गर्भधारणेचे बाजारीकरण

जननक्षमतेचा व्यापार
बाजारीकरण म्हटल्यावर आर्थिक घडामोडी, खरेदी - विक्री, कंपन्या-कंपन्यामधील जीवघेणी स्पर्धा, उत्पादनांतील व नफ्यातील चढ - उतार, जाहिरातबाजी, शॉपिंग मॉल्स - शोरूम्स, इत्यादी गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. कामगार, शेतकरी, इत्यादींचे शोषण, भेसळ, साठेबाजी, करचुकवेगिरी, भ्रष्टाचार इत्यादी अपप्रवृत्तीसुद्धा बाजारीकरणात गृहित धरल्या जातात व त्याकडे दुर्लक्षही केले जात असते. परंतु बाजाराचा हा ब्रह्मराक्षस आता आपल्या शारीरिक अवयवांच्या व्यापारीकरणाच्या प्रयत्नात आहे. मूत्रपिंडांचा काळाबाजार तर भरभराटीला आहे. युरोप अमेरिकेतील औषधी कंपन्यांच्या नवीन उत्पादनांच्या चाचणीसाठी गिनी पिग्स म्हणून आपल्या येथील गरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. व या गैर व्यवहारात मोठमोठ्या नावाजलेल्या वैद्यकीय तज्ञांचा सहभाग आहे, असे ऐकीवात आहे. आता त्याची नजर शुक्राणू, बीजांड, हार्मोन्स, गर्भ इत्यादी पुनरुत्पादनाशी संबंधित असलेल्या जैविक गोष्टीवर पडत आहे. वंध्यत्वावर मात करण्याची लालूच दाखवत लाखो - करोडोंची आर्थिक उलाढाल या पुनरुत्पादन क्षेत्रात - व विशेषकरून गर्भधारणेच्या व्यवसायात - होत आहे.

प्रेम, वात्सल्य, ममता, अशा गोष्टींची खरेदी - विक्री होऊ शकत नाही असे अनेकांना वाटते. तसाच काहिसा प्रकार संतती प्राप्तीसंबंधीसुद्धा आहे. कारण पुनरुत्पादन उत्क्रांतीचे बलस्थान आहे व ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कृत्रिम गर्भधारणा निसर्गांच्या विरुद्ध असून त्यात भाग घेणार्‍यांना कमी लेखणारी आहे. खरे पाहता, कृत्रिम गर्भधारणेचा अवलंब असाधारण परिस्थितीत एखादा अपवाद म्हणून व्हावयास हवा होता; परंतु ती आता समाजमान्य नेहमीची पद्धत म्हणून रूढ होत आहे.

'मुलं कशी जन्माला येतात?' याचे उत्तर सर्वाना माहित असले तरी चारचौघात त्याची वाच्यता करण्याची रीत (आतापर्यंत तरी) नव्हती. हा व्यवहार अत्यंत खाजगी स्वरूपातला, एकांतातला असा होता. शुक्राणू, बीजांड, गर्भनिर्मिती, गर्भधारणा या गोष्टी पुनरुत्पादन प्रक्रियेचे महत्वाचे घटक असून त्यातील प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूमिका असते. परंतु आता त्यांची चारचौघात, चव्हाट्यावर चर्चा केली जात आहे. बिनदिक्कतपणे त्यांचे आर्थिक व्यवहारात रूपांतर होत आहे. मागणी तसा पुरवठा या भांडवली तत्वांची 'री' ओढत पुरेपूर फायदा करून घेतला जात आहे. परंतु यात नेहमीप्रमाणे स्त्रियांचेच शोषण होत आहे हे अजून जनसामान्यांना उमजलेले नाही.

प्रजननाचा हा व्यापार इतर उत्पादनांच्या तुलनेत फार वेगळ्या स्वरूपाचा आहे. जमीन-जुमला, घर-दार इत्यादीसारख्या व्यवहारात मालकी कुणाची याबद्दल व्यवहार संपल्यानंतर संदिग्धता नसते. सात-बाराच्या उतार्‍यावरून त्याची शहानिशा करून घेण्याची सोय असते. परंतु अपत्य प्राप्तीच्या व्यवहारात अपत्यावरील मालकी हक्क कुणाचा याबद्दल अनेक हेवे दावे आहेत. शुक्राणू एकाकडून, बीजांड दुसर्‍याकडून, गर्भप्रक्रिया क्लिनिक्समध्ये, गर्भवाढ एका तिर्‍हाइताच्या पोटात असा व्यवहार असल्यामुळे मूल कुणाचे ही गोष्ट कायम गुलदस्त्यात राहते. या गोष्टी शेवटपर्यंत अंधारात, अस्पष्ट व संदिग्ध राहतात.

अपत्याचा हव्यास
नैसर्गिकरित्या अपत्य होऊ शकत नाही व आपला वंश पुढे नेण्यासाठी आपल्या स्वत:चे(च) मूल हवे या हव्यासापोटी ही बाजारव्यवस्था मूळ धरू लागली. आपल्याला मूल व्हावे म्हणून देवधर्म, नवस - उपवास, गंडे - दोरे व इतर अनेक प्रकारचे चित्र विचित्र अघोरी उपाय अपत्यहीन जोडपे करत असते. काही वर्षापूर्वी गुजरातच्या सीमेवरील एका गावात पार्वती माँ नावाची बाई केवळ पोटावर हात सावरून गर्भधारणेचे चमत्कार करत होती. व महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून मिळेल त्या वाहनांनी झुंडीच्या झुंडी तेथे जात होत्या. अजूनही काही अनेक जोडप्या अशा बाई - बाबांच्या नादी लागून हजारो रुपयांचा चुराडा करून घेत आहेत. हे सर्व उपाय संपल्यानंतर खात्रीचा उपाय म्हणून शेवटी आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जातात. विज्ञान - तंत्रज्ञान अशांसाठी आपली दारे उघडी ठेवत मूल होणारच याची खात्री देते.

मुळातच मूल न होण्याची कारणे अनेक आहेत. त्यातील काही, सामाजिक, काही भावनिक तर काही शारीरिक असतात. उशीरा लग्न करणे - होणे, दीर्घ काळ कुटुंब नियोजन करणे, मादक पदार्थांचे सेवन, अती मद्यपान, इत्यादीमुळेसुद्धा मूल होत नाही. शुक्राणूंची कमतरता, त्यांचा मंद वेग, बीजांडातील दोष, कमकुवत वा सदोष गर्भाशय, मासिक पाळीतील अनियमितता, हार्मोन्सचे असंतुलन, फॅलोपियन ट्यूबमधील दोष इत्यादी अनेक कारणं यामागे असू शकतात.

लग्न झाल्या झाल्या आपल्याला मूल व्हावे ही सामान्यपणे सर्व दांपत्यांची रास्त अपेक्षा असते. मूल लवकर न झाल्यास जोडप्यांना कुत्सित बोलणी ऐकून घ्यावे लागतात. विशेष करून स्त्रीला याचा फार त्रास होऊ शकतो. स्वत:ची आई, सासू, नणंद, इतर नातेवाईक, मैत्रिणी कुत्सित नजरेने तिच्याकडे पाहू लागतात. या संबंधात तिला आपण फार मोठा गुन्हा केला आहे असे वाटू लागते. पुरुष प्रधान समाजात मूल न होण्यामध्ये पुरुषाचा दोष नाही असेच गृहित धरले जाते व स्त्रीला अपराध्याच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. मग मात्र दांपत्याची ससेहोलपट चालू होते. बाबा, बुवा, ताई, महाराजांपासून सुरुवात होत अघोरी उपचारापर्यंत सर्व उपाय केले जातात. हे सर्व उपाय थकल्यानंतर गरीब कुटुंब असल्यास दैवाला दोष देतात किंवा देवाची अवकृपा म्हणून गप्प बसतात. श्रीमंत मात्र यांत्रिक पुनरुत्पादनाच्या बाजारपेठेला शरण जातात.

यांत्रिक पुनरुत्पादन
यामध्ये वंध्यत्व दूर करणारे फर्टिलिटी क्लिनिक्स व वंध्यत्वावर तंत्रज्ञान शोधणार्‍या व औषधं तयार करणार्‍या कंपन्या आपापली पोळी भाजून घेत आहेत. याच बरोबर भारतात आयुर्वेदाचे पुरस्कर्तेसुद्धा आपलेही हात धुवून घेत आहेत. मुळातच कृत्रिम गर्भधारणेच्या बाजाराशी सुमारे 90-95 टक्के जनसंख्येचा संबंध येत नाही. उरलेल्यामधील गरीबांची संख्या वगळल्यास एक टक्क्याहून कमी असलेल्या श्रीमंतांसाठीच ही बाजारपेठ आहे. जनसंख्येचा एवढा मोठा हिस्सा गर्भधारणेच्या बाजारापासून दूर असला तरी, पैशाची उलाढाल मात्र मोठ्या प्रमाणात होत आहे. इतर नित्योपयोगी उत्पादनाच्या बाजारात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असूनही या बाजाराची पातळी त्यांना अजून गाठता आली नाही.

यांत्रिक पुनरूत्पादनाची सुरवात 1978 मध्ये 'टेस्ट ट्यूब' बेबीच्या शोधानंतर झाली. यात प्रामुख्याने कृत्रिम गर्भधारणा (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन IVF) या संकल्पनेचा आधार घेतला. आता हे कृत्रिम पुनरूत्पादन वेगवेगळ्या स्वरूपात ग्राहक जोडप्यांना आकर्षित करत आहे. वंध्यत्वावर मात करणारी औषधं, परक्याचे शुक्राणू, परक्याचे बीजांड, शुक्राणू व बीजांडाचे फॅलोपियन ट्यूबमध्ये कृत्रिम संयोग, टेस्ट ट्यूबमध्ये गर्भनिर्मिती, परक्या बाईच्या (सरोगेट मातेच्या) गर्भाशयात गर्भवाढ, बीजांडाचे प्रशीतन (रेफ्रिजरेशन), गर्भाची अदलाबदल अशा अनेक पध्दतीत गर्भधारणेचा व्यवहार चालतो. गर्भधारण व्यवहारात आता अपत्यपूर्तीची केवळ अपेक्षा नसते, तर जन्माला येऊ घातलेले बाळ सुदृढ, जनुकरोगमुक्त व सर्वगुणसंपन्न असावे अशी पण अपेक्षा केली जाते व बाजारपेठ ही अपेक्षा पण पूर्ण करण्याचा तयारीत आहे.

त्रासदायक प्रकिया
मूल होण्याची भूक शमविण्यासाठी वंध्यत्व दूर करणारे क्लिनिक्स व त्यातील निष्णात डॉक्टर्स व नर्सेसची फौज शहरा-शहरात जय्यत तयारीत आहेत. नैसर्गिकरित्या मूल होत नाही याची खात्री करून घेतल्यानंतर जोडपे गर्भचाचणीसाठी तयार होते. पुरुषांची चाचणी तुलनेने फार सोपी असते. रक्त व वीर्य यांच्या चाचणीनंतर पुरुषाच्या लैगिंकतेचा संपूर्ण आराखडा डॉक्टरसमोर उभा राहतो. स्त्रीची चाचणी मात्र जास्त त्रासदायक व तिच्या आत्मसन्मानाची कदर न करणारी असते. समागमानंतर शुक्राणू तिच्या योनीत प्रवेश करतात की नाही हे सिम्स हुन्हेर चाचणीत कळते. रूबेन्स चाचणीत फॅलोपियन ट्यूबमधील दोष लक्षात येतात. हिस्टेरोस्कोपीत गर्भाशयातील उणीवा कळतात. दांपत्याला अती क्षुल्लक समजणाऱ्या या चाचण्या अतिशय क्लेशकारक व मनस्ताप देणार्‍या आहेत. एवढेच नव्हे तर चाचणीतून कळलेल्या दोषांचे निवारण करणार्‍या सर्व उपाय-उपचारांना स्त्रीलाच सामोरे जावे लागते. त्यामुळे तिला जीव नकोनकोसा वाटू लागतो. कशाला या फंदात पडलो? अशी पश्चात्तापाची वेळ येते; परंतु यासाठीची फी डॉक्टरने अगोदरच वसूल केलेली असल्यामुळे अर्धवट सोडताही येत नाही. काही दोष आढळ्यास जननेंद्रियाची शस्त्रक्रिया, त्यांनतर गर्भधारणेसाठी औषधं, इंजेक्शन्स अशा वैद्यकीय चक्रातून तिला जावे लागते. गर्भाशयाबाहेर बीजांडांची वाढ करण्याचे ठरवल्यास हार्मोन्स नियत्रिंत करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या औषधांचे दुष्परिणाम होऊ शकतात. रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. गर्भशयात गर्भ व्यवस्थितपणे स्थिर होईपर्यंत तिला या प्रकियेमधून अनेक वेळा जावे लागते. चाचणीचे सर्व ताण स्त्रीलाच सहन करावे लागतात. अपत्याच्या अदम्य इच्छेपायी ( व सासू सासर्‍यांना, आई-बापाला, नवर्‍याला खूश ठेवण्यासाठी!) स्वत:चा जीव धोक्यात घालत मुकाट्याने या सर्व गोष्टी ती सहन करते. (कित्येक वेळा स्त्रीचा दोष नसतानासुध्दा तिला सर्व चाचणी व गर्भोपचारांचा सामना करावा लागतो; कारण तिचा पुरूष या प्रसंगी योग्य साथ देत नसतो. एका अभ्यासात क्लिनिकमध्ये चाचणी करून घेणार्‍या दापंत्यापैकी वीस टक्के दांपत्य नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्यास योग्य असतात असे आढळले आहे.)

फर्टिलीटी क्लिनिक्स व डॉक्टर्स यशाच्या खात्रीबद्दल नेहमीच (चुकीची!) विधानं करत असतात. मूल जन्माला येते की नाही यापेक्षा गर्भ वाढतो आहे की नाही हेच यशाचे निकष ठरत असते. हार्मोन्समधील बदलसुद्धा गर्भवाढीच्या यशाच्या आकडेवारीत टाकले जातात. त्यामुळे हे आकडे नेहमीच फुगवून सांगितलेले असतात. जाहिरातीचा मारा करून वंध्यत्व असलेल्या जोडप्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा हा एक आक्रमक पवित्रा असतो. 'चमत्कार' म्हणूनच सामान्य लोक या गोष्टीकडे पाहतात आणि डॉक्टर्सना देवत्व बहाल करतात. दत्तक घेऊन किंवा निपुत्रिक राहूनसुध्दा हे दांपत्य सुखाने जगू शकते; परंतु बाजारीकरणाचा सातत्याने होणारा मारा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. खरे पाहता या कृत्रिम पुनरूत्पादनाच्या यशाचा दर 18-20 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. तरीसुध्दा निपुत्रिक जोडपी यांच्या आहारी जातात. 'आम्ही याव्यतिरिक्त काय करू शकतो?' असेच हतबल होऊन ते विचारतात. अपत्य प्राप्ती हवी की नको याचा निर्णय निपुत्रिक जोडप्यांनी घ्यायली हवा; परंतु आजकाल हा निर्णय बाजार लादत आहे.

आर्थिक उलाढाल
गर्भधारणेच्या व्यापार व्यवहारात पैशाची फार मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. अवयवांची खरेदी-विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु शुक्राणू, बीजांड, गर्भ हे शारीरिक अवयवांच्या सदरात मोडत नसून हे सर्व 'शरीराचे उत्पादन' आहेत अशी पळवाट शोधून त्यांची विक्री होत आहे. शुक्राणूंच्या तुलनेने बीजांडांची किंमतही जास्त व त्याला मागणीही जास्त. या संबंधातील आकडेवारी आपल्या देशात उपलब्ध नसली तरी, अमेरीकेसारख्या विकसित राष्ट्राच्या आकड्यावरून या धंद्याचे स्वरूप कळू शकेल. या दरावरून नजर टाकल्यास हे दर त्या देशातील श्रीमंतांनासुध्दा न परवडणारे आहेत हे लक्षात येईल.

शुक्राणू ..... 30,000 रूपये
बीजांड ..... 4,50,000 रूपये
कृत्रिम गर्भधारणा (प्रत्येक खेपेस) .... 12,40,000 रूपये
भाड्याचे गर्भाशय .... 6,00,000 रूपये
पूर्वजनुक चाचणी .... 3,50,000 रूपये
दत्तक:नात्यांतल्यांसाठी .... 2,50,000 रूपये
दत्तक:अमेरिकेतल्या अमेरिकेत ..... 14,50,000 रूपये
दत्तक:इतर देशातून ..... 24,50,000 रूपये

भारतासारख्या विकसनशील राष्ट्रातील राहणीमानाप्रमाणे हे दर दहा टक्के असे धरले तरी हा खर्च भारतीयांच्या आवाक्याबाहेरचा आहे. तरीसुध्दा फर्टिलिटी क्लिनिक्सची जाहिरात व डॉक्टर्सच्या आग्रहांना बळी पडून या मृगजळांच्या मागे निपुत्रिक दांपत्ये धावत आहेत. अमेरीकेतील या आकडेवारीमुळेच भारतातील गर्भधारणेच्या उद्योजक ठेकेदारांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. भाड्याने गर्भाशय देणार्‍या स्त्रीसाठी (सरोगेट मदर) अमेरिकेत साठ लाख रूपये खर्च होत असल्यास, भारतात केवळ दहा ते बारा लाख रूपये दर ठेऊनसुध्दा प्रचंड नफा कमवता याईल हा हिशोब त्यामागे आहे. परदेशातील जोडप्यांना भारतात बोलावून त्यांच्या राहण्याचा खर्च, पूर्वचाचणी, कृत्रिम गर्भधारणा, नंतरच्या गर्भारपणातील भाड्याने गर्भाशय देणार्‍या स्त्रीची (सरोगेट मातेची) काळजी, प्रसूती इत्यादी सर्व गोष्टी अती कमी पैशात उरकता येतात, हे त्यांच्या लक्षात आले आहे. बाकीच्या चाचणी-गर्भधारणा इत्यादीसाठी फार वेळ लागत नसला, तरी गर्भ वाढवण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागतोच. त्यासाठी स्त्रिया पुरवण्याची व्यवस्था केल्यास धंदा तेजीत चालेल हे लक्षात आल्यानंतर भारतात सरोगेट मातांची फौज ठिकठिकाणी उभी केली जात आहे.

सरोगेट मातांचे खेडे
गुजरातमधील आणंद हे खेडे 'अमुल' दुग्ध उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. दूध सहकारी संघाच्या वितरण व्यवस्थेमध्ये आणंद व आसपासच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी क्रांती केली आहे; परंतु आज हे खेडे युरोप, अमेरिकेत भाड्याचे गर्भाशय पुरवणाऱ्या 'सरोगेट माता' चे खेडे म्हणून नावाजले जात आहे. या गावातील अनेक तरूण/प्रौढ स्त्रिया दोन-चार लाख रूपयांसाठी गर्भव्यापारात भागीदार होत आहेत. फर्टिलीटी क्लिनिक्सचे दलाल बायकांना भुरळ पाडून या धंद्यात खोऱ्याने पैसे ओढत आहेत. गंमत म्हणजे हा सर्व व्यवहार कायदेशीर आहे. नीतीचा प्रश्नसुध्दा ह्या बायकांनी आपल्यापुरता सोडवला आहे. त्यांच्या मते आर्थिक मदत मिळत असल्यास गर्भाशय भाड्याने देण्यात काही गैर नाही. या अतिरिक्त पैशातून मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे चांगल्या घराण्यात लग्न, आजारी नवर्‍याचे औषधोपचार होत असल्यास त्यात काय चूक अशी मानसिकता मूळ धरू पाहत आहे. शिवाय नवर्‍याच्या संमतीनेच त्याची बायको ही गोष्ट करत आहे. अशा व्यवहारात आणंद हे एकमेव खेडे आहे असे म्हणण्याला अर्थ नाही. इतर राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात हे व्यवहार चालत असावेत. फक्त त्यांचा गवगवा झाला नसेल. परदेशासाठी संगणक सेवा पुरवणार्‍या कॉल सेंटर्सप्रमाणे सरोगेट मदर्स पुरवणारे किंवा गर्भधारणा सेवा पुरवणारे केंद्र नजीकच्या काळात देशभर सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही काळात भारत देश हा सरोगेट मदर्सचा देश म्हणूनही प्रसिद्धीला येईल.

वैद्यकीय पर्यटन
मुळातच इतर विकसित देशातील जननक्षमतेचे प्रमाण गेल्या वीस वर्षात कमी कमी होत चालले आहे. 1975 मध्ये सरासरी प्रमाण 2.24 होते, 2011 मध्ये ते प्रती जोडप्यामागे 1.6 झाले आहे. त्यामुळे ज्यांना मूल हवे अशी जोडपी भारतात येतात व या देशात काही काळ राहून चाचणी इत्यादी सोपस्कार संपवून मातेच्या गर्भाशयात गर्भ ठेवून ते परत जातात व नंतर येऊन अपत्य घेऊन जातात. सरोगेट मातांच्या पुरवठ्याला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत (झाले) आहे. पंधरा ते वीस लाख रुपयात अपत्य प्राप्ती होत असल्यामुळे या परदेशी जोडप्यांचे साठ - सत्तर हजार डॉलर्स (30 लाख रुपये) वाचू शकतात. वैद्यकीय पर्यटन हे गोंडस नाव देऊन याचा खुले आम बाजार मांडला जात आहे.

(खरे पाहता भारतात एक कोटीपेक्षा जास्त अनाथांची संख्या असूनसुद्धा अनाथ मुला - मुलींना दत्तक घेण्याऐवजी ही जोडपी कृत्रिम गर्भधारणेचा अवलंब करत आहेत. कदाचित परदेशातील लोकांसाठीच्या दत्तक विधान संबंधाचे कायदे अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचे व वेळखाऊ असल्यामुळे कुणीही या भानगडीत पडत नसावेत. कायद्याने अशा गोष्टीस मुभा दिल्यास Human trafficking ला आळा घालणे कठिण होत असल्यामुळे कायदे क्लिष्ट असावेत.)

आपल्या देशातही छुपेपणाने सरोगसीचे लोण पोहोचले आहे. आपल्या येथील (श्रीमंत) निपुत्रिकसुद्धा बाजारीकरणामुळे कृत्रिम गर्भधारणेचा आधार घेत आहेत. सरोगेट माता हवी म्हणून जाहिरात देत आहेत. ही प्रक्रिया संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असूनसुद्धा सरोगेट माता विशिष्ट जातीचीच हवी, गोरीपान हवी अशा अटी जाहिरातीत नमूद केलेल्या असतात. अशा कारणासाठीसुद्धा लोक जात विसरत नाहीत.

सरोगेट मातांचे शोषण
गर्भधारणा बाजाराचे पुरस्कर्ते कितीही या बाजाराची (व उपचाराची) भलावण करत असले तरी सरोगेट मातांचे नक्कीच शोषण होत आहे. गर्भ/बीजांडाचे तथाकथित 'दान' केल्यानंतर हार्मोन्ससाठी त्यांना रोज इंजेक्शन्स घ्यावे लागतात. त्यामुळे रक्तस्राव, जंतुसंसर्गाचा तत्कालिक धोका होऊ शकतोच. शिवाय पुढील आयुष्यात स्तनाचा वा बीजांडकोषाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. गर्भ वाढवताना गर्भाबरोबरच जैविक व भावनिक सबंधांना तडा जात असतो. कारण गर्भाबरोबर जनुकीय संबंधाचा यात अभाव आहे. गर्भाशय भाड्याने घ्यायच्या आधी सरोगेट माताची चाचणी घेतली जाते. जोडप्यांच्या अटींची (जात, धर्म, रंग, आरोग्य, वय इत्यादी) पूर्तता होते की नाही याकडे लक्ष दिले जाते. अपत्याची 'गुणवत्ता' जपण्यासाठी या सरोगेट मातेला अल्ट्रासाउंड वा गर्भजल परिक्षा (amniocentesis)सारख्या प्रसूतीपूर्व चाचण्या द्याव्या लागतात. प्रसूतीनंतर 'अपत्यावर आपला हक्क नाही' असे करारपत्र लिहून द्यावे लागते. गर्भकाळात काही कमी जास्त आढळल्यास गर्भपात करून घेण्याची तयारी ठेवावी लागते. शेवटच्या क्षणी काही अडचणी आल्यास अपत्यांचा ताबा घेण्यास जोडपे नकार देऊ शकते. मुळातच जन्माला आलेले बाळ कुणाचेच नसल्यामुळे 'अनाथां'च्या संख्येत भर पडते.

बीजांडाच्या कृत्रिम उत्पादन पद्धतीमुळे एकच बीजांडाऐवजी अनेक वेळा दोन - तीन बीजांडे तयार होऊ शकतात. त्यामुळे जुळे - तिळे असे जन्म घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भावस्थेत कितीही काळजी घेतली तरीही जुळ्या-तिळ्याच्या प्रसूतीतही तिच्या जिवाला धोका असतो. आजकाल प्रसूतीचा धोका कायम असतो.

फर्टिलिटी क्लिनिक्स सरोगेट मातांना एखाद्या निर्जीव यंत्रासारखी वागणूक देत असतात. एखादी सामान्य स्त्री जेव्हा गर्भारशी राहते तेव्हा तिच्या मेंदूत काही बदल होतात व ती होऊ घातलेल्या बाळाची काळजी घेण्यास सज्ज होत असते. प्रसूतीनंतर मूल परक्याचे होणार आहे या कल्पनेनेच ती अस्वस्थ होऊ शकते. व मानसिक संतुलन बिघडवून घेवू शकते. पैशासाठी ती हे ओझे बाळगत असले तरी भावनाविवश अवस्था ती टाळू शकत नाही.

या स्त्रिया जैविक गुलामगिरीच्या शिकार झालेल्या असतात. जोडप्यांकडे भरपूर पैसा असतो व सरोगेट माता म्हणून पुढे येणारे गरीब कुटुंबातलेच असतात. 'बाळाचे उत्पादन' घेणाऱ्या जोडप्याचे समाधान झाल्यानंतरच तिचे पैसे चुकते गेले जातात. पैशाच्या हव्यासापायी ती 5 -6 वेळा सरोगेट माता झाल्यास तिच्या जिवाला धोका पोहोचू शकतो. जोडपे व क्लिनिक्सना याचे काही देणे घेणे नसते; सरोगेट मातेचे शरीर म्हणजे गर्भ वाढवणार भांड असेच वाटत असते.

गर्भधारणेबद्दल बाजारव्यवस्थेला खरोखरच आत्मीयता असल्यास अशा प्रकारच्या जुजबी तंत्रज्ञानापेक्षा वंध्यत्व दूर करण्यासाठी मूलभूत संशोधनाला उत्तेजन द्यायला हवे होते. त्यासाठी पैसा ओतायला हवा होता. वंध्यत्वाची कारणं शोधून तंत्रज्ञान विकसित करायला हवे होते. परंतु या औषधी कंपन्या व त्यांना साथ देणारी वैद्यकीय व्यवस्था संशोधनात पैसे गुंतवण्याऐवजी लगेच परतफेड करू शकणार्‍या तंत्रज्ञानाला पाठिंबा देत आहेत. वायू प्रदूषणावर कायमची उपाययोजना शोधण्यापेक्षा नाकाला रुमाल बांधून गाडी चालवण्यासारखाच हा प्रकार आहे. मूळ दुखणे शोधून त्यावर इलाज करणे गरजेचे आहे. (संदर्भ)

कायदे कानून
गर्भधारणाच्या संबंधात आताच्या कायद्यामध्ये अंदाधुंदी आहे. एका देशात बीजांड विकण्यास बंदी, एका देशात गर्भ वाढविण्यास बंदी, दुसर्‍या एखाद्या देशात सरोगेट मातेवर बंदी, अशा अनेक तर्‍हा आहेत. त्यामुळे डेन्मार्कहून शुक्राणू, स्पेनमधून बीजांड, कॅलिफोर्नियात गर्भवाढ व इंग्लंडमध्ये अपत्याची वाढ अशा प्रकारे जन्मलेले मूल जागतिकीकरणाच्या चक्रात अडकून पडत आहे. भारतातसुद्धा यासंबंधीच्या कायद्यात भरपूर संदिग्धता आहे. या पद्धतीने जन्माला आलेल्या मुलावर कायदेशीर हक्क कुणाचा - शुक्राणू देणार्‍याचा, की बीजांड देणार्‍याचा की सरोगेट मातेचा, की मुलाचे संगोपन करणार्‍याचा? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. केवळ करारपत्रावर सही केली याचा अर्थ इतरांना हात झटकून मोकळा होता येत नाही. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे कायद्यातील कलमांचा योग्य अर्थ ध्वनित होतो की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. थोडासा जरी शिथिलपणा त्यात असल्यास गैरफायदा घेणारे टपलेले असतात.सरसकट बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यास मूत्राशय विक्री व्यवसाय जसा फोफावला तसा या जैविक उत्पादनाचासुद्धा काळा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृत्रिम गर्भधारणा हा उपाय नव्हे
मुळात निपुत्रिक असणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. निपुत्रिक जोडप्यांनी आपल्या मनातील अपराधीपणाची भावना दूर केल्यास समाधानी जीवन नक्कीच जगता येईल. अपत्य प्राप्तीसाठी एवढा आटापिटा करण्याची खरोखरच गरज आहे का याचाही विचार करावा लागेल. पूर्वीच्या काळी अविभक्त कुटुंबात निपुत्रिक जोडपी आपल्या भावा - बहिणींच्या मुलां-बाळांना आपलेच समजून समाधानी राहत होते. अलीकडील काळात विभक्त कुटुंबांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपलेच मूल हवे हा हट्ट न धरता नात्यातील एखाद्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलून समाधानी जीवन जगणे अशक्यातली गोष्ट नाही.

आताच्या बदलत्या सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास स्वत:चा वंश पुढे चालवण्याचा अट्टाहास कशापायी असा प्रश्न पडू शकतो. एके काळी मुलं म्हणजे म्हातारपणाचे आधार अशी प्रतिमा होती. आजच्या परिस्थितीत ही संकल्पना कालबाह्य ठरत आहे. पालकांनासुद्धा आपली मुलं म्हातारपणी आपल्याजवळ असतील किंवा त्याच्याजवळ आपण असू याची खात्री देता येत नाही. मुलं दुसरीकडे, वृद्ध आई - वडील आणखी कुठेतरी अशी परिस्थिती असताना अपत्य प्राप्तीचे हे सबळ कारण होऊ शकत नाही. मुलाबाळाशिवाय घराला घरपण येत नाही या मर्यादेपर्यंत अपत्याची गरज भासू शकते. परंतु त्यासाठी एवढा आटापिटा करायचा का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आपल्या देशापुरते बोलावयाचे असल्यास या धोकादायक तंत्रज्ञानाची अजिबात गरज नाही. हवे असल्यास लाखो अनाथ बालकांपैकी एखाद्याला/एखादीला दत्तक घेऊन आपले जीवन आनंददायी करता येईल. फक्त आपल्याजवळ पैसा आहे म्हणून एखाद्या गरीब, नडलेल्या स्त्रीला सरोगेट माता होण्यास भाग पाडून तिला गुलामासारखी वागणूक देणे विवेकीपणाचे लक्षण नव्हे. घरात मूल वाढ असताना त्याच्या खोडकरपणातून, खेळकरपणातून बोबड्या बोलातून आनंद मिळविण्यासाठी घरात काही काळ तरी रांगते मूल हवे याबद्दल दुमत नाही; परंतु यासाठी कृत्रिम गर्भधारणा उपाय होऊ शकत नाही.

संदर्भ:1. व . 2.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

प्रतिक्रिया

जिथ मागणी आणि पुरवठा आला तिथ बाजारीकरण आलेच. यावर आयबीएन वर एकदा चर्चा झाली होती. काही सरोगेट मदर उपस्थित होत्या. त्या स्वेच्छेने सरोगेट मदर झाल्या होत्या. त्यांना अपेक्षित मोबदला मिळाला होता. किती मोबदला म्हणजे योग्य याचा सर्वमान्य निकष नाही. त्यामुळे शोषण झाले कि नाही असे ठरवता येत नाही. शोषणाचा मुद्दा हा सर्व क्षेत्रात आहे. हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्याने त्याची व्याप्ती ही मर्यादित रहाणार आहे. भारतात याविषयी कायदे अस्तित्वात नसल्याने गैर प्रकार घडू शकतात. सरोगसी हे अनैतिक आहे असे म्हणाणार वर्ग हा असणारच आहे. अनैतिक नाही असेही म्हणणारा वर्ग आहेच. कारण नैतिकता ही काल स्थल समाज सापेक्ष आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हा लेख प्रतिक्रियात्मक आहे का? अशी शंका येते. ('ये तो होनाही था' या धाग्याच्या अनुषंगाने)

ज्यांना सरोगेट मदर (भाडोत्री आई) व्हायचे आहे त्यांची ना नाही, ज्यांना अपत्य हवे त्यांची ना नाही, कायद्याचीही ना नाही.. मग तुम्ही कोण त्यावर मत देणारे? - असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचे कोणतेही समर्पक उत्तर देणे शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाच्या निमित्ताने इथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. मी सर्वांना उद्देशून लिहितोय आणि विचारतोयः

कोणतीही एक अमुक गोष्ट ही त्यात सहभागी असलेल्या उभय अथवा सर्व पार्ट्यांना मान्य असल्यास त्याला कसलीच हरकत घेणे योग्य नाही असं आपलं म्हणणं आहे का?

कायदेशीर हरकत घेणं न घेणं हे प्रचलित कायद्यावर अवलंबून आहे. कायदा बदलतो आणि बदलला जाऊ शकतो. तुम्ही आणि मी स्वतः थेट "लॉ-मेकर" नसूही, पण कशा प्रकारचे कायदे यावेत याविषयी आपलं मत हे "सर्व सहभागी पार्ट्यांच्या म्युच्युअल कन्सेंटने काहीही चालेल" असं एक सोपं लिबरलायझेशनचा फील देणारं असेल का?

की इन्व्हॉल्व्ड पार्टीजची कशाला सहमती आहे आणि कशाला नाही याखेरीजही इतर अनेक घटक सामाजिक नियम (कायदे / संकेत) बनवताना लक्षात घ्यावेत?

सज्ञान मनुष्य = परस्परसंमतीने कोणताही व्यवहार ठीक असं आहे का? अन्याय माहीत असूनही तो सहन करणारी पार्टी त्यात असू शकते. अन्याय हा अन्याय आहे याची जाणीवही नसलेली "सज्ञान" वयाची पार्टी त्यात असू शकते. इतर कोणीतरी पार्टी जी यात संबंधित आहे पण थेट व्यवहारात केवळ समोर न दिसल्याने विसरली जाते आहे अशीही असू शकते.

तेव्हा एखाद्या गोष्टीवर कायद्याने बंदी घालणे, किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करणारा कायदा हा "दोन्ही पार्ट्यांची सहमती", "अहिंसक", "आजुबाजूच्यांना त्रास न होता" अशा स्ट्रिंग्ज अटॅच्ड टाईप अटी घालून सर्वकाही चालेल अशा मानसिकतेतून बनवता येईल का? की बहुमताने आणि बहुतांशांसाठी इष्ट काय ते पाहून हे कायदे बनवावे आणि एन्फोर्स करावे लागतील?

आपण हे कायदे बनवू शकत नसलो तरी उद्या लीडर लोकांपैकी कोणाचं मत कोणत्या प्रकारचे कायदे आणण्याकडे आहे हे पाहून पाठिंबा ठरवण्यासाठी तरी या विचाराचा उपयोग होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा विषय 'पर्सनल लिबर्टी' ऊर्फ 'व्यक्तिस्वातंत्र्य' म्हणजे काय? या मूलभूत प्रश्नापाशी येऊन थांबतो.

"दोन्ही पार्ट्यांची सहमती", "अहिंसक", "आजुबाजूच्यांना त्रास न होता" अशा स्ट्रिंग्ज अटॅच्ड टाईप अटी घालून सर्वकाही चालेल>>>>>>>>
-या दिशेनेच सुशिक्षित आणि सुसंपन्न समाजाची वाटचाल होणार हे उघड आहे. आज नाही पण उद्या, उद्याच्या उद्या - कमीत कमी बंधने असणारा समाजच निर्माण होणार आहे.

त्यात गैर काय? स्वतःशी असा विचार केला तर बर्‍याच बाबतीत ते स्वतःलाही लागू होते असे लक्षात येते. सेफगार्ड ('स्ट्रिंग') असले की झाले.
अवांतर उदा.:
(अणुऊर्जा निर्मिती व्हावीच, फक्त त्यातून बाँब बनू नयेत आणि विकीरणाचे अपघात होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं लेखन नेहमीच एखाद्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडणारं आणि संतुलित असतं. मात्र या वेळी ते अत्यंत एकांगी आणि भडक झालं आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं.

शोषण हा शब्द निष्काळजीपणे फेकलेला आहे. ज्या बाईला उत्पन्नाची फारशी साधनं नाहीत, तिच्यासाठी वर्षभर कष्ट घेण्याचे जर दोन ते चार लाख रुपये मिळत असतील तर ते शोषण कसं? ती जर वर्षभर शेतात राबली तर तिला वीस ते चाळीस हजार रुपये मिळण्याची मारामार ठरेल. इथे दहापट पैसे मिळतात. आणि कशासाठी, तर पूर्वी फर्टिलिटी रेट जास्त असताना प्रत्येक स्त्री सहा ते सात वेळा जे बाळंतपण करवून घेत असे त्यासाठी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश घासकडवींशी सहमत. लेख फार एकांगी वाटतो. ज्याप्रमाणे बार नर्तिका होणे, वेश्याव्यवसाय करणे हे मर्जीने होत असले तर समाजाला मान्य आहे त्याचप्रमाणे आपले गर्भाशय स्वखुशीने भाड्याने देणे ही काळाची गरज असू शकते. यामधे कुठे सक्ती आली तरच ते अनैतिक ठरेल. याविषयावर नुकताच एक मराठी चित्रपट येऊन गेला.(नांव आठवत नाही.) मला तरी यांत 'शोषण' हा टोकाचा शब्द वापरावासा वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं आहे... मी तर म्हणतो की ह्या स्त्रीयांनी गर्भधारण अवस्थेत असताना वेश्याव्यवसायही करावा. डबल जॉब म्हणजे डबल पैसे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

माझ्या मते लेखात अभिनिवेशपणे सरोगसीच्या बाजूने मांडलेल्या मुद्द्यांचा उल्लेख नसल्यामुळे कदाचित लेख एकांगी वाटल्याची शक्यता आहे. लेखात वापरलेली चित्रं अंगावर येत असल्यामुळेही लेख भडक वाटला असेल. (googleच्या images साठी surrogacy असे टंकून क्लिक केल्यास गोर्‍या गोमट्या बाळांचे, हसत हसत बाळाचे पप्पी घेणा़र्‍या सरोगेट मातांचे व जोडप्यांचे फोटो ढिगाने पाहायला मिळतील.त्याऐवजी वाचकांचे लेखाकडे लक्ष वेधण्यासाठी अशा प्रकारची चित्रं निवडली आहेत.) परंतु सरोगसीच्या बाजूने आजकाल मोठ्या प्रमाणात लेख येत आहेत. (व या लेखाच्या काही प्रतिसादातसुद्धा असा उल्लेख आहे.) गरीबांना चार पैसे (जास्त!) मिळत असल्यास तुमच्या पोटात का दुखते? हा सर्वसामान्य सूर त्यामागे आहे.

एक हायपेथेसिस केस म्हणून त्यासंबंधी चर्चा करता येईल. अमेरिकेतील वा इतर कुठल्याही विकसित देशातील जोडप्यांनाही न परवडण्याइतका खर्च यासाठी येत असल्यास निर्वेधपणे चाललेला हा धंदा एवढ्या ऊर्जितावस्थेपर्यंत पोहोचला नसता. यासाठी आपल्या शासनाने सरोगसीतून जन्मलेल्या बाळाला बाहेरच्या देशात नेण्यासाठी 1-2 कोटी रुपये एवढा जबरदस्त कर लादल्यास हा धंदा इतका तेजीत चालला नसता. किंवा शासनानेच पुढाकार घेऊन सरोगसीला उत्तेजन देण्याचे धोरण ठरवून त्यासाठी ठिकठिकाणी सरोगसी क्लिनिक्स उघडल्यास आपल्या देशातील हजारो लाखो गरीब स्त्रिया पुढे आले असते. आणि demandपेक्षा supply जास्त झाल्यावर भाव कोसळले असते व बाजारही कोसळला असता.

परंतु लेखातील मुद्दा हा नाही. मुद्दा हा आहे की सरोगसीच्या काळातील स्त्रियांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा, अर्धवटपणे राबवत असलेल्या तंत्रज्ञानाचा व त्यापासून होणार्‍या दूरगामी दुष्परिणामांचा. वंध्यत्वावर मूलभूत संशोधन न करता केवळ काही जैविक तंत्रज्ञानांची मदत घेऊन त्यालाच एकमेव उपचार पद्धती म्हणून डांगोरा पिटणार्‍यांचा.

आता राहता राहिला प्रश्न सरोगसीची बाजू टीव्ही चॅनेल्सवर मांडणार्‍यांचा. सतीची पद्धत जेव्हा रूढ होती तेव्हा जर आजच्यासारखे टीव्ही चॅनेल्सची सोय असती तर सती जाणे किती उदात्त आहे, शोषणरहित आहे, स्त्रियांच्या हिताची आहे असे छातीठोकपणे सांगणार्‍यांची संख्या कमी नसती **. पेड न्यूज फक्त मुद्रित वृत्तपत्रासाठीच नव्हे तर टीव्ही चॅनेल्सवरही शक्य आहे, हे आपण नाकारू शकत नाही.

(** अवांतर: सती जाणे हे किती उदात्त आहे व ती प्रक्रिया किती पवित्र आहे हे ठासविण्यासाठी 'स्वामी'कार रणजित देसाई यांनी स्वामी पुस्तकातील शंभरेक पानं खर्ची घातलेले वाचकांना कदाचित आठवत असेल!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश आणि तिरशिंगरावांशी सहमती.

'मुलं कशी जन्माला येतात?' याचे उत्तर सर्वाना माहित असले तरी चारचौघात त्याची वाच्यता करण्याची रीत (आतापर्यंत तरी) नव्हती. हा व्यवहार अत्यंत खाजगी स्वरूपातला, एकांतातला असा होता. शुक्राणू, बीजांड, गर्भनिर्मिती, गर्भधारणा या गोष्टी पुनरुत्पादन प्रक्रियेचे महत्वाचे घटक असून त्यातील प्रत्येकाची वैशिष्ट्यपूर्ण अशी भूमिका असते. परंतु आता त्यांची चारचौघात, चव्हाट्यावर चर्चा केली जात आहे.

सुरूवातीच्या या वाक्यांमुळे आता लैंगिक शिक्षणावरही बंदी आणावी, अशा प्रकारची रूढीनिष्ठ भूमिका डोकावते.

काही गोष्टींबद्दल दोष समाजाला आणि समाजातल्या शिक्षणाच्या अभावामुळे बनवलेल्या धारणांना दिला जावा, उदा. मूल नसण्यावरून स्त्रियांची होणारी कुचंबणा, त्यांच्याच होणार्‍या चाचण्या, उपचार इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतातल्या सरोगसीवर कायद्याचा अंकुश हवा का?
पहा आयबीएन वरील चर्चा
तसेच सरोगसीची मन्नत हा अलका धुपकर यांचा लेख वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्रत्येक गोष्टीचा बाजार होऊ नये ही योग्य भूमिका लेखकाने मांडली आहे. सरोगेट आइच्या भावनिकतेकडे कुणी लक्ष देत नाही आहे. हा स्त्रीकडून लेकरे विकत घेण्याचा प्रकार आहे. माहौल वेगळा बनवला आहे.

कशाकशावर सर्विस टॅक्स नाही याची केंद्र सरकार निगेटीव लिस्ट बनवतं. तसं आता काय काय 'विक्रेय' नाही याची लिस्ट विरोधकांनी द्यावी. ती लहान असेल. म्हणजे कल्पना येईल कि अजून कोणत्या कोणत्या बाबतीत आम्ही अनभिज्ञ आहो आणि कुठे कुठे आमचं मत चुकतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१) गर्भ हा सरोगेत आई ही जीवशास्त्रीय आई नसते. जोडप्याचे अंडपेशी आणि शुक्रपेशी यांपासून परीक्षानळीत फलित झालेले भृण त्याच आईच्या गर्भाशयात वाढू शकनार नसल्यामुळे सरोगेट आईच्या शरीरात रोपित केले जाते. ‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚‚जीन ज्या स्त्री- पुरुषाचे असतात तेच त्याचे खरे आईवडील. तो जीव सरोगेट आईच्या शरीरापासून तयार झालेला नसतो, तर तयार झालेल्या जीवाचे पोषण तिच्या शरीरात होते. हे लेकरु त्या जोडप्याचेच. तिचे लेकरु, तिच्या स्वतःच्या अंडपेशीपासून बनलेले असते.
२) जेव्हा जोडप्यातील स्त्रीची अंडपेशी वापरणे शक्य नसते तेव्हाही शक्यतो सरोगेटची अंडपेशी न वपरता पर्याय वापरला जातो. त्यामुळे ते लेकरु तिचे नाही हे निश्चित असते.
३) नऊ महिने वाढवलेल्या गर्भाबद्दल सरोगेट आइला ममत्व वाटू शकणे साहजिक आहे, पण ते तिच्याचजवळ ठेवले तर त्या लेकराच्या खर्‍या आईपासून ते काढून घेण्याचा प्रकार होईल.
४) मूल दत्तक घेणे हे कुत्रा - मांजर दत्तक घेण्यासारखे नाही. त्यासाठी विशिष्ट मनोभूमिका असावी लागते. ़आहींना हे शक्या होते, पण सर्वांनाच ते जमेल असे नाही. स्वत:चे मूल असताना, दुसरे होऊ शकत असताना किती लोक दत्तक घेतात? तसेच, सरोगेट आईकदडून का होइना, स्वतःच्या बीजापासून बनलेले मूल होणे शक्य असताना दत्तक नको असेही वाटणे साहजिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला स्वतःला ही माहिती अगोदरपासून आहे. तरीही आपण केलेला खुलासा बर्‍याच वाचकांच्या कामी येऊ शकतो. त्याबद्दल धन्यवाद. आता -
१. लेखकाने अगदीच एकांगी लिखाण केले नाही. बर्‍याच वास्तविक समस्या मांडल्या आहेत. वाक्यागणिक समस्या मांडलेली दिसते. (परवडते म्हणून सरोगेट मदर ठेवणे, कोणतीही शारिरिक समस्या नसताना, जातीतली/गोरी सरोगेट मदर मागवणे, इ)अशा समस्या या व्यवसायाच्या अनुषंगाने उद्भवल्या आहेत. या समस्या सोडवणे, एका बाजूने या धंद्याच्या भल्यासाठीही गरजेचे आहे.
२. आता लिस्ट बद्दल पुन्हा - बाजारात असे धंदे आलेले आपल्या चालतील का?
अ. भाड्याने डोळा देणे, जास्त चांगला रेट असेल तर दोन्ही देणे.
आ. मेंदूची काही स्मृती विकणे, काही प्रोसेसिंग पावर विकणे (म्हणजे त्या पेशी)
इ. तारुण्य (वय) विकणे किंवा भाड्याने देणे
ई. दुर्धर आजार असलेले अवयव काही काळ ठेऊन घेऊन चांगले अवयव देणे.
फ. मृत्यू घेणे (पैसा घरच्यांना देण्यासाठी म्हणा)

हा खरा मी प्रश्न विचारत होतो. यातलं सगळं ठीकच आहे असं म्हणणार्‍या लोकांना प्रामाणिक (हा शब्द नाही वापरला तर लोक माझ्या प्रतिसादांना चूकीने खवचट मानतील) कुतुहलाने प्रश्न विचारु इच्छितो कि बाजार म्हणून ठीक नाही ते काय काय आहे? अर्थात निगेटीव लिस्ट काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माहित असूनही आपण 'स्त्रीकडून लेकरे विकत घेणे' हा शब्दप्रयोग वापरला त्याचे आश्चर्य वाटले. त्यामुळे खुलासा करावासा वाटला की विकत देण्यासाठी ते लेकरू मुळी सरोगेट मातेचे नाहीच. घेणारे जोडपे ते लेकरू विकत घेत नसते कारण ते त्यांचेच असते. ते त्या लेकराच्या वाढीसाठी सरोगेट आईचा सहभाग विकत घेत असतात.

लेखकाने अगदीच एकांगी लिखाण केले नाही. बर्‍याच वास्तविक समस्या मांडल्या आहेत.

समस्या मांडल्या आहेत हे खरे आहे, तरीही लेखन ह्यावेळी काहीसे एकांगी वाटले. पण माझा आपल्या प्रतिसाद वरील विधानाला होता.

तुमच्या लिस्ट बद्दलः
तरूण्य अदलाबदल, स्म्ऋती विकणे हे आत्तातरी अशक्य कोटीतली गोष्ट आहे.
डोळा कसा भाड्याने देणार? तो काढूनच द्यावा लागेल. तेच अवयवांची अदलाबदल करण्यासाठी लागू पडते. ज्या शरीराला ते काढले तरी शरीराचे कार्य बिघडणार नसते अशाच ( मृत ) शरीरातून ते काढून दुसर्याला बसवतात. सरोगसीमध्ये गर्भाशय काढून दुसर्याला दिले जात नाही. तुम्ही म्हटलेल्या अवयबांच्या अदलाबदलीप्रमाणे अकार्यक्षम गर्भाशय तिच्या शरीरात बसवले जात नाही. गर्भ धारण करताना गर्भाशयाचा ताबा सरोगेट कडेच असतो. नंतरही ते तिच्याचकडे राहते. ते परवडते म्हणून भाड्याने घेणे आणि आपल्या गर्भाशयात मूल जगणार नाही म्हणून घेणे यात फरक आहे.

माझ्या नात्यातल्या एका स्त्रीचे मूल बरेच वैद्यकीय उपचार करूनही खूप आधी जन्माला आले. दोन दशके पूर्वी ते जगलेच नसते. पण आता आधुनिच तंत्रज्ञानामुळे त्याला काही महिने हॉस्पितलमध्येच नियंत्रित कक्षात वाढवून जगवणे शक्य झाले. आणखी आधी जन्मले असते तर वातावरणात प्रगत देशांत असूनही जगले नसते. गर्भाशर आणि तदनुषंगिक यंत्रणा हा अतिशय व्यामिश्र प्रकार आहे. अजून तरी जीव पूर्ण बाहेर जगवणे शक्य नाही. अशा वेळी मूल वाढ्वू न शकणार्‍या स्त्रीने काय करावे? माझ्या एका वहिनीला दृदयाच्या कमजोरीमुळे गर्भ वाढू शकण्याची शक्यता फार कमी आणि धोक्याची होती. अशा स्त्रीने काय हृदय अदलाबदली करायचे? माझ्या एका बहिणीला प्रगत देशातही काही वर्षे वैद्यकीय मदत घेऊन प्रयासाने मूल झाले. तिच्यावर मूल नाही म्हणून काहीही दडपण वगैरे नव्हते, तिलाच ते हवे होते. ते फक्त सरोगसीनेच होणार असे झाले असते तरीही माझा तिला १००% पाठिंबा असता. एकामाझ्या माहितीतील काही जोडपी स्वेच्छेने मूल होऊ न देता आनंदाने राहत आहेत, काहींना मूल होणे शक्य नाही तरीही ती आनंदात आहेत. माझ्या आणखी एका बहिणीला त्यावेळी उपलब्ध सर्व उपचारांनीदेखील मूल होऊ शकले नाही. सामाजिक दडपणापेक्षा स्वतःचे मूल असावे हीच तिची प्रबळ इच्छा होती. मुलाच्या आशेने तिने तिच्या पतीस दुसरे लग्न करून बघा असेही म्हटले होते. त्यांनी ते धुडकावले हि गोष्ट निराळी, पण जर त्यावेळी सरोगसीचे तंत्रज्ञान असते तर कदाचित तिला मूल मिळालेही असते. तिने तिच्या भावाची मुलगी खूप प्रेमाने वाढवली, पण कुठलाच नातेसंबंध नसलेल्या मुलाला दत्तक घेऊन आईप्रमाणे प्रेम करणे आपल्याला जमणार नाही हे तिने ओळखले होते. ह्याउलट माझ्या एका भावाने एक मुलगी असताना, आणखी एक मूल हवे म्हणून दुसरी मुलगी दत्तक घेतली. त्याला ते जमले, प्रत्येकाला जमेलच असे नाही. आणि न जमणे हा दोष नाही. उलट जर सरोगसीने मूल प्राप्त होत असेल तर ते जरूर करावे, तो त्या पालकांचा निर्णय आहे.

गैर्व्यवहार किडनी रोपणातही झालेले आहेत, जे समर्थनीय नाहीच. पण त्यामुळे कोणीच किडनी घेऊ नये, कायम दयलिसिस वर रहवे अशी अपेक्षा करणे चूक ठरेल. भारतातील गरीबीमुळे अनेक क्षेत्रात गैर्व्यवहार होतात. बालमजुरांपासून ते परदेशी पाठवलेले स्वस्त कामगार, घरगुती कामगार, कितीतरी. पण सर्वच व्यवहार गैर असतात असे नाही. आणि त्यात अनैतिकही काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरोगसी बद्द्ल अ‍ॅडव्होकेटकडून माहिती:
http://www.dnaindia.com/mumbai/1415694/interview-anyone-in-good-health-can-be-a-surrogate-amit-karkhanis

बातमी: Home Ministry banned foreign gay couples and single parents seeking surrogacy in India.
http://www.mumbaimirror.com/mumbai/others/Future-babies-hit-by-new-surrogacy-norms/articleshow/20966707.cms

अजून याबद्द्ल मत बनलेलं नाही....पण चर्चा वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाइलाजाने असे म्हणावे लागते की 'ऐसी अक्षरे' वर आता विचारांचे नव्हे तर व्यक्तींचे दोन गट झाले आहेत. 'तुमच्या विचारांना विरोध, म्हणून तुम्हाला विरोध' हे मागे पडून आता 'तुला विरोध, म्हणून तू जे काय म्हणशील त्याला विरोध' अशा एका जुन्याच संस्कृतीचा कालपरत्वे 'ऐसी अक्षरे' वर उदय झाला आहे. हे इतरही संकेतस्थळांबाबत झाल्याचे किमान काही लोकांच्या स्मरणात असेल. मराठी संकेतस्थळांना लाभलेला हा शापच आहे का काय कुणास ठाऊक! मग आक्रस्ताळेपणा, थयथयाट, संपादकीय हस्तक्षेप, निवृत्तीची भाषा असले सगळे सुरु होते. आणि मग ही सगळी वावटळे विरली की ते संकेतस्थळ एक कोमट, मचूळ टाईमपास स्थळ होऊन बसते. हा मराठी संकेतस्थळांचा पराजय नावाचा इतिहास आहे. तेंव्हा संस्थापक, संपादक लोकहो, सावधान!
बाकी मूळ विषयावर बोलायचे तर एवढेच म्हणतो:
१. मूल नसणे या सामाजिक काळिमा (टॅबू या अर्थी) आहे असे मानणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. काहीही करुन स्वतःचे मूल हवेच या हट्टापाई आईबाप स्वतःचे किती शारीरिक, मानसिक,आर्थिक हाल करुन घेतात हे पाहिले की सतसतविवेकबुद्धी नावाचे काही समाजात शाबूत आहे की नाही असा प्रश्न पडतो.
२. या हट्टामागे सामाजिक दडपण हे प्रचंड मोठे कारण आहे. त्यामुळे या जोडप्यांनाच दोष देऊन हात झटकणे इतके सोपे नाही.
३. मूल नसण्याचा आनंदाने स्वीकार करणे, अगदीच वाटल्यास एखादे मूल दत्तक घेणे यासाठी लागणारी प्रगल्भता जोडप्यांमध्ये आणि समाजात येत नाही तोवर यात फार बदल होणार नाही; म्हणजे नेहमीप्रमाणे ही चर्चा 'कोंबडं आधी का अंडं?' यावर येऊन थांबते.
४. कोणाचेही तिळभरही शोषण होणार नसेल आणि गर्भाशय भाड्याने देणार्‍या स्त्रीच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याची हमी मिळणार असेल ( या दोन्ही अटी पूर्ण करणे म्हणजे बहुदा अशक्यच!) तर सरोगसीत वाईट काही नाही असे माझे मत आहे.
अवांतरः हुश्श! आता या सगळ्यावर उतारा म्हणून कोणीतरी 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाचे खमंग, चुरचुरीत परीक्षण लिहावे अशी मी कळकळीची विनंती करतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

@ शहराजादजी - आपल्या प्रतिसादाचा सुर आवडला. पण माझा प्रतिसाद मत प्रवाचक नसून माझा संभ्रम मांडणारा आहे हे लक्षात घेतले तर मला काय म्हणायचे आहे हे लक्षात येईल.
@ लेकरू विकत घेणे - लेखात प्रभाकरजींनी जो अपत्याच्या मालकीचा मुद्दा मांडला आहे तो मी अशा भावनिक शब्दांत मांडला. तसा मालकी हा शब्द मी चूकीचा वापरतोय, बाळांची मालकी नसते, नातं असतं. याच 'सिमित' शब्दांबद्दल मी बोलतोय. शुक्राणू, बीजांड, गर्भाशय, औषधे, अन्न, नंतर दूध, इ मिळून मूल बनत असेल तर पहिल्या दोन दात्यांची १००% मालकी योग्य (कायद्याच्या नव्हे, नैतिकतेच्या आधारे) आहे का असा प्रश्न आहे. यात सरोगेट आईला बाळात रस असणे किंवा नसणे कदाचित 'वातावरणाने' प्रभावित झालेले असू शकते. उद्या जर सरोगेट आईला मी म्हणालो कि त्या 'मालकांना' दिलेल्या बाळाला परत मिळवण्यासाठी मी करोडो रुपये देण्यासाठी तयार आहे (प्रभवन केले), किवा तिचे उत्पन्न करोडो रुपये झाले (ज्या कारणाने बाळ द्यावे लागले, ते गेले, चांगली परिस्थिती आली) तर ती 'जाऊ द्या हो. ५ वर्षापूर्वीचे माझे उत्पन्न मी विकले, गेले, झाले. त्यात पुन्हा जाण्यासाठी मला वेळ आणि रस नाही' असले उत्तर देईल काय? की ती पेटून बरेच पैसे त्या बाळासाठी खर्च करेल? काय व्हावे? काय होईल?
@ विज्ञान - आज मूल जन्माला घालायला (स्वतःच्या) गर्भाची नाही. उद्या स्टेम पेशींची प्रगती होणार आहे. तेव्हा पुरुषांची गरज नसेल. याच शास्त्राची अजून पुढे प्रगती होईल तेव्हा स्त्रीचीही गरज नसेल. यात काहीच अशक्य कोटीतले नाही. हे व्हायला अजून जास्तीत जास्त ५० वर्षे लागतील (व्यक्तिगत मत. काळ कमी जास्त होऊ शकतो). मी आजच पैसे असले तर माझ्या येणार्‍या १०० पिढ्यांच्या (यांना पिढ्या म्हणता येणार नाही, मुलांचे) जन्माचे काँट्रक्ट असा बाजार प्रस्थापित झाला तर करू शकतो. मुद्दा कळण्यासाठी मी अतिशयोक्ती रस वापरत आहे, त्याचे हवे तितके डायल्यूशन करून वाचा ही विनंती. माझ्या उत्पन्नाचा किती हिस्सा मी किती लांब प्रोजेनीसाठी किती प्रतिष्ठित कंपनीला दिला हा नवा हिशेब सर्वजण ठेऊ लागतील. हे सरळसरळ युजेनिक्सचे प्रचलन झाले. श्रीमंत देशातील लोक त्यांच्या पिढ्या अट्टाहासाने 'चालू' ठेवतील आणि इतर लोक मात्र नैसर्गिक (तुलनेने कमी) शक्यतेने पुढे चालू ठेवणार.
@ युजेनिक्स - आपण दिलेल्या उदाहरणांत पैश्याचा रोल आहे. नैसर्गिक सुखे (जसे अपत्य सुख) जे पैशाच्या बाजारपेठेत येणे अपेक्षित नाही, ती येत आहेत. आपले नातेवाईक मूल नसणार्‍या गरीब लोकांपेक्षा कोणत्या अंगाने श्रेष्ठ होते जेणेकरून त्यांना पुत्रसुख लाभले आहे? त्यांच्याकडे पैसा आहे इतकाच ना? मी विज्ञानाचा कट्टर समर्थक आहे. त्याने मानवासाठी सुख शोधावे असे मला तीव्रतेने वाटते. पण इथे एक फरक आहे. माझा ताप जेव्हा औषधाने जातो तेव्हा इतर मानवांना कोणता 'नैतिक ताप' होत नाही. विज्ञानाने दगडाचे (पुन्हा अतिशयोक्ती) बाळात रुपांतर करून दिले तरही मी जाम खुश होईन. पण इतरांच्या करू नये त्या क्षेत्रात, जसे शरीर, जीवन हस्तक्षेप करून सुख द्यायचे शोध विज्ञान लावत असेल तर?
@ सरोगसी - कदाचित मनुष्याने आपला श्रम विकणे (जे मी रोज करतो), वेळ विकणे आणि काहीसे स्वातंत्र्य विकणे काही फार मोठा नैतिकतेत हस्तक्षेप नाही तसा सरोगसी पण नसावा. मी कदाचित 'बाळाच्या आणि आईच्या शरीरांचे ९ महिन्यांचे संबंध' या विषयाचा भयंकर बाउ करत असावा. मान्य आहे. कदाचित असा बाऊ नसावा म्हणूनच सरोगसीला कायदेशीर मान्यता, इ आहे. इतके लोक, यंत्रणा मिळून अमानवी असं करणार नाहीत असा मानसिक आधारही मला मिळतो. पण दुसरीकडे 'हस्तक्षेपा' बद्दल आपण वरचेवर कमी संवेदनशील बनत आहोत म्हणून भितीही वाटते. (उदाहरण जागेपणी बायकोसोबत दर आठवड्यातून केवळ ३६ तास (अर्धे महाघाईत) व्यतीत करणारे, महिन्याला ५०,००० रु वर कमावणारे (म्हणजे हातावर पोट नसलेले) लोक बरेच पाहतो. हा माझ्यामते खूप हस्तक्षेप आहे, पण मी लोकांची तक्रार पाहिली नाही. त्यांना हस्तक्षेपाबद्दल संवेदना नसावी.)

@ भावनिकता - माझी आई मला पोटचा गोळा म्हणते! 'त्यांचेही दोन प्रकार असतात गं' सांगू तिला? हा मुद्दा मलाच (पुरुष असून) भावनिक वाटत आहे. सरोगेट आईला नक्कीच वाटत असावा. आईची मी तक्रार करतो तेव्हा मला समजावताना घरच्यांनी, मित्रांनी 'अरे, नऊ महिने तिने तुला पोटात वाढवलं आहे' हा पहिला बॉल टाकतात. त्यावर आउट होऊनच पुढची मॅच खेळावी लागते. आता मी म्हणू शकतो का- 'I don't know if there was any consideration (in contractual sense) for that.'?

@बाजार - संशोधन प्रगतीसाठी आवश्यक आहे. पण त्याच्या फोफावण्याचा योग्य दर असावा. 'बाळ निरोगीपणे जन्मते, जगते, सरोगेट मातेला काही त्रास्/रोग होत नाही.' असे संशोधन झाले आहे. ते व्यापक नाही. प्रभाकरजींनी मांडलेले मुद्दे सुद्धा संशोधनाच्या 'एकूणतेसाठी' आवश्यक आहेत. उद्या आयुष्य ५०० वर्षे करणारे औषध संशोधिले गेले तर ते उद्याच बाजारात आणणार? संशोधन अशा प्रकारे बाजारात येऊच नये. आपल्या कितीतरी पिढ्या कितीतरी सुखांना मुकलेल्या आहेत. आताच पटकन माणसाला सर्वकष सुख देण्याची घाई नसावी. असे सुख देण्याच्या नादात अजून चार नवी दःखे, आठ नविन लोकांसाठी निर्माण होत नाहित ना याचा पहिल्यांदा अभ्यास हवा.

@ एक तात्विक प्रश्न--- मागच्या एका धाग्यात एका चित्रपटाच्या रिव्ह्यू मधे 'आपण म्हणजे नक्की कोण?' हा प्रश्न विचारात घेण्यात आला. मागच्या एका धाग्यात तत्त्व म्हणून वेश्याव्यवसाय योग्य असू शकतो असं मत अनेकांनी मांडलं. इथे अनेक जण सरोगसीच्या 'बाजाराचे' समर्थन करत आहेत. मी जी लिस्ट दिली आहे त्यात मी हाच संभ्रम उपस्थित केला आहे. हे सर्मथन कशाकशाला लागू आहे. @ डोळा भाड्याने देणे म्हणजे त्याचे बरेच पैसे मिळतील. डोळे काम झाले की परत मिळतील. काही इजा होणार नाही. अशा थोड्या वेळाच्या अंधाला ट्रेनींग, विशेष सुविधा मिळतील. तक्रार करायला जागा नाही. अर्थात कायदा असेल, संरक्षण असेल हे आलेच. @ मृत्यू विकणे म्हणजे तेच. समजा शरीराचे काही पॅरामीटर मोजून उर्वरित आयुष्य एका दिवसाच्या अचूकतेपर्यंत मोजता येईल. मग ही प्रमाणकांची लेवल शरीरात तशीच ठेऊन ज्या गोष्टी मरेपर्यंत देह चालवतात, त्या विकणे. असे करून माझे उरलेले २० वर्षे तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात मिळेल, इ आणि ठरलेल्या तारखेच्या २० वर्षे अगोदर मी मरेन. इथेही तसाच बाजार आणि कायदे. आजच्या घडीला यातलं काय काय नैतिक मानलं जावं?
@ प्रश्न - ज्यांचे ज्यांचे सरोगेट , इ बाजाराला (assuming all practices are fair, legal) समर्थन आहे, त्यांना एक प्रश्न आहे. कशाकशाचा बाजार नसावा? अगदी कंप्लीट फेअर प्रॅक्टीस असताना? म्हणजे अशी 'कर्तव्य' आणि 'अकर्तव्य/अनैतिक' यांची सीमा काय आणि मानवी मना-शरीराशी निगडीत उदाहरणे काय? आणि या सीमेला तात्विक आधार कोणता? उदंड पैसा मिळून, कायदा असून, नितिमान बाजार असून आपल्या शरीराचे काय करून घेणे आपल्याला आवडणार नाही? इतरांच्या शरीराला असं होऊ नये असं वाटेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुळात मुलं म्हणजेच बंगला, गाडीसारखं एक सुखी संसाराचं चित्रं पूर्ण करणारं 'पझेशन' झालेलं असताना गर्भाशय भाड्याने दिले-घेतले तर वावगे वाटून घेण्यात अर्थ नाही.
होमो इकॉनॉमिकससाठी असे सगळे लेख गैरलागू आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाइलाजाने असे म्हणावे लागते की 'ऐसी अक्षरे' वर आता विचारांचे नव्हे तर व्यक्तींचे दोन गट झाले आहेत. 'तुमच्या विचारांना विरोध, म्हणून तुम्हाला विरोध' हे मागे पडून आता 'तुला विरोध, म्हणून तू जे काय म्हणशील त्याला विरोध' अशा एका जुन्याच संस्कृतीचा कालपरत्वे 'ऐसी अक्षरे' वर उदय झाला आहे.

अशा प्रकारचा आरोप ,ऐ.अ.वर व्हावा हे वाचून विषाद वाटला. कुठल्याही मराठी संस्थळावर जी नांवे वाचताच, नक्की काहीतरी चांगले वाचायला मिळणार अशा नांवांमधे, राव्,नानावटी आणि अनेक आहेत. पण आपले मत स्पष्टपणे मांडणे आणि ते नेमक्या इतर काही जणांशी जुळणे, याला मी गटबाजी असे मानत नाही. प्रत्येक विषयागणिक ते जुळेलच असेही सांगता येणार नाही.
@प्रश्नः -सिनेमा-नाटकांमधे स्वप्ने, भावना आणि कधीकधी, शरीराचाही बाजार मांडला जातो. राजकारणात पैसा, मते आणि धार्मिक भावना यांचाही बाजारच चालतो. काही नियमित रक्तदात्यांनी रक्ताचाही बाजार मांडला असतो. तर, मागणी तसा पुरवठा, या न्यायाने भविष्यात कोणत्याही गोष्टीचा बाजार मांडला जाऊ शकतो. भावनेच्या आहारी न जाता , त्याचा वस्तुनिष्ठ विचार केला तर अशी निगेटिव्ह लिस्ट करण्याला काही अंत नाही. कारण नीतिमत्ता ही काळाप्रमाणे बदलत जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालाप्रमाणे नितीमत्ता बदलत जाते हे क्षणभर मान्य करुया.
आजच्या घडीला नितिमत्तेची रेषा काय असा प्रश्न होता. आजच्याच आपल्या नितीच्या कल्पना ठेऊन, मी सांगीतलेले चार संशोधने अवतरली तर, याच क्षेत्रात काय अनैतिक म्हणून सर्वमान्य होइल. मूळात मला आजच कशालाही लोक अनैतिक म्हणायला तयार नाहीत असं वाटत आहे. या धाग्याच्या विषयाच्या धर्तीवर आजच काय अनैतिक आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काळाप्रमाणे नितीमत्ता आपोआप बदलत नाही. एका संशोधनानुसार बाजारामुळे नितीमत्ता खालावण्यास उत्तेजन मिळते असे सूचित होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती.
धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0