आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ६
पहिल्या वीस मूव्ह्ज
पहिल्या दहा मूव्ह्जपर्यंत बऱ्यापैकी पुस्तकी खेळ चालू होता. त्यात दोघांनी वजिरावजिरी केली. त्यापायी आनंदचं कॅसलिंग हुकलं. पण वजिरासारखे मोठे मोहरे जाऊ लागतात तसतसा कॅसलिंगचा फायदा कमी होत जातो. दहाव्या मूव्हला आनंदने आपला घोडा डी७ वर आणला. कॉमेंटेटर्सच्या मते ही काहीशी नवीन पण जास्त बचावात्मक खेळी होती. त्यानंतर आनंदने उंटाच्या बदल्यात घोडा घेऊन वजिराच्या बाजूला कार्लसनचं डबलपॉन आणलं. त्यानंतरच्या मूव्ह्ज दोघांनीही आपापल्या डावाची बांधणी करण्यात घालवला. आनंदने राजा हलवून उंट व हत्तीला मोकळी जागा करून दिली आणि त्याची कमकुवत डावी बाजू बळकट केली. कार्लसेनने एच प्यादं पुढे सरकवत त्या बाजूवर हल्ल्याची तयारी केली.
नाट्य!
पंचविसाव्या मूव्हपर्यंत डाव तुल्यबळ, पण पांढऱ्याची बाजू काकणभर सरस दिसत होती. दोघांच्याही कमकुवत जागा आणि पुरेसा डेव्हलप न झालेलं आक्रमण यामुळे डावात काहीही होऊ शकेल अशी शक्यता होती. बहुतेक कॉमेंटेटर्सना हा खेळ लांबवर चालून ड्रॉ होणार बहुतेक असं वाटत होतं. आणि अचानक कार्लसेनने एक प्रचंड चूक केली. आपला राजा त्याने डी२ वर आणून ठेवला. त्यानंतर 26...Ne5 27.Rg8 Nc4 + झाल्यावर आनंद किमान एक प्याद्याने वर जाऊ शकला असता! आणि एवढा प्रचंड फायदा काळे मोहरे घेऊन खेळताना मिळणं सहज शक्य नसतं.
पण दुर्दैवाने त्याने या चुकीचा फायदा घेतला नाही. आणि कार्लसेनला ताबडतोब आपली चूक सुधारायची संधी दिली. या मूव्हला जाऊन तिथे सर्व इंजिनं काय म्हणतात हे पहावं. कार्लसेन १.०+ ने पुढे होता, ती आघाडी नाहीशी होऊन तो सुमारे १.५ ने मागे पडत होता. एवढा प्रचंड स्विंंग होण्याइतकी चूक कार्लसेनसारख्याकडून सठीसामाशी होते. त्याचा फायदा न घेण्याची चूक आनंदसारख्याकडून तितक्याच कमी वेळा होते. दोन खेळींमध्ये हे थरारनाट्य घडलं. त्यावेळी पाहणाऱ्या अनेक कार्लसेनचाहत्यांचे आणि आनंदचाहत्यांचे जीव भांड्यात आणि भांड्याबाहेर पडले असावेत.
पस्तिसाव्या मूव्हपर्यंत
आनंदची परिस्थिती बऱ्यापैकी दयनीय झालेली आहे. कार्लसेनने राजाची बाजू साफ केलेली आहे. आनंदचं पुढे आलेलं प्यादंही गेलेलं आहे. अजूनही आनंदला दोन प्यादी मिळवून तूट थोडी भरून काढता येईल. पण राजाच्या बाजूला तीन मोकाट प्यादी असणं फारच धोकादायक आहे. कार्लसेन जिंंकण्याची आता जवळपास खात्री व्हायला लागलेली आहे.
सिसिलियन कान व्हेरिएशन