जॉर्डनची भटकंती : ०३ : नेबो पर्वत

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

...जेराशमध्ये फिरताना देहभान विसरायला झाले. पण तरीही उन्हे उतरू लागली आणि थकलेले पाय हॉटेलवर परतण्यासाठी गाडीकडे निघाले.

तिसरा दिवस जरा लवकरच उजाडला. कारण आज अम्मान सोडून दक्षिणेच्या दिशेने चारचाकीचा ३००-३५० किमी प्रवास करायचा होता आणि तेही वाटेतली पर्यटक ठिकाणे पाहत पाहत. अर्थातच सगळ्यांनी भरपेट न्याहारी केली आणि बाहेर पडलो.

जॉर्डनमधिल जमीन बहुतांशी वाळवंटी असली तरी आजच्या आमच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ऑलिव्हची लागवड दिसत होती...


ऑलिव्हची शेती : ०१

.


ऑलिव्हची शेती : ०२

हा भाग त्याच्या ऑलिव्ह आणि ऑलिव्ह तेलासाठी प्रसिद्ध आहे. या जॉर्डनच्या चलनी शेतकी उत्पादनामुळे (कॅश क्रॉप) तेथे आलेल्या समृद्धीची जाहिरात रस्ताभर विखुरलेली सधन शेतकर्‍यांची घरे करत होती...


ऑलिव्ह शेती करणार्‍या सधन शेतकर्‍याचे घर : ०१

.


ऑलिव्ह शेती करणार्‍या सधन शेतकर्‍याचे घर : ०२

मात्र काही वेळातच गाडी नेबो पर्वताच्या डोंगराळ भागात शिरली आणि नजरेच्या टप्प्याच्या पलिकडेपर्यंत दूरवर पसरलेला वाळवंटी भाग दिसू लागला...


नेबो पर्ततावरून दिसणारा वाळवंटी परिसर


नेबो पर्वत

तसं पाहिलं तर नेबो हा काही फार उंच पर्वत नाही. पण ८१७ मीटर उंचीच्या या पर्वताला त्याच्या धार्मिक आणि ऐतिहासिक भूतकाळामुळे अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. हाच तो पर्वत ज्याच्यावरून मोझेसला शब्द दिलेली पवित्र जमीन (प्रॉमिस्ड होली लँड, ज्याला सर्वसाधारणपणे आधुनिक इझ्रेल असे संबोधले जाते) दाखवली गेली असा बायबलमध्ये उल्लेख आहे. या पर्वतावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दर्शन होते. त्यात पवित्र जमिनीबरोबरच, उत्तरेकडील जॉर्डन नदीच्या खोर्‍याचा काही भाग, इझ्रेलमधिल जेरिको शहर आणि जर आकाश निरभ्र असले तर जेरुसलेम शहराचेही दर्शन होते.

जेरिको शहर इझ्रेलमध्ये असल्याने त्याला जरी आपण भेट देणार नसलो तरी त्या शहराची काही वैशिष्ट्ये जाणून घेणे मनोरंजक ठरेल
१. हे शहर समुद्रसपाटीपेक्षा २५० मीटर खाली आहे. या प्रकारे हे जगात सर्वात खालच्या स्तरावर वसलेले शहर आहे.
२. १०,००० वर्षांपूर्वीचे मानवी वस्तीचे अवशेष सापडल्यामुळे हे जगातील सर्वात जुने शहर समजले जाते.
३. तेथे असलेल्या अनेक प्राचीन आणि धार्मिक अवशेषांमुळे ते एक महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. त्यातली काही महत्त्वाची अशी आहेत जिझस ख्राईस्टचा बॅप्टिझम जेथे केला गेला तो जॉर्डन नदीचा भाग, टेम्प्टेशन पर्वत, एलिशा झरा, सायक्यामोअर वृक्ष, सेंट जॉर्जचे थडगे, इ.

Book of Deuteronomy प्रमाणे मोझेसने नेबो पर्वतावरून इझ्रेलचे दर्शन घेतले पण त्याचे पाय त्या जमिनीला लागू शकले नाहीत. तेथे जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या पुस्तकाप्रमाणे तेथून जवळच मोआबच्या दरीत त्याचे दफन केले गेले. दोन वेगवेगळ्या जागांवर त्याचे थडगे असल्याचे दावे आहेत, पण नक्की सत्य काय ते कोणालाच माहीत नाही. काही विद्वानांच्या मते तर हा पर्वत Deuteronomy मध्ये उल्लेखलेला नेबो पर्वत नाही.

चला तर अश्या काहीश्या वादग्रस्त पण तरीही बरेचसे प्राचीन आणि धार्मिक महत्त्व असलेल्या नेबो पर्वतावर. हे पवित्र स्थान असल्याने, गाडी धार्मिक आवाराच्या बाहेर उभी करून अर्धा अधिक डोंगर पायी चढून जावा लागतो.
चढण पूर्ण झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पोप जॉन पॉल दुसरा याच्या इ स २००० मधील भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...


पोप जॉन पॉल दुसरा याच्या भेटीच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा

त्यानंतर इ स २००९ मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावा यानेही या जागेला भेट देऊन तेथे एक भाषण केले होते.

थोडे पुढे गेल्यावर मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा दिसते...


मोझेसच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा

इ स १९३३ मध्ये पर्वतमाथ्यावर एका बायझांटाईन चर्च आणि मोनास्टरीचे अवशेष सापडले. हे चर्च सर्वप्रथम चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात मोझेसच्या मृत्यूच्या जागेवरचे स्मारक म्हणून बांधले गेले. त्याचा पाचव्या आणि परत सहाव्या शतकात विस्तार केला गेला. सद्याच्या चर्चची नवीन इमारत जुन्या अवशेषांचे संरक्षण होईल अश्या रितीने नव्याने बांधलेली आहे.


बायझांटाईन चर्च

.


उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून बनवलेली बायझांटाईन चर्चची प्रतिमा

या चर्चची खासियत तेथे असलेल्या कलापूर्ण प्राचीन मोझेईक कलाकृतींचे अवशेष आहेत...


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०१

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०२

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०३

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०४

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०५

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०६

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०७ : लेख

.


बायझांटाईन चर्चमधिल मोझेईक कलाकृती : ०८ : लेख

.


बायझांटाईन चर्च : ०९ : प्राचीन काळातील मातीची भांडी

.


बायझांटाईन चर्च : १० : प्राचीन काळातील मातीची भांडी

.

चर्चला वळसा घालून पलीकडे गेल्यावर आपण परिसराचे दर्शन घेण्यासाठी बनवलेल्या एका सापटीवर जातो. तेथे गिओवान्नी फान्तोनी (Giovanni Fantoni) नावाच्या इटालियन कलाकाराने बनवलेले Brazen Serpent Monument नावाचे आधुनिक शिल्प आहे. या शिल्पात कलाकाराने मोझेसने चमत्काराने निर्माण केलेल्या सापाचा आणि जिझसच्या क्रुसाचा प्रतिकात्मक उपयोग केलेला आहे...


Brazen Serpent Monument

.

आम्ही गेलो तेव्हा (सप्टेंबर २०१०) तेथे सापडलेल्या अवशेषांसाठी पर्वतमाथ्याच्या एका टोकावर भलेमोठे संग्रहालय बांधले जात होते. आतापर्यंत कदाचित ते पूर्णही झाले असेल...

मध्यपूर्वेत स्थापना झालेल्या दोन मोठ्या धर्मांच्या सुरुवातीच्या काळाशी संबद्ध असल्याचा दावा असलेल्या ठिकाणाची आणि तेथील अवशेषांची ओळख बरोबर घेऊन आमचा प्रवास पुढच्या आकर्षणाच्या दिशेने सुरू झाला.

(क्रमशः )

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहेत फोटो. पहिले दोन फोटो जरा धुरकट वाटले. उन्हामुळे किंवा वाळवंटामुळे अशी छटा आली आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते फोटो चालत्या गाडीच्या खिडकिच्या काचेतून काढलेले आहेत, त्यामुळे तसे दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या फोटोंमध्ये जॉर्डेनियन माणसं दिसली नाहीत; हा सगळा प्रवास पर्यटकच जास्त करतात का?

बायझंटाईन चर्च मस्त आहे. त्या संस्कृतीबद्दल आणखी तपशीलात लिहाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इस्लामिक देशात तेथिल माणसांचा फोटो काढला तर काय प्रतिक्रिया होईल हे सांगणे कठीण. त्यामुळे खूप कुतुहल वाटल्याशिवाय त्यांचे फोटो टाळलेले बरे. मात्र पुढे सहलीत काही फोटो येतील.

बायझांटाईन साम्राज्याबद्दल तपशिलात लिहीणे म्हणजे एक मोठी लेखमालाच होईल. पण त्याची थोडक्यात तोंडओळख अशी करून देता येईल:

रोमन साम्राज्याच्या पूर्वेकडील ग्रीक भाषिक भागाला सामान्यपणे बायझांटाईन साम्राज्य अथवा पूर्व रोमन साम्राज्य (इस्टर्न रोमन एंपायर) असे ओळखले जाते. मूळ रोमन साम्राज्याचा र्‍हास (चवथे ते सहावे शतक) होऊ लागल्यावर त्याची स्वतंत्र बायझांटाईन साम्राज्य अशी ओळख सुरू झाली. त्याची राजधानी काँस्टंटाईन (आधुनिक इस्तान्बुल) येथे होती... त्या शहराचे मूळ नाव बायझँटियम होते, त्यावरून या साम्राज्याचे नाव पडले. हे साम्राज्य रोमन साम्राज्याच्या र्‍हासानंतर १००० वर्षेपर्यंत त्याचा इ स १४५३ मध्ये ऑटोमान तुर्कांनी पाडाव करेपर्यंत आस्तित्वात होते.

जवळ जवळ १००० वर्षे हे साम्राज्य युरोप, उत्तर अफ्रिका आणि मध्य आशियातील सर्वात प्रबळ आर्थिक, सांस्कृतिक, आणि सामरिक सत्ता होती. या मोठ्या काळात या साम्राज्याच्या सीमा बदलत राहिल्या. सम्राट जस्टिनियन द ग्रेट च्या काळात हे साम्राज्य अतुच्च्य शिखरावर होते, तेव्हा इ स ५५५ मध्ये, त्याचा असलेला विस्तार खालील नकाशात दाखविला आहे...

(नकाशा जालावरून साभार)
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मातीची भांडी मस्तच!!! लेख व फोटो आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! मोझाईक कला आवडली. अशा प्रकारच्या कलेत आपल्याकडे जे रंग वापरले जातात त्याहून वेगळे रंग आणि वेगळ्या वळणाच्या रेषा बघुन छान वाटले.

मध्ये एक जो दर्‍याखोर्‍यांचा फोटो आहे तो अतिशय आवडला. अश्या ठिकाणी काही गुंफा व गुंफाचित्रे वगैरे असावीत का असे (उगाचच) वाटले. त्या उजाड प्रदेशातही रहाणारे काही गट असतीलच! फक्त ते आपल्याला अ‍ॅक्सेसीबल असण्याची शक्यता चाचपता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जॉर्डनमधली मोझेईक्स तेथे सापडणार्‍या रंगीत दगडांच्या तुकड्यांनी बनविलेली आहेत.

लेव्हांत (सुपीक चंद्रकोर) मध्ये अनेक गुहा आहेत. त्यांतील चित्रांबद्दल मला माहिती नाही. मात्र आधुनिक इझ्रेलमधल्या एका गुहेत १,२५,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून सर्वप्रथम बाहेर पडलेल्या आणि नाईल नदीच्या काठाने उत्तेरेकडे येत तिथपर्यंत पोहोचलेल्या मानवांचे अवशेष सापडले आहेत. मात्र ते सर्व बदलत्या वातावरणाचे (हिमयुगाचे) बळी ठरून नामशेष झाले.

त्यानंतर ४०,००० वर्षांनी रक्त समुद्र पार करून येमेनच्या किनार्‍यावर उतरलेले आधुनिक मानव मात्र आपली प्रजाती सर्व पृथ्वीभर पसरवण्यात यशस्वी झाले... आज आस्तित्वात असलेले आपण सर्व रंगांचे आणि चेहेरपट्ट्यांचे मानव त्यांचेच वंशज आहोत !

आजही जॉर्डन, त्याचा परिसर आणि अरब व्दिपकल्पात अनेक भटक्या (नोमॅडीक) टोळ्या आहेत. त्यांना स्थानिक भाषांत बदू म्हणतात. मात्र कायद्याचे लांब हातही पुरेसे पोचत नसल्याने त्यांच्या भागांत जाणे सुरक्षित नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र आधुनिक इझ्रेलमधल्या एका गुहेत १,२५,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेतून सर्वप्रथम बाहेर पडलेल्या आणि नाईल नदीच्या काठाने उत्तेरेकडे येत तिथपर्यंत पोहोचलेल्या मानवांचे अवशेष सापडले आहेत. मात्र ते सर्व बदलत्या वातावरणाचे (हिमयुगाचे) बळी ठरून नामशेष झाले.

त्यानंतर ४०,००० वर्षांनी रक्त समुद्र पार करून येमेनच्या किनार्‍यावर उतरलेले आधुनिक मानव मात्र आपली प्रजाती सर्व पृथ्वीभर पसरवण्यात यशस्वी झाले... आज आस्तित्वात असलेले आपण सर्व रंगांचे आणि चेहेरपट्ट्यांचे मानव त्यांचेच वंशज आहोत !

उत्तम आणि रोचक माहिती
आभार!

लेखमाला उत्तम चालु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars