लिहितं राहण्याची खोड !

वाचन ऐन बहरात असताना मन:पूर्वक सारे काही वाचत होते. `अंतर्नाद', `अनुभव' अशा मासिकांची सभासद होते. दरमहा नियमितपणे वाचन सुरू असे. अजूनही काही मासिके येत असतात. पण वाचनातील नियमितता आता उरलेली नाही.
मात्र तेव्हा एकीकडे काही टिपणे ठेवत असे. ती पुन्हा आता वाचताना जे वाटले, ते इथे शेअर करते आहे.
ह्यात नवे काही नाही. माझ्याप्रमाणेच हा अनुभव अनेकांना असेल,
तरीपण-----

‘लिहितं राहण्याची खोड, लिहिल्याशिवाय पूर्ण होणार नाही.....’

०५.०९.२००७
आत्मचरित्रांविषयी एक गंमतीदार गोष्ट ‘अंतर्नाद’ च्या एका अंकात वाचली. ‘वाचणार्‍याचे लिहिणार्‍यास’ ह्या लेखात श्री. अवधूत परळकर लिहितात,
"लेखकाच्या जगण्यातले काही तुकडे कादंबरीत सापडले तर वाचकांनी ते खोटे असल्याचं मानावं कादंबरीकारांना वाटतं; तर कल्पनाशक्ती पणाला लावून आत्मचारित्रातील आपण निर्मिलेले खोटे प्रसंग लोकांनी खरे मानावेत, असा आत्मचरित्रकारांचा आग्रह असतो." त्याचं कारण ते लिहितात,
"लिहिणारी माणसं शब्दांचा वापर स्वत:चे विचार आणि भावभावना लपविण्यासाठी करतात आणि स्वत:ला शब्दाआड लपवू पाहतात. त्यासाठी लेखन कौशल्य पणाला लावतात."

आता सहा वर्षांनंतर नव्याने हे वाचताना जाणवते, की प्रत्येक लेखक, ललित लिहिणारा असो वा आत्मकथन करत असो, त्याच्या मनातील विचार-भावना शब्दांत जशीच्या तशी उतरवता येणे तसे कठीण आहे. वाचक ते वाचत असताना त्याच्याही मनात काहीतरी घडत असते.
लेखकाच्या मनातील भावांमध्ये वाचकाच्या मनातील समजुतींची होत राहणार्‍या मिसळणीमुळे कोणतेही लिखाण चांगले-वाईट, चूक-बरोबर असे न ठरता व्यक्तीसापेक्ष ठरते.
लिहिणारा लिहित राहतो, वाचणारा वाचत राहतो. व्यक्त केल्याचे समाधान, वाचून आकळल्याचे समाधान....

०१.०६.२०१०
मी नक्की का वाचते, त्यातून मला काय मिळतं असे प्रश्न अधूनमधून मनात येतच असतात. त्यांचं नेमकं उत्तर अगदी अवचितपणे नुकतंच मला मिळालं.
‘निवडक मराठी समीक्षा’ (प्रकाशक- साहित्य अकादमी) ह्या पुस्तकातील पु. शि. रेगे ह्यांचा ‘साहित्य आणि जीवननिष्ठा’ हा लेख वाचत होते. जीवन म्हणजे काय हे सांगताना, साहित्याबद्दल ते म्हणतात,
"जे सहित आहे ते साहित्य. साहित्य हे हितकर असावयाला पाहिजे. जीवनात जे शिव आणि सुंदर आहे त्याची त्याने प्रतीती घडवली पाहिजे. जीवन समृध्द केले पाहिजे. अटीतटीच्या प्रसंगी अचूक मार्गदर्शन करून जीवन वाढीला लागले पाहिजे."

हे वाचलं, आणि पुढे लेख पूर्ण न वाचता मी तिथेच थबकले.
मी का वाचते?
साहित्य माझा आरसा झालं. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने, मुळातून बघण्याच्या माझ्या स्वभावाला चांगलंच खतपाणी मिळालं. कोणताही चष्मा न वापरता फक्त उघड्या डोळ्यांनी सर्वत्र बघण्याची सवय लागली. स्वत:कडे तिर्‍हाईताच्या नजरेने सलग बघताना, एखाद्या लेखकाच्या लिखाणाकडेही समग्रतेने बघण्याची शोधक नजर तयार होत राहिली. ‘जीवन वाढीला लागलं.’ अर्थात, हे काही इतकं सहजासहजी झालं नाही. बरीच मानसिक पडझड झाली. समजुतींचे इमले कोसळत-चढत राहिले.

आता २०१३ साली वाचन पूर्वीइतके नियमित राहिलेले नसले तरीही असे वाटतेच,
... वाचन हे एक निमित्त आहे, जीवन वाढीला लागण्याची अव्याहतपणे चालू असणारी ही एक प्रक्रिया आहे.
जिला सुरूवात आहे पण शेवट नाही...

--- चित्रा ... १६.११.२०१३
Like

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

मुक्तक आवडलं.. अजूनही अशी स्वगतं वाचायला आवडतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

‘लिहितं राहण्याची खोड, लिहिल्याशिवाय पूर्ण होणार नाही.....’

लिहीणं = मूड स्टॅबिलायझर फॉर मी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0