Skip to main content

आनंद मरते नही...

"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने ..." हे गाणं आवडतं?
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....
कभी ये रुलाये...."
हे गाणं ऐकलत?
"कहीं दूर जब दिन ढल जाये...." ह्यातलं भावपूर्ण वातावरण भिडतं मनाला?
मग तुम्हाला "आनंद " माहिती नसणं कठीण आहे.
मुळात तुमच्यापैकी कुणी आनंद पाहिलेला नसणं हेच मुळी अवघड आहे. माझ्यासारखा एक ना एक आनंद प्रेमी तुमच्या परिचयाचा असेलच. त्यानं आग्रहानं आनंद दाखवला असेलच.
.
.
राजेश खन्नाचा "आनंद" माझा अत्यंत आवडता.
खरं तर त्यात राजेश खन्ना नाहिच. त्यात "आनंद"च आहे. राजेश खन्ना आणि आनंद हे पात्र वेगळं काढताच येणार नाही त्यात.
काहिंना आनंद फारच बडबडा, उथळ , अ-पोक्त वाटू शकतो. पण त्यानं अगदि प्रवाही ,free flow असणं हेच तर दाखवायचय.
पोक्त, विचारी ,कुटील अशा छटा तर इतरत्र प्रत्यक्ष आयुष्यात आणी पडद्यावर दिसतातच की.
असं मनमुराद "जगणं" दिलखुलास हसणं आणि क्वचित बालिश वाटेल अशा उचापत्या करणं हे काही जुळून येत नाही.
पण त्याहीपेक्षा महत्वाचं मल कुणी भावलं तर ते म्हणजे हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. वातावरण नावाचं हे पात्रं मला खूपच आवडलं.
हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही. अनेक सेल्फ्-हेल्प बुकात सांगितलेला संदेश चित्रपटाच्या गाभ्याशी आहे, पण प्रभावीपणं मांडलाय.
आपण खूप आशा अपेक्षा घेउन जगतो. खरं तर सतत जगायचा प्रयत्न करतो. खूप काही मिळावं म्हणून आपण धावपळ करतो, म्हणजे कसं की ते "खूप काही" मिळाल्यावर चार घटका निवांत जातील म्हणून ही धडपड करतो. यश, ध्येय, साध्य अशा संज्ञा आपण आपल्यापुरत्या तयार करतो; कित्येकदा इतरांना स्वतःसाठी तयार करु देतो. मग सगळी कामं वर्षानुवर्ष, दशकानुदश्कं ह्या संज्ञा मिळवण्यासाठी खर्ची घालतो. दरम्यान कित्येकदा आपल्याच रगाड्यात रमल्यानं इतर जगाशी संपर्क तुटतो. कधी एकटॅपणा जाणवायला लागतो. त्याऐवजी आसपास आपल्याला जीव लावू शकणार्‍या लोकांसाठी वेळ दिला तर खूप काही आपण मिळवू शकतो. ते "खूप काही" असलं तरी भौतिकदृष्ट्या ते "काहीही नाही". मानसिक पातळीवर म्हटलं तर खरच खूप काही आहे.
खूपदा खूप धडपड केल्यावर काहीतरी मिळाल्यावर "अरेच्चा जगायचं तर राहूनच गेलं की. आपली म्हणाविशी किती मंडळी आसपास आहेत" ही जाणीव माणसाला होते.
ही "आपली माणसं" काय भानगड असते, ते पहायचं तर हा आनंद पहावा.
.
आनंद ची भूमिका राजेश खन्ना नं धमाकेदार पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही.
अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा जॉनी वॉकर आहे. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी (रमेश देव), त्या डॉक्टरची पत्नीही(बहुतेक सीमा देव)
त्याला साथ देते. तिचा टुकिनं संसार सुरु आहे. रमेश देव चे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला.
.
.
आणि हो, बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. अमिताभ बच्चन नावाचा कुणीतरी एक त्याकाळातील नवोदित म्हणा स्ट्रगलर म्हणा एक कलाकार आहे.त्यानं ते काम "बरं" केलय म्हणतात.
.
.
चित्रपटात बह्रजरी, भव्य दिव्य काहिच नाही. रुढार्थानं म्हटला जाणारा संघर्ष नाही.(मालक्-कामगार, गरिब्-श्रीमंत, लव्ह स्टोरी व त्याबद्दल कुटुंबियांचे आक्षेप, "खानदान की इज्जत".)
म्हणजे चित्रपटातली बाबू मोशाय आणि आनंद, आनंद आणि नर्स वगैरे पात्र भांडतच नाहित असं नाही.
पण आपण हक्कानं घरच्यांशी भाम्डतो. घरच्यांचे रुसवे-फुगवे काढतो तितपतच. भांडलो, तरी माया कमी होत नाही, हे दिसतं.
.
.
हा पिक्चर इतका छान आहे की शब्दांत लिहिणं कठीण. जितकं लिहाल तितकं ते माप कमीच पडत जाणार. अचूक वर्णन शब्दांत अशक्यच.
ह्यापूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा.
खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद.

.
.

कोण कुठली नर्स, तिनं कशाला "क्लायंट"ची काळजी करावी आपल्या कामापलिकडे?
कारण तीसुद्धा "क्लायंट" नाही तर "पेशंट" म्हणून पाहते आनंद कडे.
नंतर तर पेशंट म्हणून नाही तर अजूनच कुणीतरी म्हणून पाहते. अजून कुणीतरी म्हणजे कोण?
तर ज्याच्याबद्दल भलतं सलतं ऐकलं तर आतडी पिळवतून यावीत असं कुणीतरी.
कोण कुठला तो जॉनी वॉकर्-मुरारीलाल? शब्दशः "रस्त्यात" भेटलेला एक कलंदर.
ही कलंदर माणसं एका भेटीतच एकमेकांना दाद देतात. शेवटी एकमेकांच्या जाण्यानं चटका लावून घेतात.
.
.
"माणूस" कसा असतो? बाय डिफॉल्ट तो स्वार्थी वगैरे असतो असं म्हणतात. पण त्याशिवायही तो काहीतरी असतो.
खाण्याचं आणि श्वास घेण्याचं मशीन ह्याशिवायही हा माणूस काहीतरी असतो.
तो एकमेकांसाठी काळजी करणारा, दुसर्‍याला आपलसं करुन घेणारा वगैरेही असतो.
माणसात आपसांत संघर्ष असतोच. पण जिव्हाळ्याची नातीही असतात. मायेचा ओलावा असतो.
मायेचा ओलावा हा शब्द फारच घिसापीटा झाला असला, तरी तोच इथे यथार्थ आहे,चपखल आहे.
त्याबद्दल दुसरा शब्दही बसणे कठीण.
तर माणूस असा तुमचा सख्खा जीवाचा असतो, तुमचा दोस्त असतो. ऐन लग्नाच्या वाढदिवशी तुमच्या लग्नापूर्वीच्या भानगडिंचा उल्लेख करत तुमची खेचणारा टग्याही असतो. ;)
आणि हो, विनाकरण लळा लावून नंतर मरणार नालायकही माणूस असतो.
नंतर जन्मभर असा आठवणींनी छळणारा असा तो असतो.
.
.
.
सरळ साधं घरगुती वातावरण. काहिसं उल्हासित करणारं. काहिसं ऊबदार.
तुमच्या आमच्या घरी कुटुंबासमवेत बसल्यावर एक जो निवांतपणा, समाधान मिळतं , तेच ते वातावरण.
घरात गप्पा टप्पा चालल्यात. कुणाचा तरी रिझल्ट चांगला लागलाय. आई कौतुकानं बोअल्तेय.
ताई डोक्याला मालिश करुन देतेय. तुम्ही बसल्याबसल्या काहीतरी खोबरं वगैरे खिसताय संध्याकाळी जो "खाऊ" बनणार आहे त्यात मदत म्हणून.
मस्त थट्टा मस्करी सुरु आहे. थोडक्यात तुमच्या कौटुंबिक आयुष्याच्या zenith वर तुम्ही आहात सर्वांना एकमेकांसाथी वेळ आणि आपुलकी आहे असं ते वातावरण.
.
.
.
.
१.सेन्टी मेन्टी झाल्याबद्दल सॉरी.
२.तांत्रिक बाजूंची मला जाण नाही. सॉरी. कथा वाचावी तसा मी चित्रपट/नाटक किंवा कुठलंही सादरीकरण पाहतो.
कधीमधी अधिक तपशील त्या कलेबद्दल शिकू शकलो, तर त्या नजरेतून लिहीन.

--मनोबा

राजेश घासकडवी Tue, 14/01/2014 - 14:19

भारून जाऊन केलेलं लिखाण भावलं. आनंद पाहून बरीच वर्षं झाली. पण त्यातलं 'तुझं फार आयुष्य शिल्लक नाही, अजून चाळीस-पन्नास वर्षांत मरून जाणार तू' अशा अर्थाचं वाक्य घर करून बसलंय.

सन्जोप राव Tue, 14/01/2014 - 17:39

In reply to by राजेश घासकडवी

अजून चाळीस-पन्नास वर्षांत मरून जाणार तू' अशा अर्थाचं वाक्य घर करून बसलंय.
सत्तर. सत्तर.
'आनंद' कंठस्थ असल्याने अशा बारीक गोष्टीही जाणवतात.

मन Tue, 14/01/2014 - 14:49

In reply to by मेघना भुस्कुटे

हो. मलाही तोच आवडतो.शेवटच्या सीनमधला अमिताभही आवडतो, आणि सुरुवातीचा किंचित तापट "ल्यूम्फसकोमा ऑफ द इंटेस्टाइन" च्या प्रसंगातला अमिताभही आवडतो.
आणि हो, ह्या दोन सीन दरम्यानचा अमिताभही आवडतोच.
(अभिमान, आनंद,नमक हराम हे काही चित्रपट सोडले तर नेहमीचा टाइपकास्ट अँग्री यंग मॅन कंटाळवाणा वाटतो.
लावारिस्,कालिया वगैरे वगरिए अमिताभपट असूनही अजिबात आवडत नाहित.)

भडकमकर मास्तर Tue, 14/01/2014 - 15:18

शिनुमा चार पाच वेळाच पाहिलाय पण क्याशेट शेकड्यांदा ऐकलीय ...

"... दिन्नभी पानीमें हो रात्किनारेकेकरीब
जिस्म जब खत्म हो ...... बाबूमोशा य.. " इत्यादी इत्यादी

चेतन सुभाष गुगळे Tue, 14/01/2014 - 16:06

आनंद मध्ये अत्यल्प दर्शन देऊन देखील विशेष छाप सोडून जाणारे हे तिघे:-

  1. नायिका रेणूची आई - दुर्गा खोटे
  2. पहिलवान - दारा सिंह
  3. मौनी साधू - अभिनेत्याचे नांव ठाऊक नाही

आणि नायिकेची भूमिका असूनही विशेष प्रभावी न ठरलेली रेणू - सुमिता संन्याल

ॲमी Tue, 14/01/2014 - 16:27

गाणी छानच आहेत आनंद मधली. चित्रपट पाहिला नाही. सध्यातरी पहायचा विचारही नाही. खन्ना, बच्चन दोघे इरिटेट करतात :-D
कल हो ना हो पाहिलाय :-P

मन Tue, 14/01/2014 - 16:45

In reply to by ॲमी

भौकना सुना हमने किसी का कल |
लोग कहते रहते है वो दहाड भी शायद यही होगी |
.
.
कल हो ना हो व आनंदची अशी तुलना करु नये ही अस्मितैंना कळकळीची विनंती.

बॅटमॅन Tue, 14/01/2014 - 16:49

In reply to by मन

हा ना राव. त्यांच्या आवडीनिवडी हटके असल्या म्हणून काय झालं, त्या दोन्ही पिच्चरची तुलना???? हे म्हणजे इतिहासाचार्य राजवाडे अन पु ना ओक यांची तुलना करण्यासारखं आहे =))

मेघना भुस्कुटे Tue, 14/01/2014 - 16:50

In reply to by ॲमी

'कहोनहो'मधला शाहरुख नाही का गं इरिटेट करत? नि ती हडळ जया नि ती माठ चोप्रा नि तेव्हा तरी चेहरा अज्याबात न हलवणारा भंजाळलेला सैफ अली?

'आनंद'मधे निदान सहकलाकार तरी एकाचढ एक आहेत. गाणी खल्लास सुंदर. ऋषिकेश मुखर्जींचे भावुक सिनेमे एका वयानंतर माझ्या डॉक्यात जायला लागले ते सोडा. पण तरी 'कहोनहो' नि 'आनंद'? नको!

ॲमी Tue, 14/01/2014 - 17:08

In reply to by मेघना भुस्कुटे

हा हा हा मस्त प्रतिसाद. कहोनहो पण इरिटेटच झालेला. पण त्यातली गाणी बरी होती. मी तुलना वगैरे नै केली आनंद आणि कहोनाहो ची. फक्त सांगितल की मी तो पाहिलाय.

चांदणेसंदीप Thu, 16/01/2014 - 11:53

In reply to by ॲमी

चित्रपट पाहीला नाही! पाहायचा विचारही नाही! असू द्या...ज्याच्या त्याच्या आवडी-निवडीचा भाग आहे.

एवढच सुचवू इच्छितो...गाण्यांइतकाच चित्रपटही फार सुंदर आहे.

मन Wed, 15/01/2014 - 15:17

सर्व वाचक्-प्रतिसादकहो,
मनःपूर्वक आभार.
मिसळपाववर आनंदबद्दल फारच चपखल अशी एक प्रतिक्रिया आली आहे. ती इथे डकवणार होतो; पण मिपा अ‍ॅक्सेस नाही.
@चेतन सुभाष गुगुळे :- यस, पहिलवान - दारा सिंह हे पात्र कमी लांबीचं पण उठून दिसणारं आहेच.
.
.
.
सर्वांचे पुन्हा आभार.
जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.