प्रिय मिलिंद, ... तुझा बाबा.

१५-०७-२०१४

प्रिय मिलिंद,

जन्मदाता म्हणून काही वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये माझ्या वयाच्या सत्तरी दरम्यान आयुष्याच्या समाप्तीचा भास व्हायला लागला होता तेव्हा तुला एकमेव असं एक पत्र मी लिहिलं होतं. आणि आता हे दुसरं बहुदा अखेरचं लिहितोय. तसं पहिल्या पत्राला पुरवणी म्हणून मनात काहीबाही साठतच होतं, पण नाना निमित्तांनी लिहिणं आजचं उद्यावर होत गेलं ते या क्षणापर्यंत. आता मात्र "Tough time is all that I have, I may find one day that I have less than I think" असं तीव्रतेने वाटायला लागल्यानं या क्षणी लिहिता झालो. आता गाडी outer signal ला असताना जी धांदल होते तसं जगणं सुरु आहे!

आताही वर्षानुवर्षांच्या सवयीनुसार संध्याकाळचा बाहेरच्या पोर्चवर बसून असतो. आता फरक एवढाच की पूर्वी या वेळी येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी असे आणि अधेमधे वाचनही असे. आता मात्र शून्य मनानं केवळ निष्ठत असतो. शेजारच्या वाहत्या रहदारीशी माझं काहीएक घेणंदेणं नसतं, तरीही त्या निरर्थक गजबजीनं मनाला किंचितसा चेतनास्पर्श होऊन जाति, आणि त्यातून मनाचं एकाकीपण तेवढ्यापुरतं पुसलं जातं. हे सारं रात्री अकरा-बारा पर्यंत. नंतर परिसर विझल्यागत होतो, आणि मी घराच्या पोकळीत परततो. अशात येणारा प्रत्येक नवा दिवस कालच्यासारखाच असतो. म्हणजे साऱ्याच रात्रीचे कार्बन मध्ये घालून काढलेल्या दिवसांच्या कॉपीज!

तर म्हटल्याप्रमाणे 'पुढं काय?' असं दिवसाला दिवस जोडत जगत असता सहजगत्या एक अ‌वतरण वाचण्यात आलं आणि त्यातल्या मोजमापानुसार आपण आजवर किती जगलो ते तपासून बघण्याची उत्सुकता चाळवली गेली. ते वाचून लक्षात आलं की कळत-नकळत का होईना आपण त्याच रस्त्या‌वरून पायपीट केलीय. त्यात आपण जरी फार उंची गाठली नाही तरी किमान चार पावलं टाकण्याचा प्रयत्न केला एवढ्याही जाणिवेनं तृप्तीचा ढेकर येऊन गेला. प्रस्तुत अवतरणानुसार "जीवन सुखी आणि सार्थ व्हायचं असेल तर त्यासाठी सातत्यानं नवनवे उपक्रम आणि सर्जनशीलता ही हवीच. मात्र हे काही सहजमान्य नसतं, तर त्याला निवडस्वातंत्र्य आणि कृतीशीलता लागते. आपल्यासमोर नवनव्या संधी नित्य येतच असतात. त्यातून निवड करून आणि त्यानुसार कृती करूनच आपण आपला अनोखा प्रवास सुरू ठेेवत असतो." हे मूळ इंग्रजी वचन धारदार असल्यानं तेही इथे देतोय.

"A happy and meaningful life requires continous input and creativity. It does not happen by chance. It happens because of our choices and acions. And each day we are given new opportunities to choose and act and, in doing so, we create our unique journey keep going."

माझं आरंभीचं जन्मदारिद्र्यातलं अस्थिर आणि हलाखीचं आयुष्य जगून झाल्यावर ऐन विशीतच मिळालेल्या शाश्वत कारकुनीचं प्रथमच ते स्थिरावून काहीसं सुखावलं, कारण तोवर सतत कुरतडणाऱ्या पोटाला कायम दाणागोटा मिळाला. पुढलं सारं आयुष्य याच निर्धारित रुळावरून जाणार हे निर्विवाद असताना जणू नियत असल्याप्रमाणे काही आत्यंतिक अप्रिय घटनांनी नोकरीची खालमानी लाचारी पत्करल्याबद्दल स्वतःचीच घृणा आली. आणि अखेर तिचं जोखड फेकण्याच्या वेडाचारातून मी आरंभी पत्करलेल्या चारचौघांच्या राजमार्गावरून स्वखुबीनं निवडलेल्या एकाकी आडमार्गावर फेकला गेलो. नंतर "luck is indeed where, preparation meets opportunity" या सूत्रानुसार स्वतःतले उपजत गुण आणि पात्रता या आधारे आयुष्य विस्तारणं हा रिवाज झाला. या अखंड जुगारात, लौकिकार्थानं ज्याला सुख म्हणतात ते बरचसं गहाळ झालं, आणि कायम समस्या आणि आव्हानं हाच त्याचा पर्याय झाला. त्यात धाडसाचा शिकारी थरार होता आणि यशापेक्षाही थोरला असा केवळ प्रयत्नांचा आनंद होता. आयुष्य सार्थ ठरलं ते या आगळ्या अंगानं!

वरीलप्रमाणे आयुष्यातलं चढावाचं पर्व संपलं, आणि नंतर एका लेखकानं ज्याला "magnificent melancholy of the twilight" असं म्हटलंय ते उतार आणि उदासपर्व सुरू झालंय, पोटभर जेवल्यानंतर गुंगी यावी तसं! तसं पाहता लौकिकार्थानं 'धन, धान्य, पुत्र-पौत्र' हे अलंकार प्राप्त होताच कुणीही सुखी व्हायलाच हवं, पण काहीही न करता नुसतं श्वासापुरतं जिवंत राहणं माझ्या रक्तात नसताना मर्यादांनी नेमकं तेच आता वाट्याला आलंय. इतरांना जे वरदान वाटतं ते मला शापवत वाटावं ही माझ्याबाबत 'Divine comedy' झाली आहे. वार्धक्यावर फारा वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या माझ्याच एका लेखातलं एक वाक्य आज माझ्यावरच जड शिळेसारखं आदळलंय. ते म्हणजे 'मग जगायला तयार नाही, आणि शरीर मरायला तयार नाही हीच वार्धक्यातली खरी समस्या असते.' आता स्वच्छ कबुली द्यायला हवी की त्याच लेखात नवनवे प्रयोजन साकारून 'मरेपर्यंत जगायचे हा माझाच सल्ला आज माझ्याच अंगलटीशी आलाय!'

वरील कोंडीत काही ना काही नवा तोडगा शोधण्याच्या बेसुमार धडपडीत प्राप्त अवस्थेत एकच गोष्ट मला शक्य वाटली ती म्हणजे आपण आजवर जगलो म्हणजे नक्की काय केलं, आणि काय साधलं? वयाची एक्याऐशी वर्षं ओलांडली म्हणजे पशूसारखा केवळ जीवशास्त्रीय हट्टानं जिवंत उरलो का? तसं जर नसेल तर त्यात चिमूटभर का होईना अर्थ वा आपली उपलब्धी (achievement) कुठली? या गूढ प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी diver सारख्या स्वतःच्या अंतस्थात खोल डुबक्या घेत शोधत असता मनाचे आजवर बंद ठेवलेले दराजे खुले होत जाऊन मन काहीसं रमत गेलं. वेगळ्या शब्दांत आपण आजवर रूढ रस्त्याबाहेर जाऊन जे वेडंवाकडं जगलो, नाना उद्योग-व्यवसाय केले, 'पडेन पण पडून राहणार नाही' या जिद्दीनं जय-पराजय स्वीकारले, ही केवळ बचावात्मक अशा जीवशास्त्रीय प्रेरणेतून उद्भवलेली मालिका होती की ती मागं सुप्त मनातलं कुठलं तरी धोरण वा प्रयोजनात्मक सूत्र होतं हे तपासण्याच्या ओघात मनात एकाएकी एक flashy कल्पना आली की व्यापारी जगतात ज्याप्रमाणे आर्थिक वर्षाअखेरी झाल्या उलाढालीतून 'क्या खोया, क्या पाया' या नात्यानं ताळेबंद (balance sheet) सादर केला जातो त्याप्रमाणे आपणही आपल्या आयुष्याबाबत एक आढावा का घेऊन नये? हा प्रयत्न जसजसा होत गेला, तसतसा कधी नव्हे तो माझ्यातल्या 'मी'ला आपसूक उमगत गेलो, आणि सावकाशीनं माझ्या जगण्यामागची सुप्त प्रेरणा (purposive drive) उलगडत गेली. एका अर्थानं माझ्या आत्मचरित्राचाच हा ढोबळ printout होता.

आता आयुष्याचा एकूण पट पाहताना ते सुखाचं नसलं तरी काही अंशी अर्थपूर्ण झाल्यानं किमान एक सिद्ध केलं की 'I am not dying invain, I am dying a solvent man' तथापि तृप्त जेवणाच्या भूतकालीन आठवणीनं वर्तमानकालीन भूक जशी शमत नाही तसंच यापुढल्या जगण्याला समोर नव्या ताटाची निकड वाटायला लागलेली आहे. म्हणून त्याच्या शोधात शक्यतेच्या कोटीतलं एक अखेरलिखान म्हणून काही लिहावं हा छंद हाती घेतला. खात्रीनं ते आत्मचरित्र नव्हे. तेवढा थोर मी नसल्यानं तसला समृद्ध data मजजवळ नाही. तथापि जो काही तोकडा आहे तो कदाचित माझ्यासारख्या सुमारांना पुरेसा होईल असं मात्र वाटून गेलं. जोडीला नाही त्याच्या व्यर्थ पाठी लागण्याऐवजी आहे त्याचा कल्पक उपयोग करून महत्तम सुख-समाधान कसं साधता येईल ते बघणं हे त्याचं सूत्र असल्यानं त्या प्रयोगाला जगण्याच्या कलेचा दर्जा देण्याचा माझा प्रयत्न आहे. यात पैसा हे एकून साधनसामग्रीचं (means) असल्यानं माझ्या या पुस्तकाला "झेन आणि पैसे खर्च करण्याची कला" हे तंत्रस्वरुप शीर्षक ठरवलं आहे. अंतिम दृष्ट्या हे पुस्तक पूर्ण होवो न होवो, किमान त्यातले गाभ्याचे मुद्दे (core points) तुम्हां दोघा पोरांना कळावेत म्हणून तर हे पत्र लिहायला घेतलं. तसं पाहता आजवरचं सारंच मानवी ज्ञान हस्तांतरातून साठत आलेलं आहे. अशात एक पिता या नात्यानं आजवरच्या माझ्या जगण्यातून मला जी काही थोडीफार समज आली ती तुम्हां पोरांहाती सोपवणं हे मला कर्तव्य वाटल्यानं हा पत्राचा खटाटोप आहे.

जन्मसंदर्भात आखून दिलेल्या मार्गावरून जगत असताना अकल्पितपणे पुढे माझ्या आयुष्याला लागलेल्या नव्या अशा दीर्घ वळणाला तू थोरला म्हणून बऱ्याच प्रमाणात साक्षी आहेस. त्यातले टप्पे तसंच उपवळणं पाहता अन्यांच्या तुलनेत मी काही फार भव्यदिव्य असं साधलं नसलं तरी अभावितपणे झालेल्या एका प्रयोगाचा data म्हणून त्याला काहीसं मोल असल्याचं मला वाटत राहिलं. या कारणानं स्वतःच्या पूर्वेतिहासाकडे case study या नात्यानं मी तिऱ्हाईताच्या नजरेन्या झालेल्या बदलांमागचं आदीसूत्र (thread) शोधण्याची ही उचापत आरंभली आणि आताच्या अखेरवयात 'स्व-तंत्रानं अधिकतम विविधतेनं जगणं' या माझ्या हट्टाग्रही भूमिकेत मला ते गवसलं. म्हणून आजवर मी जे काही वेगवेगळं करत गेलो ते या मूळ धोरणाचेच वेगवेगळे फादे वा अवयव होते हे आज उमगलंय.

योगायोगानं आताच्या क्षणीच वरील भूमिकेची फारा वर्षांपूर्वी डायरीत लिहिलेली एक नोंद आठवली. तीत मी म्हटलं होतं की, "जन्म संदर्भातच्या चतुःसीमात स्वतःला कायम कोंडून न घेता उध्वस्त होऊन स्वतःत काही worth गवसते काय ते शोधण्याचा माझा प्रयोग आहे. जगानं आरंभी नाकारणं आणि पुढे सन्मानानं स्वीकारणं या अतिरेकांना सांधून आयुष्याचं वर्तुळ आता पूर्ण होत आलंय. पण सोबतच वर्तुळ हे एका अर्थानं पूर्णत्व असलं तरी दुसऱ्या बाजूनं ते शून्यही असल्यानं त्यात आपला वाटा कुठला हा नवाच प्रश्न समोर उभा झालाय. या आधी मी ज्याला 'नफा-तोटा पत्रक' म्हटलंय ते नेमकं हेच!

मी जन्मलो त्या कुटुंबाची रोजच्या दोन घासांची वानवा ही स्थिती पाहता घरातला थोरला मुलगा म्हणून शिक्षण घेण्यादरम्यान सरकारी नोकरी हे तिचं उद्दीष्ट माझ्या मनावर पुरेपूर ठसवण्यात आलं होतं. वेगळ्या विचाराची कुवत नसल्यानं एक सुखद स्वप्न म्हणून मी ते स्वीकारलंही होतं. म्हणून पुढं ती मिळताच मी लगोलग मनानं स्थिरावलो. अन्न, वस्त्र, निवारा या जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्णपणे भागल्यावर पुढं अनपेक्षितपणे आयुष्यात असमाधानाचं जे एक नवं पर्व सुरू झालं त्या दरम्यान पर्यांचा शोध सुरु असताना जी.एं.च्या 'इस्किळार' या कथेतल्या एका वाक्यानं मला कायम धीरदायी सोबत केली. त्यात ते म्हणतात, "माणूस मुख्यत्वेपणे गुलाम असतो तो आपल्या मनात! मग असे लोक कोणत्यातरी प्रमुखामागून आंधळेपणानं जातात, मठात राहतात, किंवा कोणत्यातरी प्रेषितामागे मेंढराप्रमाणे फिरतात. स्वतंत्रपणे जगण्याचे ओझे सगळ्यांनाच पेलत नसते, तर आपण गुलाम आहोत ही कठोर जाणीव पूर्णपणे स्वीकारणारा माणूस स्वतंत्र होतो." याचंच एक बुलंद उदाहरण म्हणून बाबासाहेब आंबेडकर मला सतत आठवत राहिले.

स्वतःच्या निमित्तानं प्रस्थापित परिस्थिती आणि व्यवस्थेविरुद्ध झाल्या बंडखोरीची जी काही उदाहरणं माझ्या वाचण्या-ऐकण्यात होती त्यांच्यातून काही universal प्रेरणा वा सूत्र आहे का याचा कुतूहल म्हणून एक शोध माझ्या मनात कायम सुरू राहिलेला आहे. त्यातून जे काही मला गवसलं आणि भावलं ते मुद्दाम इथं द्यावसं वाटतंय.

मुळात कुठलीच बंडखोरी निष्कारण वा दिशाहीन नसते म्हणजे ती मागे कुठलातरी प्रयोजनात्मक विचार असतो. या अर्थानं तिला बौद्धिक आविष्कार मानावं लागतं. तथापि निखळ विचारातून बंडखोरी झाल्याचा इतिहास नाही. तसं असतं तर केवळ सुविचारी भाषणं ऐकून वा धार्मिक ग्रंथ-पुराणं वाचून माणसं सुधारली असती. तात्पर्य विचारांचं कृतीत रूपांतर होण्यासाठी सबळ प्रेरणा म्हणून कुठल्यातरी भावनिक उद्रेकाचा रेटा वा push लागतो. जेणेकरून शुद्ध विचाराचं श्रद्धेत वा निष्ठेत रुपान्तर होतं. हे झालं की कृतीत उताविळी येते. असं व्हावं याला जीवशास्त्रीय कारण आहे. मुळात पशूत भुकेतून निर्माण होणारी जीवशास्त्रीय तीव्रता मानवात तृप्तीची अनावर ओढ असलेल्या इच्छेत रुपांतरित होत असते. याप्रमाणे एखाद्या व्यापक इच्छेचं रुपांतर जीवनव्यापी ध्येयात झालं की बाधा झाल्याप्रमाणे त्याच्या पाठलागाचं वेड मन व्यापतं. आपल्या भाषेत 'ध्येयवेडा' ही संज्ञा रूढ झाली ती या अर्थानं! एक योगायोग म्हणजे या वेडाचं यथातथ्य रुप सांगणारं एक अवतरण जी.एं.च्या 'वेड' नावाच्याच कथेत गवसलं. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य यांच्या पराकोटीच्या मागावत असलेल्या तीन तरुणांचा हा किस्सा आहे. त्यांच्यातल्या एकाच्या तोंडी एक प्रातिनिधिक वाक्य आहे की "आम्हां सगळ्यांना नखभर ओली माती गोळा करत किड्यांचे घर बांधून राहण्याचा तिटकारा आला आहे. वितभर वासना, मेणाच्या थेंबाएवढी तृप्ती, हे आम्हाला क्षुद्र वाटते. वासना वणव्यासारखी असावी आणि, एखादी प्रचंड लाट येऊन त्यावर आदळावी त्याप्रमाणे तिची तृप्ती व्हावी, मग त्यात आमचा नाश झाला तरी चालेल असे आम्हाला वाटते."

वरील विनाशकारी वेडाचं अतिरेकी रुप म्हणजे हुतात्मे. गांधी, ख्रिस्त ही यातली थोरली उदाहरणं. हिमालयाचं शिखर गाठण्याच्या स्वप्नात संपलेले, अज्ञात भूमीच्या शोधात समुद्रात बुडालेले, असे आजवर गहाळ झालेले कित्येक आहेत, त्याच जातकुळीचे पण किडा-मुंगीसारखे माझ्यासारखे तर अगणित असतील. माझ्यासाठी तर अशाशी चुलतभाऊगिरी करणंही समाधानाला पुरेसं आहे.

वरील संदर्भात जी.एं.चं आणखी एक अवतरण मला विलक्षण भावलं कारण त्यातून मला माझ्याच व्यक्तिमत्त्वाला पण मलाच आजवर अज्ञात असलेला एक पैलू एखाद्या साक्षात्कारातला जाणवला. त्यात ते म्हणतात, "आत्मघातकी, कठोर, अशक्यप्राय निर्णय घेताना त्याचे भीषण परिणाम माणसाला ज्ञात असतात, पण त्यात चिरडून जाताना हा सारा कल्लोळ माझ्या स्वतःच्या डोळस आणि जाणीवपूर्वक केलेल्या कृतीचा आहे. आपणास तो हवा होता म्हणून आपण तो निर्णय केला, ही जाणीव देखील अतिउत्कट असू शकते. त्या क्षणी, आणि तेवढ्याच क्षणी 'मी'चे अस्तित्व असते ... सतत काहीतरी घडत असते या जाणीवेपेक्षा आपण काहीतरी घडवत आहोत ही जाणीव फार मोलाची असते."

मी उत्तरायुष्यात वरील अवतरणाबरहुकुम वागलो हा आताच्या क्षणी मला झालेला साक्षात्कार आहे. कारण त्यात सर्वसाधारण लोक त्याज्य मानतात त्या प्रकारचा एक अहंकार म्हणजे 'मी'पणा गृहित आहे. खरं तर त्यातच जोरकस कृतीप्रेरणा (motivational force) असू शकते. माझ्यात जन्मजात लहरीपणा, हट्टीपणा आदि दुर्गुण होते. बहुधा त्यातूनच माझ्यात जिद्दीपणाचा उगम झाला असावा, आणि जोडीला त्यातून आपण परिसरातल्या अन्यांपेक्षा वेगळे आणि वरचढ आहोत हा अहंकार पोसला गेला असावा! म्हणूनच नोकरी-चाकरीतली शरणागती मला असह्य झाली असावी. काही का असेना, त्यातून आपण इतरांवर अवलंबून असण्यापेक्षा इतरच आपल्यावर अवलंबून असावेत असं अद्वितीय काही आपल्यात असल्याचं सिद्ध करण्याचं आव्हान उद्भवलं हे माझ्या दृष्टिनं मोलाचं! म्हणूनच तर आरामदायी नोकऱ्या सोडून स्वतःला अधिकाधिक असुरक्षित करवून घेण्यात सारं पूर्वायुष्य उफराटं होऊन त्याला सर्वस्वी वेगळं वळण लागलं. नंतर तीन दशकं कुठलाही स्थिर भांडवली व्यवसाय व तांत्रिक पात्रता नसता मी स्वबळावर मुजोरीनं जगू शकलो हा माझ्या प्रयोगाच्या आंशिक साफल्याचा पुरावा आहे. अर्थात, माझा प्रयोग फसला असता तर माझ्यासह घरातल्या सगळ्यांचं आयुष्य पूर्णतः उध्वस्त झालं असतं हेही खरंच! पण असा काही जुगारी अंश नसेल तर ते धाडस कसलं?

आजच्या क्षणी एकूण आयुष्याचं सारश्रेय शोधताना एक नवी समज आली की 'सुख' ही एकूण अत्यंत फसवी, ढोबळ आणि व्यक्तिसापेक्ष संकल्पना आहे. तथापि समूहानं सर्वानुमतानं तिची जी प्रमाणित व्याख्या केली आहे ती 'खाऊन-पिऊन सुखी' म्हणजे केवळ शरीरपोषण आणि वंशवृद्धी एवढ्याच पायाभूत चौकटीची आहे. फक्त तीवर यश, मानसन्मान, नावलौकिक, खानदान आदींची कवचकुंडलं चढवून तिला गोंडस केली गेली आहे एवढंच! तीपासून विचलित होऊन कुणी जरा जरी हटून वेगळं जगायचं ठरवलं तर त्याची कळपाबाहेर भरकटलेलं मेंढरू म्हणून हेटाळणी होते. जसं मी स्वखुशीनं नोकरी सोडायचं जाहीर करताच आप्तस्वकीयांसोबत उर्वरित सगळ्यांनीच माझ्याकडे पाच पायांचं वासरू बघितल्यागत तिरळी नजर केली. असल्या अविचारी धाडसात खात्रीनं माझा खातमा होणार हा भाव बहुतेकांच्या नजरेत उमटून दिसला. मॅट्रिकनंतर मी स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं घरातून थप्पड बसणं हाही प्रकार त्यातलाच!

तात्पर्य, स्वतःचं तीर्थक्षेत्र स्वतः निवडणं हा जणू फौजदारी गुन्हा असल्यागत साऱ्या नजरा माझ्यावर रोखून होत्या. अशात सापळ्यात अडकलेल्या सावजागत माझ्यासमोर दोनच परस्परावलग पर्याय होते. ते म्हणजे सुखाच्या जनमान्य चौकटीसमोर मान तुकवून आत्मसमर्थन करणं, वा सुख-समाधानाची स्वतःची स्वतंत्र व्याख्या करून बंडखोरीचा धोका पत्करणं. मी दीर्घश्वासातून परतीच मार्ग नसलेला दुसरा पर्याय निवडला. याप्रमाणे सुखाची व्याख्याच एकदा वेगळी केली की त्याची साधनंही (means) आपोआप वेगळी होतात. पांडुरंगशास्त्री आठवलेंनी गीतेतल्या 'कर्मधर्मसंयोगा'वर निरुपण करताना नेमकं हेच सांगताना म्हटलंय की "वस्तूपासू मिळतं ते सुख आणि वस्तुशिवाय मिळतो तो आनंद" याचा अन्वयार्थ हा की वस्तूच्या केवळ मालकीचं सुख वेगळं, आणि तिच्या उपभोगातला सृजनशील (creative) आनंद वेगळा! हा फरक अखेर दृष्टिकोनाचा आहे, A matter of perspective! तुकडोजी महाराजांनी नेमकं हेच खालील दोन साध्या कविता ओळींतून सांगितलंय -

॥ राजास जी महाली, सौख्ये कधी न मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

वरील संदर्भात आरंभीच्या माझ्या निवडीच्या काळात वर्षापूर्वी मी पत्रातून व्यक्त केलेली एक नोंद आहे. तीत मी म्हणाले होतो की 'सुख' ही बाहेरून आयात करण्याजोगी बाब नाही तर ती अंतःस्फूर्त चीज आहे. तिचे अंतस्थातले झरे आटले की तीसाठी बाहेरचे नळ धुंडावे लागतात. या समजाला अनुसरूनच मी सुखाबाबत परावलंबी होण्याचं नाकारून त्याला पर्याय म्हणून 'सृजनशील आनंद' (creative joy) ही संकल्पना सजगपणे स्वीकारली आणि पुढं कुवतीनुसार साकारली. यातलंच थोडंफार यश आज माझ्या गाठीला आहे.

सृजनशील आनंदाची वरील संकल्पना गुंतागुंतीची (complex) आणि अमूर्त (abstract) असल्यानं पत्रात सांगणं शक्य नसलं तरी तो या आणि पुढच्या लिखाणाचा गाभा असल्यामुळे इथं ती सारांशानं देतोय. तशी ती आरंभीच उल्लेखलेल्या पांडुरंगशास्त्री आठवलेंच्या एकाच वचनात गृहीत आहे. ती म्हणजे 'वस्तुशिवाय मिळालेला तो आनंद'. यासाठी तुझ्या आवडीच्या चित्रकलेचंच उदाहरण देतो. रंग, कॅनव्हास वा कागदी ही चित्रकलेची मूलभूत साधनं आहेत, पण ती जवळ असणं म्हणजे काही सुख नव्हे. तसं असतं तर त्यांचे उत्पादक आणि दुकानदारच परमसुखी झाले असते. तात्पर्य, चित्र चितारणं हाच त्यातला निखळ आनंद असतो, आणि ही प्रक्रिया तर सर्वस्वी मानसिक आहे, वस्तुप्रमाणे भौतिक नाही. त्यातूनही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यात मिळणारा आनंद लागणाऱ्या साधनांच्या किंमत आणि आकारापेक्षा अगणितपणे मोठा असतो. म्हणजे न्यूनतम साधनात महत्तम समाधान मिळवता येत याचा हा निर्विवाद पुरावा मानून तो प्रयोग जर जीवनव्यापी केला तर ती जगण्याची कला (Art of living) ठरते.

वर मी कला ही संज्ञा तिच्या रूढार्थापेक्षा वेगळ्या म्हणजे विस्तारित अर्थाने वापरली आहे. रूढार्थानं ती गायन, नृत्य, चित्रकला आणि लेखन आदी ललितकलांसाठी वापरली जाते. वस्तुतः विज्ञान हा जसा पद्धतीचा (methods) प्रकार आहे, मग विषय कुठलाही का असेना; तसा कला हा कौशल्याचा प्रकार असतो. कुठलीही कृती आगळ्या कौशल्यानं करणं म्हणजे कलाकाही! या नात्यानं रुचकर स्वयंपाक तसंच तारेवरून चालणं यासारख्या कौशल्यांना कला म्हणता येतं. याच अर्थानं प्राचीन भारतीय साहित्यात चौसष्ट कलांचा उल्लेख आलाय. त्यात चौर्याचाही समावेश असणं हे विशेष. नेमक्या या संदर्भात एक इंग्रजी अवतरण मला फार मोलाचं वाटतं. ते म्हणजे 'Every artist may not be a unique man, but every man is a unique artist.' म्हणजे प्रत्येक कलाकार हा वेगळा माणूस नसेलही, पण प्रत्येक माणूस मात्र आगळा कलाकार असतो! तात्पर्य, सृजनशील आनंद जीव ओतून केलेल्या कुठल्याही निर्मितीतून मिळवता येतो.

सुख-समाधानानं वेगळ्या प्रकारानं जगण्यासाठी मी व्यंगचित्रकला, काष्ठशिल्पकला आणि लेखन या कलांच्या अनुनयातून वाढलो असलो तरी सृजनशील जगण्याची ती एकमेव रीत नव्हे. कारण ज्यामुळे जीवन वैशिष्ट्यपूर्ण (unique) आणि अर्थपूर्ण होईल असा एकादा तरी गुणविशेष प्रत्येकातच असतो आणि तीच त्याची वेगळी ओळख (identity) असते. निसर्गाचीच ही योजना असावी म्हणूनच अंगठ्याचा ठसा कुणाचाच कुणाशी कधी जुळत नाही. मात्र असं असूनही सर्वसामान्य विरोधाभास हा की 'तुझं आहे तुझपाशी, पण तू जागा चुकलाशी' या न्यायानं अनेकांना आपल्या या आगळेपणाची ओळख नसते, आणि असली तरी धाडसाअभावी हा झरा बुजवून सुमार असं वेगळंच आयुष्य ते जगत असतात. राजमार्गावरती जी गर्दी आढळते ती यामुळेच!

आजवरच्या माझ्या आडवळणी प्रवासात जे काही खळगे उंचवटे आले त्यांचा सुचेल तसा इतिहास सांगण्याच्या ओघात पत्र अवाढव्य होत गेलं, त्या संबंधित अधिक बारकावे आणि तपशील माझ्या 'सांजी' आणि 'रुद्राक्षी' या संग्रहातल्या वेळोवेळी लिहिलेल्या पत्रात येऊन गेला असल्याने आता एका वादग्रस्त पण जिव्हाळ्याच्या मुद्द्याचा उल्लेख करून हे लिखाण आवरतं घेतो. तो आहे 'नियती' या संकल्पनेबाबत.

अनादी काळापासून मानवी विचारविश्वात एक प्रश्न गाजतोय, तो म्हणजे मानव जे जे काही करतो ते होणारच असतं की तो ते घडवतो हा. स्वतःबाबत मला तो आताच्या क्षणी सतावतोय. आजवरच्या झाल्या कृती उघडच माझ्या हातून घडलेल्या असल्यानं उघडच मीच त्यांचा कर्ता असलो तरी माझ्या आयुष्याला दीर्घ वळण देणारी प्रयोजनात्मक प्रेरणा मूळ माझीच का हा प्रश्न बाकी उरतोच! या प्रश्नाच्या उत्तराशिवाय आजवर काही अडलेलं नसलं तरी उत्तराबाबत मनाला अस्वस्थ करणारी एक उत्सुकता जाणवते हे खरं! तथापि आजवरचे असंख्य प्रज्ञावंत जिथं हतबल ठरलेत तिथं माझ्यारख्या नगण्यांनी काही ठामपणे सांगायचं हा निव्वळ खुळेपणा असल्याची पुरेपूर जाण आहे. म्हणून स्वतःपुरतं तडजोडीचं एक कामचलाऊ उत्तर मी शोधलं आणि माझ्यापुरता हा प्रश्न निकाली काढलाय.

वरील प्रश्नाच्या दुहेरी बाजू अशा : माणूस पूर्णपणे स्वतःचा भाग्यविधाता असून तो जे काही करतो त्याची पूर्ण जबाबदारी त्याचीच असते असं मानणारा विचारवंतांचा एक गट आहे. 'Man is born alone, he has no mission, except what he makes for himself.' म्हणजे मानवी जीवनात पूर्वनियोजित काहीच नसून तो जे काही ठरवेल तच त्याचं ईप्सित असतं म्हणणारा ज्यॉं पा सार्त्र हा अस्तित्ववादी अशांचा प्रतिनिधी. हे अमान्य असणाऱ्या दुसऱ्या गटाच्या मते माणूस हा नाममात्र असून त्याला कार्यरत करविती शक्ती दुसरीच असते. या गटातले कुणी तिला ईश्वर तर कुणी पूर्वजन्मीचं संचित मानतात, आणि काही तिला जिचं निश्चित स्वरूप सांगता येत नाही अशी गूढशी अनाकलनीय शक्ती म्हणजे नियती मानतात. हे परस्परविरोधी दावे कधीच निकाली होणार नाहीत अशी आज स्थिती आहे.

वरील वाद निकाली काढण्याची माझी कुवत नसल्यानं स्वतःपुरती कुठलीतरी तडजोड शोधणं मला भाग पडलं, आणि स्वतःपुरती मी ती साधलीही. पिंड हा जन्मदत्त असल्याने नियत म्हणून पुढं त्यातून त्यातून साकारणारा व्यक्तिमत्त्वाचा घाटही तेवढाच पूर्वनिर्धारित म्हणजे preprogrammed ठरतो. तथापि प्राप्त म्हणून तो तसा ठरलेला असूनही जगण्यातून त्याला आकार देताना कराव्या लागणाऱ्या कृतीयोजनांची आखणी आणि प्रसंगानुसार अंमलबजावणी ज्याच्या त्याच्या हाती असल्याचं मानावंच लागतं. अन्यथा मानव आणि पशू तथा यंत्र यात फरकच उरणार नाही! म्हणजे इच्छास्वातंत्र्याला कणभरही अर्थ नसेल तर तो जगण्यातही येणार नाही. तात्पर्य, मानवी इच्छा अमर्याद असल्या तरी त्यांच्या पूर्तीला बाह्यपरिस्थितीच्या म्हणजे साधनसामग्रीच्या अटळ मर्यादा असतात. अशा स्थितीत उपलब्ध त्या साधनांचा कौशल्य आणि कल्पकतेनं वापर करून महत्तम सुख-समाधान साधण्याचं स्वातंत्र्य असावंच लागतं आणि प्रत्यक्षात ते असतंही. म्हणू असला प्रयोग करण्याचा जीवतोड प्रयत्न करणं हीच माझ्याअर्थी जगण्याची कला! जसं चित्रकाराला समोरची चौकट ओलांडण्याचं स्वातंत्र्य नसतं पण तिच्या आत रंगरेषांची हवी ती रचना करण्याचं परिपूर्ण स्वातंत्र्य असतं, तसाच मी सातत्याने याच तंत्राचा वापर केलाय. पैशाअभावी मला fine art कडे जाताच आलं नाही. तथापि निराश न होता टाकावू म्हणून जळावू ठरलेल्या सरपणालाच माध्यम बनवून त्यातून काष्ठशिल्पकला उभारली आणि तीतून सृजनशील आनंद मिळवला. त्याचप्रमाणे चित्रकारितेची उमंग व्यंगचित्रकारितेतून सफळ संपूर्ण केली. पुढचं जीवन सार्थ झालं ते त्यातूनच!

सारांशाने म्हणता येतं की नियती मान्य करणारांत दोन गट पडतात. एकात व्हायचं ते होणारच असेल तर काहीएक न करता स्वस्थपणे वाट बघून झाल्यागेल्याचा बिनतक्रार स्वीकार करणारे म्हणजे 'जे जे होईल ते ते पाहावे'वाले मोडतात. तर दुसऱ्यात व्हायचं ते होणारच हे मानूनही ते पूर्वज्ञात नसल्यानं ते काय या उत्सुकतेतून जोरकसपणे शोधण्याच्या प्रयत्नात हरवलेले मोडतात. म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे! मी पूर्वायुष्यात पहिल्या mode मध्ये होतो तर उत्तरायुष्यात दुसऱ्यात स्थिरावलो. या उपद्व्यापात लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे!

जगण्याच्या वरील दीर्घ प्रयोगात जन्मदत्त नियतीचा असाही एक विरोधाभासी पुरावा मिळाला की आरंभी सहजशक्य वाटणाऱ्या खूपशा गोष्टी मला प्रयत्नांतीही अशक्य झाल्या, आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहजगत्या घडून आल्या. या उनसावलीत फक्त अथक श्रमांची तयारी आणि 'पडेन पण पडून राहाणार नाही' ही निष्ठा कायम राहाण्यातून आयुष्याला अर्थ आला. आता शरीराचं तारुण्य संपलं असलं तरी मनाचं कायम अभंग आहे म्हणून 'बचेंगे तो लढेंगे' या नात्यानं मी स्वतःशीच म्हणतो -

"दर्पणी वार्धक्य माझे
न पाहतो असे नव्हे
समजावतो मीच आपणा
जाऊद्या तो मी नव्हे"

आता अखेर सार सांगायचं म्हणजे आयुष्यात प्राप्त आव्हानांनी आणि दुःखांनी खचून जाऊन ती नाहीशी व्हावीत म्हणून मी कधी देवासमोर नारळ ठेवला नाही. आरंभी बराच भांबावलो, मात्र पुन्हा सावरून लटपटत का होईना नवाच्या गिणतीला उभा होत गेलो, आणि आता केव्हातरी हेच समाधान पांघरून आडवा होणार! असो!

तुझा
बाबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

लहान शून्य म्हणून जन्मलो, आणि मोठं शून्य म्हणून संपतोय हे श्रेयही मला जगण्याच्या तृप्तीसाठी पुरे आहे!
>> a bigger cypher हा याच अर्थाचा धडा आठवला.
-------------
म्हणजे आयुष्याच्या गणिताच्या अखेर उत्तर शून्य येणार असलं तरी ते तसं आहे हे कळायला गणित तर करायलाच हवं हा न्याय जगण्याला लावणारे!
>>> bill अन् melinda gates , warren buffet , Rockfellar किंवा tata वगैरें आयुष्यभर पैसे कमावतात. व नंतर तो स्वहस्ते donate करतात. म्हणजे आयुष्यात आधी कोणत्याही भल्या/बुर्या(रॉबिनहूड,आल्फ्रेड नोबेल वगैरें) मार्गाने पैसे मिळवावे व उतारवयात स्वतःच्याच हस्ते(credit घेउन) खर्च करावे. असे धोरण समाजात मान्य दिसते. म्हणजे मी आता घरदार सोडून निघिलो तर "सडाफटींग कडे काहीच नव्हते म्हणून निघाला" असे म्हणतात. बरं उतारवयात पैसे घेउन आलात तर "आता कशाला आला मरताना" असे म्हणतात. बाकी राजकारणी सुद्धा आपापले गोल pursuit करत असावेत. आपण म्हणतो तमक्याने एवढा पैसा खाल्ला वगैरें. पण पैसा कोणी खात नसतं. एक गाडी ,अनेक गाड्या, बंगले वगैरें घेउन कोणी चाटत नसतं. प्रतिष्ठा,मान,लोकांवर टाकता येणारा दबाव,पुढचै पद मिळवण्यासाठी लागणारी साधनं म्हणून याचा वापर होत असतो.जनता पण नेत्याने तरुणवयात केलेल्या कामाला विसरते.
अनेक निर्माते,अभिनेते वगैरें खस्ता खाउन मोठे होतात अन् आपण त्यांच्या मार्गावर जावे ही त्यांची इच्छा असते. तद्वतच आपल्या आई-वडीलांची इच्छा असणारच की 'कष्ट' करुन कमावलेला पैसे याचे कसलेही ईप्सित मिळवायला का द्यावा? याच्या उलट काहीजण आम्हाला जे मिळाले नाही ते मुलाला मिळावे असे म्हणत आपापल्या मुलांना नाही ते लाड पुरवतात. मग बाहेर काहीही करावे लागले तरी बेहत्तर. म्हणजे प्रत्येक वस्तु वगैरें माझी प्रॉपर्टी असा विचार करत जगतात. समाजसुधारक पण अशाच विचाराने प्रेरित होत असतील. मग या मार्गात अनेक हितसंबंध दुर्लक्षित करावे लागतील. यात काही जण कुटुंब/नातेवाईक इत्यादीना काहीच महत्त्व देत नाहीत तर काही जण तेवढ्यासाठीच जगतात.
मग प्रत्येक पक्ष नेतृत्व आपापल्या कार्यकर्त्यांच्या सोयीचे बघते तर त्याला स्वार्थी जीवन जगणे म्हणता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Anything can be created or destroyed. You just got to have the power to convert it from one form to another.

कसला पकाऊ बाप आहे! याच्या पोराची - तो जो कोणी 'मिलिंद' असेल, त्याची - दया येते. आयुष्यभर असेच बोअर केले असणार थेरड्याने बिचार्‍यास.

बाकी, हा 'मिलिंद' लेकाचा कदाचित बापाची पत्रे न वाचता - कदाचित पाकीट / इन्ल्याण्ड लेटर जे काही असेल ते न उघडतासुद्धा - तशीच कचर्‍याच्या टोपलीत टाकत असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, तो तसेच करत असावा, याची जवळपास खात्री आहे. आणि त्याबद्दल त्यास निदान मी तरी दोष देऊ शकणार नाही.

(बाकी, इतके सारे पकवून घेतल्यावर, त्याच्या बापाच्या ज्या कोठल्या इष्टेटीच्या आशेखातर तो हे सारे सहन करीत असेल, द्याट इष्टेट बेटर बी वर्थ इट, एवढीच आशा व्यक्त करून मी माझे हे चिमुकले भाषण आटोपते घेतो, नि खाली बसतो. धन्यवाद.)
...................
थेरडा कितीही कंजूष असला, किंवा नसला, तरीही, एवढा मजकूर पोष्टकार्डावर खचितच मावू नये! किंबहुना, इनल्याण्ड तरी पुरेल की नाही, शंकाच आहे. पाकिटाससुद्धा मजबूत जास्तीचे पोष्टेज लावावे लागत असणार बहुधा.

विश्वास बसत नसल्यास वाटल्यास एखादे दिवशी गाठा त्यास, आणि बापाच्या पत्रांतील मजकुरावर त्याची तोंडी परीक्षा घेऊन पहा. आणि सांगा तो शून्य मार्क घेऊन नापास होतो की नाही ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतके सारे पकवून घेतल्यावर, त्याच्या बापाच्या ज्या कोठल्या इष्टेटीच्या आशेखातर तो हे सारे सहन करीत असेल, द्याट इष्टेट बेटर बी वर्थ इट

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्र अतिशय आवडलं. पोटाची खळगी भरण्यापलिकडचं शहाणपण सांगताना त्यातली विनम्रता फार भावली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पत्र अतिशय आवडलं.

अय्या! म्हणजे तुम्ही ते वाचले?

दुसर्‍याची पत्रे वाचू नये म्हणतात. सभ्यपणाचे लक्षण समजले जात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मध्यंतरी The age of loneliness is killing us नावाचा लेख वाचला होता. त्यातलं "Our lives are becoming nasty, brutish and long" हे वाक्य फार आवडलं होतं. एकलकोंड्या म्हातारपणी आयुष्याच्या नसलेल्या अर्थाचा कधीच न जमणारा ताळमेळ घालत बसणे आणि इतरांच्या लेखी नगण्य असलेल्या आपल्या अस्तित्वावर प्रचंड आणि पाल्हाळिक विचारमंथन करणे अतिशय करुण आहे आणि त्रासदायकसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय चिंतनशील आणि प्रेरणादायक पत्र आहे .शेअर केल्याबद्दल हार्दिक आभार सर .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय चिंतनशील आणि प्रेरणादायक पत्र आहे .

विदर्भाचे बाजूस कशासही काहीही म्हणतात, याची तशी कल्पना आहे, परंतु तरीही, अधोरेखित शब्दांच्या वैदर्भीय वापराशी परिचित नसल्याकारणाने या वाक्यातून नेमके काय सुचवावयाचे आहे याचा बोध होऊ शकला नाही. तरी कृपया अधोरेखित शब्दांच्या वैदर्भीय अर्थांचा खुलासा व्हावा, एवं सविनय प्रार्थना.
....................
उदा., साबूदाण्याचे खिचडीस साबूदाण्याची उसळ, कोथिंबिरीस सांबार, 'पुढे'ला 'समोर' (आणि म्हणून 'खूप पुढे'ला 'खूप समोर') आणि 'समोर'ला 'पुढे', इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाण्यासाठी दाणागोटा हा शब्द कसा आला? यातल्या 'गोटा' याचा काय अर्थ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मुळात माहीत नाही आणि सध्या व्युत्पत्तीकोश हाताशी नाही.
पण,लहानपणी तांदळांमध्ये (तुसासकटचं) अख्खं भात सापडायचं त्याला भातगोटे म्हणत असू.
अंदाजपंचे, कदाचित वरचं साल/कवर काढून टाकल्यावर मिळतो तो दाणा आणि सालासकट अख्खा तो गोटा असं असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.
मोल्स्वर्थात हे एवढच मिळालं.
दाणागोटा (p. 408) [ dāṇāgōṭā ] m A comprehensive term. Grain &c.; grain, pulse, and such-like.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सुक्या खोबर्‍याचा गोटा असतो, त्याचा येथे काही संबंध असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दाणागोटा हा शब्द जनावरांच्या खाण्यासंदर्भात जास्तवेळा वाचनात आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हे वैश्विक सत्य आहे काय?

फारा वर्षांपूर्वी, कॉलेजच्या दिवसांत, एका हरयाणवी सहाध्यायाबरोबर (किंवा सहलेक्चरबंक्याबरोबर म्हणा हवे तर) झालेल्या काही संभाषणात आमचेकडून काही कारणास्तव 'आपल्या'कडील (बोले तो, महाराष्ट्रातील) ज्वारीच्या भाकरीचा ज़िक्र झाला असता, त्यावर त्याची प्रतिक्रिया, "म्हणजे??? महाराष्ट्रात माणसे ज्वारी खातात??? 'आमच्या'कडे ज्वारी फक्त जनावरांना खाऊ घालतात!" अशा काहीश्या स्वरूपाची होती.

सांगण्याचा मतलब, 'आपल्या'कडे दाणागोटा हा शब्द केवळ जनावरांच्या संदर्भात वापरत असतीलही; परंतु म्हणून अन्यत्र कोठे तो माणसांच्याकरितासुद्धा वापरला जात असण्याच्या शक्यतेकरिता मन खुले ठेवण्यास काही हरकत नसावी, नाही का?

("कारण शेवटी आम्ही लिबरलच! त्याला काय करणार?" - 'न'.बा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे तर ते लोक जन्मापासून म्हणजे परंपरेने मक्याची भाकरी/रोटी खातात. आम्हांला दुष्काळाच्या निमित्ताने अधून मधून ती खावी लागते.
(असें उत्तर त्यावेळीं आपणांस कसें काय सुचलें नाहीं, बुवा?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनावरांच्या-जास्त करून गुरांच्या- संदर्भात चारापाणी आणि वैरण हे शब्द अधिक वेळा वापरलेले पाहिले आहेत. दाणा-गोटा हा शब्द सैन्याच्या रसदीच्या संदर्भात वापरलेला जास्त वाचला आहे.
एक तर्कः गुरांच्या संदर्भात शेण-गोठा या शब्दाप्रमाणे दाणा-गोठा हाही शब्द वापरात होता का? म्हणजे गोठ्यातले शेणमूत साफ करून गोठा स्वच्छ करून मग त्यात दाणा भरून गोठा पुन्हा गुरांसाठी तयार करून ठेवणे या अर्थाने?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्र आवडलं. थोडं लांबल्यासारखं वाटलं.

या पत्राला लिहिलेलं उत्तर कसं असेल, अशी उत्सुकता वाटून गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(लेखकाच्या वयाकडे बघता - त्यामुळे असावे) काहिशा जुन्या पद्धतीच्या किंवा पाल्हाळीक (व आता बुलेट पॉइंट्स ना महत्त्व असणार्‍या काळात काहिसे बोरिंग वाटु शकेल) अशा भाषा व शैलीत हे पत्र असले तरी(ही) बर्‍यापैकी आवडले.

या पत्राला लिहिलेलं उत्तर कसं असेल, अशी उत्सुकता वाटून गेली.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वर 'न'बा यांनी म्हटल्याप्रमाणे कदाचित पत्रावरील मिलिंद यांचा अभिप्राय 'पकवू नका' अशा दोन शब्दांत असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मिलिंद हे जर लैच फाटक्या तोंडाचे असतील तर कदाचित ' आयुष्यभर स्वतःच्या वायझेड कल्पनांना कवटाळून आता त्याचे उदात्तीकरण करण्यापेक्षा जे काही पांघरूण घेऊन आडवे व्हायचे असेल ते लवकर व्हा' असेही म्हणतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी शाळेत आम्हाला लोकमान्य पुण्यतिथीला भाषण ऐकवायला जमिनीवर बसवलं होतं. सर्व कार्यक्रमांना जमिनीवरच बसवायचे. खडे बोचायचे. शेवटचे आभाराचे भाषण होईस्तोवर सर्व चिमुकली ढुंगणे वेदनेच्याही पलीकडे जाऊन बधीर झालेली असायची. रिटमिट्या लागायच्या. एकेक सेकंद मोजायचो.

पण त्या विशिष्ट लोकमान्य पुण्यतिथीला लईच झालं. "टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे आठ पैलू" हा भाषणाचा विषय.

संथपणे असंख्य शब्द उलगडत साधारण अर्धापाऊण तास (पर्सिव्हड् अर्धापाउण तास अर्थात.. कारण घड्याळ कोण देणार?) झाल्यावर वक्त्यांनी क्षणभर थांबून पाण्याने भरुन फुलपात्र तोंडाला लावलं आणि "आता संपलं वाटतं" म्हणून आम्ही आशेने सुकलेल्या ओठांवर जीभ फिरवली.. पाण्याचा घोट संपवून ते म्हणाले "हा होता टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा पहिला पैलू.."

खूप रडलो.

अवांतर झालं.. सॉरी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि तुमच्या लेखनाचा मी नेहमीचा पंखा आहे मात्र एक रीझर्व्हेशन होत ( ते थोड साखरपाकात कॅडबरीचा चुरा टाकुन मधात टाकल्यासारख दवणेइश पुलकित कधी कधी काहि काही ठिकाणी वाटायच ) पण आज या तुमच्या अ-भुतपुर्व विलक्षण प्रतिसादानंतर तुमच्याविषयीचे माझे सर्व पुर्वग्रह मी बाळगले त्याचीच मला लज्जा वाटत आहे.
मै अपनी हि नजरो मे गिर गया हु,
सर्व बालके जगात एकसारख्याच टॉर्चर मधुन जात असतात याने तर आश्चर्य चकितच झालो.
काहिंना माइक हातात घेतल्यावर सगळ जग कान टवकारुन आपला एकेक शब्द झेलण्यासाठी आतुर झाले आहेत असा भ्रम च होतो.
व समोर निष्पाप निरुपद्रवी हक्काचे बालश्रोते असल्यावर तर मग काय विचारता जिभेवर सरस्वती बेभान होउन नाचु लागते.
गवि तुमच्या बालपणाविषयी सह-अनुभुती वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहिंना माइक हातात घेतल्यावर सगळ जग कान टवकारुन आपला एकेक शब्द झेलण्यासाठी आतुर झाले आहेत असा भ्रम च होतो.
व समोर निष्पाप निरुपद्रवी हक्काचे बालश्रोते असल्यावर तर मग काय विचारता जिभेवर सरस्वती बेभान होउन नाचु लागते.

ROFL ROFL

गविंबद्दल माझे पूर्वग्रह (= he is not a person who suffers fools gladly) मात्र आहेत तसेच आहेत .... Wink
पण त्या भाऊजी शब्दावरुन गविंनी जो आकाशवाणी श्रुतिकेचा (http://aisiakshare.com/node/3593?page=1#comment-83500) उल्लेख केलाय तो इतका आवडलाय. खरच एकदम शार्प मेमरी आहे Smile
____
रिटमिट्या शब्दही मस्त. पहील्यांदा ऐकला पण चक्क अनुभवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या एका मित्राच्या भाषेत 'कुल्याला कढ येतात'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

सर्व कार्यक्रमांना जमिनीवरच बसवायचे.

हे वाक्य अगोदर नजरेतून निसटले होते.

अतिशय नेमके निरीक्षण आहे. किंबहुना, काही वर्तमानपत्रे ही याच कारणामुळे खपत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पत्र आवडलं. मधेमधे कंटाळा येत आहे असे वाटायच्या आंत , एखादा नवीन मुद्दा चमकू लागे. अशा अवस्थेत, एका दमांत, सर्व पत्र वाचलं.

माझ्या बघण्यांत, नव्वदीत गेलेले असंख्य जवळचे नातेवाईक आहेत. त्यांचे विचार साधारण याच प्रकारचे होते. काहींनी तर, जगाचे रहस्य समजल्याच्या खात्रीने 'महाकाव्य' लिहायला घेतले होते. त्यांचे अनुभव, त्यांच्या वागण्याचे जस्टीफिकेशन वगैरे गोष्टी ऐकून आणि त्यांत मला आलेल्या अनुभवांची भर घालून असे म्हणावेसे वाटते की, शब्दांची कितीही बुडबुडे फुलवले, जी.ए. टाईप कितीही लेखकांच्या साहित्याची पारायणे केली, तरी जीवनाचे खरे रहस्य कधी कुणाला कळले नाही व कळणारही नाही. प्रत्येकजण आपापल्या वाट्याला आलेला कॅलिडोस्कोप ज्या नजरेने बघतो, तसे त्याचे मत होत जाते.

अवांतरः असे काही मी लिहिले तर इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या माझ्या 'मिलिंदांना' त्यांतले वाचून कळेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतरः असे काही मी लिहिले तर इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या माझ्या 'मिलिंदांना' त्यांतले वाचून कळेल ?

सोन्या बागलाणकराच्या प्रेमपत्रातील त्या सोन्या बागलाणकरालाच अवगत असतील अशा विनाकारण हायफंडू मराठी शब्दांना (लाल शाईने? चूभूद्याघ्या.) वर्तुळांकित करून, त्याशेजारी आपल्या सुवाच्य अक्षरात इंग्रजीत 'स्टुपिड' असा शेरा मारून ते पत्र सोन्या बागलाणकरालाच परत करणारी ती कन्यका कोण? बागलाणकराचा 'बॅगी', हरचेकराचा 'हॅरी' आणि खुद्द ताटकेसाहेबाचा 'टॅट्' करणारी?

काही नाही, उगाचच आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कु. नमा ओक.

बेबंदशाही-मुकर्रबखान-पगडी-ष्टाईल-केशरचना-फेम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रिय बाबा,
तुमचे हे लांबलचक पत्र वाचले. तसे तर हे खूप कंटाळवाणे काम होते, पण वाचण्याचा आणि समजवून घेण्याचा प्रयत्न केला.
लहान तोंडी मोठा घास घेतो, पण तुम्ही आता कादंबर्‍या वाचणे कमी करा. माझा अनुभव असा आहे की आपण जसे बोलतो, तसे साधे-सरळ लिहिले तर पटकन कळते. म्हणजे अर्थात त्यामुळे तुम्ही ऐसीअक्षरेसारख्या साईटवर पॉप्युलर होणार नाही, हे मला माहीत आहे. पण तुम्हाला सोप्या, सुटसुटीत शब्दात विचार मांडता येतील आणि ते माझ्यासारख्या सामान्य इतरांना समजू शकतील.

तुम्हाला छानछान सुविचार लिहायची आवड आहे, म्हणून खास काही सुविचारः
"Make everything as simple as possible, but not simpler." - Albert Einstein
"If you can't explain it to a six year old, you don't understand it yourself." - Albert Einstein
"Simplicity is the ultimate sophistication.” - Leonardo da Vinci
“The greatest ideas are the simplest.” - William Golding
“Nature is pleased with simplicity. And nature is no dummy” - Isaac Newton
“One should use common words to say uncommon things” - Arthur Schopenhauer
“Any darn fool can make something complex; it takes a genius to make something simple.” - Pete Seeger

तुम्ही आजवर किती जगलो ते तपासून बघताय, ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्यामते त्यासाठी तुमच्या वयाचे व्हायची गरज नाही. ते तर आपण रोजच करू शकतो. मॅनॅजमेंटच्या भाषेत त्याला SWOT analysis म्हणतात. Strength, Weakness, Opportunity, Threat हे वरचेवर बघावेत. म्हणजे आयुष्यात काय मिळवायचे आहे ते कळते. दुसरी गोष्ट म्हणजे मॅस्लोचा पिरॅमिड बघा, म्हणजे आपण आयुष्यात काय कमावले, आता कुठल्या टप्प्यावर आहोत आणि पुढे कुठे जायचे आहे, ते कळते. मी जेव्हा रोज एकटा फिरायला जातो ना, तेव्हा मी तरी असा विचार करतो.

शेवटी काय, आयुष्य हा प्रवास आहे. आनंद कसा मिळवायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही शून्य मनानं केवळ निष्ठत असता, याला कोणीच काही करू शकणार नाही. तुम्हाला प्रत्येक नवा दिवस कालच्यासारखाच असतो, पण मला प्रत्येक दिवस नवी आशा दाखवतो. मी आजही जिवंत आहे आणि स्वतःसाठी काहीतरी छान करू शकतो, ही भावनाच किती सुंदर आहे. तुम्ही प्रॉब्लेमकडे बघण्याऐवजी सोल्यूशनकडे बघा, इतकेच सांगावेसे वाटते.

तुमचा बाकीचा निबंध/पत्र काही वाचवले गेले नाही, त्यामुळे तूर्तास इतकेच.

आपला
मिलिंद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आरंभी सहजशक्य वाटणाऱ्या खूपशा गोष्टी मला प्रयत्नांतीही अशक्य झाल्या, आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहजगत्या घडून आल्या.

होय ही गमतीशीर विसंगती बरेचदा अनुभवास येते.
ज्या अनुभवाची आपण जीवापाड वाट पहातो तो अनुभव अळी असलेले सफरचंद निघते ...... तर ..... ध्यानी मनी नसताना, अवचित हापूस आंबा ओटीत पडतो.
कोणतं कर्म (भलेबुरे) केव्हा फळ देण्याइअतके राइप होइल काही काही सांगता येत नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या अनुभवाची आपण जीवापाड वाट पहातो तो अनुभव अळी असलेले सफरचंद निघते ...... तर ..... ध्यानी मनी नसताना, अवचित हापूस आंबा ओटीत पडतो.

नाही म्हणजे, अळीवाल्या सफरचंदाचा ज़िक्र केलात, म्हणून विचारतो... हापूसच्या कोयीतून कधी भुंगा निघालेला पाहिला नाहीत काय? अतिशय आम बाब आहे.

....................

भुंगा म्हणजे मिलिंद, हा येथे एक निव्वळ परंतु हसीन योगायोग आहे.

आम म्हणजे आंबा, हादेखील येथे एक इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय बाई एक विचीत्र किडा निघतो काही आंब्याच्या कोयीतून Sad

भुंगा म्हणजे मिलिंद, हा येथे एक निव्वळ परंतु हसीन योगायोग आहे.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुंगा हा सहसा तोतापुरी आंब्याच्या* कोयीतून निघतो**.

*तोतापुरीला आंबा म्हणावे का/का म्हणावे हा एक गहन प्रश्न आहे.

**पाऊस पडू लागल्यावर जे आंबे झाडावर राहिलेले असतात त्यातून हमखास भुंगा निघतो असे आमचे (अनुभवी कोकणी) वडील सांगायचे. तोतापुरी हे पावसाळा सुरू झाल्यावरच विकायला येतात हे कारण असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.