जॉर्डनची भटकंती : ०१ : अम्मानच्या दिशेने प्रस्थान आणि अम्मान सिटॅडेल

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

सुपीक चंद्रकोरीतील (Fertile Crescent) स्थानामुळे आणि त्याच्या प्राचीन इतिहासामुळे जॉर्डन बघण्याची इच्छा होतीच. पण एकदा विमानप्रवास करत असताना विमान कंपनीच्या मासिकात पेत्रा दरीतल्या नेबॅतियन साम्राज्याच्या जामदारखान्याचा (treasury) फोटो पाहिला आणि तो देश सफरीच्या यादीत वर सरकला. नंतर सहा आठ महिन्यांतच आमच्या कर्मस्थानाच्या क्रीडा आणि मनोरंजन विभागाने जॉर्डनच्या सहलीचा प्रस्ताव मांडला. अर्थात ही सुवर्णसंधी टाळणे शक्यच नव्हते. माझ्या फिरण्याच्या आवडीमुळे त्या विभागाच्या संचालकाची आणि माझी दोस्ती होतीच. त्याला थोडीबहुत मदत करून त्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरवायला मदत केली. अर्थात यात माझाच जास्त फायदा होता म्हणा !

जॉर्डनसारख्या प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध असलेल्या पण आधुनिक आकर्षणांचे काहीच वलय नसलेल्या देशाच्या सफरीसाठी साथी मिळविणे कल्पनेपेक्षा जरा जास्तच कठीण गेले. जाहिरातीला २५ -३० जणांनी प्रतिसाद दिला, आगाऊ रक्कम भरण्याची वेळ आली तोपर्यंत अकरा जणच शिल्लक उरले, फिलिपिनो नागरिकांना व्हिसा देण्याच्या जॉर्डनच्या काही नियमांमुळे त्यातले चार गळले आणि शेवटी सात जणच बाकी राहिले. सहलीची किंमत ठरवताना २५ जणांना जमेस धरल्याने टूर एजन्सीने आता सात जणांसाठी दर माणशी जास्त पैसे पडतील असे सांगितले. नशिबाने तो फरक सातही जणांना मान्य झाल्याने सहल नक्की झाली आणि आमचा जीव भांड्यात पडला !

सहलीत विविध स्तरांवरचे कर्मचारी असल्याने खर्च ताब्यात ठेवण्यासाठी दम्माम या आमचे सौदी अरेबियातल्या ठिकाणापासून जॉर्डनची राजधानी अम्मान पर्यंतचा साधारण १७०० किमी लांबीचा प्रवास बसने करण्याचे ठरले. इतक्या लांबीचा आणि अठरा-वीस तासांचा बसप्रवास मी पहिल्यानेच करत असल्याने जरा काळजी वाटत होती. पण दम्माम ते अम्मान अशी तडक आरामबस असल्याने जरा बरे वाटले. शिवाय आपल्याच संस्थेतले सहा सहप्रवासी असल्याने प्रवास गप्पा मारत मजेत होईल हा दिलासा होताच.

या प्रवासाचा मार्ग खालील नकाश्यात दाखवला आहे...


दम्माम ते अम्मान बस प्रवासाचा मार्ग (मूळ नकाशा जालावरून साभार)

बसच्या खुर्च्या आरामदायक होत्या. दिवसाउजेडीचे पहिले आठ-नऊ तास खेळीमेळीने गप्पा मारत गेले आणि रात्र पडू लागली. एका थांब्यावर पोटपूजा आटपल्यावर सर्वच जण आलटून पालटून डुलक्या आणि गाढ झोप घेऊ लागले. बाहेर नेहमीच दिसणारे वाळवंट आणि त्यात रात्र असल्याने बाहेर बघण्यात कोणालाच रस नव्हता. पहाटे पहाटे सौदी-जॉर्डन सीमाचौकी आली तेव्हा देशबदलाचे सोपस्कार आटपायला उठवले गेले. टूर एजन्सीच्या माणसाने आमचे पासपोर्ट ताब्यात घेऊन सगळी कारवाई केली. त्यामुळे त्या आवारात पाय मोकळे करत गप्पा मारायला अर्धा तास मिळाला. नंतर पुढे असलेले साधारण २०० किलोमीटर परत आलटून पालटून डुलक्या आणि गाढ झोप असेच गेले.

ही आहेत त्या प्रवासातली काही क्षणचित्रे...


प्रवासातले एक बस स्थानक

.


एका थांब्यावर पोटपूजा आटपल्यावर उघड्या आकाशाखाली चहा-कॉफीपानाची मजा घेताना


जॉर्डन

जॉर्डनमध्ये फिरायला सुरुवात करण्या करण्याअगोदर त्या देशाची थोडी तोंडओळख करून घेतल्यास सहलित जरा अजून जास्त मजा येईल.

सर्वसाधारणपणे जॉर्डन (Jordan; अरबीमध्ये : الأردن‎ म्हणजे al-Urdun किंवा al-Ordon) असे संबोधल्या जाणार्‍या या देशाचे औपचारिक नाव आहे 'जॉर्डनचे हाशेमाईट राज्य' (हाशेमाईट किंगडम ऑफ जॉर्डन; अरबीमध्ये: المملكة الأردنية الهاشمية‎ म्हणजे al-Mamlakah al-Urdunīyah al-Hāshimīyah). पश्चिम आशियामध्ये असलेल्या या देशाच्या दक्षिण व दक्षिणपूर्वेस सौदी अरेबिया, उत्तरपूर्वेस इराक, उत्तरेस सिरीया, पश्चिमेस इझ्रेल व मृत समुद्र आणि दक्षिणेच्या अती चिंचोळ्या भूभागाला लागून रक्त समुद्रातले आकाबाचे आखात आहे.

आजपासून ५०,००० वर्षांपूर्वी मानवाने प्रथमच कायमस्वरूपी पादाक्रांत केलेल्या सुपीक चंद्रकोर किंवा लेवांत नावाच्या भूमीचा एक भाग आहे. तेथे आतापर्यंत सर्वात जुने मानवाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे अवशेष सापडले आहेत आणि अजूनही सापडत आहेत. या भागातून पुढे जाऊन नंतर मानवाने युरोपमध्ये वस्ती करायला सुरुवात केला. त्यामुळेही या भूभागाला पाय लावण्याची माझी खास इच्छा होती.

प्राचीन काळापासून या प्रदेशात आणि त्याच्या चारी बाजूला प्रबळ राज्ये-साम्राज्ये असल्याने आणि महत्त्वाचे व्यापारी मार्ग तेथून जात असल्याने या भागाला अनन्यसाधारण राजकीय आणि आर्थिक महत्त्व होते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत दंतकथा, स्थानिक पुराणे आणि लिखीत इतिहास यापैकी एक किंवा जास्त पुरावे असलेली अनेक राज्ये-साम्राज्ये येथे होऊन गेली. काही राज्ये जॉर्डन किंवा फारतर आजूबाजूचा काही प्रदेश इतकीच मोठी होती तर इतर काही साम्राज्ये जॉर्डनसह इतर बराच मोठा भूभाग व्यापून होती. आधुनिक जॉर्डन आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाला फार पूर्वीपासून ट्रान्स़जॉर्डन असे संबोधले जात असे. ट्रान्स़जॉर्डनवर सत्ता गाजवणार्‍या महत्त्वाच्या राजसत्ता अशा होत्या: मोआब, अम्मॉन, बाशान, अस्सिरिया, बॅबिलोनिया, पर्शिया, मॅसेडोनिया, सिल्युसिड, पार्थियन, नेबॅतियन, रोमन, इस्लामी, ऑटोमान, युरोपियन साम्राज्ये, इत्यादी.

इ स पूर्वी चवथ्या शतकाच्या आसपास स्थापन झालेल्या नेबॅतियन राज्याचे अवशेष तेथे अजूनही बर्‍यापैकी शाबूत राहिलेले आहेत. आपण भेट देणार असणारी पेत्रा दरी (पेत्रा व्हॅली) हे त्यापैकी सर्वात महत्त्वाचे आणि जगप्रसिद्ध ठिकाण आहे. इ स १०६ मध्ये रोमन साम्राज्याने या भूभागावर कब्जा केला. नंतर इ स ६३३ ते ६३६ मध्ये अरबी व्दीपकल्पातून उत्तरेकडे पसरणार्‍या अरब सत्तांच्या ताब्यात हा भाग गेला. त्यानंतर अनेक इस्लामिक सत्तांतरे होत होत सोळाव्या शतकात हा भाग ऑटोमान तुर्कांच्या ताब्यात आला. त्यावेळी त्याचे नियंत्रण दमास्कस (आता आधुनिक सिरीयाची राजधानी) येथून होत होते.

पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमान साम्राज्याची शकले झाली आणि १९२० साली त्यातला एक भूभाग "जॉर्डन" या नावाने ब्रिटिश प्रभावाखाली आला. इ स १९२१ मध्ये जॉर्डनची सत्ता अब्दुल्ला इब्न हुसेनच्या हाती सोपवली गेली. इ स १९२३ मध्ये ब्रिटनने जॉर्डनला आंशिक स्वातंत्र्य दिले, पण "ब्रिटीनचे संरक्षित राष्ट्र (ब्रिटिश प्रोटेक्टोरेट)" ही स्थिती कायम ठेवली. दुसर्‍या महायुद्धात केलेल्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ब्रिटनने इ स १९४६ साली जॉर्डनला पूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले आणि राजा अब्दुल्ला (पहिला) आधुनिक जॉर्डनचा पहिला राजा बनला.

अब्दुल्लाचा १९५१ मध्ये वध झाल्यावर त्याचा मुलगा तलाल सत्तेवर आला. तलाल मानसिक रोगी असल्याने पुढच्याच वर्षी त्याची सत्तेवरून उचलबांगडी करून त्याचा मुलगा हुसेन याला राजसत्ता दिली गेली. प्रदीर्घ अरब-इझ्रेल संघर्ष, १९५६ चे सुवेझ कालवा प्रकरण, सिरीया देशाची निर्मिती, पॅलेस्टिनी समस्या, आखाती युद्ध, इ वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि पाश्चिमात्य सत्ता व अरब हितसंबंध यांच्या ओढाताणीत जॉर्डनला सुरक्षित आणि बर्‍यापैकी सुस्थितीत ठेवण्याचे श्रेय राजा हुसेन याला जाते. इ स १९९९ मध्ये कर्करोगाने त्याचे निधन झाल्यावर त्याचा मुलगा अब्दुल्ला (दुसरा) राजसत्तेवर आला आहे. त्याने जॉर्डनमध्ये २००३ मध्ये पहिली निवडणूक घेऊन लोकांनी निवडलेल्या लोकसभेची स्थापना केली; मात्र पंतप्रधानाची नेमणुक-बरखास्ती करण्याच्या अधिकारासह महत्त्वाचे शासकीय अधिकार स्वतःकडेच ठेवले. तेव्हापासून जनक्षोभामुळे अनेकदा बरखास्त केलेली मंत्रिमंडळे, अरब स्प्रिंग, इत्यादी अडथळ्यांवर अडखळत जॉर्डनची आधुनिक काळातली खडतर मार्गावरची वाटचाल चालू आहे.

तर असा आहे हा आजचा जॉर्डन... ७७,८०० चौ किमी क्षेत्रफळाच्या भूमीवर वसलेल्या ६०-६५ लाख लोकसंखेचा देश. या लोकसंखेत ९८% अरब आणि ९२% मुस्लिम आहेत. बराचसा वाळवंटी असलेल्या या देशातला सर्वात मोठा पर्वत १,८५४ मीटर उंच असून त्याची शिखरे हिवाळ्यात बर्फाच्छादित असतात आणि सर्वात सखोल जागा असलेला मृत समुद्राचा किनारा जागतीक समुद्रसपाटीच्या ४२० मीटर खाली आहे ! उन्हाळ्यात रखरखीत उष्ण असणार्‍या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.

===================================================================

अम्मानमध्ये हॉटेलवर पोहोचलो तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. बसच्या खुर्च्या कितीही आरामदायक असल्या तरी त्यांच्यात अठरा तास बसून अंग आंबलेले होते. पण बस थांब्यावरच भेटलेल्या स्थानिक मार्गदर्शकाने "दोन तासांत अम्मानच्या सहलीला बाहेर पडायचे आहे" असे सांगितले होते. त्यामुळे सर्वच जण आपापल्या खोल्यांकडे शॉवरादी प्रभातकर्मे करायला पळाले. ताजेतवाने होऊन आणि सज्जड न्याहारी आटपून हॉटेलच्या लॉबीत पोहोचलो तेव्हा अम्मानचा स्थानिक मार्गदर्शक, खमीस, आमची वाट पाहत बसलेला होता. वेळ न दवडता हॉटेल मधून बाहेर पडलो.


अम्मान

या जागेवरच्या प्राचीन वस्तीचे नाव "रब्बाथ अम्मान" म्हणजे "अम्मोनाईट लोकांचे महानगर" असे होते. राजा डेविडने हे शहर जिंकून घेतल्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. डेविडच्या प्रेयसीच्या नवर्‍याला डेविडने युद्धावर पाठविल्यावर तो या जागेवरच्या एका चकमकीत मारला गेला अशीही नोंद आहे. दुसरा टॉलेमी फिलाडेल्फस (इ स पूर्व २८३ ते २४६) या नावाच्या इजिप्तच्या राजाने हा भाग जिंकल्यावर या शहराचे नाव बदलून स्वतःच्या नावावरून फिलाडेल्फिया असे ठेवले होते. सातव्या शतकात हे शहर उम्मायद अरबांच्या ताब्यात गेल्यावर त्याचे परत अम्मान असे नामकरण केले गेले. उम्मायुदानंतरच्या कालखंडात या जागेचे महत्त्व कमी होऊन तिचे महत्व कमी झाले. एकोणिसाव्या शतकात ऑटोमान साम्राज्याच्या ट्रान्सजॉर्डन प्रांताची राजधानी म्हणून अम्मानला परत एकदा महत्त्व आले, ते कमी अधिक प्रमाणात आजतागायत चालू आहे.

नव्या-जुन्याच्या संगमाने चित्तवेधक झालेले हे शहर सात टेकड्यांचा समूह असलेल्या भूभागावर वसलेले आहे. राजधानी असण्याबरोबर हे शहर जॉर्डनचे मुख्य आर्थिक शहरही आहे. जॉर्डनची साधारणपणे अर्धी लोकवस्ती (३० लाख) या एका शहरात राहते. जॉर्डन आणि अम्मानच्या वैविध्यपूर्ण इतिहासामुळे या शहरात साहजिकपणे आजूबाजूच्या सर्व प्रकारच्या संस्कृतींची सरमिसळ झालेली आहे. तिचे दर्शन आपल्याला शहरात फिरताना होते. या शहराच्या हद्दीत असलेले काही प्राचीन / ऐतिहासिक अवशेष खास आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षणे आहेत. चला तर निघूया अम्मानची फेरी मारायला.

हॉटेलवरून आजच्या एका मुख्य थांब्याकडे जाताना या शहराच्या सात टेकड्यांवर वसलेल्या नव्या व जुन्या भागांपैकी काहींचे दर्शन झाले...


जुन्या अम्मानची पहिली झलक

.


नव्या अम्मानची पहिली झलक

अम्मानच्या सहलीत त्याच्या विविध भागांचे दर्शन आपल्या होत राहीलच.


अम्मान सिटॅडेल (अम्मान किल्ला)

अम्मानमधिल काला नावाच्या, इंग्लिश "L" या अक्षराच्या आकाराच्या, एका टेकडीवर अम्मान सिटॅडेल (Amman Citadel) ही जॉर्डनमधली एक राष्ट्रीय ऐतिहासिक जागा आहे. या टेकडीवर नवअश्मयुगापासून ते आजतागायत मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे हे शहर जगातली सर्वात जास्त (सुमारे ७,००० वर्षे) सलग मानवी वस्ती असणारी जागा समजली जाते ! अर्थातच या सगळ्या कालखंडात होऊन गेलेल्या राजसत्तांना आणी उलथापालथींना या जागेने पाहिले आहे.

त्याचबरोबर हा परिसर मध्यपूर्वेत जन्मलेल्या आणि जगभर पसरलेल्या जुदाइझम, ख्रिश्चियानिटी आणि इस्लाम तीन एकेश्वरवादी धर्मांच्या शेकडो वर्षांच्या वाटचालीचा साक्षीदार आहे.

तुलनेने आधुनिक काळात (ब्राँझ युग, इ स पूर्वी १८०० वर्षे) ह्या भागाभोवती भिंत उभारली गेली आणि त्यावरून याचे नाव अम्मान सिटॅडेल म्हणजे अम्मानचा किल्ला असे पडले आहे. मात्र येथील प्राचीन अवशेष सिटेडेलच्या बाहेरच्या जागेवरही विखुरलेले आहेत. त्यातील काही तर अम्मानच्या इतर भागांतही आहेत. या प्राचीन ठेव्याचे बरेचसे उत्खनन आणि अभ्यास अजून बाकी आहे.

चला तर बघूया ही अशी विविधरंगी जागा...


अम्मान सिटॅडेलचा नकाशा


हराक्लेस (हर्क्युलीस) चे मंदिर

येथे इ स १६२ ते १६६ मध्ये बांधलेले हर्क्युलीसचे मंदिर आहे. या मंदिराचा आकार रोममधील हर्क्युलीसच्या मंदिराच्या आकारापेक्षा मोठा आहे. मंदिराचा परिसर १२२ x ७२ मीटर आहे आणि मुख्य इमारतीचा आकार ३१ मी x २६ मीटर आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशव्दारात प्रत्येकी १० मीटर उंचीचे सहा स्तंभ आहेत. मंदिराच्या अंतर्भागांचे बरेचसे अपेक्षित अवशेष न सापडल्यामुळे या मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले असावे असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.


हर्क्युलीसच्या मंदिराचे अवशेष : ०१

.


हर्क्युलीसच्या मंदिराचे अवशेष : ०२

.


हर्क्युलीसच्या मूर्तींच्या हाताचा अवशेष (तसा काय फार मोठा नाही माझ्या हातापेक्षा Wink )


बायझँटाइन काळातील चर्चचे अवशेष

पाच-सहाव्या शतकात बांधलेल्या या चर्चचे फक्त काही खांब आणि कुसाचे अवशेष राहिलेले आहेत.


बायझँटाइन काळातील चर्च


इतर काही अवशेष


अम्मान सिटॅडेल : ०१

.

 ...
अम्मान सिटॅडेल : ०२ आणि ०३

.


सिटॅडेलवरून दिसणारे टेकडीच्या पायथ्याशी असलेले रोमन अँफिथिएटर

.


सिटॅडेलवरून दिसणारे रोमन अँफिथिएटरचे कार्यालय

.

सिटॅडेलवरून आमच्या पुढच्या थांब्याकडे नेणारा रस्त्याचा काही भाग अम्मानच्या आधुनिक उच्चभ्रू वस्तीतून जात होता...


आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०१

.


आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०२

.


आधुनिक अम्मानमधिल नविन वस्ती : ०३

.

नव्या-जुन्याची सरमिसळ असलेल्या अम्मानमधून आमची गाडी अज्लून किल्ल्याकडे निघाली...


एका जुन्या वस्तीच्या मागे दिसणारा अम्मान सिटॅडेल

(क्रमशः )

===================================================================

जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०६... ०७... ०८ (समाप्त)...

===================================================================

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

झक्कास सुरुवात, मजा येते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली प्रवासवर्णने यापूर्वी वाचलेली आहेत अन अतिशय आवडलेली आहेत. ऐसीवर आपले स्वागत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली जग फिरण्याची, ते टिपण्याची नि त्यात आम्हाला सहभागी करून घेण्याची शैली बहारदार आहे.
---------------
लोक जन्रली नायगारा धबधब्याचे फोटो टाकतात, पण आपण काय दाखवून आणाल त्याचा नेम नसतो. ते आपल्या भटकंतीचं सौंदर्यस्थल आहे.
------------
बाकी तुमचा हात पाहून हर्क्यूलिस नक्कीच घाबरला असणार! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

<<<बाकी तुमचा हात पाहून हर्क्यूलिस नक्कीच घाबरला असणार!>>>

माझा पण तोच अंदाज आहे. कारण सगळ्या सहलीत त्याने माझ्या समोर यायचे धाडस केले नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वा वा!
ऐसीवर मनंपूर्वक स्वागत आहे. सुरूवात उत्तमच झाली आहे.

१७०० किमी इतका प्रवास बसने केलात! तुम्हाला साष्टांग दंडवत!

बाकी जुन्या अम्मामचा फोटो कातील आहे! नजर हटता हटत नाही.

काही प्रश्न विचारतो (प्रतिसादातच उत्तरे हवीत असे काही नाही, लेखमालिकेतील पुढील भागांतून अधिक तपशीलात उत्तरे येणार असतील तर छानच)
=====
१. भारतीयांना जॉर्डनचा व्हिजा मिळवणे कितपत सुकर/दुष्कर आहे?
२. तिथे सामान्यांना इंग्रजीचे ज्ञान आहे का? किती आहे?
३. सदर देश कितपत "टुरिस्ट फ्रेंडली" आहे (उदा. इंग्रजी रस्त्यांवरील पाट्या, सार्वजनिक वाहतून व्यवस्थेची स्थिती, तेथील लोकांचा एकुणात टुरिस्टांना मदत करायचा अ‍ॅटिट्युड - हा कदाचित तुम्हाला जाणवला नसेल कारण तुम्ही गटात होतात, प्रवासी मदत केंद्रे इत्यादी)
४. सदर देश एकट्या-दुकट्याने फिरण्यासाठी योग्य आहे का? १. किती सेफ आहे २. हॉस्टेल्स/घरगुती सोय/स्वस्त गेस्ट हाऊसेस/स्वस्त हॉटेल्स कितपत आहेत ३. दोन शहरांमधील प्रवास स्वत: करायचा म्हटल्यास सार्वजनिक व्यवस्था कशी आहे?
======

बाकी प्रश्न विचारत जाईनच. तेथील लोकांशी काही बोलण्याचा योग आला असल्यास त्या अनुभवाबद्दलही लिहावे ही विनंती.

===

तर असा आहे हा आजचा जॉर्डन... ७७,८०० चौ किमी क्षेत्रफळाच्या भूमीवर वसलेल्या ६०-६५ लाख लोकसंखेचा देश. या लोकसंखेत ९८% अरब आणि ९२% मुस्लिम आहेत. बराचसा वाळवंटी असलेल्या या देशातला सर्वात मोठा पर्वत १,८५४ मीटर उंच असून त्याची शिखरे हिवाळ्यात बर्फाच्छादित असतात आणि सर्वात सखोल जागा असलेला मृत समुद्राचा किनारा जागतीक समुद्रसपाटीच्या ४२० मीटर खाली आहे ! उन्हाळ्यात रखरखीत उष्ण असणार्‍या या देशात हिवाळ्यात अम्मानसह व इतर काही डोंगराळ भागांत हिमवृष्टी होते.

ही नोंद अतिशय रोचक आहेच शिवाय या देशाविषयी कुतुहल + तिथे जायची इच्छा जागृत करणारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१. भारतियांना जॉर्डनचा व्हिसा मिळणे काही कठीण नाही. सर्वसाधारण प्रोसिजर असते.

२. मोठ्या शहरात आणि पर्यटन स्थळांत इंग्लिश जाणणारे बरेच लोक असतात. इतर ठिकाणी अरबी येत नसल्यास समस्या होऊ शकते.

३. सर्वसाधारण जॉर्डेनियन माणसाचा व्यवहार मैत्रीपूर्ण होता. भारतियांबद्दल त्यांना जवळिक वातते असेच वाटले.

४. देशातील मुख्य पर्यटक ठिकाणे सुरक्षित वाटली. पण एकट्यादुकट्याने देशाच्या अंतर्भागांत अथवा शहरांच्या काही कुख्यात भागांत जावू नये असा सल्ला आमच्या मार्गदर्शकाने दिला होता. हॉटेल्स सर्व प्रकारची आहेत... स्वच्छता कमीजास्त असू शकते... घासाघीस करणे ही जॉर्डनमध्येही सर्वमान्य गोष्ट आहे Wink

५. अंतर्गत प्रवास बस व खाजगी वाहनाने करता येतो. खाजगी वाहने वापरताना घासाघीस आवश्यक असते आणि त्यासाठी अरबी येणे फार उपयोगी / आवश्यक असते Smile

फिरताना प्रसंगानुरूप अजून बरीच माहिती येईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रवासवर्णनाची सुरुवात आवडली. पुढील भागाची वाट पाहतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्सुकता वाटली. जॉर्डनच्या माहितीमध्ये आलेलं आकाबा शहर म्हणजे 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' जिथे जाण्याचा घाट घालतो तेच काय?

फोटोही आवडले. (जुन्या अवशेषांच्या फोटोंमध्ये मानवी आकार दिसल्यामुळे वस्तू/वास्तूच्या आकाराची कल्पना येते.) जुन्या अम्मानमध्ये आत, रस्त्यांवरून फिरलात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय, तेच रक्तसमुद्रातल्या गल्फ ऑफ अकाबावरचे शहर ! या सहलीत आपण त्या शहराला आणि लॉरेन्सच्या घरालाही भेट देणार आहोत Smile

जॉर्डनच्या शहर-खेड्यात हिंडलो. सर्वसाधारण जॉर्डेनियन माणसाचा व्यवहार मैत्रीपूर्ण होता. मात्र अम्मान व इतर मोठी शहरे सोडल्यास इतर ठिकाणी अरबी येत नसल्यास इंग्लिश बोलणारा मार्गदर्शक जरूर आहे. आम्ही स्थानिक मार्गदर्शकाची सोय केली होती. शिवाय अरबस्थानात बराच काळ राहीलो असल्याने वेळप्रसंगी आमच्या अरबीचा त्यांच्यावर प्रयोग करून काम भागवले Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन्दार, सारीका, मन, अतिशहाणा : अनेक धन्यवाद ! सहलित असाच सहभाग असू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हराक्लेस (हर्क्युलीस) चे मंदिर
येथे इ स १६२ ते १६६६ मध्ये बांधलेले हर्क्युलीसचे मंदिर आहे.

थोडासा छिद्रान्वेषीपणा करतो. तुम्हाला इ.स. १६२ ते १६६ म्हणायचे असावे.
बाकी नेहेमीप्रमाणेच उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय ते १६६ च आहे. टंकनदोष सुधारला आहे. धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जॉर्डन, सिरीया, इजिप्त या संपूर्ण भागातील ऐतिहासिक गोष्टी पहायची इच्छा आहे, अर्थात तोवर शिल्लक राहिल्या तर. तुमचा हेवा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जॉर्डन सुरक्षित आहे. इजिप्त सद्या जरासा अस्थिरच आहे. या दोन्ही देशातील पर्यटन स्थळे शाबूत आहेत. दुर्दैवाने सिरियाच्या यादवी युद्धात प्राचीन ठेव्यांची बरीच हानी झाल्याचे वाचत आहे, नक्की काय अवस्था आहे हे यादवी युद्ध संपल्यावरच कळेल.

जॉर्डनबरोबर सिरिया आणि लेबॅनॉन (हा देश खूप सुंदर आहे असे ऐकून आहे). पण काही स्थानिक घटनांमुळे ते दोन देश बघण्याचे टाळावे लागले. लेबॅनॉनचा तर व्हिसाही काढलेला होता Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा व्वा, सर्वात प्रथम ऐसीवर प्रवासवर्णनं लिहायला सुरुवात केली ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद! मज्जा Smile

१७०० किमी बस-प्रवास हे फार भारी वाटलं, विमानाने वेळ वाचतो हे बाकी खरं पण बस प्रवासामुळे आजूबाजूची मजा पाहता येते - त्यातल्या त्यात नवीन ठिकाणचा प्रवास असेल तर अजूनच उत्सुकता आणि गंमत ( पैसे वाचतात हा महत्त्वाचा व्यावहारिक फायदा असतोच).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ना. सर्वात प्रथम १७०० किमी म्हटल्यावर नाखूषच होतो. कारण त्या अगोदर ७००-८०० किमी च्यावर बसने प्रवास केला नव्हता. पण अजून सहा जणांची सोबत असल्याने आणि प्रवासातले आठ तास रात्रीचे (झोपेचे) असल्याने वेळ तसा मजेतच गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0