जॉर्डनची भटकंती : ०७ : अकाबा

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७.... ०८ (समाप्त)...

===================================================================

थोड्याच वेळात संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी छावणीच्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरू झाली. खाणेपिणे, छावणीच्या विस्तवाभोवती नाचणे, उत्तररात्र ओलांडून जाईपर्यंत गप्पा-गोष्टी-विनोद, इत्यादी कार्यक्रम पूर्वी ठरवल्याप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाले. शेवटी बंदिस्त तंबूत जाऊन झोपण्यापेक्षा हवेशीर उघड्या मंडपातच ताणून दिली.

उघड्यावरच्या छावणीत सकाळ जरा लवकरच फटफटली. बाकीच्या पर्यटकांची गर्दी होण्याअगोदर सामायिक स्वच्छतागृहातली सकाळची कामे आटपून मस्त न्याहारी आटपून घेतली आणि निघायला वेळ असल्याने छावणीच्या परिसरात फेरफटका मारायला निघालो. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात ते वाळवंट अजूनच वेगळे दिसत होते.

तेथे जमलेल्या पर्यटकांच्या गर्दीचा व्यवसायासाठी कल्पक उपयोग करून एकजण तेथे मोटोराईझ्ड हँग ग्लायडरच्या साहाय्याने वादी रमचे विहंगम दर्शन घडवीत होता...

motorised hang glider
वादी रम : मोटोराइझ्ड हँग ग्लायडर (जालावरून साभार)

ही २०-३० मिनीटांची हवाई सफारी घ्यावी असे प्रकर्षाने वाटले होते. पण एका वेळेस चालक फक्त एकच प्रवासी घेऊन उड्डाण करू शकतो आणि सफारींच्या ११ वाजेपर्यंतच्या जागा राखीव झाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या नाराजीने तिला फाटा द्यावा लागला.

अजून थोडा वेळ आजूबाजूचा पायी फेरफटका मारून आम्ही अकाबाच्या दिशेने निघालो. थोडा प्रवास केल्यावर चातुर्याचे सात स्तंभ (सेव्हन पिलर्स ऑफ विसडम) या नावाचा वादी रममधला एक प्रसिद्ध वालुकाश्माकार समोर आला...

7 pillars
वादी रम : चातुर्याचे सात स्तंभ

लॉरेन्स ऑफ अरेबियाने त्याच्या मोहिमेनंतर लिहिलेल्या पुस्तकाचे नाव "The Seven Pillars of Wisdom" असे ठेवले होते. त्याच्या स्मरणार्थ १९८० मध्ये या वालुकाश्माकाराला हे नाव दिलेले आहे. परंतू लॉरेन्सच्या पुस्तकातल्या सात स्तंभांचा या वालुकाश्माकाराशी काहीच संबंध नाही.

लवकरच वादीतून बाहेर पडून आम्ही अकाबाकडे जाणार्‍या रस्त्याला लागलो. भारतापेक्षा गरीब असलेल्या जॉर्डनसारख्या देशातल्या दूरदराजच्या भर वाळवंटात असलेला जागतिक दर्जाचा रस्ता प्रवासी म्हणून सुखावत असला तरी आपल्या भारतात असे रस्ते कधी होणार असा खिन्न करणारा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही...


अकाबाकडे जाणारा रस्ता

तासाभराच्या प्रवासानंतर लोकवस्तीच्या खाणाखुणा दिसू लागल्या आणि अकाबा जवळ आल्याची खात्री पटली...


अकाबा शहराच्या हद्दीवरची घरे

जसजसे शहराच्या जवळ जाऊ लागलो तसतसे त्याचे आधुनिक रूप दिसू लागले...


अकाबाच्या आधुनिक वस्तीची सुरुवात

===================================================================

अकाबा

रक्त समुद्राचे उत्तरेकडील टोक इजिप्तच्या सायनाई व्दीपकल्पाने दुभागलेले आहे. त्यातल्या पश्चिमेकडील भागाला सुवेझचे आखात म्हणतात व त्याच्या उत्तर टोकावरून भूमध्य समुद्राला जोडणारा सुवेझ कालवा सुरू होतो. तर पूर्वेकडील भागाला आकाबाचे आखात म्हणतात.

आफ्रिका आणि आशियातील समुद्री व्यापारावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेवर सुमारे इ स पूर्व ४,००० पासून वस्ती आहे. अर्थातच, इतिहासात त्याचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. सर्वप्रथम येथे एडोमाईट जमातीची वस्ती होती, त्यानंतर इ स पूर्व पहिल्या शतकात अरब नाबातियन मोठ्या संख्येने आले. वादी रममध्ये आपण पाहिलेले अरॅमिक भाषेतले शिलालेख याच नाबातियन लोकांनी लिहिलेले आहेत.

रोमन काळ या शहराचा प्राचीन सुवर्णकाळ होता. या काळात ख्रिश्चन असलेला हा भूभाग इस्लामच्या उदय व प्रसारामुळे मुस्लिम झाला. नंतर ऑटोमान साम्राज्याचा भाग झाला, पहिल्या महायुद्धानंतर ट्रान्सजॉर्डन म्हणून पाश्चात्त्य ताकदींच्या ताब्यात राहिला व अखेर स्वतंत्र आधुनिक जॉर्डनचा भाग झाला हा इतिहास आपण अगोदर पाहिला आहेच.

अकाबा हे अकाबाच्या आखाताच्या किनारपट्टीवरचे सर्वात मोठे शहर, जॉर्डनचे एकुलते एक बंदर आणि अकाबा गव्हर्नरेटचे मुख्यालय आहे. जॉर्डनमधल्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांमध्ये त्याची गणना होते. प्रवाळाने (कोरल) आणि इतर सागरी जीवांनी समृद्ध, स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारा असल्याने तेथे वाळू, सूर्य, समुद्रसफारी, डायव्हिंग आणि सर्वसाधारण 'जीवाचा अकाबा करायला' आलेल्या पर्यटकांची गर्दी असते. त्यांच्या सोयीसाठी येथे अनेक आलिशान हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांसाठीही अकाबाची निवड केली जाते.

आकाबाच्या आखाताचा बहुतांश पूर्व किनारा सौदी अरेबियात येतो तर बहुतांश पश्चिम किनारा इजिप्तच्या सायनाई भागात येतो. आखाताच्या अगदी उत्तर टोकावर जेमतेम २०-२५ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा जॉर्डनच्या हद्दीत आणि १० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा इझ्रेलच्या हद्दीत आहे. त्यामुळे, आकाबाच्या आखाताच्या पूर्व किनार्‍याने प्रवास केला तर उत्तरेकडे जात प्रथम आपण सौदी अरेबियातून जॉर्डनमध्ये प्रवेश करू आणि केवळ वीसएक किमी गेल्यावर जॉर्डनमधले अकाबा शहर ओलांडून इझ्रेलमधील ऐलात शहरात शिरू, त्यानंतर दक्षिणेकडे वळून फक्त दहाएक किमी ओलांडले की इजिप्तच्या हद्दीत गेलेले असू... एकूण चार देशांच्या सीमा येथे इतक्या जवळ जवळ आहेत ! आकाबाच्या किनार्‍यावरून जॉर्डन-इझ्रेल सीमाभाग, इझ्रेलमधील ऐलात शहर आणि इझ्रेल-इजिप्त सीमेवरील चौकीच्या इमारतीचा तांबड्या रंगाचा ठिपका दिसतो.

  .
अकाबा : ०१ : अकाबा परिसराचे नकाशे (मूळ नकाशे जालावरून साभार)

खरं तर आंतरराष्ट्रीय सीमा एका वस्तीमधून गेल्यामुळे अकाबा आणि ऐलात ही दोन वेगळी शहरे झालेली आहेत. बायबलमध्ये अकाबा परिसराचा उल्लेख "राजा सॉलोमनने एलोथमधील एदॉम या शहराच्या जवळील एझिऑन गेबर (Ezion-Geber, which is near Eloth in Edom) या जागी समुद्रसफरीसाठी जहाजे बनवली." असा येतो. या संदर्भावरून इझ्रेलमधील आधुनिक वस्तीचे नाव ऐलात (Eilat) असे ठेवलेले आहे.

जॉर्डन आणि इझ्रेल यांचे संबंध खूप मैत्रीचे नसले तरी तणावाचे नसल्याने एकमेकाला लागून असलेली अकाबा आणि ऐलात ही दोन्ही शहरे त्या त्या देशांची उत्तम प्रकारची आंतरराष्ट्रीय बंदरे व पर्यटनस्थळे म्हणून विकसीत केली गेलेली आहेत. ऐलात बंदरामुळे इझ्रेलला पूर्वेकडील देशांशी सुवेझ कालव्याची मदत न घेता समुद्री दळणवळ करणे शक्य झाले आहे.

===================================================================

सकाळची भरपेट न्याहारी झालेली असल्याने आराम न करताच लगेच शहराची सफर करण्याचे ठरले. अकाबा शहर मोठ्या काळजीपूर्वक जॉर्डनची पर्यटन जाहिरात व्हावी असे देखणे बनवलेले आहे, हे लगेचच जाणवते...


अकाबा : ०२ : अकाबा शहराचे विहंगम दृश्य जालावरून साभार

.


अकाबा : ०३ : शहराचा फेरफटका

.


अकाबा : ०४ : शहराचा फेरफटका

.


अकाबा : ०५ : शहराचा फेरफटका

.

शहराच्या भटकंतीनंतर अकाबाच्या आखाताची सफर करायला निघालो. १९९७ सालापासून जॉडनच्या हद्दीतील अकाबाच्या आखाताचा दक्षिणेकडील ७ किमी भाग "अकाबा मरीन पार्क" म्हणून संरक्षीत केलेला आहे. तेथे किनारपट्टीवर पादचारी मार्ग, पर्यटक छावण्या, चारचाकी पार्किंग्ज, स्वच्छतागृहे, बोटी उभ्या करण्यासाठी खास व्यवस्था आणि पर्यटकांसाठी माहिती/शिक्षण केंद्रे अश्या अनेक सुविधा उपलब्ध करून देऊन सागर व सागरी जीवन सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

प्रवाळ पाहण्यासाठी काचेचा तळ असलेल्या अनेक आकारांच्या, सोयींच्या आणि काही तासांपासून दिवसभरापर्यंत बोटी भाड्याने मिळतात. आम्ही वेळेच्या अभावामुळे दोन तास फेरफटका मारून आणणारा पर्याय स्वीकारला. कडकडीत उन्ह, बोटीचा जाड काचेचा तळ आणि पाणी यामुळे बोटीतून प्रवाळांचे फोटो चांगले येत नाहीत (आपण जी चित्रे मासिकात/जालावर पाहतो ती पाण्याखाली, जवळून, खास कॅमेर्‍यांनी काढलेली आणि नंतर प्रोसेसिंग केलेली असतात; त्यामुळे ती खूप स्पष्ट व रंगतदार दिसतात).

समुद्रसफरीचे काही फोटो...


अकाबा : ०६ : आखातात फार पूर्वी बुडालेल्या बोटीचे अवशेष

.


अकाबा : ०७ : आखातातील प्रवाळ

.


अकाबा : ०८ : आखातातील प्रवाळ

.


अकाबा : ९ : बोटीतून दिसणारे अकाबा शहर

.


अकाबा : १० : अकाबा बंदरातला झेंडा

अकाबा बंदरात जगातला पाचव्या क्रमांकाच्या १३० मीटर उंचीचा झेंडा आहे. हा हुसेन शरीफ याने अरब भूमी स्वतंत्र करण्याच्या लढ्यात वापरला होता. या लढ्याचे पर्यवसान पुढे स्वतंत्र जॉर्डनच्या निर्मितीत झाले.


अकाबा : ११ : राजे हुसेन फार्महाउस

राजे हुसेन म्हणजे साद्द्याचे राजे अब्दुल्ला याचे पिताश्री. या फार्महाउसची डावीकडची हद्द म्हणजेच जॉर्डन-इझ्रेल आंतरराष्ट्रिय सीमारेखा आहे !

.


अकाबा : १२ : ऐलात बंदर

जॉर्डन आणि इझ्रेलची सागरी सीमा या आखाताच्या मध्यातून जाते. तेथे सीमा दर्शक तरंगते आकार (buoy) आहेत. त्या आकारांपासून पन्नासएक मीटरवर चालकाने बोट थांबवली आणि अजून पुढे गेल्यास आम्ही आक्रमक आहोत असे समजून इझ्रेलकडून गोळीबार केला जाईल असे सांगितले !


अकाबा : १३ : ऐलात शहर आणि आखातातली जॉर्डन-इझ्रेल जलसीमा

पलीकडील किनारपट्टीवर ऐलात हे नवीनच वसवलेले आधुनिक इझ्रेली शहर दिसत होते. पाण्यात पांढरे-तांबडे पट्टे असलेल्या खांबांसारखे तरंगते आकार दिसते आहेत ते जॉर्डन-इझ्रेल सागरी सीमा दाखवतात. त्यांपलीकडे इझ्रेलच्या सीमासुरक्षादलाची एक छोटी बोट उभी आहे. मधून मधून मोठ्या बोटींची गस्तही चालू होती.

जलसफर संपवून किनार्‍यावर आल्यावर भुकेची जाणीव झाली आणि एक मस्त रेस्तराँ शोधून पोटोबा आटपून घेतला. परत शहरात एक छोटा फेरफटका मारून 'धनिकांचे क्रीडांगण' आणि 'समुद्रकिनार्‍यावरचे मरुस्थल' समजल्या जाणार्‍या अकाबाचा निरोप घेऊन आम्ही मृतसमुद्राच्या दिशेने निघालो.

(क्रमशः )

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

बऱ्याच दिवसांनी लेख आला. छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0