Skip to main content

मै लडकी का दीवाना - अर्थातच एक स्त्रीवादी समीक्षा

आपल्याकडच्या उच्चभ्रूंमध्ये हिंदी चित्रपट आणि त्यातल्या सगळ्याच गोष्टींना नावं ठेवण्याची एक फॅशन आहे. या पी-क्रिटकांना ('पी-सेक'च्या चालीवरच लिहीताना, क्रिटीक या शब्दाचं मराठीकरण करताना त्याचा कीटक या शब्दाशी असणारं शब्दसाधर्म्य विसरू नये.) बाकी काही नावं ठेवण्यासारखं मिळालं नाही की चित्रपटातल्या जुनाट, सनातनी मूल्यांवर हाणण्यात मजा येते. एकीकडे "घाऊक तिरस्कार करू नये" वगैरे उपदेशामृत पाजायचं आणि वर पुन्हा हिंदी चित्रपटांचा एकेक करून घाऊक तिरस्कार करायचा, ही या उच्चभ्रूंची पारंपरिक रीत. एकतर्फी विचार करून, प्रेक्षकांवर एकतर्फी दोष ढकलणाऱ्या सडक्या समीक्षक जमातीला हिंदी सिनेमाचं महत्त्व समजवणं ही आजच्या काळाची एक महत्त्वाची गरज बनलेली आहे. (अच्छे दिन आपोआप येणार नाहीत, त्यासाठी आपल्यातल्या प्रत्येक देशप्रेमी (=मोदीप्रेमी, आठवा शुभा मुद्गल आणि कोणीसा 'येणारनााय') व्यक्तीला मेहेनत करावी लागणार आहे.) कोणत्याही साहित्य, कलाकृतीची वेगवेगळ्या पद्धतींनी समीक्षा करता येते. आमची (=आम्हाला बहाल केली गेलेली) खासियत स्त्रीवादाची असल्यामुळे आम्ही आज आम्हाला आवडलेल्या एक कलाकृतीची स्त्रीवादी समीक्षा करणार आहोत.

सर्वप्रथम, 'मै लडकी का दीवाना' हे कोणत्याही इतर उच्च कलाकृतीसारखंच 'विधान' आहे. कोणतीही कलाकृती ही चिन्हांचाच खेळ असते असं एक फसवं विधान या संदर्भात करता येईल. पण दृष्य माध्यमातून सादर केलेली कलाकृती ही चिन्हांपेक्षाही व्यापक रूप घेऊन एक शाब्दिक आकारही घेते. म्हणजे अनेक मितींमध्ये स्थान असणारं एखादं ओरिगामी-प्रॉडक्ट सोडवून शेवटी त्याचा द्विमितीय कागद निर्माण करता येतो आणि सैद्धांतिक पातळीवर, कागदाचे तुकडे किंवा घड्या करून शेवटी द्विमितीय कागद एकमितीय वस्तूत रूपांतरीत करता येतो, तसं. या गाण्याच्या बाबतीत म्हणायचं असेल तर संगीत, नृत्य, कृती, चेहऱ्यावरचे भाव या सगळ्या गोष्टींच्या घड्या करून ते शब्द या एकाच मितीत बसवता येईल. त्यामुळे या गाण्याकडे पाहताना यातले शब्द महत्त्वाचे आणि बाकीच्या गोष्टींचा अन्वय त्या दिशेने लावणं महत्त्वाचं आहे.

त्यावर असा आक्षेप घेता येतो की फक्त शब्द स्त्रीवादी असतील म्हणून दृक्-श्वाव्य कलाकृती स्त्रीवादी होते का? याच्या उत्तराकडे आपण नंतर येऊच, पण त्या आधी शब्दांमधून बाकी कलाकृती समजून घेऊ या.

गाण्याची सुरूवातच ऐका; सुरूवातीला स्त्रीच्या आवाजातले संगीताचे तुकडे झाल्यावर स्त्रियांचं वर्णन करणारी आठ विशेषणं वापरली आहेत. शिवाय ही विशेषणं वापरताना एकेका स्त्रीबद्दल बोलतो आहोत अशी या विशेषणांची रूपं आहेत. समस्त स्त्रीवर्ग असा, अशा प्रकारचं घाऊक (समीक्षकी!) सरसकटीकरण या कोरसमध्ये आणि संपूर्ण गाण्यातच नाही. "ओ जानेजा, ओ गुलबदन..." अशा प्रकारचं एकारलेपण शब्दांमध्ये लिहील्याचा आरोप या बोलांवर लावता येईल; पण हाच तर व्यक्तिवादाचा यथायोग्य सन्मान आहे. शिवाय त्यात "मै भी यहां, तू भी यही" असं म्हणत स्त्री-पुुरुष दोघेही समान पातळीवर आहेत याचाच उच्चार उच्चरवात केलेला आहे.

यापुढे हीरो अक्षय कुमारची एंट्री होते. त्याचे शब्द आहेत, "मै लडकी का दीवाना" आणि आजूबाजूला अनेक स्त्रिया तिथे दिसतात. यावरून हे स्पष्ट आहे की हा हीरो, नेहेमीच्या ठोकळेबाज womaniser गुलछबूंपमाणे गुलछर्रे उडवणारा नाही तर एकपत्नीव्रत किंवा monogamy मानणारा आहे. स्त्रीचं शोषण करणाऱ्या सामाजिकतेला नाकारणाऱ्या पहिल्या, शीर्षकओळीतून दाखवून पुढे कवी लिहीतो, "लडकी ना होती, कुछ भी ना होता। तू भी ना होती, मै भी ना होता।" याचा अर्थ स्वयंस्पष्टच आहे. स्त्रीशिवाय काहीही शक्य झालं नसतं. "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते", असं म्हणणाऱ्यांनी स्त्रीला मागेच ठेवलेलं आहे. पण स्त्रीशिवाय काहीच होणं शक्य नाही असं म्हणणारे कवी देव कोहली हे हिंदी चित्रपटांसाठी लिहीणाऱ्या गीतकारांमधले आद्य स्त्रीवादी आहेत हे कसं नाकारता येईल?

पुढे कडव्यामध्ये कवी वेगवेगळ्या देशांतल्या स्त्रियांची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत असं सांगतो. अर्थातच हे रूपक असल्यामुळे आपण याचा शब्दशः अर्थ घेऊ नये. किती चातुर्याने कवी आपल्याला स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या असतात हे सांगतो. पुरुषांकडून स्त्रियांना एकचएक अपेक्षा नसते, कोणाला काय आवडेल याचे साचे बनवता येत नाहीत हे वैज्ञानिक सत्य कवीकडून किती सहजरित्या प्रकट होतं! यापेक्षा स्त्रियांचं चांगलं वर्णन आणखी कोणालाही करणं शक्य नाही ... असं वाटेल. पण दुसऱ्या कडव्यात कवी त्याही पुढे जातो. गोऱ्या रंगाचं भयंकर फेटिश असणाऱ्या आपल्या देशात आणि विशेषतः बॉलिवूडमध्ये, सावळी स्त्रीसुद्धा सुंदर दिसते, असा दावा करणारा हा कवी बंडाचं निशाणच फडकवतो. आणि फक्त स्वभाव आणि सौंदर्य यातच स्त्रियांना मर्यादित न ठेवता, स्त्रिया अगदी चंद्रावर जाण्याइतक्या हुशार, कर्तबगार आणि धाडसी आहेत याचाही प्रत्यय देणारी ओळ दुसऱ्या कडव्यात येते.

आता यापुढे असा आक्षेप घेता येतोच की तुम्ही स्त्रीवादी तुम्हाला सोयीचं असेल तेवढंच पाहता. आणि तो घेणं काही अंशी योग्यच आहे. गाण्याची समीक्षा करताना फक्त शब्दांमध्येच अडकून राहू नये. गाणं, नृृत्य ही दृश्यकला आहे, आणि त्याची समीक्षा सगळ्या अंगांनी झालीच पाहिजे.

तर गाण्यात सुरूवातीला दिसतात स्त्रिया. कूल पॉईंट क्र. १. आधी सगळ्या स्त्रिया त्यांची जॅकेट्स फेकून देतात आणि मग अक्षय कुमार हा माचोमॅन त्यांची नक्कल करतो. कूपॉक्र २. तेहतीसाव्या सेकंदाला पहा, या स्त्रियांच्या चेहेऱ्यावरचे भाव सिंकमध्ये नाहीत. थोडक्यात जे पुढे शब्दांत वर्णन केलेलं आहे - सगळ्या स्त्रिया एकाच साच्यातून निघत नाहीत - त्याचंच चित्रीकरण या गाण्यातही आहे. कूपॉक्र ३.

या सगळ्या समानतेचा परिपोष होतो ते दृष्य मात्र गाण्यात थोडं उशीरा येतं. हा हृद्य भाग सगळ्यांनी मूळ गाण्यातच पहावा. आत्तापर्यंत आपण अक्षय कुमार हा हीरो कसा समानतावादी आहे हे पाहिलं. अशा पुरुषाला स्त्रिया उचलूनच धरतात, हे किती कलात्मकतेने मांडलेलं आहे यासाठी मूळ गाणंच पहावं, १:४३-१:४५ मध्ये. आत्तापर्यंत स्त्रिया damsel in distress होत्या. पण आता तसं नाही. स्त्रिया स्वतंत्र झाल्या आहेत आणि या अशा मुक्त स्त्रियाही स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे वागत आपली आवडनिवड, मतं कृतीतून व्यक्त करतात.

लिंगसंदर्भात असणाऱ्या सगळ्या स्टीरीओटाईप्सची उलटपालट करणाऱ्या गाण्याला आलेली प्रतिक्रिया देणाऱ्या यूट्यूब सदस्याचं नाव - MrAwsomeness45 आणि प्रतिक्रिया किती बोलकी आहे पहा - "the songs were good as well especially this song"

आपापल्या वकुबानुसार अन्वय सातत्याने लावलाच जातो, नाही का?

समीक्षेचा विषय निवडा

अस्वल Wed, 11/06/2014 - 01:16

सुंदर समीक्षा.
समीक्षेविना गाण्याचा पोत काहीसा जाडाभरडा वाटत होता, आता त्याच्या तलमतेचा प्रत्यय आला.
ह्या गाण्यातील विचक्षण सौंदर्यस्थळे लक्षातच आली नव्हती. ती वेचून निवडून दाखवल्याबद्दल धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/06/2014 - 02:13

In reply to by ऋता

हो, ते राहिलंच नाही का! तूच मदत कर आता मला. आणि सगळ्या जगाला आपण ओरडून सांगू, स्त्री ही स्त्रीची शत्रू नसते.

भडकमकर मास्तर Wed, 11/06/2014 - 08:28

सुंदर गाण्याची थोर ओळख..
अक्षयमाचोदीव्वाना अक्षयमाचोदीव्वाना अक्षयमाचोदीव्वाना अक्षयमाचोदीव्वाना अक्षयमाचोदीव्वाना
असा एक मंत्र आठवला. ;)

बॅटमॅन Wed, 11/06/2014 - 11:53

In reply to by भडकमकर मास्तर

समीक्षा जबरीच !!!

तदुपरि, वरील मंत्रात शब्दांचा नक्की स्प्लिट कुठेय याबद्दलही काही रोचक विचार डोकावले हो =))

डर्टी माइंड तेच्यायला =))

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/06/2014 - 17:44

In reply to by भडकमकर मास्तर

"अक्षयमाचोदीव्वाना" हा मंत्र दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी शेवटी तयार झालेला आहे. त्या काळात एका महान भारतीय अध्यात्मिक गुरूंनी, गुप्त राहून, हा मंत्र मित्र राष्ट्रांना गांधीजींकरवी पाठवला होता. या मंत्राच्या जोरामुळेच दुसऱ्या महायुद्धाचा निकाल हिटलर-मुसोलिनी-हिरोहितो या अक्षाच्या विरुद्ध लागला. पहा हा मंत्र कसा आहे ते -

अक्ष-यमाचो-दिव्वाना

अक्ष देशांना यमाचं पिसं लागावं म्हणून या मंत्राचा जप केला गेला आणि हिटलर-मुसोलिनी यांचं काय झालं हे सर्वज्ञात आहे. यामागचा इतिहास मास्तरांनी पुढे आणल्यानंतर आता भारतात 'अच्छे दिन' जरूर येणार.

ऋषिकेश Wed, 11/06/2014 - 09:42

जगातील सर्व संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीच कशी श्रेष्ठ आहे याचे उदाहरण म्हणून या गाण्याकडे बघता यावं हे तुमच्या समीक्षेनंतर जाणवलं. इतर सर्व माध्यमांत कसल्याशा बेख्डेल नी काय काय टेस्ट्स घेऊनही उलुशे चित्रपट बहेर येत असताना भारतात मात्र देवी रूपी स्त्री च्या वैविध्याला बॉलिवूडच्या गाण्यात इतके सहजपणे टिपले आहे याची जाणीव होऊन भडभडून आले.

खरं तर देवीच्या आरती ऐवजी हेच गाणे म्हटले पाहिजे असे या समीक्षेनंतर वाटू लागले आहे, हेच या समीक्षेचे यश नाही काय?

मेघना भुस्कुटे Wed, 11/06/2014 - 11:59

In reply to by ऋषिकेश

...याची जाणीव होऊन भडभडून आले...

कशाकशाची जाणीव होऊन काय सांगू... मलाही भडभडून आले! एक शिरसाष्टांग पोचवून घ्यावा.

तिरशिंगराव Wed, 11/06/2014 - 10:06

अक्षयकुमार जरी लडकी म्हणत असला तरी त्याला 'मैं लडकियोंका' असेच म्हणायचे असावे अशा त्याच्या अ‍ॅक्शन्स आहेत. फक्त ते मीटरमधे बसत नसल्याने गीतकाराने सर्व मुलींचा लडकी असा सामान्य नामासारखा उल्लेख केला आहे. सगळ्या 'लडक्यांना' तो हवा आहे आणि त्यालाही त्या सर्वच हव्या आहेत. पण एकाचवेळेस ते शक्य नसल्याने त्या मुलींच्या कामाग्नीवर उतारा म्हणून त्याने आगीचा बंब आणला आहे. पण त्यातही कुठल्याच लडकीला नाराज करायचे नसल्याने डायरेक्टरने कलात्मकरीत्या अक्षयकुमारच्या हातातल्या होजच्या पाण्याचा फोर्स दाखवून अक्षयकुमारचा कामक्रीडेतला फोर्स दाखवून दिला आहे.
त्यामुळे हे गाणे स्त्रीवादाला अनुकूल नसून मॅचो पुरुषांचे स्त्रीवरील वर्चस्व दाखवणारेच आहे असे आमचे मत झाले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/06/2014 - 17:47

हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो चित्रपट फारच फारएण्डी आहे. त्याने सवडीनुसार हा ही चित्रपट मनावर घ्यावा. हा यूट्यूबचा दुवा.

धनुष Wed, 11/06/2014 - 19:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदुस्थानी लडकी कि बिंदिया में सारा इंडिया… वाह वाह! इति चिन्त्यं!

अक्षयच्या सपूत (१९९६) ला आधीच anticipate करून तब्बू ने त्याला उत्तर दिलय (१९९४) - https://www.youtube.com/watch?v=9VFYkdtMf00

लडके आजके लडके
अकल से खाली
जेबसे कडके

अश्या आशयघन मुखड्या नंतर एका ठिकाणी तब्बू ची जोडीदारीण गुलशन ग्रोवर, जो सगळे आयुष्य लंडन मध्ये घालवून आलाय आणि केवळ ह्मारे लंडन मे आईसा नाई होतां एवढे एकच वाक्य हिंदीत बोलतो, त्याला मध्येच मराठीत सांगते -
तू लफडा केला,
तू दंगल केली,
तुझ्या आईला…
तुझ्या आईला मी सांगते! (मधली … अन्नू मलिकी जिनिअस चा एक छोटासा नमुना)

सगळा सिनेमाच आवर्जून पाहावा असा आहे. ह्याच मुख्य वैशिष्ठ्य असं कि ह्यात अजय देवगण (ज्याच्या शरीराचे काळा चष्मा आणि बाईक हे जैविक विस्तार आहेत) आणि सुरेश ओबेरॉय (ज्याच शरीर एका कुबडीचा जैविक विस्तार आहे) हे दोघ ड्यानी चा फोटो घेऊन त्याच्या शोधात रस्तोरस्ती फिरत असतात. आता ह्यात एक बिन महत्वाची बाब ही की तो त्या शहराचा महापौर असतो. असो. एवढ्या रसभंगा बद्दल दिलगीर आहे. सिनेमाचे 'फारएण्डी' जाहीर वाचन करण्याचा इरादा आहे. इन्शाअल्लाह!

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/06/2014 - 22:14

In reply to by धनुष

ह्याच मुख्य वैशिष्ठ्य असं कि ह्यात अजय देवगण (ज्याच्या शरीराचे काळा चष्मा आणि बाईक हे जैविक विस्तार आहेत) आणि सुरेश ओबेरॉय (ज्याच शरीर एका कुबडीचा जैविक विस्तार आहे) ..

'जैविक विस्तार' हा कल्पनाविस्तार निव्वळ थोर आहे.

राजेश घासकडवी Thu, 12/06/2014 - 22:09

या लेखाकडे दुर्लक्ष करून मारायचं ठरवलं होतं. पण इतके प्रतिसाद मिळाल्यावर लक्षात आलं की आपण जर मत मांडलं नाही तर हे स्यूडोसेक्युलर स्त्रीवादी डावे समाजवादी विचारवंत आत्ता माजले आहेत त्यापेक्षा माजतील आणि मग कोर्टांना पुस्तकं फाडण्याचे आदेश देणं आणि पोलिसांना ते बजावणं याशिवाय दुसरा काही उद्योगच राहणार नाही.

लेखिकेने केवळ एकच एक स्त्रीवादी पुस्तक वाचून त्या सीमॉन द बुव्वाच्या स्त्रीवादी दाढीमिशा सर्वत्र दाखवत सुटलेली आहे हे उघड आहे. जे दिसेल त्यात या बयेला स्त्रीवाद दिसतो. त्यामुळे अशी एकवादी ढापणं लावणाऱ्या तथाकथित विचारवंतांच्या चिकित्सेचं जे होतं तेच झालेलं आहे - समीक्षेच्या नावाखाली निखालस चुकीचं आणि त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अत्यंत नीरस लिखाण आलेलं आहे. ते इतकं नीरस आहे की कागदावर छापून गाईंसमोर टाकलं तर गाईही उपाशी राहतील पण या कडब्याला तोंड लावणार नाहीत.

या लिखाणातल्या चुका काढून दाखवायच्या झाल्या तर त्यावर एक महाप्रचंड ग्रंथच होऊ शकेल. पण मला तरी त्या दाखवून वाचकांच्या सुजाणतेचा अपमान करायचा नाहीये. लेख वाचून झाला तितका पुरे असावा.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 13/06/2014 - 08:00

In reply to by राजेश घासकडवी

साप साप म्हणत दोरी बडवण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद आहे. स्वतःच स्वतःच्या काही कल्पना करून घ्यायच्या आणि लोकांना नावं ठेवायची ही मराठी आंजावरची पद्धत इथेही सुरू आहे हे पाहून भडभडून का कायसंसं आलं. स्वतःला गुर्जी म्हणवणारा हा विद्रट सदस्य आरोप करताना किती नीच पातळीला जाईल याचा नेम नाही. आणि असं करताना थोर लेखिका सिमोन द बोव्हार ही स्त्री होती, तिला दाढी-मिशा नव्हत्या, ती तिच्या उतारवयातही सुंदर दिसत असे, तरुण वयात ती शिक्षिका होती तेव्हा बाकीच्या खडूस म्हाताऱ्या शिक्षिका स्वतःची धड काळजी घेणाऱ्यातल्या नसल्यामुळे इतर विद्यार्थिनींना ती खूप आकर्षक वाटत असे वगैरे तपशील वाचण्याची काळजी या सदस्यांनी घेतलेली नाही. चालायचंच, सुमारसद्दी चालते ती किती खालच्या थराला जाते हे आम्हांस माहित नाही असं नाही.

टीका करताना यांनी व्यक्तिगत पातळी गाठल्यामुळे, अर्थातच मिरच्या झोंबल्याचं आम्हांस समजलं आहे. याचा अर्थ आम्ही योग्य दिशेने प्रगती करत आहोत. "उस के दुश्मन बहोत है, जरूर कोई महान विचारवंत स्त्रीवादी होगी।" या थोर चित्रपटीय संवादाची आठवण इथे होणं अपरिहार्य आहे. पण आपला शाब्दिक हिंसेचा व्यक्तिगत अजेंडा पुढे ढकलताना, पवित्र हिंदू धर्माचा अपमान करताना गायींचं नाव काढून हा स्त्रियांना अन्य मातांविरोधात, साक्षात गोमातेविरोधात भडकवण्याचा हा डाव आहे, हे सगळ्यांनी, विशेषतः ऋता आणि मेघनाने, लक्षात घ्यावं.

घासकडवी, खरोखरच तुम्ही काही वाचन, अभ्यास, विचार वगैरे केला असेल तर चुका काढणारा लेख लिहा. नाहीतर ही फुकट्टची ट्यँवट्यँव दुसरीकडे जाऊन करा. इथे तुमच्यासारख्या विचारवंतद्वेष्ट्या आणि व्यक्तिगत सूडाच्या फुलीफुली अजेंड्याने भरलेल्या प्रतिसादांना कोणीही धूप घालणार नाही. झालंच तर हे गाणं ज्या 'सपूत' नामक सिनेमातलं आहे ते पहा. द्वेषाने द्वेषच वाढतो आणि प्रेमामुळे प्रेम वाढतं, त्यातूनच माणसांची आयुष्य सुखी होतात, असा संदेश देणारा हा थोर चित्रपट तुम्हाला झेपलाच तर काहीतरी चांगला बदल घडू शकेल.

गब्बर सिंग Fri, 13/06/2014 - 08:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि असं करताना थोर लेखिका सिमोन द बोव्हार ही स्त्री होती, तिला दाढी-मिशा नव्हत्या, ती तिच्या उतारवयातही सुंदर दिसत असे, तरुण वयात ती शिक्षिका होती

एकदम रापचिक होती.

धनंजय Sat, 14/06/2014 - 02:06

In reply to by गब्बर सिंग

शिक्सा/शिक्सिका होती तर. (असे क्लोद लेवि-स्त्रोस याच्या कुटुंबातले लोक म्हणत असणार. अथवा झाँपोल सात्रचे सेमीट मित्रमंडळ.)

राजेश घासकडवी Sat, 14/06/2014 - 07:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सीमोन द बुव्वा हा बुवा नसून बया होती याबाबत मला काहीएक शंका नाही. च्यायला नाहीतर 'स्त्री ही जन्मत नसून घडवली जाते' सारखी आचरट, जीवशास्त्राला फाट्यावर मारणारी विधानं कोण करणार आणखीन? डार्विन तिच्या आधी बरीच वर्षं होऊन गेला, त्याने वेगवेगळ्या प्राण्यांच्या मेट सिलेक्शनविषयी लिहिलं तरी हिला पत्ताच नाही. आणि हो, दाढीमिशांचा उल्लेख इतक्या लिटरली घेणं म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणं होतं की खरोखरच बथ्थड डोक्यात काही न शिरणं होतं कोण जाणे! तुम्हाला 'दाढी दाखवणे' हा वाक्प्रचार माहीतच नाही का?

आणि ही बया किती सुंदर होती, आणि किती विद्यार्थिनींना (!) कशा प्रकारे आणि किती आकर्षक वाटायची याच्याशी माझं काहीही देणंघेणं नाही. कोणाला कोणाच्या दाढीमिशा आवडतील हे सांगणारा मी कोण? बाकी व्यक्तिगत पातळी, मिरच्या झोंबणं वगैरे शब्दप्रयोग फारच करमणुकप्रधान वाटले. आणि स्वतःचा तथाकथित अपमान सहन होत म्हणून तो गोमातेच्या खांद्यावर टाकणं आणि आपण व गोमातेच्या लायनीत मेघना, ऋता वगैरेंना बसवून त्यांना बोंबलून बोलावणं तर फारच मनोरंजक.

असो, या लेखातल्या चुका काढायच्या झाल्या तर ग्रंथच लिहावा लागेल असं म्हटल्यानंतर 'लेख लिहाच' असं चिडवून म्हणणं यातून जो अविनय दिसतो, त्यावरून विद्या फार नसावी असाच निष्कर्ष अधोरेखित होतो. पण वानगीदाखल एकच चूक लिहितो.

"मै लडकी का दीवाना" आणि आजूबाजूला अनेक स्त्रिया तिथे दिसतात. यावरून हे स्पष्ट आहे की हा हीरो, नेहेमीच्या ठोकळेबाज womaniser गुलछबूंपमाणे गुलछर्रे उडवणारा नाही तर एकपत्नीव्रत किंवा monogamy मानणारा आहे.

आजूबाजूला अनेक स्त्रिया दिसण्यावरून मोनोगामीत्व सिद्ध होतं? आर यू आउट ऑफ युअर फ्रीकिंग माइंड?? हे म्हणजे टेबलावर शंभर प्रकारची पक्वान्नं दिसल्यावर 'खाणारा डायेबेटिक असावा' असं म्हणण्यासारखं आहे. कुठच्याही निरीक्षणावरून कुठचाही निष्कर्ष काढायचा ठरवलं तर मग काय म्हणावं? उद्या तुम्ही भाजपाच्या भगव्या रंगाच्या अतिरेकावरून 'हा धर्मनिरपेक्ष सेक्युलरवादी पक्ष आहे हे सिद्ध होतं' असं म्हणाल.

'न'वी बाजू Sat, 14/06/2014 - 17:57

In reply to by राजेश घासकडवी

डार्विन तिच्या आधी बरीच वर्षं होऊन गेला ... तरी हिला पत्ताच नाही

काय सांगता! बया रिपब्लिकन होती???

(रिपब्लिकन आणि स्त्रीवादी - रादर, रिपब्लिकन असूनही स्त्रीवादी - बात कुछ जमी नहीं.)

चीजपफ Fri, 13/06/2014 - 11:16

१९९० चे दशक म्हणजे स्त्री समानतेचा, पूजनीयतेचा मोठा रमणीय कालखंड तो!! सुनील शेट्टीचे शहर कि लडकी, बिजय आनंदचे सुबह सुबह जब खिडकी खोले...

गब्बर सिंग Sat, 14/06/2014 - 02:47

In reply to by चीजपफ

काय राव ... अभिनयपटू अक्षयकुमार चे ... भोलीभाली लडकी, खोल तेरे दिल की ... प्यार वाली खिडकी - सारखे "अजरामर" गाणे ... भूल गये क्या ?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 14/06/2014 - 03:18

In reply to by गब्बर सिंग

दोन दोन सदस्यांची मागणी असेल तर 'हिंदी चित्रपटदर्शकांसाठी स्त्रीवाद' असं एखादं 'For Dummies' पुस्तक लिहायला घ्यायला हवं.

नंदन Mon, 16/06/2014 - 11:51

लेख आणि प्रतिसाद मस्तच! पण मराठी चित्रपटांतील स्त्रीमुक्तीपरिपोषक गीतांचा अनुल्लेख खटकला.
'सांग मला रे सांग मला' ह्या स्त्रीमुक्तीच्या महन्मंगल, ओजस्वी स्तोत्राच्या ओळींत दडलेला जळजळीत उपरोध कुणालाच कसा दिसला नाही बरे?

त्या रिबिनीला पैसे पडती, ते तर बाबा मिळवूनी आणती
कुणी ना देती पैसा-दिडकी, घरात बसल्या आईला

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई
बाबा येता भिऊन जाई, सावरते ती पदराला

धडा शिक रे तू बैलोबा, आईहूनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला

बॅटमॅन Mon, 16/06/2014 - 11:53

In reply to by नंदन

धडा शिक रे तू बैलोबा, आईहूनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला

यात उपरोध कसला? हे तर उत्क्रांतीतून आलेल्या वागणुकीचं समर्थन आहे. ;)

काळा मठ्ठ बैल … Mon, 16/06/2014 - 15:45

ते इतकं नीरस आहे की कागदावर छापून गाईंसमोर टाकलं तर गाईही उपाशी राहतील पण या कडब्याला तोंड लावणार नाहीत.

धडा शिक रे तू बैलोबा, आईहूनही मोठ्ठे बाबा

हे फार होतय.
शिक्शा व्हायलाच हवी.
पण इतिहासाचं भान सुध्दा असायला हवं.
ते असत तर ...
चातीवरचे केस भादरणारा अक्शय 'न'कला करतोय
हे कळलं असतं ----

सुशेगाद Tue, 17/06/2014 - 20:13

जब भी कोई स्त्रीवादी हसीना देखू मेरे दिल कि तार बाजे बार बार ओ ओ या या

शाम उठाले
जान पहचान नहीं कैसे उठाऊ
अरे इसको नहीं रे इस धागे को ऊपर उठाले....