छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : सावली
कॅमेर्यातून काढलेल्या चित्रांना "छायाचित्रण" म्हणतात. (काहीकाही लोक रंगीत चित्रांना "प्रकाशचित्रण" म्हणण्याचा आग्रह धरतात, ही बाब त्यांना क्षणभर माफ करूया.) चित्रामध्ये सावल्यांचे पार्श्वभूमी म्हणून महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगभगीत फ्लॅशमुळे सावल्या नाहिशा झाल्या, तर पुष्कळदा चित्र सपाट होते, त्याची त्रिमिती हरवते. द्विमिती चित्राची त्रिमिती हरवते, म्हणजे काय? चित्रातील वस्तू त्रिमिती असल्याचा हवाहवासा भास हरवतो. उलटपक्षी कधीकधी सावल्या नको तिथे येऊन रसभंग करतात... यावेळच्या पाक्षिक आव्हानात आपल्याला सावल्यांनाच विषय बनवायचे आहे. छोटी जिची बाहुली, मोठी माझी सावली.
येथे "सावली" शब्दाचा सामान्य अर्थ अपेक्षित आहे, तो विषय असून रूपकात्मक अर्थ साधत असेल, तर उत्तम.
------------
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २५ डिसेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २६ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.
----------
मागचा धागा: दृश्य आणि दृश्येतर कला यांची सांगड, आणि विजेते छायाचित्र.
Taxonomy upgrade extras
'सावली' विषय येऊन गेला आहे
ऋता यांनी हाच विषय आव्हान क्र. ४ मध्ये दिला होता.
तरी नव्या सावल्या पाहायला प्रत्यवाय नसावा.
----
काहीकाही लोक रंगीत चित्रांना "प्रकाशचित्रण" म्हणण्याचा आग्रह धरतात, ही बाब त्यांना क्षणभर माफ करूया.
.......माझ्या मते लोक 'छायाचित्रणा'ऐवजी 'प्रकाशचित्रण' हा शब्द वापरू लागले कारण झालेला तंत्रातील बदल.
डिजिटल् कॅमेरे येण्यापूर्वीच्या तंत्रात निगेटिव्ह् फिल्मवर सर्वत्र प्रकाश पडला तर ती निरुपयोगी होत असे (फिल्मवरचा सर्वात काळा भाग सर्वात उजळ आणि सर्वात उजळ भाग सर्वात काळा होई). त्यामुळे 'चित्र' टिपणे म्हणजे फिल्मवर छाया पकडणे हा अर्थ अभिप्रेत असावा. डिजिटल् कॅमेर्यात तसे नसल्याने आणि डिजिटल् सेन्सर्स् आपल्या डोळ्याला दिसते तसेच चित्र आपल्याला दाखवित असल्याने अर्थ बदलला असावा.
(की 'छाया'तले स्त्रैण वर्चस्व सहन न होऊन कुण्या व्यक्तीने 'प्रकाशा'तल्या पौरुषास पुढे आणले ? ;))
छाया घे निवारुनिया
काहीकाही लोक रंगीत चित्रांना "प्रकाशचित्रण" म्हणण्याचा आग्रह धरतात, ही बाब त्यांना क्षणभर माफ करूया.
Don't take 'umbra'ge :)
[Umbrage, Umbra (छाया, विशेषतः ग्रहणांतील), Umbria (इटलीचा एक प्रांत), Adumbrate (भविष्याची पुसट चाहूल/रेखाटन) हे सारे शब्द प्रोटो-इंडो-युरोपियन मधल्या 'andho' ह्या मुळापासून तयार झालेले शब्द असल्याचा (गैर)फायदा घेऊन :).]
खरे तर सर्वच बिंबचित्रण
सर्वच प्रकाश कॅमेर्यांत छायांचे थेट चित्रण होत नसून बिंबाचे (भिंगातील परावर्तनामुळे बनणार्या रियल इन्व्हर्टेड इमेजचे) चित्रण होत असते.
फिल्मवरती प्रकाशाचा आलेख करणारी रासायनिक प्रक्रिया "उलटी" होती, खरी. म्हणजे प्रकाश पडावा तिथे चांदीचा कण काळा होई. प्रकाश पडल्यावर पांढरा होणारा कण सापडला असता, तर मजा आली असती. :-) पण त्यामुळे दुसर्या पायरीत काळे-पांढरे उलट करावे लागते. तेही चांदीच्या कणांनीच, खरे.
सीसीडीमध्ये प्रकाशाचा आलेख सिलिकॉन-सेमिकंडक्टरच्या प्रभारां(चार्ज)मध्ये लिहिला जातो. त्या प्रभारांना रंग नसतो. त्यांनाही दुसरी पायरी लागते. आणि त्याचे संगणन आजकाल त्याच कॅमेरा यंत्रात केले जाते.
पण मग पोलरॉईड कॅमेर्यात दोन्ही पायर्या त्याच यंत्रात केल्या जात, आणि थेट "डोळ्यांना दिसल्यासारखे चित्र" बाहेर पडत असे. म्हणजे प्रकाश-आलेखाची पहिली पायरी ("उलटे" चांदीचे कण वा चार्ज) विचित्र असली म्हणून काही बाबतीत फरक पडत नाही. दोन्ही प्रकारांत भिंगातून केंद्रित झालेल्या बिंबाचे चित्र काही पायर्यांनंतर "डोळ्यांना दिसते तसे" आलेखित होते.
परंतु कॅमेर्याने-काढलेले-चित्र या सामान्य-कल्पनेकरिता शब्द हवा ना. लाकडाची बहुमजली वास्तू आणि विटांची बहुमजली वास्तू बांधण्याचे तंत्र वेगळे असले, तरी "इमारत" शब्दाकरिता भाषेत गरज आहेच.
माझ्या मते फिल्मने वा डिजिटल काढलेल्या चित्रांकरिता सामान्यनाव म्हणून "छायाचित्रण" ठीकच आहे.
-----
छायाचित्रण/प्रकाशचित्रण बाबतीत माझी कुरापत वेगळी आहे. मराठीत पुष्कळदा आपण तांत्रिक संज्ञांची व्याख्या त्यांच्या नावात ठासून भरायचा आग्रह धरतो.
पुष्कळदा तांत्रिक संज्ञा तयार होतात, तेव्हाचे ज्ञान पुढील संशोधनाने बदलते. अशा वेळी ती संज्ञा तशीच चालू ठेवली तरी सुटसुटीत असते. सुटसुटीतचे उदाहरण : "ऑक्सिजन"चा अर्थ "ऑक्सि+जन" ही व्याख्या = आम्लजनक नाही. तर "ऑक्सिजन" हे एकसंध चिन्ह "अमुक विवक्षित वायू, मूलद्रव्य..." या अर्थाकरिता योजलेले आहे. "ऑक्सिजन" या लिखित शब्दाच्या अंतर्गत व्याख्या नाही. ऑक्सिजन अणू किंवा रेणू किंवा सिलिंडरकरिता "ऑक्सिजन" हे सामान्य नाव चालते. ऑक्सिजन अणू वेगळा, रेणू वेगळा, अन्य रेणूंमधला घटक वेगळा, म्हणून वेगवेगळी नावे बोजड होतील.
कृष्णधवल कॅमेर्यातूनसुद्धा "छायांचे चित्रण" होत नाही. कोणीतरी चुकून ते नाव दिले, ते चिकटले. एकदा का चिकटले, तर "छायाचित्रण" हे नाव व्याख्या राहात नाही, एकसंध चिन्ह होते. चिकटलेल्या नावांचे संदर्भ हळूहळू (आपोआप) बदलणे सोपे.
स्पर्धेसाठी नाही
काळाची सावली
दाटीवाटीने वसलेल्या मुंबईतल्या जुन्या चाळी- इमारतींवर पडलेली एका उत्तुंग टॉवरची छाया मला जणु काळाची सावली भासली. 'मी तुमचे अस्तित्व लवकरच झाकोळुन टाकणार आहे, फक्त वेळ यायची आहे' असे जणु ती काळी छाया त्या पाच सात तपे तग धरुन उभ्या असलेल्या जुन्या इमारतींना सांगत असल्याचा भास झाला. (चित्रणस्थळ विठ्ठलभाई पटेल मार्ग, गोल देऊळ/ खेतवाडीच्या अलिकडे)
निकाल
मी उशीर केला आणि तेवढ्यात काही उत्तम चित्रे आली. विलंबाचे फळ गोड म्हणून चटक लागली, तर माझ्या सवयी आणखीच बिघडतील!
तिसरा क्रमांक : अमुक "मेघछाया"
दुसरा क्रमांक : बोका "कमानीची सावली (की सावल्यांची कमान ?)"
पहिला क्रमांक : ३_१४ विक्षिप्त अदिती "सेल्फी".
खरे तर ३_१४ विक्षिप्त अदितींचे "वाळूतल्या रेघोट्या" चित्र अधिक सफाईदार आहे. शिवाय त्यांचे स्वतःच्या सावलीचे चित्र "सेल्फी"पेक्षा पुष्कळ काही कथाकथन करू शकते, म्हणून शीर्षकाचे गुण कापायला हवे होते. कल्पकतेमुळे, योग्य अशा एकसुरी रंगसंगतीमुळे, झाडाच्या सावलीमुळे, सावलीतली व्यक्ती "सेल्फी" काढत नसून (अ) फोनवर बोलत आहे, वा (आ) गाल/हनुवटी हातात धरून विचारमग्न आहे अशी कथा कल्पिता येते म्हणून, वगैरे... हेच चित्र निवडले.
पुढील विषय ३_१४ विक्षिप्त अदितींनी निवडावा.
मला केव्हापासून हा विषय यावा,
मला केव्हापासून हा विषय यावा, असं वाटत होतं. धन्यवाद धनंजय!