीव्र होता की, टिळक, रानडे, गोखले प्रभृतींसकट सर्वांना ‘बाटलेले’ ठरवण्यात येऊन ‘कृष्णपक्षी’ संबोधलं जाऊ लागलं. कृष्णपक्षीयांशी संसर्ग टाळला जाऊ लागल्यामुळे त्यांच्यातल्या टिळकांसकट कोणालाही घरकाम करण्यासाठी माणसं मिळेनात. पुण्यात सनातन्यांची संख्या इतकी मोठी होती की, त्यांच्या दबावामुळे टिळकांच्या घराच्या कार्यासाठी आचारी आणि पुरोहित तयार होईनात. शेवटी शेजारपाजारच्या महिलांकडून गुपचूप जिन्नस तयार करवून आणि रानड्यांकडे आश्रित असलेल्या उपाध्यांकडून कसंबसं कार्य निभवावं लागलं.
टिळक-रानडे यांना सुधारक मानावं की नाही, हा एक मुद्दा वेगळा असला तरी, टिळक हे त्या काळी सुधारकांपैकी मानले जात, हे त्या काळचं वास्तव होतं. तशा सुधारक म्हणवले जाणाऱ्यांची संख्या (४६) ही इतकी अत्यल्प होती की, त्या सर्वांची नावंदेखील उपलब्ध आहेत. या उलट सनातनी मंडळींची संख्या सुधारकांच्या शेकडो पट होती. या प्रकरणात तिसरा पक्ष नव्हता. सुधारक नसलेल्या बहुसंख्याकांनी (सनातनी - शुक्लपक्षीयांनी) अत्यल्पसंख्याकांवर (सुधारक - कृष्णपक्षीयांवर) बहिष्कार टाकला होता.

याचा अर्थ टिळकांच्याच जातीतल्या ऐंशी टक्यांच्या वर लोकांनी टिळकांवर बहिष्कार टाकला होता. अत्युच्च वर्णीयांनी एखाद्याला धर्मभ्रष्ट ठरवून त्याच्यावर बहिष्कार टाकल्यावर अन्य जातीयांना काय संदेश गेला असेल आणि त्यांना काय करावं लागलं असेल, ते सांगणं न लगे...

' -अक्षरनामा' या संस्थळावरील लोकेश शेवडे यांच्या लेखावरून साभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा बहिष्कार (तत्कालीन भाषेत: ग्रामण्य)

‘ग्रामण्य’ बोले तो नक्की काय? बहिष्कार, की (बहिष्कार टाकावा, की न टाकावा / बहिष्कार टाकण्याजोगे कृत्य घडले आहे, की नाही, हे ठरविण्यासाठी चालविलेला) खटला किंवा चौकशी?

(काहीसे impeachmentसारखे? Impeachment बोले तो पदच्युती नव्हे, तर, पदच्युती करावी, की न करावी, पदच्युती करण्याजोगा गुन्हा घडला आहे, किंवा नाही, याचा निवाडा करण्यासाठी चालविलेला खटला अथवा चौकशी.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑ..?!

चहा आणि बिस्कीट खाल्ल्यास धर्म बुडाला किंवा कोणी मनुष्य बाटला असे असायचे ? पावाचे ऐकले होते.

यामागे चहा कल्प्रिट होता की बिस्कीट? की जिथे बसून ते घेतले ते ठिकाण? म्हणजे त्या ठिकाणी ताक देखील घेतले असते तर असेच झाले असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यामागे चहा कल्प्रिट होता की बिस्कीट? की जिथे बसून ते घेतले ते ठिकाण?

Does it really matter?

बोले तो, ती इसापनीतीतली गोष्ट नव्हे का, लांडगा-कोकराची? तू ओढ्यातून पाणी पिऊन माझे पाणी गढूळ केले नसशील, तर तुझ्या आज्याने माझ्या आज्याचे केले असेल. बॉटमलाइन, मला कसेही करून तुला खायचे आहे, तेव्हा मी तुला खाणार!

एखाद्याला कसेही करून धुपवायचे आहे, तर त्याकरिता काहीतरी निमित्त पुढे करायचे, याहून त्याला अधिक काही अर्थ नाही.

या मंडळींनी मंदिरात जाऊन भटाब्राह्मणांसोबत धारोष्ण दूध आणि प्रसादाचा साजूक तुपातला गोड शिरा यांचे जरी सेवन केले असते, तरीसुद्धा त्यांच्यावर या लोकांनी येनकेनप्रकारेण ग्रामण्य आणले असते. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सर्व ठीक आहे. उत्सुकता अशासाठी होती की, म्हणजे तोपर्यंत साधारणपणे पुण्यात लोक चहाच पीत नव्हते की काय, अशा अर्थाने.

ता. क . बिस्किटाबद्दल आता वर जाऊन लेखात वाचून कळले की तेव्हा ते हिंदूंना त्याज्य होते. चहा तुलनेत निर्दोष असावा बहुधा.

या निमित्ताने असेही वाटते की पुढे बिस्किटांना मान्यता मिळण्याची प्रक्रिया फास्ट झाली असावी. ब्रिटिश काळातच उभ्या राहिलेल्या बिस्कीट फॅक्टऱ्या आणि पुढे उदाहरणार्थ पुलंनी मित्रांसोबत माँजिनी येथे पंचम जॉर्ज काळात गेले असता "व्हॉट इज हॉट" वगैरे संभाषण जुळून न आल्याने टी अँड सम बिस्कुटस मागवली, आणि फोर टीज आणि फॉर्टीजचा घोळ करून चाळीस बिस्किटांची पिशवी उचलली आणि हर हर.. इ इ हे सर्व आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहा पूर्णपणे निर्दोष नव्हता असं दिसतं, पण वेगळ्या कारणांसाठी. इथे चहाचा इतिहास दिला आहे.
https://www.seriouseats.com/indian-tea-history-5221096

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रामण्य असं डकडकगोवर शोधलं विकिपिडिया पान सापडलं. ग्रामण्य

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद,
लोकेश शेवडे याच्या लेखातील ‘ग्रामण्य’ या शब्दप्रयोगाचा गूगलवर शोध घेत असताना प्रबोधनकार ठाकरे यांनी १९१९साली लिहिलेल्या 'ग्रामण्यांचा समग्र इतिहास' या पुस्तकांचा संदर्भ सापडला. या पुस्तकात ग्रामण्य या शब्दप्रयोगातून इतिहासकाळात झालेल्या छळाबद्दल व त्याचा एखाद्या हत्याराप्रमाणे केलेल्या वापराबद्दल विस्तृत माहिती दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0