अयशस्वी ठरलेले काही तंत्रज्ञान सुविधा (उत्तरार्ध)

ड्होरॅक कीर्बोर्ड
QWERTY कीबोर्डचा नेमका शोध कुणी लावला, कधी लावला व कशासाठी लावला याबद्दल मतभिन्नता असली तरी 1880 मध्ये टाइपिंगच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या, यावर इतिहासकारांचे एकमत आहे या स्पर्धेत जिंकलेल्यानी कीबोर्ड चक्क तोंडपाठ करून टाइप करत होता. परंतु यातील कीच्या मांडणीवरून काहीही अर्थबोध होत नव्हता. परंतु ऑगस्ट ड्होरॅक यानी 1936 मध्ये कीबोर्ड संबधीचे एक पेटंट घेतले. या संशोधकाच्या मते त्याच्या कीबोर्डवर टाइप करताना बोटांची कमी हालचाल व जास्त वेगाने टायपिंग आणि कमीत कमी चुका होतात. 1940 च्या सुमारास नौदलाने रेमिंग्टन वापरणार्‍या त्यांच्या टायपिस्टला ड्होरॅक की बोर्ड वापरण्याचे प्रशिक्षणही दिले. अमोरीकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्याच्या OSX, LINUX, ANDROID, IOS, BSD यासारख्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये QWERTY किंवा ड्होरॅक कीबोर्ड हे दोन्ही वापरण्याच्या सोइ दिलेल्या आहेत. परंतु QWERTY च्या बद्दल कितीही तक्रारी असल्यातरी अजूनही त्याचा वापर थांबला नाही. स्टीफन जे गूल्ड या वैज्ञानिकाचे आई वडील हे दोघेही टायपिस्ट होते. त्यामुळे जगातल्या यच्चावत टाइपिस्टनी QWERTY कीबोर्ड एकाच दिवशी वापरायचे थांबवून ड्व्होराक कीबोर्ड शिकल्यास आपण सर्व यशस्वी होऊ. असे त्याला म्हणावेसे वाटले.

फ्लाईंग ट्रेन

जॉर्ज बेनी या संशोधकाने शोधलेल्या बेन्नी रेलप्लेनचे पहिले उड्डाण 8 जुलै 1930 रोजी ग्लास्गो शहरात झाली. अगदी उंचावर असलेल्या स्टील गर्डर फ्रेमच्या ट्रॅकच्या खाली लोंबकळणार्‍या सिगारेट-सदृश्य बोगीला विद्युत (वा डिझेल) इंजिन व दोन प्रोपेलर्स जोडलेले होते. या ट्रेनमधून जाताना कुठेही अडथळा नसल्यामुळे प्रवास अगदी सुखकर वाटला. एडिबरो ते ग्लास्गो पर्यंत याच प्रकारचे रूळ टाकून फ्लाईंग ट्रेन चालू करण्याचा प्रकल्प प्रस्ताव मांडला. परंतु बेन्नीला आर्थिक मदत न मिळाल्यामुळे याचे पुढे काही झाले नाही. खरे पाहता लंडन मेट्रोने या प्रकल्पामध्ये रुची दाखवली होती. कारण लंडनच्या श्रीमंताना प्रवास करताना लंडनच्या झोपडपट्टीचे दर्शन नको होते.

1956 साली हे गर्डर फ्रेम खाली उतरवून जागा साफ करण्यात आली. व फ्लाईंग ट्रेन इतिहासजमा झाली.

विंगसूट

पक्षीप्रमाणे आपल्यालाही पंख असावे ही माणसांची फार पूर्वीपासूनची इच्छा होती. व 4 फेब्रूवारी 1912 रोजी फ्लँझ रिचेल्ट या फ्रेंच माणसाने एफेल टॉवरवरून विंगसूटचा वापर करून उडी मारली. त्याचा विंगसूट हाताच्या बाह्यापासून लांब पंख्याच्या आकाराचा होता त्यात हवा गेल्यास ते फुगू शकले असते. फ्लँझच्या कल्पने प्रमाणे टॉवर वरुन उडी मारल्यानंतर काही क्षणातच सूट मध्ये हवा जाणार होती व एखाद्या पक्षीच्या पंखाप्रमाणे तो तंरगत खाली उतरणार होता. परंतु हा प्रयोग यशस्वी झाला नाही. त्याचे प्रेतच खाली पडले. कारण मध्येच कुठेतरी त्याला हार्टअटॅक आल्यामुळे तो मेला. काही वर्षानी फ्लेम सोहन् यांनी या विंगसूटच्या डिझाइन मध्ये भरपूर सुधारणा केली त्याच्या सूटमध्ये स्टीलच्या तारा टाकून त्या भोवती लोकरीचे कापड शिवलेले होते. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. विमानातून हजारो फूट उंचीवरून तो हे सूट वापरून तरंगत खाली येत होता व जमिनीपाशी आल्यानंतर पॅराशूट उघडून जमलेल्या जमावाच्या मध्ये सुरक्षितपणे उतरत होता. त्यामुळे त्याला बर्ड मॅन म्हणून ओळखत होते. परंतु तोही अशाच एका प्रयोगच्यावेळी पॅराशूट न उघडल्यामुळे गर्दीतच पडून मेला. नंतर कित्येक वर्षे या सूटचे नामोनिशाण राहिले नाही परंतु 1999 च्या सुमारास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्कायडायव्हिंगचे रोमांचक खेळ खेळणारे हे विंगसूटचा वापर करू लागले. व हे सूट बर्ड मॅन म्हणूनच आता ओळखले जातात. तरीसुध्दा दरवर्षी विंगसूट घातलेले असतानासुद्धा सुमारे 20 खेळाडूंचा मृत्यु होतो.

एअरशिप

विमानांचे उत्पादन करणार्‍या बोइंग व एअरबस या कंपन्यांनी विमानाऐवजी एअरशिपमध्ये पैसा, श्रम ओतला असता तर या जगाचे अगदीच वेगळे चित्र दिसले असते. विमानांपेक्षा एअरशिप्सचा वेग कमी असतो ही एकमेव उणीव सोडल्यास एअरशिप्समुळे ध्वनी प्रदूषण होत नाही, इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते, देखभाल वा लॉजिस्टिक्सची गुंतागुंत नाही हे मान्य करावेच लागेल. यांच्या टेक ऑफसाठी एअरपोर्ट वा एअरस्ट्रिप्सची गरज भासणार नाही. अगदी शहराच्या मध्यभागातूनसुद्धा एखादे टॉवर उभारून एअरशिपचे उड्डाण शक्य होते. विमानापेक्षा जास्त प्रवाश्यांची सोयसुद्धा यातून होऊ शकते. परंतु याच्या अपघातच्या वेळच्या स्लोमोशनमध्ये चित्रित केलेल्या चित्रफिती बघितल्यावर या एअरशिप्सच्या उड्डाणास कुणीही अनुमती देणार नाही हेही तितकेच खरे.

1930 साली एक ब्रिटिश एअरशिप फ्रान्स येथे कोसळल्यानंतर ब्रिटिश कंपन्यांनी या प्रकल्पातून अंग काढून घेतले. हिंडेनबर्ग येथील अपघातानंतर अमेरिकन कंपन्यानी याला कायमचे बासनात गुंडाळून ठेवले.

मॉड्युलर इमारती

मॅनहटन शहरात 65 मजल उंचीची, 2100 कार्सच्या पार्किंगची सोय असलेली, मॉल्स, प्लाझा, प्राथमिक शाळा, हॉटेल्स इत्यादी सुविधा असलेली एक अत्याधुनिक इमारत बांधण्यासाठी प्रशासनाने येल विद्यापीठाच्या पॉल रूडॉल्फ या वास्तुविशारदाला पाचारण केले. रूडॉल्फच्या मते आधुनिक शहराच्या बकालपणाला चुकीची नगररचना कारणीभूत आहे. ऑफिससाठीची इमारत येथे व राहण्यासाठीची अपार्टमेंट आणखी कुठेतरी हे बदलायला हवे असे त्याला वाटत होते. रूडॉल्फच्या डोक्यात त्या काळी पूर्वरचित इमारतींची कल्पना घोळत होती. इमारतीचे सुटेभाग वेगळ्या ठिकाणी तयार करून साइटच्या ठिकाणी त्याना जोडण्यात यावे अशी ती कल्पना होती. मॅनहटनचा प्रकल्प हा त्याला महत्वाकांक्षी प्रकल्प वाटला व त्याच्या या अफलातल्या कल्पनेला उत्तेजन मिळेल असे त्याला वाटत होते. साइटवर इमारतीचे भाग बांधण्यापेक्षा अगोदरच कुठेतरी सुटसुटे बांधून नंतर ते जोडून इमारत पूर्ण करण्याची त्याची इच्छा होती. त्यानी त्या अनुषंगाने डिझाइन पूर्ण केले. इमारतीतील प्लंबिंग, वायरिंग, पायपिंग, ड्रेनेजसकट पूर्ण केलेल्या डिझाइनमुळेच त्याची गोची झाली. प्लंबर्स व इलेक्ट्रशियन्सच्या युनियन्सने प्रकल्पाला कडकडून विरोध केला. असल्या डिझाइनमुळे प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स उपाशी पडतील अशी भीती दाखवली. शेवटी प्रकल्पतून त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पॉल रुडॉल्फचे स्वप्न धुळीला मिळाले.

परंतु पुढे कित्येक वर्षानंतर याच प्रकारचे पूर्वरचित इमारती सिंगापूर, शांघाय व अमेरिकेतील ब्रूकलिन शहरात बांधण्यात आल्या. कदाचित यानंतर मॉड्युलर इमारतींना पर्याय नाही असेच म्हणावे लागेल.

एरो सायकल
1950च्या सुमारास अमेरिकन सैनिकांसाठी HZ -1 या एरो सायकलीचे प्रारूप तयार करण्यात आले. या सैनिकाना कमीत कमी वेळेत लांब अंतरावर जावून व उंचीवरून टेहळणी करायचे होते. यासाठी डी लॅकनर हेलिकॉप्टर्स या कंपनीने एकच सैनिक काही अंतरापर्यंत जाण्यासाठी पर्सनल हेलिकॉप्टरचे डिझाइन प्रस्तुत केले. हेलिकॉप्टरसारखे रोटर ब्लेड्स, त्याखाली इंजिन, व एरो सायकलीच्या सुरक्षित लँडिंगसाठी ब्लेड्सच्या टोकाला बलून्स असी ती रचना होती. प्रशिक्षित नसलेला सैनिकसुद्धा वीसेक मिनिटात साधी सायकल शिकल्याप्रमाणे एरो सायकल चालवू शकतो, असे डिझाइनरच दावा होता. सायकलच्या मधोमध उभा असलेला सैनिक स्वतःच्या किटसकट इंजिनचे थ्रॉट्लिंग करत अंतर कापू शकतो. प्रारूपवरील काही प्राथमिक चाचण्या यशस्वी ठरल्या. परंतु नंतरच्या चाचण्यामध्ये लँडिंगच्या वेळी रोटर ब्लेड्स क्रॅश होऊ लागल्यामुळे अपघात होऊ लागले. मुळात एरो सायकलीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे सैनिकाला जमत नव्हते. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला गेला.

आता याची जागा ड्रोन्स घेत आहेत.

जॉयस्टिक व ट्रॅकबॉल

संगणकांसाठी माउस यायच्या आधी संगणक तज्ञ जॉयस्टिक व ट्रॅकबॉल या सुविधावर लक्ष केंद्रित करत होते. स्क्रीनवरील सूचनादर्शक (pointer) म्हणून या सुविधा वापरत असताना कर्सर नेमक्या हव्या असलेल्या बिंदूपाशी नेल्याशिवाय संगणकाला सूचना मिळत नसे. माउसने मात्र या उणीवावर मात केली. मेंदू, डोळे व हाताची बोटं यांच्यातील अप्रत्यक्षपणे होत असलेल्या सिंक्रोनायझेशनमुळे कर्सर नेमक्या बिंदूपाशी तंतोतंतपणे नेण्याची गरज नाही हे लक्षात आले व माउसमधील गुंतागुंत कमी करणे शक्य झाले. माउस हा इतर सुविधांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कार्यक्षम होऊ शकतो हे लक्षात आले. यातही बॉल असून त्याच्या हालचालीवरच माउस काम करतो. म्हणूनच माउस हे Manual Operated Utility for Software Enhancement म्हणून बाजारात तगून आहे.

ट्रॅकबॉलचा सूचनादर्शक म्हणून वापरण्याची कल्पना राल्फ बेंजालिन या तज्ञाची होती. दुसर्‍या महायुद्धात रडारच्या नियंत्रणासाठी ट्रॅकबॉलचा वापर करण्यात आला. विमानातील वेग नियंत्रणाचे काम करणार्‍या जॉयस्टिकचा वापरही संगणकासाठी काही काळ करण्यात आला. परंतु याचा वापर प्रामुख्याने व्हिडिओ गेम्स व एव्हिएशन क्षेत्रातच होत आहे.
तरीसुद्धा माउस ही असाधारण सुविधा आहे असे समजण्याचे कारण नाही. लहान मुलांच्या एका चाचणीत कर्सरला स्क्रीनच्या वरच्या बाजूला नेण्यास सांगितल्यावर काही मुलं चक्क माउस उचलून स्क्रीनच्या वरच्या बाजूस ठेवत होते. हाच प्रकार टच स्क्रीन वापरताना वयस्करांच्या बाबतीतही होत असतो.

व्हिडिओ चॅट
संगणकाचा वापर फक्त आकडेमोड वा ग्लोरिफाइड टाइपरायटर म्हणून न करता ते एक उत्कृष्ट प्रतीचे संपर्क माध्यम होऊ शकते याचा साक्षात्कार कदाचित माउसच्या शोधानंतर झाला असे म्हणता येईल. माउसमुळे जलद गतीने टेक्स्ट टाइप करून पाठविणे व पलीकडून आलेले टेक्स्ट वाचणे व त्याला परत उत्तर देणे, व अशाप्रकारे प्रश्नोत्तरांची व माहितीची देवाण घेवाण फारच सुलभ झाले. स्क्रीनवरील अक्षर वाचणे सुलभ झाले. परंतु अशा प्रकारे चॅट करताना समोरची व्यक्ती स्क्रीनवर दिसत असल्यास त्याच्या देहबोलीवरून आपला प्रतिसाद नक्कीच बदलत गेला असता. अशा प्रकारच्या व्हिडिओ चॅटवरील संभाषणाचे प्रात्यक्षिक 9 डिसेंबर 1968 रोजी स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखवण्यात आले. वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीने याच कल्पनेचा वापर करत व्हिडिओफोन बाजारात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु व्हिडिओ चॅटिंग ही फारच गुंतागुंतीची असल्यामुळे ती बाजारात यशस्वी होऊ शकली नाही. कदाचित व्हिडिओ समोर येणार्‍या व्यक्तीला वेळी अवेळी संपर्क साधणार्‍याला आपला चेहरा दिसू नये असे वाटत असावे. संगणकावरील स्काइप वा तत्सम सॉफ्टवेअर वापरून वा टेलिकॉन्फरन्सिंग वरून व्हिडिओ चॅट-सदृश संभाषण होत असले तरी ते सांगून ठरवून केले जात असते. त्याला अभ्यंतर नसावे. त्यामुळे तरुण – तरुणींच्यात स्काइपवरून चॅट करण्यापेक्षा टेक्स्टिंगलाच जास्त पसंती दिले जात असावे.

म्हणूनच या तंत्रज्ञानाला कचर्‍याची टोपली दाखवली असावी.

टीव्ही इंटरनेट

गेली कित्येक वर्षे टीव्ही व इंटरनेटची सांधेजोड करण्याची कल्पना अनेक उद्योजकांच्या डोक्यात घोळत आहे. बहुतेक घरामध्ये इंटरनेट नसेलही. परंतु टीव्ही मात्र हमखास असतो. जर टीव्हीतून इंटरनेट सुविधा देणे शक्य झाल्यास ती सुविधा हातोहात विकला जाईल असा त्याकाळी अंदाज होता. 80च्या सुमारास AT&T आणि CBS कंपन्यानी दोन मनोरंजन टर्मिनल्सची प्राथमिक चाचणीही घेतली होती.

परंतु 90च्या दशकात इंटरनेट हे माहिती तंत्रज्ञानाचे सुपर हायवे आहे हे लक्षात आल्यानंतर टीव्ही फक्त मनोरंजनाचे साधन होऊ शकते याची खात्री झाली व ही कल्पना बाजूला पडली. परंतु स्टीव्ह पर्लमन हा सॉफ्टवेर अभियंता वेबटीव्हीच्या संशोधनासाठी श्रम खर्ची घालू लागला. मायक्रोसॉफ्टने पर्लमनची कंपनी विकत घेतली. व टीव्ही स्क्रीनचा वापर गेम्स खेळण्यासाठीच होऊ लागला.

आजकाल Apple TV, WD TV, Amazon Fire TV, Google TV, Android TV, Now TV (UK), Chromecast, DVR smart TV इत्यादी टीव्ही यंत्रणा इंटरनेटचा वापर करून एंटर्टेनमेंट चॅनेल्स उपलब्ध करून देत आहेत. परंतु या स्मार्ट टीव्हीच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेला टीव्ही अजूनही घराच्या कोपर्‍यात विराजमान आहे. व ग्राहक संतुष्ट आहेत.

माणूस
माणसाच्याऐवजी सॉफ्टवेर किवा मशीनच्या हातात सर्व नियंत्रण दिल्यास बिघडले कुठे? हा प्रश्न वरच्यावर डोके काढत असते. अलीकडेच गूगलने चालकविरहित कार व्यवस्थितपणे चालवून याची चुणूक दाखवली. यापूर्वीसुद्धा कित्येक ठिकाणी रोबोंचा वापर करत माणसांना जबाबदारीतून मुक्त केले आहे. व मशीनच्या कार्यक्षमतेपुढे माणूस फिका पडत आहे हे सप्रमाण सिद्ध झाले आहे. सीसीटीव्ही, संगणक व त्यासाठी बनविलेल्या अल्गॉरिदम्सचा वापर करून अपराध्यांना अपराध करण्यापूर्वीच (?) परस्पर पकडण्याची शक्कल लढवली जात आहे. व टेक्नोसाव्हींच्या दबावापुढे नमते घेत हे स्वप्न अस्तित्वात येईलही. यामुळे माणूस हा उपरा ठरत आहे.

मुळात माणसांकडून चुका होऊ शकतात; माणसं मूडी असल्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवण्यात काही अर्थ नाही; त्यांच्यात सातत्याचा अभाव असतो; ते sloppy असतात; अशा अनेक तक्रारी माणसांच्याबद्दल आहेत. हे सर्व जरी खरे असले तरी जगाच्या व्यवहारात अशा अनेक गोष्टी आहेत की ती माणसच करू शकतात; मशीन्सना ते शक्य होणार नाही. काही बारकावे असतात त्या फक्त माणसांनाच कळतात. माणसं अनुभवाने शिकतात. मशीन्स फक्त डाटा गोळा करू शकतात; अनुभवांची शिदोरी त्यांच्याकडे नाही व अनुभवातून आलेले शहाणपणही नाही. आज जरी मानवसदृश रोबो वा 3 डी प्रिंटर्स वा ऍप्स माणसापेक्षा वरचढ वाटत असले तरी माणसाला पर्याय नाही हेही तितकेच खरे.

त्यामुळे माणूस प्राणी हे एक अयशस्वी डिझाइन आहे म्हणून त्याला अडगळीत टाकता येत नाही.

.....समाप्त

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हा भाग आवडला. पूर्वार्धापेक्षा समहाऊ जास्त रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भागही आवडला.

इंटरनेट टीव्हीच्या तंत्रज्ञानामध्ये पुढे काय होतं याबद्दल मला कुतूहल आहे. सध्या काही चॅनल्स स्वतःची अॅप्स वापरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, टेनिस चॅनलचं फोन-टॅबलेटसाठी अॅप आहे, एचबीओ टीव्हीसाठी अॅप काढणार आहे असं कानावर आलं होतं. कदाचित काही काळानंतर केबल टीव्हीचा ग्राहकवर्ग आक्रसून जाईल असंही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.